* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/१/२४

शिकाऱ्यांच्या शिकारीवर.. On the hunt for hunters..|

सकाळचा चहा घेऊन येणाऱ्या नोकरासाठी इबॉटसन दरवाजा उघडतच होता,तेवढ्यात मी तिथे आलो.ती बातमी कळल्यावर त्याने पौरीला जायचा बेत पुढे ढकलला आणि जीनच्या पलंगावर मधोमध नकाशा ठेवून आम्ही पुढच्या योजना आखू लागलो.हेडक्वार्टर्समधलं इबॉटसनचं काम खूप तातडीचं होतं त्यामुळे तो जास्तीत जास्त दोन दिवस व दोन रात्री इथे राहू शकत होता.मी कालच नैनितालला टेलिग्राम केला होता की मी पौरी-कोटद्वारा मार्गे निघत आहे.ती तार रद्द करायची व रेल्वेने जाण्याऐवजी आल्या मार्गाने परतायचं असं मी ठरवलं.हे सर्व मार्गी लागल्यावर आम्ही त्या दुर्दैवी बाईचं गाव नकाशात शोधून काढलं आणि मी तंबूत परतलो. योजनेत बदल झाल्याचं मी माझ्या माणसांना सांगितलं आणि सर्व सामानाची बांधाबांध करून खबर द्यायला आलेल्या माणसांबरोबर आमच्या पाठीमागे यावं अशी सूचना दिली.

जीन रुद्रप्रयागमध्येच राहणार होती.इबॉटसनकडे एक गल्फ अरब जातीचा घोडा आणि इंग्लिश घोडी होती.ब्रेकफास्टनंतर आम्ही ह्या उत्कृष्ट जातीच्या घोड्यांवर स्वार होऊन चटवापिपलच्या दिशेने दौडत निघालो.आम्ही आमच्या सोबत रायफल्स,निळ्या ज्योतीचा स्टोव्ह,पेट्रोल लँप व इतर सटरफटर सामान घेतलं होतं.इबॉटसनचा एक नोकर घोड्यांसाठी चारा वैरण घेऊन,एक उसन्या घेतलेल्या घोड्यावरून आमच्या बरोबर निघाला.चटवापिपल पुलावरच आम्ही घोडे सोडले.कालच्या त्या जल्लोषाच्या भरात रात्री हा पूल बंद केला गेला नव्हता. 


त्यामुळे त्या बिबळ्याने रात्रीच नदी ओलांडली होती व लागणाऱ्या पहिल्याच गावात बळी मिळवला होता.

गावातला एक माणूस आमच्यासाठी पुलावर थांबला होता.तो आम्हाला पलीकडचा डोंगर चढून व गवताळ उताराच्या कडेने जात परत दरीत उतरून एका खोल आणि दाट जंगल माजलेल्या घळीत घेऊन गेला.त्या घळीतून एक छोटा झरा वाहत होता.इकडेच आम्हाला पटवारी आणि इतर वीस जण मृतदेहापाशी थांबलेले आढळले.यावेळचा बळी म्हणजे एक १८-२० वर्षाची तरूण मुलगी होती.दोन्ही बाजूला हात ठेवलेल्या अवस्थेत ती पालथी पडलेली होती.अंगावर एकही कपडा नव्हता आणि तळपायापासून ते मानेपर्यंत तिचं संपूर्ण शरीर चाटलं गेलं होतं.गळ्यावर व मानेवर चार मोठाले दाताचे व्रण होते.तिच्या धडावरचं आणि खालच्या भागातलं थोडं थोडं मास बिबळ्याने खाल्लेलं होतं.आम्ही डोंगर चढत असताना जे ढोलाचे आवाज ऐकले होते ते या पहारा देणाऱ्या लोकांनीच वाजवले होते.आता दुपारचे फक्त दोन वाजलेले असल्याने आणि आसपास कुठेही बिबळ्या असण्याची शक्यता नसल्याने आम्ही चहा पिण्यासाठी गावात गेलो.आमच्याबरोबर पटवारी व एक माणूस होता.

चहा पिऊन झाल्यावर आम्ही त्या मुलीला जिथे मारण्यात आलं होतं त्या घरात गेलो.हे एक शेताच्या मधोमध बांधलेलं दगडी घर होतं.या घरात ती मुलगी,तिचा नवरा व त्यांचं सहा महिन्यांचं मूल एवढे जण रहात होते.दोन दिवसांपूर्वीच जमीनीबाबतच्या एका कज्जामध्ये साक्ष देण्यासाठी तिचा नवरा पौरीला गेला होता आणि घराची जबाबदारी त्याने त्याच्या बापावर सोपवली होती.त्या रात्रीची जेवणं होऊन झोपायची वेळ झाली.मुलाला दूध पाजून झाल्यावर त्या मुलीने त्याला सासऱ्याच्या हातात दिलं,दरवाजा उघडला,बाहेर पाऊल टाकलं अन् उकीडवी बसली.(मी अगोदरच सांगितलंय की आमच्या पहाडी भागातल्या घरात संडास बाथरुम नसतात.) छोटं मूल आईकडून सासऱ्याकडे दिलं जात असताना रडायला लागलं त्यामुळे जरी बाहेरून काही आवाज आलाच असेल पण तसा काहीही आवाज आला नसेल याबद्दल माझी खात्री आहे तरी त्याला तो ऐकू आला नसणार.ही अंधारी रात्र होती.काही वेळ वाट पाहिल्यावर म्हाताऱ्याने हाक मारली पण उत्तर न मिळाल्याने अजून एकदा हाक मारली.त्यानंतर मात्र त्याने उठून घाईघाईने दरवाजा बंद करून घेतला.संध्याकाळी थोडासा पाऊस पडला होता. त्यामुळे आसपास नीट निरीक्षण केलं तर घटना संगतवार लावता येणं शक्य होतं.पाऊस थांबल्यानंतर थोड्याच वेळात गावाच्या दिशेकडून बिबळ्या तिथं आला होता व शेतातल्याच एका शिळेमागे दबून बसला.ही शिळा दरवाजाच्या डावीकडे तीस यार्डावर होती. तिच्याआड तो काहीवेळ बसला... बहुतेक



त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकत ! दरवाजा उघडून बाहेर आल्यावर ती मुलगी दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजेच बिबळ्याकडे थोडीशी पाठ करून उकीडवी बसली.बिबळ्याने शिळेला वळसा घालून घर व शिळा यामधलं तीस यार्ड अंतर पोट जमीनीला टेकवून सरपटत पार केलं आणि भिंतीच्या अगदी कडेकडेने जाऊन त्या मुलीला मागून पकडलं.त्यानंतर तिला शिळेपर्यंत ओढत घेऊन आला.इकडेच... ती मुलगी ठार झाल्यावर किंवा


 त्या माणसाने मारलेल्या हाकेचा आवाज आल्यावर त्याने तिला तोंडात धरून उचललं व नांगरलेल्या जमीनीवरून फरफटल्याच्या खुणा राहू नयेत अशा पद्धतीने तोंडातच पण जरा उंच पकडून एक शेत ओलांडलं.पुढे तीन फुटी बांधावरून खालच्या शेतात उडी मारली.हे शेत एका बारा फूट खोल बांधावर संपत होतं व त्याच्या खाली नीट मळलेली पायवाट होती.ही बारा फूट उडी त्याने तिला तोंडात घेऊनच मारली.त्या मुलीचं वजन जवळजवळ साठ किलो होतं.तरीही वाटेवर पाय टेकवल्यानंतरसुद्धा तिच्या शरीराचा एकही भाग जमीनीला टेकला नव्हता यावरून तुम्हाला त्या बिबळ्याच्या ताकदीची कल्पना येईल.पायवाट ओलांडून डोंगर उतारावरून तो खाली अर्धा मैल गेला होता व तिथे तिला टाकून तिचे सर्व कपडे ओरबाडून काढले होते.थोडंसं खाऊन झाल्यावर त्याने तिला वेलीचं छप्पर असलेल्या एका झाडाखाली, पाचूसारख्या हिरव्याकंच गवतावर टाकून दिलं होतं.


संध्याकाळी चार वाजता सोबत पेट्रोल लॅम्प व शूटींग लाईट घेऊन आम्ही मृतदेहाजवळ बसण्यासाठी निघालो.

मृतदेह शोधताना व नंतर पहारा करताना त्या माणसांनी केलेला गोंगाट बिबळ्याने ऐकलाच असणार असा अंदाज करायला हरकत नव्हती.आता जरी तो भक्ष्याजवळ आला तरी पूर्ण सावधगिरी बाळगूनच येणार हे निश्चित होतं म्हणून आम्ही भक्ष्याच्या अगदी जवळ न बसण्याचं ठरवलं. भक्ष्यापासून साठ यार्ड दूर एक झाड होतं व तिथून हिरवळीवरचं भक्ष्य व्यवस्थित दिसत होतं. त्यामुळे आम्ही हेच झाड निवडलं.


हे वाढ खुंटलेलं ओकचं झाड डोंगरावर उताराशी जवळजवळ काटकोन करून उभं होतं.आम्ही आमचा पेट्रोल लॅम्प एका छोट्या झाडाखालच्या खळ्यात लपवून पाईनच्या पानांनी झाकला. इबॉटसनने झाडाच्या फांद्या जिथे फुटल्या होत्या तिथे जागा घेतली तर मी टेकडीकडे तोंड करून झाडाशी पाठ देऊन बसलो.यावेळी इबॉटसन शॉर्ट घेणार होता व मी आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पहारा देणार होतो.बॅटरी गेल्यामुळे शूटींग लाईट चालू होत नव्हता.त्यामुळे इबॉटसनला नीट दिसेल तोपर्यंतच आम्ही बसणार होतो व नंतर पेट्रोल लॅम्पच्या साहाय्याने गावात परतणार होतो.तिथे रुद्रप्रयागवरून आलेली आमची माणसं वाट पाहत थांबणार होती.


आसपासच्या जमीनीचं नीट निरीक्षण करण्यासाठी आम्हाला वेळ उरला नव्हता,पण गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की भक्ष्य पडलेल्या जागेच्या पूर्वेकडे दाट जंगल आहे आणि त्याच जंगलात बिबळ्या गेला असण्याची जास्त शक्यता आहे.जर खरंच त्याच दिशेकडून बिबळ्या भक्ष्याकडे आला तर तो तिथे पोचण्याच्या बरंच अगोदर इबॉटसनला दिसणार होता कारण त्याच्या रायफलला टेलिस्कोपिक साईट बसवली होती.या साईटमुळे फक्त अचूक नेम लागतो असं नाही तर वरचा अर्धा तासही आम्हाला हाताशी मिळणार होता,काही टेस्ट्स घेऊन आम्ही ते पडताळूनही पाहिलं होतं. प्रकाशाचं एखादं मिनिट तेव्हा यश-अपयश ठरवायला कारणीभूत होणार असेल तेव्हा हा वेळेचा खरं म्हणजे प्रकाशाचा- घटक निर्णायक ठरतो.पश्चिमेकडच्या पहाडामागे सूर्य अस्ताला जायला लागला आणि काही मिनिटं आम्ही सावलीत आलो तेवढ्यात एक भेकर त्याचा अलार्म कॉल देत डोंगरावरून खाली भुंकत पळत आलं,डोंगराच्या कडेला ते जरा थांबलं व त्याच ठिकाणी थोडावेळ थांबून भुंकल्यावर पलीकडच्या बाजूला गेलं.त्याचा आवाज हळूहळू अस्पष्ट होत गेला.हे भेकर बिबळ्याला पाहून भुंकलं होतं हे निश्चित आणि जरी त्या भागात एका पेक्षा अधिक बिबळे असण्याची शक्यता होती तरी माझ्या आशा उंचावल्या.मी वळून पाहिलं तर इबॉटसनसुद्धा सावध झाला होता व त्याचे दोन्ही हात रायफलवर होते.


प्रकाश कमी होत होता तरीही अजून टेलिस्कोपिक साईटच्या मदतीशिवाय शूटींग करता येईल इतपत दिसू शकत होतं इतक्यात डोंगराच्या दिशेकडे असणाऱ्या झुडुपांच्या मागून एक पाईन कोन घरंगळत आला आणि माझ्या पायाशीच झाडाजवळ पडला.बिबळ्या आला होता आणि काहीतरी धोका जाणवल्यामुळे त्याने अशी दिशा पकडली होती की जिथून भक्ष्याच्या आसपासची सर्व परिस्थिती निरखून बघता येईल.दुर्दैव असं की असं करताना तो आणि भक्ष्य यांच्या सरळ रेषेतच आमचं झाडं आलं होतं.माझी फक्त बाह्याकृतीच दिसण्याची शक्यता होती.पण इबॉटसन झाडाच्या फांद्यांवर असल्याने तो मात्र बिबळ्याच्या नजरेतून सुटणार नव्हता.जेव्हा मी नेम धरू शकेन आणि इबॉटसनच्या टेलिस्कोपिक साईट्सचा उपयोग होईल इतकासुद्धा प्रकाश राहिला नाही तेव्हा बिबळ्या दबकत दबकत उतरून आमच्या दिशेला येताना मी ऐकलं.आता मात्र जे काही करायचं ते अगदी ताबडतोब करायला पाहिजे होतं.त्यामुळे मी पटकन इबॉटसनला माझी जागा घ्यायला सांगितलं आणि पेट्रोल लॅम्प हस्तगत केला.हा लॅम्प जर्मन मेकचा होता आणि त्याला 'पेट्रोमॅक्स' असं नाव होतं.त्याचा प्रकाश चांगला पडायचा पण त्याचं लांबुळकं धूड आणि लांबलचक हँडल यामुळे तो जंगलात वापरण्याच्या उपयोगाचाच नव्हता.


मी इबॉटसनपेक्षा थोडा उंच आहे त्यामुळे मीच लॅम्प हातात घेईन असं मी इबॉटसनला सुचवलं. पण इबॉटसन म्हणाला की,तो लॅम्प व्यवस्थित हाताळू शकेल.त्याच्या रायफलापेक्षा माझ्यावर अवलंबून राहाणं त्याला योग्य वाटलं असावं म्हणून इबॉटसन पुढे तर,रायफलवर दोन्ही हात ठेवून मी मागे असे आम्ही गावाच्या रस्त्याला लागलो.

शेतापासून पन्नास यार्डावर एका कातळावर चढताना इबॉटसनचा पाय घसरला, लॅम्पचा तळ खडकावर आपटला व मँटल धुळीत पडलं.पेट्रोल टाकीवर दिसणारी छोटी निळी ज्योत सुद्धा बऱ्यापैकी प्रकाश देत होती पण प्रश्न हा होता की एवढासा उजेड तरी किती वेळ टिकणार! इबॉटसनच्या म्हणण्याप्रमाणे तीन मिनिटं ही ज्योत राहील.तीन मिनिटं... जिथे दर सेकंदाला दगडधोंडे,

काटेकुटे चुकवण्यासाठी दिशा बदलून पावलं टाकावी लागणार होती आणि नरभक्षक पाठलागावर असण्याची शक्यता होती अशी ही डोंगराची वाट चढून जाणे हे एक भयानक आव्हानच होतं. (नंतर आम्हाला कळलं की खरोखर आमचा पाठलाग होत होता)


कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की नंतर कितीही वर्ष निघून गेली तरी तुमच्या आठवणीत तसेच कोरलेलेच राहतात.त्या दिवशी अंधारात ती चढण चढणे हा माझ्या बाबतीत असाच प्रसंग होता.

चढण चढून पायवाटेवर आल्यानंतरही नष्टचर्य संपलं नव्हतंच.कारण या वाटेवर म्हशींच्या असंख्य लोळणी होत्या आणि आमची माणसं कुठे आहेत ते आम्हाला माहीत नव्हतं.


कधी चिखलातून पाय घसरत तर कधी दगडगोट्यांवर ठेचा खात शेवटी आम्हाला काही दगडी पायऱ्या लागल्या.

या पायऱ्या उजवीकडे चढत गेल्या होत्या आणि त्या चढून वर आल्यावर आम्हाला एक अंगण लागलं.पलीकडे दरवाजा होता.पायऱ्या चढतानाच आम्ही हुक्क्याचा आवाज ऐकला होता.म्हणून मी दरवाजावर लाथ मारून ओरडून उघडायला सांगितला.जेव्हा उत्तर आलं नाही तेव्हा मी काड्यापेटी काढली आणि तिचा हलवून आवाज करत जोरात ओरडलो की जर एका मिनिटात दरवाजा उघडला नाही तर मी झोपडीला आग लावीन. मिनिटभरातच प्रथम आतला व नंतर बाहेरचा दरवाजा उघडला गेला.मी व इबॉटसन दोन ढांगात आत घुसलो तसा ताबडतोब दरवाजा बंद केला गेला.


या एवढ्याशा खोलीत निरनिराळ्या वयाची पुरुष,

बायका व मुलं अक्षरशः ठासून भरली होती.आमच्या अशा अनौपचारिक प्रवेशानंतर जेव्हा सर्वजण सावरले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडायला उशीर केल्याबद्दल माफी मागितली आणि सांगितलं की इतकी वर्ष दहशतीखाली काढल्याने आम्हाला रात्री येणाऱ्या प्रत्येक आवाजाचा संशय येतो व त्यामुळे दार उघडण्याचं धाडस झालं नाही.आम्हाला त्यांचं म्हणणं न पटण्याची शक्यता नव्हतीच.कारण इबॉटसन घसरून पडल्यावर जेव्हा मँटल धुळीत पडलं व कंदील फुटू नये म्हणून तो विझवायला लागला त्या क्षणापासून आतापर्यंत आमची मनोमन खात्री पटली होती की आमच्यातला एक किंवा कदाचित दोघंही जिवंतपणे गावात पोचू शकणार नाही.आम्हाला सांगितलं गेलं की आमची माणसं संध्याकाळीच गावात पोचली होती.ती असंच पुढे डोंगराच्या कडेला असलेल्या एका घरात थांबली आहेत.दोन धडधाकट माणसांनी आमच्याबरोबर रस्ता दाखवायला येण्याची तयारीही दर्शवली, पण परत येताना त्यांना एकटं यावं लागणार होतं आणि ती हत्याच ठरली असती.त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला एखादा तरी दिवा किंवा कंदील मिळेल का? खोलीचे कोपरे धुंडाळल्यावर त्यांना एक फुटक्या काचेचा कंदील मिळाला व जोरजोरात हलवल्यावर त्यात थोडं तेलही आहे हे समजलं.पटकन कंदील पेटवला गेला व खोलीतल्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही बाहेर पडलो.ताबडतोब आमच्या मागे दरवाजे घट्ट लावून कड्याही घातल्या गेल्या. पुन्हा एकदा त्या म्हशींच्या लोळणी,गवतात लपलेले दगडगोटे व काटे... पण मदतीला मंद का होईना प्रकाशाचं साधन असल्याने आम्ही झपाटा मारला आणि आम्हाला ज्या दुसऱ्यांदा लागणाऱ्या पायऱ्या चढायला सांगितल्या होत्या त्या शेवटी आल्या आणि आम्ही एका एकमजली इमारतीच्या अंगणात आलो.त्याच्या उजव्या डाव्या बाजूला दरवाजे होते ते सगळे घट्ट बंद होते;कुठेही थोडासुद्धा प्रकाश दिसत नव्हता.मी हाका मारल्यावर एक दरवाजा उघडला गेला. चार-पाच दगडी पायऱ्या चढल्यावर आम्ही वरच्या मजल्याच्या व्हरांड्यात आलो.तिथे आमच्या माणसांसाठी आणि आमच्यासाठी राखून ठेवलेल्या खोल्या होत्या.

आमची माणसं रायफली व कंदील आमच्या हातातून घेऊन आम्हाला मोकळं करत असताना एक कुत्रा कुठूनतरी तिथे आला.हा आपला साधासुधा गावठी कुत्रा होता व आमचे पाय हुंगल्यावर शेपटी हलवत तो आताच आम्ही चढून आलेल्या पायऱ्यापर्यंत गेला... आणि दुसऱ्याच क्षणी भीतीने दचकल्यासारखा आवाज काढून नंतर अंगात आल्यासारखा भुंकत मागे सरकला... त्याच्या अंगावरचे सर्व केस ताठ उभे राहिले होते! आमचा कंदील तर विझून गेला होता.पण आमच्या माणसांनी दुसरा कंदील पैदा केला.इबॉटसनने तो वर धरून सर्व कोनांतून फिरवला,मी चटकन रायफल लोड केली तरीही पायऱ्यांच्या खाली असणाऱ्या अंगणात उजेड पडलाच नाही.


त्या कुत्र्याकडे पाहूनच बिबळ्याच्या सर्व हालचालींचा अंदाज येत होता.तो अंगण ओलांडून पुढच्या पायऱ्या उतरून खालच्या पायवाटेला लागला तेव्हा शेवटी तो कुत्रा भुंकायचा थांबला व त्या दिशेकडे बघून मध्ये मध्ये गुरगुरत शेवटी खाली बसला.या दोन्ही खोल्यांना खिडक्या नव्हत्या.फक्त दरवाजा बंद करूनच आम्ही सुरक्षितपणे खोलीत झोपू शकलो असतो.पण त्यामुळे गुदमरायला झालं असतं.म्हणून आम्ही व्हरांड्यावरच रात्र घालवायचं ठरवलं.हा कुत्रा त्या खोलीच्या मालकाचाच असावा आणि त्याला व्हरांड्यात झोपायची सवयही असावी.

आळीपाळीने झोपत आम्ही ती रात्र घालवली पण पायाशीच झोपलेल्या कुत्र्यामुळे आम्हाला सुरक्षिततेची जाणीव मात्र होत राहिली.


२४.१२.२३ या लेखमालेतील पुढील भाग..


११/१/२४

वाईटाला ही चांगले म्हणा.. Call bad good..

'एखादा चांगला कर्मचारी कामात निष्काळजीपणा दाखवू लागला किंवा वाईट काम करू लागला तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याला नोकरीतून काढू शकता,पण त्यामुळे समस्या सुटू शकणार नाही.तुम्ही त्याच्यावर टीका करू शकता पण त्यामुळे त्याचं मन खट्टू होईल. हेन्री हॅक लॉवेल,इंडियानामध्ये एका मोठ्या ट्रक डीलरशीपचा सर्व्हिस मॅनेजर होता.तो आपल्या एका मेकॅनिक-बिल

पासून त्रस्त होता,ज्याचं काम सध्या समाधानकारक नव्हतं.मिस्टर हँकने त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्याच्याशी मनमोकळी चर्चा केली.।


"बिल,तू एक चांगला मेकॅनिक आहेस.तू अनेक वर्षांपासून इथे काम करतो आहेस. ग्राहकांची अनेक वाहनं तू चांगल्या प्रकारे दुरुस्त केली आहेत.तुझं काम इतकं उत्तम आहे की अनेक ग्राहक तुझी स्तुती करतात.पण मागील काही दिवसांत तुझ्या कामात तू दिरंगाई करतो आहेस. तुझं काम आधीसारखं उत्तम राहिलेलं नाही. चांगला मेकॅनिक असल्याने मला तुला हे सांगावंस वाटतं की मी या स्थितीत खूश नाहीये. पण आपण दोघे मिळून या परिस्थितीवर तोडगा काढू शकतो."


बिलने उत्तर दिले की,'मला हे उमजलंच नाही की मी आधीइतकं चांगलं काम करत नाहीए.' त्याने आपल्या बॉसला आश्वासन दिलं की मी अजूनही तितकंच उत्तम काम करू शकतो. यापुढे सुधारण्याचा प्रयत्न करीन.


तर मग त्याने तसे केले का? तुम्हाला कळलेच असेल की त्याने तसेच केले असणार.तो पुन्हा एकदा उत्तम व कुशल मेकॅनिक झाला.मिस्टर हँकने भूतकाळाच्या त्याच्या कामाची त्याच्यासमोर जी प्रतिमा बनवली होती त्या प्रतिमेला बिल जागला.


'बाल्डविन लोकोमोटिव्ह वर्क्स'चे अध्यक्ष सॅम्युअल वॉक्लेनने म्हटलं होतं,"साधारण माणसाला सहजपणे प्रेरित केलं जाऊ शकतं,जर तो तुमचा आदर करत असेल तर; आणि जर तुम्ही त्याला हे सांगितलंत की तुम्ही त्याच्या एखाद्या विशेष योग्यतेसाठी त्याचा आदर करता."


थोडक्यात,जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट सुधारायची असेल तर असं दाखवा की तो त्या व्यक्तीचा सर्वश्रेष्ठ गुण आहे.


शेक्सपियरनं म्हटलं होतं,"जर तुमच्यात कुठलाच गुण नसेल तर,असा व्यवहार करा की जणू काही तो गुण तुमच्यात आधीपासूनच आहे." 


आणि लोकांना पण स्पष्टपणे सांगून द्या की तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये जो गुण पाहू इच्छिता तो त्याच्यात आधीपासूनच आहे.त्यांची चांगली प्रतिमा बनवा.


जॉर्जेट लेब्लांकनं आपलं पुस्तक 'सॉव्हेनियर्स, माय लाइफ विथ मॅटरलिंक'मध्ये सांगितलंय.की त्यांनी कशा त-हेनं एका बेल्जियन सिंड्रेलाचा अद्भूत कायापालट केला.


"शेजारच्या हॉटेलमधून एक नोकराणी माझं जेवण आणायची,"त्या लिहितात,"तिला 'मेरी द डिशवॉशर' म्हटलं जायचं. कारण तिनं आपली कारकीर्द भांडी घासणाऱ्या मोलकरणीच्या मदतनीसच्या रुपात सुरू केली होती.ती कुरुप दिसायची,तिचे डोळे थोडे तिरळे होते आणि पाय सळयांसारखे बारकुळे होते.तिची अंगकाठी किडकिडीत होती. तिच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता.


"एक दिवस जेव्हा आपल्या लाल हातात मेरी मॅकरोनीची प्लेट घेऊन उभी होती,तेव्हा मी तिला सरळपणे म्हटलं,

'मेरी,तुला कल्पना नाही की तुझ्यात किती गुण लपलेले आहेत.मेरीला आपल्या भावना लपवून ठेवण्याची सवय होती. ती काही क्षण थबकली.तिनं संकटाच्या विचाराने काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही.तिने प्लेट टेबलवर ठेवली आणि मग भोळेपणाने म्हणाली, "माझा यावर विश्वास बसत नाही." तिला याबाबतीत काही शंका नव्हती,

त्यामुळे तिने मला एकही प्रश्न विचारला नाही.ती किचनपर्यंत गेली आणि तिनं मी म्हटलेलं तिनं पुन्हा म्हटलं.तिच्या आस्थेमध्ये इतकी शक्ती होती की कुणीच तिची टर उडवली नाही.त्या दिवसानंतर लोक तिच्याशी चांगला व्यवहार करू लागले.पण सर्वांत अजब बदल मेरीत आला होता.तिला आता विश्वास वाटू लागला होता की तिच्यात अनेक सुप्त गुण होते. ती स्वतःचा चेहरा व शरीराकडे विशेष लक्ष देऊ लागली.त्यामुळे निद्रिस्त तारुण्य जागृत झालं आणि तिची कुरुपता नाहीशी झाली.


"दोन महिन्यांनी तिनं घोषणा केली की ती खानसाम्याच्या भाच्याशी लग्न करणार आहे.'मी एक लेडी बनणार आहे,' तिनं मला सांगितलं आणि मला धन्यवाद दिले.एका छोट्याशा वाक्यांनं तिचं पूर्ण जीवनच बदलून गेलं होत."


जॉर्जेट लेब्लांकने 'मेरी द डिशवॉशर'ला एका प्रतिमेत बसवलं होतं,जिच्या हिशोबाने ती व्यवहार करू शकेल आणि त्या प्रतिमेने तिचा कायापालट झाला होता.बिल पार्कर डेटोना बीच, फ्लोरिडामध्ये एका फूड कंपनीचे सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह होते.ते आपल्या कंपनीद्वारा निघणाऱ्या नवीन उत्पादनांमुळे खूप उत्साहित होते.त्यांना हे जेव्हा समजलं की एका मोठ्या फूड मार्केटच्या मॅनेजरने या उत्पादकांना आपल्या दुकानात ठेवण्यापासून मज्जाव केला, तेव्हा ते खूप दुःखी झाले.बिल पूर्ण दिवसभर यावर विचार करीत राहिले आणि त्या संध्याकाळी घरी जाण्याआधी त्याने पुन्हा एकदा दुकानात जाऊन प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.


"जॅक," तो म्हणाला, "जेव्हा मी सकाळी आले होतो तेव्हा मला असं जाणवलं की तेव्हा मी आमच्या उत्पादनांबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिली नव्हती.मी आता तुमचा थोडा वेळ घेईन, म्हणजे मी ती माहिती तुम्हाला नीट सांगू शकेन,जी मी आधी दिली नव्हती.मला नेहमीच या गोष्टीचा आदर वाटलेला आहे की तुम्ही नेहमी ऐकण्यासाठी इच्छुक असता व जर ते तुम्हाला मान्य झालं तर तुम्ही आपला निर्णय बदलण्यासाठी तयार राहता."


जॅक यानंतरसुध्दा ऐकायला नकार देऊ शकला असता का? अजिबात नाही,कारण त्याला आपल्या प्रतिमेला जागायचं होतं.


एका सकाळची गोष्ट आहे.डब्लिन,आयर्लंडचे एक दंत चिकित्सक डॉ.मार्टिन फिट्जह्यू अवाक झाले होते.

त्यांच्या एका रुग्णाने सांगितले की ज्या धातुच्या कपाने तो आपलं तोंड स्वच्छ करत होता,तो कप ठेवण्याचा होल्डर अस्वच्छ होता.खरं तर तो रुग्ण कागदी कपाने गुळण्या करत असे.परंतु व्यावसायिकदृष्ट्या हे योग्य नव्हतं की कप ठेवण्यासाठी अस्वच्छ होल्डरचा उपयोग केला जावा.

जेव्हा रुग्ण निघून गेला तेव्हा डॉक्टरांनी आपल्या खाजगी ऑफिसात जाऊन सफाई करणाऱ्या महिला कामगार ब्रिजिटला एक चिठ्ठी लिहिली.ब्रिजिट त्यांच्या ऑफिसची स्वच्छता करायला आठवड्यातून दोनदा येत असे.त्यांनी लिहिलं-


प्रिय ब्रिजिट,


मी तुला फार कमी वेळ भेटू शकतो.मी असा विचार केला की तुझ्या स्वच्छतेच्या इतक्या चांगल्या कामासाठी मी तुला धन्यवाद द्यायला वेळ काढायला हवा.तसं पाहिलं तर मला वाटतं की आठवड्यात दोनच दिवस,दोन तासाचा वेळ स्वच्छतेसाठी खूपच कमी असतो.जर तुला पण असे वाटत असेल की तुला 'कधीतरी' स्वच्छ करण्याच्या वस्तू,जसे की कपहोल्डर इत्यादींना साफ करायला जास्त वेळेची आवश्यकता आहे तर तू कृपया अर्धा तास जास्त काम करण्याची तसदी घे.उघडच आहे की मी या अतिरिक्त कामाचे जास्त पैसे देईन.


डॉ.फिट्जह्यू सांगतात, "दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये आलो तेव्हा माझे टेबल आरशाप्रमाणे चमकत होते आणि माझी खूर्चीसुद्धा इतकी गुळगुळीत झाली होती की मी त्यावरून जवळजवळ घसरून खालीच पडलो. मी आत्तापर्यंत जितके कप होल्डर्स बघितले होते त्यात सर्वांत चमकणारा होल्डर हा होता.मी स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीसमोर तिची एक प्रतिमा बनवली होती आणि या छोट्याशा प्रयत्नानंतर तिने आपले सर्वश्रेष्ठ काम केले.तिने या जास्तीच्या कामात किती जास्त वेळ लावला? बरोबर आहे तुमचं - अजिबातच नाही!"


एक जुनी म्हण आहे,"जर एखाद्या कुत्र्याला वाईट नाव दिलंत तर तो इतका वाईट वागेल की तुम्ही त्याचे प्राणच घेऊ पाहाल." पण जर तुम्ही त्याचे लाड केलेत,तर तुमच्यासाठी काय काय करतो ते पाहा!


श्रीमती रुथ हॉपकिन्स ब्रुकलीन न्यू यॉर्कमध्ये चौथीची शिक्षिका होती.शाळेत पहिल्या दिवशी तिने आपल्या वर्गाच्या उपस्थिती रजिस्टरला पाहिलं आणि नवीन सत्र सुरू करण्याच्या तिच्या उत्साहावर पाणी पडलं.यंदा तिच्या वर्गात टॉमी टी.आला होता,जो शाळेतला सर्वांत कुप्रसिध्द 'खोडकर मुलगा' होता.तिसरीची वर्गशिक्षिका नेहमी आपल्या सहकाऱ्यांकडे,प्रिन्सिपलकडे त्याची तक्रार करीत असे.तो केवळ वांडच नव्हता,तर वर्गात गंभीर समस्यासुद्धा निर्माण करीत असे.तो सगळ्या मुलांशी भांडत असे,मुलींना छेडत असे आणि शिक्षकांना तर बेजार करत असे,वयाप्रमाणे त्याच्या या खोड्या वाढतच चालल्या होत्या.

त्याच्यात एकच गोष्ट चांगली होती आणि ती म्हणजे तो वेगाने शिकत असे व अभ्यासात हुशार होता.


श्रीमती हॉपकिन्सने तत्काळ टॉमीच्या समस्येचे निराकरण करायचं ठरवलं.जेव्हा ती आपल्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत करीत होती,तेव्हा तिने प्रत्येकाशी या त-हेने गप्पा केल्या,"रोझ,तुझा पोशाख खूप सुंदर आहे." "एलिलिया,मी ऐकलंय की तू खूप छान चित्र काढतेस."जेव्हा ती टॉमीजवळ आली तेव्हा त्याच्या डोळ्यात बघत तिने म्हटले


'टॉमी,मला वाटतं की तू स्वाभाविकच लीडर आहेस,

नेता आहेस.मला असं वाटतं की तू या वर्गाचा मॉनिटर व्हावंस. मुलांना सांभाळायला तू माझी मदत कर म्हणजे यंदा चौथीचा आपला वर्ग शाळेतला सर्वोत्कृष्ट वर्ग होईल." सुरुवातीच्या दिवसांत शिक्षिकेने टॉमीच्या प्रत्येक गोष्टीची वारंवार स्तुती केली आणि तो किती चांगला विद्यार्थी आहे हे त्याला सांगितलं.अशी स्वतःची प्रतिमा उंचावल्यावर तर नऊ वर्षांचा हा मुलगा,आपल्या उंचावलेल्या प्रतिमेला कायम राखण्यासाठी विवश झाला आणि त्याने आपल्या शिक्षिकेच्या नजरेतली प्रतिमा बदलू दिली नाही.जर तुम्हाला दुसऱ्यांच्या व्यवहाराला किंवा वागणुकीला बदलण्याच्या कठीण नेतृत्व-

आव्हानात निपुण व्हायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला इतकी प्रतिष्ठा द्या किती योग्य कार्य करण्यासाठी सिद्ध होईल.


२६.१२.२३ या लेखातील पुढील भाग..


९/१/२४

मर्डर स्वतः चा / Murder itself...


हा मला नेहमी इथेच भेटतो, याचं नाव.... जाऊ दे.... नावात काय आहे ? 


उंची असेल साधारण पाच फूट,वर्ण सावळा, अगदीच किरकोळ बांधा आणि केस वाढलेले...


हा स्वतः भिक मागत नाही;परंतु जे लोक भीक मागतात त्यांच्या हातातून याला हवी असलेली गोष्ट तो ओढुन घेतो... नाही दिली तर त्यांना शिव्या देतो,प्रसंगी हात उचलतो... सर्वांसाठी अत्यंत उपद्रवी असा हा मुलगा ! 


साधारण चार वर्षांपूर्वी मला हा भेटला आणि कसं कोण जाणे ? परंतु याला माझा लळा लागला... 


माझ्याशी अत्यंत प्रेमाने अदबीने आणि नम्रतेने तो वागतो,प्रसंगी माझ्यावर हक्क दाखवतो... 


माझा कोणताही शब्द तो पडू देत नाही... बरं माझ्याकडून याची कोणतीही अपेक्षा नाही. 


का करत असेल माझ्यावर इतकं प्रेम ? याचा मी नेहमीच विचार करतो. 


इतरांना तो खूप त्रास देतो हे मला नेहमीच खटकतं परंतु तरीही हळूहळू मलाही त्याचा लळा लागला...


परंतु इतक्या दिवसात तो नेमका कसा आहे ?हे मी अजून ओळखू शकलो नाही.तो जेवढा राकट आणि रानवट आहे तितकाच तो हळवा आणि संवेदनशील आहे.... त्याची दोन्ही रूपं मी नेहमी अनुभवत असतो.


इतरांना किळसवाणे वाटेल असे ड्रेसिंग मी करत असताना मला येऊन अगदी तन्मयतेने मदत करतो... त्याला किळस वाटत नाही. 


हात पाय मोडलेल्या रस्त्यावरच्या एखाद्या पेशंटला उचलून रिक्षा किंवा ॲम्बुलन्स मध्ये ठेवायला मदत कर,

म्हटलं तर त्या व्यक्तीला अजिबात दुखणार नाही,याची काळजी घेऊन फुलासारखे अलगद तो त्याला उचलतो... 


एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये सोडून ये; म्हणालो तर वाटेत जाताना त्याचा हात हातात घेऊन,कपाळावर हात ठेवून त्याला तो धीर देतो...


आणि बिथरला तर याच्या अगदी विरुद्ध.... हातात जे येईल ते घेऊन समोरच्या व्यक्तीला मारतो,मग त्याचा हात मोडो की पाय.... याला पर्वा नसते. 


मागच्या वेळी हातात मावणार नाही,एवढा मोठा दगड घेऊन तो एकाच्या डोक्यात घालायला निघाला होता वरच्यावर त्याचा हात मी अडवला.... 


पशुचे क्रौर्य आणि माणसातील माणुसकी अशा दोन्ही गोष्टी याच्यात ठासून भरल्या आहेत,कोणत्या वेळी हा नेमका कसा वागेल ? याचा काहीही भरवसा नसतो... मला अजूनही तो कळला नाही हेच खरं....! 


बऱ्याचदा फिल्मी स्टाईल मध्ये तो मला म्हणतो, 'तुमच्यासाटी काय पन करंल सर आपन ... तुमच्यासाटी एकांदा मर्डर बी करायला आपन मागं फुडं बगनार नाय ' 


प्रत्येक व्यक्तीमध्ये पशु आणि मानव दोघेही लपलेले असतात कोणत्या वेळी कोणी डोके वर काढायचे हे संस्कार ठरवतात....


आई-वडिलांचे छत्र लहानपणी हरवले,गरीब मावशीने सांभाळ केला... परिस्थितीशी झगडता झगडता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट उत्तर देत तो इथपर्यंत पोहोचला होता. जगणं हिच लढाई होते तेव्हा,संस्कार आपोआप माघार घेतात...


याच्यासाठी काहीतरी करायचं माझ्या डोक्यात होतं;परंतु काय करायचं आणि कसं करायचं हे कळत नव्हतं. 


एके दिवशी डोक्यात एक विचार घेवुन निघालो, तो भेटला... भेटला तसा, लहान मुलाप्रमाणे गळ्यात पडला... 


त्याला सहज विचारलं, 'तु नेहमी म्हणतोस ना? सर तुमच्यासाठी काय पण ... काय करू शकतोस तु माझ्यासाठी ?' 


'हो सर काय पन,तुमि सांगा,तुमच्यासाटी एकांदा  मर्डर बी करायला आपन मागं फुडं बगनार नाय '


५००० रुपयांची गड्डी त्याच्या खिशात ठेवत मी म्हणालो,'माझं एक काम होतं,करशील का ?'


'एक काय,धा कामं सांगा ना सर,तुमच्यासाटी काय पन ...  बोला ना काय करायचं ? तो बेफिकिरीने हाताच्या बाह्या वर घेत म्हणाला.


त्याच्या कानाजवळ जावून हळुच म्हणालो,'एक मर्डर करायचा आहे'


तो जवळपास उडालाच..'क्काय करायचं आहे ?' त्याने आश्चर्याने पुन्हा विचारलं. 


"म-र्ड-र" तिन्ही शब्दांवर दाब देत पुन्हा त्याच्या काना जवळ जाऊन म्हणालो.पहिले पाच हजार दिले आहेत पुढचे नंतर बघू...


त्याचा विश्र्वास बसेना....


'आवो सर काय बोलताय ? कुनाचा मर्डर करायचा ? 


'सांगतो '


'आनी कशासाटी?'


'ते हि सांगतो '


'आवो पन सर आज काय असं भंजाळल्यावानी बोलताय ?' तो वैतागुन म्हणाला. 


'का रे घाबरलास का ?'


याचे उत्तर त्याने दिलं नाही.... रस्त्यावर पडलेली एक काडी घेऊन तो बसल्या जागी रेघोट्या मारत विचार करायला लागला.त्याच्या मनात कदाचित द्वंद्व सुरू झालं असावं. 


'का रे घाबरलास ना ?' खांद्याला धरून त्याला हलवून म्हणालो. 


'तसं नाय वो सर,पन इतके दिवस मी तुम्हाला बगतोय,तुमि लोकांची सेवा करता,त्यांना जगवता आनी आज मर्डरच्या गोष्टी करू लागले...' तो भांबावून गेला होता .... कावरा बावरा झाला होता. 


त्याला म्हटलं,'इथं खूप गर्दी आहे बस गाडीवर,आपण दुसरीकडे जाऊन बोलू ....' आज पहिल्यांदाच तो अत्यंत नाखुशीने माझ्यामागे बसला.वाटेत जाताना म्हणाला,एक बोलू का सर?डॉक्टर म्हनुन तुमचं काम आहे माणसाला जगवणं... आज तुमि मर्डरची गोष्ट केली आपल्याला नाही आवडलं... आपल्या मनातून उतरले राव तुमि....' अत्यंत पडलेल्या आवाजात तो बोलत होता.गाडी चालवत असताना मला त्याचा चेहरा दिसत नव्हता;परंतु तो कसा झाला असेल,

याची मला कल्पना आहे. 


आपल्या मनात ज्यांच्याबद्दल आदर असतो, असे लोक चुकीचे वागायला लागले,की आदर नावाच्या भावनेचा फुगा फुटतो,त्याचंही नेमकं तेच झालं असावं...! 


मी त्याच्या मनातून पूर्णतः उतरलो होतो,याची मला जाणीव झाली.   


तरीही मी त्याला म्हणालो,'का रे ? तूच म्हणाला होतास ना तुमच्यासाठी मर्डर सुद्धा करू शकतो' 


'अवो सर आपुन भांडन मारामाऱ्या करतो शिव्या देतो,पण एकांद्या जीवाला आपुन कायमचे संपवू शकत नाय..आपुन तितके हरामी नाय....

तुमच्यासाटी मर्डर पन करू शकतो,याचा अर्थ मी तुमच्यासाठी काय पन करू शकतो असा होतो,  पन म्हनून काय खरंच तुमी माझ्याकडून मर्डर करून घेणार का ? 


गाडी थांबवून एका ठिकाणी त्याला बसवत म्हणालो,'ते काहीही असो,तुला एक मर्डर करायचा आहे... ऍडव्हान्स दिला आहे... 


'कुनाचा मर्डर करायचा आहे ?' त्याने चाचरत, रडवेल्या स्वरात विचारले. 


'तुझाच....'  त्याच्याकडे पाहत ठामपणे मी बोललो. 


'क्काय???' म्हणत जवळपास किंचाळत तो ओरडला. 


सुकलेलं पान अलगद गळून पडावं;तशी त्याची उरली सुरली सहनशक्ती आणि माझ्या बद्दलचा असलेला आदर आता गळून पडला.


xxxx माजा मर्डर करायला मलाच पैशे देतो ? थांब तु xxxx असा ऐकणार नाहीस.... तुला मी दाकवतोच आता.... साल्या तुला मी काय समजलो आणि तू काय निघालास...'


शिव्यांची लाखोली वाहत,मला मारण्यासाठी हातात काही सापडते का,ते तो आजूबाजूला शोधू लागला.... त्याचा अवतार आता भयानक झाला होता. 


त्याचा हात धरण्याचा मी प्रयत्न केला;परंतु त्याने माझ्या हाताला हिसडा दिला... तो आता आवरण्याच्या पलीकडे गेला होता...


थांब थांब,आता फक्त शेवटचं माझं बोलणं ऐकून घे;म्हणत महत्प्रयासाने मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो.तोंडातून शिव्या अजुन सुरूच होत्या.तो ऐकेचना....


आता मात्र त्याच्या तोंडावर माझा हात दाबून अधिकारवाणीने म्हणालो, 'बास लय नाटक झालं तुझं...

आता दहा मिनिट मी काय सांगतो ते ऐकून घे,त्यानंतर पुन्हा शिव्या दे...


तो मुकाट्यानं बसला...


'ऐक,तू पहिल्यांदा मला भेटलास त्याला चार वर्षे झाली...का ते मला माहित नाही; परंतु तुझ्या मनात तू मला मानाचं स्थान दिलं... माझ्यासाठी तू वाटेल ते करायला तयार होतास. 


किळस येईल,अशा रुग्णांची सेवा तू पूजा केल्याप्रमाणे करत होतास,तुझ्या मध्ये मला देव दिसायला लागला. 


बिन आई बापाचा पोरगा तू.... मी तुझ्याकडे बापाच्या नजरेने पाहायला लागलो.माझाच मुलगा समजून मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करायला लागलो.हि झाली माझी बाजू;पण दुसऱ्या बाजूने तु जे काही इतरांच्या बाबतीत वागतोस,

त्यामुळे तू कोणालाही आवडत नाहीस. 


उठ सूट एखाद्याच्या डोक्यात दगड घालायची भाषा करतोस,एखादवेळी पोलिसांच्या तावडीत सापडलास तर जेलमध्ये माझ्या डोळ्यादेखत सडशील.... 


किंवा तुझ्यावर जी मंडळी नाराज आहेत तेच तुझा डोक्यात दगड घालून खून करतील.. ! 


ज्याला मी मुलगा समजतो,त्याच्या बाबतीत हे असं झालेलं मला आवडेल का ? 


ज्या दिवशी तू येत नाहीस ना,त्या दिवशी लोकांना आनंद होतो.... उद्या तु मेल्यावर हे लोक पेढे वाटतील... 


असलं कसलं आयुष्य रे... ? 


आपल्या असण्याने कोणालातरी आनंद होतो आणि आपल्या नसल्याने कोणालातरी दुःख होतं ते खरं आयुष्य...! आपण मेल्यावर लोकांनी रडावं असं वाटत असेल तर,आपण जिवंत असताना त्यांना हसवलं पाहिजे बाळा...


पण तू मात्र त्यांना कायम रडवतोस.... ! 


तुला वाटतं,तुला पाहून लोकांनी घाबरावं... तूझा दरारा निर्माण व्हावा....म्हणजे तू हिरो होशील.... 


येड्या,आपल्याला पाहून कोणालातरी भीती वाटते,

यापेक्षा आपल्याला पाहून कोणाची तरी भीती जाते,याचं सुख जास्त असतं मर्दा... खरा हिरो तो असतो... ! 


"भाई" व्हायला नाही; "भाऊ" व्हायला काळीज लागतं...


एखाद्याला ढकलून पाडायला ताकद नाही लागत .... पडलेल्या एखाद्याला हात देऊन उचलायला ताकद लागती बाळा.... 


त्याचा चेहरा आता बदलत चालला होता.... 


मला जाणवत होतं,त्याला बरंच काही कळतंय;  परंतु अजून बरंच समजायचं राहिलंय ....


बाळा,तुझ्या मध्ये ना,एक देवमाणूस लपला आहे; पण त्याच्या मागे एक ना- लायक, ना- करता, गुन्हेगार राक्षस सुद्धा बसला आहे... आत्तापर्यंत मला ज्या शिव्या दिल्यास ना.... त्या शिव्या तू त्याला दे,मला नाही... ! 


आतापर्यंत मी जो मर्डर करायचा म्हणतोय ना, तो याच राक्षसाचा.... !


त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं.... ! 


अजून फोड करून सांगणं आवश्यक होतं....


बाळा आपण केळ खातो... साली सकट खातो का ? साल काढून फेकून द्यावीच लागते ना ? नारळ फोडून खोबरे खातो... वरची करवंटी फेकून द्यावी लागते ना ? 


तसंच हे... तुझ्यात बसलेल्या राक्षसाला तुलाच बाहेर काढून फेकुन द्यावे लागेल... माणूस म्हणून तुला जगायचं असेल, तर या राक्षसाचा मर्डर तुलाच करावा लागेल.... कळतंय का ??? 


मला नेमकं काय म्हणायचंय,ते त्याला आत्ता उमगलं...त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि अक्षरशः एखाद्या लहान पोरागत रस्त्यावर माझ्या कुशीमध्ये येऊन तो ढसाढसा रडायला लागला...


'ए सर,आपल्याला आय बाप नाहीत,तु आपला बापच झाला राव,आपल्याला याआधी आसलं साल्लं कुणी सांगितलं नाही,अपुन त्या राक्षसाला आता खल्लास करणार... बघ तु... पन तु ऱ्हाशील ना आपल्या सोबत कायम ???' 


मी त्याला जवळ ओढून पाठीवर थोपटत राहिलो...


त्याच्या चेहऱ्यावर आता वेदना होत्या....


असणारच की.... नारळावर नको असलेले केसर उपटून ओढून काढताना त्या नारळाला सुद्धा वेदना होतच असतील की... हापूस आंब्याला,मीच फळांचा राजा आहे;हे सिद्ध करण्यासाठी,हृदयातून आरपार सुरी फिरवून स्वतःच्या फोडी करून घ्याव्याच लागतात.... 


इथं स्वतःच्या शरीरात लपलेल्या राक्षसाला ओढून काढून त्याचा "वध" करायचा होता,मग वेदना तर होणारच की.... 


आज त्याने स्वतःतल्या राक्षसाला ओढून बाहेर काढले....  A Perfect Murder... !!!


तिकडे तो रडत होता आणि इकडे मी खदाखदा हसत होतो, डोळ्यादेखत एक "मर्डर" होऊन सुद्धा....! यानंतर या पाच हजार रुपयांमध्ये,रस्त्यावरच मोबाईल ॲक्सेसरीज (हेडफोन, मोबाईलचे कव्हर इत्यादी) विकण्याचा व्यवसाय त्याला आपण टाकून दिला. 


तो आता हा व्यवसाय करतो,जमेल तेव्हा येऊन मला मदत करतो आणि सर्वात महत्त्वाचं,म्हणजे कोणाच्याही हातातून कोणतीही वस्तू तो हिसकावून घेत नाही,उलट येताना त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येतो...! 


हल्ली तो "आनंद" वाटत फिरतो... !!! 


"आनंद मरता नही" किती खरं आहे हे वाक्य...! 


"हा"' कधी येतो....  म्हणून आज लोक त्याची वाट बघतात...


हि नवनिर्मिती पाहताना; बाप झाल्याचा मला पुन्हा आनंद होतो... पुन्हा आनंद होतो.... पुन्हा पुन्हा आनंद होतो...! 


या सर्व घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले...! 


मागच्या महिन्यामध्ये मला तो भेटला आणि म्हणाला, 'सर पुढच्या महिन्यामध्ये माझा "बड्डे" आहे...'


बड्डे... वाढदिवस... ! 


वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन वाढ झालीच पाहिजे असं काही नाही... बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचा ऱ्हास झाला तरी ती शेवटी वाढच असते....कणाकणाने रात्र संपत जाते तेव्हाच तर सूर्य उगवतो,...तिरस्कार नाश पावतो,तेव्हाच तर प्रेम निर्माण होतं...


यानेही याच्यातल्या राक्षसाला संपवले, म्हणून आज तो माणूस म्हणून उभा आहे...!!!


हि सर्व प्रक्रिया अत्यंत शांततेत घडली होती.... 


बीज रुजताना आवाज होत नाही.... झाड मोडताना कडाड - धडाड करुन धरणीकंप झाल्यासारखा आवाज होतो.... निर्मिती शांततेत होत असते.....आवाज विनाशाला असतो...!


माणूस होण्याची हि "नवनिर्मिती" अत्यंत शांततेत घडली होती आणि ही नवनिर्मिती आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रेट करायची ठरवली...


मधल्या काळात सौ.तेजस्विनीताई सुगंधी,यांचा मला फोन आला,त्या म्हणाल्या,'माझ्या मुलीची एक जुनी परंतु अत्यंत उत्तम कंडीशन मधील सायकल आहे ती तुम्हाला द्यायची आहे,त्याचे योग्य काय ते करावे'


वर वर्णन केलेला संपूर्ण प्रसंग हा ४ जानेवारी २०२३ चा आहे... याच दिवशी तो माणसात आला होता आणि म्हणून हिच त्याची जन्मतारीख असं मी समजतो.... 


यानंतर ४ जानेवारी २०२४  रोजी साईबाबा मंदिर,सातारा रोड येथे मी "त्याला" बोलावलं.


केक आणून त्याचा "बड्डे" सेलिब्रेट केला .... 


तेजस्विनी ताईंनी दिलेली सायकल त्याला भेट म्हणून दिली... 


ज्यांना तो यापूर्वी त्रास द्यायचा,असा समस्त भिक्षेकरी वर्ग त्याच्या वाढदिवसाला उपस्थित होता.... 


गंमत म्हणजे या समस्त वर्गाने त्याच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना केली...! 


सायकल दिल्यानंतर माझा हा मुलगा म्हणाला, 'सर आंदी तुम्ही सायकल चालवा,आन मंग मला द्या....


त्यात त्याची काय भावना असेल माहित नाही.... 


पण बऱ्याच वर्षानंतर मी सुद्धा सायकल चालवण्याचा आनंद घेतला...! 


कार्यक्रम संपला... मी निघालो... 


जाताना तो जवळ आला ...पाया पडला... म्हणाला, 'सर कुच काम होना तो बोलना...'


मी म्हणालो, 'एकच मर्डर करायचा होता... तो तू केलास .... आता माझं काही काम नाही तुझ्याकडे...' 


'बस क्या सर' म्हणत हसत तो पुन्हा कुशीत आला... 


यावेळी तो हसत होता आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते...


पोराच्या "जेवणाचा" विचार करते ती आई असते,

परंतु पोराच्या अख्ख्या "जीवनाचा" विचार करतो तो बाप असतो... ! 


या पोराला जन्माला घालून,आज मी परत बाप झालो.... परत परत बाप झालो....! 


जाताना त्याने केकचा तुकडा भरवला... मी तो मटकन खाऊन टाकला... हे सेलिब्रेशन होतं, माझ्या बाप होण्याचं... !!! 


मी गाडीला किक मारली... निघालो... संध्याकाळची गार हवा बोचत होती ....आणि डोक्यात गाणं वाजत होतं.... साला मै तो बाप बन गया... ! 


४ जानेवारी गुरुवार २०२४


डॉ.अभिजित सोनवणे,

डॉक्टर फॉर बेगर्स,

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर


तुमचा जन्म होणं ही दहा लाखातली एक गोष्ट आहे…


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं अस्तित्व हाच इतका मोठा चमत्कार आहे की,तो लक्षात घेत तुम्ही साजरा केला पाहिजे.कारण तुमची आई तिच्या आयुष्यात दहा लाख अंडज वागवते.तुम्ही जो गणितीय चमत्कार आहात त्याच्या जवळपासही फिरकत नाही ही संख्या अलीकडे झालेल्या संशोधनानुसार असं दिसून आलं आहे की,ज्या अंडजामुळे तुम्ही जन्माला आलात,त्या अंडजाने तुमच्या पित्याच्या २५ कोटी शुक्राणूंपैकी कुणाशी जोडून घ्यावं,हे ठरवताना अतिशय चोखंदळपणा दाखवला होता.तुमची निर्मिती करणाऱ्या अंडजाने दुसरा एखादा शुक्राणू निवडला असता,तर आज तुम्ही इथे नसता,कारण तुमचा कधी जन्मच झाला नसता.म्हणजे तुमचा जन्म हा एखाद्या चमत्काराहून कमी नाही. 


मेल रॉबिन्स द हाय फाईव्ह हॅबिट,या पुस्तकातील उतारा..।


आजचा हा लेख २४९ वा पृष्ठ संख्या - १३२१४

हा ब्लॉग मला भेट देणारे आमचे निर्मळ,प्रेमळ,

मित्र तरुण शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांचा आज जन्म दिवस त्यांना जन्मदिवसाचे आनंदी अभिष्टचिंतन…