नेपोलियन बोनापार्टच्या अखेरच्या बंदिवासाच्या दिवसांत काय घडलं हे जाणून घेण्यासाठी एक ब्रिटीश महिला ज्युलिया ब्लॅकबर्न अटलांटिक महासागरातल्या एका छोट्याशा बेटावर जाऊन थडकते.आणि उलगडतो या बेटाचा आजवर अज्ञात असलेला इतिहास.
ज्युलिया ब्लॅकबर्न ही इंग्लंडमधली मध्यमवयीन लेखिका एकदा फ्रान्समध्ये सहलीसाठी गेली आणि तिथे नेपोलियनच्या प्रेमात पडली. नेपोलियनबद्दल जेवढं शक्य तेवढं वाचून काढल्यावर तिच्या लक्षात आलं,की युरोपच्या इतिहासावर आपला कायमचा ठसा उमटवणाऱ्या या असामान्य योद्ध्याच्या अखेरच्या दिवसांबद्दल कोणत्याच चरित्रात पुरेशी नोंद नाही.
ब्रिटिशांनी वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारूण पराभव केल्यानंतर त्याला युद्धकैदी म्हणून सेंट हेलेना या अटलांटिक महासागरातील जगापासून तुटलेल्या बेटावर ठेवण्यात आलं.नजरकैदेत सहा वर्षं काढल्या
नंतर तिथेच नेपोलियनचा मृत्यू झाला. या बेटावर तो कुठे राहिला,त्याने इतकी वर्षं काय केलं,बेटावरच्या रहिवाशांशी त्याचे कसे संबंध होते याबद्दल फारच त्रोटक माहिती उपलब्ध असल्याचं ज्युलियाच्या लक्षात आलं.तिच्या मनाने घेतलं,की आपण या बेटावर जाऊन राहायचं आणि नेपोलियनच्या अखेरच्या दिवसांबद्दल समजून घ्यायचं.एकदा ठरल्यावर ज्युलियाने लंडन,पॅरिस आणि लिस्बन इथल्या ग्रंथालयांमध्ये या बेटाबद्दल जेवढी माहिती मिळेल तेवढी गोळा केली.
'सोसायटी ऑफ ऑथर्स' या संस्थेने आणि ऑथर्स फाउंडेशन यांनी ज्युलियाच्या प्रवासासाठी,संदर्भ शोधण्यासाठी आणि वाटखर्चासाठी अनुदान दिलं.
ट्रेव्हर हर्ल हे सेंट हेलेनाचे अभ्यासक तिच्या मदतीस धावले. सेंट हेलेनाची माहिती आणि तिथल्या स्थानिकांचे संदर्भ हाताशी घेऊन ज्युलिया या बेटाच्या प्रवासावर जाण्यासाठी सज्ज झाली.
ही गोष्ट १९८९-९० च्या दरम्यानची.त्या वेळी सेंट हेलेना या बेटावर दोन महिन्यांतून एकदाच जहाज जात असे.त्यामुळे ते एकदा गेलं की पुढचं जहाज येईपर्यंत दोन महिने या बेटावर मुक्काम करण्यावाचून पर्यायच नसे.या बेटावर राहण्याच्या सोई आहेत की नाही,तिथे आपल्याला हवी ती माहिती मिळेल की नाही याचा काथ्याकूट करत बसण्यापेक्षा ज्यूलियाने बेटावर जाऊन थडकण्याचं ठरवलं. तिच्यासोबत तिची दोन मुलं होती.आईला बेटावर सोडून त्याच जहाजाने ती परत येणार होती.आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर अटलांटिक सागरकिनारी अंगोला नावाचा एक देश आहे.
तिथून विषुववृत्तावरून प्रवास करायला सुरुवात केली की सुमारे १,९२० किलोमीटरवर सेंट हेलेना बेट आहे.दहा कोटी वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकी भूखंड दक्षिण आफ्रिकेहून वेगळा होऊन सध्याच्या जागेकडे प्रवास करत असताना ते अस्तित्वात आलं.अमेरिका खंडातून यायचं झालं तर दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझिलच्या पूर्व किनाऱ्यावरून बेटावर येण्यासाठी आफ्रिकेच्या दिशेने २,५६० किलोमीटर प्रवास करावा लागतो.वाटेत दुसरं कुठलंही बेट लागत नाही.सोळा बाय आठ किलोमीटरचा परीघ असणारं हे छोटं बेट ब्रिटिशांच्या ताब्यात असून तिथली लोकसंख्या आजही पाच हजारांच्या वर नाही.
इंग्लंडहून सेंट हेलेनाला जायला सोळा दिवस लागतात.वाटेत आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्या
जवळच्या कॅनरी बेटांवर एक थांबा आहे.मग आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका दरम्यानचा प्रवास सुरू होतो.
वाटेत असेन्शन बेटाशी थांबून जहाज सेंट हेलेनाच्या दिशेने पुढे निघतं.असेन्शन बेटावरचे रहिवासी परक्यांना घाबरतात.या बेटाच्या एका टोकाला ब्रिटिश हवाई दलाचा तळ आहे.
फॉकलंडला जाणारी विमानं इथे इंधन घेऊन पुढे जातात.या बेटावर ज्वालामुखीजन्य खडकात कोरून अठराव्या शतकात मेलेल्या खलाशांच्या कबरी तयार केल्या आहेत.या बेटापासून तीन दिवसांच्या सागरी प्रवासानंतर सेंट हेलेनाचे कडे दिसू लागतात.सेंट हेलेनाच्या पूर्व बाजूला उंच उंच पहाडांची तटबंदी आहे.त्यातल्या एका दरीत जेम्सटाऊन हे बंदर वसलं आहे.सेंट हेलेनाला ज्वालामुखीय खडकांची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे.वारा आणि पाऊस यांच्या प्रभावामुळे या तटबंदीत काही खोरी निर्माण झाली आहेत.यामुळे जी शिखरं निर्माण झाली आहेत त्यांना स्थानिकांनी बायबलमधली नावं दिली आहेत,
तर काहींना त्यांच्या आकारांवरून नावं देण्यात आली आहेत. गाढवाचे कान,तुर्की टोपी,चिमणी,इत्यादी. थोडा कल्पनेला ताण दिला,तर एक शिखर, त्रिकोणी टोपी घातलेल्या नेपोलियनच्या डोक्यासारखं दिसतं,
असं स्थानिक म्हणतात.आपण त्याला 'हो' म्हणायचं असतं, असं ज्युलिया मजेने लिहिते.
सेंट हेलेना बेटावर सर्वसामान्य माणसांसोबत राहायचं असं ज्युलियाने ठरवलं होतं.तिथे गेल्यावर कळलं की त्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता.ज्युलियाने बेटावर मुक्काम ठोकला.नेपोलियनच्या अखेरच्या दिवसांचा शोध घेता घेता या बेटाचा अद्भुत इतिहास तिच्यासमोर उलगडत गेला.त्यामुळेच सेंट हेलेनावरून परत आल्यावर ज्युलियाने जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव 'एम्परर्स 'लास्ट आयलंड' असं असलं, तरी प्रत्यक्षात ते नेपोलियनबरोबरच सेंट हेलेनाची आणि हे बेट माणसाळवणाऱ्या फर्नांडो लोपेझचीही गोष्ट सांगतं.बेटावर स्थिरस्थावर झाल्यावर आणि ओळखीपाळखी करून घेतल्यावर स्थानिक मंडळींना ज्युलियाचा पहिला प्रश्न अर्थातच नेपोलियनबद्दल होता.
नेपोलियनचा सहा वर्षांचा मुक्काम ही बेटवासीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असणार अशी ज्युलियाची समजूत होती. पण आश्चर्य म्हणजे या बेटावरच्या कित्येकांना नेपोलियनबद्दल माहितीही नव्हती.त्यांच्या दृष्टीने बेटाच्या इतिहासातली सर्वांत महत्त्वाची व्यक्ती होती फर्नांडो लोपेझ.या लोपेझने ज्युलियाला हेलेनाच्या इतिहासात डोकवायला भाग पाडलं. हे बेट युरोपी दर्यावर्दीच्या नजरेस पहिल्यांदा पडलं ते १५०२ मध्ये.पोर्तुगीज दर्यावर्दी अॅडमिरल डी नोव्हा याला या बेटाचा शोध लागला.तो आपल्या जहाजासह भारतातून पोर्तुगालला चालला होता.हटके भटके - निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन.
या बेटाला प्रदक्षिणा घातल्यावर अखेरीस त्याला जहाज लावता येईल अशी एकमेव जागा सापडली.
आज तेच जेम्सटाऊन हे ठिकाण हेलेनावरचं एकमेव बंदर आणि या बेटाची राजधानी आहे.जहाज किनाऱ्याला लावून डी नोव्हा आणि त्याचे खलाशी या बेटावर उतरले. बेटावर मानवी वस्ती नव्हती,एवढंच नव्हे तर प्राणीही नव्हते.भरपूर झाडं, फळं,मासे असं मुबलक अन्न मिळाल्याने डी नोव्हा कंपनीने या बेटावर काही दिवस मजेत घालवले.तिथून जाताना त्या वेळच्या प्रथेप्रमाणे डी नोव्हाने जहाजावरच्या बकऱ्यांच्या काही जोड्या बेटावर सोडल्या.संकटकाळी या बेटावर कुणी उतरलं तर त्यांची सोय व्हावी,हा हेतू त्यामागे होता.डी नोव्हामुळे या बेटाच्या अस्तित्वाचा शोध जगाला लागला.बेटाच्या किनाऱ्यावर नांगर टाकलात्या दिवशी सम्राट कॉन्स्टंटाइनच्या आईचा,
हेलेनाचा वाढदिवस होता.त्यावरून या बेटाचं नाव सेंट हेलेना पडलं. बेटाबद्दल माहिती झाल्यावर जहाजं या बेटावर थांबू लागली.पुढे त्यानंतर तेरा वर्षांनी,म्हणजे १५१५ मध्ये आणखी एक जहाज या बेटावर थांबलं.
त्यातले उतारू पाय मोकळे करण्यासाठी बेटावर उतरले.त्यातच एक होता फर्नांडो लोपेझ. लोपेझ हा एक पोर्तुगीज सरदार होता.जनरल अल्बुकर्क बरोबर तो भारतात आला होता. लोपेझच्या नेतृत्वाखाली काही सैन्य भारतात ठेवून अल्बुकर्क आणखी कुमक आणायला पोर्तुगालला परत गेला.तो दोन वर्षांनी परतला,तेव्हा लोपेझने इस्लामचा स्वीकार करून स्थानिक राजाची नोकरी स्वीकारल्याचं त्याला आढळून आलं.त्यामुळे लोपेझला राजद्रोह आणि धर्मद्रोह या दोन अपराधांसाठी शिक्षा झाली. त्याचा उजवा हात,डावा अंगठा,कान आणि नाक तोडण्यात आले.डोक्यावरचे केस,भुवया आणि दाढी-मिश्याही चिमट्याने उपटून काढल्या गेल्या.या घटनेनंतर तीन वर्षांनी अल्बुकर्कचं निधन झालं,तेव्हा लोपेझने पोर्तुगालला परतायचा निर्णय घेतला.हे जहाज पाणी घेण्यासाठी सेंट हेलेना बेटाजवळ थांबलं,तेव्हा पोर्तुगालला परतण्याबद्दल लोपेझच्या मनात द्विधा निर्माण झाली.अशा अवस्थेत आपला कोण स्वीकार करेल,असं त्याला वाटू लागलं. त्यामुळे तो सेंट हेलेनावर उतरला आणि जंगलात जाऊन लपला.जहाज निघताना ही गोष्ट खलाशांच्या लक्षात आली.त्यांनी लोपेझला शोधण्याचा प्रयत्न केला,पण तो सापडला नाही. त्याच्यासाठी एक डबा बिस्किटं आणि खारवलेल्या मांसाच्या काही पट्ट्या किनाऱ्यावर ठेवून जहाज पोर्तुगालकडे निघालं.इकडे लोपेझने एक खड्डा खणून त्याच्या बाजूने दगड रचले आणि राहण्याची सोय केली.बेटावर भरपूर कंदमुळं आणि फळं उपलब्ध होती.समुद्रात मासे मिळत होते,पक्ष्यांची अंडी सहज हाती लागत होती.बेटावर कुठलाही हिंस्र प्राणी नव्हता.दुसरी माणसं नसल्यामुळे संसर्गजन्य आजाराचा प्रश्न नव्हता. त्यामुळे लोपेझ तिथे टिकून राहिला,स्थिरावला. सेंट हेलेनावर असा मुक्काम करणारा तो पहिलाच माणूस.एक वर्ष उलटलं.तिथल्या एकमेव नैसर्गिक बंदराला आणखी एक जहाज लागलं.
त्या खलाशांना लोपेझचं राहण्याचं ठिकाण सापडलं.
कपड्यांवरून तिथली व्यक्ती पोर्तुगीज असावी हे त्यांच्या लक्षात आलं.त्यांनी तिथे बिस्किटं,चीज आणि आणखी काही टिकाऊ खाद्यपदार्थ ठेवले.त्याबरोबर 'तू जो कोणी आहेस त्याने लपायची गरज नाही. तुला कुणीही त्रास देणार नाही,'अशा अर्थाची चिठ्ठीही त्याच्या निवाऱ्यात ठेवली.हे जहाज तिथून निघत असताना एक कोंबडा त्यावरून खाली पडला आणि लाटांबरोबर किनाऱ्याला आला.लोपेझने त्याला उचलून घेतलं व खाणं भरवलं.हा कोंबडा लोपेझच्या मागे मागे फिरू लागला.हळूहळू लोपेझ थांबलेल्या जहाजांवरील खलाशांना भेटू लागला.बऱ्याच खलाशांनी त्याला भेटवस्तू द्यायला सुरुवात केली.त्याला भेटवस्तू दिली की जहाजावर संकट येत नाही,ही समजूत हळूहळू दृढ होत गेली.या भेटीत भाजीपाला,
केळी,नारळ आदींची रोपं आणि बिया;डाळिंब,संत्री आणि लिंबाची रोपं; बदकं,कोंबड्या आदी पक्षी;मोर
,टर्की,ठिपक्या- ठिपक्यांच्या गिनी कोंबड्या,गायी,
डुकरं,कुत्री, मांजरं,बकऱ्या असे प्राणी यांचा समावेश होता. लोपेझ कष्टाळू होता.एका हाताने काम करता करता त्याने इथे मळे फुलवले.त्याचे प्राणी बेटभर हिंडू लागले.त्याच्या मळ्यातल्या फळांच्या बिया पशुपक्ष्यांनी बेटभर पसरवल्या.लोपेझ त्या बेटाचा राजा आणि एकमेव नागरिक होता.
जवळपास दहा वर्षांनंतर लोपेझची हकीकत पोर्तुगालच्या राजा-राणीच्या कानावर गेली. राणीने एक आज्ञापत्र पाठवून लोपेझला लिस्बनला बोलावून घेतलं.राजाज्ञेमुळे नाइलाजाने लोपेझ लिस्बनला पोहोचला.राजाने 'जे हवं ते माग' असं म्हणताच लोपेझने पोपना भेटायची इच्छा व्यक्त केली.पोपसमोर स्वतःच्या पापांचा झाडा देऊन त्याने क्षमायाचना केली. त्यानंतर लगेचच 'मला परत माझ्या बेटावर सोडा' असं त्याने राजाला सांगितलं.त्यानुसार त्याला पुन्हा सेंट हेलेनावर सोडण्यात आलं.पुढे लोपेझ आणखी वीस वर्षं एकटाच या बेटावर नांदला.जणू सेंट हेलेनाच्या शांततेने त्याच्या विद्रूपतेसह त्याला आपलंसं करून टाकलं होतं. सेंट हेलेना म्हणजे लोपेझ असं समीकरण बनलं. १५४६ मध्ये लोपेझचं सेंट हेलेना बेटावरच निधन झालं.
त्यानंतर पोर्तुगीज जहाजांवरचे जे खलाशी खूप आजारी असतील त्यांना या बेटावर उतरवण्याची प्रथा पडली.या बेटाच्या नैसर्गिक वातावरणात त्यांची तब्येत सुधारली की त्यांना पुन्हा मायदेशी आणलं जात असे.
त्यामुळे बेटावर एक लाकडी प्रार्थनागृह,एक छोटा धक्का आणि काही घरं यांची भर पडली.
यानंतर तब्बल २७० वर्षांनी, म्हणजे १८१५ मध्ये सेंट हेलेनाच्या इतिहासात नेपोलियनचा प्रवेश झाला.
नेपोलियनचं सेंट हेलेनावर आगमन,त्याचा बेटावरचा मुक्काम आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या घडामोडी यांचाही ज्युलियाने एखादी रहस्यकथा उलगडावी तसा आढावा घेतला आहे.याचं कारण नेपोलियनच्या अखेरच्या दिवसांच्या शोधात सेंट हेलेनावर पोहोचण्याआधी तिने उपलब्ध जुनी वृत्तपत्रं नेपोलियनच्या मृत्यूनंतर सेंट हेलेना बेटावरून परतलेले फ्रेंच सैनिक,सैन्याधिकारी आणि नोकरचाकर यांच्या दैनंदिनी अशा सर्व संदर्भांचा अभ्यास केला होता.त्यातले कच्चे दुवे लक्षात ठेवूनच ती सेंट हेलेनावर पोहोचली.तिथल्या वास्तव्यात तिने बेटावरची उपलब्ध जुनी कागदपत्र तपासली आधी मिळवलेल्या माहितीशी त्याचा ताळमेळ घातला.
उर्वरीत भाग पुढील २२.११.२३ या लेखामध्ये...
टिप - १८.११.२३ या दिवशी प्रसारित झालेला लेख किंगफिशरची चार भावंडं…Kingfisher's four siblings… सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन) मधील आहे.