मानवी जीवनात कळत-नकळत प्रवेशणारी संस्था म्हणजे रुग्णालय-हॉस्पिटल ! आज घडीला अत्यंत वादग्रस्त, परंतु तितकीच गरजेची असणारी ही संस्था प्राचीन काळापासून दुःखमुक्तीचे एक केंद्र म्हणून कार्यरत आहे. जीवक व सुश्रुताच्या परंपरेतील अनेक डॉक्टर आजही त्याच निष्ठेने आपले सेवा कार्य करताहेत. त्यांना अनेक कुशल अकुशल तंत्रज्ञांची मदत होत आहे. परंतु अंतिमतः ही सारी माणसेच आहेत. गुण आणि दोष असणारी, स्वतःची सुख-दुःखे, व्यथा-वेदना असणारी.आपण या सर्वांकडे एका रुग्णाच्या किंवा ग्राहकाच्या नजरेने पाहतो.परंतु डॉ. रवींद्र श्रावस्ती हे हॉस्पिटलकडे दुःखमुक्तीचे जीवनदायी केंद्र म्हणून पाहतात. व्यथा-वेदना घेऊन येणारी व ती दूर करण्यासाठी अहोरात्र झटणारी माणसे नीटपणे समजून घेऊन, शब्दांतून मांडण्याचे गुंतागुंतीचे काम येथे लेखकाने ललित स्वरूपात केले आहे. या लेखनात बुद्धाचा दुःख स्वीकारण्याचा आणि त्यातून मुक्त होण्यासाठी झगडण्याचा विचार आहे आणि त्याला कारुण्याच्या भावनेची जोड आहे. म्हणून हे लेखन मेडिको व नॉनमेडिको वाचकांसाठी महत्त्वपूर्ण व अनुभवसंपन्न बनविणारे आहे.
१. रुग्णांचा कारखाना उर्फ मेल मेडिकल वार्ड
हा वार्ड सदा गजबजलेला. कितीही स्वच्छ केले तरी घाणेरडा होणारा. रोगगच्च वार्ड. रोगाचे प्रकार तर किती? प्रचंड ! मोजदादच करता येणार नाही.
वेदनांचे प्रकारही भरपूर आणि त्याची जातकुळीही भिन्नच. आकांत, आक्रोश यांचे प्रमाण तर अतिप्रचंड ! हृदय तर धसका घेईलच. चक्क सारे शरीर धसकटून जाईल, उचकटून जाईल असे टाहो इथल्या गजबजलेल्या वार्डमधून बाहेर पडत असतात. मृत्यूची जा ये इथे हमखास चालू असतेच. त्यापेक्षा जगण्याची जिवंत चिवट लढाई इथे चालू असते. या वार्डचे श्वास चोवीस तास, १२ महिने, वर्षोन् वर्षे चालूच आहेत. अनेकांचे श्वास इथे गेले, तितकेच आलेही! पण या वार्डाने मात्र श्वासणे सोडले नाही. या वार्डाला कुलूप घातलेय असेही कधी झाले नाही. एखाद्या दिवशी या वार्डमध्ये कुणीच माणूस आला नाही, असेही कधी झाले नाही.
तर असा हा मेल मेडिकल वार्ड उर्फ पुरुष वैद्यकीय कक्ष. आत प्रवेश केल्या केल्या दोन चार बेडवर नाकात नळी घातलेले चार दोन रुग्ण हमखास दिसतीलच. चिक्कार दारू पिऊन बेशुद्ध झालेले किंवा पिकावर फवारण्यासाठी वापरतात ते 'रोगार'सारखे पातळ विष प्यायलेले रुग्ण ह्या बेडवर न चुकता दिसतातच.
दोन्ही प्रकारचे रुग्ण मोठमोठ्याने ओरडत असतात, शिव्या देत असतात, दंगा दंगा करत असतात. एक ओरडला की लगेच दुसरा ओरडतो. दुसऱ्याने शिवी दिली की, पहिला तितक्याच तत्परतेने शिवी हासडतो. दोघांची जुगलबंदी चाललेली असते. गंभीर वातारवणात तेवढीच लोकांची मौजमजा. दारू प्यायलेला
शुद्धीवर येत असताना दंगा करत असतो तर दुसरा विष प्यायलेला विषावर उतारा म्हणून दिलेल्या अॅटोपिनच्या ओव्हर डोसमुळे असंबंध बडबड किंवा शिव्या देत असतो. काही असो त्या दोघांच्या जुगलबंदीमुळे मेल मेडिकलमधील गंभीर वातावरण मिस्किल झालेले असते.
त्यापुढील पाच-सहा बेड तर जवळजवळ राखीवच । दारूच्या दुष्परिणामामुळे झालेले आजार घेऊन वावरणारे लोक या बेडवर विसावलेले असतात. पिवळे जर्द डोळे तसेच पिवळे झालेले शरीर असे रुपडे असलेले, लिव्हर खराब झाल्यामुळे कावीळ झालेले लोक. तिथेच कुठेतरी अॅडमिट असतात. चेहरा सुजलेला, हात पाय सुजलेले, पोटात पाणी भरलेले असे रुग्ण मिळतातच. दारू पिऊन पिऊन लिव्हर जेव्हा दगडासारखे होते, तेव्हा असे पाणी शरीरभर पाझरत राहते. सरकारी 'उपसा जलसिंचन योजने' सारखे. कितीही पाणी काढले तरी फुटलेले नळ पाझरतात तसे यांचे 'असायटिस' नावाचे पाणी पोटातून झरतच असते.
सलाईनची जाडजुड सुई पोटाच्या त्वचा व स्नायूतून आरपार घुसविल्यावर पोटाच्या पोकळीत साचलेले पाणी (Ascites) सलाईनच्या नळीमधून वाहू लागते. ते काचेच्या बाटलीत साठविले जाते. दररोज ४-५ लोकांच्या पोटांमधून असे पाणी काढावेच लागते. वाईट गोष्ट अशी की, दुसऱ्या दिवशी पोट पुन्हा तसेच पाण्याने तुडुंब भरलेले असते. कोयना धरण भरल्यासारखे. मग पुन्हा उपसा करा. जणू उपसा जलसिंचन योजना.
कुणीतरी या लोकांच्या सुटलेल्या पोटाला बघून खवचटपणे म्हणते Ever pregnant never delivered!
एके दिवशी मी एका वयस्कर 'अल्कोहोलिक ड्रिंकर'च्या पोटातील पाणी काढत होतो - ड्रेन करत होतो. का कोण जाणे मला बोलण्याची उबळ आली. मी त्याला विचारले, 'काय मामा, पानी कंच्या नदीचं? क्रिश्नेचं की पंचगंगेचं?'
मला वाटलं आजोबा उसळेल. लाखोली वाहील. त्यानं तसंच इरसाल उत्तर दिलं, 'पानी कोयनेचं हाय! धरणाचं नव्हं. व्हात्या नदीचं. घे हात धुन ! घे चुळ भरून !'
—-----
—-----
मघाच्या ४-५ कॉटच्या जागेतच कुठेतरी कावीळ मेंदूत घुसल्यामुळे बेशुद्ध झालेले रुग्ण अॅडमिट केलेले असतात, यांची स्थिती मात्र भयानकच, अतिशय गंभीर, मृत्यूच्या पावलांनी गजबजलेली ही कॉट, नाकातून जठरात सोडलेली नळी. त्यातून येणारे रक्त नावाचे काळपट पाणी. लघवी मार्गात घातलेल्या नळीतून येणारा युरीनचा पिवळाजर्द स्राव, पोटात तुडुंब घुसलेले पाणी. ते बाहेर काढावे तर आणखी शुद्ध हरपणार किंवा माणूस दगावणार. लिव्हरच्या ठिकऱ्या झालेल्या आणि मेंदूच्या साऱ्या संवेदना बधीर झालेल्या. मध्येच आकडी येईल, झटके येतील, मध्येच आरडाओरड ऐकायला येईल. ब्लड, अॅल्बुमिन, डेक्स्ट्रोज, बी कॉम्प्लेक्स, लॅक्ट्युलोज कायबाय चालू असते. शून्य उपयोग आणि एक दिवस भयाण मृत्यू माणसाचे गाठोडे करतो. गाठोड्यात बांधलेल्या त्याची तरुण बायको हंबरडा फोडते -
धन्या आता तुला कुटं शोधू ?
पाखरा तुला कुटल्या घरट्यात बघू ?
कुटं हुडकू रे, धन्या ?
वाद्या, कुटं बघू तुला, कुटं शोधू ?
काठी म्हनत नव्हतास. लोकांड म्हणत नव्हतास दना दना पाटीवर हानत हुतास. आता त्या पोरक्या पाटीवर कोन काठी हानणार रे, वासरा! आता चिपाड तर हानायला ये रे, लेकरा...'
(वासरू, लेकरू ही सारी विशेषणं नवऱ्यासाठीच बरं)
आता थोडं पुढं गेल्यावर कोपऱ्यात ३-४ बेड आहेत. भिंतीवर कसलेसे डाग आहेत. तसे बेडवरसुद्धा काळे, लाल, पिवळे डाग आहेतच. दुर्गंधी तर इथे सदाचीच ठाण मांडून असते. पॅरालिसीस उर्फ अर्धांगवायू झालेले रुग्ण इथे ठेवलेले असतात. हात हालत नाही, पाय हालत नाही, शरीर हालत नाही, बोलता येत नाही किंवा चाचरत बोलता येते. थोडे शुद्धीवर किंवा पूर्ण बेशुद्ध, असे रुग्ण. या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यापूर्वी अकिवाट, नागरमनोळी इथे यांना दाखवून आणलेले असतेच. त्यावेळेस एखादा माणूस चालत असतो तो इथे येईपर्यंत निश्चल झालेला असतो. बोलता माणूस 'अबोल' झालेला असतो किंवा शुब्बीवर असलेला माणूस बेशुद्ध झालेला असतो !
अंगारा-भंडारा असले 'प्राचीन आर्ट' ही कपाळावर विलसत असतात. गंडेदोरे, भंडाऱ्याची पेटी असले 'प्राचीन फॅशनेबल' आयटम कडोसरीस किंवा हातापायात, गळ्यात गुंडाळून त्यांना आणलेले असते. एवढे करून फरक पडलाच तर पडला म्हणून इथे आधुनिक दवाखान्यात आणलेले असते.
पीजी डॉक्टर येतो. तपासतो आणि 'स्ट्रोक झालाय' म्हणून सांगतो. सी.टी. स्कॅन करायला लागेल म्हणून सांगून 'रेफरल चिट' देऊन निघून जातो. प्राथमिक तेवढे उपचार सुरू केले जातात.
गंमत म्हणा किंवा ट्रॅजेडी म्हणा आता पैसे संपलेले असतात. दुसऱ्या तिसऱ्या दिवसाची वाट पहात ते निश्चेष्ट शरीर पूर्ण निदानाची आणि योग्य ट्रिटमेंटची वाट पहात बसते. कधीतरी सी.टी. स्कॅन होतो. त्याचा रिपोर्ट यायला अर्धा एक दिवस जातो. रिपोर्ट येतो तोही भल्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी दुपारी. मेंदूत रक्तस्राव किंवा मेंदूला रक्त पुरवठा नाही असा रिपोर्ट. मग खरी ट्रिटमेंट सुरू होते. तोपर्यंत बराच जिवंत मेंदू मेलेला असतो. महत्त्वाचा काळ (Crucial period) वाया गेलेला असतो. वाचलेला मेंदू थोडा थोडा काम करू लागतो. किंवा तोही थकून भागून कधीतरी मरून जातो. नंतर माणूस मरतो.
ज्या समाजाचा मेंदूच हरवलाय,तिथे माणसाचा मेंदू पॅरालाईज होणारच.योग्य उपचाराविना सडून जाणारच !
—--
—--
आता वार्डच्या त्या कोपऱ्यात पहा. दिसले? खोकलणारे, धापणारे लोक. नाकात ऑक्सिजनची नळी आणि भात्यासारखी धपापणारी छाती. हिरवा पिवळा कफ उर्फ बडका किडनी ट्रे मध्ये किंवा भिंतीच्या फरशीवर फेकलेला. इथलीही दुर्गंधी नाकातले संवेदनेचे केस जाळणारी. नाकालासुद्धा स्नायू असतात ते इथे आल्यावर कळते. छातीचे स्नायू एवढे दमतात की शरीराला श्वास घेण्यासाठी इतर स्नायूंची मदत घ्यावीच लागते. पोटाचे, मानेचे पुढील स्नायू: एवढेच काय नाकपुड्यांचे स्नायूही त्यासाठी वापरावे लागतात. जणू कुणीतरी नाक आणि तोंड दाबलेय! कुठून हवा येणार? कुठून ऑक्सिजन मिळणार? अशी अवस्था,
तर असे हे पेशन्ट, ऑक्सिजनसाठी क्षणक्षण तडफडणारे. त्यांची अवस्था बघवत नाही; त्यांना त्यांचे हाल सोसता सोसवत नाहीत. बाहेर हवा आहे; ऑक्सिजन आहे. पण तो योग्य तेवढा फुफ्फुसात शिरत नाही. फुफ्फुसांचा दगड झालाय न्यूमोनिया झालाय किंवा फुफ्फुस नावाच्या हवेच्या पिशवीला कातरणारा टी.बी. झालाय. किंवा ह्याच हवेच्या पिशवीला दाबणारे 'प्लुरल इफ्युजन' नावाचे पाणी किंवा 'एम्पायमा' नावाचा पू फुफ्फुसाच्या बाहेरील आवरणात दाटलेला असतो. जीव गुदमरून टाकणारे हे आजार. ऑक्सिजन वेळेवर लावला नाही तर जिवंतपणी मरण म्हणजे काय ते तेच जाणोत ! तेच सहन करू शकतात. नुसता तडफडणारा जीव ! पाण्यावाचून माशासारखा, ऑक्सिजनवाचून माणसासारखा !
पेशन्टच्या डोक्याकडचा कॉटचा भाग. त्यावर ठेवलेली लोखंडी कमान -त्या कमानीवर पाठ व मान ठेवून ऑक्सिजनसाठी धडपडणे म्हणजे काय असते हे त्या मानेला आणि त्या माणसालाच ठाऊक !
……..
…….
आता वार्डच्या अगदी दुसऱ्या कोपऱ्यात बघा. खंगलेले, काळेनिळे झालेले, इजिप्तच्या ममीसारखे देह झालेले रुग्ण कॉटवर झोपवलेत. एड्सने घेरलंय त्यांना. मुख्यतः २० ते ३० वयोगटातले रुग्ण आहेत हे. क्वचित एखादा ६०-७० चा. हा तसा अस्पृश्य भाग. इथे तसे फारसे कुणी फिरकत नाही. फिरकलेच तर रुग्णाला स्पर्श करण्याचे टाळतात. स्पर्श केलाच तर ग्लोव्हज् घालून, मास्क वापरून. एखादा सन्माननीय अपवाद असतो, नाही असे नाही. बाकींच्या दृष्टिकोनातून ते अस्पृश्य - अस्पृश्यच ते !
कुणाला वारंवार संडास लागले आहे कित्येक महिने कित्येक वर्षांपासून. कुणाचा तापच हटत नाही. कुणाच्या पोटात, छातीत, मणक्यात, मेंदूत पाणी झालेय. कुणाला टी.बी. झालाय. कुणाचे शरीरच खंगतेय. नुसता हाडांचा सापळा. मांस खरडलेय हाडाना. असे दिसतात ममीफाईड बॉडी! नाना प्रकार.
यांच्या सेवेशी तसे फुटकळ नातेवाईक. चार हात लांब राहून बोलणारे.
मॅरिड रुग्णांची बायको मात्र सदोदित सेवेला हजर असणारी, 'माझ्या नवऱ्याला वाचवा' म्हणून अजिजणारी, धडपडणारी. हाताला ग्लोव्हज् वा तोंडाला मास्क असलं काही न वापरता सेवाशुश्रूषा करणारी. दुर्गंधाने माखलेल्या बेडखाली, बेडजवळ बसून राहणारी किंवा रात्री-बेरात्री जीव थकला की तिथेच घाणीत झोपणारी. तिच्यासाठी जीव हळहळतो !
आश्चर्याची बाब म्हणजे त्यातल्या बऱ्याच बायका एचआयव्ही निगेटीव्ह । त्यांच्या शरीरात एचआयव्हीचा व्हायरस नाही. नवऱ्याच्या मात्र शरीरात एचआयव्ही. त्याने मौजमजा केली, गुण उधळले म्हणून त्याला एचआयव्ही. हे कळूनही त्या बिचाऱ्या त्यांच्यासाठी राबतात. भारतीय नारी तुम्ही ग्रेट !
इथले एड्सग्रस्त जिणे आणि मृत्यू दोन्हीही अपमानास्पद, लाजीरवाणे, नो सिम्पथी अॅट ऑल.
…..
…..
आता इथून थोडे बाहेर या. वार्डच्या दरवाजा लगत काही बेड आहेत. पांढरे फटफटीत. नखांचे चमचे झालेले, केसही पांडुरके धुरकटलेले. मक्याच्या केसासारखे भुरके. क्वचित डोळ्याभोवती काळी वर्तुळे. हातांच्या पेरांच्या मागच्या बाजूस काळी मेहंदी लावल्यासारखे डाग नकल पिग्मेंटेशन. ओठांच्या कोपऱ्यात जखमा, जीभ टकली बाल्ड किंवा त्यावर जखमांचे भूखंड जिऑग्राफीकल टंग. पूर्ण निस्तेज माणसे. केविलवाणी. आता मरतील की मग मरतील अशी. चार दोन पावले टाकली तरी धापतात. मटकन खाली बसतात किंवा चक्कर येऊन कोसळतात. पूर्वीपेक्षा दुपटीने पांढरी फिक्क पांढरी फटक पडतात. पांढरी जीभआपसुक बाहेर येतेच. डोळेही पांढरे केलेले असतातच. पण्डुरोग तो हा.
कुणालाही कणव येईल अशी यांची अवस्था.
इथे दोन दृश्ये कायम दिसतात.
दृश्य एक. काळे लालभडक रक्त असलेल्या रक्ताच्या बाटल्या. ते काळे भडक रक्त शरीरात चढविले जातेय. कधी तरी रिअॅक्शन येऊन हुडहुडणारा, धडधडणारा रुग्ण. अंगभर गांध्या येऊन सुजलेला रुग्ण. क्वचित तडतडून मरतो अशी रुग्णांची पोट्रेटस् नेहमी इथे तयार होतात.
दृश्य दोन.
कधी कधी रक्त का कमी झाले कळत नाही. निदानच लागत नाही. मग छातीच्या हाडाच्या मगजामधून मगजमिश्रित रक्त किंवा खुब्याच्या हाडामधून हाडाचा एक टवका तपासणीसाठी काढला जातो. त्याला बोन मॅरो अॅस्पिरेशन किंवा बोन मॅरो बायॉप्सी असे म्हणतात.
ही तपासणी करताना त्या जागी भूल दिली जाते. तरीही रुग्णाचे हाल होतेच. रुग्ण अगदी गुरासारखा ओरडतो. बॉब ठोकतो. तडफडतो.
खरे तर बोन मॅरो नव्हें बोंब मारो अॅस्पिरेशन (बायॉप्सी) असेच म्हणायला हवे. वेदनादायकच हा प्रकार, परंतु निदान करण्यासाठी, पेशन्टचा जीव वाचविण्यासाठी हे करणे भागच असते. असो.
आता आणखी काही गोष्टी सांगायला हव्यातच. तर हे एवढेच आजार नाहीत इथे भेटणारे, आणखी भरपूर आहेत. मलेरिया, टायफॉईड, हगवणीचे प्रकार, काविळीचे आजार, तापाचे असंख्य प्रकार आजारः हृदय, मेंदू, पोट, मज्जारज्जू, त्वचा, सांधे, डोळे, नाक, कान, घसा, दात.... कशाकशाचे म्हणून सांगावे.
हे कमी म्हणून की काय आंतरग्रंथींचे आजार आणि हो राहिलेच. कॅन्सर ! विविध अवयवांचे कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर, तर यांचेही रुग्ण इथे अॅडमिट असतात. जिथे बेड मिळेल तिथे किंवा जमिनीवर गादी टाकून. त्यामुळे या आजारांचे रुग्ण इतस्ततः विखुरलेले असतात. यांचीही संख्या प्रचंड असते. फक्त ते विखुरलेले असतात एवढेच.
कॅन्सरचा आजार तसा जीवघेणाच. निदान होते तेच मुळी अगदी उशिराने. त्यानंतर त्यावरील उपचार म्हणजे रोग परवडला, असे म्हणण्याची पाळी. उपचार प्रचंड महागडे. शस्त्रक्रियेचे उपचार म्हणजे कॅन्सरग्रस्त अवयव कुरतडणे किंवा तो अवयवच काढणे. विरुपता, विद्रूपता ठरलेली.
पहा औषधोपचार म्हणजे केमोथेरपी शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी औषधाने मारणे. वाळल्याबरोबर ओलेही जळते तसे कॅन्सरच्या पेशीबरोबर नॉर्मल पेशीही मारल्या जातात.
रेडोओथेरपी म्हणजे कॅन्सरग्रस्त अवयव जाळणे.
जीवन केविलवाणे! उपचाराने शरीराचे होरपळणे आणि मृत्यू वेदनादायक,
मृत्यू सहज, पुन्हा जिवंतपणा दुर्लभ !
कॅन्सरच्या मृत्यूचे एक बरे असते. लोक हळहळतात, फारच हळहळतात. सिम्पथी भरपूर, जीवन कृतार्थ वाटावे असा मृत्यू !
तर हा मेल मेडिकल वार्ड, इथे प्रत्येक भिंतीवर, कोपऱ्यात, दारात, वाराबाहेर, बसल्या ठिकाणी, झोपल्या ठिकाणी, खायच्या जागी पिचकाऱ्या दिसतील, पानाच्या, गुटख्याच्या. तंबाखूच्या.
अत्तराचे वास असतील तसेच दारूचे, माव्याचे भपकारेही असतील.
आजारांनी - आजाऱ्यांनी, माणसांनी गजबजलेला वार्ड. डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, वार्ड आया यांचा जीव जातो इथे सेवा देताना. जीव मेटाकुटीला येतो. पायाला चाके लावून फिरावे लागते वार्डभर. तरीही तक्रारी चालूच राहतात पेशन्टकडून, नातेवाईकांकडून. समाधानच होत नाही त्यांचे.
हलगर्जी करतात
लक्ष देत नाहीत
खिदळत असतात
कुणाचा पायपोस कुणास नाही
शिकावू डॉक्टरच बघतात
त्यांना काय कळते?
आमचा माणूस तुमच्या निष्काळजीपणामुळे गेला
बघून घेतो. सोडतच नाही कुणाच्या बाला
आमचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही.
…..
…..
असे शेरे. अशा धमक्या. नेहमीच ऐकायला मिळतात. अगदी वरपर्यंत तक्रार होते. पेपरमध्ये छापले जाते. विपर्यस्त बातम्या येतात. वातावरण ढवळून निघते. स्टाफमध्ये भीती. डॉक्टरांमध्ये दहशत. बरेचसे.
रुग्ण अॅडमिट होतच राहतात. तेच ते पुन्हा पुन्हा घडत राहते. इतिहास घडत राहतो. 'बि'घडत राहतो. रणांगण तेच. पात्रे बदलतात. गात्रे बदलतात.
पुन्हा तेच
पळापळ, गडबड गोंधळ
धुमश्चक्री.
धुमाकूळ.
---
आदिम दु:खाचे मुक्तिस्थानक हॉस्पिटल, डॉ. रवींद्र श्रावस्ती,नाग-नालंदा प्रकाशन,प्रकाशक-त्र्यंबकेश्वर मिरजकर.
नमस्कार वाचकांनो.
आपलं या पुस्तक प्रवासात स्वागत.वरील पुस्तक क्रमशः प्रकाशित करीत आहे.विजय गायकवाड.