* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जन्म जीवशास्त्राचा Birth Biology

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१२/५/२४

जन्म जीवशास्त्राचा Birth Biology

त्याचा मृत्यू झाला!त्यावेळी व्हेसायलियस इतका कफल्लक होता,की एका माणसाला दया येऊन त्यानं व्हेसायलियसच्या अंत्यविधीची व्यवस्था केली.नाही तर व्हेसायलियसच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून टाकायच्या दृष्टीनं त्याच्या शरीराचे लचके गिधाडांनी तोडून टाकण्यासाठी ते उघड्यावर टाकून द्यायची वेळ आली असती! त्याचा सांगाडा नंतरच्या संशोधकांना वापरता आला असता! वयाच्या पन्नासाव्या वर्षी व्हेसायलियसचा असा अतिशय धक्कादायकरीत्या शेवट झाला!आयुष्यभर धर्मकांडाविरुद्ध भूमिका घेतल्याची शिक्षा म्हणून व्हेसायलियसला जाणूनबुजून या धार्मिक यात्रेला पाठवलं गेलं होतं असं काही जण म्हणायचे.पण नंतर यात काही तथ्य नसल्याचं आढळून आलं. ही खोटी बातमी पाचवा चार्ल्स राजाच्या दरबारी असलेल्या ह्युबर्ट लँग्वेटनं मुद्दामच पसरवली होती.या लँग्वेटचं असंही म्हणणं होतं,की १५६५ साली व्हेसायलियस एका शरीराचं विच्छेदन करत असताना त्या शरीरातलं हृदय अजून सुरूच असल्याचं म्हणजेच तो माणूस अजून जिवंतच असल्याचं लक्षात आलं! हे कळताच राजाचा मुलगा असलेला दुसरा फिलिप्स यानं भडकून व्हेसायलियसला या यात्रेला धाडलं.पण हे सगळं थोतांडच होतं.एकूणच शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र पुढे नेण्यात व्हेसायलियसचा खूपच मोठा हात होता यात शंकाच नाही.एकाच वर्षी प्रकाशित झालेल्या कोपर्निकसचं

'ऑन द रिव्होल्यूशन ऑफ हेवनली स्फियर्स' आणि व्हेसायलियसचं 'दे ह्युमॅनी कॉर्पोरिस फॅब्रिका' या दोन पुस्तकांना प्रसिद्धी मात्र सारखीच मिळाली नाही.

व्हेसायलिसच्या फॅब्रिकाला त्यातल्या सुंदर चित्रांमुळे लवकर प्रसिद्धी मिळाली.शिवाय,माणसाचं शरीर आतून कसं आहे हा प्रश्न अवकाशात पृथ्वी कशी फिरते या प्रश्नापेक्षा किंचितसा लहान होता.त्यामुळे या पुस्तकावर आणि व्हेसायलियसवर घणाघाती टीका झाली नाही.पण कोपर्निकसच्या संकल्पना आणि पुस्तकातला मजकूर धार्मिक लोकांच्या काही पचनी पडला नाही.


कोपर्निकसला याचा फारच त्रास भोगावा लागला.

थोडक्यात,कोपर्निकसमुळे 'डळमळले भूमंडल' अशी अवस्था झाली होती आणि व्हेसायलिसमुळे 'देवानं निर्माण केलेल्या माणसाच्या निर्मितीमध्ये माणसानंच हस्तक्षेप करायचं पाप' घडलं होतं! जुन्या धार्मिक आणि चुकीच्या मतांचा काळा पडदा दूर सारून विज्ञानाच्या क्षितिजावरचा सूर्योदय हे दोघे महान वैज्ञानिक लोकांना दाखवायचा प्रयत्न करत होते,पण धर्मांधतेची झापडं डोळ्यांवर घट्ट बांधून झोपलेल्या समाजाला जाग यायला अजून काही वैज्ञानिकांची गरज होती.


हे काम गॅब्रिएलो फॅलोपिओ किंवा गॅब्रिएल फैलोपियस (Gabriello Fallopio or Gabriel Fallopius) (१५२३-१५६२) हा व्हेसायलियसचाच शिष्य पुढे नेणार होता। याचा जन्म १५२३ साली झाला होता.त्यानं व्हेसायलियसची प्रयोगात्मक ॲनॅटॉमीची परंपरा पुढे नेली.त्यानं माणसाच्या शरीरातल्या जवळपास सगळ्याच अवयवांचा बारकाईनं अभ्यास केला आणि आजपर्यंत दुर्लक्षित झालेले आकारानं लहान पण फार महत्त्वाचे अवयव शोधून काढले आणि त्यांना स्वतःचं नाव दिलं. (उदा.,फैलोपियन ट्यूब)


सोळाव्या शतकात वैद्यकशास्त्राविषयी मोलाची कामगिरी करणाऱ्या अगदी मोजक्या लोकांपैकी तो एक होता.

व्हेसायलियसचा तो मित्र,सहकारी आणि शिष्यही होता.

इटलीमधल्या मोदेना नावाच्या गावात त्याचा जन्म झाला.

त्याचं कुटुंब गरीब होतं,त्यामुळे फैलोपिओला लहानपणा-

पासूनच कष्ट करायची सवय होती. विलक्षण धडपड करून त्यानं कसंबसं आपलं शिक्षण पूर्ण केलं.नंतर पोट भरण्यासाठी त्याला चर्चमध्ये धार्मिक विधींमध्ये मदत करणाऱ्या क्लर्जीची नोकरी धरावी लागली.१५४२ साली त्याला धर्मगुरूच्या पदावर बढती मिळाली. त्याचबरोबर युरोपमधल्या फेरारामध्ये त्यानं वैद्यकशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं.१५४८ साली त्याला एमडी ही पदवीही मिळाली! त्यानंतर त्यानं अनेक वैद्यकीय प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि फेरारामध्येही ते काम केलं.गिरोलामो फॅब्रिची हा त्याच्या काही गाजलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक समजला जातो. फॅलोपिओनं त्या काळात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या पिसाच्या विद्यापीठातही प्राध्यापक म्हणून काम केलं.१५५१ साली पडुआ विद्यापीठात शरीरशास्त्र आणि शस्त्रक्रिया या विषयांचा प्रमुख म्हणून काम करण्यासाठी त्याला आमंत्रण आलं.ते त्यानं स्वीकारलं आणि आपल्या मुख्य कामाव्यतिरिक्त तिथल्या वनस्पतिशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणूनही काम केलं.फॅलोपिओनं स्वतः माणसाच्या डोक्यासंबंधी बरंच संशोधन केलं.आपल्या डोक्याची रचना कशी असते,

त्यातून आपल्याला काय काय आजार होऊ शकतात,

आणि ते कसे बरे करता येतील यावर त्याचा भर असे.

वैद्यकशास्त्रानुसार आपल्या कानाचे सामान्यतः तीन भाग (बाहेरचा, मधला आणि आतला) असतात असं मानलं जातं.फैलोपियसनं त्या काळात आतल्या कानाविषयी असलेल्या माहितीत भर घातली.तसंच मधल्या आणि बाहेरच्या कानाच्या भागांमध्ये असणाऱ्या टिंपॅनिक मेंब्रेन (किंवाढोबळपणे आपल्या कानाचा पडदा) विषयी बरंच संशोधन केलं.तसंच मधल्या कानाच्या रचनेबद्दल त्यानं सखोल अभ्यास करून तिथं असणाऱ्या मॅस्टॉइड सेल्स नावाच्या अवयवाविषयी सर्वप्रथम आपली मतं नोंदवली.


याखेरीज डोळे आणि नाक यांच्यासंबंधीसुद्धा त्यानं मोलाची कामगिरी केली.एकूणच माणसाच्या शरीरातले स्नायू आणि त्यांच्यामधल्या पेशी यांच्याविषयी त्यानं भरपूर अभ्यास करून आपला गुरू व्हेसायलियस याच्याही काही चुका दुरुस्त केल्या.


पुरुष आणि स्त्री या दोघांच्या पुनरुत्पादनाच्या अवयवांच्या अभ्यासानंतर त्यानं स्त्रीच्या शरीरात गर्भाशय आणि अंडाशय यांना जोडणारी एक नळी असल्याचा शोध लावला.त्याच्या या कामगिरीमुळे आज आपण या नळीला 'फॅलोपियन ट्यूब' या नावानं ओळखतो.तसंच आपल्या कानाच्या बाहेरच्या बाजूच्या संवेदना टिपून त्यासंबंधीची माहिती मेंदूला द्यायचं काम करणारा एक ऑडिटरी नर्व्ह नावाचा मज्जातंतू असतो.

तिथून आपल्या चेहऱ्याच्या भागात असणाऱ्या मज्जातंतूंना पुलासारखं जोडणाऱ्या अवयवाचाही शोध त्यानंच लावला.त्यामुळे तिचंही नाव फॅलोपिओच्या गौरवाप्रीत्यर्थ 'ॲक्वाडक्ट्स फॅलोपी' असं पडलं. 


कानाच्या विकारांचं निदान करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा चिमटा वापरणाराही तो पहिलाच. 


त्यानं शरीरात येणाऱ्या व्रणांविषयी (अल्सर) आणि शरीरात वाढणाऱ्या रोगट पेशींच्या ट्युमरविषयी प्रबंध लिहिले.तसंच त्यानं शस्त्रक्रियांविषयीसुद्धा आपली निरीक्षणं नोंदवली.डोक्याला होणाऱ्या जखमांविषयीच्या हिप्पोक्रॅट्सच्या पुस्तकाचं परीक्षणही त्यानं केलं होतं.

फैलोपियस हा स्त्री-पुरुषांच्या शारीरिक संबंधांतल्या वैद्यकीय बाबींबद्दलचाही तज्ज्ञ समजला जाई.आधी पुरुषाच्या लिंगावर आणि मग सगळ्या शरीरावर पुरळ आणणारा सिफिलिस नावाचा गंभीर गुप्तरोग होऊ नये म्हणून पुरुषानं कंडोम वापरावा ही दूरदृष्टी त्याला त्या काळात होती! यासाठी त्यानं कंडोमच्या काही चाचण्याही घेतल्या असाव्यात असं मानलं जातं.किंबहुना त्यानं लिहून ठेवलंय की यासाठी त्यानं ११०० पुरुषांची चाचणी घेतली आणि त्या सगळ्यांनी शरीरसंबंधाच्या वेळी कंडोम वापरल्यानं एकालाही सिफिलिस झाला नाही! त्याचा कंडोम म्हणजे पुरुषानं लिंगावर सरकवायचं पातळ कापडावर औषध पसरवून वाळवलेलं एक आवरण होतं.त्यावर स्त्रिया भाळाव्यात म्हणून त्याला एक छोटी गुलाबी रिबिन गुंडाळायची रसिकताही फॅलोपिओमध्ये होती!ज्या स्त्रियांचे आधी शारीरिक संबंध आलेले नसतात त्यांच्या योनीमध्ये हायमेन नावाचा एक पडदा असतो हे त्यानंच ठासून सांगितलं आणि योनीचं आज सर्वमान्य असणारं इंग्रजी नाव 'व्हजायना' हेही त्यानंच सुचवलं ! 


१५५६ सालच्या सुमाराला त्याची प्रकृती खालावली.

१५६० साली तो पॅरिसमध्ये एके ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी गेला.पण त्याच्या फुफ्फुसांना आलेल्या सुजेमुळे त्याचं निधन झालं.त्याची पॅरिसमधली डॉक्टरची जागा मग त्याचा विद्यार्थी गिरोलामो फॅब्रिची यानं घेतली.याच काळातला बार्टोलोमो युस्ताची (Bartolomeo Eustachi) (१५०० किंवा १५१४-१५७४) हाही गाजलेला शरीरतज्ज्ञ होता. त्याचं लॅटिन भाषेतलं नाव युस्टॅशिओ असं होतं. हा व्हेसायलियसचा विरोधी आणि गेलनचा समर्थक होता.पण तरीही त्यानं स्वतः जेव्हा मानवी शरीराच्या आत डोकावलं तेव्हा त्यानंही जे आपल्याला डोळ्यांनी पाहिलं तेच सांगायचा प्रयत्न केला.युस्टॅशिओ हा मूळचा इटलीतला.त्याला लॅटिन,ग्रीक,आणि अरेबिक भाषा यायच्या.व्हेसायलियस या साथीत त्यानं गेलनच्या अर्धवट माहितीची सद्दी संपवत खऱ्या अर्थानं वैद्यकीय क्षेत्रात अचूक माहितीचं युग आणलं.आपल्या कानाच्या आत असणाऱ्या नळीविषयीचं फॅलोपिओचं संशोधन त्यानं पुढे नेलं आणि त्याचं अचूक शब्दांमध्ये वर्णनही केलं. याआधी या नळ्या अल्केमॉननंही पाहिल्या होत्या.पण हे ज्ञान मागची दोन हजार वर्ष अंधारात राहिल्यामुळे या नळ्यांना आता 'युस्टॅशियन ट्यूब्ज'च म्हटलं जातं.

आपल्या कानाच्या आतल्या भागात असलेल्या कोर्टी नावाच्या अवयवाविषयीही त्यानं पुढचं संशोधन केलं.या अवयवामुळे आपल्याला ऐकू येतं.तसंच आपल्या किडनीच्या वरच्या भागात हार्मोन्स तयार करणाऱ्या ताऱ्यांच्या आकाराच्या ॲड्रेनल ग्लँड्स नावाच्या ग्रंथी असतात. आपल्याला ताणतणावाचा सामना नीट करता यावा म्हणून त्या कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनॅलिन यांच्यासारखे रसायनं स्त्रवतात.१५६३ साली या ॲड्रेनल ग्लँड्सचा शोध युस्टॅशिओनं लावला. व्हेसेंलियसच्या धर्तीवर त्यानंही माणसाच्या शरीररचनेची रेखाटनं 'ॲनॅटॉमिकल एनग्रोव्हिंग्ज' या नावानं तयार केली होती.

त्यामुळे त्यालाही त्या काळच्या धार्मिक साम्राज्याचा रोष ओढवून घ्यायची भीती वाटत होती.पण त्याच्या जिवंतपणी ही छापणं शक्य झालं नाही.तब्बल दीडशे वर्षांनी ती १७१४ साली प्रसिद्ध झाली! त्यावेळी युस्टॅशिओनं किती मेहनत घेऊन अतिशय अचूकतेनं माणसाच्या शरीरासंबंधीची रेखाटनं तयार केली होती,हे जगाला दीडशे वर्षांनी उमगलं ! पण प्रसिद्ध झाल्यानंतर मात्र हे पुस्तक बेस्टसेलर ठरलं! 


जर धर्माचा पगडा युस्टॅशिओच्या काळात नसता तर माणसाच्या शरीराच्या आतली रहस्य जगाला कळायला अठरावं शतक उजाडायची गरज भासलीच नसती ! 


थोडक्यात,व्हेसायलियस,फॅलोपिओ,युस्टॅशिओ आणि त्या वेळच्या अनेक वैज्ञानिकांनी त्या त्या काळच्या प्रचलित धार्मिक रूढींना घाबरून न जाता मानवी शरीराच्या आत काय आहे हे डोकावून पाहण्याचं धाडस केलं.त्यातूनच आधुनिक विज्ञानाच्या उज्ज्वल युगाची सुरुवात झाली.

ॲनॅटॉमीतूनच आता शरीरक्रिया शास्त्र (फिजिओलॉजी),

शस्त्रक्रिया (सर्जरी) आणि बायॉलॉजीच्या इतरही अनेक शाखांचा जन्म होणार होता.


०६.०४.२४ या लेखातील शेवटचा भाग…