* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सुखाचा चहा / happy tea

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/९/२५

सुखाचा चहा / happy tea

"रस्त्यातच त्याला पावसाने गाठलं,.आधीच सकाळपासून वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली,..रस्ता तसा रोजचा परिचयाचा पण कधी थांबाव लागलं नव्हतं,..ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला,..पत्र्याच्या शेड खाली,..छोटीशी चहाची टपरी होती,.. तसही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिला होता आणि आता वातावरणही छान होतं,..हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणार नव्हता,....."


टपरीवर एक जोडपं आणि छोटं मूल होतं,.. ते मूल पत्र्यावरून पडणाऱ्या पन्हाळ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून हसत होतं,.. मध्येच ओला हात आई बाबांवर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे हसून बघत होते,..,..त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरचं पाणी झटकत तो बसला,..एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला,.. त्याच त्यालाच छान वाटलं,..समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेली शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर,....चिंब पावसात धूसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला,....बायकोचाच त्याने कट केला सकाळपासून हा पाचवा फोन तिचा. काहीतरी चुका करत राहते आणि आपला मूड घालवते लग्नाला अजून चार महिने नाही झाले पण बोअर झालं हे सहजीवन या भावनेने त्याने फोन कट केला,..,.


तेवढ्यात चहाचा ग्लास घेऊन तो टपरीवाला समोर आला,...आणि तितक्यात त्या बाई कडून काही ग्लास सुटले हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकन आवाज झाला,..ते मुल क्षणभर थबकलं पाण्यात खेळताना,..तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला त्याला काही नाही खेळ तू,..आणि तो काचा भरू लागला,..तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली,..तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला,..एकूण चार पाच ग्लास फुटले होते म्हणजे आजची कमाई नक्की शून्य,..पण तो माणूस शांत होता,..आता ह्याची बेचैनी अजून वाढली,..ह्याला सकाळचा प्रसंग आठवला,..आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो,....


बोललो तिला पण ती शांत होती,.. ह्या वातावरणासरखी आणि आपण ह्या चहासारखं गरम,.. शब्दांच्या वाफा आपल्या तोंडातून निघत होत्या,..आपलं तर फारस नुकसानही नव्हतं,..पण आपण किती रिॲक्ट झालो,...त्यामुळे दिवसभर देखिल आपला मूड खराब होता,... आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला,..खूप काही शिकल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून,..तो पैसे द्यायला काऊंटर जवळ आला,..वीसची नोट देताच चहावाला म्हणाला,"सर सुट्टे नाही माझ्याकडे 10 रु द्यायला.... तुमच्याकडे असतील तर बघा,....त्याने खिसा तपासला पण नव्हते सुट्टे,.. चॉकलेट देऊ चहावाला म्हणाला,"त्यावर हसून ह्याने नकार दिला,..आणि म्हणाला,.." असू द्या तुम्हाला नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली,..ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात,.."


 चहावाला हसून म्हणाला,.."तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते कधीतरी चूक होणारच आपल्याकडूनही होते फक्त आपल्याला रागावणार कोणी नसतं,.... आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर अस रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी,..आयुष्य क्षणभंगूर आहे होत्याचं नव्हतं कधी होऊ शकतं,..आता हिलाच बघा ना लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि  एकाएकी दृष्टी गेली,...डॉक्टर म्हणाले," येईल दृष्टी परत.." पण कधी ते नक्की नाही,...खूप वाईट वाटलं,..माझी चिडचिड होत होती,...एकदिवस तिनं माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणाली,"आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा,..मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे,..त्या दिवसापासून ठरवलं किती नुकसान झालं तरी तिला रागवायच नाही,...माणूस नेहमी स्वतःच्या बाजूनी विचार करतो ना सर,..थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येत सगळं,..."


ह्याला आता जास्त आश्चर्य वाटलं अंध बायको असून किती शांतपणे स्वीकारलं आहे सगळं,... आपण तर जणू चिडणं हा आपला अधिकार आहे अश्या अविर्भावात असतो सतत,....आपली बायको सकाळी किती घाबरली होती,...त्याला आठवलं खरंतर रात्रभर पाय दुःखतात म्हणून कुठले तेल घेऊन मालिश करत बसली होती,.. मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो त्यालाच एकदम भरून आलं,.... त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मघापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबलापाशी आली आणि म्हणाली,"दहा रुपये सुट्टे नाहीत तर हा गजरा घ्या,....कुणाचे फुकट पैसे नाही ठेवत आम्ही,..

तसही कपाने महाभारत झालं म्हणता घरात ह्या गजऱ्याने मिटवून टाका,..कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं तर संसारात, म्हणजे मजा असते नाही का,....?"


 इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांना जी मोकळीक द्यायची ती दिली जाईल का,..? साहेब याच रोडवरून रोज येणं जाणं असेल तर येत जा अधून मधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला,..तो बघतच राहिला त्या जोडप्याला,..एकमेकांना शारिरीक गुणांनी विसंगत असलं तरी समजून घेणार जोडपं,...आता मुलाला आंनदी होड्या बनवून देत होत आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती,...हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होतं,.....


 त्याने गजरा घेतला आणि वीस रुपयात खूप काही मिळालं ह्या भावनेने निघाला,.. गाडीला किक मारताना सहजच टपरीची पाटी बघितली,..त्यावर नाव होतं "सुखाचा चहा..." 


स्टोरी लॉकडाऊन ची.. 

स्टोरी कोल्हापूरकरांच्या माणुसकीची.. 


पुणे रिटर्न असल्यामुळं, सीपीआर मध्ये पहिला स्वॅब घेतला..दोन दिवसांनी रिपोर्ट निगेटिव्ह आला..पण ताप असल्यामुळं १४ दिवसांचा इथंच क्वारंटाईन चा शिक्का बसला..

गावी यायचं होत लगेच मला.. पण शिक्का बसल्यामुळं इथंच थांबाव लागलं.. मुंबई मध्ये सध्या राहणाऱ्या माझ्या कोल्हापूरच्या मित्राला हे समजल्यावर त्याचा कॉल आला,

बोलला, "भावा नागाळा पार्कात माझा फ्लॅट हाय.. बिल्डिंग मध्ये बाकी कोणी नसतंय त्यामुळं तू बिनधास्त जाऊन राहा तिथं..

आणि काय लागलं तर पहिला सांगायचं काय.. भाऊ आहेस तू आपला.. काकींशी ( माझ्या आईशी ) पण बोलतो मी.. पत्ता पाठवतो तुला.."इतकं बरं वाटलं ना या धीर देणाऱ्या त्याच्या शब्दांमुळं.. मग इथल्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि गेलो तिथं.. आता आलोय इथं तर म्हटलं, जेवणाचं कसं करायचं.. हा प्रश्न होता.. मित्राला बोलायच्या आधी बघूया म्हटलं इथ जवळपास कुठून पार्सल मिळतंय का ते..


गॅलरीत उभा होतो.. खालून एक वयस्कर काका चाललेले..

त्यांना हाक मारली आणि सांगितलं कि,

"काका असं असं आहे न मी बाहेर पडू शकत नाही..इथं

जवळपास कुठून जेवणाची सोय होईल का?"

त्यांनी मास्क काढला.. वर माझ्याकडे बघितलं.. चेहऱ्यावर स्मितहास्य आणून खिशातून लगेच मोबाईल काढला.. 

बोलले, "थांब नंबर देतो तुला.."

"गणेशरावांचा नंबर आहे हा.. त्यांचं जवळच हॉटेल आहे इथं.. ते करतील जेवणाची तुझी सोय "

इतकं बोलले आणि गेले ते.. 

मी फोन केला त्या नंबर वर त्यांनी पत्ता विचारून लगेच जेवणाची सोय केली.. आता महत्वाचं कि,

१४ दिवस काढायचे होते इथ मला.. खिशात पैसेही थोडेच.. ४ दिवस गणेश रावांकडून मागवलं मी जेवण..

५ व्या दिवशी बघतोय तर पाकिटात पैसे थोडेच शिल्लक.. विचार करत करत गॅलरीत आलो.. 

नेहमीप्रमाणे ते काका तिथून जात होते.. 

त्यांनी हाक मारली मला.. बोलले, काय कस काय चाललंय?


मी म्हटलं ठीक काका.. आणि परत पुढचा विचार करत बसलो.. 

काकांना बहुतेक कळालेलं कि कायतर प्रॉब्लेम आहे.. 

म्हणून खोचून विचारलं आणि त्यांनी.. मग सगळं सांगितलं मी त्यांना.. 

काकांनी विठोबासारखं दोन हात कमरेवर ठेवले आणि म्हणाले, "माझा मुलगा आर्मीत आहे मुला.. तुझ्याएवढाच.. तो जर तिथं राहून देशाची रक्षा करत असेल तर मी काय इथं माझ्या मुलांची रक्षा करू शकत नाही.."

लगेच फोन करून त्यांनी त्या गणेश रावांना बोलवून घेतलं तिथं.. 

दोघे बोलत होते.. मला इतकं काही ऐकू येत नव्हतं वर.. 

बहुतेक माझी सगळी परिस्थिती सांगत होते ते त्यांना..

काका बोलले, मी बोललोय यांना थोड्यावेळात तुझं जेवण येईल.. आणि खरच एका तासात गणेशराव माझ्या बिल्डिंग च्या खाली.. पार्सल घेऊन.. 

त्यांना कळकळीनं मी म्हटलं,दादा सध्या तुम्हाला द्यायला माझ्याकडं पैसे नाहीत ओ..

त्यानंतर सेम त्या काकांसारखं.. 

वर बघून, स्मितहास्य देऊन त्यांचे ते शब्द,

"पैश्याचं काय एवढं घेऊन बसलाय दादा.. माणुसकी आहे कि तेवढी आमच्यात.."

त्यावर काय पुढं बोलावं मलाच समजेना..

५ व्या दिवसापासून ते १४ व्या दिवसापर्यंत.. सलग १० दिवस पार्सल येत होत त्यांच..

कुठला कोण मी त्यांच्या ओळखीचा ना पाळखीचा..

ते काका पण रोज जाताना विचारपूस करायचे.. 


१५ व्या दिवशी मी माझ्या गावी आलो..

घरी आई बाबांना ही सगळी स्टोरी सांगितली.. 

बाबांनी लगेच माझ्या त्या मित्राला, त्या काकांना ज्यांचा नंबर घेऊन आलेलो मी आणि गणेशरावांना कॉल केला, सर्वांचे आभार मानले आणि गणेशरावांचे  गुगल पे वरून जेवणाचे १० दिवसाचे पैसे लगेच ट्रान्स्फर केले..


खरं सांगायचं तर.. हो नक्कीच, कोरोना मूळ आपल्या सगळ्यांवर एक वाईट वेळ आलेली आहे.. 

पण जोपर्यंत आपण आपली माणुसकी टिकवून आहे ना.. तोपर्यंत कोरोनाच काय.. अशा कितीतरी महामारी आल्या तरी त्या आपल्याला हरवू शकत नाहीत..


" विसरलेले पाकीट ! "


असाच एके दिवशी ऑफीसला निघालो. किल्ली, रूमाल, लॅपटॉप, टिफीन सगळं घेतलंय...जाताना बायकोला एक फ्लाईंगही दिलाय. तीही नई नव्हेली दुल्हनसारखी लाजलीये... 

दिवसाची लई भारी सुरवात...


गाडी सुरू केली. पेट्रोलच्या काट्यानं मान टाकलेली. पम्पम् करत गाडी पेट्रोल  पंपावर...


" दोनशेचं टाक रे."


त्यानं गाडीच्या टाकीत भुरूभुरू पेट्रोल ओतायला सुरवात केली. मी पँटच्या खिशात हात घातला. तिथली जागा रिकामी! आयला...


पाकीट विसरलो.


वरच्या खिशात हात घातला.

तो ही रिकामा...


आयला.... फोनही विसरलो. माझा चेहरा पार ऊतरला. आजूबाजूला पाहिलं कुणीही ओळखीचं दिसेना. प्रचंड लाज वाटायला लागली. तसा हा पंप ओळखीचा. घरापासून दीड किलो मीटरवर गेली वीस वर्ष इथंच पेट्रोल भरतोय...


पण हे एकतर्फी प्रेमासारखं !


आता पंप ओळख देईल, याची गॅरंटी वाटत नव्हती. दातओठ खावून निर्णय घेतला... ठरलं... गाडी इथंच लावायची. इथं साली रिक्षाही मिळत नाही. जाऊ दीड किलोमीटर चालत. घरनं फोन आणि पैसे घेऊ. बायको सोडेल इथपर्यंत...


प्रॉब्लेम एकच होता. पंधरा मिनटात क्लायंट ऑफिसला पोचणार होता. बॉस पेट्रोल शिवाय पेटला असता. माझं टेन्शन माझ्या चेहर्यावर  ओघळू लागलं. पंपावरचा माणूस खुदकन् हसला...


" होतं साहेब असं कधी कधी.. ऊद्या द्या पैसे."


माझ्या जीवात जीव. मी मनापासून त्याला थँक्स  म्हणलं. पुन्हा त्याला दिलसे थँक्स म्हणलं... 


ऑफीस गाठलं. मी पोचलो अन् पाचच मिनिटांत क्लायंट आला. दीड तास त्याच्याच सेवेत. तो पटला. गटला. मोठ्ठी ऑर्डर मिळाली. बॉसही हसला. त्याचं हसू म्हणजे मोनालीसाच्या हसण्यासारखं. गूढ आणि दुर्मिळ... 


चलो चाय हो जाए.. ऑफीसच्या खाली सद्रुची टपरी. ऑफीसपेक्षा मला त्याच्याकडचा चहा आवडतो. मनप्रसन्न काही घडलं की मी तिथला चहा घेतो. मी जिना ऊतरून खाली. मस्त अद्रकवाली चाय. घुटक घुटक संपवली. खिशात हात घातला...


आपण पाकीट विसरलो हेही विसरलो


सद्रूनं माझा चेहरा वाचला. सद्रूला काही म्हणणार...


एवढ्यात त्यानंच माझ्या खिशात, शंभराच्या पाच नोटा कोंबल्या.


काय बी बोलू नका साहेब. रोजच्या गणगणीत विसरतं माणूस...


अजून लागले तर सांगा. तुमास्नी ऑफीसमधी कुणीबी दिले आस्ते. पर तुमी कुणाला पैसे मागावे, मला नस्तं आवडलं. उद्या देतो, म्हणून मला तरास देवू नका. जावा बिगीबिगी. साहेब कावतील तुमचं...


मी चिडीचूप्प. हलक्या पावलानं ऑफीसला परतलो. वरच्या खिशाला पाचशेची ऊब होती...


त्या पाचशे रूपयांनी मी अंबानीहून श्रीमंत झालेलो.


दीड वाजत आला. लंचटाईम झाला. एवढ्यात बायको ऑफीसात. घामाघूम झालेली. तुम्हाला नाही, मलाच काळजी... पाकीट, फोन विसरलात...


तसं तुमचं पैशावाचून काही अडणार नाही म्हणा. सगळी तुमचीच माणसं आहेत आजूबाजूला.


पण मला खूप लागलं असतं. शक्यतो मागायची वेळ येवू नये, आपल्या माणसावर...घ्या तुमची ईस्टेट, शंभर फोन येवून गेलेत त्याच्यावर...अन् तुमच्या त्या 'बचपन की सहेली' चा सुद्धा. गेटटुगेदर आहे म्हणे. तुमच्या ९१ च्या बॅचचं निस्तरा काय ते. मी चालले...


बायको पी.टी. उषापेक्षा जास्त वेगाने गायब. पाकीट खिशात ठेवलं...


आता तर मी भलताच श्रीमंत झालेलो.


 लंचटाईमनंतर बॉसच्या केबिनमधे. दार हलकेच लोटलं. केबिनमधे शिरणार तोच कानावर काही पडलं. बॉस बायकोशी बोलत होता...


" जानू , तुझा ड्रेस आणला असता गं नक्की. आज नेमकं वॉलेट विसरलोय. तुला दिसलं नाही का घरी..? "


ऊद्या नक्की. प्लीज. रागवू नकोस. मी केबिनबाहेर वेळ काढला. पावणेदोन मिनटात फोनवरचं बोलणं संपलं. नॉक करून आत गेलो...


पाकीटातल्या दोन गुलाबी नोटा बॉसच्या हातात कोंबल्या.


"थँक्स म्हणू नका सर.." पटकन् मागे फिरलो...


बॉसच्या चेह-यावरचा सुटकेचा आनंद, मी पाठीवरल्या डोळ्यांनी, डोळे भरून बघितला...*श


माझं पाकीट पुन्हा रिकामं...


तरीही मी डबलश्रीमंत...


साला श्रीमंतीचा माज करावा, तो रिकाम्या पाकिटांनी... भरल्या पाकीटात ती मजा नाही...


व्हाट्सअप च्या माध्यमातून या कथा माझ्यापर्यंत आलेल्या त्या जशा आहेत तशा तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत.