* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: टिबुकली / Tibukli

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/11/26

टिबुकली / Tibukli

(परिचय : टिबुकली आकारानं कबुतराएवढी.गुबगुबीत.भुरा रंग.पोट कोशा रंगाचे.लहान टोकदार चोच.बिना शेपटीचा पाणथळ पक्षी.विणीच्या हंगामात डोके व मान गडद उदी तांबूस रंगाची.पंखांचा रंग तांबूस पिंगट.नर व मादी दिसायला सारखेच.झिलाण,तळी व बोडीतील पाणवनस्पतीत जोडीने अथवा थव्याने राहतात.नवेगाव तळ्यात पाहिलेल्या एका टिबुकली पक्ष्याच्या जोडीची ही कथा.)

उन्हाळा आला की नवेगाव बांध तळ्याकाठची हिरवीगार वनस्पती सुकू लागे.दिवसादिवसाला पाणी आटू लागे.पाणी आटलं की काळ्याभोर गाळाची जमीन उघडी पडे.सूर्याची प्रखर किरणं तळ्याच्या पृष्ठावर पडत.

त्याकडे पाहवत नसे. परावर्तित प्रकाशानं डोळे दिपून जात.अशा ह्या तापलेल्या उन्हात आठवण व्हायची ती श्रावण महिन्यातील हिरवळीची. पावसाच्या शिडकाव्याची.आणि पाहता पाहता चातकांचे थवे उंच आकाशातून पंख फडफडवीत उडताना आढळू लागायचे. त्यांचा टाहो रात्री-अपरात्री कानावर पडू लागायचा. आकाशही ढगांनी भरलेलं असायचं.आता लवकरच पावसाळा सुरू होणार याची खात्री पटायची.

अन् खरचं.पावसाला सुरुवात व्हायची.रात्री मी अंगणात उघड्यावर झोपलेला.वाऱ्यावादळासह पाऊस बरसायचा.मी अंगावर डोक्यापर्यंत पांघरुन घेऊन झोपी जायचा.अंगावर पावसाचे शितोंडे पडत.थोड्याच वेळात पांघरूण ओलं होई. अंगाला गार स्पर्श होई. पाऊस पडला की काळ्याभोर जमिनीतून हिरवे तृणांकुर बाहेर येऊ लागायचे आणि पाहता पाहता सारा आसंमंत हरित दिसू लागायचा.खिडकीजवळीच्या पलंगावर झोपून मी पावसाची शोभा पाही.त्याचा साद ऐकी.अन् साद ऐकता ऐकता श्रावणमास सुरू होई.

तळ्याचा काठ पुन्हा हिरवागार दिसू लागे.त्यातून पाणी डोकावू लागे.बेटासारख्या दिसणाऱ्या घरट्यात टिबुकली बसलेली असे.उंच वाढलेलं देवधान तिच्या घरट्यावर झुकलेलं असे.हिरव्या गादेतून थंडगार वाऱ्याची झुळूक वाहात असे.रानफुलं फुललेली असायची.वनस्पतींचा मंद मधुर गंधही सुखावून जाई.चंडोल पक्षी आनंदानं गात आकाशातून उडत असायचे रंगीबेरंगी मनोल्या चिवचिव करीत गात असायच्या.नाचऱ्या आपल्या शेपटीचा पंखा करून देवधानात नाचत नाचत गात असायच्या.

टिबुकली मात्र अजूनही घरट्यातील पाच अंड्यांवर बसलेली असायची.त्यांना घोळत असायची.मग पाठीवर मान विसावून डोळे मिटून स्तब्ध बसलेली दिसायची.

काही हातांवर जोडीदार तिचं संरक्षण करीत पोहत असायचा.माझ्या पायांची चाहूल लागताच धोक्याची सूचना देणारा आवाज काढायचा.मादी सावध व्हायची.

मोठ्या घाईनं चोच व पायांनी गवतपाला टाकून अंडी झाकी.लगेच ती पाण्यात उतरायची. डुबी मारून पोहत दूर जायची.बेटावरचं घरटं एखाद्या गवताच्या ढिगासारखं वाटे.अंडी तर अजिबात दिसायची नाहीत.मी दुर्बिणीतून काठावरून त्यांच्याकडेच पाहात असतो.यांचंही सारं लक्ष माझ्याकडेच असतं.मी दूर जाण्याची ते वाट पाहात असतात.मी दूर जातो.लपणात बसून त्यांच्याकडे पाहू लागतो.एकानं पाण्यात बुडी घेतली. घरट्याजवळ तरंग उठले.अन् थोड्याच वेळात चिमुकली मान दिसली.

त्यानंतर चेंडूएवढं तिचं शरीर वर आलं.थोडा वेळ तिनं आजूबाजूला जलविहार केला,अन् लगेच बेटावरील घरट्यात उडी घेतली.अंड्यांवरचा केरकचरा बाजूला सारला.पुन्हा अंड्यांची जुळवाजुळव केली,अन् त्यावर बसून ती अंडी उबवू लागली.पुन्हा बेटाभोवती तरंग उठले.तेवढ्यात घरट्याच्या काठावर उदी तांबूस रंगाचं डोकं दिसू लागलं.त्याच्या चोचीत चारा होता.मादीनं मान लांब करून हळूच तो प्रेमानं दिलेला घास चोचीत घेतला.तशी त्यानं पुन्हा बुडी घेतली.आपलं शरीर पाण्याखाली ठेवून नर मादीला भरवीत होता.

जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,,साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर

जवळजवळ वीस एकवीस दिवस हे नरमादी आळीपाळीनं घरट्यातील अंडी सतत उबवीत होते.मध्ये वारं वादळ व पाऊस येऊन गेला.अन् शेवटच्या दिवशी पाच काळीभोर चेंडूएवढी मखमली पिलं बाहेर आली.

अंगावर पांढरे ठिपके असलेली.त्या दिवशी सूर्याची कोवळी किरणं घरट्यावर पडली अन् आईच्या उबेतून बाहेर पडलेली काळ्या मानेची पाच पिलं मला दिसली.जवळच असलेल्या नरानं त्या पिलांना पाहिलं.नर दिसताच मादीनं घरटं सोडलं आणि ती नरासोबत पाण्यात उतरली.आता ती दोघं बेटाभोवती हळूवार आवाज काढीत पोहू लागली.ती त्यांना साद घालत होती.अन् ती बावरी पिलं त्यांच्याकडे धावली.धावताना पाण्यात पडली अन् लगेच पोहू लागली.दुसऱ्या दिवसापासून ती स्वतःच पाण्यात बुडी घेऊ लागली.पण लगेच ती पाण्यावर यायची.

घरट्यापासून दूर जाऊ लागली की ती आईची पिसं चोचीनं धरून तिच्याबरोबर तरंगत असायची.

काही दिवसांनी आई त्यांना उडणाऱ्या माश्या कशा पकडाव्यात,देवधानावर,बसलेले कृमिकीटक कसे टिपावेत, पारळाचं बी कसं खावं याचे पाठ देऊ लागली.

एकदा तिनं असंच पिलांना मासेमारीसाठी पाण्यात आणलं. ती छोटा मासा चोचीत पकडून त्यांच्यासमोर पुन्हा पाण्यात टाकायची. पिलं माशाला पकडू शकली नाहीत तर थोड्याच अंतरावर गेलेल्या त्या माशाला ती पुन्हा पकडायची. त्यांच्यासमोर तो टाकायची आणि तो त्यांना पकडायला लावायची. अशा रीतीनं पिलं मासे पकडण्यात प्रवीण होईपर्यंत ती त्यांना सतत मासे । पकडण्याचे पाठ देऊ लागली.त्या पिलांना पाण्यात तरंगण्यात मोठी मौज वाटू लागली,नुकतीच अंड्यांचं कवच फोडून बाहेर आलेली ती पिलं,पण आता त्यांना आभाळाचं कवच अपुरं पडू लागलं. त्यांना स्वैर व स्वच्छंद विहार करण्यात अपूर्व आनंद मिळू लागला.

त्यांना जगाचा काहीच अनुभव नव्हता.त्यांना माहीत नव्हतं की हे जग सुखदुःखानं भरलेलं आहे.त्यांना अनेक रहस्ये अजून समजायची होती.अल्लड अन् अजाण पिलांना संकटांची जाणीवही नव्हती.पण त्यांच्या अवतीभोवती संकटेच संकटे होती.सर्वत्र शत्रूच शत्रू होते.म्हणून नरमादी दोघंही अगदी सावधचित्त होते.जरा कुठं खुट्ट झालं की नर धोक्याची सूचना देई.सूचना मिळताच मादी आणि पिलं पाण्यात बुडी मारायचे.

ढांगोळ्या पायाचा सुकाणू करून ती आईजवळ पोहोचायची.एकामागून एक ते मखमली पाच गोळे तिच्या पाठीवर आरूढ व्हायचे.ती त्यांना आपल्या पंखात घ्यायची अन् पिलांसकट पाण्यात बुडी मारायची, त्यांना देवधानात लपविण्यासाठी.

श्रावणात क्षणात ऊन पडतं तर क्षणात पाऊस.जिकडे तिकडे पाखरांचं संगीत सुरू असतं.जलवनस्पतींना फुलांचा बहार आलेला असतो.पिलंपण दिवसा दिवसानं वाढत असतात. आता ती मातापित्यांपासून दूर जातात.

स्वतंत्रपणे नाचू बागडू लागतात.पण त्यांना आजूबाजूच्या संकटांची जाणीव नसते.एका सकाळी ते सारं पक्षिकुळ शांत पाण्यात चरत चरत जलविहार करीत होतं.इतक्यात नरानं धोक्याची सूचना दिली.पाहता पाहता एक शावक पाण्याखाली दिसेनासं झालं.हुदाळ्यानं ऑटरनं-त्याला आत ओढलं होतं. काही तरंग दिसले. ते उत्तरोत्तर वाढत होते अन् देवधानात विरून जात होते.

पिलं मोठी झाली.ती स्वतःची काळजी घ्यायला आता समर्थ झाली होती.एक दिवस मादी सतत पाण्यात डुंबत होती.वर येत होती.पाहिलं तर ती पुन्हा घरटं बांधत होती.तिनं अंडी घातली.एका महिन्यानंतर पुन्हा चार पिलं दिसली.आता पूर्वीची ती मोठी झालेली पिलं आपल्या भावंडांची काळजी घेत त्यांना वाढविण्यात मातापितरांना साहाय्य करीत होती.

समाप्त...