श्रीरामपूर,नौखाली,नव वर्षदिन १९४७.हा देखील एक नव-वर्ष-दिनच! ही घटना लंडनच्या डाऊनिंग स्ट्रीटपासून सहा हजार मैलांवर असलेल्या गंगा नदीच्या खोऱ्यातील एका छोट्या खेड्यात पहायला मिळत होती.एका शेतकऱ्याच्या झोपडीतील शेणाने सारवलेल्या जमिनीवर एक वयोवृद्ध गृहस्थ ऐसपैस पडलेला आढळत होता.वेळ नेमकी मध्यान्हीची होती. बरोबर बाराच्या ठोक्याला त्या व्यक्तीने आपल्या साहाय्यकाकडून एक भिजून चिंब झालेली पोत्याची पिशवी मागून घेतली.पिशवीच्या छिद्रातून आत भरलेल्या चिखलाचे थेंब गळताना दिसत होते.त्या माणसाने ती पिशवी अतिशय काळजीपूर्वक आपल्या पोटावर थापटून ठेवली. त्यानंतर तशीच आणखी एक किंचित लहान दुसरी पिशवी त्याने आपल्या तुळतुळीत टकलावर थापून घेतली.हा सारा उपचार त्या माणसाच्या दिनचर्येचा नित्याचा भाग होता. त्याच्या निसर्गोपचाराचा हा परिपाठ होता.जमिनीवर पसरलेला तो माणूस दिसायला अगदी किरकोळ,बारकेला होता.पण म्हणून त्याच्या शक्तीचा अजमास घेणे वेडेपणाचे ठरणार होते. सत्त्याहत्तर वर्षांचा तो बलाढ्य ब्रिटिश साम्राज्य
शाहीला खिळखिळी करण्यास कारणीभूत होत होता हे कळताच थक्क व्हायला होत होते.त्याने दिलेल्या धक्क्यांनीच तर ब्रिटिश सरकारला जाग आली होती.त्याने उभ्या केलेल्या चळवळीचा परिपाक म्हणूनच व्हिक्टोरिया राणीचा पणतू लंडनहून भारताच्या स्वातंत्र्याची सनद घेऊन भारतात प्रवेश करणार होता. जगाला त्याची ओळख होती.मोहनदास करमचंद गांधी या नावाने ! मात्र सर्व भारतवासी त्याला 'महात्मा गांधी' म्हणूनच संबोधताना दिसत! म.गांधीची प्रतिमा रूढार्थाने 'क्रांतिकारकां'ची नव्हती.तो त्यांचा साचाच नव्हता.तरी जगाच्या इतिहासात लढल्या गेलेल्या एका अभूतपूर्व स्वातंत्र्यसंग्रामाचे ते उद्गाते होते यात शंका नाही.
त्यांच्यापाशी सेनानीला लागणारे भव्य व्यक्तिमत्व बिलकूल नव्हते.दिसायला अगदी लहानगे.उंची जेमतेम पाच फुटांची.वजन एकशे चौदा पौंडाच्या जवळपास.
हातपाय कंबरेच्या मानाने ऐसपैस.अवयवात प्रमाणबद्धता अशी कमीच म्हणा.बरे,चेहरा तरी देखणा असावा ! तोही तुलनेने कुरूपातच जमा. डोक्याचा आकार नको त्याहून मोठा,कान काटकोनात चिकटवल्यासारखे.साखर-
दाणीच्या मुठीसारखे नाक.पुष्कळच बसके,नाकपुड्यांना टोके आलेली.त्याखाली पांढऱ्याशुभ्र मिशांचा झुपका.
दातांचे बोळके झालेले.त्यामुळे ओठांचा आकार संपूर्णपणे दृश्यमान.थोडक्यात,महात्मा गांधीचा चेहरा दर्शनसुख देणाऱ्यापैकी नव्हता.
नाकाडोळयांनी नीटस नसणाऱ्या त्या चेहऱ्यावरचे तेज मात्र आगळे होते.रूपसौंदर्यापेक्षा भावसौंदर्यात सरस भासणाऱ्या त्या मुखावरचे भाव त्यांच्या प्रवाही विचार शक्तीचा व विनोदबुद्धीचा चटकन प्रत्यक्ष आणून देत व त्यातील विलोभनीय चैतन्य साकार करत.
आपल्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने गांधींनी हिंसाचारात लडबडलेल्या शतकापुढे एक नवा पर्याय ठेवला होता.
त्याच्या प्रभावाखाली आणलेल्या भारतीय जनतेला त्यांनी इंग्रजाविरुद्ध उभे केले होते.
त्यांची शस्त्रे होती प्रार्थना व तिरस्कारदर्शक मौनवत,त्यांना मशिनगन्स,दहशतवाद्यांचे बॉम्ब नको होते. त्यांना सशस्त्र उकाव अभिप्रेत नव्हता.त्यांना उभारायचे होते नीतीतत्त्वावर आधारलेले धर्मयुद्ध
हातवारे करून गर्जना करणा-या जुलमी हुकुमशहांच्या पिसाट अंमलाखाली भांबावून गेलेल्या पश्चिम युरोपमधील जनतेला भारतातील घटनांची अपूर्वाई वाटावी इतके त्याचे कार्य महान होते.हिंदुस्थानची प्रचंड लोकसंख्या आपल्यामागे खेचून घेताना गांधीनी आपला आवाज किंचितही चढवला नव्हता.अगदी मोजक्या शब्दांनी व कृतींनी.त्यांनी लोकांना प्रोत्साहित केलेले होते.आपल्या अनुयायांसाठी सत्ता व संपत्ती यांची आमिषे लावलेले गळ त्यांच्यापाशी नव्हते.उलट त्यांनी एक ताकीद देऊन ठेवलेली ज्यांना माझ्यामागून यायचे असेल त्यांनी उघड्या जमिनीवर झोपण्याची,जाडेभरडे कपडे घालण्याची,
मिळेल ते अन्न खाण्याची, पहाटे उठण्याची आणि विशेष म्हणजे शौचकूप साफ करण्याची तयारी ठेवून यावे.
गांधीच्या अनुयायांचा पोषाख साधा,स्वहस्ते कातलेल्या खादीच्या कापडाचा होता.पण त्यामुळे त्याचा परिणाम कमी झाला असे आढळत नव्हते.सहजासहजी उठून दिसणारा हा वेष सर्वांना एकत्र आणणारा होता.युरोपीय देशातील हुकुमशहांनी घालून दिलेल्या वेषांशी त्याची तुलना होऊ शकत होती.
प्रचाराच्या आधुनिक तंत्राचा गांधीनी वापर केला नाही.त्यांचा बराचसा पत्र- व्यवहार त्यांच्याच अक्षरात असावयाचा.आपल्या कार्यकत्यांशी संवाद साधण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे. निरनिराळया माध्यमातून ते लोकांशी संपर्क साधत.जनतेत सक्तीची बांधिलकी निर्माण करण्याचा मार्ग त्यांनी चोखाळला नाही.तरीही त्यांचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचत होता.आपल्या एखाद्या छोटया कृत्याने ते काश्मीर- पासून कन्याकुमारीपर्यंत कोठेही सहजासहजी भिडत असत.
शतकानुशतक' 'नेमिचि येणाऱ्या'दुष्काळाचा अनुभव असणाऱ्या साध्यासुध्या भारतीय जनतेच्या अंत:करणास भिडण्यासाठी त्यांनी एक नवे अस्त्र शोधून काढले होते.
'प्राणांतिक उपोषणा'साधे पण समर्थ. कृती छोटी पण परिणती मोठी.गांधींची सारी शक्ती त्यांच्या उपोषणा त होती. सोडा बायकार्बोनेट मिश्रित पाण्याच्या एका पेल्यात संबंध ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी रिकवून टाकले होते. गांधींच्या कृश आकृतीत भारताची श्रद्धालू भोळीभाबडी,परमेश्वराची पाईक असणारी जनता एका थोर महात्म्याची लक्षणे अनुभवत होती.ते ज्या मार्गाने नेतोल त्या मागनि, निमूटपणे,आज्ञाधारक मुलाप्रमाणे,
त्यांचे बोट धरुन जात होती. त्या शतकातील ते एक थोर व्यक्तिमत्व होते.त्यांच्या अनुयायांनी तर त्यांना संतपदाला नेऊन पोचवले होते.इंग्रज अधिकाऱ्यांना उच्चपदस्थांना मात्र गांधी धूर्त व कारस्थानी वृत्तीची व्यक्ती वाटत.त्यांच्या आमरण उपोषणाचा अंत मृत्यूच्या सीमारेषेवर घडताना दिसत होता.त्यांनी आरंभलेल्या अहिंसक चळवळीचे पर्यवसान नकळत हिसेंत झालेले आढळून येई.व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल तसे मृदू अंतकरणाचे;पण त्यांनाही गांधीच्या या पावित्र्याचा तिटकारा होता.त्यांच्या मते गांधी म्हणजे 'संधिसाधू,आपलाच वरचष्मा ठेवण्याची हाव असलेला,
एक दुतोंडी माणूस' होता.
गांधींबरोबर चर्चा करण्याचे योग आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांपैकी फारच थोड्यांना ते प्रिय होते.त्यातही फारच थोड्यांना ते खऱ्या अर्थाने समजले होते.थोडक्यात,
गांधी म्हणजे नियतीने ब्रिटिशांना घातलेले एक अनाकलनीय कोडेच होते म्हणा ना! तसा माणूस अजबच.महान नैतिक अचारणाबरोबर एक प्रकारचा विचित्र विक्षिप्तपणा त्यांच्या व्याक्तिमत्वात सामावून राहिला होता.गहन अशा राजकीय कूट प्रश्नावर चालू असलेल्या एकीकडच्या चर्चेत मध्येच लैंगिक संयम किवा मिठाच्या पाण्याचा एनिमा अशा-सारख्या वेगवेगळ्या विषयावर अगदी सहजपणे बोलण्यात त्यांना कसलीही भीती वाटत नसे.असे म्हणत की,ज्या ठिकाणी गांधी वास करत ते स्थळ भारताची राजधानी बनून राहायचे तात्पुरते.आजच्या एक जानेवारीच्या शुभदिनी ते बंगालमधील श्रीरामपूरसारख्या एका लहानशा खेड्यात येऊन ठाकले होते.त्या खेडयात कोणतीही आधुनिक सुविधा नव्हती. नुसता फोन करायचा झाल्यास तीस मैल चालायची गरज लागे.पण या असल्या एकाकी खेड्यातून गांधी सर्व उपखंडावर आपला वचक ठेवून होते.नौखाली विभागातील भौगोलिक स्थिती तशी अडचणीची.अगदी दुर्गम असा प्रदेश,जेमतेम चाळीस चौरस मैल.चारी बाजूंनी पाणी.पण तरीही अडीचएक दशलक्ष लोकसंख्या ठेचून भरलेला.त्या संख्येपैकी ऐंशी टक्के जनता मुसलमान.तसे बघायला गेले तर तो दिवस गांधीच्या आयुष्यातील एक अतिशय समाधानाचा दिवस असायला हवा होता.कारण, ज्या एका ध्येयसिद्धीसाठी त्यांनी अविरत असा झगडा दिला ते स्वातंत्र्य आता दृष्टिपथात आलेले दिसत होते.
संघर्षाचा हा अत्युच्च क्षण नजीक येत असताना गांधी मात्र अत्यंत खिन्न व निराश मनःस्थितीत चाचपडत होते.
त्याला कारणही तेवढेच सबळ होते.स्वातंत्र्यदेवतेच्या स्वागतासाठी भयानक जातीय दंगलीच्या पायघड्या घातल्या जात असलेले पाहणे त्यांच्या नशिबात होते.
नौखाली हा त्या दंगलीचा केन्द्रबिंदू ठरला होता.
जिकडेतिकडे अमानुष अशा कत्तलींना उत आलेला.
एकमेकांच्या घरांच्या होळया पेटलेल्या.या दंगलीची झळ साऱ्या देशाला लागण्याची भीती वाटत होती.एवढेच नव्हे तर तिचे पडसाद ॲटलींच्या संभाषणातदेखील उमटलेले दिसले.लॉर्ड माऊन्टबॅटनना दिल्लीला तातडीने पाठवण्याच्या त्यांच्या धोरणाचे निमित्तही तेच होते.आज गांधीही त्यासाठीच श्रीरामपूरात तळ ठोकून राहिले होते.
वास्तविक विजयोत्सवाच्या तयारीला ज्यांनी लागायला हवे तेच एकमेकांच्या उरावर बसून गळे घोटत होते ही केवढी दुःखाची गोष्ट ! गांधींचे अंतकरण शत:श विदीर्ण होत होते हे बघताना.अद्यापही आपल्यामागून मोठ्या आदराने आलेल्या आपल्या देशबांधवांना अहिंसेची महती पटू नये ! यूरोपातील युद्धात झालेल्या अत्याचारी अणुबॉम्बच्या वापरामुळे झालेली हानी बघून त्यांची अहिंसेवरील श्रद्धा अधिकच दृढमूल झाली होती.नव्याने स्वतंत्र्य होणाऱ्या भारताने आशियाला एक नवा मार्ग दाखवावा,नवी प्रेरणा द्यावी याकडे त्यांचे लक्ष होते आणि नेमक्या याच वेळी आपल्याच देशबांधवांनी अहिंसेकडे पाठ फिरवावी ! कोणत्या आशेवर जगायचे आता,असा प्रश्न गांधींना पडला.स्वातंत्र्यप्राप्तीकडे राष्ट्र करत असलेली आगेकूच या अमानुष कृत्यांमुळे कुचकामाची ठरणार होती.त्या विजयश्रीला कसलाच अर्थ उरणार नव्हता.त्यात उन्माद तो कोठून येणार अशाने ?या शिवाय आणखी एक गोष्ट गांधींना छळत होती.ती म्हणजे भारताचे विभाजन.तेही धर्मतत्त्वाच्या आधारावर.
आजपर्यंत गांधीनी ज्या निधर्मी तत्त्वाचा हिरीरीने पुरस्कार केला त्याचा चोळामेळा झाला होता.तो त्यांचा मोठा पराभव होता.भारतातील मुसलमानधर्मी राजकारणी पुरुषांनो मागणी केलेल्या त्यांच्या परमप्रिय मातृभूमीच्या फाळणीने त्याच्या शरीरातील कण न् कण आक्रंदत होता.एखाद्या पौर्वात्य गालिच्यातील धाग्यांप्रमाणे भारतातील वेगवेगळचा धर्माचे लोक गुंतले गेले आहेत असे त्यांचे मत होते.
'भारताचे खंडन करण्याआधी तुम्हाला माझ्या शरीराचे तुकडे करावे लागतील'असे त्यांनी वारंवार घोषित केले होते.जातीय दंगलीत होरपळून गेलेल्या श्रीरामपुरात गांधी आपल्या अंतःकरणातील निःस्सीम श्रद्धेचा शोध घेत होते. तेथील दंगल इतरत्र पसरू नये याची खबरदारी त्यांना घ्यावयाची होती.'सगळीकडे दाट काळोख पसरला आहे.
त्यांचा भेद करणारा एकही प्रकाश-किरण मला दिसत नाही.सत्य अहिंसा ही माझी श्रद्धास्थाने आहेत.गेली पन्नास वर्षे मी त्यांच्याच आधारावर जगत आहे.परंतु आज ! त्या माझ्या प्राणप्रिय तत्त्वांची प्रचीती मला येऊ नये,हेच माझे दुर्दैव ! मी जी तत्त्वे जीवापाड जोपासली,ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला त्या तत्त्वांची ताकद आजमावण्यासाठी,एक नवीन तंत्र शोधून काढण्यासाठी मी येथे मुद्दाम आलो आहे.
गांधींनी आपल्या अनुयायांना सांगितले.
दिवसामागून दिवस घालवत गांधी त्या गावातून फिरत राहिले.तेथील लोकांशी बोलत राहिले. स्वतःशी चिंतन करू लागले.ते आपल्या 'आतल्या आवाजा' च्या आदेशाची प्रतिक्षा करत होते.त्या आवाजाने त्यांना यापूर्वीच्या अनेक पेचप्रसंगांतून मार्ग दाखवला होता;
आणि अखेर तो आदेश आला.त्या दिवशीच्या निसर्गोपचार-कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्र केले.आपला मनसुबा त्यांनी जाहीर केला.आता गांधी एका क्लेशयात्रेस आरंभ करणार होते.दंगलग्रस्त नौखाली भागात त्यांची पदयात्रा सुरू होणार होती.
नौखालीची सत्तेचाळीस गावे म्हणजे जवळजवळ एकशेसोळा मैलांचा भूप्रदेश-ते पालथा घालणार होते.पश्चातापाची खूण म्हणून 'अनवाणी चालत चवताळलेल्या मुसलमांनाना आवर घालण्यासाठी हा हिंदू त्यांच्यात जाऊन मिसळणार होता. झोपडी- झोपडीत जाऊन शांततेचा पाठ देणार होता.त्यांच्या या पश्चातापदर्शक प्रवासात त्यांना साथ हवी होती ती फक्त परमेश्वराची ! आपल्या जोडीला त्यांना केवळ चौघेजणच हवे होते.खेड्यातून हिंडताना जो कोणी जे काही देईल त्यावरच गुजराण करायची त्यांची जिद्द होती.
काँग्रेस व मुस्लीम लीग या पक्षाचे राजकारणी दिल्लीत बसून चर्चेचा वाटेल तेवढा घोळ घालत भारताच्या भवितव्याच्या खुशाल चिंध्या करू देत.अखेर त्यांच्यापुढील समस्यांचे उत्तर त्यांना नेहमीसारखे या देशातील खेड्यातच शोधावे लागणार आहे.हिंदु-मुसलमानात बंधुभाव व सलोखा निर्माण करण्याचा हा माझा शेवटचा महान प्रयोग आहे.बर तो यशस्वी झाला तर सारे राष्ट्र त्यांच्या तेजाने उजळून निघेल या नौखालीत पुन्हा एकदा अहिंसेची मशाल प्रज्वलित होईल व तिच्या झळीने भारताला पछाडणारे जातीय- वादाचे भूत पार पळून जाईल असा माझा विश्वास आहे.' ही गांधीवाणी अपार विश्वासाची होती.गांधींनी एका भल्या पहाटे त्यांच्या पदयात्रेस आरंभ केला.त्यांच्यासमवेत त्यांची एकोणीस वर्षांची नात-मनू-होती,जवळच्या सामानात कागद,चरखा व त्यांना गुरुस्थानी असणारी तीन हस्तिदंती माकडे-कानांवर,डोळयांवर व तोंडावर हात धरून बसलेली,
भगवद्गीता,कुराण,येशू ख्रिस्ताच्या तत्त्वांची व आचरणाची पुस्तिका यांचा समावेश होता.
हातात बांबूची लाठी घेतलेला तो सत्त्याहत्तर वर्षांचा वृद्ध आपल्या हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेण्यासाठी निर्धाराने पावले टाकत चालला. निरोप देणारे गावकरी गुरुदेव टागोरांचे गीत गात होते.गांधींना प्रिय असणाऱ्या त्यातील एका गीताचे स्वर गांधीही गुणगुणत होते--
' जरी त्यांची साद ऐकू आली नाही.तरी तू तसाच पुढे चल-एकटा.चल अकेला '
हिंदु-मुसलमानातील जातीय दंगली हा भारताला नियतीने दिलेला एक कठोर शाप होता.हजारो वर्षांची परंपरा पाठिशी घेऊन आलेला तो शाप थेट ख्रिस्ती सनापूर्वी पंचवीसशे वर्षांमागून छळत येत होता.हिंदूंच्या या मातृभूमीवर मध्ययुगात मुसलमानांनी आक्रमण करून अठराव्या शतकापर्यंत त्या देशात राज्य केले होते.
या दोन्ही धर्मात अगदी कमालीचा फरक होता. अगदी आधिभौतिक तत्त्वांपासून ते थेट सामाजिक रूढीपर्यंत त्यांचे आचारविचार परस्पर विरोधी होते.अठराव्या शतकात इंग्रज आले व मुसलमानी साम्राज्य संपले.मात्र या दोघातील संशयाचे वातावरण कायमच टिकले. मुसलमानांना केलेल्या अत्याचारांचा हिंदूंना विसर पडला नाही.शिवाय,या दोन्ही समाजात आर्थिक स्पर्धाही होतच राहिली.त्यामुळे मूळच्या सामाजिक व धार्मिक प्रश्नांचे गांभीर्य वाढतच गेले.आध्यात्मिक व धार्मिक प्रवृत्तीच्या या खंडप्राय देशात स्वातंत्र्ययुद्धास धर्मयुद्धाचे रूप येण्यात नवल नव्हते.कळत नकळत हे रूप देण्यास गांधीच कारणीभूत झाले.वास्तविक, धर्मसहिष्णुतेच्या बाबतीत गांधींचा हात कोणीही धरला नसता.भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुसलमानांना सहभागी करून घेण्याचा आग्रहही त्यांचाच.पण अखेर गांधी स्वतःएक 'हिंदू' होते. परमेश्वराच्या अस्तित्वावर त्यांची अविचल श्रद्धा होती.तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता.आजाणतेपणी त्यांच्या चळवळीला हिंदुत्वाची छटा लाभली.कदाचित ते अपरिहार्यही असेल.पण नेमकी तीच गोष्ट भारतीय मुसलमानांच्या मनात संशय व अविश्वासाचे बीज रोवून राहिली.चातुर्वण्यभेद व पुनर्जन्म यांवर हिंदूंचा असणारा विश्वास हा एक अडथळाच ठरला.ती एक अढी होऊन बसली.वेळोवेळी झालेल्या निवडणुकांत मुसलमानांना सहभागी करून घेण्यास स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सतत नकार दिला.) त्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदुस्थानात आपण अल्पसंख्यच राहणार, बहुसंख्यांक हिंदू आपल्यावर अन्यायच करणार ही जाणीव दृढ झाली.ज्या भूमीवर आपले पूर्वज सत्ताधीश म्हणून राहिले त्याच भूमीत आपल्याला दुबळे,अवमानित जीवन जगावे लागणार ही कल्पनाच त्यांना असह्य वाटू लागली.या फेऱ्यातून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग त्यांच्यापुढे उरला व तो म्हणजे या उपखंडावर आपल्या समाजासाठी स्वतंत्र अशा इस्लामी राज्याची निर्मिती.
मुसलमान मागणी करत असलेल्या या राज्याच्या योजनेचे बीजारोपण प्रत्यक्षात इंग्लंडातील केंब्रिजमधल्या एका साध्या निवासात झाले म्हणे! एका चार-साडेचार पानांच्या कागदावर टंकलिखित केलेल्या त्या आराखड्याचा उद्गाता होता एक भारतीय मुसलमान पदवीधर,रहिमत अली त्याचे नाव.त्याचे वय त्यावेळी चाळीस होते.२८ जानेवारी १९३३ या दिवशी त्याने काही मंडळी जमवली.भारत हे एकसंघ राष्ट्र आहे.या मूळ कल्पनेची संभावना त्याने 'एक पूर्णतः विसंगत वाटणारे असत्य' या शब्दांत केली. पंजाब,सिंध,सरहद्द प्रांत,बलुचिस्थात,
काश्मीर या भूप्रदेशात मुसलमानांची संख्या अधिक आहे,सबब त्या भूमीचे एका वेगळया मुसलमान राष्ट्रात रूपांतर झाले पाहिजे असे त्याने सुचविले.त्या राष्ट्रासाठी त्याने नावही दिले-पाकिस्तान (पवित्र प्रदेश). हिंदु राष्ट्रवादाच्या वेदीवर आम्ही बळी जाऊ इच्छित नाही'अशा अलंकारिक शद्वात त्याने आपल्या निवेदनाचा समारोप केला होता.
रहिमत अलीच्या या गाभ्याचा भारतीय मुसलमानांच्या राजकीय आकाक्षांना खतपाणी घालणाऱ्या मुस्लीम लीगने स्वीकार केला व त्याच पायावर आपली चळवळ उभी केली. बॅ.जिना त्या मूळच्या सभेला उपस्थित होते. आपल्यासाठी स्वतंत्र राष्ट्र ही कल्पना मुसलमानांना रुचली यात नवल नाही.शिवाय काँग्रेसच्या पुढाऱ्यांची वागणूक त्यांना उपकारच ठरली. १६ ऑगस्ट' हा दिवस प्रत्यक्ष कृति दिन' म्हणून पाळण्याची हाक लीगच्या नेत्यांनी मुसलमान जनतेला दिली.जरूर पडेल तर प्रत्यक्ष कृतीनेच पाकिस्तान स्थापन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली.बस्स! एवढे निमित्त पुरे झाले.
कलकत्ता शहरात जातीय दंग्याची ठिणगी पडली.
मुसलमानांच्या झुंडी हिंदूंचा निःपात करण्यासाठी रस्त्यावर आल्या.प्रतिकाराने पेट घ्यायला वेळ लागलाच नाही.कलकत्ता,बिहार, नोखाली,मुंबई या शहरात अत्याचारांनी थैमान घातले.हुगळीचा रंग रक्त- रंजित झाला. गिधाडांची चैन झाली.एकट्या कलकत्त्यात सहा हजार लोक यमसदनास गेले.भारताच्या भूमीवर एक नवे यादवी युद्ध सुरू झाले.भारताच्या इतिहासात कलाटणी मिळण्याचा क्षण जवळ आला. 'आमचे राष्ट्र आम्हाला मिळाले नाही तर सगळा भारत आम्ही आमच्या ताब्यात घेऊ' अशी धमकी मुसलमानांनी दिली होती.तिची चाहूल लागायला आरंभ झाला.पुण्यभूमी नरकभूमी बनली.गांधी अतिशय व्यथित झाले.एकीकडे गांधी दुःखी,तर दुसरीकडे महंमदअली जिना खूष.गेल्या पाच शतकाचा गांधीचा प्रमुख राजकीय वैरी बॅरिस्टर जिना.एक चाणाक्ष व बुद्धिमान वकील.भारतात उसळलेल्या जातीय दंग्यांचे भांडवल कितपत करावे हे कळण्याइतकी अक्कल त्यांना होती.( फ्रीडम ॲट मिडनाईट मूळ लेखक- लॅरी कॉलिन्स,
डोमिनिक लापिए,भाषांतर- राजेंद्र व्होरा,अनिल गोरे,संस्करण- माधव मोर्डेकर,अजब पुस्तकालय कोल्हापूर) इतिहास जिनांच्या कर्तुत्वाची नोंद घेईल की नाही याची शंका आहे. (अर्थात,त्यांच्या जमातीच्या इतिहासात ती होणारच !) पण तरीही गांधी किंवा इतर कोणाच्याही हातात नसलेली भारताच्या भवितव्याचा दरवाजा खोलण्याची चावी फक्त जिनांच्याच हातात होती.अशा या कठोर प्रवृत्तीच्या,मिळतेजुळते न घेणाऱ्या दुराग्रही माणसाशी व्हिक्टोरिया राणीच्या पणतूची-लॉर्ड माऊन्टबॅटन यांची-गाठ होती.
१९४६ च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईबाहेरील एका तबूंत आपल्या अनुयायांसमोर परिस्थितीचे मूल्यमापन करताना जिनांनी त्यांना 'प्रत्यक्ष कृती' चा अर्थ विशद करून सांगितला होता.त्यांनी जाहीर केले : जर काँग्रेसला युद्धच खेळावयाचे असेल तर त्यासाठी आम्ही एका पायावर उभे आहोत.'आपल्या निर्वीकार चेहऱ्यावर स्मित हास्याची लकेर उमटवत,आपल्या भेदक डोळयांत अंतःकरणातील दबलेल्या विकारांना वाट करत बॅ.जिनांच्या निस्तेज ओठातून आव्हान असे होते :
• हिंदुस्थान खंडित तरी किंवा खत्म तरी होईल ! आम्ही मुसलमान त्याशिवाय गप्प बसणार नाही हे ब्रिटिशांनी व काँग्रेसने नीट ध्यानात ठेवावे.'