आपण पाहिले की,लिओनार्डो हा अत्यंत स्वयंभू व अभिजात असा कलावान होता.त्याच्या कृतीत अनुकरण नाही.तो म्हणे,"आपण निसर्गाचे अनुकरण करावे,दुसऱ्या कलावंताचे करू नये." ग्रीक हे उत्कृष्ट कलावंत होते.
कारण ते निसर्गानुकारी होते.पण रोमन कलावंत दुय्यम दर्जाचे वाटतात.कारण,निसर्गाचे अनुकरण करण्याऐवजी त्यांनी माणसांचे - ग्रीकांचे अनुकरण केले.जुन्या ग्रीक कलावेत्त्यांत जी प्रतिभेची ज्वाला होती,ती लिओनार्डो -
मध्ये होती. लिओनार्डो जीवनातून स्फूर्ती घेई.कधीकधी तर तो जीवनाच्या पलीकडेही जाई.जीवनात नसलेलेही त्यांत ओतून तो अधिक सौंदर्य निर्मी. मोनालिसाची जी प्रतिकृती त्याने काढली आहे, तीत किती नाजूकपणा,
किती कोमलता,किती सुंदरता व एक प्रकारचीप्रभुशरणता
आहे.! मूळच्या खऱ्या मोनालिसाच्या चेहऱ्यात या साऱ्या भावना क्वचितच असतील.हे चित्र काढताना लिओनार्डोने निसर्गाचे अनुकरण केले आहे असे वाटते.त्या मानवी मुखमंडलावर त्याने इतकी मधुरता रेखाटली आहे आणि इतका चांगुलपणा उमटविला आहे,याचे कारण त्याच्या हृदयातच अपार साधुता,अपार मधुरता होती.
फिडियसच्या कलेचा आत्मा जसा लिओनार्डोजवळ होता,तसे त्याच्याजवळ सेंट फ्रेंन्सिससचे हृदयही होते.तो जीवनाकडे दुःखी स्मिताने पाहतो.त्याला मानवांची दुःखे पाहून त्यांची करुणा येई;पण त्यांचा मूर्खपणा पाहून तो स्मित करी.कधीकधी स्मिताचे परिवर्तन मनमोकळ्या हास्यातही होई.या बाबतीत ग्रीक लेखक रिस्टोफेन्स याच्याशी त्याचे साम्य आहे.आपण असेही म्हणू शकू की,लिओनार्डो हा रेखा व रंग यांचा रिस्टोफेन्स होता.ग्रीक रिस्टोफेन्स शब्दसृष्टीतील तर हा रंगसृष्टीतील.त्या ग्रीक नाटककाराप्रमाणे मानवी जीवनाच्या हास्यरसात्मक नाटकातील जे अधिक हास्यास्पद प्रकार दिसत,त्यांवर दृष्टी टाकणे त्याला बरे वाटे. जीवनातील नाना प्रकारचे हास्यास्पद चेहरे त्याने आपल्या नोटबुकात काढले आहेत.
त्याची नोटबुके अशा चेहऱ्यांनी भरलेली आहेत.
कधीकधी तो शेतकऱ्यांना आपल्या घरी बोलावी व गोष्टी सांगून त्यांची हसवूनहसवून मुरकुंडी वळवी.हसताना त्यांचे चेहरे निरनिराळ्या प्रकारचे होत; ते पाहून तो लगेच कागदाच्या तुकड्यांवर ते टिपून घेई व नंतर आपल्या अमर स्केचबुकांत त्या चेहऱ्यांना तो अमरत्व देई.
अपूर्व अशा परिस्थितीत मानवी भावना कशा दिसतात हे पाहण्याचे लिओनार्डोला जणू वेडच होते! ज्यांचा शिरच्छेद व्हायचा असे,अशा गुन्हेगारांचे चेहरे काढण्यासाठी तो तास न् तास बसे व त्यांच्या मरणान्तिक भावना रेखाटत असे; पण त्या मरणोन्मुखांची करुण मुखे रंगविताना त्याला आसुरी आनंद मात्र होत नसे.तो त्या वेळी शास्त्रीय दृष्टीने ते भावनांचे आविष्कारण पाहत असे.तो जणू मानसशास्त्राचा अभ्यास करी व त्यावर रेखारूप निबंध लिही.तो कलावान होता. जीवनाची व मरणाची प्रत्येक स्थिती,प्रत्येक दशा अभ्यासावयाची जिज्ञासा त्याला असे.
कलावान या नात्याने तो अभ्यास करी;पण 'मनुष्य' या नात्याने त्याने जीवनालाच गौरविले आहे व मरणाला धिक्कारले आहे.त्याचा चरित्रलेखक व्हासारी लिहितो, "जेथे पाखरे विकली जात,त्या जागी तो जाई;आपल्या हातांनी पिंजऱ्यातील पक्षी घेई,त्यांची मागण्यात येई तितकी किंमत देई व नंतर त्यांना सोडून देऊन त्यांचे स्वातंत्र्य त्यांना परत देई ! "
त्याला प्राणिमात्राबद्दल अनुकंपा वाटे,प्रत्येक जीव पवित्र वाटे.तो शाकाहारी झाला.आपण जर प्राणी निर्मू शकत नाही तर त्यांना ठार मारण्याचा आपणास काय अधिकार? तो लिहितो, "कोणत्याही प्राण्याचा जीव घेणे ही अत्यंत अमानुष गोष्ट आहे.रागाने अथवा मत्सराने आपण कोणाचा प्राण घ्यावा अशी आत्म्याची खरोखरच इच्छा नसते.ज्याला प्राणांची किंमत वाटत नाही,ज्याला दुसऱ्याच्या जिवाची पर्वा नाही,तो जिवंत राहण्यास अपात्र नव्हे काय ?"
लिओनार्डो स्वानुभवाने बोलत होता.आपण कशाच्या जोरावर हे असे बोलू शकतो,हे तो जाणत होता.
जीवनातील दुर्दैव,करुणा,विरोध व क्रूरता या गोष्टी त्याने स्वतः पाहिल्या होत्या.लुडोव्हिको स्फोर्झाच्या दरबारात व नंतर सीझर बोर्डिआ याच्या राजवाड्यात त्याला दिसले की,अत्यंत क्षुद्र स्वार्थासाठी व क्षुद्र कारणांसाठी माणसे माणसांची कत्तल करीत असतात.तो मानवातील सौंदर्याचा उपासक होता व म्हणून तो कलावान झाला.
पण मानवातील दुष्टता व जंगलीपणा पाहून तो तत्त्वज्ञानी झाला.
लिओनार्डोचे तत्त्वज्ञान सर्वसंग्राहक आहे. तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक संप्रदायात जे जे चांगले दिसले ते ते सारे त्याने घेतले.सर्व ठिकाणचे उत्कृष्ट विचार घेऊन त्याने स्वत:चे तत्त्वज्ञान उभारले जीवन-मरणासंबंधीचे लिओनार्डोचे विचार सुसंबद्ध नाहीत.त्याच्या स्फुट व विस्कळीत विचारांना 'दर्शन' किंवा 'मीमांसा' म्हणता येणार नाही.
त्याने टीपा,टिप्पण्या लिहिल्या.त्याच्या पाच हजार पृष्ठांत सर्व काही संक्षेपाने आले आहे.
तो डाव्या हाताने लिही,म्हणून त्याचे बरेचसे लिखाण लागत नाही.तसेच तो आपले इटॅलियन अक्षर हिब्रू व अरेबिक याप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिही.
लिओनार्डोच्या तत्त्वज्ञानात्मक सूत्रांची नीट व व्यवस्थित मांडणी अद्यापि कोणी केलेली नाही.पण त्याच्या इतस्तत: विखुरलेल्या विचारांतून स्टोइकांची धैर्यशीलता व ख्रिस्ताची मधुर सौम्यता यांचे मिश्रण आपणास आढळून येते.लिओनार्डो चर्चचा सभासद नव्हता;पण तो येशूचा अनुयायी होता.त्याने काढलेल्या ख्रिस्ताच्या चित्रांतील ख्रिस्ताचे मुखमंडल रंगविताना ख्रिस्ताचा आत्मा आपण ओळखला आहे,असेच जणू तो दाखवीत आहे.पण त्याने ख्रिस्ताचे मुख तेवढेच नीट रंगविले असे नाही, तर ख्रिस्ताचे विचारही सहानुभूतिपूर्वक समजून घेतले होते.तो ख्रिस्ताप्रमाणे,स्टोइक बंधूंप्रमाणे, स्वतःची दुःखे समाधानाने व सहजतेने सहन करी;तो त्यांचा बाऊ करीत नसे.दुसऱ्यांच्या दुःखांविषयी तो सहानुभूती दाखवी.शत्रूंचा द्वेष व मित्रांचा मत्सर यांमुळे त्याला बराच त्रास होई. मायकेल एंजेलो हा त्याचाच समकालीन महान चित्रकार,
पण लिओनार्डोच्या कलेकडे तो सहानुभूतीने बघत नसे; व त्याचा सार्वजनिकरित्या अपमान करण्याची एकही संधी गमावीत नसे.लिओनार्डो मात्र हे सर्व अपमान सोशी,
धीरोदात्ततेने सहन करी.तो आपल्या हस्तलिखितात एके ठिकाणी लिहितो, "कपड्यांमुळे थंडीपासून बचाव होतो,तसा सहनशीलतेमुळे दुसऱ्यांनी दिलेल्या त्रासापासून बचाव होतो.थंडी वाढेल तसतसे अधिकाधिक कपड़े अंगावर घातल्यास थंडी काही करू शकणार नाही;तद्वतच लोक तुमच्या बाबतीत अधिकाधिक अन्याय करू लागले तर अधिकाधिक सहिष्णू व सहनशील बना.म्हणजे त्या अन्यायांनी व निंदा अपमानांनी तुमचे मन त्रस्त होणार नाही व त्यांची - शक्ती नष्ट होईल."व्यक्तींचा मूर्खपणा सहन करायला तो सिद्ध होता.पण मानवजातीचा मूर्खपणा पाहून मात्र त्याला तिरस्कार वाटे.तो एके ठिकाणी लिहितो, 'मानवा,तुझ्या जातीविषयी तुला काय वाटते? मानवजातीची मूर्खता व तिचा टोणगेपणा पाहून तुला लाज नाही वाटत?"
पोकळ मानसन्मानांसाठी सदैव आपसात झगडणारे राजे व सरदार पाहून त्याला गंमत वाटे.त्याचे आश्रयदाते राजवैभवाच्या कलेत तज्ज्ञ होऊ पाहत होते;पण लिओनार्डो कलेच्या राजवैभवात - भक्तिप्रेमात रंगला होता.त्याला जीवनाचा खरा - आनंद सौंदर्यातच सापडला. इतर सारे खटाटोप 'मृगजळापाठीमागे लागण्याप्रमाणे फोल' असे तो म्हणे. (Koheleth प्रमाणे) महत्त्वाकांक्षेत अर्थ नाही. आशा शेवटी निराशाच निर्मिते.तो लिहितो, "इच्छापूर्तीपेक्षा इच्छाच अधिक गोड असते. कीर्तीसाठी धडपडत असता स्वत:ची मान व दुसऱ्याच्या माना मोडून घेणे हे हास्यास्पद होय. झाडावर असताना गोड वाटणारे फळ तोंडात गेले म्हणजे कडू लागते.आपल्या शक्तीच्या मर्यादा ओळखण्यास आपण शिकले पाहिजे. फार मोठ्या ध्येयाची आशा धरणे मूर्खपणाचेच नव्हे;तर धोक्याचेही आहे.आपल्या बुद्धीच्या शक्तीनुसार आपण आपल्या महत्त्वाकांक्षेचे मोजमाप ठेवावे;आपल्या आशा- आकांक्षा त्या पूर्ण करणाऱ्या आपल्या शक्तीच्या पलीकडच्या असू नयेत.ज्यांची इच्छा आपण करतो ते प्राप्त होतेच असे नसल्यामुळे मिळू शकेल त्याचीच इच्छा आपण करू या.
इच्छा गोड असते; पण पूर्ती कडू असते, दुःखदायी असते.अशी कोणतीही निर्दोष देणगी नाही की जिच्यासाठी खूप कष्ट पडत नाहीत.हालांशिवाय,दुःखा-
शिवाय देणगीच नाही.लिओनार्डोसारख्या कलावंताच्या बाबतीत तर हे अधिकच सत्यार्थाने खरे आहे.कलावंताला अधिक निर्मिता येते,अधिक प्राप्त करून घेता येते;कारण तो दुःखही खूप सोसतो.ग्रीक कवींची अशी एक मीमांसा होती की,ज्ञान दुःखातून व वेदनांतूनच संभवते.जीवनाचा गंभीर अर्थ त्यांना समजला होता.म्हणूनच त्यांनी असा प्रचार मांडला. (Pathei Mathos). आपण सोसण्यास तयार असतो;म्हणूनच आपण शिकू शकतो.आपणास असलेल्या मृत्यूच्या जाणिवेमुळेच आपण जीवनाचा अर्थ समजू शकतो.
लिओनार्डोला जीवनाचा खोल अर्थ नीट समजला होता;कारण तो मृत्यूशी नीट परिचित होता,मृत्यूचा अर्थ त्याने पूर्णपणे ओळखला होता.त्याला वाटे की,मृत्यू मोठा फसव्या आहे. कधीही पूर्ण न होणाऱ्या आशांची आमिषे दाखवून फसविणे हेच मृत्यूचे काम ! जो भविष्यकाळ कधीही येणार नाही,त्याची आशा दाखवून मृत्यू फसवीत असतो.तो म्हणतो, "आपण नेहमी भविष्याची आशा करीत असतो; पण भविष्य आपल्यासाठी एकच निश्चित अशी गोष्ट ठेवीत असते व ती म्हणजे सर्व आशांचे मरण ! आपले सारे जीवन म्हणजे मरणाची तयारी.मी जगण्यासाठी शिकत आहे असे मला वाटे; पण ते शिकणे वस्तुतः मरण्यासाठीच होते."
पण लिओनार्डो जे जे भोगावे लागे,ते ते एखाद्या स्टोइकाप्रमाणे शांतीने व हसतमुखाने सहन करी.मृत्यूचे शेवटचे बोलावणे आले,तेव्हा तो दमल्याभागलेल्या मुलाप्रमाणे झोपी जाण्यास तयार होता.विश्रांतीवर त्याचा हक्क होता. मरणापूर्वी थोडाच वेळ त्याने आपल्या मित्रास लिहिले,"एखादा दिवस चांगल्या कामात गेला, सार्थकी लागला,म्हणजे जशी झोप सुरेख लागते, तद्वत् ज्याने आपले जीवन नीट व्यतीत केले आहे,त्याला मरताना आनंद होतो."तो वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी वारला.त्याचा मित्र मेल्सी लिहितो,"त्याचा वियोग प्रत्येकाला दु:सह आहे. त्याच्या मरणामुळे सर्वांना दुःख होत आहे.असा आणखी एखादा पुरुष निर्माण करणे निसर्गाच्या शक्तीच्या बाहेरचे आहे." लिओनार्डोच्याच शब्दांत सांगायचे झाले तर,विभूतिमान पुरुषांविषयी त्याने काढलेलेच शब्द आपणास त्यालाही लावता येतील."तो मानवात जन्मलेला देवदूत होता. ' "
१३.७.२०२३ या लेखातील शेवटचा दुसरा भाग..
समाप्त…