पक्ष्यांचा सहवास अनुभवण्याची संधी आम्हाला आणखी एकदा मिळाली.काही कामानिमित्त मी सकाळी सकाळी आळंदीला गेलो होतो.परत येताना चऱ्होली
गावाजवळ शाळकरी मुलांचा घोळका दिसला.मुलांना साप वगैरे दिसलाय की काय अशी शंका येऊन मी स्कूटर थांबवली. अचानकच त्यांच्यासमोर उभा ठाकल्यामुळे पोरं बावचळली आणि काही तरी लपवायला लागली. पाहिलं तर त्यात किंगफिशरची,
म्हणजे खंड्या पक्ष्याची चार पिल्लं होती.घरट्यातून काढून पोरं ती विकायला निघाली होती.असं करणं बरोबर नाही हे मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला;पण पोरं बधेनात,तेव्हा मात्र गळ्यातलं आयडेंटिटी कार्ड दाखवून त्यांना झापलं.मग घाबरून त्यांनी ती चारही पिल्लं माझ्या स्वाधीन करून टाकली.कापडा
सहित त्यांना हलकेच शबनम बॅगमध्ये ठेवून गाडीला किक मारली.
चारही पिल्लांना थेट घरी आणलं.घरात चौथं शिरल्या
बरोबरच माझ्या हातातून एक पिल्लू भुर्रकन उडून पंख्यावर बसलं.दुसरं पुस्तकाच्या रॅकवर,तिसरं जिन्याच्या पायरीवर आणि चौथं थेट देव्हाऱ्यात जाऊन बसलं.आमच्या घरी आल्यानंतर त्यांच्या त्या वेळच्या हालचालींच्या आणि वर्तणुकीचा मी माझ्या अंदाजानुसार अर्थ लावला.आमच्या बंगल्यातल्या स्टडी रूममध्ये सर्वप्रथम पंख्याच्या पात्यावरच्या उच्च स्थानावर स्थानापन्न झालेला मला निवृत्तिनाथ वाटला. पुस्तकांच्या रॅकवर ठामपणे जाऊन बसलेला ज्ञानदेव,पायऱ्यांवर विसावलेला सोपानदेव आणि हक्काने देव्हाऱ्यात जाऊन बसलेली या तिघांची बहीण मुक्ताबाई ! आळंदीहून परत येताना भेटली म्हणून या चार पिल्लांना आम्ही या चार संतांची नावं देऊन टाकली.
आमच्या नेहमीच्या ट्रांझिट केजमध्ये या चारही पिल्लांची राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी फिश मार्केट गाठलं.
किंगफिशर हा पक्षी मत्स्याहारी. त्यामुळेच तो पाणथळींच्या आसपास आढळतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मासे आणणं भाग होत. पण त्या दिवशी आकुर्डी,
चिंचवड,पिंपरी यापैकी कुठल्याच मासेबाजारात छोट्या आकाराचे मासे मिळाले नाहीत.शेवटी अर्धा किलो मोठे मासे घेऊन घरी परतलो.मग जर्सीच्या मुक्कामात पक्ष्यांना भरवण्यासाठी आत्मसात केलेल्या तंत्राचा वापर करायचं ठरवलं.त्याचा इथे खूपच छान उपयोग झाला.किंगफिशर पक्षी त्यांच्या पिल्लांच्या पालन
पोषणाची जबाबदारी अत्यंत काळजीने घेत असतात.पिल्लांना भरवण्यासाठी छोटे मासे मिळाले नाहीत,तर ते मोठे मासे चोचीत धरून जमिनीवर किंवा एखाद्या झाडाच्या फांदीवर आपटून छोटे तुकडे करतात आणि मोठ्या मायेने पिल्लांना भरवतात.मीसुद्धा त्या मोठ्या माशांचे आडवे तिडवे तुकडे करून घेतले.आता हे तुकडे छोट्या माशांसारखेच दिसत होते.चौघाही भावंडांनी एकापाठोपाठ चोची उघडून ते तुकडे अध्याश्यासारखे गिळून टाकले.पोटं भरल्यावर पिल्लं शांतपणे झोपी गेली.त्यांच्या पिंजऱ्याभोवती चादर टाकली आणि खोलीतला दिवा बंद करून आम्हीही झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी पहाटे साखरझोपेत असतानाच या चौघांच्या चिवचिवटाने आम्हाला जाग आली.आदल्या दिवशीचं जेवण पचून पोरं पुन्हा भुकावली असावीत.
ब्रेकफास्टसाठी त्यांनी माशांच्या उरलेल्या तुकड्यांवर ताव मारला.बाहेर मस्त ऊन पडलं होतं.त्यांचा पिंजरा उचलून पोर्चमध्ये ठेवला.बागेतल्या पाइपने त्यांना अंघोळ घातली आणि पिंजराही धुऊन घेतला. कंपाऊंडचं गेट लावून घेतलं आणि आमच्या लाडक्या कुत्र्यावर,पिंटूवर या चौघांच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली.तोही इमानदारीने कावळे आणि मांजरांना पिल्लांपासून दूर हाकलू लागला.आसपासचे दयाळ,
बुलबुल,साळुंक्या आणि पोपटही किलबिलाट करत या नव्या पाहुण्यांना भेटून गेले.पिल्लं टकमक नजरेने हे सगळं पाहत होती.थोड्या वेळाने त्यांना घरात घेतलं आणि मी पुन्हा एकदा मासेखरेदी करून आलो.दुपारी प्रतिभा शाळेतून घरी आली तेव्हा तिला पाहून
पिल्लांनी चिवचिवाट सुरू केला होता.मासे चिरून ठेवले आणि दारं-खिडक्या बंद करून आम्ही पिल्लांना मोकळं सोडलं.भुर्रकन उडून पिल्लांनी वेगवेगळ्या जागा पटकावल्या. प्रतिभाने प्रत्येकापाशी जाऊन माशांचे तुकडे त्यांना भरवायला सुरुवात केली.आश्चर्य म्हणजे ही पिल्लं आम्हाला घाबरत नव्हती की बुजतही नव्हती.एक पिल्लू प्रतिभाच्या खांद्यावर बसलं, तर एक हातावर तिसरं हवेत झेपावून तिच्या हातातल्या डिशवरच लँड झाला आणि मासे मटकावू लागलं,तर चौथ्याने कमालच केली.तो उडत उडत येऊन डिशवर न बसता फक्त एक तुकडा घेऊन उडाला.अगदी पाण्यातून मासा पकडून उडून जाव तसाच.
जेवण झाल्यावर त्यांची रवानगी पुन्हा एकदा पिंजऱ्यात केली आणि आम्ही आमच्या कामाला लागलो.
संध्याकाळी मात्र मला आंबळी,म्हणजे छोटे मासे मिळाले.मग काय,पोरं खूष! पुढचा आठवडाभर असाच दिनक्रम होता.दिवसभरात चार ते पाच वेळा खाणं,
पिंजरे स्वच्छ करणं, त्यांना अंघोळी घालणं,ऊन दाखवणं,थोडा वेळ घरात मोकळं सोडणं आणि रात्री पिंजऱ्यावर चादर टाकून त्यांना गुडूप झोपवणं.आता ही चारही भावंड आम्हा तिघांना चांगलीच ओळखू लागली होती.जेवणाच्या वेळी न बुजता आमच्या अंगाखांद्यावर खेळायची.चौघंही आता चांगलीच धष्टपुष्ट झाली होती.
आता त्यांना पुन्हा निसर्गात सोडलेलं चालणार होतं,पण त्यापूर्वी घराबाहेरच्या थोड्या मोठ्या आकाराच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं.इथे त्यांना चोवीस तास आजूबाजूच्या जगाचा अनुभव मिळणार होता. खरोखरच त्या चौघांना हा पिंजरा मनापासून आवडला.
मोकळं आकाश,पक्ष्यांचे आवाज,वेट मोटमधल्या पाणीसाठ्यात सूर मारून मासे पकडणारे इतर किंगफिशर पक्षी आता त्यांना दिवसभर दिसत होते.
त्यांच्यासारखंच आपणही पाण्यात सूर मारून मासे खावेत अशी इच्छा एव्हाना त्यांच्यात जागी झाली असेल असं आम्हाला वाटू लागलं.
त्या दिवशी नारळी पौर्णिमा होती.मुसळधार पाऊस पडत होता.जेवायला घरी येताना मी सहज या पोरांच्या पिंजऱ्याजवळ थांबलो,तर आत तीनच पिल्लं ! एवढ्या पावसात चौथं पिल्लू गेलं कुठे?आजूबाजूला पाहिलं,तर त्या भावंडांमधलं सगळ्यात छोटं पिल्लू,म्हणजे मुक्ती मंकी हिलच्या दिशेने दहा-बारा फूट अंतरावर जाऊन आपल्या भावंडांना च्यूक-च्यूक करून बोलवत होती.
मला वाटलं,मुक्ती आपणहूनच बाहेर पडली असावी.पण तिचं वागणा पाहता लक्षात आलं,की आकाराने लहान असल्यामुळे ती पिंजऱ्याबाहेर येऊ शकली होती.
थोरल्या भावंडांना ते शक्य नव्हतं.पण का कुणास ठाऊक,भावंडांना सोडून जाण्याची तिची तयारी दिसत नव्हती.च्यूक च्यूक करत ती माघारी फिरली आणि माझ्यासमोर येऊन थांबली.
मी उजवा हात तिच्यासमोर धरला. आज्ञाधारकपणे ती हातावर आली.पिंजऱ्याचं दार उघडून मी हात आत घातला.क्षणात माझ्या हातावरून उडून ती आपल्या भावंडांच्यामध्ये जाऊन बसली.
गंमत म्हणजे मुक्त होण्याची संधी मिळूनही भावंडांसाठी मुक्ता पिंजऱ्यात परतली ते कुठल्या दिवशी,तर रक्षाबंधनाच्या !
दोन दिवसांनी पाऊस थांबला होता.चांगलं ऊन पडलं.या चार संत भावंडांना निरोप देण्याची वेळ आली होती.त्यांनाही बहुधा ते कळलं असावं.चौघांनी पोटभर नाश्ता केला.हलकेच एकेकाला ट्रान्झिट केजमध्ये घेतलं.हा पिंजरा गाडीत टाकून भोसरी तळ्यावर गेलो.पिंजरा गाडीबाहेर काढला.पिंजऱ्याचं दार उघडलं.काही क्षणांत निवृत्ती,ज्ञानदेव आणि सोपान पिंजऱ्याबाहेर पडून जवळच्याच झाडावर जाऊन बसले.तिथून ते मुक्ताला हाक मारत होते.त्या हाकांमुळे छोटी मुक्ताईही आत्मविश्वासाने पिंजऱ्याबाहेर झेपावली.चारही भावंडांनी उत्तरेला आळंदीच्या दिशेने झेप घेतली.