* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मर्डर स्वतः चा / Murder itself...

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/१/२४

मर्डर स्वतः चा / Murder itself...


हा मला नेहमी इथेच भेटतो, याचं नाव.... जाऊ दे.... नावात काय आहे ? 


उंची असेल साधारण पाच फूट,वर्ण सावळा, अगदीच किरकोळ बांधा आणि केस वाढलेले...


हा स्वतः भिक मागत नाही;परंतु जे लोक भीक मागतात त्यांच्या हातातून याला हवी असलेली गोष्ट तो ओढुन घेतो... नाही दिली तर त्यांना शिव्या देतो,प्रसंगी हात उचलतो... सर्वांसाठी अत्यंत उपद्रवी असा हा मुलगा ! 


साधारण चार वर्षांपूर्वी मला हा भेटला आणि कसं कोण जाणे ? परंतु याला माझा लळा लागला... 


माझ्याशी अत्यंत प्रेमाने अदबीने आणि नम्रतेने तो वागतो,प्रसंगी माझ्यावर हक्क दाखवतो... 


माझा कोणताही शब्द तो पडू देत नाही... बरं माझ्याकडून याची कोणतीही अपेक्षा नाही. 


का करत असेल माझ्यावर इतकं प्रेम ? याचा मी नेहमीच विचार करतो. 


इतरांना तो खूप त्रास देतो हे मला नेहमीच खटकतं परंतु तरीही हळूहळू मलाही त्याचा लळा लागला...


परंतु इतक्या दिवसात तो नेमका कसा आहे ?हे मी अजून ओळखू शकलो नाही.तो जेवढा राकट आणि रानवट आहे तितकाच तो हळवा आणि संवेदनशील आहे.... त्याची दोन्ही रूपं मी नेहमी अनुभवत असतो.


इतरांना किळसवाणे वाटेल असे ड्रेसिंग मी करत असताना मला येऊन अगदी तन्मयतेने मदत करतो... त्याला किळस वाटत नाही. 


हात पाय मोडलेल्या रस्त्यावरच्या एखाद्या पेशंटला उचलून रिक्षा किंवा ॲम्बुलन्स मध्ये ठेवायला मदत कर,

म्हटलं तर त्या व्यक्तीला अजिबात दुखणार नाही,याची काळजी घेऊन फुलासारखे अलगद तो त्याला उचलतो... 


एखाद्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये सोडून ये; म्हणालो तर वाटेत जाताना त्याचा हात हातात घेऊन,कपाळावर हात ठेवून त्याला तो धीर देतो...


आणि बिथरला तर याच्या अगदी विरुद्ध.... हातात जे येईल ते घेऊन समोरच्या व्यक्तीला मारतो,मग त्याचा हात मोडो की पाय.... याला पर्वा नसते. 


मागच्या वेळी हातात मावणार नाही,एवढा मोठा दगड घेऊन तो एकाच्या डोक्यात घालायला निघाला होता वरच्यावर त्याचा हात मी अडवला.... 


पशुचे क्रौर्य आणि माणसातील माणुसकी अशा दोन्ही गोष्टी याच्यात ठासून भरल्या आहेत,कोणत्या वेळी हा नेमका कसा वागेल ? याचा काहीही भरवसा नसतो... मला अजूनही तो कळला नाही हेच खरं....! 


बऱ्याचदा फिल्मी स्टाईल मध्ये तो मला म्हणतो, 'तुमच्यासाटी काय पन करंल सर आपन ... तुमच्यासाटी एकांदा मर्डर बी करायला आपन मागं फुडं बगनार नाय ' 


प्रत्येक व्यक्तीमध्ये पशु आणि मानव दोघेही लपलेले असतात कोणत्या वेळी कोणी डोके वर काढायचे हे संस्कार ठरवतात....


आई-वडिलांचे छत्र लहानपणी हरवले,गरीब मावशीने सांभाळ केला... परिस्थितीशी झगडता झगडता चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट उत्तर देत तो इथपर्यंत पोहोचला होता. जगणं हिच लढाई होते तेव्हा,संस्कार आपोआप माघार घेतात...


याच्यासाठी काहीतरी करायचं माझ्या डोक्यात होतं;परंतु काय करायचं आणि कसं करायचं हे कळत नव्हतं. 


एके दिवशी डोक्यात एक विचार घेवुन निघालो, तो भेटला... भेटला तसा, लहान मुलाप्रमाणे गळ्यात पडला... 


त्याला सहज विचारलं, 'तु नेहमी म्हणतोस ना? सर तुमच्यासाठी काय पण ... काय करू शकतोस तु माझ्यासाठी ?' 


'हो सर काय पन,तुमि सांगा,तुमच्यासाटी एकांदा  मर्डर बी करायला आपन मागं फुडं बगनार नाय '


५००० रुपयांची गड्डी त्याच्या खिशात ठेवत मी म्हणालो,'माझं एक काम होतं,करशील का ?'


'एक काय,धा कामं सांगा ना सर,तुमच्यासाटी काय पन ...  बोला ना काय करायचं ? तो बेफिकिरीने हाताच्या बाह्या वर घेत म्हणाला.


त्याच्या कानाजवळ जावून हळुच म्हणालो,'एक मर्डर करायचा आहे'


तो जवळपास उडालाच..'क्काय करायचं आहे ?' त्याने आश्चर्याने पुन्हा विचारलं. 


"म-र्ड-र" तिन्ही शब्दांवर दाब देत पुन्हा त्याच्या काना जवळ जाऊन म्हणालो.पहिले पाच हजार दिले आहेत पुढचे नंतर बघू...


त्याचा विश्र्वास बसेना....


'आवो सर काय बोलताय ? कुनाचा मर्डर करायचा ? 


'सांगतो '


'आनी कशासाटी?'


'ते हि सांगतो '


'आवो पन सर आज काय असं भंजाळल्यावानी बोलताय ?' तो वैतागुन म्हणाला. 


'का रे घाबरलास का ?'


याचे उत्तर त्याने दिलं नाही.... रस्त्यावर पडलेली एक काडी घेऊन तो बसल्या जागी रेघोट्या मारत विचार करायला लागला.त्याच्या मनात कदाचित द्वंद्व सुरू झालं असावं. 


'का रे घाबरलास ना ?' खांद्याला धरून त्याला हलवून म्हणालो. 


'तसं नाय वो सर,पन इतके दिवस मी तुम्हाला बगतोय,तुमि लोकांची सेवा करता,त्यांना जगवता आनी आज मर्डरच्या गोष्टी करू लागले...' तो भांबावून गेला होता .... कावरा बावरा झाला होता. 


त्याला म्हटलं,'इथं खूप गर्दी आहे बस गाडीवर,आपण दुसरीकडे जाऊन बोलू ....' आज पहिल्यांदाच तो अत्यंत नाखुशीने माझ्यामागे बसला.वाटेत जाताना म्हणाला,एक बोलू का सर?डॉक्टर म्हनुन तुमचं काम आहे माणसाला जगवणं... आज तुमि मर्डरची गोष्ट केली आपल्याला नाही आवडलं... आपल्या मनातून उतरले राव तुमि....' अत्यंत पडलेल्या आवाजात तो बोलत होता.गाडी चालवत असताना मला त्याचा चेहरा दिसत नव्हता;परंतु तो कसा झाला असेल,

याची मला कल्पना आहे. 


आपल्या मनात ज्यांच्याबद्दल आदर असतो, असे लोक चुकीचे वागायला लागले,की आदर नावाच्या भावनेचा फुगा फुटतो,त्याचंही नेमकं तेच झालं असावं...! 


मी त्याच्या मनातून पूर्णतः उतरलो होतो,याची मला जाणीव झाली.   


तरीही मी त्याला म्हणालो,'का रे ? तूच म्हणाला होतास ना तुमच्यासाठी मर्डर सुद्धा करू शकतो' 


'अवो सर आपुन भांडन मारामाऱ्या करतो शिव्या देतो,पण एकांद्या जीवाला आपुन कायमचे संपवू शकत नाय..आपुन तितके हरामी नाय....

तुमच्यासाटी मर्डर पन करू शकतो,याचा अर्थ मी तुमच्यासाठी काय पन करू शकतो असा होतो,  पन म्हनून काय खरंच तुमी माझ्याकडून मर्डर करून घेणार का ? 


गाडी थांबवून एका ठिकाणी त्याला बसवत म्हणालो,'ते काहीही असो,तुला एक मर्डर करायचा आहे... ऍडव्हान्स दिला आहे... 


'कुनाचा मर्डर करायचा आहे ?' त्याने चाचरत, रडवेल्या स्वरात विचारले. 


'तुझाच....'  त्याच्याकडे पाहत ठामपणे मी बोललो. 


'क्काय???' म्हणत जवळपास किंचाळत तो ओरडला. 


सुकलेलं पान अलगद गळून पडावं;तशी त्याची उरली सुरली सहनशक्ती आणि माझ्या बद्दलचा असलेला आदर आता गळून पडला.


xxxx माजा मर्डर करायला मलाच पैशे देतो ? थांब तु xxxx असा ऐकणार नाहीस.... तुला मी दाकवतोच आता.... साल्या तुला मी काय समजलो आणि तू काय निघालास...'


शिव्यांची लाखोली वाहत,मला मारण्यासाठी हातात काही सापडते का,ते तो आजूबाजूला शोधू लागला.... त्याचा अवतार आता भयानक झाला होता. 


त्याचा हात धरण्याचा मी प्रयत्न केला;परंतु त्याने माझ्या हाताला हिसडा दिला... तो आता आवरण्याच्या पलीकडे गेला होता...


थांब थांब,आता फक्त शेवटचं माझं बोलणं ऐकून घे;म्हणत महत्प्रयासाने मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो.तोंडातून शिव्या अजुन सुरूच होत्या.तो ऐकेचना....


आता मात्र त्याच्या तोंडावर माझा हात दाबून अधिकारवाणीने म्हणालो, 'बास लय नाटक झालं तुझं...

आता दहा मिनिट मी काय सांगतो ते ऐकून घे,त्यानंतर पुन्हा शिव्या दे...


तो मुकाट्यानं बसला...


'ऐक,तू पहिल्यांदा मला भेटलास त्याला चार वर्षे झाली...का ते मला माहित नाही; परंतु तुझ्या मनात तू मला मानाचं स्थान दिलं... माझ्यासाठी तू वाटेल ते करायला तयार होतास. 


किळस येईल,अशा रुग्णांची सेवा तू पूजा केल्याप्रमाणे करत होतास,तुझ्या मध्ये मला देव दिसायला लागला. 


बिन आई बापाचा पोरगा तू.... मी तुझ्याकडे बापाच्या नजरेने पाहायला लागलो.माझाच मुलगा समजून मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करायला लागलो.हि झाली माझी बाजू;पण दुसऱ्या बाजूने तु जे काही इतरांच्या बाबतीत वागतोस,

त्यामुळे तू कोणालाही आवडत नाहीस. 


उठ सूट एखाद्याच्या डोक्यात दगड घालायची भाषा करतोस,एखादवेळी पोलिसांच्या तावडीत सापडलास तर जेलमध्ये माझ्या डोळ्यादेखत सडशील.... 


किंवा तुझ्यावर जी मंडळी नाराज आहेत तेच तुझा डोक्यात दगड घालून खून करतील.. ! 


ज्याला मी मुलगा समजतो,त्याच्या बाबतीत हे असं झालेलं मला आवडेल का ? 


ज्या दिवशी तू येत नाहीस ना,त्या दिवशी लोकांना आनंद होतो.... उद्या तु मेल्यावर हे लोक पेढे वाटतील... 


असलं कसलं आयुष्य रे... ? 


आपल्या असण्याने कोणालातरी आनंद होतो आणि आपल्या नसल्याने कोणालातरी दुःख होतं ते खरं आयुष्य...! आपण मेल्यावर लोकांनी रडावं असं वाटत असेल तर,आपण जिवंत असताना त्यांना हसवलं पाहिजे बाळा...


पण तू मात्र त्यांना कायम रडवतोस.... ! 


तुला वाटतं,तुला पाहून लोकांनी घाबरावं... तूझा दरारा निर्माण व्हावा....म्हणजे तू हिरो होशील.... 


येड्या,आपल्याला पाहून कोणालातरी भीती वाटते,

यापेक्षा आपल्याला पाहून कोणाची तरी भीती जाते,याचं सुख जास्त असतं मर्दा... खरा हिरो तो असतो... ! 


"भाई" व्हायला नाही; "भाऊ" व्हायला काळीज लागतं...


एखाद्याला ढकलून पाडायला ताकद नाही लागत .... पडलेल्या एखाद्याला हात देऊन उचलायला ताकद लागती बाळा.... 


त्याचा चेहरा आता बदलत चालला होता.... 


मला जाणवत होतं,त्याला बरंच काही कळतंय;  परंतु अजून बरंच समजायचं राहिलंय ....


बाळा,तुझ्या मध्ये ना,एक देवमाणूस लपला आहे; पण त्याच्या मागे एक ना- लायक, ना- करता, गुन्हेगार राक्षस सुद्धा बसला आहे... आत्तापर्यंत मला ज्या शिव्या दिल्यास ना.... त्या शिव्या तू त्याला दे,मला नाही... ! 


आतापर्यंत मी जो मर्डर करायचा म्हणतोय ना, तो याच राक्षसाचा.... !


त्याच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं.... ! 


अजून फोड करून सांगणं आवश्यक होतं....


बाळा आपण केळ खातो... साली सकट खातो का ? साल काढून फेकून द्यावीच लागते ना ? नारळ फोडून खोबरे खातो... वरची करवंटी फेकून द्यावी लागते ना ? 


तसंच हे... तुझ्यात बसलेल्या राक्षसाला तुलाच बाहेर काढून फेकुन द्यावे लागेल... माणूस म्हणून तुला जगायचं असेल, तर या राक्षसाचा मर्डर तुलाच करावा लागेल.... कळतंय का ??? 


मला नेमकं काय म्हणायचंय,ते त्याला आत्ता उमगलं...त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि अक्षरशः एखाद्या लहान पोरागत रस्त्यावर माझ्या कुशीमध्ये येऊन तो ढसाढसा रडायला लागला...


'ए सर,आपल्याला आय बाप नाहीत,तु आपला बापच झाला राव,आपल्याला याआधी आसलं साल्लं कुणी सांगितलं नाही,अपुन त्या राक्षसाला आता खल्लास करणार... बघ तु... पन तु ऱ्हाशील ना आपल्या सोबत कायम ???' 


मी त्याला जवळ ओढून पाठीवर थोपटत राहिलो...


त्याच्या चेहऱ्यावर आता वेदना होत्या....


असणारच की.... नारळावर नको असलेले केसर उपटून ओढून काढताना त्या नारळाला सुद्धा वेदना होतच असतील की... हापूस आंब्याला,मीच फळांचा राजा आहे;हे सिद्ध करण्यासाठी,हृदयातून आरपार सुरी फिरवून स्वतःच्या फोडी करून घ्याव्याच लागतात.... 


इथं स्वतःच्या शरीरात लपलेल्या राक्षसाला ओढून काढून त्याचा "वध" करायचा होता,मग वेदना तर होणारच की.... 


आज त्याने स्वतःतल्या राक्षसाला ओढून बाहेर काढले....  A Perfect Murder... !!!


तिकडे तो रडत होता आणि इकडे मी खदाखदा हसत होतो, डोळ्यादेखत एक "मर्डर" होऊन सुद्धा....! यानंतर या पाच हजार रुपयांमध्ये,रस्त्यावरच मोबाईल ॲक्सेसरीज (हेडफोन, मोबाईलचे कव्हर इत्यादी) विकण्याचा व्यवसाय त्याला आपण टाकून दिला. 


तो आता हा व्यवसाय करतो,जमेल तेव्हा येऊन मला मदत करतो आणि सर्वात महत्त्वाचं,म्हणजे कोणाच्याही हातातून कोणतीही वस्तू तो हिसकावून घेत नाही,उलट येताना त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येतो...! 


हल्ली तो "आनंद" वाटत फिरतो... !!! 


"आनंद मरता नही" किती खरं आहे हे वाक्य...! 


"हा"' कधी येतो....  म्हणून आज लोक त्याची वाट बघतात...


हि नवनिर्मिती पाहताना; बाप झाल्याचा मला पुन्हा आनंद होतो... पुन्हा आनंद होतो.... पुन्हा पुन्हा आनंद होतो...! 


या सर्व घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले...! 


मागच्या महिन्यामध्ये मला तो भेटला आणि म्हणाला, 'सर पुढच्या महिन्यामध्ये माझा "बड्डे" आहे...'


बड्डे... वाढदिवस... ! 


वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन वाढ झालीच पाहिजे असं काही नाही... बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीचा ऱ्हास झाला तरी ती शेवटी वाढच असते....कणाकणाने रात्र संपत जाते तेव्हाच तर सूर्य उगवतो,...तिरस्कार नाश पावतो,तेव्हाच तर प्रेम निर्माण होतं...


यानेही याच्यातल्या राक्षसाला संपवले, म्हणून आज तो माणूस म्हणून उभा आहे...!!!


हि सर्व प्रक्रिया अत्यंत शांततेत घडली होती.... 


बीज रुजताना आवाज होत नाही.... झाड मोडताना कडाड - धडाड करुन धरणीकंप झाल्यासारखा आवाज होतो.... निर्मिती शांततेत होत असते.....आवाज विनाशाला असतो...!


माणूस होण्याची हि "नवनिर्मिती" अत्यंत शांततेत घडली होती आणि ही नवनिर्मिती आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त सेलिब्रेट करायची ठरवली...


मधल्या काळात सौ.तेजस्विनीताई सुगंधी,यांचा मला फोन आला,त्या म्हणाल्या,'माझ्या मुलीची एक जुनी परंतु अत्यंत उत्तम कंडीशन मधील सायकल आहे ती तुम्हाला द्यायची आहे,त्याचे योग्य काय ते करावे'


वर वर्णन केलेला संपूर्ण प्रसंग हा ४ जानेवारी २०२३ चा आहे... याच दिवशी तो माणसात आला होता आणि म्हणून हिच त्याची जन्मतारीख असं मी समजतो.... 


यानंतर ४ जानेवारी २०२४  रोजी साईबाबा मंदिर,सातारा रोड येथे मी "त्याला" बोलावलं.


केक आणून त्याचा "बड्डे" सेलिब्रेट केला .... 


तेजस्विनी ताईंनी दिलेली सायकल त्याला भेट म्हणून दिली... 


ज्यांना तो यापूर्वी त्रास द्यायचा,असा समस्त भिक्षेकरी वर्ग त्याच्या वाढदिवसाला उपस्थित होता.... 


गंमत म्हणजे या समस्त वर्गाने त्याच्या निरोगी आयुष्याची प्रार्थना केली...! 


सायकल दिल्यानंतर माझा हा मुलगा म्हणाला, 'सर आंदी तुम्ही सायकल चालवा,आन मंग मला द्या....


त्यात त्याची काय भावना असेल माहित नाही.... 


पण बऱ्याच वर्षानंतर मी सुद्धा सायकल चालवण्याचा आनंद घेतला...! 


कार्यक्रम संपला... मी निघालो... 


जाताना तो जवळ आला ...पाया पडला... म्हणाला, 'सर कुच काम होना तो बोलना...'


मी म्हणालो, 'एकच मर्डर करायचा होता... तो तू केलास .... आता माझं काही काम नाही तुझ्याकडे...' 


'बस क्या सर' म्हणत हसत तो पुन्हा कुशीत आला... 


यावेळी तो हसत होता आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते...


पोराच्या "जेवणाचा" विचार करते ती आई असते,

परंतु पोराच्या अख्ख्या "जीवनाचा" विचार करतो तो बाप असतो... ! 


या पोराला जन्माला घालून,आज मी परत बाप झालो.... परत परत बाप झालो....! 


जाताना त्याने केकचा तुकडा भरवला... मी तो मटकन खाऊन टाकला... हे सेलिब्रेशन होतं, माझ्या बाप होण्याचं... !!! 


मी गाडीला किक मारली... निघालो... संध्याकाळची गार हवा बोचत होती ....आणि डोक्यात गाणं वाजत होतं.... साला मै तो बाप बन गया... ! 


४ जानेवारी गुरुवार २०२४


डॉ.अभिजित सोनवणे,

डॉक्टर फॉर बेगर्स,

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर


तुमचा जन्म होणं ही दहा लाखातली एक गोष्ट आहे…


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं अस्तित्व हाच इतका मोठा चमत्कार आहे की,तो लक्षात घेत तुम्ही साजरा केला पाहिजे.कारण तुमची आई तिच्या आयुष्यात दहा लाख अंडज वागवते.तुम्ही जो गणितीय चमत्कार आहात त्याच्या जवळपासही फिरकत नाही ही संख्या अलीकडे झालेल्या संशोधनानुसार असं दिसून आलं आहे की,ज्या अंडजामुळे तुम्ही जन्माला आलात,त्या अंडजाने तुमच्या पित्याच्या २५ कोटी शुक्राणूंपैकी कुणाशी जोडून घ्यावं,हे ठरवताना अतिशय चोखंदळपणा दाखवला होता.तुमची निर्मिती करणाऱ्या अंडजाने दुसरा एखादा शुक्राणू निवडला असता,तर आज तुम्ही इथे नसता,कारण तुमचा कधी जन्मच झाला नसता.म्हणजे तुमचा जन्म हा एखाद्या चमत्काराहून कमी नाही. 


मेल रॉबिन्स द हाय फाईव्ह हॅबिट,या पुस्तकातील उतारा..।


आजचा हा लेख २४९ वा पृष्ठ संख्या - १३२१४

हा ब्लॉग मला भेट देणारे आमचे निर्मळ,प्रेमळ,

मित्र तरुण शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांचा आज जन्म दिवस त्यांना जन्मदिवसाचे आनंदी अभिष्टचिंतन…