* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१५/६/२५

बारा वर्षांचं पोरं ! Twelve year old boy

आजवर नोंदवल्या गेलेल्या कहाण्या सांगतात,की जेव्हा मदतीला धावून येणारं कोणी नाही याची जाणीव मुलांना होते तेव्हा त्यांच्यामध्ये जगण्याची नवी जिद्द येते.अमेरिकेतल्या कटाहदिन पर्वतावरच्या जंगलात हरवलेल्या डॉन फेंडलरची गोष्ट हे या 'सर्व्हयव्हल इन्स्टिंक्ट'चं क्लासिक उदाहरण मानलं जातं.


निर्मनुष्य जंगलात बारा वर्षांचं पोर!डॉन फेंडलर,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानिटकर,समकालीन प्रकाशन 


वडील आणि दोन भावांसोबत ट्रेकिंगला गेलेला असताना हरवण्याची वेळ कुणावर का यावी?पण डॉन फेंडलरच्या बाबतीत तसं घडलं खरं.कटाहदिन पर्वतरांगांमधलं बॅक्स्टर शिखर चढायचं आणि नंतर पुढे आणखी एका ट्रिपला जायचं,असं या चौघांचं ठरलेलं असतं.त्यात बदल होण्याचं खरं तर काही कारण नसतं;पण पाच-दहा मिनिटांच्या घडामोडींमुळे त्यांचे सगळे मनसुबेच नव्हे,तर डॉनचं आयुष्यच बदलून जातं.


ही गोष्ट आहे तब्बल ८० वर्षांपूर्वीची.बारा वर्षांचा डॉन, त्याचा जुळा भाऊ रायन आणि धाकटा टॉम आपल्या वडिलांसोबत मेन राज्यातल्या सर्वाधिक उंचीच्या कटाहदिन पर्वताचा ट्रेक करण्यासाठी आलेले असतात.हा पर्वत चढायला अतिशय अवघड मानला जातो.प्रचंड आकाराच्या शिळांमधून वाट काढत जाणारा रस्ता,सतत बदलणारी हवा आणि चहबाजूनी पसरलेलं दाट जंगल.दुपारी एक वाजता फेंडलर कुटुबातले हे चौघं आणखी दोघा गिर्यारोहकांसोबत बेस कॅम्पवरून निघतात.चढता चढता डॉन आणि कटाहदिनमधल्या एका गाइडचा मुलगा हेन्री इतरांच्या बरेच पुढे जातात, ते शिखरावर पोहोचतात तेव्हा तिथे दाट धुकं पसरलेलं असतं.एका जागी थांबलं तर माणूस गोठून जाईल अशी थंडी पडलेली.त्यामुळे डॉन लगेचच खाली उतरायला लागण्याचा निर्णय घेतो.शिवाय,का कुणास ठाऊक, त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलेल असत. लवकरात लवकर वडील आणि भावांपाशी जावं,ही भावना त्याचा ताबा घेते.हेन्रीला कड्याच्या दुसऱ्या बाजूने एक ओळखीचा गिर्यारोहक येताना दिसतो. त्याच्यासाठी थांबून मगच खाली उतरावं असं त्याला वाटतं.अशा धुक्यात खाली उतरणं धोक्याचं आहे,असं हेन्रीने सांगूनही डॉन त्याकडे लक्ष देत नाही.आपण कसली रिस्क घेतोय असं त्याच्या मनातही येत नाही;पण तिथेच त्याची मोठी चूक होते.


धुक्याचा पडदा इतका दाट असतो की डॉनला काही फुटांवरचंही दिसत नसतं;पण थोडं खाली गेलं की वडील भेटतील,अशा विचाराने तो खालच्या दिशेने चालत राहतो.जसे वर आलो,तसंच खाली जायचं एवढंच,असं त्याला वाटत असतं.पण त्याला माहिती नसतं की कटाहदिनमधल्या वाटा ऐन सूर्यप्रकाशताही फसव्या असतात.येताना आपण याच रस्त्यावरून आलो ना,अशी शंका डॉनला मधून मधून येत असते;पण उतरताना रस्ता नेहमीच वेगळा वाटतो,असं म्हणून तो स्वतःचं समाधान करतो.बराच वेळ चालल्यावरही वडील भेटत नाहीत,तेव्हा मात्र त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते.पण आपण थोडे भरकटलो असलो तरी वडील फार लांब नसणार अशी खात्रीही त्याला वाटत असते.

शिवाय हेन्री आणि त्याला भेटलेला गिर्यारोहकही आता खाली उतरू लागले असणार आणि आपण आहोत त्या ठिकाणाहून जास्त दूर नसणार असाही त्याचा अंदाज असतो.त्यामुळे एका पठारापाशी थांबून तो जोरजोरात हाका मारतो;पण धुक्यामुळे त्याचा आवाज फारसा लांबवर पोहोचतच नाही.तिथेच थांबून वाट पाहत राहावं की पुन्हा खाली उतरू लागावं हे ठरवताना डॉनचा पार गोंधळ उडतो.तिथेच थांबलं तर कोणी ना कोणी भेटेल असं एक मन सांगत असतं,पण दुसरीकडे तिथे त्या धुक्यात एकट्याने भीतीही वाटत असते.शिवाय मुख्य अडचण असते ती कडाक्याच्या थंडीत एका जागी थांबून राहण्याची.असेच थांबून राहिलो,तर सकाळपर्यंत थंडीने गोठून मरू,या विचाराने तो पुन्हा एकदा खालच्या दिशेने चालू पडतो;पण थोड्याच वेळात त्याच्या पक्कं लक्षात येतं की आपण रस्ता चुकलोय ! कटाहदिनच्या पर्वतावर रस्ता चुकणं म्हणजे धोक्याची घंटाच.कारण थोडेफार आखलेले ट्रेल्स वगळता बाकीची पर्वतरांग जंगलांनी वेढलेली आणि निर्मनुष्य असते.पण डॉनला त्या धोक्याची जाणीव नसल्यामुळे थोड्या वेळाने धुकं कमी होईल आणि आपल्याला वाट कळेल,किंवा कोणी तरी आपल्याला शोधून काढेल असं त्याला वाटत असतं. त्यामुळे मनातून काहीसा घाबरलेला असला तरी फारशी चिंता न करता तो खालच्या दिशेने चालत राहतो.सध्या तरी त्याचं सगळं लक्ष ती खडतर वाट उतरण्यावर केंद्रित झालेलं असतं.वाट अशी काही नसतेच.डॉनच्या दुप्पट-तिप्पट आकाराच्या शिळा,त्यामध्ये वाढलेली काटेरी झाडंझुडपं,छोट्या अणकुचीदार दगडांचा खच, अशा परिस्थितीत ठेचकाळत,काट्यांनी ओरखडून घेत, धडपडत डॉन चालत राहतो.एकदा तर तो अचानक २०-२५ फुटांच्या खड्ड्यात पडतो;पण नशिबाने एका झुडपाचा आधार घेऊन तो कसाबसा वर येतो. छातीतली धडधड शांत करत तो एका जागी बसून राहतो.स्काऊटमध्ये शिकवलेलं वाक्य त्याला आठवतं, की संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवलं पाहिजे,तरच आपल्याला मार्ग मिळू शकतो.'डोकं शांत ठेव' असं स्वतःला बजावत तो पुन्हा एकदा परतीच्या वाटेतल्या खाणाखुणा दिसतात का हे बघण्याचा प्रयत्न करतो; पण तसा काही मागमूसही लागत नाही.


थोड्याच वेळात पाऊस आणि बर्फ पडायला सुरुवात होते.डॉन पूर्ण भिजून जातो.त्याने घातलेली जाडजूड जीन्स पूर्ण ओली होऊन जाते.आता एका जागी थांबून राहणं आणखी अवघड होतं.थोड पुढे गेल्यावर त्याला अचानक एका झाडावर एक टेलमार्क दिसतो.त्यावर लिहिलेलं असतं सॅडल ट्रेल.हा ट्रेल जंगलात बराच आत जातो असं डॉनने ऐकलेलं असतं.त्यामुळे तो त्या वाटेने न जाण्याचा निर्णय घेतो.पुढची चाल सुरू करण्याआधी डॉन पुन्हा एकदा खच्चून हाका मारतो; पण याही वेळी कोणी ओ देत नाही.हाका मारून थकल्यावर मात्र त्याला रडू फटत.तो बराच वेळ दगडावर बसून रडत राहतो.पुन्हा हाका मारतो.पुन्हा उठून वाट शोधण्याचा प्रयत्न करतो.पुन्हा बसून रडू लागतो.त्यातच डोंगरावरून खाली वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज त्याला घाबरवून सोडतो.कॅम्पवरच्या गाइड्सनी सांगितलेल्या भुताखेतांच्या गोष्टी त्याला आठवू लागतात.ती भीती मनातून घालवण्यासाठी तो पुन्हा चालू लागतो.शिवाय आपण चालत राहिलो तर रात्रीची जेवणं होण्याच्या आत आपण कॅम्पपाशी पोहोचू अशीही आशा असतेच.आता डोंगरावरची झाडांची संख्या वाढू लागलेली असते.जंगलच सुरू झालेलं असतं म्हणा ना! आणखी थोडं खाली गेल्यावर त्याला एक छोटा ओढा वाहताना दिसतो.आपण डोंगराच्या पायथ्याजवळ आलो आहोत असं वाटून डॉनला थोडा धीर येतो.पण आता सूर्य मावळू लागलेला असतो आणि झपाट्याने अंधार होत जातो.आजची रात्र जंगलातच काढावी लागणार हे त्याला कळून चुकतं.आपण हरवलो आहोत हे कळल्यापासून मनात भीती असली तरी रात्र होण्याआधी आपण कॅम्पवर पोहोचू असं त्याला खात्रीने वाटत असतं.त्यामुळे जंगलात एकट्याने राहावं लागणार हे लक्षात आल्यावर अवघ्या बारा वर्षांच्या पोराची अवस्था काय होईल,या भीतीने आपल्याच पोटात गोळा येतो;पण डॉन मात्र त्यामानाने शांत असतो.पाऊस लागू नये यासाठी तो त्यातल्या त्यात मोठं झाड शोधून काढतो आणि त्याखाली झोपण्याची तयारी करतो. अंगावरची भिजून कडक झालेली जीन्स आणि बूट काढून ठेवून अंगाचं मुटकुळं करून तो पडून राहतो. शांत बसल्यावर पहिल्यांदाच त्याच्या लक्षात येतं,दगड आणि झाडाझुडपांमुळे खरचटून आपल्याला अंगभर जखमा झाल्या आहेत.अणकुचीदार दगडांवरून चालून बुटांची पूर्ण वाट लागलेली आहे;पण त्याकडे दुर्लक्ष करून तो झोपी जाण्याचा प्रयत्न करतो.


जंगलात एकट्याने झोपणं इतकं सोपं असतं? आपल्याकडे तर पोरं तोवर स्वतंत्र खोलीतही एकट्याने झोपू लागलेली नसतात.

डॉन त्या अनुभवाला कसा सामोरा जातो?जंगलातली रात्र आवाजांनी दणाणून गेलेली असते.आजवर कधीही न ऐकलेले भेसूर आवाज डॉनला भिववत असतात,पण त्याहीपेक्षा जास्त त्रास असतो तो अंगावर चालून येणाऱ्या डासांचा आणि निरनिराळ्या चावऱ्या माश्यांचा.आपण हेन्री सोबत राहिलो असतो तर कॅम्पमधल्या उबदार बेडवर असतो.या विचाराने डॉन स्वतःवर चिडतो,हताश होतो, रडतो.पण मुलांच्या मनात काय उलथापालथ सुरू असते बघा.


आपण हरवलोय याचं डॉनला जितकं दुःख असतं तितकंच आपल्यामुळे आई-वडिलांच्या जिवाला घोर लागला असणार याबद्दल त्याला वाईट वाटत असतं.स्वतःसाठी मदत मागताना तो देवाला म्हणतो, 'माझ्या मॉम-डैडला जास्त काळजी करू देऊ नकोस !'


सकाळी उठतो तेव्हा त्याला एक विचित्र अनुभव येतो. उठून बघतो तो ओढ्याच्या पलीकडे हेन्री उभा असतो. डॉन आनंदाने वेडाच होतो.तो पळत ओढ्यापाशी जातो आणि हेन्रीला हाका मारू लागतो;पण हेन्री त्याच्याकडे पाहत नाही की काही बोलत नाही.

त्याची नजर भलतीकडेच कुठे तरी लागलेली असते.डॉन त्या दिशेने बघतो,तर तिथे भूतासारख्या चार मोठ्या पांढऱ्या आकृत्या हेन्रीकडे पाहत असतात.हेन्रीने आपल्याला मदत करू नये यासाठी त्या त्याला हिप्नॉटाइज करताहेत असं डॉनला वाटतं.थोड्या वेळाने बाइकवर बसून त्याचे वडीलही तिथे आलेले त्याला दिसतात.ते त्याला हाकाही मारतात.डॉन आपले बूट आणि जीन्स घेऊन त्यांच्या दिशेने धावत सुटतो;पण तिथे ओढा ओलांडून पोहोचेपर्यंत हेन्री,ती भुतं आणि डॉनचे वडील सारेच गायब झालेले असतात.पुढे सुटका झाल्यावर या प्रसंगाबद्दल बोलताना अनेकजण डॉनला असं सुचवण्याचा प्रयत्न करतात की हे त्याला पडलेलं स्वप्न असावं;पण डॉन मात्र आपण जागेपणीच हे सारं पाहिलं यावर ठाम असतो.त्यामुळे मनाच्या असंतुलित अवस्थेमुळे त्याला झालेले भास असावेत,असा निष्कर्ष डॉक्टर काढतात.या प्रसंगानंतर खूप वेळ डॉन हतबल होऊन बसून राहतो.त्याच्या मनात विचार येतो,'स्वतःचे कपडे फाडण्याएवढे लोक वेडे होत असणार ते बहुतेक असेच.' पण त्याच वेळी त्याच्या आतून आवाज येतो, 'तुला वेडं व्हायचं नाहीये.तुला यातून बाहेर पडायचंय.' डॉन लिहितो,'त्या दिवसांत अनेकदा कुणी तरी दुसरंच माझ्याशी बोलतंय;जंगलातून बाहेर पडण्यासाठी,माझं मन स्थिर राहावं यासाठी मला मदत करतंय असं मला वाटायचं.'मन स्थिर ठेवण्याचा आणखी एक उपाय त्याला माहिती असतो,तो म्हणजे देवाची प्रार्थना.त्या काळात डॉन मनापासून देवाची प्रार्थना करतो.तो लिहितो,'प्रार्थना करताना आपण काय म्हणतोय याचा मी आजवर कधीच विचार केला नव्हता, पण त्या काळात मात्र मी एकेक शब्द विचार करून उच्चारायचो.प्रार्थना केल्यावर मला आतून शांत शांत वाटायचं.मी पूर्ण भिजलेलो असलो तरी अंगात ऊब तयार व्हायची.'प्रार्थना करून झाल्यावर डॉन पुन्हा चालू लागतो.स्काऊटमध्ये शिकलेला आणखी एक नियम त्याला आठवत असतो.जंगलात हरवलात तर एखाद्या ओढ्याच्या काठाने चालत राहां,तो ओढा मोठ्या ओढ्याला किंवा नदीला जाऊन मिळेल.आणि अशा ठिकाणी नक्कीच एखादी मानवी वस्ती असेल.आता काही झालं तरी ओढ्याचा काठ सोडायचा नाही असं डॉन ठरवून टाकतो पण आता चालणंही त्याच्यासाठी तितकं सोपं राहिलेलं नसतं,कारण बूट पायाला बसत नसतात.ते भिजल्यामुळे आकुंचन पावलेत असं डॉनला वाटत असतं;पण प्रत्यक्षात चालून चालून त्याचे पाय सुजलेले असतात.थोड्या वेळाने तर ते ओढ्यात वाहूनच जातात.तसंच त्याच्या पँटचंही या काठावरून त्या काठावर टाकण्याच्या नादात पँटही वाहून जाते.

अंगावर पँट नसताना कॅम्पमध्ये जाणार कसं हा प्रश्न एकवेळ सोडवता येऊ शकतो;पण काटेकुटे, थंडी,पाऊस आणि डासांनी भरलेल्या जंगलात पँटशिवाय राहणं म्हणजे अशक्यच.पण डॉनपुढे दुसरा इलाज काय असतो? आज संध्याकाळपर्यंत काही झालं तरी आपण कॅम्पवर पोहोचूच,असं मनाशी म्हणत तो ओढ्याकाठून चालत राहतो.


पोटातल्या कावळ्यांमुळे बूट-पँट हरवण्यासारख्या 'छोट्या' गोष्टींकडे लक्ष देणं त्याला शक्य नसतं.खाऊन बारा तास कधीच उलटून गेलेले असतात.डोळ्यांसमोर त्याच्या आवडीचे पदार्थ नाचायला लागलेले असतात. त्याच्या मनात येतं,एक कप दुधाचं महत्त्व आजवर कधीच कळलं नसेल.डॉनला झाडांमध्ये वेगवेगळी फळं दिसत असतात;पण नक्की खात्री असल्याशिवाय रानटी फळं खाणं धोक्याचं आहे,एवढं त्याला माहिती असतं. ओढ्यात मासे असतात;पण ते तरी कच्चे कसे खाणार? त्यामुळे बराच काळ ओढ्यातलं पाणी पिऊनच त्याला भूक भागवावी लागते.


जवळपास दुसरा पूर्ण दिवस डॉन काही न खाता आपले जखमी पाय ओढत चालत असतो.दिवस मावळायला येतो तरीही मानवी वस्तीचं कुठलंच चिन्हं त्याला दिसत नाही.त्यातल्या त्यात दिलासा एवढाच की अंधार होण्याआधी त्याला स्ट्रॉबेरीने लगडलेलं झाड दिसतं.डॉन त्या झाडावर अक्षरशः तुटून पडतो.पुन्हा रात्र.पुन्हा तीच थंडी.पाऊस.तेच अंग फोडून काढणारे डास.आधीच रक्तबंबाळ झालेलं अंग कराकरा अंग खाजवत राहणं.अंगाचं मुटकुळं करून जॅकेट पांघरुणासारखं गुंडाळून एका झाडाखाली झोपण्याचा डॉनचा प्रयत्न यशस्वी होतो न होतो तोच पावसाला सुरुवात होते.

रात्रीच्या मिट्ट काळोखातच धडपडत उठून त्याला जरा बरी जागा शोधावी लागते.अखेर एक मोठ्या झाडाच्या ढोलीत त्याला आश्रय मिळतो.रात्रीतून ही धडपड करावी लागल्याबद्दल चिडचिड करण्याऐवजी अशी सुरक्षित जागा शोधून दिल्याबद्दल देवाचे आभार मानून तो झोपी जातो.पण त्या रात्री थंडी इतकी पडते की डॉनचे सांधे आखडून जातात.एखाद्या म्हाताऱ्या माणसाप्रमाणे 


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

१३/६/२५

दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही Attitude is everything

तुमच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी सर्वात आधी वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करा. - नॉर्मन व्हिंसेंट पील.


२८ जुलै,२००६.अटलांटा,जॉर्जिया.एका भल्या मोठ्या बॉलरूममधील माझे व्याख्यान मी नुकतेच संपविले होते.

आठवड्याच्या शेवटास असलेल्या या चर्चासत्रास शेकडो लोक अटलांटा येथे आले होते, ज्यामध्ये व्यक्तिगत विकास या क्षेत्रातील जिम रॉन आणि बॉब प्रॉक्टर यासारखे उत्कृष्ट वक्ते सहभागी झाले होते.तुम्हाला कदाचित माहीत असेल की,जिम रॉन आणि बॉब प्रॉक्टर यांना व्यक्तिगत स्वमदत उद्योगातील एक 'आख्यायिका'च म्हणता येईल. गेल्या ४० हून जास्त वर्षांमध्ये जगभरातील लाखो लोकांपुढे,प्रत्येकाने सादरीकरण केलेले आहे.


तुमच्या वृत्तीत बदल करा आणि तुमचे जीवनच बदलेल ! दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही,अनुवाद - डॉ.मोहन उसगावकर,

ॶॅटिट्यूड इज एव्हरिथिंग,मुळ लेखक - जेफ केलर,प्रकाशक - साकेत प्रकाशन,प्रा.लि.पुणे


जेव्हा सर्वांनी ते सभागृह सोडले रूम सोडली तेव्हा मी माझ्या सर्व गोष्टी गोळा करायला सुरुवात करणार होतो; पण काही कारणासाठी मी क्षणभर थांबलो होतो.मी सन १९८५ मध्ये मागे गेलो जेव्हा मी माझ्या अभ्यासिकेत निराश आणि नकारार्थी विचारांना कवटाळून बसलो होतो.


त्यावेळेस,मी जिम रॉन आणि बॉब प्रॉक्टर यांचे ध्वनिफितीवरचे कार्यक्रम ऐकण्यास सुरुवात केली होती.

आता २० वर्षानंतर,त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर व्याख्यान करायचा मान मला लाभला होता.


"हे कसे घडले?" असा माझा मीच विचार करीत होतो. मला स्पष्ट आणि मोठ्या आवाजात माझेच उत्तर मिळाले,'मी माझी वृत्ती बदलली.'


हे पाहा,जेव्हा तुम्ही तुमची वृत्ती बदलता तेव्हा तुमचे विश्वच चमकून जाते.तुम्ही चैतन्यमय होता.तुम्हाला नव्या शक्यता दिसू लागतात.तुम्ही चैतन्यमय होता. तुम्ही कृतिशील बनता.तुम्ही असामान्य परिणाम साध्य करता.म्हणून मी म्हणतो,'जेव्हा तुम्ही तुमची वृत्ती बदलता तेव्हा तुमचे जीवनच बदलते!'


जर मी तुम्हाला सांगितले की,गेली २० वर्षे ही माझी यशाची केवळ एक माळ होती.तर मी तुम्हाला खोटे सांगतोय असे होईल.खरं तर सर्व बाबी यशापासून दूर होत्या.या वाटचालीत माझ्या पराजयांचा आणि पिछेहाटींचाही सहभाग होता;परंतु या पुस्तकात मी ज्या यशाच्या तत्त्वाबद्दल बोललेलो आहे त्या तत्त्वांनी मला असे धाडस,मार्गदर्शन आणि बळ दिले की,ज्यामुळे माझी पुढील वाटचाल चालू राहिली.


तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवा..


हे पुस्तक वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.यावरून हे दिसून येते कीतुमचे अविश्वसनीय मनोबल विकसित करण्यामध्ये तुम्हाला खरंच रुची आहे.तरीसुद्धा,हे पुस्तक वाचणे ही फक्त, तुम्हाला जसे जगावयाचे आहे,तसे वागण्याची पहिली पायरी आहे.तुम्ही जेव्हा या कल्पनांवर लक्ष केंद्रित करून-अमलात आणण्यासाठी कृती कराल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात विलक्षण घडामोडी घडवून आणण्याच्या मार्गावर असाल.


काम असे करा की ते असफल होणं अशक्य असेल. - डोरोथी बँडे 


तुम्ही कदाचित आकडेवारी पाहिली असेल की जी सांगते,

लोकसंख्येच्या फक्त ५ टक्के लोक यशाची उच्च पातळी गाठतात,असे का बरे? २० वर्षांच्या संशोधनानंतर मला ते पटलेले आहे की,ते असे का असते.या पुस्तकात नमूद केलेली यशाची तत्त्वे,एखादी व्यक्ती दैनंदिन पातळीवर अमलात आणेल अशी व्यक्ती क्वचित असेल.क्वचितच एखादी व्यक्ती सातत्याने

सकारात्मक वृत्ती मनी बाळगते की,त्यामुळे त्याचे विचार ही त्याची सत्यता बनू शकेल.क्वचित एखादी व्यक्ती, स्वतः वापरलेल्या शब्दांकडे लक्ष ठेवते,ते हे लक्षात घेऊन की ती तिच्या मनाची तयारी सर्वसाधारण किंवा अपयश यासाठी करीत आहे.


अशीही एखादी व्यक्ती क्वचितच असते की जिच्यात,तिला समोर येणाऱ्या भीतींना तोंड द्यायचे धाडस असते, कारण त्यामुळेच ती ज्या गोष्टी करायला घाबरते,त्याच गोष्टी करून तिची कुवत विकसित होते.


क्वचित एखादीच व्यक्ती अशी असते जी प्रत्येक काळ्या ढगामध्ये चंदेरी किनार शोधत असते.


आणि क्वचितच एखादी व्यक्ती निर्धार करते, सकारात्मक वृत्तीने पाठपुरावा करते.... आणि तिच्याकडेच काम करून घेण्याची चिकाटी असते.


अशा अत्यंत दुर्मीळ व्यक्तींपैकी तुम्ही एक असावयास हवे,असे मी तुम्हाला आव्हान करतो.


तुम्ही कधी पाहिलेल्या स्वप्नापेक्षा जास्त काही बनण्याची कुवत तुमच्यात असते.तुमच्यात महानता आहे... आणि तुमची वृत्तीच,

तुमच्या क्षमतेला वाट करून देणारी गुरुकिल्ली आहे.माझी वृत्तीच बदलल्याने,माझे जीवनच बदलले आणि जर चांगली वृत्ती माझ्या जीवनात चमत्कार घडवू शकली तर तुमच्या जीवनामध्येही ती चमत्कार घडवू शकते !


डॉ.चार्लस् स्विन्डॉल यांचे हे शब्द मला तुम्हाला सांगायचे आहेत.डॉ.स्विन्डॉल यांनी वृत्तीबाबतची मुख्य लक्षणे शोधून,ती आपल्या जीवनाच्या दिशेवर कसे नियंत्रण ठेवतात,ते सांगितले आहे.


" जितके जास्त दिवस मी जगेन,तेवढाच जीवनावर होणाऱ्या वृत्तीचा प्रभाव मला जास्त समजेल.दृष्टिकोन हा वास्तवापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो,असे मला वाटते.दृष्टिकोन हा भूतकाळ,शिक्षण,पैसा,परिस्थिती,अपयश,यश,इतर लोक जो विचार करतात किंवा बोलतात किंवा काय करतात;या सर्व बाबींपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.तो बाह्य रंगरूपापेक्षा,

पात्रतेपेक्षा किंवा कौशल्यापेक्षा महत्त्वाचा आहे.दृष्टिकोन हा संस्था,चर्च,घर बनवते किंवा मोडते सुद्धा!


"लक्षणीय बाब ही आहे की,आपल्याला त्या दिवशी कुठली वृत्ती स्वीकारायची,याबाबतची पसंती आपण रोजच्या रोज करू शकतो.आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही...

आपण हे तथ्यपण बदलू शकत नाही की,लोक एका विशिष्ट पद्धतीने काम करतील. अपरिहार्य बाबी,आपण बदलू शकत नाही.फक्त एकच गोष्ट आपण करू शकतो की,आपल्याकडे

असलेल्या एकाच दोरीवर आपण खेळू शकतो आणि ती म्हणजे आपला दृष्टिकोन.


"मला हे पटले आहे की,जीवन म्हणजे १० टक्के ते आहे जे माझ्याबाबत घडून गेलेले आहे आणि माझा त्याला कसा प्रतिसाद असतो ते ९० टक्के आहे. आणि म्हणून ते आपल्याच हातात आहे... आपल्या वृत्तींवर आपलाच ताबा असतो.


खूप प्रभावी शब्द आहेत ना? डॉ.चार्लस स्विन्डॉल जे सुचवित आहेत तसे करा आणि " तुमच्याकडे असलेल्या एका दोरीवरच खेळा ".आता हीच वेळ आहे,तुमच्या वृत्तीवर नियंत्रण ठेवण्याची ! आता हीच वेळ आहे,तुमच्या स्वतःच्या आयुष्यात चमत्कार घडविण्याला सुरुवात करण्याची!


पुढे जात रहा.स्वतःवर विश्वास ठेवा.तुमची स्वप्ने साकारण्यासाठी धाडस आणि चिकाटी असू द्या.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही!' हे कधीही विसरू नका…(समाप्त )


चारोळी (प्रारंभ)


 "गणित जिथं खेळासारखं वाटे,

तिथं शिक्षक असतो दीपकसारखा वाटे,

ज्ञानाची मशाल पेटवणारा प्रकाश,

नागावचा दीप,ज्ञानासाठी खास!"


 डॉ.दिपक मधुकर शेटे – एक दीप जो ज्ञानासाठी तेवत आहे...


शिक्षण म्हणजे केवळ माहिती नव्हे,तर प्रेरणा, आकलन व कृतीचा संगम." – या विचारांची मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ.दीपक मधुकर शेटे,कोल्हापूर जिल्ह्यातील नागाव या छोट्याशा गावातून आलेले,परंतु आज राज्यभरातील शैक्षणिक क्रांतीचे एक अग्रगण्य नाव.


साधेपणातून श्रेष्ठतेकडे..


साध्या शेतकरी कुटुंबात जन्म.ग्रामीण शिक्षणाचा पाया. परंतु त्यांच्यात होती एक वेगळी आग – शिक्षण क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची!त्यांचे बालपण अभ्यास,प्रयोग,आणि प्रश्न विचारण्याच्या वृत्तीत गेले.


 "गणित" हे मित्र करणे.


गणित हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना भयावह वाटतो. पण डॉ.शेटेंनी याच विषयाला खेळ,प्रात्यक्षिकं,आणि रोजच्या जीवनाशी जोडत विद्यार्थ्यांना "गणितासोबत मैत्री" करायला शिकवलं.त्यांनी तयार केलेली 'गणितायन प्रयोगशाळा'ही महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी संकल्पना ठरली आहे.


 संस्कृत श्लोक जो त्यांच्या कार्याशी साजेसा आहे:


 "विद्या ददाति विनयं,विनयाद् याति पात्रताम्।

पात्रत्वात् धनमाप्नोति, धनात् धर्मं ततः सुखम्॥"

(विद्या विनय देते,विनय पात्रता देते, पात्रता धन देते, धनाने धर्म,आणि धर्माने सुख मिळते.)



ही संकल्पना त्यांनी त्यांच्या शिक्षणात जीवंत केली आहे.

विद्यार्थ्यांना विद्या,विनय आणि उपयुक्तता यांचा संगम घडवला.


प्रयोगशीलतेचा शिक्षक..


गणितायन लॅब ही केवळ प्रयोगशाळा नाही,ती विद्यार्थ्यांच्या मनामनांतील भीती दूर करून,जिज्ञासेला चालना देणारी ज्ञानाची कार्यशाळा आहे.त्यात –


स्थानिक वस्तूंनी बनवलेली उपकरणं


खेळातून संकल्पना शिकवणं.


"करून बघा,समजेल" या तत्वाचा अवलंब


या सर्व गोष्टींमुळे आज त्यांच्या लॅबला राज्यभरातून अभ्यासदौरे येतात.


महान विचारवंतांची संगती


"Innovation is seeing what everybody has seen and thinking what nobody has thought." – Dr. Albert Szent-Györgyi


डॉ.शेटे यांचं कार्य या विचाराशी पूर्णपणे साजेसं आहे. त्यांनी खेड्यात बसून अशा गोष्टी केल्या,ज्या शहरी संसाधनांनी संपन्न शिक्षकांनाही सुचल्या नसतील.


 नवोपक्रम आणि कृती संशोधन


त्यांनी केलेल्या कृती संशोधन प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांची गणितातील अचूकता वाढली,संकल्पनांचा गाभा स्पष्ट झाला आणि अभ्यासात रस निर्माण झाला.ते सतत प्रयोग करतात,निरीक्षण करतात आणि त्यातून नवे उपाय शोधतात.


समाजाप्रती बांधिलकी


ते केवळ शिक्षक नाहीत,तर एक प्रेरणादायी नेतृत्व आहेत.त्यांनी पालक,शिक्षक,शाळा समिती आणि समाज यांना एकत्र आणत सामूहिक शैक्षणिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.


 पुरस्कार आणि गौरव


राज्यस्तरीय शिक्षक सन्मान


गणित विषयातील नवोपक्रम पुरस्कार


विविध प्रशिक्षणांतून मार्गदर्शन


गुणवत्ता शिक्षणासाठी सतत योगदान


हा शेवट नाही,सुरुवात आहे...


डॉ.शेटे यांचं कार्य म्हणजे एका दिव्याची ज्योत दुसऱ्या दिव्याला लागवून उजेड वाढवणं.ते विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवतात आणि शिक्षकांमध्ये शिक्षण हे साधन नव्हे,साधना आहे ही भावना रुजवतात.


चारोळी (समारोप)


 "गणिताचं बीज रुजवणारा,प्रयोगांनी ते फुलवणारा,

दीपक सर हे शिक्षक नाही,ते एक विचारांचा दरवळ!

झोळीत नाही संपत्ती,पण ज्ञानाचा आहे महासाठा,

नागावच्या मातीतला हिरा,महाराष्ट्राचा खरा दागिना!"

११/६/२५

आकाशाचं सौंदर्य / beauty of sky

सृष्टीच्या विराट दर्शनानं आश्चर्यचकित झालेल्या मानवाचं प्रथम दोन गोष्टींकडं लक्ष वेधलं.वरचं अनंत आकाश आणि खालची अफाट पृथ्वी.हे आकाश क्षितिजाशी पृथ्वीला मिळालेलं.आकाशात ग्रह-नक्षत्रांचा दिव्य खेळ चालतो.

धरतीच्या भूगर्भातील घडामोडींमुळं भूतलावरील पर्वतमाला नाहीशा होऊन तिथं समुद्र दिसतो.सागराच्या पोटातून डोंगरदऱ्या जन्माला येतात. कालौघात नद्या आपल्या प्रवाहाची दिशा बदलतात किंवा एखादी सरस्वती नदी लुप्तही होते. पृथ्वीतलावरील सारं काही अस्थिर आहे;परंतु आकाशातील खगोल मात्र चिरस्थायी आहे.


आकाशाचं खरं दर्शन घ्यायचं ते पर्वतावरून किंवा वाळवंटी प्रदेशातूनच.वनाधिकारी असल्यामुळं माझं बहुतेक वास्तव्य जंगलात असे.मी आकाशाचं सौंदर्य न्याहाळलं,ते पर्वतशिखरांवरून,डोंगरमाथ्यांवरून आणि गडांच्या चौथऱ्यांवरून.पर्वतावर उभं राहून आकाशाकडं पाहिलं,तर वाटतं की,तारे अधिक जवळ आले आहेत. उतारांवरील आणि खोऱ्यांतील जंगलांमधील उंच वृक्षांवर तारे अधांतरी लोंबत आहेत असा भास होतो.


वडगाव मावळात असताना पवन मावळातल्या तुंगी गडावर एकदा रात्रीचा गो.नी.दांडेकरांबरोबर मुक्कामाला गेलो होतो.बरोबर आणखी दोघं तिघं होते.


तुंगी हा टेहळणीचा गड आहे.तिथून आजूबाजूच्या सुमारे सोळा गडांचं दर्शन होतं.तिथल्या एका पडक्या विहिरीजवळ बसून आम्ही रात्रभर आकाशाकडं पाहात जागत होतो.इथून मला आकाशाच्या सौंदर्याचं खरं दर्शन झालं.वरती विशाल निळा घुमट,अष्टदिशा ग्रह-नक्षत्रांनी व्यापलेल्या.त्यात काही तारे फार तेजस्वी,सुंदर,तर काही मंद व मनोहर दिसत.मी दुर्बिणीतून आभाळाकडं पाहिल्यावर जो देखावा दिसला,तो केवळ अपूर्व होता. ताऱ्यांची संख्या जास्त दिसू लागली.इतकंच नव्हे,तर काही ताऱ्यांचं तेजही विलक्षण दिसू लागलं.काही लाल मण्यांसारखे दिसत,काही पाचूसारखे,काही नीलमण्यांसारखे,तर काही आपल्या तेजानं प्रत्यक्ष हिऱ्याला देखील मागं टाकतील असे होते.जिथं नुसत्या डोळ्यांना एक तारा दिसत होता,तिथं दुर्बिणीतून दोन किंवा तीन दिसत होते जिथं काहीच दृष्टीस पडत नव्हतं, तिथं दाट ढगांसारखा ताऱ्यांचा पुंज दृष्टीस पडे.


ग्रह-ताऱ्यांचं नियत परिभ्रमण त्या दिवशी जेवढं जाणवलं,तेवढं पुन्हा कधी दिसलं नाही.


ताऱ्यांचा प्रकाश धरतीवर पडलेला दिसत नाही म्हणतात;परंतु तुम्ही जंगलात गेलात,की अंधाऱ्या रात्री त्यांचा प्रकाश जाणवू लागतो.घनदाट अरण्यात रात्री कधी अंधार नसतोच.ग्रह-नक्षत्रांचा सौम्य प्रकाश जिकडंतिकडं दृगोचर होतो.अशा वेळी जंगलातून पायी चालू लागलात,की त्यांच्या मंद प्रकाशात बांबू-बेटांच्या अस्पष्ट छाया जमिनीवर पडलेल्या दिसतात.


जंगलातील तळी,सरोवरं,जलाशयं आणि दलदली यांभोवती रात्री आणि पहाटेच्या वेळी भटकताना मोठं गूढ वाटे.यक्षिणींचं आणि किन्नरींचं तिथं वास्तव्य असावं असं वाटे.साऱ्या आभाळाचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं असे.वाटे,की हे जलाशय गुरू-शुक्रांच्या डोळ्यांनी आपणाकडं पाहात आहे.


एकदा मध्यरात्रीनंतर मी नवेगावबांध सरोवराकाठी गेलो होतो.

अमावस्या एक-दोन दिवसांवर आलेली होती. जिकडंतिकडं विलक्षण शांतता होती.समोर स्तब्ध विशाल जलाशय पसरलेला होता.त्यात साऱ्या आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं होतं.लक्ष लक्ष ग्रहतारे त्यात चमकताना दिसले.वरती आकाश आणि खाली पाण्यात प्रतिबिंबित झालेला आकाशाचा पट.तिथं पाण्यावर कुठंच अंधार दिसत नव्हता.त्या स्वर्गीय दृश्याकडं मी किती तरी वेळ पाहात होतो.त्या अद्भुत शांतीनं मन प्रसन्न होत होतं.


पक्षिनिरीक्षणाच्या छंदामुळं पहाटेपूर्वीच्या काळोखात मी तळ्याची वाट धरीत असे.त्यामुळं मला जेवढं आकाशाचं दर्शन झालं,तेवढं क्वचितच कोणाला झालं असेल. पाखरांना जाग येऊन त्यांचा मंजुळ आवाज केव्हा कानांवर पडेल त्याची वाट पाहात मी तळ्याकाठी आकाशाकडं पाहात उभा असे.


कित्येक वेळा मी जंगलातील उंच निरीक्षण-मनोऱ्यात रात्री बसलेला असे.डोक्यावर छप्पर नसे.चोहो बाजूंना घनदाट जंगल.हिरे-माणकादी रत्नांनी झगमगणारा निळा-जांभळा आकाशाचा तुकडा तेवढा दिसायचा. क्षणोक्षणी त्या निळ्या पटलावरील रत्नजडित नक्षी बदलत असायची.पानगळीच्या दिवसांत सारे वृक्ष पर्णहीन झालेले असत. फक्त त्यांच्या फांद्या-डहाळ्या यांची नक्षी आभाळाच्या पार्श्वभूमीवर कोरलेली दिसायची.क्षणात असा भास होई की,ग्रह-नक्षत्रांची पानंफुलं लेवून ही अलंकृत झालेली झाडं उभी आहेत.काळ्याशार डोहातील पाण्यात काठावरच्या झाडांचं देखणं,कंप पावणारं प्रतिबिंब पडलेलं असायचं.


पक्षिनिरीक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावर मी अनेकदा पायी हिंडलो आहे.तेव्हा समुद्रकिनाऱ्यावरून आकाशाचं आगळंवेगळं दर्शन घडलं आहे.सागरकिनाऱ्यावरील हवेतील आर्द्रतेप्रमाणं चांदण्या कमी-अधिक जवळ आल्यासारख्या दिसतात


एकदा मी दिवेआगरच्या सागर-पुळणीवर रात्रभर आभाळाकडं पाहात जागत होतो.सागराच्या भरती-ओहोटीमुळे ग्रह-नक्षत्रांचं प्रतिबिंब तिथं आपण नेहमीचं पाहू शकतो,असं नाही.परंतु मध्येच काही काळ समुद्राचं पाणी स्थिर असतं.त्या वेळी अलौकिक सौंदर्य असलेल्या साऱ्या आभाळाची पडछाया या पाण्यात दिसू लागते.

हवेतील आर्द्रता जशी कमी होऊ लागते, तसे ग्रहगोल पुळणीवर उतरतात की काय,असं वाटू लागतं.


राजस्थानमधील रणथंबोर, सारिस्का आणि जैसलमेर या वाळवंटी प्रदेशांत तर आकाशातील नक्षत्रं अधिक जवळ आल्यासारखी वाटतात.


'रुक्मिणी स्वयंवरा'त निसर्गसौंदर्याकडं इतर कोणत्याही प्राचीन कवीपेक्षा नरेंद्रानं अधिक लक्ष पुरविलं आहे. आकाशात सायंकाळी नक्षत्रांचं कसं आगमन होतं,याचं सुंदर वर्णन 'नक्षत्राची शोभा'मध्ये आलं आहे :


तंब गगनीं नक्षत्रे उमटत: जैसी आकाशीं घाटौलि फुलत,ना तरि मेघ वीणि साधित : मोतियांची,की पाख-धुनि करीती चकोरे : ते सैग मंदाकिनीचे थेंबगोरे,की दिसति बाणलिंगे ऐतारे:गगन नर्मदेची...


म्हणजे 'नंतर एक एक करून आकाशात नक्षत्रं उमटू लागली.जणू काय गगनाच्या उद्यानातील पुष्पकळ्याच उमलू लागल्या.

नक्षत्रांच्या उगवण्याच्या परी तरी किती ? कुठे दाटलेले मेघ हळूच दूर होत आणि त्याआडची नक्षत्रं दिसू लागत.वाटे,जणू मेघाचा शिंपलाच उघडला आणि ही मोत्याची वीण ओघळली.कधी वाटे,चांदणं पिण्यासाठी आकाशाकडं जाणारे चकोर वाटेत मंदाकिनीच्या जलात आपले पंख धुऊ लागले आणि त्या पंखांना चिकटलेले मंदाकिनीचे हे थेंबच चोहिकडे उडाले.किंवा असं वाटे,की आकाशगंगेचा प्रवाहच वाहात आहे आणि ही नक्षत्रं म्हणजे त्या प्रवाहातील तेजस्वी बाणलिंगे आहेत.' (आनंद साधले)


सारिस्का या व्याघ्रप्रकल्प क्षेत्रात आम्हा वनाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा होता.राहण्यासाठी खुल्या मैदानावर राहुट्या उभ्या केल्या होत्या.फेब्रुवारी महिना. दिवसा खूप कडक ऊन पडे,तर रात्री गारठवणारी थंडी पडे.रोज रात्री जेवण झालं,की मी तंबूसमोर वेताच्या खुर्चीवर बसून अंगावर ब्लॅकेट ओढून समोरच्या आकाशाकडं पाहात असे.एकदा आकाशातून उल्का पृथ्वीकडं येताना दिसली.अंधारलेलं आकाश क्षणभर प्रकाशानं झगझगीत झालं.पिवळा प्रकाश मागं सोडीत-रेखीत उल्का चालली होती.ती राहुटीवरून माझ्याजवळून प्रकाशाचा झोत टाकीत गेली.मला वाटलं,ती राहुटीवर पडणार.परंतु तसं काही घडलं नाही. दुसऱ्या दिवशी कळलं,की ती उल्का इथून एका किलोमीटर अंतरावर खाली पडली,तेव्हा दोन व्यक्तींचा त्यात मृत्यू झाला.


आकाशाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी तुम्हाला खगोलशास्त्राचं ज्ञान आवश्यक आहे असं नव्हे. रात्रीच्या शांत समयी मला एकट्यानंच आकाशाचं दर्शन घेण्यात जो आनंद मिळतो, तो खगोलशास्त्रज्ञांच्या सहवासात मिळत नाही. ते सारे जण सतत मोठमोठ्यानं बोलून रात्रीच्या शांततेचा भंग करतात. वाटतं, या शास्त्रज्ञांना आकाशातील सौंदर्यानं कधी स्पर्श केला असेल काय?


डेव्हिड थोरोला तो आकाशस्पर्श झाला होता,तो एका ठिकाणी लिहितो-'सूर्यास्त झाला,की जंगलाआडून हळूहळू तारकापुंज डोकावताना दिसतात.रात्रीची सुरुवात अशी उदात्त रीतीनं होणं हा केवढा योगायोग आहे!ही नक्षत्रांची वेळ म्हणजे शांतपणं अंतर्मुख होण्याचा समय.ग्रहगोलांनी सुशोभित झालेल्या आकाशाच्या निळ्या घुमटाखाली विशाल मृदगंधा पृथ्वी एखाद्या निसर्गदेवतेच्या मंदिरासारखी दिसते.या नक्षत्रदेवतांपुढं मन विनम्र होतं.इंद्रधनुष्य आणि नक्षत्रं म्हणजे अनंताचं जणू हस्ताक्षरच आहे!'


पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर 


नोबेल परितोषिकविजेती अमेरिकन कादंबरीकार पर्ल बक् हिचं बरंच आयुष्य चीनमध्ये गेलं.त्या पार्श्वभूमीवर लिहिलेली खगोलशास्त्रज्ञ 'फादर, अँड्री' ही तिची सर्वश्रेष्ठ कथा म्हणून गणली जाते. ही कथा वाचताना फादर अँड्रींना नक्षत्रांचा स्पर्श झाला आहे.


बालकवींना आकाशाच्या सौंदर्याचा साक्षात्कार झाला होता.'आनंदी आनंद गडे' ह्या कवितेत तो अनुभवास येतो :


नीलनभीं नक्षत्र कसें

डोकावूनि हैं पाहतसे;

कुणास बघतें ? मोदाला !

मोद भेटला का त्याला ?


'निर्झरास' या कवितेत आकाशाचं सुंदर वर्णन आले आहे.निळ्या आभाळातील तारका कशा दिसतात,पहा-


रम्य तारका लुकलुकती

नीलारुण-फलकावरती;

त्यांच्या 'तारकांचे गाणें' या कवितेची सुरुवात पहा-


कुणि नाहीं ग,कुणि नाहीं

आम्हांला पाहत, बाई.

शांति दाटली चोहिंकडे;

या ग,आतां पुढें पुढें,

लाजतलाजत

हळूच हांसत,

खेळ गडे,खेळू कांही,

कोणीही पाहत नाहीं,


बालकवींचं अंतःकरण एखाद्या सरोवरासारखं पारदर्शक होतं.दिव्यलोकीच्या शांतीचा त्यांना आकाशस्पर्श झाला होता.


विमल चंद्रिका क्षितिजावरतीं

 तरळ तारका चमचम करिती,

दिव्य लोकिंची रुचिरा शांती,

तुडुंब भरली गगनांत... १


ग्रहाग्रहावर भरलें तेज,

 तेजाची लयलूटच आज,

 रात्रींचा शेवटला साज देव करिती जणुं स्वर्गात (तडाग असतों,तर-)


'अनंत' या कवितेत त्यांनी विश्वाचं सुंदर वर्णन केलं आहे.


अनंत तारा नक्षत्रे हीं अनंत या गगनांत,

अनंत दीप्ती,अनंत वसुधा,हे शशिसूर्य अनंत.


जिकडं तिकडं त्यांना प्रकाशाचाच साक्षात्कार होतो.


हर्षचरितात बाणभट्टानं पहाटेच्या ताऱ्यांचं मोठं सुंदर वर्णन केलं आहे.


'कलविंककंधराधूसरासु तारकासु'


म्हणजे प्रातःकालीन ताऱ्यांचा वर्ण कलविंक पक्ष्यांच्या पंखाच्या धूसर वर्णासारखा असतो.


'वंगचित्रे' या ग्रंथात पु.ल.देशपांडे यांनी आकाशसौंदर्य पाहणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांची एक सुंदर आठवण सांगितली आहे.


'रवींद्रनाथ,म्हणे,रोज पहाटे चार वाजता उठत असत. मग उत्तररामायणातल्या सौधावर येऊन स्वस्थ उभे राहात.अनेकांच्या पाहण्यात ही गोष्ट आली होती.कुणी तरी धिटाईनं विचारलं,


"गुरुदेव,रोज इतक्या पहाटे उठून आपण काय पाहता?"


गुरुदेव म्हणाले,"पहाट पाहतो."


रोजची पहाट त्यांना नवी दिसायची आणि ती तशी असतेच,फक्त पाहणारे डोळे हवेत.एका कवितेत तर त्यांनी म्हटलं आहे-


आज मनेरमध्ये छेये सुनील आकाश ओठे गेये छि

आज शकाल बेलाय छेले खेलार छेले शिकल टूटे छि...


मी मराठी तर्जुमा केला-


आज उतरले सुनील अंबर मनात माझ्या वेड्या आज पहाटे लुटुलुटुच्या शैशव लीला तोडिति सगळ्या बेड्या...


इथं मला बालपणी पाठ केलेली एक कविता आठवते :


देवा,तुझें किती। सुंदर आकाश

 सुंदर प्रकाश। सूर्य देतो । 

सुंदर चांदण्या। चंद्र हा सुंदर 

चांदणें सुंदर। पडे त्याचें।


आज इतकी वर्ष लोटली.अजूनही मी रोज पहाटे उठून रानावनांत फिरायला जातो,तेव्हा नित्यनूतन अशा आकाशाचं दर्शन होतं.