* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: शिकाऱ्यांच्या शिकारीवर.. On the hunt for hunters..|

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/१/२४

शिकाऱ्यांच्या शिकारीवर.. On the hunt for hunters..|

सकाळचा चहा घेऊन येणाऱ्या नोकरासाठी इबॉटसन दरवाजा उघडतच होता,तेवढ्यात मी तिथे आलो.ती बातमी कळल्यावर त्याने पौरीला जायचा बेत पुढे ढकलला आणि जीनच्या पलंगावर मधोमध नकाशा ठेवून आम्ही पुढच्या योजना आखू लागलो.हेडक्वार्टर्समधलं इबॉटसनचं काम खूप तातडीचं होतं त्यामुळे तो जास्तीत जास्त दोन दिवस व दोन रात्री इथे राहू शकत होता.मी कालच नैनितालला टेलिग्राम केला होता की मी पौरी-कोटद्वारा मार्गे निघत आहे.ती तार रद्द करायची व रेल्वेने जाण्याऐवजी आल्या मार्गाने परतायचं असं मी ठरवलं.हे सर्व मार्गी लागल्यावर आम्ही त्या दुर्दैवी बाईचं गाव नकाशात शोधून काढलं आणि मी तंबूत परतलो. योजनेत बदल झाल्याचं मी माझ्या माणसांना सांगितलं आणि सर्व सामानाची बांधाबांध करून खबर द्यायला आलेल्या माणसांबरोबर आमच्या पाठीमागे यावं अशी सूचना दिली.

जीन रुद्रप्रयागमध्येच राहणार होती.इबॉटसनकडे एक गल्फ अरब जातीचा घोडा आणि इंग्लिश घोडी होती.ब्रेकफास्टनंतर आम्ही ह्या उत्कृष्ट जातीच्या घोड्यांवर स्वार होऊन चटवापिपलच्या दिशेने दौडत निघालो.आम्ही आमच्या सोबत रायफल्स,निळ्या ज्योतीचा स्टोव्ह,पेट्रोल लँप व इतर सटरफटर सामान घेतलं होतं.इबॉटसनचा एक नोकर घोड्यांसाठी चारा वैरण घेऊन,एक उसन्या घेतलेल्या घोड्यावरून आमच्या बरोबर निघाला.चटवापिपल पुलावरच आम्ही घोडे सोडले.कालच्या त्या जल्लोषाच्या भरात रात्री हा पूल बंद केला गेला नव्हता. 


त्यामुळे त्या बिबळ्याने रात्रीच नदी ओलांडली होती व लागणाऱ्या पहिल्याच गावात बळी मिळवला होता.

गावातला एक माणूस आमच्यासाठी पुलावर थांबला होता.तो आम्हाला पलीकडचा डोंगर चढून व गवताळ उताराच्या कडेने जात परत दरीत उतरून एका खोल आणि दाट जंगल माजलेल्या घळीत घेऊन गेला.त्या घळीतून एक छोटा झरा वाहत होता.इकडेच आम्हाला पटवारी आणि इतर वीस जण मृतदेहापाशी थांबलेले आढळले.यावेळचा बळी म्हणजे एक १८-२० वर्षाची तरूण मुलगी होती.दोन्ही बाजूला हात ठेवलेल्या अवस्थेत ती पालथी पडलेली होती.अंगावर एकही कपडा नव्हता आणि तळपायापासून ते मानेपर्यंत तिचं संपूर्ण शरीर चाटलं गेलं होतं.गळ्यावर व मानेवर चार मोठाले दाताचे व्रण होते.तिच्या धडावरचं आणि खालच्या भागातलं थोडं थोडं मास बिबळ्याने खाल्लेलं होतं.आम्ही डोंगर चढत असताना जे ढोलाचे आवाज ऐकले होते ते या पहारा देणाऱ्या लोकांनीच वाजवले होते.आता दुपारचे फक्त दोन वाजलेले असल्याने आणि आसपास कुठेही बिबळ्या असण्याची शक्यता नसल्याने आम्ही चहा पिण्यासाठी गावात गेलो.आमच्याबरोबर पटवारी व एक माणूस होता.

चहा पिऊन झाल्यावर आम्ही त्या मुलीला जिथे मारण्यात आलं होतं त्या घरात गेलो.हे एक शेताच्या मधोमध बांधलेलं दगडी घर होतं.या घरात ती मुलगी,तिचा नवरा व त्यांचं सहा महिन्यांचं मूल एवढे जण रहात होते.दोन दिवसांपूर्वीच जमीनीबाबतच्या एका कज्जामध्ये साक्ष देण्यासाठी तिचा नवरा पौरीला गेला होता आणि घराची जबाबदारी त्याने त्याच्या बापावर सोपवली होती.त्या रात्रीची जेवणं होऊन झोपायची वेळ झाली.मुलाला दूध पाजून झाल्यावर त्या मुलीने त्याला सासऱ्याच्या हातात दिलं,दरवाजा उघडला,बाहेर पाऊल टाकलं अन् उकीडवी बसली.(मी अगोदरच सांगितलंय की आमच्या पहाडी भागातल्या घरात संडास बाथरुम नसतात.) छोटं मूल आईकडून सासऱ्याकडे दिलं जात असताना रडायला लागलं त्यामुळे जरी बाहेरून काही आवाज आलाच असेल पण तसा काहीही आवाज आला नसेल याबद्दल माझी खात्री आहे तरी त्याला तो ऐकू आला नसणार.ही अंधारी रात्र होती.काही वेळ वाट पाहिल्यावर म्हाताऱ्याने हाक मारली पण उत्तर न मिळाल्याने अजून एकदा हाक मारली.त्यानंतर मात्र त्याने उठून घाईघाईने दरवाजा बंद करून घेतला.संध्याकाळी थोडासा पाऊस पडला होता. त्यामुळे आसपास नीट निरीक्षण केलं तर घटना संगतवार लावता येणं शक्य होतं.पाऊस थांबल्यानंतर थोड्याच वेळात गावाच्या दिशेकडून बिबळ्या तिथं आला होता व शेतातल्याच एका शिळेमागे दबून बसला.ही शिळा दरवाजाच्या डावीकडे तीस यार्डावर होती. तिच्याआड तो काहीवेळ बसला... बहुतेक



त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकत ! दरवाजा उघडून बाहेर आल्यावर ती मुलगी दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजेच बिबळ्याकडे थोडीशी पाठ करून उकीडवी बसली.बिबळ्याने शिळेला वळसा घालून घर व शिळा यामधलं तीस यार्ड अंतर पोट जमीनीला टेकवून सरपटत पार केलं आणि भिंतीच्या अगदी कडेकडेने जाऊन त्या मुलीला मागून पकडलं.त्यानंतर तिला शिळेपर्यंत ओढत घेऊन आला.इकडेच... ती मुलगी ठार झाल्यावर किंवा


 त्या माणसाने मारलेल्या हाकेचा आवाज आल्यावर त्याने तिला तोंडात धरून उचललं व नांगरलेल्या जमीनीवरून फरफटल्याच्या खुणा राहू नयेत अशा पद्धतीने तोंडातच पण जरा उंच पकडून एक शेत ओलांडलं.पुढे तीन फुटी बांधावरून खालच्या शेतात उडी मारली.हे शेत एका बारा फूट खोल बांधावर संपत होतं व त्याच्या खाली नीट मळलेली पायवाट होती.ही बारा फूट उडी त्याने तिला तोंडात घेऊनच मारली.त्या मुलीचं वजन जवळजवळ साठ किलो होतं.तरीही वाटेवर पाय टेकवल्यानंतरसुद्धा तिच्या शरीराचा एकही भाग जमीनीला टेकला नव्हता यावरून तुम्हाला त्या बिबळ्याच्या ताकदीची कल्पना येईल.पायवाट ओलांडून डोंगर उतारावरून तो खाली अर्धा मैल गेला होता व तिथे तिला टाकून तिचे सर्व कपडे ओरबाडून काढले होते.थोडंसं खाऊन झाल्यावर त्याने तिला वेलीचं छप्पर असलेल्या एका झाडाखाली, पाचूसारख्या हिरव्याकंच गवतावर टाकून दिलं होतं.


संध्याकाळी चार वाजता सोबत पेट्रोल लॅम्प व शूटींग लाईट घेऊन आम्ही मृतदेहाजवळ बसण्यासाठी निघालो.

मृतदेह शोधताना व नंतर पहारा करताना त्या माणसांनी केलेला गोंगाट बिबळ्याने ऐकलाच असणार असा अंदाज करायला हरकत नव्हती.आता जरी तो भक्ष्याजवळ आला तरी पूर्ण सावधगिरी बाळगूनच येणार हे निश्चित होतं म्हणून आम्ही भक्ष्याच्या अगदी जवळ न बसण्याचं ठरवलं. भक्ष्यापासून साठ यार्ड दूर एक झाड होतं व तिथून हिरवळीवरचं भक्ष्य व्यवस्थित दिसत होतं. त्यामुळे आम्ही हेच झाड निवडलं.


हे वाढ खुंटलेलं ओकचं झाड डोंगरावर उताराशी जवळजवळ काटकोन करून उभं होतं.आम्ही आमचा पेट्रोल लॅम्प एका छोट्या झाडाखालच्या खळ्यात लपवून पाईनच्या पानांनी झाकला. इबॉटसनने झाडाच्या फांद्या जिथे फुटल्या होत्या तिथे जागा घेतली तर मी टेकडीकडे तोंड करून झाडाशी पाठ देऊन बसलो.यावेळी इबॉटसन शॉर्ट घेणार होता व मी आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पहारा देणार होतो.बॅटरी गेल्यामुळे शूटींग लाईट चालू होत नव्हता.त्यामुळे इबॉटसनला नीट दिसेल तोपर्यंतच आम्ही बसणार होतो व नंतर पेट्रोल लॅम्पच्या साहाय्याने गावात परतणार होतो.तिथे रुद्रप्रयागवरून आलेली आमची माणसं वाट पाहत थांबणार होती.


आसपासच्या जमीनीचं नीट निरीक्षण करण्यासाठी आम्हाला वेळ उरला नव्हता,पण गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की भक्ष्य पडलेल्या जागेच्या पूर्वेकडे दाट जंगल आहे आणि त्याच जंगलात बिबळ्या गेला असण्याची जास्त शक्यता आहे.जर खरंच त्याच दिशेकडून बिबळ्या भक्ष्याकडे आला तर तो तिथे पोचण्याच्या बरंच अगोदर इबॉटसनला दिसणार होता कारण त्याच्या रायफलला टेलिस्कोपिक साईट बसवली होती.या साईटमुळे फक्त अचूक नेम लागतो असं नाही तर वरचा अर्धा तासही आम्हाला हाताशी मिळणार होता,काही टेस्ट्स घेऊन आम्ही ते पडताळूनही पाहिलं होतं. प्रकाशाचं एखादं मिनिट तेव्हा यश-अपयश ठरवायला कारणीभूत होणार असेल तेव्हा हा वेळेचा खरं म्हणजे प्रकाशाचा- घटक निर्णायक ठरतो.पश्चिमेकडच्या पहाडामागे सूर्य अस्ताला जायला लागला आणि काही मिनिटं आम्ही सावलीत आलो तेवढ्यात एक भेकर त्याचा अलार्म कॉल देत डोंगरावरून खाली भुंकत पळत आलं,डोंगराच्या कडेला ते जरा थांबलं व त्याच ठिकाणी थोडावेळ थांबून भुंकल्यावर पलीकडच्या बाजूला गेलं.त्याचा आवाज हळूहळू अस्पष्ट होत गेला.हे भेकर बिबळ्याला पाहून भुंकलं होतं हे निश्चित आणि जरी त्या भागात एका पेक्षा अधिक बिबळे असण्याची शक्यता होती तरी माझ्या आशा उंचावल्या.मी वळून पाहिलं तर इबॉटसनसुद्धा सावध झाला होता व त्याचे दोन्ही हात रायफलवर होते.


प्रकाश कमी होत होता तरीही अजून टेलिस्कोपिक साईटच्या मदतीशिवाय शूटींग करता येईल इतपत दिसू शकत होतं इतक्यात डोंगराच्या दिशेकडे असणाऱ्या झुडुपांच्या मागून एक पाईन कोन घरंगळत आला आणि माझ्या पायाशीच झाडाजवळ पडला.बिबळ्या आला होता आणि काहीतरी धोका जाणवल्यामुळे त्याने अशी दिशा पकडली होती की जिथून भक्ष्याच्या आसपासची सर्व परिस्थिती निरखून बघता येईल.दुर्दैव असं की असं करताना तो आणि भक्ष्य यांच्या सरळ रेषेतच आमचं झाडं आलं होतं.माझी फक्त बाह्याकृतीच दिसण्याची शक्यता होती.पण इबॉटसन झाडाच्या फांद्यांवर असल्याने तो मात्र बिबळ्याच्या नजरेतून सुटणार नव्हता.जेव्हा मी नेम धरू शकेन आणि इबॉटसनच्या टेलिस्कोपिक साईट्सचा उपयोग होईल इतकासुद्धा प्रकाश राहिला नाही तेव्हा बिबळ्या दबकत दबकत उतरून आमच्या दिशेला येताना मी ऐकलं.आता मात्र जे काही करायचं ते अगदी ताबडतोब करायला पाहिजे होतं.त्यामुळे मी पटकन इबॉटसनला माझी जागा घ्यायला सांगितलं आणि पेट्रोल लॅम्प हस्तगत केला.हा लॅम्प जर्मन मेकचा होता आणि त्याला 'पेट्रोमॅक्स' असं नाव होतं.त्याचा प्रकाश चांगला पडायचा पण त्याचं लांबुळकं धूड आणि लांबलचक हँडल यामुळे तो जंगलात वापरण्याच्या उपयोगाचाच नव्हता.


मी इबॉटसनपेक्षा थोडा उंच आहे त्यामुळे मीच लॅम्प हातात घेईन असं मी इबॉटसनला सुचवलं. पण इबॉटसन म्हणाला की,तो लॅम्प व्यवस्थित हाताळू शकेल.त्याच्या रायफलापेक्षा माझ्यावर अवलंबून राहाणं त्याला योग्य वाटलं असावं म्हणून इबॉटसन पुढे तर,रायफलवर दोन्ही हात ठेवून मी मागे असे आम्ही गावाच्या रस्त्याला लागलो.

शेतापासून पन्नास यार्डावर एका कातळावर चढताना इबॉटसनचा पाय घसरला, लॅम्पचा तळ खडकावर आपटला व मँटल धुळीत पडलं.पेट्रोल टाकीवर दिसणारी छोटी निळी ज्योत सुद्धा बऱ्यापैकी प्रकाश देत होती पण प्रश्न हा होता की एवढासा उजेड तरी किती वेळ टिकणार! इबॉटसनच्या म्हणण्याप्रमाणे तीन मिनिटं ही ज्योत राहील.तीन मिनिटं... जिथे दर सेकंदाला दगडधोंडे,

काटेकुटे चुकवण्यासाठी दिशा बदलून पावलं टाकावी लागणार होती आणि नरभक्षक पाठलागावर असण्याची शक्यता होती अशी ही डोंगराची वाट चढून जाणे हे एक भयानक आव्हानच होतं. (नंतर आम्हाला कळलं की खरोखर आमचा पाठलाग होत होता)


कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की नंतर कितीही वर्ष निघून गेली तरी तुमच्या आठवणीत तसेच कोरलेलेच राहतात.त्या दिवशी अंधारात ती चढण चढणे हा माझ्या बाबतीत असाच प्रसंग होता.

चढण चढून पायवाटेवर आल्यानंतरही नष्टचर्य संपलं नव्हतंच.कारण या वाटेवर म्हशींच्या असंख्य लोळणी होत्या आणि आमची माणसं कुठे आहेत ते आम्हाला माहीत नव्हतं.


कधी चिखलातून पाय घसरत तर कधी दगडगोट्यांवर ठेचा खात शेवटी आम्हाला काही दगडी पायऱ्या लागल्या.

या पायऱ्या उजवीकडे चढत गेल्या होत्या आणि त्या चढून वर आल्यावर आम्हाला एक अंगण लागलं.पलीकडे दरवाजा होता.पायऱ्या चढतानाच आम्ही हुक्क्याचा आवाज ऐकला होता.म्हणून मी दरवाजावर लाथ मारून ओरडून उघडायला सांगितला.जेव्हा उत्तर आलं नाही तेव्हा मी काड्यापेटी काढली आणि तिचा हलवून आवाज करत जोरात ओरडलो की जर एका मिनिटात दरवाजा उघडला नाही तर मी झोपडीला आग लावीन. मिनिटभरातच प्रथम आतला व नंतर बाहेरचा दरवाजा उघडला गेला.मी व इबॉटसन दोन ढांगात आत घुसलो तसा ताबडतोब दरवाजा बंद केला गेला.


या एवढ्याशा खोलीत निरनिराळ्या वयाची पुरुष,

बायका व मुलं अक्षरशः ठासून भरली होती.आमच्या अशा अनौपचारिक प्रवेशानंतर जेव्हा सर्वजण सावरले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडायला उशीर केल्याबद्दल माफी मागितली आणि सांगितलं की इतकी वर्ष दहशतीखाली काढल्याने आम्हाला रात्री येणाऱ्या प्रत्येक आवाजाचा संशय येतो व त्यामुळे दार उघडण्याचं धाडस झालं नाही.आम्हाला त्यांचं म्हणणं न पटण्याची शक्यता नव्हतीच.कारण इबॉटसन घसरून पडल्यावर जेव्हा मँटल धुळीत पडलं व कंदील फुटू नये म्हणून तो विझवायला लागला त्या क्षणापासून आतापर्यंत आमची मनोमन खात्री पटली होती की आमच्यातला एक किंवा कदाचित दोघंही जिवंतपणे गावात पोचू शकणार नाही.आम्हाला सांगितलं गेलं की आमची माणसं संध्याकाळीच गावात पोचली होती.ती असंच पुढे डोंगराच्या कडेला असलेल्या एका घरात थांबली आहेत.दोन धडधाकट माणसांनी आमच्याबरोबर रस्ता दाखवायला येण्याची तयारीही दर्शवली, पण परत येताना त्यांना एकटं यावं लागणार होतं आणि ती हत्याच ठरली असती.त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला एखादा तरी दिवा किंवा कंदील मिळेल का? खोलीचे कोपरे धुंडाळल्यावर त्यांना एक फुटक्या काचेचा कंदील मिळाला व जोरजोरात हलवल्यावर त्यात थोडं तेलही आहे हे समजलं.पटकन कंदील पेटवला गेला व खोलीतल्या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही बाहेर पडलो.ताबडतोब आमच्या मागे दरवाजे घट्ट लावून कड्याही घातल्या गेल्या. पुन्हा एकदा त्या म्हशींच्या लोळणी,गवतात लपलेले दगडगोटे व काटे... पण मदतीला मंद का होईना प्रकाशाचं साधन असल्याने आम्ही झपाटा मारला आणि आम्हाला ज्या दुसऱ्यांदा लागणाऱ्या पायऱ्या चढायला सांगितल्या होत्या त्या शेवटी आल्या आणि आम्ही एका एकमजली इमारतीच्या अंगणात आलो.त्याच्या उजव्या डाव्या बाजूला दरवाजे होते ते सगळे घट्ट बंद होते;कुठेही थोडासुद्धा प्रकाश दिसत नव्हता.मी हाका मारल्यावर एक दरवाजा उघडला गेला. चार-पाच दगडी पायऱ्या चढल्यावर आम्ही वरच्या मजल्याच्या व्हरांड्यात आलो.तिथे आमच्या माणसांसाठी आणि आमच्यासाठी राखून ठेवलेल्या खोल्या होत्या.

आमची माणसं रायफली व कंदील आमच्या हातातून घेऊन आम्हाला मोकळं करत असताना एक कुत्रा कुठूनतरी तिथे आला.हा आपला साधासुधा गावठी कुत्रा होता व आमचे पाय हुंगल्यावर शेपटी हलवत तो आताच आम्ही चढून आलेल्या पायऱ्यापर्यंत गेला... आणि दुसऱ्याच क्षणी भीतीने दचकल्यासारखा आवाज काढून नंतर अंगात आल्यासारखा भुंकत मागे सरकला... त्याच्या अंगावरचे सर्व केस ताठ उभे राहिले होते! आमचा कंदील तर विझून गेला होता.पण आमच्या माणसांनी दुसरा कंदील पैदा केला.इबॉटसनने तो वर धरून सर्व कोनांतून फिरवला,मी चटकन रायफल लोड केली तरीही पायऱ्यांच्या खाली असणाऱ्या अंगणात उजेड पडलाच नाही.


त्या कुत्र्याकडे पाहूनच बिबळ्याच्या सर्व हालचालींचा अंदाज येत होता.तो अंगण ओलांडून पुढच्या पायऱ्या उतरून खालच्या पायवाटेला लागला तेव्हा शेवटी तो कुत्रा भुंकायचा थांबला व त्या दिशेकडे बघून मध्ये मध्ये गुरगुरत शेवटी खाली बसला.या दोन्ही खोल्यांना खिडक्या नव्हत्या.फक्त दरवाजा बंद करूनच आम्ही सुरक्षितपणे खोलीत झोपू शकलो असतो.पण त्यामुळे गुदमरायला झालं असतं.म्हणून आम्ही व्हरांड्यावरच रात्र घालवायचं ठरवलं.हा कुत्रा त्या खोलीच्या मालकाचाच असावा आणि त्याला व्हरांड्यात झोपायची सवयही असावी.

आळीपाळीने झोपत आम्ही ती रात्र घालवली पण पायाशीच झोपलेल्या कुत्र्यामुळे आम्हाला सुरक्षिततेची जाणीव मात्र होत राहिली.


२४.१२.२३ या लेखमालेतील पुढील भाग..