अलक..१
आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते.आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या ३ औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन.दोन्ही भाऊ खजील झाले.
अलक..२.
शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले,इथे माझी जेवणाची चंगळ आहे.
काळजी करु नकोस.आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.
अलक..३.
आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले,अग हळू हळू आजोबा पडतील ना.आजोबा हसून म्हणाले,पड़ींन बरा,माझ्याजवळ दोन काठया असताना.
अलक..४.
आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले.का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.
अलक..५.
ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली,ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.
अलक..६.
वडील गेल्यावर भावांनी संपत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली,मी खुप भाग्यवान,माझ्या वाटयाला तर आयुष्य आलं.
अलक..७.
काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस.मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले.
अलक...८.
खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनी ला म्हणाली वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे,तर वहिनी म्हणाल्या अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की,सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता मग मी तरी काय वेगळे करते.रिमोट ने tv केंव्हाच बंद केला होता.
अलक.. ९.
तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये तो खूपच आजारी होता म्हणून.जाताना बळेबळेच ५ हजाराचे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला,म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता,माझा दोस्त बरा झाला की छानसी साडी घ्या.त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.
अलक..१०.
आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने, स्वंयपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन भेळ केलीय आज कैरी घालून.खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.
अलक..११.
तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या.तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला.सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले.थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती.त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती.देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.
जगात वाईट नाही.चांगल्या माणसांची संख्या खूप जास्त असल्यामुळे हे जग सुंदर झालं आहे..
ग्राम बोली
कावळे - गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे कावळे
कालवण / कोरड्यास – पातळ भाजी
आदण - घट्ट भाजीचा रस्सा त्याला आदण म्हणतात.
कढाण - मटणाचा पातळ रस्सा त्याला कढाण म्हणतात.
घाटा - हरभर्याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला घाटा म्हणतात.
हावळा - हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला हावळा म्हणतात.
कंदुरी - पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलवायचे.बकर्याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची नाही त्याला कंदुरी म्हणतात.
हुरडा - ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात.त्यास हुरडा म्हणतात.
आगटी - हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणकूट टाकून कणसं भाजली जातात त्याला आगटी म्हणतात.
कासूटा,काष्टा - पूर्वी सर्रास धोतर नेसलं जायचं. धोतराची गाठ कमरेभोवती बांधल्यानंतर राहिलेल्या धोतराच्या निर्या घालून पाठीमागे खोचल्या जायच्या त्याला कासूटा म्हणत आणि हाच प्रकार स्त्रियांनी केला तर त्याला काष्टा म्हणत.
घोषा - पूर्वी ग्रामीण भागात पाटील किंवा उच्चभ्रू लोकांध्ये ज्या स्त्रिया लग्न होऊन यायच्या त्यांना घोषा पद्धत असायची.म्हणजे घराबाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर साडीच्या वरून शेळकट गुंडाळायचे व ते पूर्ण तोंडावर घ्यायचे... शेळकट पातळ असल्यामुळे शेळकटातून बाहेरचे दिसायचे.परंतु चेहरा दिसायचा नाही.शेळकट नसेल तर पदर तोंडावर असा ओढायचा की जेणेकरून चेहरा दिसणार नाही.
दंड - एखाद्या चुकीच्या कामामुळे शासन आर्थिक दंड करते तो वेगळा.येथे दंड म्हणजे पूर्वी कपड्यांची कमतरता असायची.अशा वेळी स्त्रिया एखादी साडी जुनी झाली तरा त्याचा जीर्ण झालेला भाग कापून काढायचा आणि दुसर्या जुन्या साडीचा चांगला भाग काढायचा आणि हे दोन चांगले भाग शिवून एक आडी तयार करायची.याला दंड घातला म्हणायचे.
धडपा - साडीचा भाग जीर्ण झाला असेल आणि त्याला दंड लावायला दुसरी साडी नसेल तर साडीचा जीर्ण झालेला भाग काढून टाकला जातो व नऊवारीसाडीची सहावारी साडी करून नेसली जाते.त्याला धडपा म्हणतात.
कंबाळ / क्याळ - पूर्वी स्त्रियांच्या नऊवारी साड्या असायच्या त्या नेसताना पोटासमोर साडीच्या निर्या पोटावर खोचायच्या त्याचा आकार केळीच्या कंबळासारखा व्हायचा किंवा केळासारखा दिसायचा म्हणून काही भागात त्याला कंबाळ तर काही भागात त्याला क्याळ म्हणायचे.
दंडकी - म्हणजे आताचा हाफ ओपन शर्ट दंडकीला जाड मांजरपाठाच कापड वापरलं जायचं.त्याला पुढे खालच्या बाजूला दोन मोठे खिसे,आतल्या बाजूला एक मोठा खिसा.तसेच त्याला गळ्याजवळ एक चोरखिसा असायचा.
बाराबंदी - पूर्वी ग्रामीण भागात शर्ट नसायचा,जाड मांजरपटच्या कापडाचा छोट्या नेहरू शर्टसारखा आकार असायचा,त्याला बटण नसायची,बटणाऐवजी बांधण्यासाठी बंधांचा वापर केला जायचा.तो शर्ट घातल्यानंतर बारा ठिकाणी बांधावा लागायचा म्हणून त्याला बाराबंदी म्हणत.
तिवडा - पूर्वी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत.खळ्यात कणसं टाकून त्यावर बैल,म्हैस फिरवली जायची.त्यांना गोल फिरता यावे म्हणून खळ्याच्यामध्ये उभे लाकूड रोवले जायचे त्याला तिवडा म्हणत.
तिफण,चौफण - पूर्वी शेतात धान्य पेरण्यासाठी कुरीचा (पाबर) वापर करत.पिकामध्ये जास्त अंतर ठेवायचे असेल तर तिफणीचा वापर करत,अंतर कमी ठेवायचे असेल तर चौफणीचा वापर करत.
कुळव,फरांदी - शेतात पेरण्यापूर्वी शेती स्वच्छ करण्यासाठी गवत,कचरा काढण्यासाठी कुळवाचा वापर केला जात असे.जास्त अंतर ठेवून शेती स्वच्छ करायची असेल तर फरांदीचा वापर करत.
यटाक - कोणतेही औत ओढण्यासाठी शिवाळ/ जू याचा वापर करताना ते जोडण्यासाठी ज्या सोलाचा वापर करत त्याला यटाक म्हणत.
शिवाळ - पूर्वी शेती नांगरण्यासाठी लाकडी,लोखंडी नांगराचा वापर केला जायचा.नांगर ओढण्यासाठी सहा-आठ बैल लागायचे,ते ओढण्यासाठी बैल शिवाळी ला जोडली जायची.
रहाटगाडगं - पूर्वी शेतीला पाणी देण्यासाठी मोटेचा किंवा रहाटगाडग्याचा वापर केला जायचा. रहाटगाडग्याला छोटे छोटे लोखंडी डबे जोडून गोलाकार फिरवून विहिरीतून पाणी काढलं जायचं त्याला रहाटगाडगं म्हणतात.
रहाट - पाणी पिण्यासाठी आडातून पाणी काढण्यासाठी रहाटाचा वापर केला जायचा.बादलीला कासरा बांधला जायचा.ती राहाटावरून खाली सोडली जायची.पाण्याने भरली की वर ओढून घ्यायची व जवळ आली की हाताने बाहेर काढून घ्यायचं.
चाड - शेतात धान्य पेरण्यासाठी चारी नळ्यातून सारखं बी पडावं म्हणून चाड्याचा वापर केला जायचा.
ठेपा - पूर्वी जनावरांना बांधण्यासाठी लाकडी मेडक्याचा ( Y आकाराचे लाकूड) वापर करून छप्पर तयार केलं जायचं.पावसाळ्यात छप्पर एका बाजूला कलंडले तर ते पडू नये म्हणून लाकूड उभे करून त्याला आधार दिला जायचा त्याला ठेपा म्हणत.
शेकरण - पूर्वी घरं कौलारू होती,तेव्हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी घर गळू नये म्हणून दरवर्षी कौलं व्यवस्थित लावली जायची त्याला शेकरण म्हणत.
तुराटी -तुरी बडवून जी काटकं राहायची त्याला तुराटी म्हणतात. याचा उपयोग घर शेकारण्यासाठी केला जायचा.
काडं - गहू बडवून जी काटकं राहायची त्याला काडं म्हणतात.काडाचाही उपयोग शेकरण्यासाठी केला जात.
भुसकाट - धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा राहतो त्याला भुसकाट म्हणतात.याला जनावरं खातात.
वैरण - ज्वारी,बाजरी काढल्यानंतर जो भाग एका जागी बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण म्हणतात.
जू - औत,बैलगाडी,कुळव ओढण्यासाठी बैलाच्या खांद्यावर जे आडवं लाकूड ठेवलं जायचं त्याला जू म्हणत.
साठी - वयाची एक साठी असते आणि दुसरी बैलगाडीची साठी असते या साठीचा उपयोग शेतातील माल,डबा,धान्याची पोती,शेणखत,बाजारचा भाजीपाला वाहण्यासाठी केला जातो.त्याची रचना अशी असते,खाली-वर बावकाडे असतात.खालच्या वरच्या बावकाडाला भोक पाडून लाकडं ताशीव नक्षीदार उभी केली जातात.त्याला करूळ म्हणतात.करूळाच्या वर एक बावकाड असतं त्यामध्ये करूळी फिट केली जातात.ज्यामुळे साठीची उंची वाढते व शेतीचा जास्त माल बसतो.साठीला खाली आडवी लाकडं टाकली जातात.त्याला तरसे म्हणतात.त्यावर फळ्या टाकल्या जातात. ज्यामुळे साठीतला माल वाहतूक करताना खाली पडत नाही.
बंधूतुल्य कवी अनिल फारणे यांच्याकडून व्हाट्सअप च्या मार्गावरून माझ्यापर्यंत आलेली ही उपयुक्त माहिती.उर्वरित शिल्लक राहिलेली माहिती पुन्हा कधीतरी…