* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/७/२३

लिओनार्डो डी व्हिन्सी - भाग - २

आपण पाहिले की,लिओनार्डो हा अत्यंत स्वयंभू व अभिजात असा कलावान होता.त्याच्या कृतीत अनुकरण नाही.तो म्हणे,"आपण निसर्गाचे अनुकरण करावे,दुसऱ्या कलावंताचे करू नये." ग्रीक हे उत्कृष्ट कलावंत होते.

कारण ते निसर्गानुकारी होते.पण रोमन कलावंत दुय्यम दर्जाचे वाटतात.कारण,निसर्गाचे अनुकरण करण्याऐवजी त्यांनी माणसांचे - ग्रीकांचे अनुकरण केले.जुन्या ग्रीक कलावेत्त्यांत जी प्रतिभेची ज्वाला होती,ती लिओनार्डो -

मध्ये होती. लिओनार्डो जीवनातून स्फूर्ती घेई.कधीकधी तर तो जीवनाच्या पलीकडेही जाई.जीवनात नसलेलेही त्यांत ओतून तो अधिक सौंदर्य निर्मी. मोनालिसाची जी प्रतिकृती त्याने काढली आहे, तीत किती नाजूकपणा,

किती कोमलता,किती सुंदरता व एक प्रकारचीप्रभुशरणता

आहे.! मूळच्या खऱ्या मोनालिसाच्या चेहऱ्यात या साऱ्या भावना क्वचितच असतील.हे चित्र काढताना लिओनार्डोने निसर्गाचे अनुकरण केले आहे असे वाटते.त्या मानवी मुखमंडलावर त्याने इतकी मधुरता रेखाटली आहे आणि इतका चांगुलपणा उमटविला आहे,याचे कारण त्याच्या हृदयातच अपार साधुता,अपार मधुरता होती.


फिडियसच्या कलेचा आत्मा जसा लिओनार्डोजवळ होता,तसे त्याच्याजवळ सेंट फ्रेंन्सिससचे हृदयही होते.तो जीवनाकडे दुःखी स्मिताने पाहतो.त्याला मानवांची दुःखे पाहून त्यांची करुणा येई;पण त्यांचा मूर्खपणा पाहून तो स्मित करी.कधीकधी स्मिताचे परिवर्तन मनमोकळ्या हास्यातही होई.या बाबतीत ग्रीक लेखक रिस्टोफेन्स याच्याशी त्याचे साम्य आहे.आपण असेही म्हणू शकू की,लिओनार्डो हा रेखा व रंग यांचा रिस्टोफेन्स होता.ग्रीक रिस्टोफेन्स शब्दसृष्टीतील तर हा रंगसृष्टीतील.त्या ग्रीक नाटककाराप्रमाणे मानवी जीवनाच्या हास्यरसात्मक नाटकातील जे अधिक हास्यास्पद प्रकार दिसत,त्यांवर दृष्टी टाकणे त्याला बरे वाटे. जीवनातील नाना प्रकारचे हास्यास्पद चेहरे त्याने आपल्या नोटबुकात काढले आहेत.

त्याची नोटबुके अशा चेहऱ्यांनी भरलेली आहेत.


कधीकधी तो शेतकऱ्यांना आपल्या घरी बोलावी व गोष्टी सांगून त्यांची हसवूनहसवून मुरकुंडी वळवी.हसताना त्यांचे चेहरे निरनिराळ्या प्रकारचे होत; ते पाहून तो लगेच कागदाच्या तुकड्यांवर ते टिपून घेई व नंतर आपल्या अमर स्केचबुकांत त्या चेहऱ्यांना तो अमरत्व देई.


अपूर्व अशा परिस्थितीत मानवी भावना कशा दिसतात हे पाहण्याचे लिओनार्डोला जणू वेडच होते! ज्यांचा शिरच्छेद व्हायचा असे,अशा गुन्हेगारांचे चेहरे काढण्यासाठी तो तास न् तास बसे व त्यांच्या मरणान्तिक भावना रेखाटत असे; पण त्या मरणोन्मुखांची करुण मुखे रंगविताना त्याला आसुरी आनंद मात्र होत नसे.तो त्या वेळी शास्त्रीय दृष्टीने ते भावनांचे आविष्कारण पाहत असे.तो जणू मानसशास्त्राचा अभ्यास करी व त्यावर रेखारूप निबंध लिही.तो कलावान होता. जीवनाची व मरणाची प्रत्येक स्थिती,प्रत्येक दशा अभ्यासावयाची जिज्ञासा त्याला असे.

कलावान या नात्याने तो अभ्यास करी;पण 'मनुष्य' या नात्याने त्याने जीवनालाच गौरविले आहे व मरणाला धिक्कारले आहे.त्याचा चरित्रलेखक व्हासारी लिहितो, "जेथे पाखरे विकली जात,त्या जागी तो जाई;आपल्या हातांनी पिंजऱ्यातील पक्षी घेई,त्यांची मागण्यात येई तितकी किंमत देई व नंतर त्यांना सोडून देऊन त्यांचे स्वातंत्र्य त्यांना परत देई ! "


त्याला प्राणिमात्राबद्दल अनुकंपा वाटे,प्रत्येक जीव पवित्र वाटे.तो शाकाहारी झाला.आपण जर प्राणी निर्मू शकत नाही तर त्यांना ठार मारण्याचा आपणास काय अधिकार? तो लिहितो, "कोणत्याही प्राण्याचा जीव घेणे ही अत्यंत अमानुष गोष्ट आहे.रागाने अथवा मत्सराने आपण कोणाचा प्राण घ्यावा अशी आत्म्याची खरोखरच इच्छा नसते.ज्याला प्राणांची किंमत वाटत नाही,ज्याला दुसऱ्याच्या जिवाची पर्वा नाही,तो जिवंत राहण्यास अपात्र नव्हे काय ?"


लिओनार्डो स्वानुभवाने बोलत होता.आपण कशाच्या जोरावर हे असे बोलू शकतो,हे तो जाणत होता.

जीवनातील दुर्दैव,करुणा,विरोध व क्रूरता या गोष्टी त्याने स्वतः पाहिल्या होत्या.लुडोव्हिको स्फोर्झाच्या दरबारात व नंतर सीझर बोर्डिआ याच्या राजवाड्यात त्याला दिसले की,अत्यंत क्षुद्र स्वार्थासाठी व क्षुद्र कारणांसाठी माणसे माणसांची कत्तल करीत असतात.तो मानवातील सौंदर्याचा उपासक होता व म्हणून तो कलावान झाला.

पण मानवातील दुष्टता व जंगलीपणा पाहून तो तत्त्वज्ञानी झाला.


लिओनार्डोचे तत्त्वज्ञान सर्वसंग्राहक आहे. तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक संप्रदायात जे जे चांगले दिसले ते ते सारे त्याने घेतले.सर्व ठिकाणचे उत्कृष्ट विचार घेऊन त्याने स्वत:चे तत्त्वज्ञान उभारले जीवन-मरणासंबंधीचे लिओनार्डोचे विचार सुसंबद्ध नाहीत.त्याच्या स्फुट व विस्कळीत विचारांना 'दर्शन' किंवा 'मीमांसा' म्हणता येणार नाही.

त्याने टीपा,टिप्पण्या लिहिल्या.त्याच्या पाच हजार पृष्ठांत सर्व काही संक्षेपाने आले आहे. 


तो डाव्या हाताने लिही,म्हणून त्याचे बरेचसे लिखाण लागत नाही.तसेच तो आपले इटॅलियन अक्षर हिब्रू व अरेबिक याप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिही.

लिओनार्डोच्या तत्त्वज्ञानात्मक सूत्रांची नीट व व्यवस्थित मांडणी अद्यापि कोणी केलेली नाही.पण त्याच्या इतस्तत: विखुरलेल्या विचारांतून स्टोइकांची धैर्यशीलता व ख्रिस्ताची मधुर सौम्यता यांचे मिश्रण आपणास आढळून येते.लिओनार्डो चर्चचा सभासद नव्हता;पण तो येशूचा अनुयायी होता.त्याने काढलेल्या ख्रिस्ताच्या चित्रांतील ख्रिस्ताचे मुखमंडल रंगविताना ख्रिस्ताचा आत्मा आपण ओळखला आहे,असेच जणू तो दाखवीत आहे.पण त्याने ख्रिस्ताचे मुख तेवढेच नीट रंगविले असे नाही, तर ख्रिस्ताचे विचारही सहानुभूतिपूर्वक समजून घेतले होते.तो ख्रिस्ताप्रमाणे,स्टोइक बंधूंप्रमाणे, स्वतःची दुःखे समाधानाने व सहजतेने सहन करी;तो त्यांचा बाऊ करीत नसे.दुसऱ्यांच्या दुःखांविषयी तो सहानुभूती दाखवी.शत्रूंचा द्वेष व मित्रांचा मत्सर यांमुळे त्याला बराच त्रास होई. मायकेल एंजेलो हा त्याचाच समकालीन महान चित्रकार,

पण लिओनार्डोच्या कलेकडे तो सहानुभूतीने बघत नसे; व त्याचा सार्वजनिकरित्या अपमान करण्याची एकही संधी गमावीत नसे.लिओनार्डो मात्र हे सर्व अपमान सोशी,

धीरोदात्ततेने सहन करी.तो आपल्या हस्तलिखितात एके ठिकाणी लिहितो, "कपड्यांमुळे थंडीपासून बचाव होतो,तसा सहनशीलतेमुळे दुसऱ्यांनी दिलेल्या त्रासापासून बचाव होतो.थंडी वाढेल तसतसे अधिकाधिक कपड़े अंगावर घातल्यास थंडी काही करू शकणार नाही;तद्वतच लोक तुमच्या बाबतीत अधिकाधिक अन्याय करू लागले तर अधिकाधिक सहिष्णू व सहनशील बना.म्हणजे त्या अन्यायांनी व निंदा अपमानांनी तुमचे मन त्रस्त होणार नाही व त्यांची - शक्ती नष्ट होईल."व्यक्तींचा मूर्खपणा सहन करायला तो सिद्ध होता.पण मानवजातीचा मूर्खपणा पाहून मात्र त्याला तिरस्कार वाटे.तो एके ठिकाणी लिहितो, 'मानवा,तुझ्या जातीविषयी तुला काय वाटते? मानवजातीची मूर्खता व तिचा टोणगेपणा पाहून तुला लाज नाही वाटत?"


पोकळ मानसन्मानांसाठी सदैव आपसात झगडणारे राजे व सरदार पाहून त्याला गंमत वाटे.त्याचे आश्रयदाते राजवैभवाच्या कलेत तज्ज्ञ होऊ पाहत होते;पण लिओनार्डो कलेच्या राजवैभवात - भक्तिप्रेमात रंगला होता.त्याला जीवनाचा खरा - आनंद सौंदर्यातच सापडला. इतर सारे खटाटोप 'मृगजळापाठीमागे लागण्याप्रमाणे फोल' असे तो म्हणे. (Koheleth प्रमाणे) महत्त्वाकांक्षेत अर्थ नाही. आशा शेवटी निराशाच निर्मिते.तो लिहितो, "इच्छापूर्तीपेक्षा इच्छाच अधिक गोड असते. कीर्तीसाठी धडपडत असता स्वत:ची मान व दुसऱ्याच्या माना मोडून घेणे हे हास्यास्पद होय. झाडावर असताना गोड वाटणारे फळ तोंडात गेले म्हणजे कडू लागते.आपल्या शक्तीच्या मर्यादा ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. फार मोठ्या ध्येयाची आशा धरणे मूर्खपणाचेच नव्हे;तर धोक्याचेही आहे.आपल्या बुद्धीच्या शक्तीनुसार आपण आपल्या महत्त्वाकांक्षेचे मोजमाप ठेवावे;आपल्या आशा- आकांक्षा त्या पूर्ण करणाऱ्या आपल्या शक्तीच्या पलीकडच्या असू नयेत.ज्यांची इच्छा आपण करतो ते प्राप्त होतेच असे नसल्यामुळे मिळू शकेल त्याचीच इच्छा आपण करू या.


इच्छा गोड असते; पण पूर्ती कडू असते, दुःखदायी असते.अशी कोणतीही निर्दोष देणगी नाही की जिच्यासाठी खूप कष्ट पडत नाहीत.हालांशिवाय,दुःखा-

शिवाय देणगीच नाही.लिओनार्डोसारख्या कलावंताच्या बाबतीत तर हे अधिकच सत्यार्थाने खरे आहे.कलावंताला अधिक निर्मिता येते,अधिक प्राप्त करून घेता येते;कारण तो दुःखही खूप सोसतो.ग्रीक कवींची अशी एक मीमांसा होती की,ज्ञान दुःखातून व वेदनांतूनच संभवते.जीवनाचा गंभीर अर्थ त्यांना समजला होता.म्हणूनच त्यांनी असा प्रचार मांडला. (Pathei Mathos). आपण सोसण्यास तयार असतो;म्हणूनच आपण शिकू शकतो.आपणास असलेल्या मृत्यूच्या जाणिवेमुळेच आपण जीवनाचा अर्थ समजू शकतो.


लिओनार्डोला जीवनाचा खोल अर्थ नीट समजला होता;कारण तो मृत्यूशी नीट परिचित होता,मृत्यूचा अर्थ त्याने पूर्णपणे ओळखला होता.त्याला वाटे की,मृत्यू मोठा फसव्या आहे. कधीही पूर्ण न होणाऱ्या आशांची आमिषे दाखवून फसविणे हेच मृत्यूचे काम ! जो भविष्यकाळ कधीही येणार नाही,त्याची आशा दाखवून मृत्यू फसवीत असतो.तो म्हणतो, "आपण नेहमी भविष्याची आशा करीत असतो; पण भविष्य आपल्यासाठी एकच निश्चित अशी गोष्ट ठेवीत असते व ती म्हणजे सर्व आशांचे मरण ! आपले सारे जीवन म्हणजे मरणाची तयारी.मी जगण्यासाठी शिकत आहे असे मला वाटे; पण ते शिकणे वस्तुतः मरण्यासाठीच होते."


पण लिओनार्डो जे जे भोगावे लागे,ते ते एखाद्या स्टोइकाप्रमाणे शांतीने व हसतमुखाने सहन करी.मृत्यूचे शेवटचे बोलावणे आले,तेव्हा तो दमल्याभागलेल्या मुलाप्रमाणे झोपी जाण्यास तयार होता.विश्रांतीवर त्याचा हक्क होता. मरणापूर्वी थोडाच वेळ त्याने आपल्या मित्रास लिहिले,"एखादा दिवस चांगल्या कामात गेला, सार्थकी लागला,म्हणजे जशी झोप सुरेख लागते, तद्वत् ज्याने आपले जीवन नीट व्यतीत केले आहे,त्याला मरताना आनंद होतो."तो वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी वारला.त्याचा मित्र मेल्सी लिहितो,"त्याचा वियोग प्रत्येकाला दु:सह आहे. त्याच्या मरणामुळे सर्वांना दुःख होत आहे.असा आणखी एखादा पुरुष निर्माण करणे निसर्गाच्या शक्तीच्या बाहेरचे आहे." लिओनार्डोच्याच शब्दांत सांगायचे झाले तर,विभूतिमान पुरुषांविषयी त्याने काढलेलेच शब्द आपणास त्यालाही लावता येतील."तो मानवात जन्मलेला देवदूत होता. ' "


१३.७.२०२३ या लेखातील शेवटचा दुसरा भाग..


समाप्त…

१३/७/२३

कला,विज्ञान-वेत्ता लिओनार्डो डी व्हिन्सी

समुद्राच्या अज्ञात मार्गांचे संशोधन करण्यात कोलंबस गुंतला असता,दुसरा एक मोठा प्रगतीवीर मानवी बुद्धीच्या व मनाच्या अज्ञात प्रदेशात प्रकाश पसरीत जात होता.

अज्ञात क्षेत्रात रस्ते तयार करीत होता.या अपूर्व विभूतीचे नाव लिओनार्डो डी व्हिन्सी.नवयुगातील संस्कृतीचा हा अत्यंत परिपूर्ण असा नमुना होता,असे म्हटले तरी चालेल.

त्याची सर्वगामी बुद्धिमत्ता हे त्याच्या पिढीतील एक महदाश्चर्य होते. "एवढ्याशा लहान डोक्यात इतके ज्ञान मावते तरी कसे?" असे मनात येऊन लोक त्याच्याकडे बघत राहत व त्यांचे आश्चर्य अधिकच वाढे.


आजचे आपले युग विशिष्ट क्षेत्रात पारंगत होण्याचे आहे.

अशा स्पेशलायझेशनच्या काळात लिओनार्डोच्या अपूर्व बुद्धिमत्तेची अनंतता लक्षात येणे जरा कठीण आहे.

त्याच्या सर्वकष बुद्धीची आपणास नीट कल्पनाही करता येणार नाही.लिओनार्डोने जे जे केले ते पहिल्या दर्जाचे केले.कुठेही पाहिले तरी तो पहिला असे.तो जे काही करी,ते उत्कृष्टच असे.सारे जगच त्याचे कार्यक्षेत्र होते.

अमुक एक विषय त्याने वगळला असे नाही.जगातील सौंदर्यात त्याने नवीन सौंदर्य ओतले.जगातील सौंदर्याची गूढता समजून घेण्याची तो खटपट करी.तो चित्रकार होता, शिल्पकार होता,इमारती बांधणारा होता, इंजीनियर होता,वाद्यविशारद होता,नैतिक तत्त्वज्ञानी होता.त्यांच्यात सारे एकवटलेले होते. साऱ्या कला व शास्त्र मिळून त्याची मूर्ती बनली होती.मरताना अप्रसिद्ध अशी पाच हजार पृष्ठे तो मागे ठेवून गेला.या पाच हजार पृष्ठांपैकी पन्नास पृष्ठांकडेही आपण किंचित पाहिले तरी त्याच्या मनाची व्यापकता आपणास दिसून येईल.त्या पन्नास पृष्ठांत लिओनार्डोने पुढील विषय आणले आहेत;प्राचीन दंतकथा व मध्ययुगीन तत्त्वज्ञान, समुद्राच्या भरती-ओहोटीची कारणे, फुफ्फुसांतील हवेची हालचाल,पृथ्वीचे मोजमाप, पृथ्वी व सूर्य यांमधील अंतर,घुबडाची निशाचरत्वाची सवय,मानवी दृष्टीने भौतिक नियम,वाऱ्यात वृक्षाचे तालबद्ध डोलणे, उडणाऱ्या यंत्राचे स्केच,मूत्राशयातील खड्यावर वैद्यकीय उपाय,वाऱ्याने फुगविलेले कातड्याचे जाकीट घालून पोहणे,प्रकाश व छाया यांवर निबंध,

क्रीडोपवनाचा नकाशा,नवीन युद्धयंत्रे, सुगंध बनविण्याच्या पद्धतीचे टाचण,स्वतंत्र भौमितिक सिद्धांताची यादी,

पाण्याच्या दाबाच्या शक्तीचे प्रयोग,पशुपक्ष्यांच्या सवयीचे निरीक्षण-परीक्षण,निर्वाततेवर निबंध,शक्ती म्हणून वाफेचा उपयोग करण्याची योजना,नवीन म्हणींवर प्रकरण व चंद्राच्या रचनेसंबंधी माहिती.


लिओनार्डोच्या पाच हजार पृष्ठांपैकी पन्नासच पृष्ठे आपण घेतली,तरी त्यात(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,

अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन) आलेल्या अनेक विषयांपैकी फक्त एकदशांशच वरच्या यादीत आलेले आहेत.यावरून या पाच हजार पृष्ठांत किती विषयांवर टीप-टिप्पणी आल्या असतील, त्याची कल्पनाच करणे बरे.या शेकडो विषयांत आणखी पुढील कलानिर्मितीची भर घाला; - अत्यंत निर्दोष असे मोनालिसा पोट्रेट,'शेवटचे जेवण',हे अत्यंत सुंदर चित्र आणि त्या काळात आठवे आश्चर्य मानला जात असलेला,त्याने तयार केलेला घोड्यावर बसलेल्या स्फोझचा पुतळा.असा लिओनार्डो होता.त्याच्या बुद्धीची वा प्रतिभेची खोली येईल का मोजता ? त्याच्या खोल बुद्धीत व प्रतिभेत येईल का डोकावता?


निसर्गाला क्षुद्र मानवाबरोबर सतत प्रयोग करीत राहिल्यामुळे कंटाळा येत असेल व म्हणून तो मधूनमधून एखादा खराखुरा मनुष्य निर्माण करतो.लिओनार्डो हा असा खराखुरा मनुष्य होता.फ्लॉरेन्समध्ये सेर पिअरो ॲन्टोनिओ नावाचा वकील होता, त्याचा अनौरस पुत्र लिओनार्डो.हाॲन्टोनिओ व्हिन्सी किल्ल्याच्या टस्कन टेकड्यांत राहत असे.सभोवतालचे दगडाळ रस्ते पाहून लिओनार्डोच्या मनावर परिणाम झाला असेल.टेकड्यांवर होणाऱ्या छाया प्रकाशांच्या खेळांचाही त्याच्या आत्म्यावर खूप परिणाम झाला असेल,लिओनाडोंचे मन, त्याची बुद्धी व त्याचा आत्मा त्या निसर्गावर पोसले जात होती.

लहानपणी लिओनार्डो अतीव सुंदर होता.त्याचे लावण्य पाहून सारे दिपून जात. त्याचे केस सोनेरी होते.तो अंगात गुलाबी रंगाचा झगा घाली.तो जणू मेघातून खाली उतरलेला एखादा देवदूतच भासे! आणि तो गाणे तरी किती सुंदर गाई!जणू गंधर्वच स्वर्गातून उतरलासे वाटे! अगदी लहानपणीच तो फ्ल्यूट वाजवावयास शिकला.

बापाकडे येणाऱ्या पाहुण्यांना तो गाऊन दाखवी;पण गाताना व वाजविताना मूळच्या शब्दांत तो सुधारणा करी व संगीतात नावीन्य ओती,त्यायोगे पाहुणे चकित होत ! पण केवळ संगीतातच अपूर्वता दाखवून लिओनार्डोचे समाधान झाले नाही.त्याने मानवी विचाराच्या प्रत्येक क्षेत्रात पारंगत व्हायचे ठरविले;व तो त्यासाठी प्रयत्न करू लागला.लिओनार्डोचे मन गणिततज्ज्ञाचे होते, बोटे कुशल यंत्रज्ञाची होती,आत्मा कलावंताचा होता. (हृदय कलावंतांचे होते,बुद्धी गणितज्ञाची होती,बोटे मेकॅनिकची यंत्रज्ञाची होती.) त्या काळी ॲन्ड्री डेल व्हेरोशिया हा प्रसिद्ध - कलावंत होता.तो चित्रकार,शिल्पकार, मूर्तिकार होता.त्याच्या कलाभवनात लिओनार्डो वयाच्या अठराव्या वर्षी इ.स. १४०० मध्ये शिरला आणि थोड्या वर्षांतच त्याने या तिन्ही कलांत आपल्या गुरूला मागे टाकले.

वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्याने मिलनच्या ड्यूकला एक पत्र लिहिले.या पत्रात त्याने आपणाला शांतीच्या कला व युद्धाची शस्त्रास्त्रे यांचा मिलनमधील मुख्य डायरेक्टर नेमावे,अशी मागणी केली होती. या ड्यूकचे नाव लुडोव्हिको स्फोझ.या पत्रात लिओनार्डो ने आपल्या अंगच्या गुणांचे वर्णन केले आहे.'हे पत्र लिहिणारा एक तर अपूर्व बुद्धीचा तरी असला पाहिजे,नाही तर मूर्ख तरी असला पाहिजे असे कोणालाही वाटले असते,' असे जीन पॉल रिक्टर म्हणतो.हा आश्चर्यकारक तरुण,ड्यूकला साध्या व स्पष्ट शब्दांत लिहितो, "शत्रूचा पाठलाग करताना बरोबर घेऊन जाता येतील असे पूल मी बांधून देऊ शकेन.

तसेच शत्रूचे पूल मी नष्ट करू शकेन.मी नद्या व दलदली बुजवू शकेन,कोरड्या करू शकेन, दगडी पायावर न बांधलेला कोणताही किल्ला मी उद्ध्वस्त करू शकेन.मी नवीन प्रकारची तोफ बनवू शकेन,नद्यांच्या खालून आवाज न करता बोगदे कसे बांधावे हे मी शोधून काढले आहे.


शत्रूवर हल्ला करण्यासाठी आच्छादित रणगाडे कसे बांधावेत हे मला माहीत आहे.पाण्यातून लढण्याची,

बचावाची व चढाईची शस्त्रे करण्याची आश्चर्यकारक योजना माझ्याजवळ आहे.तद्वतच शांततेच्या काळात मी शिल्पकामांत कोणाचीही बरोबरी करू शकेन,

चित्रकलेतही उत्तमोत्तमांच्या तोडीचे काम मी करू शकेन आणि तुमच्या (स्फोर्झाच्या) कीर्तिमान घोड्यावर बसलेला पुतळा जगात कोणीही पाहिला नसेल,इतका सुंदर मी करू शकेन.


त्या तरुण लिओनार्डोला जवळच्या वेड्यांच्या दवाखान्यात न पाठविता ड्यूकने त्याला आपल्या राजवाड्यात बोलावले.लिओनार्डो आला. राजवाड्यातील पुरुषमंडळींवर त्याने प्रभाव पाडला आणि महिला मंडळाचा तो आवडता झाला.लुओव्हिको स्फोर्झा याच्या दरबारी लिओनार्डो वीस वर्षे राहिला.मिलन येथे तो सरकारी इंजीनियर होता आणि आनंदोत्सवाचा अनधिकृत आचार्य होता.तो करमणुकीच्या योजना आखी.संगीत रची,पडदे रंगवी, पोशाखांच्या नवीन नवीन पद्धती निर्मी व दरबारात होणाऱ्या साऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमांत स्वतः प्रमुखपणे भाग घेई.त्याच्या काळच्या प्रक्षुब्ध जीवनात त्याने खूप ॲक्टिव्ह काम केले.तो नेहमी पुढे असे.पण तो या रोजच्या करमणुकी वगैरेतच रमणारा नव्हता.तो त्या काळचा एक अती प्रतिभावान व स्वप्नसृष्टीत वावरणारा महापुरुष होता.तो नवयुगातील नवीन नगरी बांधीत होता.ही नवीन नगरी कशी बांधावी,

सजवावी,उदात्त व सुंदर दिसणारी करावी.याच्या योजना तो मांडी. सुरक्षितपणे जाता यावे म्हणून त्याने निरनिराळ्या उंचीचे रस्ते तयार करविले.त्याने एकाखाली एक असे रस्ते केले.स्वच्छता व आरोग्य अधिक राहावे म्हणून रस्ते रुंद असावेत,असे तो म्हणे. मिलन शहर सुंदर दिसावे म्हणून ठायीठायी चर्चेस्,धबधबे,कालवे,सरोवरे व उपवने यांची योजना तो मनात मांडी.त्याच्या मनात अशी एक योजना होती की,शहरे फार मोठी नसावीत,पाच हजारच घरे प्रत्येक शहरात असावीत व कोणत्याही घरात सहांहून अधिक माणसे नसावीत.तो म्हणे,माणसे फारच गर्दी करून राहतात,मग ती सुखी कशी होणार? एके ठिकाणी दाटी करून शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे राहणाऱ्या या माणसांना जरा अलग अलग राहायला शिकविले पाहिजे.

गर्दी करून राहिल्याने सगळीकडे घाणच घाण होते,दुर्गंधी सुटते व साथीची आणि मरणाची बीजे सर्वत्र पसरतात. "


त्याने स्वत:चे मिलन शहर तर सुंदर केलेच,पण भविष्यकालीन सुंदर शहराचीही निर्दोष योजना त्याने आखून ठेवली.जरी तो अनेकविध कार्यात सदैव मग्न असे,तो चित्रकला व मूर्तिकला या आपल्या आवडत्या दोनच कलांस सारा वेळ देई. इ.स. १४९८ मध्ये त्याने 'लास्ट सपर' हे चित्र संपविले. त्याने हे चित्र एका मठातील भिंतीवर रंगविले आहे.तो मठ सँटा मेरिया डेले ग्रॅझी येथील होता.भिंतीवरचे ते चित्र आता जरा पुसट झाले आहे.त्याला भेगा व चिरा पडल्या आहेत.

लिओनार्डोने रंगांत तेल मिसळले.भिंतीवरील चित्रांसाठी रंगांत तेल मिसळणे हा शोध घातक होता.या चित्रातील रंग काही ठिकाणी निघून गेला आहे.येशू व त्याचे शिष्य यांचे चेहरे दुय्यम दर्जाच्या कलावंतांकडून पुन्हा सुधारून ठेवण्यात आले आहेत.तरी त्या जीर्णशीर्ण झालेल्या चित्रामधूनही सौंदर्याचा आत्मा अद्यापी प्रकाशत आहे.

डिझाइन भौमितिक आहे,चित्राची कल्पना अव्यंग आहे,

चित्रातील बौद्धिक भावदर्शन गूढ व गंभीर आहे.मानवी बुद्धी व प्रतिभा यांची ही परमोच्च निर्मिती आहे.या चित्रात शास्त्र व कला यांचा रमणीय संगम आहे आणि शास्त्रकलांच्या या निर्दोष व परिपूर्ण मीलनावर तत्त्वज्ञानाने घेतलेल्या चुंबनाचा ठसा उमटला आहे.


"हे चित्र रंगवायला लिओनार्डो याला कितीतरी दिवस लागले.परिपूर्णतिकडे त्याचे डोळे सारखे लागले होते.

आदल्या दिवशी झालेले काम पुन्हा दुसऱ्या दिवशी तो पाही आणि त्यात सुधारणा करी.ते चित्र हळूहळू फुलत होते.ते अत्यंत काळजीपूर्वक तयार होत होते.चरित्रकार लोमाइझो लिहितो, "चित्र काढायला आरंभ करताना लिओनार्डोचे मन जणू भीतीने भरून जाई... त्याचा आत्मा कलेच्या उदात्त भव्यतेने भरलेला असे. तो आदर्श सारखा समोर असल्यामुळे स्वतःच्या रेषांमधल्या रंगांतील चुका त्याला दिसत व चित्र नीट साधले नाही,असे त्याला सारखे वाटे.त्याची जी चित्रे इतरांना अपूर्व वाटत,त्यात त्याला दोष दिसत. " त्याचा दुसरा एक चरित्रकार सिनॉर बॅन्डेलो लिहितो, "पुष्कळ वेळा तो मठात अगदी उजाडता उजाडता येई ... शिडीवर चढून तो चित्र काढीत बसे.

सायंकाळी अंधार - पडेपर्यंत तो काम करीत बसे.आता चित्र काढता येणे शक्य नाही,दिसत नाही,असे होई, तेव्हाच तो नाइलाजाने काम थांबवी.तो तहानभूक विसरून जात असे.तो तन्मय होऊन जाई.परंतु कधीकधी तीन-चार दिवस तो नुसता तिथे येई व केवळ बघत बसे.तो चित्राला हातही लावीत नसे.छातीवर स्वस्तिकाकार हात ठेवून तो भिंतीवरील आकृती पाहत उभा राही.तो त्यातील गुणदोषच जणू पाही."


स्वतःच उत्कृष्ट टीकाकार व दोषज्ञ असल्यामुळे संपूर्ण अशी एखादी कलाकृती त्याच्या हातून क्वचितच पुरी होई.पण तो अविश्रांत कर्मवीर होता.थकवा तर त्याला माहीतही नव्हता. बँडेल्लो लिहितो, "तो किल्ल्यात मोठ्या घोड्याचा पुतळा तयार करीत होता.तेथील कामावरून मोठ्या लगबगीने भरदुपारी येताना मी त्याला कधी कधी पाहिले आहे.मिलनच्या रस्त्यात दुपारच्या उन्हात चिटपाखरूही नसे. डोळे दिपवणारे प्रखर ऊन तापत असे,पण सावलीची कल्पनाही मनात न आणता लिओनार्डो धावपळ करीत मठाकडे जाई,तेथील 'शेवटचे भोजन' या चित्रावर ब्रशाचे काही फटकारे मारी व पुन्हा किल्ल्यातील घोड्याच्या पुतळ्याकडे जाई."


हा घोडा अर्वाचीन मूर्तिकलेतील एक आश्चर्य आहे.

लुडोव्हिकोचा पिता या घोड्यावर बसलेला काढायचा होता.घोड्याचा आकार प्रचंड होता. एकंदर पुतळ्याची ती कल्पनाच अतिशय भव्य होती. इ.स. १४९३ मध्ये या पुतळ्याचा मातीचा नमुना प्रदर्शनार्थ मांडला गेला होता.

त्रिकोणी मंडपाखाली मेघडंबरीखाली हा पुतळा ठेवला गेला.मिलन शहराची ती अमरशोभा होती. मिलनमधील ते अपूर्व आश्चर्य होते.नंतर पितळेचा तसा पुतळा ओतून घ्यावा म्हणून योजना केली गेली;पण ती सिद्धीस गेली नाही. कारण इ.स. १४९९ मध्ये फ्रेंच सैनिकांनी मिलन घेतले.व हा पुतळा हे त्यांच्या तिरंदाजीचे एक लक्ष्य होते.

बाण मारून पुतळा छिन्नविच्छिन्न केला गेला.


आपल्या या अर्धवट रानटी मानवसमाजात प्रतिभावान व प्रज्ञावान पुरुष जे निर्माण करीत असतात,त्याचा मूर्ख लोक विनाश करतात. मूर्खानी विध्वंसावे म्हणूनच जणू शहाण्यांनी निर्मिले की काय कोण जाणे! युद्धाने मनुष्याचा देहच नव्हे,तर आत्माही मारला जातो,हा युद्धावरचा सर्वांत मोठा आरोप आहे.आपण पाहिले की,रणविद्येतील इंजीनिअर या नात्याने लिओनार्डोच्या कारकिर्दीस सुरुवात झाली.पण आयुष्याच्या अखेरच्या काळात तो लष्करशाहीचा कट्टर शत्रू झाला.'युद्ध म्हणजे अत्यंत पाशवी मूर्खपणा व वेडेपणा',असे तो म्हणतो.

पाण्याखाली राहून लढण्याचे यंत्र पूर्ण करण्याबद्दल जेव्हा त्याला सांगण्यात आले, तेव्हा ते नाकारून तो म्हणाला,

"मनुष्याचा स्वभाव फार दृष्ट आहे."युद्धातील सारी पशुता व विद्रूपता यथार्थतेने पाहणारे जे काही लोक नवयुगात होते,त्यातील लिओनाडों हा पहिला होय.त्याने लढाईची अशी चित्रे काढली की, टॉलस्टॉय जर कलावान असता,

तर ती त्याने काढली असती.पण केवळ रंग व ब्रश,

कॅन्व्हस व कापड,यांवरच युद्धांची क्रूरता व भीषणता दाखविणारी चित्रे तो काढी असे नव्हे,तर अंगिहारी येथील लढाईचे त्याने केलेले वर्णन त्याने काढलेले शब्दचित्र इतके उत्कृष्ट आहे की, थोर रशियन कादंबरीकारांच्या उत्कृष्ट लिखाणाशीच ते तोलता येईल.ती तेथील रणधुमाळी,ती धूळ,तो धूर,लढणाऱ्यांच्या वेदनाविव्हळ तोंडावर पडलेला सूर्याचा लालसर प्रकाश,जखमी होऊन पडलेल्या शिपायांचे शीर्णविदीर्ण देह,छिन्नविच्छिन्न झालेले घोडे, प्रत्येक दिशेने येणारी बाणांची वृष्टी,पाठलाग करीत येणाऱ्यांचे पाठीमागे उडणारे केस,रक्ताने माखलेल्या धुळीतून व घर रस्त्यांतून, पाठीवरच्या स्वारांना वाहून नेताना घोड्यांच्या टापांनी पडलेले खळगे,फुटकीतुटकी चिलखते, मोडलेले भाले,तुटलेल्या तलवारी,फुटलेली शिरस्त्राणे,या साऱ्या वस्तू मेलेल्यांच्या व मरणाऱ्यांच्या तंगड्यांमध्ये विखुरलेल्या असत; त्या मोठमोठ्या जखमांच्या तोंडातून भळभळा वाहणारे रक्त,ते टक लावून पाहणारे डोळे, मेलेल्यांच्या त्या घट्ट मिटलेल्या मुठी,

त्यांच्या त्या नाना दशा,श्रमलेल्या शिपायांच्या अंगांवरची घाण आणि धूळ,रक्त,घाम व चिखल यांची घाण या व अशा हजारो.बारीक-सारीक गोष्टी लिओनार्डोने लढाईच्या त्या वर्णनात आणल्या आहेत.त्याने हे शब्दचित्र कॅन्व्हासवर रंगवून ठेवले नाही,ही किती दुःखाची गोष्ट! ते चित्र किती भीषण व हृदयद्रावक झाले असते!त्याने अंगिहारीच्या लढाईची काही स्केचिस केली;पण रंगीत चित्र तयार केले नाही. त्याला कदाचित असेही वाटले असेल की,हे काम आपल्याही प्रतिभेच्या व बुद्धीच्या पलीकडेच आहे.


मनुष्याची क्रूरता दाखवायला मनुष्याची कला जणू अपुरी पडते,असे वाटते.


शिल्लक राहिलेला भाग..पुढील लेखामध्ये..

११/७/२३

त्या दोन साड्या अन् एक पातेलं..

जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला,एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.


"नाय ताई ! मला न्हाय परवडत.एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत." म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले.


"अरे भाऊ ..., फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही.बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत..! तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात.मी म्हणून तुला दोन साड्या तरी देतेय."


" ऱ्हावू द्या, तीन पेक्षा कमीमध्ये तर मला अजिबातच परवडत न्हाय." तो पुन्हा बोलला.


आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोश्या, केस पिंजरलेल्या,वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला मला कांही खायला द्या अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या.


त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवाण्या जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं.तिची नजर त्या वेडसर दिसणार्‍या महिलेच्या कपड्यांकडे गेली.

जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तीचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.


त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी,पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही.

असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर भिकारणीच्या ओंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली,"हं तर मग काय भाऊ! तू काय ठरवलंय ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?"


यावर काही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या,आपल्या गाठोड्यात टाकल्या,पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला.


विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली... तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं  गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता... त्यानें ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला.


आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं होतं... त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं होतं.


तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं देऊ करायला एकाएकी कां तयार झाला होता.याचं कारण  तिला आता चांगलंच उमगलं होतं.


आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणिव झाली होती...अनामिक


पुढील लेखात ..

कला,विज्ञान-वेत्ता लिओनार्डो डी व्हिन्सी

९/७/२३

रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या

'प्रयाग' या शब्दाचा अर्थ संगम.केदारनाथवरून येणारी मंदाकिनी आणि बद्रीनाथवरून येणारी अलकनंदा या दोन नद्यांचा रुद्रप्रयाग येथे संगम होतो.यापुढे त्यांच्या एकत्रित प्रवाहालाही अलकनंदा म्हणूनच संबोधतात.पण पुढे देवप्रयागला ह्या अलकनंदाला भागीरथी येऊन मिळाल्यावर त्यांच्या एकत्रित प्रवाहाला सर्व हिंदू लोक 'गंगामय्या' म्हणून ओळखतात तर इतर सर्व जग 'गंगा' म्हणून ओळखतं.

जेव्हा एखादं जनावर - तो वाघ असो किंवा बिबळ्या - नरभक्षक बनतं तेव्हा ओळख पटण्यासाठी आणि नोंद ठेवणं सुलभ जावं यासाठी त्याला त्या भागातल्या महत्त्वाच्या ठिकाणाचं नाव दिलं जातं.त्या नावाचा अर्थ असा नव्हे की त्या नरभक्षकाने आपली कारकीर्द त्याच गावापासून सुरू केली किंवा सर्व मनुष्यबळी त्याच गावात घेतले.त्यामुळे या रुद्रप्रयागच्या बिबळ्यानेही त्याचा पहिला बळी रुद्रप्रयागपासून बारा मैलांवर केदारनाथ रस्त्यावरील एका छोट्याशा गावात घेतला असला तरी पुढे तो 'रूद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या' म्हणूनच ओळखला जाऊ लागला.ज्या कारणांमुळे वाघ नरभक्षक बनतात त्याच कारणांमुळे बिबळे नरभक्षक बनत नाहीत.

बिबळ्या हे आपल्या जंगलातलं सर्वात रुबाबदार व देखणं जनावर आहे आणि अडचणीत सापडला किंवा जखमी झाला तर धाडसात इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा कांकणभर सरसच आहे.मात्र,मला

कबूल करायला आवडत नसलं तरीही एक गोष्ट खरी आहे की जर भूक भागली नाही तर तो जंगलात सापडणारा कोणताही मृतदेह खातो.

त्या अर्थाने scavanger किंवा 'जंगलातला सफाईकामगार' 'जंगलातला सफाईकामगार' म्हणता येईल... आफ्रिकेतला सिंहही याच प्रकारातला!

गढवालचे लोक हे प्रामुख्याने हिंदू आहेत आणि त्यामुळे ते मृत व्यक्तीचं दहन करतात. सर्वसाधारणपणे हा दहनविधी जवळच्या ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावरच पार पाडला जातो.कारण त्याची रक्षा पुढे कुठेतरी गंगेत व तिथून सागराला मिळेल अशी श्रद्धा असते. पहाडी मुलखातली गाव शक्यतो उंच डोंगरावर बसलेली असतात आणि ओढा,नद्या या खाली दरीतून वाहतात.साहजिकच एखाद्या दहनविधीसाठी किती ताकद खर्ची पडत असेल याचा अंदाज येऊ शकेल;कारण मृतदेह वाहून नेणारे खांदेच नव्हेत तर जाळायला लागणारं सरपण गोळा करणे व वाहून नेणे यासाठी बरंच मनुष्यबळ लागतं.

सर्वसाधारणपणे हे सर्व विधीपूर्वक पार पाडलं जातं;पण जर कधी एखादा साथीचा रोग पसरला आणि लोक जास्त संख्येने मरायला लागले तर मात्र पटापट सर्व मृतदेहांची विल्हेवाट लावणं अशक्य होऊन बसतं.अशा वेळी हा विधी अतिशय सरळसोट पद्धतीने पार पाडला जातो.

मृतदेहाच्या तोंडात जळत्या कोळशाचा तुकडा ठेवून तो देह डोंगराच्या कडेला नेला जातो आणि सरळ खालच्या दरीत लोटून दिला जातो.ज्या ठिकाणी वाघ,बिबळ्यांच्या नैसर्गिक भक्ष्याचा तुटवडा असेल त्याठिकाणी जर एखाद्या बिबळ्याला असा मृतदेह सापडला तर तो आपली भूक त्यावरच भागवतो.त्यामुळे त्याला चटक लागू शकते.नंतर ती साथ थांबली की मग अचानक हे नवं भक्ष्य दुर्मीळ झाल्याने सहज आणि विपुल मिळणाऱ्या ह्या नव्या शिकारीकडे तो वळतो. १९१८ मध्ये आलेल्या एन्फ्ल्यूएन्झाच्या साथीने भारतात लाखो बळी घेतले व त्यात गढवालच्या वाट्यालाही प्रचंड मनुष्यहानी आली. याच साथीच्या शेवटी शेवटी म्हणजे १९१८ च्या सुमारास या आपल्या 'रूद्रप्रयागच्या नरभक्षक बिबळ्या'चा उदय झाला.

या बिबळ्याने त्याचा पहिला नरबळी १ जून १९१८ला रुद्रप्रयागपासून काही मैलांवरच्या 'बैंजी' या गावात घेतला तर शेवटचा बळी १४ एप्रिल १९२६ रोजी 'भैंसवाडा' या गावात घेतला. मधल्या आठ वर्षांच्या कालावधीमध्ये त्याच्या नावावर एकशेपंचवीस नरबळींची नोंद आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या नोंदीप्रमाणे आलेला हा आकडा आणि वास्तव यात फरक आहे ही माझी शंकाच नव्हे तर खात्री आहे.कारण त्याच्या शिकारीसाठी मी त्या भागात जेवढे दिवस राह्यलो त्या काळातल्या काही बळींची सरकारी दफ्तरात नोंद नाही.अशा तऱ्हेने या बिबळ्याने प्रत्यक्षात घेतलेल्या बळींपेक्षा कमी बळी त्याच्या नावावर टाकून मला आठ वर्ष त्याच्या दहशतीखाली काढणाऱ्या लोकांवर अन्याय करायची इच्छा नाहीये. त्याचबरोबर त्याने निर्माण केलेल्या दहशतीकडेही मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. त्याने वास्तवात घेतलेले बळी सरकारी

नोंदींपेक्षा कमी असो किंवा जास्त,गढवालचे लोक एका बाबतीत मात्र सहमत होतील की सर्वात जास्त.प्रसिद्धी याच बिबळ्याच्या (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे) वाट्याला आली आहे.माझ्या माहितीप्रमाणे त्याचं नाव युनायटेड किंगडम,अमेरिका,कॅनडा,दक्षिणआफ्रिका,केनिया,मलाया,हाँगकाँग,ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड इथल्या जवळपास सर्व दैनिकात, मासिकांत व साप्ताहिकात झळकलंय.

या प्रसारमाध्यमांशिवाय वर्षभरात चार धाम यात्रा करणाऱ्या जवळ जवळ साठ हजार यात्रेकरूंमार्फत त्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं.

नरभक्षकाने घेतलेल्या नरबळींची नोंद ठेवण्याची सरकारी पद्धत अशी असायची...

मयत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी गावच्या पटवाऱ्याकडे घडलेली घटना नोंदवायची.त्यानंतर त्या पटवाऱ्याने घटनास्थळावर जायचं व मृतदेह गायब असेल तर ताबडतोब एक शोधपथक तयार करायचं. जर मृतदेह सापडला तर पटवाऱ्याने पंचनामा करायचा.जर त्याची खात्री पटली की हा खरोखर नरभक्षकाचा बळी आहे,भलतंसलतं काही नाही, तर त्याच्या नातलगांना त्यांच्या जातीधर्माच्या रिवाजाप्रमाणे मृतदेहांचं दहन किंवा दफन करायला परवानगी द्यायची.त्यानंतर त्याने त्याच्या रजिस्टरमध्ये सर्व घटनेचा सविस्तर वृत्तांत लिहून,

नरभक्षकाच्या नावासमोर त्या नरबळींचं नाव लिहून अहवाल तयार करायचा आणि जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखाला म्हणजेच,डेप्युटी कमिशनरला सादर करायचा. डेप्युटी कमिशनरनेही जिल्हास्तरावरच्या नोंदवहीत त्याची नोंद ठेवायची.परंतु जर मृतदेह मिळालाच नाही (कारण आपली शिकार खूप अंतर वाहून नेण्याची वाईट खोड बिबळ्याला असते.) तर मात्र ही केस पुढील चौकशी साठी कार्यान्वित होते व अशा वेळेला त्याची 'नरभक्षकाचा बळी' म्हणून नोंद होत नाही.त्याचबरोबर जर नरभक्षकाच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती जबर जखमी झाली व काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचीही नोंद 'नरभक्षकाचा बळी' म्हणून होत नाही.यावरून असं सहज लक्षात येतं की ही सर्व पद्धत कितीही चांगली असली तरी नरभक्षकाच्या सर्व बळींची नोंद ठेवणं केवळ अशक्य आहे,खास करून जेव्हा एखादा नरभक्षक एखाद्या ठिकाणी फार वर्ष कार्यरत असेल तेव्हा.!


उर्वरित भाग नंतर..




७/७/२३

जीवनात विजयी करणारी गोष्ट..!

तो अगदी निवांतपणे गुरूंसमोर उभा होता.गुरू त्याच्या जाणकार नजरेने त्याला तपासत होते. नऊ-दहा वर्षांचा मुलगा,त्याला लहान मूल समजा.त्याला डावा हात नव्हता,तो बैलाशी झालेल्या भांडणात तुटला होता.तुला माझ्याकडून काय हवे आहे.गुरुने त्या मुलाला विचारले.त्या मुलाने गळा साफ केला.

धैर्य एकवटले आणि म्हणाले - मला तुमच्याकडून कुस्ती शिकायची आहे.एक हात नाही आणि कुस्ती  शिकायची आहे ? विचित्र गोष्ट आहे.का? शाळेतील इतर मुले मला आणि माझ्या बहिणीला दादागिरी करतात.मला टुंडा म्हणतात.सगळ्यांच्या मेहरबानीने माझे आयुष्य उध्वस्त केले आहे गुरुजी.मला माझ्या हिंमतीवर जगायचे आहे.कोणाच्याही दयेची गरज नाही.माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे हे मला माहित असले पाहिजे.योग्य गोष्ट आहे.पण आता मी म्हातारा झालोय आणि कोणाला शिकवत नाही.तुला माझ्याकडे कोणी पाठवले? मी अनेक गुरूकडे गेलो. मला कोणी शिकवायला तयार नाही.

एका ज्येष्ठ गुरूने तुमचे नाव सांगितले.फक्त तेच तुला शिकवू शकतात.कारण त्यांच्याकडे फक्त वेळ आहे आणि शिकायला कोणी नाही,म्हणून त्यांनी मला सांगितले.ते उद्धट उत्तर कोणी दिले असेल हे गुरूना समजले.अशा गर्विष्ठ लोकांमुळेच वाईट स्वभावाचे लोक या खेळात आले,हे गुरूना माहित होते.ठीक आहे.उद्या सकाळी उजाडण्यापूर्वी आखाड्यात पोहोचा माझ्याकडून शिकणे सोपे नाही,हे मी आधीच सांगत आहे. कुस्ती हा प्राणघातक खेळ आहे.स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याचा वापर करा.मी जे शिकवतो त्यावर पूर्ण विश्वास ठेव.आणि माणसाला या खेळाची नशा चढते.त्यामुळे डोकं थंड ठेव समजले?


होय गुरूजी.समजले आपण म्हणाल, त्या प्रत्येक गोष्टीचे मी पालन करीन.मला तुमचा शिष्य करा. त्या मुलाची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.गुरु आपल्या एकुलत्या एक शिष्याला शिकवू लागले.माती तुडवली गेली,मुग्दुलवरून धूळ झटकली गेली आणि या एक हाताच्या मुलाला कसे शिकवायचे या विचारात गुरूचे डोळे लागले.


गुरूने त्याला फक्त एक डाव शिकवला आणि दररोज मुलाला प्रशिक्षण देण्यास भाग पाडले. सहा महिन्यांसाठी दररोज फक्त एक डाव.एके दिवशी सद्गुरूंच्या वाढदिवशी शिष्याने पाय दाबताना प्रकरण छेडायला सुरुवात केली. गुरुजी, सहा महिने झाले आहेत,मला या डावाचे बारीकसारीक मुद्दे चांगले समजले आहेत आणि मला काही नवीन डाव देखील शिकवा.गुरू तिथून उठले आणि निघून गेले.त्याने गुरूला नाराज केल्याने मुलगा परेशान झाला. मग गुरूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.

अजून काही शिकायचे आहे.असे त्याने कधीच विचारले नाही.गावात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात मोठी बक्षिसे होती.प्रत्येक आखाड्यातील निवडक पैलवान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. गुरुजींनी उद्या सकाळी शिष्याला बैलांसह गाडी घेऊन बोलावले.जवळच्या गावात जायचे आहे. सकाळी तुला कुस्तीच्या डावात सहभागी होण्यासाठी जायचे आहे.हात नसलेल्या या मुलाने कुस्तीचे पहिले दोन सामने जिंकले.तसेच विरोध करणाऱ्या सर्व गुरूचे चेहरे उतरले.बघणारे थक्क झाले.हात नसलेले मूल कुस्तीत कसे जिंकू शकते? कोणी शिकवले?आता तिसऱ्या कुस्तीत समोरचा खेळाडू नवशिक्या नव्हता.पण मुलाने ही कुस्ती सुद्धा आपल्या नीटनेटक्या चालीने जिंकली आणि बाजी मारली.आता या मुलाचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण मैदान आता त्याच्यासोबत होते.मीही जिंकू शकतो,ही भावना त्याला प्रबळ करत होती.काही वेळातच तो अंतिम टप्प्यात पोहोचला.

ज्या आखाड्याने त्या मुलाला या म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते,त्या गर्विष्ठ पैलवानाचा शिष्य शेवटच्या कुस्तीत या मुलाचा प्रतिस्पर्धी होता.हा कुस्तीपटू तेवढ्याच वयाचा असूनही ताकद आणि अनुभवाच्या बाबतीत तो या मुलापेक्षा वरचढ होता.त्याने अनेक मैदाने मारली होती.तो या मुलाला काही मिनिटांत चित करेल हे स्पष्ट होते.पंचांनी सल्ला दिला,कुस्ती घेणे योग्य होणार नाही.कुस्ती ही बरोबरीची असते.मानवता आणि समानतेनुसार ही कुस्ती रद्द करण्यात आली आहे.बक्षीस दोघांमध्ये समान विभागले जाईल.पंचांनी त्यांचा हेतू उघड केला.

कालच्या या मुलापेक्षा मी खूप अनुभवी आणि बलवान आहे.ही कुस्ती मीच जिंकणार, ही गोष्ट सोळा आणे खरी आहे.त्यामुळे मला या कुस्तीचा विजेता बनवायला हवे.तेथें स्पर्धक अहंकारनी बोलला ।


मोठ्या भावापेक्षा मी नवीन आणि अनुभवाने लहान आहे.माझ्या गुरूनी मला प्रामाणिकपणे खेळायला शिकवले आहे. न खेळता जिंकणे हा माझ्या गुरुचा अपमान आहे. माझ्या सोबत खेळा आणि माझ्यासाठी जे आहे ते द्या.मला ही भिक्षा नको आहे. त्या देखण्या तरुणाचे स्वाभिमानी शब्द ऐकून लोकांनी टाळ्या वाजवल्या.अशा गोष्टी ऐकणे चांगले पण हानिकारक असते. पंच निराश झाले. काही कमी की जास्त झाले तर?आधीच एक हात गमावला आहे,

अजून काही आणखी नुकसान होऊ नये? मूर्ख कुठला.! कुस्ती सुरू झाली आणि उपस्थित सर्वजण थक्क झाले.संधीच्या शोधात मुलाने टाकलेला डाव आणि बाजी त्या मोठ्या स्पर्धकाला झेलता आली नाही.तो मैदानाबाहेर पडला होता.कमीत कमी प्रयत्नांत त्या नवशिक्या स्पर्धकाने त्या जुन्या स्पर्धकाला धूळ चारली होती.आखाड्यातत

पोहोचल्यावर शिष्याने आपले पदक काढून सद् गुरुच्या चरणी ठेवले.सद् गुरूंच्या पायाची धूळ कपाळावर लावून त्याने आपले डोके मातीने माखले.


गुरुजी,मला एक गोष्ट विचारायची होती.विचारा... मला फक्त एक डावच माहित आहे.तरीही मी कसा जिंकलो?


तू दोन डाव शिकला होतास.त्यामुळेच तू जिंकलास.

कोणते दोन डाव गुरुजी?


पहिली गोष्ट,तु हा डाव इतक्‍या चांगल्या प्रकारे शिकलास की त्यात चुकीला वाव नव्हता.मी तुझ्याशी झोपेत कुस्ती लढवली तरीही तू या डावात चूक करत नाहीस.तुमच्या प्रतिस्पर्ध्याला हे माहित होते की तुम्हाला हा डाव माहित आहे, पण तुला फक्त हा एकच डाव माहित आहे हे त्याला थोडे माहीत होते का? आणि गुरू,दुसरी गोष्ट काय होती? दुसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे.प्रत्येक डावासाठी प्रतिडाव आहे.! असा कोणताही डाव नाही ज्याची तोड नाही.असा दावा केलाच जाऊ शकत नाही.तसाच या डावाचाही ही एक तोड होता.मग माझ्या प्रतिस्पर्ध्याला तो डाव कळणार नाही का? हे त्याला माहीत होते.पण तो काही करू शकला नाही.तुला माहीत आहे का? कारण त्या तोडीत डाव टाकणाऱ्या स्पर्धकाचा डावा हात धरावा लागतो! आता तुला समजले असेल की हात नसलेला साधा मुलगा विजेता कसा झाला? ज्या गोष्टीला आपण आपली दुर्बलता समजतो, तिला आपले सामर्थ्य बनवून जगायला शिकवतो,तोच खरा सद् गुरू आतून

आपण कुठेतरी कमकुवत आसतो,अपंग आहोत.त्या कमकुवतपणावर मात करून जगण्याची कला शिकवणारा गुरु प्रत्येकाला हवा आहे.आपल्याकडे दोन हात आहेत... एक स्वतःला मदत करण्यासाठी आणि दुसरा इतरांना मदत करण्यासाठी आजपासून इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची आणि इतरांची मदत केली पाहिजे.


अनामिक..