* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: शीर्षक कशाला हवे ! Why do you need the title!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/११/२३

शीर्षक कशाला हवे ! Why do you need the title!

चिचोरा तलाव - 

   

दिवाळी पाडव्याची ऑफिसला सुटटी असल्याने पोरींना घेवून त्यांच्या आजोळी गेलो होतो. त्यांच्या आजोबांचे घर शेतात असल्याने व खेळायला भलंमोठं अंगण असल्याने दिवसभर इकडुन तिकडे हुंदडुन पोरी थकल्या होत्या. दिवस मावळायला झाला होता.

गावातल्या मंदिरात संध्याकाळचे भजन सुरू झाले होते. अंगणात खुर्च्या टाकुन आम्ही घरबसल्या भजनाचा आनंद घेत होतो.डाॅ.रामेश्वर नाईक सरांचा मोबाईलवर काॅल आला आणि चारठाणा परिसरातल्या तलावावर पट्टेरी राजहंस दिसत असल्याची बातमी दोन दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात वाचली,उद्या भाऊबीजेची सुटटी आहे.आम्ही चारपाच जण सकाळी चारठाणाला येणार आहेत.पक्ष्यांचे लोकेशन घ्या आणि कळवा असे फर्मानच डाॅ रामेश्वर नाईक सरांनी सोडले. काॅन्फरन्स काॅलवर डाॅ.दुर्गादास कान्हडकर सुद्धा होते.साधारणतः दहा पंधरा मिनिटे आम्ही त्यावर चर्चा केली आणि तलाव व पक्ष्यांच्या स्थितीची माहीती घेवून कळवतो असे सांगुन मी फोन बंद केला.चारठाण्याच्या जवळपासच्या पट्टयात म्हटलं तर चारपाच पाझर तलाव आहेत.त्यातला सर्वात मोठा तलाव म्हणजे कवडयाचा गावशिवारी असलेला तलाव,कान्हा गाव शिवारातील तलाव व जिंतूर संभाजीनगर राज्यरस्त्यावर रायखेडयाजवळ असलेला छोटासा तलाव.परंतू पट्टेरी राजहंस आणि ज्या तलावावर नेहमीच पाणपक्षी दिसण्याची शक्यता जास्त असते त्या चिचोरा तलावाला यावर्षी पाणीच आहे की नाही याबाबत मी साशंक होतो.


चिचोरा तलाव... चारठाणा गावाला ज्या दोन तलावातुन पाणीपुरवठा केल्या जातो त्यापैकी एक असलेला मोठा तलाव.चारठाणा कावी रोडवर कान्हा शिवारात चारठाणा गावाच्या पुर्वेला असलेला हा पाझर तलाव.या तलावावर मी यापूर्वी अनेकवेळा पक्षिनिरीक्षण केले आहे.


  ४० ते ५० पट्टेरी राजहंस पक्ष्यांच्या थव्याची नोंद मागील वर्षी मी याठिकाणी घेतलेली आहे.

पावसाळा चांगला झाला आणि तलाव शंभर टक्के भरला तर हा तलाव शेतकऱ्यांच्या पिकाला हिवाळभरणी पाणी पुरवुन गावाची,वन्यप्राण्यांची,

पक्ष्यांची तहान भागवण्याचं काम हा तलाव करत असतो.


जसजसा उन्हाळा जवळ यायला लागतो,ऊन तापायला लागतं,पिकांसाठी पाणी उपस्याचा जोर वाढतो तेव्हा हळुहळु या तलावाची पाणी पातळी कमी व्हायला लागते.पाण्याची पातळी कमी झाली की पाणपक्ष्यांना खाद्य सहज उपलब्ध होतं आणि हिवाळी स्थलांतरित पाणपक्ष्यांची या तलावावर गर्दी व्हायला लागते. 


चक्रवाक बदक,थापटया बदक,चमचा, हळदीकुंकु बदक,नदीसुरय,रंगीत करकोचा, पांढऱ्या मानेचा करकोचा,पांढरे बगळे,पांढरा, पिवळा धोबी,वारकरी,

जांभळी पाणकोंबडी अशा कितीकरी पक्ष्यांचे निरीक्षण या तलावावर करता येते. मागच्या तीन वर्षांपासुन मी आणि पुष्पक ने अनेकवेळा या तलावावर पक्ष्यांचे निरीक्षण केले आहे,फोटोशुट केले आहे.मागील वर्षीच उन्हाळा संपत आलेला असतानाही मोठया प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याने पट्टेरी राजहंस पक्षी येथुन आपल्या मुळ देशात परतायचे नांव घेत नव्हते.साधारणतः ४० ते ५० पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी मी या चिचोरा तलावावर घेतलेल्या आहेत.परंतू यावर्षी मुळातच पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने तलावात पाणी असेल कि नाही या साशंकतेनेच हिवाळा सुरू होवूनही मी अजुन त्या तलावाकडे फिरकलो नव्हतो.

परंतु आता मात्र कसंही करून त्याची माहीती घेणं आवश्यक होतं.माझे सहकारी सोमनाथ खके यांना फोन करून तलावाची व पक्ष्यांची स्थिती काय आहे याची एखाद्या शेतकऱ्यांकडुन माहीती घ्यायला सांगितली.त्यांनीही लगेच आजुबाजुच्या दोन तीन शेतकऱ्यांना फोन करून तलावातील पाण्याची व दिसणाऱ्या पक्ष्यांची माहीती घेतली. पाण्याने तळ गाठलेला आहे,पक्षी दिसतात मात्र फारसे नाही अशी खात्रीलायक माहीती मिळाली. लगेच 'माणिक' सरांना फोन करून सर्व माहीती दिली व डाॅ.नाईक सरांसोबत येण्यासाठी आग्रह केला.शाळेला सुटया असल्याने व माझ्या अगोदरच डाॅ नाईक सरांनी त्यांना फोन केल्याने क्षणाचाही विलंब न लावता सकाळी मी सोबत येतोय असं त्यांनी सांगीतलं.आता गावाकडुन सकाळी लवकर उठुन मला चारठाणा जावं लागणारं होतं.जेवण करून राजहंस दिसतील की नाही या विचारात मी तसाच बाजेवर आडवा होवून झोपेच्या आधीन झालो.


सकाळी (चार) वाजता उठण्याच्या रोजच्या सवयीप्रमाणे उठलो.घराबाहेर आलो असता थंडीने चांगलंच डोकं वर काढलेलं जाणवत होतं. काहीशी बोचरी वाटणारी थंडी अंगाला झोंबत होती.थंडीशी दोन हात करत तसेच सकाळचे सर्व कार्यभाग उरकुन आंघोळीला फाटा देत मी साडेपाचच्या सुमारास चारठाणा जाण्यासाठी घराबाहेर पडलो.सगळीकडे काळोख दाटलेला होता.रानपाखरांचा हलकासा चिवचिवाट कानवर पडत होता.मोबाईल बॅटरीच्या उजेडात गाडीपर्यंत पोचलो.मस्त मराठी भावगीते ऐकत साधारणतः सव्वासहाच्या सुमारास मी चारठाण्यात पोचलो.नुकतंच उजाडायला लागलं होतं.माणिक सरांना फोन केला.ते जिंतूरच्या जवळपास आले होते. सातच्या आसपास वालुरहुन डाॅ.ज्ञानेश्वर हरबक चारठाण्यात पोचले.साडेसातपर्यंत डाॅ नाईक सर, माणिक सर,

गोदातीर समाचारचे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब काळे,समीर पावडे,डाॅ उमेश लाड,अशोक लाड,डाॅ रणजीत लाड,दत्ता बनसोडे,सुधीर सोनूनकर व इतर काही सहकारी चारठाण्यात पोचले.चार गाडयांचा ताफा चिचोरा तलावाच्या दिशेने निघाला होता.चिचोरा तलावाकडे जाण्यासाठी चारठाणा गावाला वळसा घालुन जाणाऱ्या कान्हा कावि रस्त्याने आम्ही चिचोरा तलावाकडे निघालो होतो.दोन किमी अंतरावर गेल्यानंतर डांबरी रस्ता सोडुन आम्ही कच्च्या रस्त्याने तलावाकडे निघालो. अंगावर पांढऱ्या मातीचा धुरळा साठवत गाडया चिचोरा तलावाकडे सरकत होत्या.

थोडयाच वेळात आम्ही तलावाजवळ पोचलो.गाडीतुन खाली उतरताच माझी नजर एका शिकारी पक्ष्यावर पडली.कदाचित आपली तहान भागविण्यासाठी तो तलावावर उतरला असावा. नजरेत सामावून घेईपर्यंत व इतर सहकाऱ्यांना त्याची माहिती देई पर्यंत तो शिकारी पक्षी भर्रकन उडाला.त्याची ओळख पटेपर्यंत तो नजरेआड झाला होता.कदाचित पाणघार किंवा बोनेलीचा गरुड असावा...तलावाच्या पश्चिम दिशेकडुन खालच्या बाजुला उतरत मी तलावातील पाण्याचा व पक्ष्यांच्या स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो.पाण्याने तर तळ गाठलेला दिसत होता परंतू पक्ष्यांच्या कुठंच काही हालचाली दिसत नव्हत्या.

तलावातल्या गाळाचा उपसा केल्याने जागोजागी पाण्याचे डबके साचलेले दिसत होते.


माणिक सरांकडुन दुर्बीण घेवून तलावाच्या चौफेर मी पक्ष्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो.पलिकडच्या काठावर दक्षिणेकडुन दोन हळदीकुंकु बदक आणि पाण्यात दुरवर पसरलेल्या खरपणाच्या रांगेवर एक राखाडी बगळा ध्यान लावुन बसलेला दिसला त्याशिवाय काहीच नजरेस पडत नव्हतं. तलावाच्या दक्षिणेकडुन पुढे सरकुन पुन्हा काही हालचाली दिसतात का म्हणुन मी बाकी सर्वांना तिकडुन जाण्याचा इशारा केला आणि मी स्वतः पाळुवरच्या रस्त्याने पुढे सरकलो.माझ्या मागे डाॅ.नाईक सर आणि माणिक सर होतेच.थोडया अंतरावर एका बाभळीच्या झाडावर काळसर पांढरट रंगाचे एक पिल्लु नजरेस पडले.नाईक सरांनी त्याच्यावर कॅमेरा रोखत त्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला परंतू कॅमेरा फोकस होईपर्यंत ते पिल्लु उडुन दुसऱ्या झाडावर थोडंसं आतमध्ये जावुन बसलं.त्याच्या बाह्यरंगावरून ते  चातक पक्ष्यांचं पिल्लु असावं असा अंदाज मी आणि माणिक सरांनी लावला.


सातभाई आणि चातक पक्ष्यांची पिल्लं लहान असताना सारखीच दिसत असल्याने त्यांना ओळखणं तसं कठीणच जातं.त्याला आहे त्या अवस्थेत त्याचा नाद सोडुन आम्ही पुढे सरकलो.


 पाळुवरून तलावाच्या दिशेनं दगडांची एक उतरंड वजा पायवाट उतरली होती.तलावावर पाणी पिण्यासाठी जाणारी जनावरं किंवा शेताकडं जाणारे शेतकरी याच वाटेचा वापर करत असावीत,म्हणुन वाट दगडाची असली तरी चांगलीच रूळलेली होती.त्याच दगडी वाटेवरून आम्ही तलावाच्या दिशेनं खाली उतरलो.

वाटाड्या म्हणून मी पुढे असल्याने पुन्हा एकदा पक्ष्यांच्या काही हालचाली दिसतात का ते न्याहाळतच होतो.गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी खोदलेल्या विहीरीच्या खरपणाचा ढिग तलावाच्या काही भागात आतपर्यंत लांबवर गेलेला होता.ढिग संपतो त्या टोकाकडे दोन तीन मोठे दगड विखुरलेले होते त्या दोन दगडांच्या आडोशाला करवानक (ग्रेटर थिकनी) पक्ष्यांची एक जोडी जी की या भागात दिसायला अत्यंत दुर्मीळ असे पक्षी आहेत ते नजरेस पडले.यापुर्वी मागच्या वर्षी कवडा तलाव परिसरात व याच चिचोरा तलावात ग्रेटर थिकनी मी पाहीले होते.सोबत असलेल्या बाकीच्यांना मी करवानक पक्षी दाखवले.ज्यांच्याकडे कॅमेरा होता ते सर्व फोटोशुट करण्यासाठी पुढे सरकले.

दुर्बीण असलेले सहकारी दुर्बीणीतुन त्यांचे निरीक्षण करत होते.दोन्ही पक्षी दगडांच्या आड असल्याने फोटोसाठी अडथळा वाटत होता.डाॅ नाईक,डाॅ रणजीत लाड व अजुन एकजण खरपणाच्या ढिगारावर वरपर्यंत चढुन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते.त्यांना आता थिकनी ठळकपणे दिसत होती.माणिक सर आणि मी इतरांना थिकनीबद्यल माहीती देत होतो.सर्वचजण लक्ष देवुन माहीती ऐकत होते आणि त्या पक्ष्यांचे निरीक्षण करत होते.आमच्या कलकलाटाने थिकनी सावध झाल्या होत्या.काही कळायच्या आत त्यांनी आमच्याजवळुन दुर होत पलिकडच्या काठावर जावुन अलिप्त बसणे पसंत केले.इकडे दोन पांढरा धोबी पक्षी तुरूतुरू किडे शोधण्यात व्यस्त असल्याचे दिसत होते.

काहीच हालचाल नाही म्हणता म्हणता करवानक,पांढरा धोबी,राखी बगळा,हळदी कुंकु बदक अशा पक्ष्यांच्या हालचाली आता नजरेला पडत होत्या.दत्ता बनसोडे आणि सुधीर सोनुनकर पक्ष्यांचे निरीक्षण करता करता पुर्वेला पुढे सरकत होते.काही अंतरावर गेल्यावर त्यांची चाहुल लागताच तलावाच्या काठावरील ओल्या मातीतल्या हिरव्या गवताचे कोवळे कोंब खाण्यात व्यस्त असलेल्या चक्रवाक बदकांनी वर माना काढत कर्कश असा बैंक बैंक असा आवाज काढला.त्यांचा आवाज कानावर पडताच आमच्या सर्वांच्या नजरा चक्रवाक पक्ष्यांकडे वळल्या.दत्ता बनसोडे आणि सुधीर सोनुनकर जसजसे पुढे सरकत होते तसे सहा ते आठ चक्रवाक हळुहळु खोलगट भागातुन वर येवुन पाण्याच्या दिशेने सरकु लागले.एका जोडीने वेळ न लावता पाण्यात उतरत दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी जलविहार सुरू केला होता.बाकीचे मात्र अजुनही अंदाज घेत जागेवरच पुढे पुढे सरकत होते.आता मात्र उरलेल्या चक्रवाक पक्ष्यांनी सुद्धा धोका न पत्करता दुर जायचं ठरवलं.एका जोडीने आकाशाकडे झेप घेत दुरपर्यंत भरारी घेतली आणि लगेच नजरेआड झाले.तर दोन जोडयांनी आकाशात काही उंचावरून दोन तीन घिरटया मारत आमच्या हालचालीचा अंदाज घेतला आणि एखाद्या लढावू विमानानं आपला वेग नियंत्रित करत आल्हादपणे जमीनीवर उतरावं तसं आमच्यापासुन काही अंतरावर पाण्यात हे चक्रवाक उतरले होते.आम्ही सर्वच त्यांच्या करामतीचे निरीक्षण करत आनंद घेत होतो. दुरवर पाण्याच्या एका वळमनीत एक काळा शराटी किडे शोधण्यात मग्न होता.दत्ता बनसोडे आणि सोनुनकर सरांच्या पाठोपाठ पलिकडचे चक्रवाक पक्षी पाहण्यासाठी मी,सोमनाथ खके आणि कैलास रावुत सुदधा तलावाच्या पुर्वेला पुढे सरकलो.काळा शराटी शेणकुडात किडे शोधण्याचा प्रयत्न करत होता.सर्वचजण आता आपापल्या परीने तलावाभोवती पांगले होते. साधारणतः तास दिड तास पक्ष्यांचे निरीक्षण केल्यावर हळुहळु सर्वजण पुन्हा एकत्र जमा होत होते.तोपर्यंत सोमनाथ खके यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती.गरमागरम खिचडी भजे घेवून दिपक पवार तलावावर येवून पोचला होता.

तलावाच्या काठावरच मोकळी जागा पाहुन आम्ही सर्वांना नाश्त्यासाठी गोलाकार बसवले. काही जणांनी घरून येताना दिवाळी फराळ, पराठे,गोड पदार्थ सोबत आणले होते.खिचडी भज्यांसोबत या सर्व पदार्थांवर ताव मारत आम्ही सर्वांनी नाश्ता उरकला.तिकडे पक्षी सुदधा आपल्या खाण्यावर ताव मारण्यात मग्न झालेले दिसत होते.वर्तमानपत्रातुन पट्टेरी राजहंसची बातमी प्रसिद्ध झाली होती.पट्टेरी राजहंस नजरेस पडले नसले तरी करवानक आणि चक्रवाक पक्ष्यांनी ती कमतरता भरून काढल्याने कुणी नाराज झालं नव्हतं.


तलाव आणि जंगलं कधीच नाराज करत नाहीत. त्यांच्याजवळ जे असेल ते मुक्तहस्ते ते इतरांना देत असतात.


 पट्टेरी राजहंस दिसायला लागल्यावर पुन्हा या तलावावर यायचे असे ठरवुन आम्ही चिचोरा तलावावरून परतीच्या मार्गाला लागलो होतो.


विजय जनार्धन ढाकणे

शिवाई,शिवाजी नगर,जिंतूर 


सहज सुंदर घडलेली अशी घटना आपल्या सहज सुंदर भाषेमध्ये मांडलेली आहे.हे वाचत असताना.


फर्ननचे एक वाक्य समोर आले.


" समजून घेणे ही एक कला आहे.आणि प्रत्येकजण कलाकार नसतो. "


शीर्षक कशाला हवे !


छोटे ओठ बालकाचे

आईच्या विस्तारित गालावर

महाकाय सुख अनुभवत

त्याचे मन मोठे मोठे होत जाते 

आहे का हे सत्य ?


ही आमची सृष्टी

पृथ्वीने जन्मास घातली

ही जीवसृष्टी

बाईपणातून प्रसवली

हे खरे सत्य.


कळते झाल्यावर आम्ही

हे जग विराट पुरूषाने

ईश्वराने जन्मास घातले

असे सांगत सुटतो

 बिनदिक्कत


वय उमलते तसे

प्रेम शरीरात फुलून येते

आपले आपले वेगळेपण 

विसरून क्षणभर सर्व 

इच्छितात एकांत


मिलन संपले की

पुन्हा वेगळे ते,

तो पुरुष महान

अन् ती स्त्री लहान 

 मनोविश्वात - धर्मग्रंथात 


श्रमणांचे एक संचित इथे

पुसट जरी काहीसे ते

माझ्या जाणीवेत दाटून येते

नेणीवेला चकवा देऊन मी

होतो उत्कट काठोकाठ 


मी उमलवून माझे पुरूषत्व

तिच्याकडे खेचला जातो 

तिच्यात असतेच स्त्रीत्व - मातृत्व

अन् प्रेमाचे कोवळे बळ

विराट अफाट


ओठ माझे छोटे

तिच्या ओठावर झुकतात जेव्हा 

ती पृथ्वी होऊन

 बिलगते विराटतेने अन् तेव्हा 

होते जीवन संतृप्त 


 माझ्यातला छोटा पुरूष

विरघळतो वितळतो

रूपांतरित होऊन

आदिमाया बनतो मी

होतो मातृत्व 


क्षणिक असते पुरूषत्व

सदोदित उरते मातृत्व

लिंग म्हणजे केवळ जीव

 पुरूषपण निभावत हरवत

उरवावे मनुष्यत्व


डॉ.रवींद्र श्रावस्ती


अतिशय मार्मिक व बरचं काही सांगुन जाणारी ही कविता तयार करण्यास .डॉ..रवींद्र श्रावस्ती यांना 

चार तास लागले.आपल्या सर्वांसाठी ही पहिली कविता..