* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२५/९/२५

ग्राम बोली / village dialect

आरपाटा…

बैलगाडी ओढण्यासाठी दोन चाकांची गरज असते. चाक दणकट होण्यासाठी साठीच्या खाली एक बूट असतं,त्यावर लोखंडी कणा ठेवला जातो. तो कणा साठीच्या बाहेर गोलाकार लाकडू असते,त्याला मणी म्हणतात.त्या मण्यामध्ये कणा बसवला जातो.
मण्याला लहान-लहान भोकं असतात.त्यामध्ये आर लाकडाच्या उभ्या दणकट पट्ट्या बसवल्या जातात.
त्या आर्‍यामध्ये बसवतात.आर झिजू नयेत म्हणून त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते त्याला धाव म्हणतात. 

ढकली …

बैलगाडीच्या साठीच्या पुढच्या तोंडाला एक आडवं लांब लाकूड लावलं जाते त्याला ढकली म्हणतात.या ढकलीचा उपयोग बैल पाठीमागे सरकायला लागला तर तो ढकलीमुळे मागे सरकणे थांबतो. 

दांडी …

बैलगाडीसाठी चाकं तयार झाली की ती ओढण्यासाठी बुट्याला साठीच्याखाली जो चौकोनी लाकडाचा ठोकळा असतो त्याला तीन भोकं पाडली जातात त्यामध्ये तीन साठीपेक्षा ५/६ फूट लांबीची लाकडं बसवली जातात.त्यावर जू ठेवलं जात.जू आणि बूट याला यटक घातलं जातं.त्यात बैल जोडून गाडी ओढली जाते.

आळदांडी…

गाडीला ज्या तीन दांड्या बसवल्या जातात.त्यापैकी दोन ज्वापेक्षा थोड्या लांब असतात.तिसरी दांडी ज्वापेक्षा कमी लांबीची,पण ज्वापर्यंतच्या लांबीची असते.या आळदांडीमुळे जू मागे सरकत नाही आणि यटकामुळे पुढे सरकत नाही. 

पिळकावणं…

गाडीला किंवा कोणत्याही औताला जे यटाक घातलं जातं ते ढिले राहू नये म्हणून दोन-फूट लांबीचा लाकडाचा दांडा चरकात घालून पिळलं जातो, जेणेकरून यटाक ढिल होत नाही.त्याला पिळकावणं म्हणतात.

जूपणी,खिळ ….

जूला दोन्ही बाजूला शेवटच्या टोकाला दोन भोकं पाडलेली असतात.त्यात दोन-तीन फूट लांबीचा लाकडी दांडा घालून वरच्या बाजूला जराजाड ठेवला जातो. जुपणीला बारीक रस्सीनं विणलेला ३/४ फुटाचा पट्टा बांधलेला असतो.जेव्हा बैल गाडीला जुंपतात,तेव्हा जू उचललं जातं.बैल जू खाली घेतात ज्वाच्या भोकात दोन्हीबाजूला जुपण्या बसवतात व जुपणीला घेऊन जुपणीत अडकवला जातो.
जेणेकरून बैलगाडी चालू झाल्यानंतर बैल इकडं-तिकडं हलत नाहीत.बैल सरळ चालतात.त्यामुळे इकडे-तिकडे झाल्यास खिळ बसते म्हणून जुपणी किंवा खिळ म्हणतात.

बूट …

बैलगाडीच्या साटीला आधार व दोन चाक जोडण्यासाठी त्यावर कणा ठेवला जायचा.असे चौकनी लाकूड असायचे त्यालाच बैलगाडी ओढण्यासाठी दोन दांड्या जोडल्या जायच्या त्याला बूट म्हणायचे. 

हिसकी …

खाली वाय आकार असलेली परंतु लांब काठी असते. त्या काठीचा उपयोग कोणतीही वस्तू दाबून धरण्यासाठी केला जातो त्याला हिसकी म्हणतात. 

कोळप …

पिकाची आंतर मशागत करण्यासाठी व पिकातील तण काढण्यासाठी ज्या औताचा उपयोग केला जातो त्याला कोळप म्हणतात.

फड …

फड तीन प्रकारचे असतात जेथे तमाशा असतो तो तमाशाचा फड,जेथे कुस्त्या चालतात त्याला कुस्त्यांचा फड,जेथे ऊस तोडतात त्या शेताला ऊसाचा फड म्हणतात. 

पास …

पूर्वी शेतातील तण गवत काढण्यासाठी कुळव किंवा फरांदीचा वापर केला जायचा त्याला दोन जानावळी असायची त्याला पास जोडलेली असायची त्यामुळे जमिनीतून खालून गेल्याने गवत तण मरून जाते. 

वसाण …

शेतात कुळव चालवताना कुळवाच्या किंवा फरांदीच्या पासत गवत अडकून पास भरकटायची जे अडकलेले गवत असायचे त्याला वसाण म्हणत. 

उंडकी …

पूर्वी पेरताना तीन किंवा चार नळ असायचे.पेरताना एखाद्या नळातून बी पडत नसेल तर त्याला उंडकी 
म्हणायचे.

आडणा …

वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये.

फण …

कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं असतात त्यात फण बसवला जातो.फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो.त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात.चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडतं.फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते.त्याला फासळ म्हणतात.

भूयट्या …

जमीन भुसभुशीत असेल तर औत,कुळक,फरांदी,कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं.त्याला भूयट्या म्हणतात.

रूमण …

औत भूयट्या चालवताना दिंडाला मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला रूमण म्हणतात.

उभाट्या …

जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला उभाट्या म्हणतात.

खांदमळणी …

बैलांचा महत्त्वाचा सण बेंदूर.बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते.बैलाच्या मानेला साद हणतात. खांद्याला त्रास झालेला असतो म्हणून खांद्याला तेल, हळद,तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.

कंडा …

बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात. 

चाळ …

बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला चाळ म्हणतात. 

शेंट्या …

बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात.
बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात. 

झूल …

बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते.त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात.त्याला झूल म्हणतात.

आंबवणी,चिंबवणी …

शेतात कोणत्याही रोपाची कांदा,वांगी,कोबी,फ्लॉवर, ऊस,लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते.त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते.रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला चिंबवणी म्हणतात. 

वाफा,सारा …

कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहानआकाराचा असतो त्याला वाफा म्हणतात,तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.

मोट …

पूर्वी शेतीला पाणी पाजण्यासाठी इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटारीचा शोध लागण्यापूर्वी मोटेचा वापर करत असत.मोट म्हणजे जाड पत्र्याचे एक चौकोनी साधारण ५० लीटर पाणी बसेल असे भांडं तयार करायचे,त्याला खाली तळात एक चौकोनी बोगदा ठेवला जायचा.त्यावर आत मोटेमध्ये उघडझाप होईल असे झाकण असायचे.विहिरीच्या एका भिंतीला दोन उभी व एक आडवं लाकूड कायम केलेले असायचे. त्याच बाजूला जमिनीवर उताराचा भाग तयार केलेला असायचा त्याला धाव म्हणत.जे आडवं लाकूड असायचं त्याला एक चाक बसवलेले असायचं.मोटेच्या वरच्या बाजूला एक साखळी असायची त्याला नाडा बांधायचा. (नाडा म्हणजे जाड ५०/ ६० फूट लांबीचा कासरा) मोटेच्या खालच्या बाजूला एक साखळी असायची त्याला सोल बांधले जायचे नंतर मोट विहिरीत सोडायची.त्याला दोन बैल जोडलेले असायचे.बैल धावेवरून मागे सरत आले की मोट पाण्यात बुडायची. मोट पाण्यात बुडली की मोटेत आत उघडझाप होणारे जे झाकण असते ते उघडायचे.मोट पाण्याने भरली की नाडा,सोल यांना ताण यायचा.मोट भरली की बैल धावेवरून पुढे हाणायचे.मोट विहिरीच्या वर आली की पाणी थारोळ्यात पडायचे. (थारोळं - दगडी बांधकाम केलेला चौकोनी हौद) ते पाणी पाटात,शेतात जायचं. पुन्हा मोट मागे बैल सरकवत न्यायची. पुन्हा वर आणायची ही क्रिया दिवसभर चालवून शेताला पाणी दिलं जायचं.

पांद 

शेतात जाण्यासाठी दोन्ही बाजूला झाडी आणि मधून चिखलमातीचा जो रस्ता. 

व्हाण 

पूर्वी चटणी तयार करण्यासाठी किंवा कालवणाचा मसाला तयार केला जायचा ते जमिनीत रोवलेला मध्ये खोलगट भाग असलेला मोठा दगड असतो.खोलगट असून ते बारीक करण्यासाठी लाकडी मुसळाचा किंवा लोखंडी ठोंब्याचा वापर केला जायचा.

मांदान 

स्वयंपाक करताना खरकटं पाणी टाकण्यासाठी चुलीजवळ एक चौकनी खड्डा केला जायचा. त्याला पांढर्‍या मातीचे प्लॅस्टर केलं जायचं त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नव्हतं.त्या मांदानात खरकटं पाणी टाकलं जायचं त्याला मांदान म्हणत.

दुपाकी घर 

मध्ये उंच भाग त्याला आड म्हणतात.त्या आडाच्या दोन्ही बाजूला उतरता पत्रा किंवा कौलं टाकून पाणी पडण्यासाठी जे घर असते ते दुपाकी. 

पडचीटी…

दुपाकी घराला लागूनच एकाच बाजूला पाणी पडेल असा जो निवारा केला जातो. 

वळचण 

घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला असतो त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते. या वळचणीला जनावरे, लोक निवार्‍याला उभी राहतात.

गुंडगी …

गाडग्याचा सर्वात छोटा अवतार 

उतरंड …

घरात ज्या छोट्या-छोट्या वस्तू असायच्या त्या या गाडग्यात भरून उतरंडीला ठेवायच्या.उतरंडीची रचना सर्वात मोठं गाडगं तळात नंतर लहान,लहान असे ठेवत १०/११ गाडगी एकावर एक ठेवायची व शेवटच्या गाडग्यावर झाकण म्हणून गुंडगीचा उपयोग व्हायचा. 

पाभरी …

पितांबराच्या वर नेसण्याचे वस्त्र असते.

कणींग …

कळकाच्या कांब्यापासून पिंपासारख्या आकाराचे धान्य ठेवण्यासाठी केलेले असते त्याला आतून बाहेरून शेणाने सारवले जायचे. 

कणगूले …

कणगीचा छोटा आकार परंतु जाडीने जास्त. टोपलं - पूर्वी भाकरी ठेवण्यासाठी कळकाच्या कांब्यापासून घमेल्याच्या आकाराचे तयार केलेले असे.

चुलवाण …

उसापासून गूळ तयार करण्यासाठी गोलाकार आतून पोकळ उंच असा भाग बांधलेला असतो त्याच्या एका बाजूला जळण टाकण्यासाठी दरवाजा ठेवलेला असतो. 

काहिल …

काहिल चुलवाणावर ठेवली जाते.ऊसाचा रस तयार झाला की,तो काहिलीमध्ये टाकला जातो.नंतर चुलवाणाला खालून जाळ घातला जातो.पातळ रसाचे घट्ट गुळात रूपांतर होते.वाफा - गूळ तयार होत आला की,काहिलीला दोन लांब लाकडं अडकवली जातात आणि ७/८ लोकांनी ती काहिल ओढत आणून तयार झालेला गूळ वाफ्यात ओतला जातो. 

ढेपाळ …

गोलाकार पत्र्यापासून तयार केलेले असते. १किलो,५ किलो,१० किलो अशा वेगवेगळ्या आकाराची असतात. त्यामध्ये गूळ भरण्यापूर्वी आतून तेल लावले जाते. ढेपाळ्यात गूळ भरतात.ढेपाळ्यात गूळ थंड झाल्यानंतर ते ढेपाळे पालथे केले की ढेप बाहेर येते.

बलुतं …

पूर्वी वस्तूविनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. सुतार,लोहार,तेली,माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना बलुतं म्हणत.या बलुत्यांना शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल ते थोडं थोडं प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे. 

तरवा …

कोणत्याही रोपाची लागण करण्यापूर्वी वाफ्यामध्ये रेघा ओढून कांदा,वांगी,फ्लॉवर,कोबी जे पाहिजे त्याचं बी पेरलं जातं.पाणी दिल्यानंतर १०/१२ दिवसांनी ते दिसायला लागतं. त्याला तरवा म्हणतात. 

लोंबी …

गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.

सुगी …

ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ही पीक काढायला आली की तो काढणींचा काळ होता त्याला *सूगी* म्हणत. 

खळं …

कणसापासून ज्वारी तयार करण्यासाठी शेतात गोलाकार भागावरची माती काढून त्याच्या मधोमध एक लाकूड रोवलं जायचं.त्याला तिवडा म्हणत.माती काढल्यावर तिवड्याभोवती बैल गोलाकार फिरवला की जमीन कठीण व्हायची.नंतर त्यावर कणसं टाकून बैल गोलाकार फिरवून त्यातील सर्व ज्वारी निघाली की वावडीवर उभं राहून वाढवायची. 

माचवा …

पूर्वी ज्वारीच्या शेताची कणसं आल्यानंतर पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला माळा.

वगळ …

ओढ्याचा छोटा आकार. 

शिंकाळं …

मांजर,उंदीर यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी दही,दूध, तूप हे तुळईला अडकवून ठेवण्यासाठी वाकापासून तयार केलेलं असत. 

गोफण …

शेतात ज्वारी, बाजरी यासारख्या पिकांचे पक्ष्यापासून संरक्षण करण्यासाठी दगड-माती मारण्यासाठी रश्शीपासून तयार केलेली असायची. 

सपार / छप्पर ….

जनावरांच्या संरक्षणासाठी शेतात लाकडं व पालापाचोळ्यापासून तयार केलेलं घर. 

बाटूक …

ज्वारीच्या शेतात ज्याला कणसं येत नाहीत त्याला बाटूक म्हणतात. 

पिशी ….

ज्वारीच्या कणसाचा हुरडा काढल्यानंतर जो भाग राहातो त्याला पिशी म्हणतात. 

झापा …

शेतात जनावरांच्या संरक्षणासाठी जे सपार तयार केलेलं असतं त्याला लावायचे दार म्हणजे झापा.

माळवं …

शेतात केलेला भाजीपाला 

पावशा …

पूर्वी एखाद्या वर्षी पाऊस कमी असेल तर खेडेगावात सर्व मुलं एकत्र जमत.गावाबाहेर जाऊन एखाद्या मुलाला नग्न करायचे.त्याच्या कमरेभोवती लिंबाचा पाला बांधायचा.डोक्यावर पाट ठेवायचा.पाटावर पिंड काढायची आणि गावात येऊन प्रत्येक घरापुढे 'पावशा ये रं तू नारायणा' हे गाणं म्हणायचं,मग त्या घरातील स्त्री पाण्याचा तांब्या व भाकरी घेऊन बाहेर येणार पाणी पायावर ओतणार आणि भाकरी चटणी देणार.सर्व जमवलेल्या भाकरी शेतात जाऊन खायच्या. 

कोठी घर …

वाड्यातले धान्याचे कोठार. 

परस …

वाड्याच्या पाठीमागे मोकळी जागा असायची, 
त्यामध्ये छोटी-मोठी झाड असायची. 

पडवी …

वाड्यात मधल्या चौकासभोवार जो वाड्याचा भाग असायचा त्याला पडवी म्हणत. 

भंडारी ….

घराच्या भिंतीत,खूप रुंद असलेल्या भिंतीतच एक चौकनी पोकळ भाग ठेवला जायचा त्याला छोटी दार- कडीकोयंडा असायचा.यामध्ये घरातील महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जायच्या.

आगवळ …

लहान मुलींचे केस लोकरीच्या धाग्याने वेणीसारखे बांधावयाचा धागा. 

वज्री …

आंघोळ करताना अंग घासायची घासणी.

कथळी …

चहाची किटली. 

चौपाळे …

सार्वजनिक जेवणात वेगवेगळ्या वस्तू एकाच भांड्यात ठेवून वाढल्या जायच्या ते भांडे.

बारनी …

खिडकीचा छोटा प्रकार असायचा त्याला बारनी म्हणत.

शेजर …

पूर्वी ज्वारी,बाजरी,आरगड,गिडगाप अशी धान्याची पिकं काढली म्हणजे एकत्र ठेवली जायची.ती एकत्र ठेवण्यासाठी कडब्याच्या पेंढ्या बांधून पेंढ्या एकावर एक ठेवून खोलगट चौकोन तयार केला जायचा त्याला शेजर म्हणायचे. 

बुचाड …

पूर्वी पीक काढल्यानंतर वाटायला वेळ नसेल तर कणसासह कडबा एकत्र लावला जायचा तो लावताना कडब्याच्या पेंढ्या खाली कणसं आणि वर बुडके असे लावले जायचे त्याचा आकार खाली रुंद आणि वर निमुळते असे त्रिकोणी आकाराचे लावले जायचे. जेणेकरून पावसापासून संरक्षण व्हावे याला बुचाड म्हणतात. 

गंज …

पीक काढल्यानंतर त्यांची कणसं काढून झाली की पेंढ्या बांधल्या जातात.त्या पेंढ्याचा उपयोग जनावरांच्या चार्‍यासाठी होतो म्हणून त्या पेंढ्या एकत्र केल्या जातात व त्या आयताकार रचल्या जातात. निम्म्यात गेल्यानंतर वरचा भाग त्रिकोणी केला जातो. जेणेकरून ऊन,वारा,थंडी,पाऊस यापासून त्याचे संरक्षण होते.त्याला गंज म्हणतात. 

तलंग …

कोंबडीच्या लहान पिल्लाला तलंग म्हणतात. 

कालवड …

गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर कालवड म्हणतात व पुल्लिंगी असेल तर खोंड म्हणतात. 

रेडकू …

म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी असेल तर टोणगा /रेडा म्हणतात.

दुरडी …

दुरडी कळकाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते... धान्यात माती,कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊन किंवा पाण्यातच दुरडी हालवायची त्यामुळे माती केर-कचरा निघून जातो. 

हारा …

कळकाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपलं म्हणतात,मोठ असेल त्याला हारा म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.

बाचकं …

धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात छोटं पोतं असते त्याला बाचकं म्हणतात. 
 
झोळणा …

पूर्वी पंचमीला मुली नागोबाला जायच्या तेथे फेर धरून खेळ खेळायच्या जाताना लाह्या,फुटाणे,शेंगदाणे एकत्र करून झोळणा भरायचा व त्यातील भेटेल त्याला थोडं थोडं खायला द्यायचं.झोळणा म्हणजे झोळीच्या छोट्या आकाराचा असायचा.

मोतीचूर …

हा एका ज्वारीचाच प्रकार आहे.परंतु हा मोतीचूर तव्यात टाकून भाजला की त्याच्या पांढर्‍या लाह्या तयार होतात.लाह्या तयार होताना त्याचा ताडताड आवाज येतो.त्या तव्याच्या बाहेर जाऊ नयेत म्हणून त्याला फडक्याने दाबून धरले जाते.

इराक्तीला,मुतायला ..

पूर्वी लघवी हा शब्द प्रचलित नव्हता.त्या वेळी स्त्रिया लघवीला जायचं म्हटलं की इराक्तीला म्हणायच्या.

वटकावण,सोबणी …

भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या बाजूला उंचवटा करायचा.हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा असायचा.त्यालाच वटकावण किंवा सोबणी म्हणत. 

खंडी …

२० मणाची खंडी. 

मण ….

४० शेराचा मण. 

पायली …

दोन आदुल्या म्हणजे पायली. 

आदुली …

आठ चिपटी म्हणजे एक आदुली.

मापटं …

एक शेर म्हणजे मापटं. 

चिपटं …

दोन चीपटं म्हणजे एक मापटं. 

कोळव..

दोन कोळवी म्हणजे एक चीपट.

संग्रहित ठेवून संस्कृती जपूया.....
श्री.भागवत सोमेश्वर भंगे

'तरीपण केलया धाडस मी' अनिल फारणे

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खूप वर्षांनी आठवली!

शाळा तर कधीचीच संपलीय,पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहिलीय!!

"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेच!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेच!
आता समानार्थी भाव,विरुद्धार्थी बनलेत,
अन् अर्थांचे अनर्थ झालेत!!

"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्न पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्र,
आजही रिकाम्याच राहिल्यात!!

पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्याच!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्न,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..

"संदर्भासहित स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

"कवितेच्या ओळी पूर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्न!
आजही शोध सुरू आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पूर्णत्व आयुष्याला!!

"निबंध लिहा", किंवा "गोष्ट लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरून गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्र नियतीच ठरवणार!!

तेव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्न "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्र नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्न ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खूप वर्षांनी आठवली...
तेव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

१४.०५.२०२४ या लेखातील दुसरा शेवटचा भाग…




२३/९/२५

सुखाचा चहा / happy tea

"रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं,.आधीच सकाळपासून वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली,..रस्ता तसा रोजचा परिचयाचा पण कधी थांबाव लागलं नव्हतं,..ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला,..पत्र्याच्या शेड खाली,..छोटीशी चहाची टपरी होती,.. तसही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातावरणही छान होतं,..हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता,....."


टपरीवर एक जोडपं आणि छोटं मूल होतं,.. ते मूल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं,.. मध्येच ओला हात आई बाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे हसून बघत होते,..,..त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला,..एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला,.. त्याच त्यालाच छान वाटलं,..समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर,....चिंब पावसात धूसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला,....बायकोचाच त्याने कट केला सकाळपासून हा पाचवा फोन तिचा. काहीतरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते लग्नाला अजून चार महिने नाही झाले पण बोअर झालं हे सहजीवन या भावनेने त्याने फोन कट केला,..,.


तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरीवाला समोर आला,...आणि तितक्यात त्या बाई कडून काही ग्लास सुटले हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकन आवाज झाला,..ते मुल क्षणभर थबकलं पाण्यात खेळताना,..तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला त्याला काही नाही खेळ तू,..आणि तो काचा भरू लागला,..तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली,..तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला,..एकूण चार पाच ग्लास फुटले होते म्हणजे आजची कमाई नक्की शून्य,..पण तो माणूस शांत होता,..आता ह्याची बेचैनी अजून वाढली,..ह्याला सकाळचा प्रसंग आठवला,..आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो,....


बोललो तिला पण ती शांत होती,.. ह्या वातावरणासरखी आणि आपण ह्या चहासारखं गरम,.. शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातून निघत होत्या,..आपलं तर फारस नुकसानही नव्हतं,..पण आपण किती रिॲक्ट झालो,...त्यामुळे दिवसभर देखिल आपला मूड खराब होता,... आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला,..खूप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून,..तो पैसे द्यायला काऊंटर जवळ आला,..वीसची नोट देताच चहावाला म्हणाला,"सर सुट्टे नाही माझ्याकडे 10 रु द्यायला.... तुमच्याकडे असतील तर बघा,....त्याने खिसा तपासला पण नव्हते सुट्टे,.. चॉकलेट देऊ चहावाला म्हणाला,"त्यावर हसून ह्याने नकार दिला,..आणि म्हणाला,.." असू द्या तुम्हाला नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली,..ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात,.."


 चहावाला हसून म्हणाला,.."तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते कधीतरी चूक होणारच आपल्याकडूनही होते फक्त आपल्याला रागावणार कोणी नसतं,.... आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर अस रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी,..आयुष्य क्षणभंगूर आहे होत्याचं नव्हतं कधी होऊ शकतं,..आता हिलाच बघा ना लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि  एकाएकी दृष्टी गेली,...डॉक्टर म्हणाले," येईल दृष्टी परत.." पण कधी ते नक्की नाही,...खूप वाईट वाटलं,..माझी चिडचिड होत होती,...एकदिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणाली,"आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा,..मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे,..त्या दिवसापासून ठरवलं किती नुकसान झालं तरी तिला रागवायच नाही,...माणूस नेहमी स्वतःच्या बाजूनी विचार करतो ना सर,..थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येत सगळं,..."


ह्याला आता जास्त आश्चर्य वाटलं अंध बायको असून किती शांतपणे स्वीकारलं आहे सगळं,... आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे अश्या अविर्भावात असतो सतत,....आपली बायको सकाळी किती घाबरली होती,...त्याला आठवलं खरंतर रात्रभर पाय दुःखतात म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती,.. मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो त्यालाच एकदम भरून आलं,.... त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मघापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली,"दहा रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या,....कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही,..

तसही कपाने महाभारत झालं म्हणता घरात ह्या गजऱ्याने मिटवून टाका,..कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं तर संसारात, म्हणजे मजा असते नाही का,....?"


 इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का,..? साहेब याच रोडवरून रोज येणं जाणं असेल तर येत जा अधून मधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला,..तो बघतच राहिला त्या जोडप्याला,..एकमेकांना शारिरीक गुणांनी विसंगत असलं तरी समजून घेणार जोडपं,...आता मुलाला आंनदी होड्या बनवून देत होत आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती,...हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं,.....


 त्याने गजरा घेतला आणि वीस रुपयात खूप काही मिळालं ह्या भावनेने निघाला,.. गाडीला किक मारताना सहजच टपरीची पाटी बघितली,..त्यावर नाव होतं "सुखाचा चहा..." 


स्टोरी लॉकडाऊन ची.. 

स्टोरी कोल्हापूरकरांच्या माणुसकीची.. 


पुणे रिटर्न असल्यामुळं, सीपीआर मध्ये पहिला स्वॅब घेतला..दोन दिवसांनी रिपोर्ट निगेटिव्ह आला..पण ताप असल्यामुळं १४ दिवसांचा इथंच क्वारंटाईन चा शिक्का बसला..

गावी यायचं होत लगेच मला.. पण शिक्का बसल्यामुळं इथंच थांबाव लागलं.. मुंबई मध्ये सध्या राहणाऱ्या माझ्या कोल्हापूरच्या मित्राला हे समजल्यावर त्याचा कॉल आला,

बोलला, "भावा नागाळा पार्कात माझा फ्लॅट हाय.. बिल्डिंग मध्ये बाकी कोणी नसतंय त्यामुळं तू बिनधास्त जाऊन राहा तिथं..

आणि काय लागलं तर पहिला सांगायचं काय.. भाऊ आहेस तू आपला.. काकींशी ( माझ्या आईशी ) पण बोलतो मी.. पत्ता पाठवतो तुला.."इतकं बरं वाटलं ना या धीर देणाऱ्या त्याच्या शब्दांमुळं.. मग इथल्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि गेलो तिथं.. आता आलोय इथं तर म्हटलं, जेवणाचं कसं करायचं.. हा प्रश्न होता.. मित्राला बोलायच्या आधी बघूया म्हटलं इथ जवळपास कुठून पार्सल मिळतंय का ते..


गॅलरीत उभा होतो.. खालून एक वयस्कर काका चाललेले..

त्यांना हाक मारली आणि सांगितलं कि,

"काका असं असं आहे न मी बाहेर पडू शकत नाही..इथं

जवळपास कुठून जेवणाची सोय होईल का?"

त्यांनी मास्क काढला.. वर माझ्याकडे बघितलं.. चेहऱ्यावर स्मितहास्य आणून खिशातून लगेच मोबाईल काढला.. 

बोलले, "थांब नंबर देतो तुला.."

"गणेशरावांचा नंबर आहे हा.. त्यांचं जवळच हॉटेल आहे इथं.. ते करतील जेवणाची तुझी सोय "

इतकं बोलले आणि गेले ते.. 

मी फोन केला त्या नंबर वर त्यांनी पत्ता विचारून लगेच जेवणाची सोय केली.. आता महत्वाचं कि,

१४ दिवस काढायचे होते इथ मला.. खिशात पैसेही थोडेच.. ४ दिवस गणेश रावांकडून मागवलं मी जेवण..

५ व्या दिवशी बघतोय तर पाकिटात पैसे थोडेच शिल्लक.. विचार करत करत गॅलरीत आलो.. 

नेहमीप्रमाणे ते काका तिथून जात होते.. 

त्यांनी हाक मारली मला.. बोलले, काय कस काय चाललंय?


मी म्हटलं ठीक काका.. आणि परत पुढचा विचार करत बसलो.. 

काकांना बहुतेक कळालेलं कि कायतर प्रॉब्लेम आहे.. 

म्हणून खोचून विचारलं आणि त्यांनी.. मग सगळं सांगितलं मी त्यांना.. 

काकांनी विठोबासारखं दोन हात कमरेवर ठेवले आणि म्हणाले, "माझा मुलगा आर्मीत आहे मुला.. तुझ्याएवढाच.. तो जर तिथं राहून देशाची रक्षा करत असेल तर मी काय इथं माझ्या मुलांची रक्षा करू शकत नाही.."

लगेच फोन करून त्यांनी त्या गणेश रावांना बोलवून घेतलं तिथं.. 

दोघे बोलत होते.. मला इतकं काही ऐकू येत नव्हतं वर.. 

बहुतेक माझी सगळी परिस्थिती सांगत होते ते त्यांना..

काका बोलले, मी बोललोय यांना थोड्यावेळात तुझं जेवण येईल.. आणि खरच एका तासात गणेशराव माझ्या बिल्डिंग च्या खाली.. पार्सल घेऊन.. 

त्यांना कळकळीनं मी म्हटलं,दादा सध्या तुम्हाला द्यायला माझ्याकडं पैसे नाहीत ओ..

त्यानंतर सेम त्या काकांसारखं.. 

वर बघून, स्मितहास्य देऊन त्यांचे ते शब्द,

"पैश्याचं काय एवढं घेऊन बसलाय दादा.. माणुसकी आहे कि तेवढी आमच्यात.."

त्यावर काय पुढं बोलावं मलाच समजेना..

५ व्या दिवसापासून ते १४ व्या दिवसापर्यंत.. सलग १० दिवस पार्सल येत होत त्यांच..

कुठला कोण मी त्यांच्या ओळखीचा ना पाळखीचा..

ते काका पण रोज जाताना विचारपूस करायचे.. 


१५ व्या दिवशी मी माझ्या गावी आलो..

घरी आई बाबांना ही सगळी स्टोरी सांगितली.. 

बाबांनी लगेच माझ्या त्या मित्राला, त्या काकांना ज्यांचा नंबर घेऊन आलेलो मी आणि गणेशरावांना कॉल केला, सर्वांचे आभार मानले आणि गणेशरावांचे  गुगल पे वरून जेवणाचे १० दिवसाचे पैसे लगेच ट्रान्स्फर केले..


खरं सांगायचं तर.. हो नक्कीच, कोरोना मूळ आपल्या सगळ्यांवर एक वाईट वेळ आलेली आहे.. 

पण जोपर्यंत आपण आपली माणुसकी टिकवून आहे ना.. तोपर्यंत कोरोनाच काय.. अशा कितीतरी महामारी आल्या तरी त्या आपल्याला हरवू शकत नाहीत..


" विसरलेले पाकीट ! "


असाच एके दिवशी ऑफीसला निघालो. किल्ली, रूमाल, लॅपटॉप, टिफीन सगळं घेतलंय...जाताना बायकोला एक फ्लाईंगही दिलाय. तीही नई नव्हेली दुल्हनसारखी लाजलीये... 

दिवसाची लई भारी सुरवात...


गाडी सुरू केली. पेट्रोलच्या काट्यानं मान टाकलेली. पम्पम् करत गाडी पेट्रोल  पंपावर...


" दोनशेचं टाक रे."


त्यानं गाडीच्या टाकीत भुरूभुरू पेट्रोल ओतायला सुरवात केली. मी पँटच्या खिशात हात घातला. तिथली जागा रिकामी! आयला...


पाकीट विसरलो.


वरच्या खिशात हात घातला.

तो ही रिकामा...


आयला.... फोनही विसरलो. माझा चेहरा पार ऊतरला. आजूबाजूला पाहिलं कुणीही ओळखीचं दिसेना. प्रचंड लाज वाटायला लागली. तसा हा पंप ओळखीचा. घरापासून दीड किलो मीटरवर गेली वीस वर्ष इथंच पेट्रोल भरतोय...


पण हे एकतर्फी प्रेमासारखं !


आता पंप ओळख देईल, याची गॅरंटी वाटत नव्हती. दातओठ खावून निर्णय घेतला... ठरलं... गाडी इथंच लावायची. इथं साली रिक्षाही मिळत नाही. जाऊ दीड किलोमीटर चालत. घरनं फोन आणि पैसे घेऊ. बायको सोडेल इथपर्यंत...


प्रॉब्लेम एकच होता. पंधरा मिनटात क्लायंट ऑफिसला पोचणार होता. बॉस पेट्रोल शिवाय पेटला असता. माझं टेन्शन माझ्या चेहर्यावर  ओघळू लागलं. पंपावरचा माणूस खुदकन् हसला...


" होतं साहेब असं कधी कधी.. ऊद्या द्या पैसे."


माझ्या जीवात जीव. मी मनापासून त्याला थँक्स  म्हणलं. पुन्हा त्याला दिलसे थँक्स म्हणलं... 


ऑफीस गाठलं. मी पोचलो अन् पाचच मिनिटांत क्लायंट आला. दीड तास त्याच्याच सेवेत. तो पटला. गटला. मोठ्ठी ऑर्डर मिळाली. बॉसही हसला. त्याचं हसू म्हणजे मोनालीसाच्या हसण्यासारखं. गूढ आणि दुर्मिळ... 


चलो चाय हो जाए.. ऑफीसच्या खाली सद्रुची टपरी. ऑफीसपेक्षा मला त्याच्याकडचा चहा आवडतो. मनप्रसन्न काही घडलं की मी तिथला चहा घेतो. मी जिना ऊतरून खाली. मस्त अद्रकवाली चाय. घुटक घुटक संपवली. खिशात हात घातला...


आपण पाकीट विसरलो हेही विसरलो


सद्रूनं माझा चेहरा वाचला. सद्रूला काही म्हणणार...


एवढ्यात त्यानंच माझ्या खिशात, शंभराच्या पाच नोटा कोंबल्या.


काय बी बोलू नका साहेब. रोजच्या गणगणीत विसरतं माणूस...


अजून लागले तर सांगा. तुमास्नी ऑफीसमधी कुणीबी दिले आस्ते. पर तुमी कुणाला पैसे मागावे, मला नस्तं आवडलं. उद्या देतो, म्हणून मला तरास देवू नका. जावा बिगीबिगी. साहेब कावतील तुमचं...


मी चिडीचूप्प. हलक्या पावलानं ऑफीसला परतलो. वरच्या खिशाला पाचशेची ऊब होती...


त्या पाचशे रूपयांनी मी अंबानीहून श्रीमंत झालेलो.


दीड वाजत आला. लंचटाईम झाला. एवढ्यात बायको ऑफीसात. घामाघूम झालेली. तुम्हाला नाही, मलाच काळजी... पाकीट, फोन विसरलात...


तसं तुमचं पैशावाचून काही अडणार नाही म्हणा. सगळी तुमचीच माणसं आहेत आजूबाजूला.


पण मला खूप लागलं असतं. शक्यतो मागायची वेळ येवू नये, आपल्या माणसावर...घ्या तुमची ईस्टेट, शंभर फोन येवून गेलेत त्याच्यावर...अन् तुमच्या त्या 'बचपन की सहेली' चा सुद्धा. गेटटुगेदर आहे म्हणे. तुमच्या ९१ च्या बॅचचं निस्तरा काय ते. मी चालले...


बायको पी.टी. उषापेक्षा जास्त वेगाने गायब. पाकीट खिशात ठेवलं...


आता तर मी भलताच श्रीमंत झालेलो.


 लंचटाईमनंतर बॉसच्या केबिनमधे. दार हलकेच लोटलं. केबिनमधे शिरणार तोच कानावर काही पडलं. बॉस बायकोशी बोलत होता...


" जानू , तुझा ड्रेस आणला असता गं नक्की. आज नेमकं वॉलेट विसरलोय. तुला दिसलं नाही का घरी..? "


ऊद्या नक्की. प्लीज. रागवू नकोस. मी केबिनबाहेर वेळ काढला. पावणेदोन मिनटात फोनवरचं बोलणं संपलं. नॉक करून आत गेलो...


पाकीटातल्या दोन गुलाबी नोटा बॉसच्या हातात कोंबल्या.


"थँक्स म्हणू नका सर.." पटकन् मागे फिरलो...


बॉसच्या चेह-यावरचा सुटकेचा आनंद, मी पाठीवरल्या डोळ्यांनी, डोळे भरून बघितला...*श


माझं पाकीट पुन्हा रिकामं...


तरीही मी डबलश्रीमंत...


साला श्रीमंतीचा माज करावा, तो रिकाम्या पाकिटांनी... भरल्या पाकीटात ती मजा नाही...


व्हाट्सअप च्या माध्यमातून या कथा माझ्यापर्यंत आलेल्या त्या जशा आहेत तशा तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत.




२१/९/२५

शिऊरकर / Shiurkar

एका प्रसिद्ध यात्रा कंपनीबरोबर यशा आणि सावी युरोपसफरीसाठी निघाले होते.अमेरिका दोनदा उभं-आडवं पाहून झालं होतं.त्यामुळे प्रगत देश, तिथल्या सोयी,शिस्त वगैरेंचं नावीन्य राहिलं नव्हतं.पण 

युरोपची गोष्टच वेगळी.जगाचा इतिहास आणि भारताइतकीच प्राचीन संस्कृती ह्याबद्दल बरंच वाचलं होतं.शिवाय दुसऱ्या महायुद्धामुळे छोटे-मोठे देश,
त्यांची नावं माहीत झाली होती. 

कथा-कादंबऱ्यांतून गंडोला,आयफेल टॉवर भेटत गेले आणि ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राज्यामुळे तिथले बरेचसे संदर्भ माहीत होते.शाळेतल्या 'लंडन ब्रीज इज फॉलिंग' मुळे आणि कोहिनूरमुळे लंडनचंही आकर्षण होतं.खरं सांगायचं तर,यशा अन् सावी ह्या दोघांचीही कोहिनूर पाहून निराशा झाली होती.भावनिक आकर्षण नक्कीच होतं.पण राणीच्या खजिन्यात कोहिनूरपेक्षा मोठे,तेजस्वी हिरे अन् इतर रत्नं होती.

कालच रात्री यशा अन् सावी दोघे मुक्कामाला पॅरिसला आले होते.आज सकाळपासूनचा कार्यक्रम भरगच्च होता.सकाळी नास्ता करून मुक्कामाच्या होटेलवरून निघाल्यावर पहिलंच स्थळ म्हणजे पॅरिसचं प्रसिद्ध 'लौवरे' म्युझियम.इथे लिओनार्दोचं विश्वविख्यात मोनालिसाचं पेंटिंग ठेवलं होतं.
सहलीबरोबर असलेल्या टूरगाईडने सगळ्या ग्रुपला म्युझियममध्ये शिरण्याआधी माहिती सांगितली होती की, 'माहीतगारांच्या मते हे म्युझियम वरवर बघायचं म्हटलं तरी कमीतकमी आठ दिवस लागतील.आपण ते फक्त चार तासातच पाहणार आहोत.त्यात मोनालिसाचं आणि इतर पेंटिंग्ज,आकर्षक ग्रीक-रोमन शिल्पकला हे भाग महत्त्वाचे आहेत.आपण तीन तास बरोबर असू.शेवटचा तास तुम्ही परत आपल्याला आवडलेल्या कलाकृती पाहू शकाल.दुपारी बरोबर एक वाजता प्रवेशद्वाराजवळ भेटायचं आहे.'

(गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन,)

पहिले तीन तास ते सुंदर म्युझियम पाहून सगळेच भारावून गेले.नंतर शेवटचा तास सुरू झाला.नवीन झालेल्या मैत्रिणीबरोबर सावी जाते म्हणाली.यशा एकटाच परत त्याच्या आवडलेल्या कलाकृती पाहण्यात रमला.थोड्या वेळापूर्वी एक प्राचीन कलाकृती बघताना यशाला एक वेगळीच भावना स्पर्शन गेली होती.पण ती कशासंबंधी होती ते मात्र खूप प्रयत्न करूनही लक्षात येत नव्हतं म्हणून तो शोधत शोधत पुन्हा त्या विभागात गेला.सर्वत्र स्त्री-पुरुषांचे संगमरवराचे शेकडो पुतळे होते. युरोपियन शैलीच्या मुख्यतःपुरुषांच्या ग्रीक पुतळ्यांसमोर तो रेंगाळला.त्याला काहीतरी आठवत होतं.विस्मृतीच्या धुक्याआडून बाहेर येण्याचा प्रयत्न त्याचं मन करत होतं,पण काय ते लक्षात येत नव्हतं. एका पुतळ्याकडे निरखून बघता बघता अचानक काळाची पुटं निमिषार्धात बाजूला झाली.काळ चाळीस-पंचेचाळीस वर्षं मागे गेला आणि वीज चमकावी तसा यशा उद्‌गारला,

"अरे, हा तर शिऊरकर !"

यशा माध्यमिक शाळेत नुकताच गेला होता.त्यावेळी शिऊरकर त्याला पहिल्यांदा दिसला.कर्पूरवर्णाचा, उंचापुरा शिऊरकर गावात मधूनच कधी तरी दिसायचा. पांढरा मळकट पायजमा अन् पांढराच सदरा घातलेला शिऊरकर विलक्षण देखणा होता.अत्यंत धारदार नाक त्याच्या चेहऱ्याची शोभा वाढवत असे.त्याचे डोळेही वेगळेच होते.तेजस्वी नव्हते पण एक विलक्षण शांतपणा त्याच्या डोळ्यांत होता.तो तुमच्याकडे पाहत असताना तुम्हाला न पाहता पलीकडे शून्यात पाहतो आहे असा भास व्हायचा.शिऊरकरची आणखी एक खासियत होती.तो कधीच आणि काहीच बोलत नसे.रस्त्यातून एकटा जात असताना तो क्वचितच हसत असे.पण तो वेडा नव्हता किंवा गावही त्याला तसं मानत नव्हतं.खरं तर शिऊरकर गावाच्या खिजगणतीतच नव्हता. शिऊरकर कुठे राहतो,त्याचं नाव काय,त्याला कुणी नातलग आहे का,हे यशाला कधीच समजलं नाही.

एकदा दसऱ्याच्या सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाला बाबूच्या टांग्यातून बापूंबरोबर यशा गावाबाहेरच्या स्टेशनरोडवरच्या भव्य पटांगणात जात असताना त्याला एका जीर्ण बखळीच्या आत एका भिंतीला टेकून बसलेला शिऊरकर दिसला.यशाच्या मित्रांनादेखील वेगवेगळ्या प्रसंगांत तो तिथेच दिसलेला.त्यावरून शिऊरकर त्या पडक्या,एकाकी बखळीतच राहत असावा असा अंदाज यशाने त्यावेळी बांधला होता,पण ते तेवढंच.शिऊरकर काही ठरावीक घरांमध्ये जात असे. तिथल्या माऊल्या शिऊरकरला भिक्षा देत असत. अर्थात तिथेही तो काही मागत नसे.खरं तर एक शब्दही तो बोलत नसे.घरातल्या कुणाचं लक्ष जाईपर्यंत एखाद्या कोपऱ्यात शांत उभा राही.कुणाचं लक्ष गेलं की, घरातली कारभारीण त्याला काही तरी खायला आणून देत असे.खिशात ठेवलेल्या मळक्या फडक्यात ती भिक्षा बांधून शिऊरकर मोन्या मुकाट्याने निघून जाई

.त्याला देण्यासारखं घरात काही नसेल आणि तसं कारभारणीने त्याला सांगितलं तरी तो तशाच कोऱ्या चेहऱ्याने तिथून निघे.होळीच्या दिवसाची पुरणपोळी आणि कधी तरी मिळालेली शिळी,कडक झालेली पोळी तो सारख्याच निर्विकारपणे घेई.कुठली विरक्ती त्याने प्राप्त केली होती,कुणास ठाऊक !

एकदा गावातले लाईट गेले होते.यशा आणि त्याच्या गँगचा चोर-शिपायाचा खेळ गल्लीत रंगला होता. सगळीकडे पसरलेल्या गर्द काळोखाचा फायदा घेऊन सगळे चोर ठिकठिकाणी आडोशाला लपत होते.
शिपाई झालेला मुलगा त्यांना शोधायची पराकाष्ठा करत होता. त्यावेळची गोष्ट.

यशाच्या मोठ्या चौसोपी वाड्यात त्याच्या धाकट्या बहिणी मंदा आणि मुक्ता ओसरीवर बापूंच्या सतरंजीवर तक्क्याला टेकून भुताच्या गोष्टी करत होत्या. आजूबाजूच्या अंधाराने त्या गोष्टींची भीतिदायकता जास्तच वाढत होती.अचानक मंदाला दरवाज्याजवळच्या कोपऱ्यात काहीतरी दिसलं.तिने ते मुक्ताला दाखवलं.त्या दोघीही जोरात किंचाळायला लागल्या.स्वैपाकघरात चुलीवर भाकऱ्या भाजत असलेल्या माई लगबगीने हातात मिणमिणती चिमणी घेऊन आल्या तर कोपऱ्यात शिऊरकर शांतपणे उभा होता.दोघींच्या किंचाळण्याचा त्याच्यावर अजिबात परिणाम झाला नव्हता.जणू काही त्याने काही ऐकलंच नव्हतं.शिऊरकरला पाहून माई मुक्तालाच म्हणाल्या,

"ओरडायला काय झालं? तुम्हाला दिसलं नाही का शिऊरकर आहे तो ? देवाघरचं अश्राप लेकरू ते.
त्याला काय घाबरायचंय ? लहान मुलासारखा निष्पाप आहे तो.थांब रे बाबा.गरम भाकरी करते आहे.ती घेऊन जा." माई आत गेल्या गरम गरम ज्वारीची भाकरी अन् त्यावर लिंबाएवढा लसणीच्या चटणीचा गोळा घेऊन आल्या. शिऊरकरने खिशातून आपलं मळकं फडकं काढलं.

त्यावर माईंनी दिलेली चटणी-भाकर त्याने ठेवली.

"इथेच चौकात बसून खातोस का? आणखी एकादी भाकर देऊ का ?"

माईंचे हे प्रश्न बहुदा त्याने मघाच्या मंदा-मुक्ताच्या किंकाळ्यांसारखे ऐकलेच नव्हते.

माईंनी दिलेली भाकर घेऊन तो मागे वळून वाड्याबाहेर पडला.शिऊरकरसंबंधी मोठ्या माणसांमध्ये चाललेली बोलणी यशाने लहानपणापासून वेगवेगळ्या वेळी तुकड्यातुकड्यांनी ऐकली होती.त्यावरून दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास गावापासून पंधरासोळा किलोमीटरवर असलेल्या अनकाई किल्ल्याजवळच्या भागात वर्षभर असलेल्या गोऱ्या शिपायांच्या कँपशी काही संबंध असावा असं त्याच्या मनाने घेतलं.कारण प्रत्येक वेळेस शिऊरकरचा विषय निघाला की,त्यावेळी गोऱ्या शिपायांच्या कँपचा उल्लेख हटकून व्हायचाच. हजारभर सैनिकांच्या गरजा भागवण्यासाठी त्या परिसरात छोटीमोठी दुकानं थाटली गेली होती.शिवाय कोल्हाट्यांची अन् डोंबाऱ्यांची पालंसुद्धा तिथे पडलेली असत.छावणी अनकाईहून उठण्याच्या सुमारास गावात स्टेशनरोडच्या एका मंदिराच्या बाहेर रात्रीच्या अंधारात कुणीतरी एक नवजात मूल आणून ठेवलं.सगळ्या गावात त्यावेळी तो चर्चेचा विषय झाला होता. गोरंगोमटं,गुटगुटीत बाळ शांतपणे एका चिरगुटावर पडलं होतं.त्याचं जावळ सोनेरी होतं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते अजिबात रडत नव्हतं.त्या बाळाचं काय करायचं हा प्रश्न साऱ्या गावाला पडला तसा एकेक जण काढता पाय घेऊ लागला.नंतर समजलं की,तिथल्याच एका घरात राहणाऱ्या एका मुक्या ब्राह्मणाने त्याला घरी नेलं म्हणे.तोही एकटाच होता.वेळ जावा म्हणून असेल किंवा कणव आली म्हणून असेल त्याने त्या बाळाला नेलं,हे खरं.पुढे पाचसहा वर्षांनी तो ब्राह्मण कुठल्याशा साथीत मरण पावला.पण त्याचं नाव तो ह्या मुलाला देऊन गेला होता.त्यामुळे सगळा गाव त्याला शिऊरकरचा मुलगा म्हणून 'शिऊरकर' म्हणू लागला होता.ते आडनावच त्याचं नाव झालं.

शिऊरकर यशापेक्षा सुमारे दहा वर्षांनी मोठा होता. त्यामुळे शिऊरकरचं बालपण यशाला ठाऊक असण्याचा प्रश्नच नव्हता.पण गावातले लोक सांगायचे, त्यावरून शिऊरकर लहानपणापासून अगदी तो ब्राह्मण वारल्यानंतरदेखील त्या बखळीत एकटाच असायचा. बखळ गावाबाहेर असल्याने जवळपास वस्ती नव्हती. त्यामुळे त्याच्याशी खेळायलाही कुणी नसायचं.खायला मिळावं म्हणून तो तेव्हापासूनच गावात यायचा.पण तेव्हाही कुणाशी बोलायचा नाही.आत्तासारखाच तेव्हाही येऊन नुसतं उभं राहायचा.सुरुवातीला गावातल्या लोकांनी त्याला बाळ्या,बंड्या अशा नावांनी हाका मारायचा प्रयत्न केला.पण तो अशा हाकांना प्रतिसाद द्यायचा नाही.
बहुदा 'शिऊरकर' नावच त्याला आवडत असावं.
शिऊरकरला लहानपणापासूनच कुत्र्यांची आवड असावी.गावात् फिरताना त्याच्या आजूबाजूला एकदोन कुत्री हमखास दिसत.

कुठल्याच गल्लीतली कुत्री त्याच्यावर भुंकल्याचं कुणी पाहिलं नव्हतं.बखळीत तो कुत्र्यांशी खेळताना दिसत असे.दिवसा गावात फारसा न दिसणारा शिऊरकर रात्री किंवा पहाटे अनिर्बंध भटकत असावा.

एकदा माईबरोबर नवरात्रात यशा कोटमगावच्या देवीच्या दर्शनाला पहाटेच जात होता.अजून उजाडलेलंही नव्हतं.सगळीकडे अंधारच होता.
त्यावेळेस शिऊरकर समोरून परत गावाकडे येताना दिसला. अर्थात तो नुस्ताच उन्मुक्त भटकत होता की,देवीचं दर्शन घेऊन येत होता,हे मात्र समजलं नाही.

एकदा गल्लीत मुलं गोट्या खेळत होती.खेळ रंगात आला होता.त्यावेळी शिऊरकर तिथून जात होता. मुलांना खेळताना पाहून पुढे जाता जाता तो अचानक थांबला.मागे येऊन मुलांचा खेळ पाहत उभा राहिला. शिऊरकरला असा उभा राहिलेला सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिला.सुभ्या त्याला म्हणाला,

"खेळतोस का?"

सुभ्या त्याला नुसतं विचारूनच थांबला नाही तर त्याने टम्मण त्याच्या हातात दिला अन् म्हणाला,

"हं,मार ही लाल गोटी."

शिऊरकरने पवित्रा घेतला नि गोटी अचूक मारली.मग काय,मुलांना तो खेळच झाला.प्रत्येकाने वेगवेगळ्या गोट्या दाखवाव्या अन् शिऊरकरने त्या अचूक टिपाव्या, असा खेळ रंगला.

"आयला,शिऊरकरचा नेम जाम भारी आहे.मी सांगतो, लहानपणी तो जाम गोट्या खेळत असणार!" दिल्या आत्मविश्वासाने म्हणाला."आणि आतापण बखळीत बसून तो एकटाच गोट्या खेळण्याची प्रॅक्टिस करत असणार." पक्याने पुस्ती जोडली.

पाचसहा अचूक नेम मारून टम्मण खाली टाकून शिऊरकर काही न बोलताच पुढे निघून गेला.अर्थात गोट्या खेळतानाही तो बोलला नाहीच.त्याच्या चेहऱ्यावरचे भावदेखील बदलले नाहीत.

एका उन्हाळ्यातली गोष्ट.उन्हाळ्यात सगळं गाव घराबाहेरच्या अंगणात किंवा ओट्यावर अंथरुणं टाकून झोपायचं.गल्लीत सर्वच कुटुंबं बाहेर झोपत असल्याने झोप लागेपर्यंत एकमेकांशी गप्पा मारत.
रात्री हवेत थोडा गारवा येईपर्यंत सगळे जण गडीगुप झोपलेले असत.आप्पा आणि त्यांचं कुटुंबही ओट्यावर झोपलं होतं.आप्पांचं कुटुंब म्हणजे कोण - तर आप्पा स्वतः, त्यांची बायको आणि त्यांची तरुण मुलगी राही.राही अत्यंत देखणी होती.गावातल्या एकूण एका तरुण मुलाचं हृदय राहीने चोरलं होतं.
दिवसभर आप्पांच्या घरावरून तरुण मुलांची वर्दळ चालू असायची.आप्पांना ह्याची जाणीव होती.ते राहीला डोळ्यांत तेल घालून जपत.घरावरून जाणारा एखादा पोरगा थोडा जरी रेंगाळला तरी आप्पा त्याला शिव्या देऊन हुसकत असत.राहीला तिच्या सौंदर्याची जाणीव होती.तिचा बराच वेळ नट्टापट्टा करण्यात जात असे.त्या रात्री नेहमीप्रमाणे आप्पा आणि त्यांचं कुटुंब घराच्या बाहेरच्या ओट्यावर झोपलं होतं.मध्यरात्रीच्या सुमारास कशाने कोण जाणे पण आप्पांना जाग आली.त्यांना अंधारात कुणीतरी ओट्यावर बसलेलं दिसलं.बसलेली व्यक्ती नेमकी राहीच्या पायाजवळ बसली होती. आप्पांना आधी वाटलं,आपल्याला भास होतोय.म्हणून त्यांनी निश्चल बसलेल्या त्या व्यक्तीला न्याहाळलं तर तो शिऊरकर होता! आजूबाजूच्या घरांच्या अंगणात आणि ओट्यांवर गल्लीतली इतर कुटुंबंही झोपली होती. म्हणून आप्पा दबक्या आवाजात म्हणाले,

"ए शिऊरकर,चल निघ ! उठ तिथून ! तिथे कशाला बसलास ?"

शिऊरकर नेहमीप्रमाणे त्याच्याच समाधीत होता. आजूबाजूचे लोक उठतील आणि छोट्याशा गावातल्या लोकांना चघळायला एक विषय मिळेल आणि तोही मध्यरात्री राहीच्या अंथरुणाजवळ बसलेल्या शिऊरकरचा.म्हणून आप्पा दबक्या आवाजात शिऊरकरला तिथून जायला सांगत होते.लोकभयास्तव आप्पा त्याला मोठ्याने दम भरू शकत नव्हते.पण शिऊरकरचं तिथे तसं बसणं त्यांना अस्वस्थही करत होतं.घशातल्या घशात ते शिऊरकरला 'जा, निघ' असं बराच वेळ गुरगुरत होते.आता मात्र शिऊरकरचा संयम संपला असावा.
बाजूच्या दोन गल्ल्यांत ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात तो ओरडला-

"पण मी हात तरी लावला का...?"

शिऊरकर पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत राहिला. पांघरुणाच्या आतून डोकावून पाहणाऱ्यांनी त्या दिवशी शिऊरकरचा आवाज प्रथमच ऐकला ! आता आप्पांच्या संतापाचाही कडेलोट झाला.शिऊरकरवर ते सात्त्विक संतापाने ओरडत शिवी देऊन म्हणाले,

"हरामखोरा नसेल हात लावला तर लाव पण ऊठ तिथून !"

आप्पा संतापाने धुमसत असतानाच शिऊरकर शांतपणे तिथून उठला.शिऊरकरलाबहुदा तेवढ्या बोलण्यानेही श्रम झाले होते.तो हळूहळू चालत गल्लीच्या टोकाला गेला आणि मग दिसेनासा झाला.

गल्लीच्या बाहेर जाणाऱ्या शिऊरकरला पाहत,
झालेल्या गमतीशीर प्रकारामुळे पांघरुणाच्या आडून हसणाऱ्यांत यशापण सामील झाला.तेवढ्यात त्याचा खांदा कुणीतरी हलवला.यशा एकदम दचकला ! निरखून पाहिलं तर समोरच सावी उभी होती आणि म्हणत होती,

"यशा,अरे,इथे किती वेळपासून उभा आहेस ? ह्या मूर्तीत एवढं काय विशेष आहे ? आणि स्वतःशीच काय हसत होतास? बाहेर सगळा ग्रुप तुझी वाट पाहतो आहे." यशा काही न बोलता घाईघाईने सावीसोबत निघाला.आता बाहेर गेल्यावर एवढा वेळ का लागला आणि त्या मूर्तीत आपण एवढं काय बघत होतो ह्याचं काय उत्तर द्यावं ह्याचा विचार तो एकीकडे करत होता..... समाप्त 

ट्रीप खूप लहान आहे./The trip is too short.

 एक स्त्री बसमध्ये चढली आणि एका पुरुषाच्या  शेजारी बसताना त्याला तिच्या बॅगांनी मार लागला...परंतु तो पुरुष काहीही बोलला नाही.,तो माणूस गप्प बसल्यावर, त्या बाईने त्याला विचारले की तिने त्याच्यावर बॅग मारली, तेव्हा त्याने तक्रार का केली नाही ??


 त्या माणसाने हसून उत्तर दिले:


"एवढ्या क्षुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही, कारण "आपला 'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे....कारण मी पुढच्या थांब्यावर उतरत आहे"..!


या उत्तराने महिलेला खूप त्रास झाला....तिने त्या पुरुषाची माफी मागितली आणि तिला वाटले की  *ट्रिप खूप लहान आहे..!*  हे शब्द सोन्याने लिहावेत..!


आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपला वेळ इतका कमी आहे, की निरुपयोगी युक्तिवाद, मत्सर, इतरांना क्षमा न करणे, असंतोष आणि वाईट वृत्तीने काळोख करणे हा वेळ आणि शक्तीचा हास्यास्पद अपव्यय आहे..!


तुमचे हृदय कोणीतरी तोडले आहे का ??  शांत राहणे.,.


ट्रिप खूप लहान आहे..!

 

कोणी तुमचा विश्वासघात केला, धमकावले, फसवले किंवा तुमचा अपमान केला ??

आराम करा - तणावग्रस्त होऊ नका.,


ट्रिप खूप लहान आहे..!


कोणी विनाकारण तुमचा अपमान केला का ??वाईट बोलले का? शांत राहणे... दुर्लक्ष करा…


ट्रिप खूप लहान आहे..!


तुम्हाला 'न आवडलेली' टिप्पणी कोणी केली आहे का ??  शांत राहणे...दुर्लक्ष करा...क्षमा करा, त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा आणि विनाकारण त्यांच्यावर प्रेम करा.,.


ट्रिप खूप लहान आहे..!


काहींनी आपल्यासमोर कितीही समस्या आणल्या, त्याचा विचार केला, लक्षात ठेवला तरच ती समस्या निर्माण होते की आमचा *'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे..!


आमच्या सहलीची लांबी कोणालाच माहीत नाही... उद्या कोणी पाहिला नाही  तो कधी थांबेल हे कोणालाच माहीत नाही..!


आपली एकत्र सहल खूप लहान आहे....चला मित्र, नातेवाईक आणि कुटुंबाचे कौतुक करूया...त्यांचा आदर करा...  आपण आदरणीय, दयाळू, प्रेमळ आणि क्षमाशील होऊ या....कारण आम्ही कृतज्ञता आणि आनंदाने भरून जाऊ, आपली एकत्र सहल खूप लहान आहे..!


तुमचे हास्य सगळ्यांसोबत शेअर करा....तुमचे जीवन सुंदर व आनंदी बनण्यासाठी....... तुम्हाला हवा तसा तुमचा मार्ग निवडा....कारण…


आपली सहल खूप छोटी आहे..!!


आदरणीय सुनील घायाळ यांच्याकडून व्हॉट्सऍप द्वारे माझ्यापर्यंत आलेली....ही छोटी गोष्ट...





१९/९/२५

मध माशांना दगड मारु नका / Don't throw stones at honeybees.

अशा त-हेची विखारी पत्रे लिहून मार्क ट्वेनला समाधान मिळत असे.त्यामुळे त्यांच्या मनातली मळमळ ओकली जात असे आणि त्यांना त्यापासून काही नुकसानही होत नसे.कारण मार्कची पत्नी ती पत्रे गुपचुप फाडून फेकून देई.त्यांचे पत्र कधीच पेटीत टाकले गेले नाही.

तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला जाणता का जिला तुम्ही बदलायला,सुधरवायला आणि अधिक चांगले व्हायला पाहताय ? खूपच छान ! हा फार चांगला विचार आहे. मीसुद्धा तुमच्यासारखाच आहे.पण मग स्वतःपासूनच सुरुवात का करू नये? विशुध्द स्वार्थी तऱ्हेने विचार केला तरी दुसऱ्यांना सुधारण्याऐवजी स्वतःला सुधारणे आमच्यासाठी जास्त लाभदायक होईल.हो,आणि कमी धोकादायकसुद्धा ! कन्फुशियसने म्हटले होते, "स्वतःच्या घराच्या पायऱ्याच स्वच्छ नसतील तर शेजाऱ्याच्या छतावर पडलेल्या बर्फाबाबत तक्रार करू नका."

जेव्हा मी तरूण होतो तेव्हा लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असे.त्यावेळी मी रिचर्ड हार्डिंग डेव्हिस नावाच्या लेखकाला एक मूर्खपणाचे पत्र लिहिले होते.मी लेखकांबाबत एका पत्रिकेसाठी एक लेख तयार करीत होतो तेव्हा मी डेव्हिसला त्यांच्या कार्यपध्दतीबाबत विचारले.काही आठवड्यांपूर्वी मला एक असे पत्र मिळाले होते,ज्याच्याखाली लिहिले होते, "सांगितले गेले पण वाचले गेले नाही." मी या वाक्याने खूपच प्रभावित झालो.मला वाटले की लेखक खूप मोठी,व्यग्र व महत्त्वपूर्ण व्यक्ती असणार,म्हणूनच तिने असे लिहिले.मी अजिबातच व्यग्र नव्हतो,पण मी रिचर्ड हार्डिंग डेव्हिसवर प्रभाव टाकायला बघत होतो,म्हणून मी माझ्या छोट्या पत्राच्या शेवटी हे शब्द लिहिले, "सांगितले गेले पण वाचले गेले नाही.".

ते माझ्या पत्राला उत्तर देण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी त्याच पत्राच्या शेवटी एक ओळ लिहून परतीच्या टपालाने माझ्याकडे पाठवून दिले :"तुमच्या असभ्यपणाला काय म्हणावं?" गोष्ट खरी होती.चूक मी केली होती आणि यासाठी कदाचित माझी निंदासुद्धा करायला हवी होती.पण मी मानवच असल्याने मला त्याबद्दल खूपच वाईट वाटलं.मला त्यामुळे इतकं दुःख झालं की जेव्हा दहा वर्षांनंतर मी डेव्हिसच्या मृत्यूबद्दल ऐकलं तेव्हा माझ्या मनात एकच विचार येत होता,'बरं झालं,त्यांनी मला किती दुःख दिलं होतं,नाही का!'

जर तुम्ही आणि मी कुणाच्या मनात स्वतःबद्दल द्वेष निर्माण करू पाहत असाल,जो दशकांनंतर
सुध्दा कायम राहत असेल आणि मरणानंतरही नष्ट होत नसेल,तर आम्हाला अजून काही करायचं नाही आहे;फक्त निवडक शब्दांमध्ये बोचणारी टीका करायची आहे.या गोष्टीमुळे काही फरक पडत नाही की आमची टीका किती बरोबर आणि किती योग्य आहे.

लोकांशी व्यवहार करताना आम्ही लक्षात ठेवले पाहिजे की आम्ही तार्किक लोकांशी व्यवहार करीत नाही. आम्ही भावनिक लोकांशी व्यवहार करत आहोत ज्यांच्यामध्ये पूर्वग्रह आहेत,दोषही आहेत,गर्व आणि अहंकारसुद्धा आहे.

कडवट टीकेमुळेच थॉमस हार्डिसारख्या इंग्रजी साहित्यातल्या महान कादंबरीकाराने कादंबरी लिहिणे कायमचे सोडून दिले होते.टीकेमुळेच इंग्रजी कवी थॉमस चॅटरने आत्महत्या केली होती.

बेंजामिन फ्रेंकलिन,जे आपल्या तारुण्यात अतिशय असभ्य होते,ते भविष्यात इतके कूटनितीज्ञ बनले, लोकांशी व्यवहार करण्यात इतके कुशल झाले की त्यांना फ्रान्समध्ये राजदूताच्या रुपात पाठवले गेले. त्यांच्या यशाचे रहस्य काय होते? ते म्हणत,

"मी कुणाबद्दल वाईट बोलणार नाही.प्रत्येकाबद्दल चांगलंच बोलेन."

कुणीही मूर्ख निंदा करू शकतो,तक्रार करू शकतो. जास्त करून मूर्ख लोक हेच करतात परंतु समजायला व माफ करायला तुम्हाला समजूतदार आणि संयमी व्हायला लागते.

कार्लायलने म्हटले होते, "महान व्यक्ती लहान लोकांबरोबर व्यवहार करताना आपली महानता दाखवतात."

वॉब हूपर एक प्रसिध्द वैमानिक होते,जे हवाई-
सर्कशीत प्रदर्शन करीत असत.एकदा ते सॅनडियॅगोहून एका कार्यक्रमात भाग घेऊन झाल्यावर लॉस एंजलिसमधल्या आपल्या घरी परतत होते.अचानक हवेतच तीनशे फूट उंचीवर विमानाची दोन्ही इंजिनं बंद पडली.अत्यंत कुशलतेने त्यांनी विमान खाली उतरवले. या प्रकारात विमानाला बरेच नुकसान झाले,पण कुणीही जखमी झाले नाही.या घटनेनंतर हुपरने सर्वांत प्रथम विमानाच्या इंधनाची तपासणी केली.त्यांना आलेल्या शंकेनुसार त्यांच्या दुसऱ्या महायुध्दकालीन विमानामध्ये गॅसोलिनऐवजी जेटचं इंधन टाकलं होतं.

विमानतळावर परतल्यावर त्यांनी त्या मेकॅनिकची चौकशी केली ज्याने त्यांच्या विमानाची सर्व्हिसिंग केली होती.तो तरुण मेकॅनिक आपल्या गंभीर चुकीबद्दल खूपच शरमिंदा होता.जेव्हा हुपर त्याच्याकडे गेले तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.त्याच्या चुकीमुळे एक अतिशय महागडे विमान नष्ट तर झाले होते,पण तीन जण प्राणास मुकले असते.तुम्हाला हुपरच्या संतापाची कल्पना येऊ शकते? या निष्काळजीपणासाठी तो कुशल आणि स्वाभिमानी पायलट किती रागावू शकला असता,पण हुपर त्या मेकॅनिकला काही कडक बोलले नाहीत आणि त्याच्यावर टीकाही केली नाही.याउलट,त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, "माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.यापुढे तू असे कधी करणार नाहीस.मी तुला माझ्या उद्याच्या एफ-५१ विमानाची सर्व्हिसिंग करायला देतो आहे."

बहुतेक आई-वडील आपल्या मुलांवर टीका करतात. तुम्हाला वाटत असेल की मी यापासून तुम्हाला रोखेन; पण नाही,मी असे करणार नाही.मला फक्त हे सांगायचेय की,कुणावर टीका करण्याआधी अमेरिकन पत्रकारितेचा 'फादर फरगेट्स' हा एक अप्रतिम लेख वाचून काढा. हा लेख प्रथम पीपल्स होम जर्नलच्या संपादकीय रुपात छापला गेला होता.आम्ही हा लेख लेखकाची परवानगी घेऊन छापतो आहोत.'रीडर्स डायजेस्ट'मध्ये याचे संक्षिप्त रुपांतरण प्रकाशित झाले होते.'फादर फरगेट्स' अशा छोट्या लेखांपैकी आहे जे गहन अनुभूतीच्या काही क्षणात लिहिले जातात आणि थेट वाचकांच्या हृदयालाच हात घालतात.आता हा लेख पुनर्प्रकाशित होतो आहे.याचे लेखक डब्लू. लिव्हिंगस्टोन लानेंडच्या मते हा लेख हजारो पत्रिका व वर्तमानपत्रांमध्ये छापला गेला आहे,याला अनेक विदेशी भाषांमध्येही रुपांतरीत केले गेले आहे व तिथेही तो तितकाच लोकप्रिय ठरला आहे.त्या भाषांमध्येही हा लेख अनेक वेळा छापला गेलाय.मी हजारो लोकांना व्यक्तिगत परवानगी दिली आहे की ते याचा प्रयोग स्कूल,चर्च व भाषणांच्या व्यासपीठांवर करू शकतील. तो अनेकदा असंख्य रेडियो कार्यक्रमांमध्येही प्रसारीत झाला आहे.गंमत म्हणजे कॉलेज व शाळांच्या पत्रिकांमध्येसुध्दा हा लेख छापला गेलाय.अनेकदा अगदी छोटासा लेखसुध्दा अगम्य कारणांमुळे लोकप्रिय होतो.या लेखाबाबतीत असेच घडले.

फादर फरगेट्स (प्रत्येक पित्याने हे लक्षात ठेवावे)

डब्लू.लिव्हिंगस्टोन लानेंड

"ऐक बेटा ! मला तुला काही सांगायचंय.तू गाढ झोपेत आहेस.तुझा इवलासा हात तुझ्या सुकुमार गालाखाली दबलाय आणि तुझ्या घामाने भरलेल्या कपाळावर कुरळे केस विखुरले आहेत.मी तुझ्या खोलीत गुपचुप शिरलो आहे एकटाच.नुकताच मी जेव्हा लायब्ररीत वर्तमानपत्र वाचत होतो तेव्हा मला खूप पश्चात्ताप झाला.म्हणूनच मी अर्ध्या रात्री तुझ्याजवळ उभा आहे, एखाद्या अपराध्यासारखा !

ज्या गोष्टींबद्दल मी विचार करीत होतो त्या अशा आहेत बेटा.मी आज तुझ्यावर खूप रागावलो.जेव्हा तू शाळेत जायला तयार होत होतास तेव्हा मी तुझ्यावर खूप चिडलो.तू टॉवेलऐवजी पडद्याला हात पुसले होतेस. तुझे जोडे घाणेरडे होते,यावरूनसुध्दा मी तुला रागावलो. तू जमिनीवर इकडे तिकडे पसारा करून ठेवला होतास, त्यावरूनसुध्दा मी तुला खूप वेडंवाकडं बोललो.

नाश्ता करताना मी तुझ्या एका मागोमाग एक चुका दाखवत गेलो.तू टेबलावर खाणं सोडून दिले होतेस. खाताना तू मचमच आवाज करीत होतास.टेबलावर तू हाताची कोपरं टेकवली होतीस.तू ब्रेडवर खूप सारे लोणी चोपडले होतेस.एवढेच नव्हे,तर मी ऑफिसमध्ये जात होतो आणि तू खेळायला जात होतास तेव्हा तू वळून हात हलवून "बाय बाय,डॅडी"

म्हणाला होतास अन् मी भुवया उडवून तुला टोकले होते,'तुझी कॉलर नीट कर.' संध्याकाळीदेखील मी हेच सगळे केले.ऑफिसातून परतल्यावर तू मातीत मित्रांबरोबर खेळत होतास हे मी पाहिले.तुझे कपडे मळलेले होते,तुझ्या मोज्यांना भोके पडली होती.मी तुला पकडून घेऊन गेलो आणि तुझ्या मित्रांसमोर 'मोजे महाग आहेत.जेव्हा तुला विकत घ्यावे लागतील तेव्हा तुला त्याची किंमत कळेल'असं म्हणून तुला अपमानित केले.जरा विचार करा,एक बाप आपल्या मुलाचे मन यापेक्षा अधिक कसे दुखावू शकेल ?

तुला आठवतेय का,जेव्हा मी लायब्ररीत वाचन करत होतो तेव्हा तू माझ्या खोलीत रात्री आला होतास, एखाद्या घाबरलेल्या हरणाच्या पाडसासारखा.तुला किती दुःख झाले आहे हे तुझ्या डोळ्यांवरून कळून येते होते आणि मी वर्तमानपत्रावरून तुझ्याकडे बघत माझ्या वाचनात व्यत्यय आणल्याबद्दल 'आता काय हवंय,कधी तरी आरामात बसू दे मला!' असं म्हणत तुला झिडकारुन टाकले होते.त्या वेळी तू दारातच थबकला होतास.तू काहीही न बोलता,फक्त लाडात येऊन माझ्या गळ्यात हात घालून माझे चुंबन घेऊन "गुड नाइट" म्हणून निघून गेला होतास.तुझ्या छोट्या छोट्या हातांच्या मिठीवरून असे कळून येत होते की तुझ्या अंतःकरणात ईश्वराने प्रेमाचे असे फूल लावले आहे जे इतक्या उपेक्षेनंतरही मरगळले नाही...मग तू जिन्यावर खट-खट आवाज करीत निघून गेलास.

तर बेटा,या घटनेनंतर थोड्याच वेळाने माझ्या हातून वर्तमानपत्र गळून पडले आणि मला खूपच हताश वाटू लागले.हे मला काय होत आहे? दोष काढण्याची, धाक-दपटशा दाखवण्याची सवय होत चालली होती मला.आपल्या मुलाच्या बालिश चुकांचे हे बक्षीस मी त्याला देत होतो.असं नाही बेटा,की मी तुझ्यावर प्रेम करीत नाही,पण मी एका लहान मुलाकडून आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा करत होतो.मी तुझं वागणं आपल्या वयाच्या तराजूनं तोलून बघत होतो.

तू इतका लोभस आहेस,इतका चांगला आणि खरंच, तुझे छोटेसे हृदय इतके विशाल आहे जशी की पर्वतांच्या मागून उगवणारी पहाटच ! तुझी महानता यावरूनच दिसून येते की दिवसभर वडिलांकडून बोलणी खाऊनही त्यांना रात्री गुड नाइट किस द्यायला तू आलास.आजच्या रात्री इतर काहीच महत्त्वाचे नाही बेटा.मी या अंधारात तुझ्या उशाशी आलोय आणि इथे गुडघे टेकून शरमिंदा होऊन बसलोय.

हा एक कमकुवत पश्चात्ताप आहे.मला माहीत आहे की जर मी तुला जागं करून हे सगळं सांगितलं तर कदाचित तुला हे काहीच समजणार नाही.पण उद्यापासून मी नक्कीच तुझा लाडका बाबा बनून दाखवेन.मी तुझ्याबरोबर खेळेन,तुझ्या मजेदार गोष्टी मन लावून ऐकेन,तुझ्यासह खळखळून हसेन आणि तुझ्या दुःखात सहभागी होईन.यापुढे जेव्हा कधी मी तुला रागवायला तोंड उघडेन,त्याआधीच मी माझी जीभ दातांखाली दाबून धरेन.मी एखाद्या मंत्रासारखं
असं वारंवार म्हणेन, "तो तर अगदी छोटासा आहे... छोटासा मुलगा !"

मला याचे दुःख होते की मी तुला मुलगा नव्हे तर मोठा माणूस समजलो होतो.पण आज जेव्हा मी तुला पाय पोटाशी घेऊन झोपलेला,थकलेला पाहतोय तेव्हा बेटा, मला असं वाटत आहे की तू अजून छोटाच तर आहेस ! कालपर्यंत तू आपल्या आईच्या कुशीत होतास,तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होतास.मी तुझ्याकडून किती अवास्तव अपेक्षा केली होती,किती तरी जास्त !

लोकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा.आम्ही हे शोधून काढायला हवे की ते जे काही करतात ते का बरे करतात.हे टीका करण्यापेक्षा अधिक रोचक आणि लाभदायक होईल.एवढेच नव्हे,तर त्यामुळे सहानुभूती,सहनशक्ती आणि दयाळूपणाचे वातावरण निर्माण होईल.सर्वांना समजून घेण्याचा अर्थ आहे सर्वांना क्षमा करणे."

डॉ.जॉन्सननी म्हटलंय,"ईश्वर स्वतः मानवाच्या मृत्यूआधी त्याचा निर्णय घेत नाही." तर मग तुम्ही आणि मी असे करणारे कोण?

कुणाविषयी वाईट बोलू नका,निंदा करू,नका,
तक्रार करू नका.

समाप्त....