समुद्राच्या अज्ञात मार्गांचे संशोधन करण्यात कोलंबस गुंतला असता,दुसरा एक मोठा प्रगतीवीर मानवी बुद्धीच्या व मनाच्या अज्ञात प्रदेशात प्रकाश पसरीत जात होता.
अज्ञात क्षेत्रात रस्ते तयार करीत होता.या अपूर्व विभूतीचे नाव लिओनार्डो डी व्हिन्सी.नवयुगातील संस्कृतीचा हा अत्यंत परिपूर्ण असा नमुना होता,असे म्हटले तरी चालेल.
त्याची सर्वगामी बुद्धिमत्ता हे त्याच्या पिढीतील एक महदाश्चर्य होते. "एवढ्याशा लहान डोक्यात इतके ज्ञान मावते तरी कसे?" असे मनात येऊन लोक त्याच्याकडे बघत राहत व त्यांचे आश्चर्य अधिकच वाढे.
आजचे आपले युग विशिष्ट क्षेत्रात पारंगत होण्याचे आहे.
अशा स्पेशलायझेशनच्या काळात लिओनार्डोच्या अपूर्व बुद्धिमत्तेची अनंतता लक्षात येणे जरा कठीण आहे.
त्याच्या सर्वकष बुद्धीची आपणास नीट कल्पनाही करता येणार नाही.लिओनार्डोने जे जे केले ते पहिल्या दर्जाचे केले.कुठेही पाहिले तरी तो पहिला असे.तो जे काही करी,ते उत्कृष्टच असे.सारे जगच त्याचे कार्यक्षेत्र होते.
अमुक एक विषय त्याने वगळला असे नाही.जगातील सौंदर्यात त्याने नवीन सौंदर्य ओतले.जगातील सौंदर्याची गूढता समजून घेण्याची तो खटपट करी.तो चित्रकार होता, शिल्पकार होता,इमारती बांधणारा होता, इंजीनियर होता,वाद्यविशारद होता,नैतिक तत्त्वज्ञानी होता.त्यांच्यात सारे एकवटलेले होते. साऱ्या कला व शास्त्र मिळून त्याची मूर्ती बनली होती.मरताना अप्रसिद्ध अशी पाच हजार पृष्ठे तो मागे ठेवून गेला.या पाच हजार पृष्ठांपैकी पन्नास पृष्ठांकडेही आपण किंचित पाहिले तरी त्याच्या मनाची व्यापकता आपणास दिसून येईल.त्या पन्नास पृष्ठांत लिओनार्डोने पुढील विषय आणले आहेत;प्राचीन दंतकथा व मध्ययुगीन तत्त्वज्ञान, समुद्राच्या भरती-ओहोटीची कारणे, फुफ्फुसांतील हवेची हालचाल,पृथ्वीचे मोजमाप, पृथ्वी व सूर्य यांमधील अंतर,घुबडाची निशाचरत्वाची सवय,मानवी दृष्टीने भौतिक नियम,वाऱ्यात वृक्षाचे तालबद्ध डोलणे, उडणाऱ्या यंत्राचे स्केच,मूत्राशयातील खड्यावर वैद्यकीय उपाय,वाऱ्याने फुगविलेले कातड्याचे जाकीट घालून पोहणे,प्रकाश व छाया यांवर निबंध,
क्रीडोपवनाचा नकाशा,नवीन युद्धयंत्रे, सुगंध बनविण्याच्या पद्धतीचे टाचण,स्वतंत्र भौमितिक सिद्धांताची यादी,
पाण्याच्या दाबाच्या शक्तीचे प्रयोग,पशुपक्ष्यांच्या सवयीचे निरीक्षण-परीक्षण,निर्वाततेवर निबंध,शक्ती म्हणून वाफेचा उपयोग करण्याची योजना,नवीन म्हणींवर प्रकरण व चंद्राच्या रचनेसंबंधी माहिती.
लिओनार्डोच्या पाच हजार पृष्ठांपैकी पन्नासच पृष्ठे आपण घेतली,तरी त्यात(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,
अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन) आलेल्या अनेक विषयांपैकी फक्त एकदशांशच वरच्या यादीत आलेले आहेत.यावरून या पाच हजार पृष्ठांत किती विषयांवर टीप-टिप्पणी आल्या असतील, त्याची कल्पनाच करणे बरे.या शेकडो विषयांत आणखी पुढील कलानिर्मितीची भर घाला; - अत्यंत निर्दोष असे मोनालिसा पोट्रेट,'शेवटचे जेवण',हे अत्यंत सुंदर चित्र आणि त्या काळात आठवे आश्चर्य मानला जात असलेला,त्याने तयार केलेला घोड्यावर बसलेल्या स्फोझचा पुतळा.असा लिओनार्डो होता.त्याच्या बुद्धीची वा प्रतिभेची खोली येईल का मोजता ? त्याच्या खोल बुद्धीत व प्रतिभेत येईल का डोकावता?
निसर्गाला क्षुद्र मानवाबरोबर सतत प्रयोग करीत राहिल्यामुळे कंटाळा येत असेल व म्हणून तो मधूनमधून एखादा खराखुरा मनुष्य निर्माण करतो.लिओनार्डो हा असा खराखुरा मनुष्य होता.फ्लॉरेन्समध्ये सेर पिअरो ॲन्टोनिओ नावाचा वकील होता, त्याचा अनौरस पुत्र लिओनार्डो.हाॲन्टोनिओ व्हिन्सी किल्ल्याच्या टस्कन टेकड्यांत राहत असे.सभोवतालचे दगडाळ रस्ते पाहून लिओनार्डोच्या मनावर परिणाम झाला असेल.टेकड्यांवर होणाऱ्या छाया प्रकाशांच्या खेळांचाही त्याच्या आत्म्यावर खूप परिणाम झाला असेल,लिओनाडोंचे मन, त्याची बुद्धी व त्याचा आत्मा त्या निसर्गावर पोसले जात होती.
लहानपणी लिओनार्डो अतीव सुंदर होता.त्याचे लावण्य पाहून सारे दिपून जात. त्याचे केस सोनेरी होते.तो अंगात गुलाबी रंगाचा झगा घाली.तो जणू मेघातून खाली उतरलेला एखादा देवदूतच भासे! आणि तो गाणे तरी किती सुंदर गाई!जणू गंधर्वच स्वर्गातून उतरलासे वाटे! अगदी लहानपणीच तो फ्ल्यूट वाजवावयास शिकला.
बापाकडे येणाऱ्या पाहुण्यांना तो गाऊन दाखवी;पण गाताना व वाजविताना मूळच्या शब्दांत तो सुधारणा करी व संगीतात नावीन्य ओती,त्यायोगे पाहुणे चकित होत ! पण केवळ संगीतातच अपूर्वता दाखवून लिओनार्डोचे समाधान झाले नाही.त्याने मानवी विचाराच्या प्रत्येक क्षेत्रात पारंगत व्हायचे ठरविले;व तो त्यासाठी प्रयत्न करू लागला.लिओनार्डोचे मन गणिततज्ज्ञाचे होते, बोटे कुशल यंत्रज्ञाची होती,आत्मा कलावंताचा होता. (हृदय कलावंतांचे होते,बुद्धी गणितज्ञाची होती,बोटे मेकॅनिकची यंत्रज्ञाची होती.) त्या काळी ॲन्ड्री डेल व्हेरोशिया हा प्रसिद्ध - कलावंत होता.तो चित्रकार,शिल्पकार, मूर्तिकार होता.त्याच्या कलाभवनात लिओनार्डो वयाच्या अठराव्या वर्षी इ.स. १४०० मध्ये शिरला आणि थोड्या वर्षांतच त्याने या तिन्ही कलांत आपल्या गुरूला मागे टाकले.
वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्याने मिलनच्या ड्यूकला एक पत्र लिहिले.या पत्रात त्याने आपणाला शांतीच्या कला व युद्धाची शस्त्रास्त्रे यांचा मिलनमधील मुख्य डायरेक्टर नेमावे,अशी मागणी केली होती. या ड्यूकचे नाव लुडोव्हिको स्फोझ.या पत्रात लिओनार्डो ने आपल्या अंगच्या गुणांचे वर्णन केले आहे.'हे पत्र लिहिणारा एक तर अपूर्व बुद्धीचा तरी असला पाहिजे,नाही तर मूर्ख तरी असला पाहिजे असे कोणालाही वाटले असते,' असे जीन पॉल रिक्टर म्हणतो.हा आश्चर्यकारक तरुण,ड्यूकला साध्या व स्पष्ट शब्दांत लिहितो, "शत्रूचा पाठलाग करताना बरोबर घेऊन जाता येतील असे पूल मी बांधून देऊ शकेन.
तसेच शत्रूचे पूल मी नष्ट करू शकेन.मी नद्या व दलदली बुजवू शकेन,कोरड्या करू शकेन, दगडी पायावर न बांधलेला कोणताही किल्ला मी उद्ध्वस्त करू शकेन.मी नवीन प्रकारची तोफ बनवू शकेन,नद्यांच्या खालून आवाज न करता बोगदे कसे बांधावे हे मी शोधून काढले आहे.
शत्रूवर हल्ला करण्यासाठी आच्छादित रणगाडे कसे बांधावेत हे मला माहीत आहे.पाण्यातून लढण्याची,
बचावाची व चढाईची शस्त्रे करण्याची आश्चर्यकारक योजना माझ्याजवळ आहे.तद्वतच शांततेच्या काळात मी शिल्पकामांत कोणाचीही बरोबरी करू शकेन,
चित्रकलेतही उत्तमोत्तमांच्या तोडीचे काम मी करू शकेन आणि तुमच्या (स्फोर्झाच्या) कीर्तिमान घोड्यावर बसलेला पुतळा जगात कोणीही पाहिला नसेल,इतका सुंदर मी करू शकेन.
त्या तरुण लिओनार्डोला जवळच्या वेड्यांच्या दवाखान्यात न पाठविता ड्यूकने त्याला आपल्या राजवाड्यात बोलावले.लिओनार्डो आला. राजवाड्यातील पुरुषमंडळींवर त्याने प्रभाव पाडला आणि महिला मंडळाचा तो आवडता झाला.लुओव्हिको स्फोर्झा याच्या दरबारी लिओनार्डो वीस वर्षे राहिला.मिलन येथे तो सरकारी इंजीनियर होता आणि आनंदोत्सवाचा अनधिकृत आचार्य होता.तो करमणुकीच्या योजना आखी.संगीत रची,पडदे रंगवी, पोशाखांच्या नवीन नवीन पद्धती निर्मी व दरबारात होणाऱ्या साऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमांत स्वतः प्रमुखपणे भाग घेई.त्याच्या काळच्या प्रक्षुब्ध जीवनात त्याने खूप ॲक्टिव्ह काम केले.तो नेहमी पुढे असे.पण तो या रोजच्या करमणुकी वगैरेतच रमणारा नव्हता.तो त्या काळचा एक अती प्रतिभावान व स्वप्नसृष्टीत वावरणारा महापुरुष होता.तो नवयुगातील नवीन नगरी बांधीत होता.ही नवीन नगरी कशी बांधावी,
सजवावी,उदात्त व सुंदर दिसणारी करावी.याच्या योजना तो मांडी. सुरक्षितपणे जाता यावे म्हणून त्याने निरनिराळ्या उंचीचे रस्ते तयार करविले.त्याने एकाखाली एक असे रस्ते केले.स्वच्छता व आरोग्य अधिक राहावे म्हणून रस्ते रुंद असावेत,असे तो म्हणे. मिलन शहर सुंदर दिसावे म्हणून ठायीठायी चर्चेस्,धबधबे,कालवे,सरोवरे व उपवने यांची योजना तो मनात मांडी.त्याच्या मनात अशी एक योजना होती की,शहरे फार मोठी नसावीत,पाच हजारच घरे प्रत्येक शहरात असावीत व कोणत्याही घरात सहांहून अधिक माणसे नसावीत.तो म्हणे,माणसे फारच गर्दी करून राहतात,मग ती सुखी कशी होणार? एके ठिकाणी दाटी करून शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे राहणाऱ्या या माणसांना जरा अलग अलग राहायला शिकविले पाहिजे.
गर्दी करून राहिल्याने सगळीकडे घाणच घाण होते,दुर्गंधी सुटते व साथीची आणि मरणाची बीजे सर्वत्र पसरतात. "
त्याने स्वत:चे मिलन शहर तर सुंदर केलेच,पण भविष्यकालीन सुंदर शहराचीही निर्दोष योजना त्याने आखून ठेवली.जरी तो अनेकविध कार्यात सदैव मग्न असे,तो चित्रकला व मूर्तिकला या आपल्या आवडत्या दोनच कलांस सारा वेळ देई. इ.स. १४९८ मध्ये त्याने 'लास्ट सपर' हे चित्र संपविले. त्याने हे चित्र एका मठातील भिंतीवर रंगविले आहे.तो मठ सँटा मेरिया डेले ग्रॅझी येथील होता.भिंतीवरचे ते चित्र आता जरा पुसट झाले आहे.त्याला भेगा व चिरा पडल्या आहेत.
लिओनार्डोने रंगांत तेल मिसळले.भिंतीवरील चित्रांसाठी रंगांत तेल मिसळणे हा शोध घातक होता.या चित्रातील रंग काही ठिकाणी निघून गेला आहे.येशू व त्याचे शिष्य यांचे चेहरे दुय्यम दर्जाच्या कलावंतांकडून पुन्हा सुधारून ठेवण्यात आले आहेत.तरी त्या जीर्णशीर्ण झालेल्या चित्रामधूनही सौंदर्याचा आत्मा अद्यापी प्रकाशत आहे.
डिझाइन भौमितिक आहे,चित्राची कल्पना अव्यंग आहे,
चित्रातील बौद्धिक भावदर्शन गूढ व गंभीर आहे.मानवी बुद्धी व प्रतिभा यांची ही परमोच्च निर्मिती आहे.या चित्रात शास्त्र व कला यांचा रमणीय संगम आहे आणि शास्त्रकलांच्या या निर्दोष व परिपूर्ण मीलनावर तत्त्वज्ञानाने घेतलेल्या चुंबनाचा ठसा उमटला आहे.
"हे चित्र रंगवायला लिओनार्डो याला कितीतरी दिवस लागले.परिपूर्णतिकडे त्याचे डोळे सारखे लागले होते.
आदल्या दिवशी झालेले काम पुन्हा दुसऱ्या दिवशी तो पाही आणि त्यात सुधारणा करी.ते चित्र हळूहळू फुलत होते.ते अत्यंत काळजीपूर्वक तयार होत होते.चरित्रकार लोमाइझो लिहितो, "चित्र काढायला आरंभ करताना लिओनार्डोचे मन जणू भीतीने भरून जाई... त्याचा आत्मा कलेच्या उदात्त भव्यतेने भरलेला असे. तो आदर्श सारखा समोर असल्यामुळे स्वतःच्या रेषांमधल्या रंगांतील चुका त्याला दिसत व चित्र नीट साधले नाही,असे त्याला सारखे वाटे.त्याची जी चित्रे इतरांना अपूर्व वाटत,त्यात त्याला दोष दिसत. " त्याचा दुसरा एक चरित्रकार सिनॉर बॅन्डेलो लिहितो, "पुष्कळ वेळा तो मठात अगदी उजाडता उजाडता येई ... शिडीवर चढून तो चित्र काढीत बसे.
सायंकाळी अंधार - पडेपर्यंत तो काम करीत बसे.आता चित्र काढता येणे शक्य नाही,दिसत नाही,असे होई, तेव्हाच तो नाइलाजाने काम थांबवी.तो तहानभूक विसरून जात असे.तो तन्मय होऊन जाई.परंतु कधीकधी तीन-चार दिवस तो नुसता तिथे येई व केवळ बघत बसे.तो चित्राला हातही लावीत नसे.छातीवर स्वस्तिकाकार हात ठेवून तो भिंतीवरील आकृती पाहत उभा राही.तो त्यातील गुणदोषच जणू पाही."
स्वतःच उत्कृष्ट टीकाकार व दोषज्ञ असल्यामुळे संपूर्ण अशी एखादी कलाकृती त्याच्या हातून क्वचितच पुरी होई.पण तो अविश्रांत कर्मवीर होता.थकवा तर त्याला माहीतही नव्हता. बँडेल्लो लिहितो, "तो किल्ल्यात मोठ्या घोड्याचा पुतळा तयार करीत होता.तेथील कामावरून मोठ्या लगबगीने भरदुपारी येताना मी त्याला कधी कधी पाहिले आहे.मिलनच्या रस्त्यात दुपारच्या उन्हात चिटपाखरूही नसे. डोळे दिपवणारे प्रखर ऊन तापत असे,पण सावलीची कल्पनाही मनात न आणता लिओनार्डो धावपळ करीत मठाकडे जाई,तेथील 'शेवटचे भोजन' या चित्रावर ब्रशाचे काही फटकारे मारी व पुन्हा किल्ल्यातील घोड्याच्या पुतळ्याकडे जाई."
हा घोडा अर्वाचीन मूर्तिकलेतील एक आश्चर्य आहे.
लुडोव्हिकोचा पिता या घोड्यावर बसलेला काढायचा होता.घोड्याचा आकार प्रचंड होता. एकंदर पुतळ्याची ती कल्पनाच अतिशय भव्य होती. इ.स. १४९३ मध्ये या पुतळ्याचा मातीचा नमुना प्रदर्शनार्थ मांडला गेला होता.
त्रिकोणी मंडपाखाली मेघडंबरीखाली हा पुतळा ठेवला गेला.मिलन शहराची ती अमरशोभा होती. मिलनमधील ते अपूर्व आश्चर्य होते.नंतर पितळेचा तसा पुतळा ओतून घ्यावा म्हणून योजना केली गेली;पण ती सिद्धीस गेली नाही. कारण इ.स. १४९९ मध्ये फ्रेंच सैनिकांनी मिलन घेतले.व हा पुतळा हे त्यांच्या तिरंदाजीचे एक लक्ष्य होते.
बाण मारून पुतळा छिन्नविच्छिन्न केला गेला.
आपल्या या अर्धवट रानटी मानवसमाजात प्रतिभावान व प्रज्ञावान पुरुष जे निर्माण करीत असतात,त्याचा मूर्ख लोक विनाश करतात. मूर्खानी विध्वंसावे म्हणूनच जणू शहाण्यांनी निर्मिले की काय कोण जाणे! युद्धाने मनुष्याचा देहच नव्हे,तर आत्माही मारला जातो,हा युद्धावरचा सर्वांत मोठा आरोप आहे.आपण पाहिले की,रणविद्येतील इंजीनिअर या नात्याने लिओनार्डोच्या कारकिर्दीस सुरुवात झाली.पण आयुष्याच्या अखेरच्या काळात तो लष्करशाहीचा कट्टर शत्रू झाला.'युद्ध म्हणजे अत्यंत पाशवी मूर्खपणा व वेडेपणा',असे तो म्हणतो.
पाण्याखाली राहून लढण्याचे यंत्र पूर्ण करण्याबद्दल जेव्हा त्याला सांगण्यात आले, तेव्हा ते नाकारून तो म्हणाला,
"मनुष्याचा स्वभाव फार दृष्ट आहे."युद्धातील सारी पशुता व विद्रूपता यथार्थतेने पाहणारे जे काही लोक नवयुगात होते,त्यातील लिओनाडों हा पहिला होय.त्याने लढाईची अशी चित्रे काढली की, टॉलस्टॉय जर कलावान असता,
तर ती त्याने काढली असती.पण केवळ रंग व ब्रश,
कॅन्व्हस व कापड,यांवरच युद्धांची क्रूरता व भीषणता दाखविणारी चित्रे तो काढी असे नव्हे,तर अंगिहारी येथील लढाईचे त्याने केलेले वर्णन त्याने काढलेले शब्दचित्र इतके उत्कृष्ट आहे की, थोर रशियन कादंबरीकारांच्या उत्कृष्ट लिखाणाशीच ते तोलता येईल.ती तेथील रणधुमाळी,ती धूळ,तो धूर,लढणाऱ्यांच्या वेदनाविव्हळ तोंडावर पडलेला सूर्याचा लालसर प्रकाश,जखमी होऊन पडलेल्या शिपायांचे शीर्णविदीर्ण देह,छिन्नविच्छिन्न झालेले घोडे, प्रत्येक दिशेने येणारी बाणांची वृष्टी,पाठलाग करीत येणाऱ्यांचे पाठीमागे उडणारे केस,रक्ताने माखलेल्या धुळीतून व घर रस्त्यांतून, पाठीवरच्या स्वारांना वाहून नेताना घोड्यांच्या टापांनी पडलेले खळगे,फुटकीतुटकी चिलखते, मोडलेले भाले,तुटलेल्या तलवारी,फुटलेली शिरस्त्राणे,या साऱ्या वस्तू मेलेल्यांच्या व मरणाऱ्यांच्या तंगड्यांमध्ये विखुरलेल्या असत; त्या मोठमोठ्या जखमांच्या तोंडातून भळभळा वाहणारे रक्त,ते टक लावून पाहणारे डोळे, मेलेल्यांच्या त्या घट्ट मिटलेल्या मुठी,
त्यांच्या त्या नाना दशा,श्रमलेल्या शिपायांच्या अंगांवरची घाण आणि धूळ,रक्त,घाम व चिखल यांची घाण या व अशा हजारो.बारीक-सारीक गोष्टी लिओनार्डोने लढाईच्या त्या वर्णनात आणल्या आहेत.त्याने हे शब्दचित्र कॅन्व्हासवर रंगवून ठेवले नाही,ही किती दुःखाची गोष्ट! ते चित्र किती भीषण व हृदयद्रावक झाले असते!त्याने अंगिहारीच्या लढाईची काही स्केचिस केली;पण रंगीत चित्र तयार केले नाही. त्याला कदाचित असेही वाटले असेल की,हे काम आपल्याही प्रतिभेच्या व बुद्धीच्या पलीकडेच आहे.
मनुष्याची क्रूरता दाखवायला मनुष्याची कला जणू अपुरी पडते,असे वाटते.
शिल्लक राहिलेला भाग..पुढील लेखामध्ये..