* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२१/६/२४

जॉन जेम्स ऑधुबाँ - John James Audubon

आद्य पक्षी चित्रकार जॉन जेम्स ऑधुबाँ हा १९व्या शतकातला निसर्ग चित्रकार केवळ निरीक्षणांतून पक्ष्यांची अफलातून चित्रं काढत असे.या चित्रांनी अमेरिकेतल्या पक्षीशास्त्राच्या अभ्यासाला दिशा मिळाली.आज दोनशे वर्षांनंतरही 'द ऑधुबाँ सोसायटी' मार्फत त्याने पक्षीमित्रांच्या मनात आदरस्थान मिळवलेलं आहे.या झंगड चित्रकाराची ही कथा


▶ जॉन जेम्स ऑद्युबाँ हे नाव बहुतेक निसर्गप्रेमींना ठाऊक असतं,ते त्याच्या अमेरिकी पक्ष्यांच्या चित्रांमुळे.

ऑद्युबाँला चित्रकलेची नैसर्गिक देणगी लाभलेली होती.

त्याने उत्तर अमेरिकी खंड उभं आडवं पिंजून काढलं;त्या भटकंतीमध्ये दिसलेल्या सर्व पक्ष्यांची आणि प्राण्यांची जिवंत वाटावीत अशी चित्रं त्याने स्वप्रयत्नांनी रेखाटली.

ऑद्युबाँची ही चित्रं पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं.चित्रकलेच्या या एक तपाच्या तपश्चर्येतून 'द बर्ड्स ऑफ अमेरिका (१८२७-३९)' याची निर्मिती झाली.

आजही ते कार्य जाणकारांना वंदनीय वाटतं.त्याचं तितकंच महत्त्वाचं पण दुर्लक्षित कार्य म्हणजे 'द व्हिव्हिपेरस क्काडुपेड्स ऑफ अमेरिका'. (गर्भाशयात वाढून जन्म घेणारे अमेरिकी चतुष्पाद) (१८४५-१८४८).


ऑद्युबाँ पक्षी ओळखून त्यांना शास्त्रीय नावंही देई.

त्याकामीही त्याचा कुणीच गुरू नव्हता.ऑद्युबाँचं एकूणच आयुष्य अतिशय चित्तचक्षुःचमत्कारिक होतं.त्याला साहसाची आवड होती.स्टारट्रेकचं बोधवाक्य 'व्हेअर नो मॅन हॅज गॉन बीफोर' हे त्याने शे-दीडशे वर्षं आधीच आत्मसात केलं होतं.


मी जुन्या पुस्तक-मासिकांच्या शोधात हिंडायचो, त्या काळात एक दिवस ऑद्युबाँ सोसायटीचं निसर्गविषयक आणि निसर्ग संरक्षणविषयक नियतकालिक माझ्या हाती लागलं. संपादकीयाच्या वरती नेहमीप्रमाणे संपादकाचं छायाचित्र छापायचं सोडून एका पदकाचं चित्र छापलेलं होतं.त्या पदकाच्या मध्यभागी ऑधुवाँचं चित्र होतं आणि भोवती'अमेरिकन ऑद्युबाँ सोसायटी'असा मजकूर होता.ते वाचून आणि पाहून मी खूप प्रभावित झालो.ऑद्युबाँबद्दल त्या आधीही मी वाचलेलं होतं.त्यामुळेच जेव्हा एका प्रदर्शनात त्याच्यावरचं एक छोटेखानी पुस्तक दिसलं,

त्याक्षणीच मी ते उचललं होतं.'द इसेन्शियल जॉन जेम्स ऑद्युबाँ' हे ते पुस्तक; अवघ्या ११२ पानांचं.त्याची लेखिका आहे अँनेट ब्लाउगुंड.


जॉन जेम्स ऑद्युबाँच्या पूर्वायुष्याची जी त्रोटक खरी माहिती एकत्रित करण्यात आली आहे, त्यानुसार झाँ आद्युबाँ या दर्यावर्दी कप्तानाचा तो मुलगा होता.वडील मालदार होते.त्यांनी सेंट डॉर्मिगे बेटावर (म्हणजे आताचं हैती) बरीच जमीन खरेदी केली होती.हे बेट त्यावेळी फ्रेंच वसाहतीचा भाग होतं. झाँ आद्युबाँनी आपल्या इस्टेटीवर एक बाई ठेवली होती.तिचं नाव जोआन राबीन.या विवाहबाह्य संबंधातून झालेला मुलगा म्हणजे झाँ (ज्युनिअर).झाँ (धाकटा) याचा जन्म २५ एप्रिल १७८५ या दिवशी झाला.साहसाची आवड,कामाचा पिच्छा पुरवून ते पूर्ण करणं,एकाग्रता आदी गुण त्याला वडिलांकडून वारसा म्हणून मिळाले;तर चित्रकलेचा वारसा त्याला आईकडून मिळाला.त्याच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्याच्या आईचं निधन झालं.त्यामुळे तान्ह्या झाँला त्याच्या वडिलांकडे फ्रान्समध्ये पाठवण्यात आलं.तिथे त्याच्या वडिलांच्या धर्मपत्नीने त्याचं संगोपन केलं. १७९४ मध्ये नऊ वर्षांच्या झाँला त्याच्या वडिलांनी आणि सावत्र आईने दत्तक घेऊन त्याला ऑद्युबाँ घराण्याचं नाव वापरायचा मार्ग मोकळा करून दिला.तो अकरा वर्षांचा असताना वडिलांनी त्याला नौदलात भरती करण्याच्या दृष्टीने नेव्हल ॲकॅडेमीत दाखल केलं.तिथे त्याने तीन वर्ष कशीबशी पार पाडली; तेव्हा हा मुलगा नौदलात जाण्याच्या लायकीचा नाही,याबद्दल त्याच्या वडिलांची खात्री पटली.


अशा प्रकारच्या कोणत्याही प्रशिक्षणापेक्षा झाँचा वन्य पशू-पक्ष्यांकडे अधिक कल होता.जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तो वडिलांच्या इस्टेटीतील आणि आजूबाजूच्या वनात जात असे;तिथे पेस्टल रंग आणि ग्राफाइटच्या साहाय्याने वन्यजीवांचं रेखाटन करत असे.

तो ही रेखाटनं करायला कुठे आणि कसा शिकला हे एक कोडंच आहे;पण या बाबतीत त्याला कुठलाही गुरू नसावा;एकलव्याच्या निष्ठेने,हौशी चित्रकारांसाठी त्याकाळी उपलब्ध असलेली पुस्तकं वाचूनच तो चित्रकार बनला असावा.वयाच्या अठराव्या वर्षी ऑद्युबाँने नेपोलियनच्या लष्कर भरतीतून सुटका व्हावी म्हणून अमेरिकेत पळ काढला.त्याने आता 'झाँ' हे नाव बदलून 'जॉन' हे इंग्लिश नाव लावायला सुरुवात केली. नाव बदलणं त्याला जमून गेलं तरी त्याच्या उच्चारण पद्धतीतून त्याचं फ्रेंच मूळ अखेरपर्यंत लक्षात येत असे.१८१२ मध्ये त्याने अमेरिकी नागरिकत्व मिळवलं.अमेरिकेत त्याच्या वडिलांनी फिलाडेल्फियाच्या जवळ खूप वर्षांपूर्वी एक शेत खरेदी केलं होतं.त्याची जबाबदारी आता जॉनवर सोपवण्यात आली.हे जॉनच्या पथ्यावरच पडलं. इथे त्याने अमेरिकेतील पक्ष्यांची रेखाटनं करायला सुरुवात केली.त्यामुळे त्याचं शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं.हळूहळू त्याने नव्या पक्ष्यांच्या शोधात दूरवर भटकायला सुरुवात केली.ऑधुबाँच्या स्थलांतरामागे आणखी एक कारण होतं.आपण अनौरस आहोत,ही भावना बालपणापासून त्याला सतावत असे.यामुळेच आपण स्वतंत्रपणे मोठं व्हायचं ही जिद्द,कष्ट करण्याची क्षमता,खोटा मोठेपणा आणि स्वतःबद्दल खऱ्या-खोट्या आख्यायिका निर्माण करणं,ही वृत्ती त्याच्या अंगी बाणली असावी. कारण पुढे त्याच्या हयातीतच त्याच्याबद्दलच्या काही दंतकथा निर्माण झाल्या होत्या.आद्युबाँबद्दलची एक अफलातून आख्यायिका म्हणजे तो राजपुत्र होता.फ्रान्सचा राजा सोळाव्या लुईचा हरवलेला मुलगा म्हणजे ऑद्युबाँ ही अफवा कुणी आणि कशी पसरवली हे कळायला मार्ग नाही;पण ती दीर्घकाळ अमेरिकेत प्रचलित होती.दुसरी एक अशीच कहाणी म्हणजे फ्रान्सचा विख्यात चित्रकार झाक्कस लुईस डेव्हीड (१७४८-१८२५) याच्याकडे ऑद्युबाँचं चित्रकारीचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं होतं.


ऑद्युबाँच्या चित्रांवर त्या चित्रकाराचा प्रभाव होता,हे निश्चित.मात्र त्याच्याकडून ऑद्युबाँने थेट प्रशिक्षण घेतल्याचा पुरावा उपलब्ध नाही.आणखी एका जबरदस्त हकीकतीला तर ऑद्युबाँनेच खतपाणी घातलं असं म्हटलं जातं;ती म्हणजे,अमेरिकेत गौरवर्णीयांच्या दृष्टीने आदराला पात्र असा शिकारी डॅनिएल बून (१७३४-१८२०) याच्याबरोबर ऑद्युबाँ अनेक शिकारी मोहीमांमध्ये साथीदार म्हणून वावरला होता.या अफवेचा ऑद्युबाँने त्याच्या चित्रांच्या प्रसिद्धीसाठी फायदा करून घेतला होता,असंही म्हटलं जातं.


ऑद्युबाँला जनसंपर्काची हातोटी लाभलेली होती.त्याच्या साहसी प्रतिमेची वृद्धी करायला तो या दंतकथांचा उपयोग करून घेत असे असंही म्हटलं जातं.ऑद्युबाँचे टीकाकार मात्र ऑद्युबाँने त्याच्याबद्दलच्या आख्यायिका तयार व्हायला स्वतःच खूप हातभार लावला होता,त्या अमेरिकाभर कशा पसरतील याबद्दलही तो प्रयत्नशील असे,असं म्हणतात.याच दंतकथांच्या पसाऱ्यातून अनेक अभ्यासकांनी त्याच्या आयुष्याचं खरंखुरं चित्र रंगवलं,तेही 'सत्य हे कल्पिताहून अ‌द्भुत असतं' या उक्तीचा प्रत्यय आणून देणारं आहे,यात शंकाच नाही.रानावनात हिंडताना जॉनजवळ कायम एक स्केच पॅड,पेन्सिली आणि त्याआधीच्या पक्षीतज्ज्ञांची संदर्भ पुस्तकं असत.त्या काळात ही पुस्तकं चुकीच्या माहितीने भरलेली तर होतीच;पण त्यातली माहिती ही अगदी त्रोटक आणि अपूर्ण स्वरूपाची असे.त्या काळातील इतर अनेक निसर्गशास्त्रज्ञांप्रमाणेच जॉनने स्वतःच पक्ष्यांबद्दल अधिक आणि अधिकृत माहिती मिळवायला सुरुवात केली.त्याचबरोबर प्रत्येक भटकंतीत तो पक्ष्यांची घरटी,त्यांची अंडी, पिसं,मृतदेह तसंच खारी,रॅकूल,

ओपोसम,साप, सरडे आणि बेडूकही गोळा करू लागला. मारलेल्या पशुपक्ष्यांच्या मृतदेहांमध्ये भुस्सा किंवा पेंढा भरून तो ते जतन करू लागला. त्यासाठी त्याने यातील तज्ज्ञ लोकांशी ओळखी वाढवल्या.पक्ष्यांचं जीवन समजावून घेण्यासाठी त्यांच्या पायात पातळ पत्र्याची कडी बसवायचा उद्योग करणाऱ्या काही आद्य पक्षी निरीक्षकांमध्ये त्याचा समावेश होतो.त्याकाळात ऑधुबॉ या पक्ष्यांच्या पायांवर चांदीची वळी चढवत असे.पक्ष्यांची वर्तणूक नोंदवण्यासाठी निरीक्षणं करताना तो तासन् तास निश्चल बसून राहत असेच;पण तहानभूक विसरून त्यांचा नंतर पाठलाग करायचा प्रयत्न करत असे.


या भटकंतीच्या काळात तो शिकार करायला शिकला.

त्याची ख्याती एक नेमबाज म्हणून दुनियाभर पसरली.

त्याची दुनिया अर्थात अमेरिकेपुरती मर्यादित होती पण बोलताना तो जग फिरल्यासारखा बोलत असे.तो ज्या शहरात जाई तिथे कायम सर्व प्रकारच्या पार्ट्यांमध्ये त्याचा सहभाग असे.त्याच्या वाक् चातुर्याने तो तरुणींवर छाप पाडण्यात यशस्वी होई.यातच कदाचित त्याची स्वतःबद्दल आख्यायिका निर्माण करण्याची वृत्ती दडलेली असावी.ऑद्युबाँची पहिली पेंटिंग्ज स्थिर बसलेल्या पक्ष्यांची होती.त्यांतली अनेक चित्रं काहीशी हौशी चित्रकारी दाखवतात.त्या काळात त्याच्यावर जॉर्जेस लुई लक्लर्क,कोम्ते द बफाँ या चित्रकारांचा प्रभाव होता,हे स्पष्ट होतं. त्याच्यावर आणखीही एका चित्रकाराचा प्रभाव सुरुवातीच्या काळात जाणवतो,असं त्याच्या चरित्रकारांचं म्हणणं आहे.तो चित्रकार म्हणजे पंधराव्या लुईच्या दरबारात असलेला झाँबाहिस्ते उड्री.


लवकरच ऑद्युबाँच्या लक्षात आलं,की स्थिर बसणं हा खरं तर पक्ष्यांचा स्वभाव नाही.त्यामुळे तो चित्रातून पक्षी सजीव कसे भासतील यावर उपाय शोधू लागला.त्यावर उपाय सापडण्याआधीच त्याचं आयुष्य सजीव करणारी एक घटना घडली.जॉन त्याचे शेजारी मिस्टर ब्लेकवेल यांची मुलगी ल्युसी हिच्या प्रेमात पडला. ल्युसीलाही हा मुलगा आवडला.त्यांचं लग्न होण्यात त्यामुळे कुठलीच अडचण आली नाही.


पक्ष्यांच्या नादात हिंडणाऱ्या जॉनचं त्याच्या त्या इस्टेटीकडे अजिबातच लक्ष नव्हतं.कर्ज फेडण्यासाठी मग हा सर्व जमीन जुमला त्याला विकावा लागला.कर्ज फेडून उरलेल्या पैशांसह इ.स.१८१० मध्ये तो आपल्या कुटुंबासह केंटकी राज्यातील हेंडर्सन या गावी राहायला लागला. त्याचा मित्र आणि व्यावसायिक भागीदार फर्डिनांड रोझीयर हाही तिथे आला.त्या दोघांनी तिथे एक व्यापारी केंद्र म्हणजे 'ट्रेडिंग पोस्ट' स्थापन केलं.

यासाठी त्यांनी मिसुरी राज्यातील सेंट जेनेव्हीव्ह येथे एक वखारही प्रस्थापित केली.दुर्दैवाने याच वेळी युरोपमध्ये नेपोलियनने युद्ध चालवलं होतं.त्यामुळे अमेरिकेने आयातीवर बंदी घातली आणि हा ऑधुबाँचा उद्योग अल्पायुषीच ठरला.मग ऑधुबॉंने हेंडर्सनमध्ये एक दुकान टाकलं.वाणसामानासह सर्व विक्री केंद्र असं याचं स्वरूप होतं.या व्यावहारिक निर्णयाचा त्याला फायदा झाला.त्याने काही जमीन विकत घेतली;तिथे एक घरही बांधलं.तोपर्यंत त्याने २०० पेंटिंग्ज चितारली होती. दुर्दैवाने ही पेंटिंग्ज उंदरांनी खाऊन टाकली.याच सुमारास त्याने एका व्यवसायात पुन्हा मार खाल्ला.त्याला कर्ज झालं.ते कर्ज फेडता आलं नाही म्हणून १८१९ मध्ये त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता.तेव्हा घर आणि जमीन विकून तो तुरुंगातून सुटला;पण त्याचं दिवाळं निघालेलं होतं.यामुळे काही काळ तो नैराश्याच्या गर्तेत सापडला;पण लवकरच त्याने स्वतःला सावरलं.तुरुंगात असतानाही पक्ष्यांची चित्रं रंगवणं त्याने थांबवलेलं नव्हतं.तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने उत्तर अमेरिका खंडातले जास्तीत जास्त पक्षी रेखाटून 'ऑर्निथॉलॉजिकल सर्व्हे ऑफ अमेरिका' म्हणजे अमेरिकेतील पक्ष्यांचे सचित्र चित्रण पूर्ण करण्याचा निश्चय केला.यातली बरीचशी तैलचित्रं तो पाच ते पंचवीस डॉलर्सना विकू लागला.


उत्तर अमेरिकेतील पक्ष्यांची चित्रं रेखाटण्यामागे ऑद्युबाँचे तीन हेतू होते - याआधी ज्यांनी ज्यांनी हे काम हाती घेतलं होतं,त्यांच्यापेक्षा जास्त अचूक,बिनचूक,शास्त्रशुद्ध अशी चित्रं काढून कीर्ती मिळवणं,पक्षी निरीक्षणाबद्दल जागृती निर्माण करणं,तसंच भरपूर पैसा कमावणं. यासाठी ऑद्युबाँ कित्येक दिवस रानावनात एकटा भटकायचा.

एखादा नवा पक्षी दिसला की तो त्याचा पाठलाग करत असे;त्या पक्ष्याच्या सवयी आणि राहण्याच्या ठिकाणाचा शोध घेण्याकरता हरत-हेचे प्रयत्न करत असे.या प्रकारच्या संशोधनात अनेक संकटं येतात याची वाच्यता तो त्याच्या घरात कधीही करीत नसे. घरच्यांनी उगीच चिंता करत बसावं,हे त्याला मान्य होणारं नव्हतं.


१८२० मध्ये ऑद्युबाँला सिनसिनाटी महाविद्यालयाच्या वेस्टर्न म्युझियममध्ये टॅक्सीडर्मिस्ट आणि प्राणी-पक्ष्याच्या मृतदेहांच्या मागे त्यांची नैसर्गिक पार्श्वभूमी रंगवण्याचं काम मिळालं.त्यामुळे तो कुटुंबियांसह सिनसिनाटीला राहायला लागला.हे संग्रहालय स्थापन करणारा डॅनियल ड्रेक ऑद्युबाँच्या कामाच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे त्यानेच ऑद्युबाँच्या निसर्गचित्रांचं पहिलं प्रदर्शन भरवलं.टॅक्सीडर्मीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी ऑद्युबाँने सिनसिनाटीत चित्रकला प्रशिक्षण वर्ग सुरू केला.सुरुवातीलाच त्याला पंचवीस विद्यार्थी मिळाले.त्यातलाच एक विद्यार्थी जोसेफ मेसन;पुढे 'बर्ड्स ऑफ अमेरिका' या महापक्षिकोशनिर्मितीत ऑद्युबाँने त्याला सहकारी म्हणून स्थान दिलं. ऑद्युबाँची पक्ष्यांची चित्रं आणि त्याला शास्त्रीय पार्श्वभूमीची जोड या प्रकल्पातल्या त्याच्या सहकाऱ्यांमध्ये मेसनने कायमच त्याचा उजवा हात म्हणून काम केलं.संपूर्ण उत्तर अमेरिकेतील पक्ष्यांच्या चित्रीकरणासाठी,त्यांच्या सवयी अभ्यासण्यासाठी ऑद्युबाँने मिसुरी नदीच्या दक्षिण भागात प्रवास करायचं ठरवलं,त्यावेळी उत्तर अमेरिकेचा बराच मोठा भूभाग तेथील स्थानिक मूळ रहिवासी टोळ्यांच्या अधिपत्त्याखाली होता.गोऱ्या अमेरिकेच्या सीमांचा विस्तार करणाऱ्यांना तेव्हा 'फ्रंटियर्स मेन' म्हणण्यात येत असे.ऑद्युबाँ बरेचदा त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखाच वेष परिधान करून भटकत असे.कातडी कपडे,तशीच पादत्राणं आणि अमेरिकी रानगव्यांच्या कातड्याचा लांब कोट,या वेषात त्याची भटकंती सुरू होती.१८२२ नंतरच्या त्याच्या भटकंतीच्या प्रत्येक दिवसातील बारीक सारीक घटनांची तो नोंद ठेवत होता.याखेरीज नातेवाईक,जवळचे मित्र,ओळखीपाळखीचे लोक आणि व्यावसायिक परिचितांना त्याने शेकडो पत्रं लिहिली.


(हटके भटके, अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन) दुर्दैवाने त्याच्या नातीने त्याच्या बऱ्याच नोंदवह्यांची वाट लावली;कच्ची रेखाटनं विकून टाकली.

ऑद्युबाँ हा रानावनात हिंडणारा मुक्त माणूस होता.त्याच्या पत्रात (त्याच्या नातीच्या मते) काही वेळा अशिष्ट भाषा असे;तर नोंदवह्या असंस्कृत वर्णनांनी भरलेल्या असत.

तिच्या काटछाटीतून जी कागदपत्रं वाचली त्यांवरून हा चित्रकार जेवढा रगेल आणि रंगेल होता,तितकीच त्याच्या स्वभावाला दुसरी एक हळुवार आणि नाजूक भावनिक बाजूही होती,हे स्पष्ट होतं.कष्टप्रद जीवन जगताना त्याची स्वप्नाळू वृत्तीही त्याने कायमच जागृत ठेवली होती.त्याची भाषा ओघवती होती.

शब्दांच्या साहाय्याने परिस्थिती जिवंत करण्याचं कौशल्यही त्याच्याजवळ होतं


त्याच्या पत्रांमधून आणि नोंदवह्यांमधून, कामासाठी कुटुंबियांपासून दूर राहावं लागतं याबद्दल त्याला खेद वाटे,तो सतत कुटुंबीयांबद्दल चिंताग्रस्त असे,हेही दिसून येतं.या नोंदींमधूनच त्याने 'बर्डस ऑफ नॉर्थ अमेरिका' या ग्रंथाच्या निर्मितीचा निर्णय का घेतला तेही स्पष्ट होतं. त्याआधीच्या 'अमेरिकन ऑर्निथॉलॉजी' सारख्या पुस्तकांत अनेक उणीवा होत्या.चुकीची आणि अपूर्ण माहिती,रंगांची गल्लत,चित्रांमधली गफलत यांमुळे संदर्भग्रंथ म्हणून ती पुस्तकं वापरताना निराशाच पदरी येत असे.'अमेरिकन ऑर्निथॉलॉजी' हे अमेरिकी पक्ष्यांबद्दल पहिलं पुस्तक.ते अलेक्झांडर विल्सन याच्या प्रयत्नातून तयार झालं.या पुस्तकातली सगळी चित्रं स्थिर बसलेल्या पक्ष्यांची एक बाजू (प्रोफाइल) दाखवणारी चित्रं होती. ऑद्युबाँने आपल्या ग्रंथात पक्ष्यांच्या प्रत्यक्ष आकाराची (लाईफ साईज) चित्रं द्यायची, ती सुद्धा त्या पक्ष्यांच्या वैशिष्ट्यांसह असतील याची काळजी घ्यायची,असा निर्णय घेतला.


याच काळात अमेरिकेत वनस्पतीशास्त्र आणि कीटकशास्त्रात पथदर्शी असं आद्यकार्य सुरू झालेलं होतं;बरेच हौशी संशोधक नवनवे प्राणी जगापुढे आणत होते;चतुष्पाद,वनस्पती,कीटक आणि पक्षी यांचं शास्त्रशुद्ध वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली होती;प्राणीशास्त्रात बरेच संदर्भग्रंथ प्रकाशित होत होते.ऑद्युबाँवर त्या साऱ्याचा प्रभाव पडला.त्या काळात इंग्लंडमध्ये तर निसर्गशास्त्र जोरात होतं.पुस्तकं,छापील चित्रं आणि विविध देशांमधून येणारे वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने यांचा संग्रह केला जात होता; ब्रिटिश म्युझियमचा पाया घातला गेला होता. ऑद्युबाँची कीर्ती ब्रिटनमध्येही पसरली होती. चार्ल्स डार्विन यांनीही त्यांच्या संशोधनात ऑद्युबाँचे संदर्भ वापरले होते.युरोपात छपाईकला सुरू झाल्यानंतर पुस्तकं क्रमशः छापायला सुरुवात झाली.विल्सनचं 'अमेरिकन ऑर्निथॉलॉजी' आणि मार्क केट्सबीचं 'द नॅचरल हिस्टरी ऑफ कॅरोलायना,

फ्लोरिडा अँड द बहामा आयलंड्स' ही चित्रपुस्तकं अशीच क्रमशः छापून विकली गेली होती.


१८३५ मध्ये ब्रिटिशांबरोबरचं युद्ध संपल्यानंतर हळूहळू अमेरिकेत आर्थिक सुबत्ता डोकावू लागली होती.

अमेरिकेतील धनिक वर्ग आता निसर्गचित्रात पैसे गुंतवू लागला होता.याचा ऑद्युबाँच्या प्रकल्पाला फायदाच झाला. ऑद्युबाँला चित्रकलेचं वैचारिक शिक्षण मिळालेलं नव्हतं.त्यामुळे त्याने वेळोवेळी चित्रकलेची वेगवेगळी तंत्रं हाताळली.अमेरिकी पक्ष्यांची आणि वन्यप्राण्यांची चित्र काढणं यावर त्याचा प्रमुख भर होता.चित्रांमध्ये पक्ष्यांच्या पिसांच्या रंगछटांमधील बारकावे उतरावेत यासाठी तो खूप मेहनत घेत असे.त्यासाठी त्या काळातील आघाडीच्या चित्रकारांचा तो निःसंकोच सल्ला घेत असे.त्याला तैलचित्रं फारशी जमली नाहीत;मात्र जलरंगात चित्र रंगवण्यात त्याचा हातखंडा होता.त्याची 'पॅसेंजर पिजन' आणि 'कॅरोलायना पॅराकीट्स'ची चित्रं याची साक्ष आहेत.ऑद्युबाँच्या काळात हे पक्षी अमेरिकेत संख्येने प्रचंड होते;पण त्यांची वारेमाप हत्या झाल्याने ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत कायमस्वरूपी नाहीसे झाले.ऑद्युबाँने या पक्ष्यांची रंगवलेली चित्रं इतकी काव्यात्म आहेत,की त्यामुळे त्यांच्या नामशेष होण्याबद्दलचा खेद वाढीस लागतो.


पक्ष्यांची जलरंगातील भरपूर चित्रं काढून झाल्यावर ऑद्युबाँ या चित्रांची एन्ग्रेव्हिंग करणाऱ्या,छपाई करणाऱ्याच्या शोधात फिलाडेल्फियास पोहोचला.त्या काळात फिलाडेल्फिया ही अमेरिकेची सांस्कृतिक आणि वैज्ञानिक राजधानी होती.तिथे अमेरिकी संघराज्यातील सर्वोत्कृष्ट छपाई होत असे.


या भागातील उर्वरित भाग ..२३.०६.२४ या लेखामध्ये..

१९/६/२४

सायनाईड पॉयझनिंग - Cyanide poisoning..

बोकडाला भेट देऊन मी इन्स्पेक्शन बंगल्यावर परतत होतो तेव्हा गावातच मला निरोप मिळाला की रुद्रप्रयागमध्ये माझ्या उपस्थितीची तातडीची गरज आहे,कारण आदल्या रात्री आणखी एका माणसाचा बळी गेलाय.निरोप देणाऱ्या माणसाला ही घटना नक्की कुठे घडली त्याबद्दल जास्त माहिती नव्हती,पण नरभक्षकाने पगमार्कस असं दाखवत होते की आमचा गावापर्यंत पाठलाग केल्यानंतर बिबळ्या परत शेळ्यांच्या वाटेवर गेला होता व वळणावरून उजवीकडे गेला होता.

त्यामुळे माझा अंदाज असा होता की आमच्यापैकी कोणालाही उचलण्यात अपयश आल्यावर त्याने डोंगराच्या वरच्या बाजूला जाऊन तिथे शिकार साधली असणार.माझा हा अंदाज खरा ठरल्याचं नंतर सिद्ध झालं.बंगल्यावर आलो तसा मला इबॉटसन नंदराम नावाच्या एका माणसाशी बोलत असलेला दिसला.आम्ही काल बोकडाजवळ बसलो होतो.त्या ठिकाणापासून चार मैलांवर नंदरामचं गाव होतं.या गावाच्या वरच्या बाजूला अर्ध्या मैलावर एका खोल घळीच्या पलीकडे गवय्या नावाच्या अस्पृश्य जातीच्या माणसाने जंगलाचा एक छोटा भाग साफ करून त्यावर घर बांधलं होतं.या घरात तो त्याची आई,बायको,तीन पोरांबरोबर राहत होता. त्या दिवशी अगदी पहाटे नंदरामला गवय्याच्या घराकडून रडण्याचा आवाज आला.त्याने ओरडून 'काय प्रकार आहे?' असे विचारलं तेव्हा त्याला सांगितलं गेलं की अर्ध्या तासापूर्वी घराच्या मालकाला नरभक्षकाने उचलून नेलंय.ताबडतोब धावतपळत ही खबर द्यायला नंदराम बंगल्यावर आला होता.इबॉटसनने त्याच्या अरबी व इंग्लिश घोड्यांवर खोगिरं घातली.भरपेट ब्रेकफास्ट करून आणि रस्ता दाखवायला नंदरामला बरोबर घेऊन आम्ही निघालो. त्या पहाडी भागात पायवाटा अशा अजिबात नव्हत्या.फक्त गुरांच्या आणि बकऱ्यांच्या अवघड वाटा होत्या.मोठ्या आकाराच्या इंग्लिश घोड्यांना त्या वाटावरची वळणं घ्यायला अवघड पडायला लागलं तसं आम्ही घोडे परत पाठवले व उरलेला चढाचा रस्ता पायीच तुडवाले तसं जंगलातल्या साफ केलेल्या जागेवर आम्ही पोचलो तशा आम्हाला घरातल्या दोन बायका भेटल्या. अजूनही त्यांना आपला 'मालक' जिवंत असेल अशी आशा होती हे सरळ दिसत होतं.त्यांनी आम्हाला गवय्या दरवाजाजवळ बसलेला असताना बिबळ्याने त्याला कुठून उचललं ती जागा दाखवली.त्या दुर्दैवी माणसाला बिबळ्याने गळ्यावरच पकडलं होतं.त्यामुळे त्याला ओरडताही आलं नव्हतं.त्यानंतर १००-१५० यार्ड ओढून नेऊन त्याला ठार मारलं होतं.तिथून पुढे ४०० यार्ड ओढत नेऊन एका छोट्या झुडुपाखालच्या खळग्यात टाकून दिलं होतं. बायकांचं रडणं व नंदरामच्या घातलेल्या हाकांमुळे खाताना त्याला व्यत्यय आला असावा. त्यामुळे फक्त गळा,जबडा व खांद्याचा आणि मांडीचा थोडासा भाग खाऊन तो निघून गेला होता.भक्ष्याच्या आसपास कुठेही,बसता येईल असं सोयीचं झाड नव्हतं.त्यामुळे आम्ही मृतदेहात खाल्लेल्या ठिकाणी विष पेरून ठेवलं.आता संध्याकाळ व्हायला सुरुवात झाल्याने आम्ही तो खळगा दिसेल इतपत दूर डोंगरावर एका ठिकाणी जागा घेतली.बिबळ्या आसपासच कुठेतरी होता हे निश्चित.पण दोन तास बसूनसुद्धा आम्हांला काही दिसलं नाही.नंतर आम्ही आम्हाला दिलेला कंदील पेटवून इन्स्पेक्शन बंगल्यावर परतलो.दुसऱ्या दिवशी पहाटे अंधार असतानाच आम्ही उठलो आणि अगदी तांबडं फुटत असतानाच परत एकदा त्याच जागी तासभर बसलो पण आम्हाला ना काही दिसलं ना काही ऐकायला आलं.उन्हं चांगली वर आल्यावर आम्ही मृतदेहाजवळ आलो आणि पाह्यलं तर विष पेरलेल्या भागांना बिबळ्याने तोंडही लावलं नव्हतं.

पण दुसरा खांदा व पाय खाल्ला होता. त्यानंतर त्याने काही अंतर तो मृतदेह ओढत नेऊन एका झुडुपाच्या खाली ठेवून दिला होता.


याही ठिकाणी बसायला योग्य असं झाड जवळपास नव्हतं.त्यामुळे बरीच चर्चा केल्यावर आम्ही एक योजना निश्चित केली.इबॉटसनने डोंगर उतरून एक मैलावरच्या गावात जाऊन एका मोठ्या आंब्याच्या झाडावर मचाण बांधून बसावं व रात्र तिथेच काढावी तर मी भक्ष्यापासून ४०० यार्डावर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, जिथे आम्हाला आदल्या दिवशी पगमार्कस दिसले होते तिथे बसावं.यावेळी मी जे झाड निवडलं ते ऱ्होडोडेंड्रॉनचं मोठं झाड होतं.जमीनीपासून पंधरा फूटांवर ते काही वर्षापूर्वी तोडलं गेलं होतं आणि त्या तोडलेल्या ठिकाणी चारही बाजूला त्याला मजबूत फांद्या फुटल्या होत्या.त्या फांद्याच्या मधोमध तुटलेल्या खोडावर बसलो तर मला छान बैठकही मिळणार होती आणि छान आडोसासुद्धा. माझ्याबरोबर समोर दाट जंगल असलेला डोंगर होता व झाडाखालची बांबूची वाढही चांगली दाट होती.डोंगराच्या अंगावरूनच पूर्वपश्चिम अशी एक पायवाट जात होती आणि माझं झाड या आडव्या पायवाटेच्या खाली उतारावर दहा फूटांवर होतं.माझ्या जागेवरून मला या आडव्या पायवाटेचा दहा यार्डाचा भाग तेवढा दिसत होता.ही वाट माझ्या डाव्या बाजूला एक घळ ओलांडून त्याच उंचीवरून पुढे गेली होती आणि उजव्या बाजूला तीनशे यार्डावर जिथे भक्ष्य ठेवलं होतं त्या झुडुपाच्या थोडी खालून गेली होती.

पायवाट ज्या ठिकाणी घळीत उतरत होती त्या ठिकाणी पाणी नव्हतं.पण तीस यार्ड खाली व बरोबर माझ्या झाडाखाली मुळांपासून ३-४ पावलांवर दोन तीन छोटी डबकी होती.तिथूनच गावाला व शेतीवाडीला पाणी देणारा झरा सुरू होत होता.माझ्यापासून चारशे यार्ड दूर डोंगरावर गवय्याचं घर होतं.तिथून एक छोटीशी वाट निघून त्या आडव्या पायवाटेवर मला दिसणाऱ्या दहा यार्ड पट्ट्यातच येऊन मिळत होती.या छोट्या वाटेवर तीस यार्डावर एक वळण होतं व याच ठिकाणी एक छोटासा खोलगट भाग सुरू होऊन आडव्या पायवाटेपर्यंत गेला होता.वरच्या छोट्या वाटेवर हा खोलगट भाग जिथून सुरू होता ते ठिकाण व जिथे तो खालच्या पायवाटेवर येऊन मिळत होता ते ठिकाण मात्र मला दिसत नव्हतं.


त्या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाश होता त्यामुळे टॉर्चची गरज नव्हती.बिबळ्या आडव्या पायवाटेवरून किंवा गवय्याच्या घरावरून येणाऱ्या वाटेवरून, कुठूनही आला तरी मला वीस ते चाळीस यार्डावरून सोपा शॉट मिळणार होता.


मी इबॉटसनला सोडायला काही अंतर डोंगर उतरून गेलो व जसा सूर्यास्त जवळ यायला लागला तसा झाडावर येऊन बसलो.काही मिनिटांनी तीन कालीज फिझन्टस,

मादी व एक पिल्लू-डोंगरावरून खाली आले व झाडाखालच्या झऱ्यावर पाणी पिऊन आले तसे निघूनही गेले.दोन्ही वेळेला ते माझ्या झाडाखालून गेले,पण त्यांनी मला पाह्यलं नाही याचा अर्थ माझं लपणं निर्दोष होतं.


रात्रीचा पहिला प्रहर शांततेत गेला पण आठ वाजता भक्ष्याच्या दिशेकडून एका भेकराने अलार्म कॉल द्यायला सुरुवात केली.बिबळ्या आला होता पण मला दिसत असलेल्या दोन्ही वाटांवरून तो भक्ष्यापर्यंत गेला नव्हता.

काही वेळ भुंकल्यावर भेकर थांबलं व दहा वाजेपर्यंत सर्व काही शांत होतं.आता भेकर परत भुंकायला लागलं.याचा अर्थ बिबळ्या दोन तास भक्ष्यावर होता म्हणजे भरपेट खाण्याइतपत व विषाचा पुरेसा डोस अंगात भिनण्या -

इतपत वेळ तो तिथे होता.यावेळी आम्ही भरपूर विष वापरलं होतं आणि त्या कॅप्सूल्स मृतदेहाच्या अंगात अगदी खोलवर पुरून ठेवल्या होत्या.क्षणभरही डोळे न मिटता मी समोरच्या डोंगरावर नजर लावून बसलो होतो.

चंद्रप्रकाश इतका तेजस्वी होता की मला गवताचं पात न् पातं दिसत होतं.साधारण दोन वाजता गवय्याच्या घराच्या दिशेकडून बिबळ्या येत असल्याचं मला ऐकायला आलं.

कारण तो चालताना आवाज यावा म्हणून मी काल त्या वाटेवर वाळून कडकडीत झालेला पालापाचोळा पसरून ठेवला होता.तो ज्या निष्काळजीपणे आणि आवाज न होण्याचा कोणताही प्रयत्न,न करता चालत होता त्यामुळे माझ्या लक्षात आलं की त्याचं एकूण लक्षण काही ठीक दिसत नाहीये.वळणावर तो क्षणभर थांबला,नंतर वाट सोडून त्या खोलगट भागात शिरला आणि त्यातूनच चालत खालच्या आडव्या पायवाटेवर आला.इथे तो परत थांबला.रायफल गुडघ्यांवर आडवी ठेवून आणि दोन्ही हात त्यावर सज्ज ठेवून मी अजिबात आवाज न करता बराच वेळ बसून राहिलो.तो वाटेवरून येणार याची खात्री असल्याने मी ठरवलं होतं की त्याला झाडासमोरून जाऊ द्यायचं आणि तो मला बघू शकेल याची शक्यता संपुष्टात आल्यावर रायफल खांद्याला लावून मला पाहिजे तिथे नेम धरून ट्रीगर दाबायचा.काही वेळ त्याचं डोकं फांद्यामधून दिसेल याची मी वाट पाह्यली व जेव्हा तणाव असह्य झाला तेव्हा मला तो बिबळ्या पायवाटेच्या बाजूला उडी मारून तिरप्या रेषेत बुप झाडाच्या दिशेने येताना ऐकायला आलं.काही क्षण मला वाटलं की काहीतरी चमत्कार घडून त्याने मला पाह्यलं असावं आणि आता पहिल्या भक्ष्याची चव न आवडल्याने दुसरा बळी मिळवण्याचा त्याचा इरादा असावा.पण पायवाट सोडून येण्यामध्ये त्याचा हेतू माझ्याकडे येण्याचा नसून खालच्या झऱ्यावर शॉर्टकट्ने येण्याचा होता.कारण एकदाही न थांबता तो माझं झाड ओलांडून गेला व दुसऱ्या क्षणाला मला तो घाईघाईने आवाज करत पाणी पितानाचा,'लपलप' आवाज ऐकायला आला.त्याच्या एकंदरीत वागणुकीवरून व पाणी पिण्याच्या पद्धतीवरून आता नक्की वाटत होतं की त्याने विषाचा चांगलाच डोस खाल्ला आहे,पण सायनाईडचा मला पूर्वी काहीच अनुभव नसल्याने त्याचा परिणाम दिसायला किती वेळ लागतो याची मला काहीच कल्पना नव्हती.आता झाडाखालचा आवाज बंद होऊनसुद्धा दहा मिनिटं झाली होती आणि बहुधा तो झऱ्याजवळच मरून पडला असावा असं मला वाटायला लागलं तेवढ्यात मी त्याला घळीपलीकडच्या डोंगरावर चढून जात असताना पाहिलं.घळीपलीकडे पायवाटेवर आल्यानंतर त्याचा आवाज बंद झाला.गवय्याच्या घराच्या दिशेकडून वाटेवरून येताना, खोलगट भागातचालताना,

झाडाकडे येताना, पाणी पिताना व शेवटी घळीपलीकडे जाताना एकदाही मला तो दिसू शकला नव्हता.योगायोगाने म्हणा किंवा हेतूपूर्वक म्हणा त्याने स्वतःला सतत कोणत्या ना कोणत्या अशा आडोशाखालीच ठेवलं होतं की जिथे अगदी लख्ख चंद्रप्रकाशही पोचू शकणार नाही.आता माझी एक संधी तर हुकली होती,पण जर नैनितालच्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सायनाइड इतकं प्रभावी असेल तर अजूनही आशा होतीच.


उरलेली रात्र मी तशीच जागून काढली.सकाळी इबॉटसन आला व चहा करून पिता पिता मी त्याला रात्रीची घटना सविस्तर सांगितली. भक्ष्याला भेट दिल्यानंतर कळलं की पहिल्या दिवशी अर्धवट खाल्लेला पायाचा भाग त्याने संपूर्ण खाल्ला होता.त्यामध्ये आम्ही विषाचा संपूर्ण डोस पेरला गेला होता.याशिवाय डावा खांदा व पलीकडचा विष पेरून ठेवलेला भागही त्याने खाऊन संपवला होता.


आता त्याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं होतं.त्यामुळे इबॉटसनबरोबर आलेला पटवारी आता कामाला लागला.

दुपारपर्यंत त्याने शंभर माणसं जमवली.त्यांची एक रांग करून बिबळ्या गेला होता त्या दिशेचा संपूर्ण डोंगराचा भाग आम्ही पिंजून काढला.


कालच्या माझ्या झाडापासून अर्ध्या मैलावर ज्या दिशेला बिबळ्या जाताना मी ऐकलं होतं त्या दिशेला काही मोठमोठ्या शिळा होत्या आणि त्यांच्या तळाशीच बिबळ्या आत जाऊ शकेल इतपत मोठी खोलवर गेलेली गुहा होती.गुहेच्या तोंडावरच बिबळ्याने जमीन खरवडली होती. विष्ठाही केली होती... त्या विष्ठेत त्याने संपूर्ण गिळलेलं भक्ष्याचं एक बोट सापडलं.बऱ्याच उत्साही लोकांनी इकडे तिकडे फिरून दगडधोंडे आणले आणि ते गुहेच्या तोंडाशी रचून आम्ही ती गुहा पूर्ण सीलबंद करून टाकली.आता आत लपलेला बिबळ्या बाहेर पडण्याची शक्यता अजिबात उरली नाही.


दुसऱ्या दिवशी मी एक इंच जाडीच्या तारेच्या जाळीचं भेंडोळं व तंबू लावताना वापरायच्या लोखंडी मेखा घेऊन आलो.दगडधोंडे बाजूला काढून आम्ही त्या गुहेचं तोंड जाळीने बंद करून टाकलं.त्यानंतरचे दहा दिवस मी त्या गुहेला सकाळ-संध्याकाळ भेट देत होतो व त्या काळात नरभक्षकाची कोणतीही बातमी न आल्याने दर दिवशी माझ्या आशा उंचावत चालल्या की पुढच्या भेटीत तरी मला तो बिबळ्या गुहेतच मेला आहे याचे काही निर्देश मिळतील.दहाव्या दिवशी मी गुहेला भेट देऊन परत आलो तेव्हा इबॉटसनने एका अशुभ बातमीनेच माझं स्वागत केलं.रुद्रप्रयागपासून पाच मैलांवरच्या व बद्रीनाथ यात्रा मार्गाच्या वरच्या बाजूला एका मैलावरच्या गावात एका बाईचा बळी गेला होता.


नक्कीच.... अर्सेनिक व स्ट्रायक्लीनचं विष पचवणाऱ्या आणि उलट त्यामुळे उत्तेजित होणाऱ्या जनावरांसाठी सायनाईड हे योग्य विष नसणार ! बिबळ्याने अंगात विष पचवलं होतं ते संशयातीत होतं.तो गुहेत शिरला हे ही नक्की होतं.कारण गुहेत शिरताना त्याची पाठ जिथे घासली गेली होती तिथे खडकाला त्याचे केस चिकटले होते.कदाचित ओव्हरडोस हे विषाचा परिणाम न होण्याचं कारण असावं आणि लांब कुठेतरी त्या गुहेला दुसरं तोंड असावं ज्यातून तो निसटला असावा.


तरीही नरभक्षकाच्या सहवासात आठ वर्ष काढलेल्या गढवाली जनतेची,ते जनावर नसून सैतानी शक्ती आहे आणि अग्निशिवाय त्याला मारण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही अशी अंधश्रद्धा असावी ह्या गोष्टीचं आता मात्र मला अजिबात आश्चर्य वाटेनासं झालं होतं.


२२.०५.२४ या लेखमालेतील पुढील भाग…!

१७/६/२४

जीवघेणे संघर्ष / Fatal Conflict

दीड-दोन लाख वर्षांपूर्वी मानवजातीच्या अगदी छोट्या-छोट्या टोळ्या खूप विखुरलेल्या असणार.त्यांची परस्परांशी स्पर्धा,संघर्ष संभाव्य नव्हता.त्यांची संख्या अगदी सावकाशीने वाहत राहिली असणार आणि जशी वाढली,तसे ते नव-नव्या मुलखात पसरले असणार,या वेळीही निश्चितच हे आमच्या टोळीतील,हे परके असा आपपर भाव असणार,पण त्यातून एकमेकांना विखरून राहणे हीच महत्त्वाची निष्पत्ती असावी. अशा विखुरण्याला माणसाचे ज्ञानसंपादन हा मोठा आधार असावा.कारण ह्या ज्ञानाच्या जोरावर माणूस नव-नव्या परिसरांना जुळवून घेत,तिथला आहार,तिथल्या धोक्यांना समजावून घेत पसरू लागला.केवळ शिकार व अन्य आहार गोळा करणारे मानवी समाज पार ध्रुवप्रदेशाजवळील बर्फील्या प्रदेशापासून अंदमान बेटांवरच्या वर्षावतात पसरलेले आहेत.अनेक दशसहस्र वर्षे ते असे पसरत असता परस्परांशी संघर्ष टाळत राहिले असणार.पण संघप्रिय मानव मोठ-मोठ्या आकारांच्या पशूची शिकार करण्यात तरबेज झाला होता. एक सामाजिक पशू म्हणून मुंग्या मधमाशांप्रमाणे तो आपल्या संघाच्या भल्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायला,जरूर तर प्राणार्पण करायला प्रवृत्त झालेला असणार.


ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा माणसाच्या टोळक्यांना आता नव्या प्रदेशावर पसरायला वाव राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली,तेव्हा त्यांच्यात जीवघेणे संघर्ष सुरू होणे अपेक्षित होते.असे संघर्ष उफाळल्यावर आपपर भाव,स्वकीय आणि परकीय,मित्र आणि शत्रू अशा भावना तीव्र होत गेल्या असणार.मानवी टोळक्यांत असे जीवघेणे संघर्ष केव्हा सुरू झाले? सुमारे बारा हजार वर्षांपासून भाल्यांसारखी प्रक्षेपक आयुधे वापरत लढाया सुरू झाल्या असाव्यात.ह्या काळानंतर हिंसेत कवट्या फुटलेल्या अनेक जणांचे अवशेष सापडू लागतात.अशा लढाया सुरू झाल्यावर स्वकीयांशी कसे वागावे आणि परकीयांशी कसे वागावे ह्याची अगदी विभिन्न नीतिमूल्ये विकसित झाली असावीत.एका जमातीला दुसरी

बरोबरच्या संघर्षात यशस्वी व्हायला स्वकीयांना संघटित करण्याच्या नेतृत्व कौशल्याची आणि परकीयांशी लढताना धैर्य, शौर्य ह्या गुणांची मदत झाली असणार.ह्या प्रवृत्ती,ही गुणवैशिष्ट्ये पोसली गेली असणार.करुणा,मैत्री,

माया स्वकीयांसाठी; क्रौर्य,शत्रुत्व परकीयांसाठी अशी मानवी मूल्येही उद्भवली असणार.ह्या आपल्यातल्यांशी आणि परक्यांशी वागण्याच्या अगदी वेगळ्या भावनांमुळे क्रौर्य कोणते आणि शौर्य कोणते,सद्वर्तन कोणते आणि दुराचार कोणता हे वेगवेगळ्या समाजातले लोक अगदी वेगवेगळ्या मापाने ठरवू शकतात. 


२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात कसाबने अनेक नागरिकांचे बळी घेतले.

भारतीयांना हे क्रूर,घृणास्पद वाटले.पण काही जिहादाच्या पुरस्कर्त्यांना ही एका शूर धर्मवीराची कर्तबगारी भासली.


जमाती-जमातींतील रक्तलांच्छित संघर्ष ईशान्य भारतात अगदी अलीकडे-अलीकडेपर्यंत चालू आहेत.शत्रू समाजावर हल्ले करून त्यांची मुंडकी कापून आणणे हे शौर्याचे लक्षण होते.नागा योद्ध्यांच्या घरांच्या प्रवेश -

द्वारावर अशी मुंडकी अभिमानाने ठोकून लावलेली असत.अजूनही नागा- कुकी जमातींतले असे संघर्ष संपलेले नाहीत.वीस वर्षांपूर्वी मी मणिपूरच्या चुर्चांदपूरच्या डोंगरात गांगटे नावाच्या कुकी समाजाच्या एका गावाचा अभ्यास केला.हे गाव आता जवळजवळ पूर्णपणे ख्रिस्तीधर्माचे बनलेले आहे.असे धर्मांतर १९५५ च्या सुमारास झाले.तत्पूर्वी ह्या मुलखात जवळपास एक-पंचमांश भूभाग जलभाग देवराया,देवडोह म्हणून पूर्णपणे नैसर्गिक आवरणाखाली राखून ठेवलेला होता.

धर्मांतरानंतर आता पारंपरिक निसर्गपूजा बंद केली पाहिजे म्हणून सगळ्या देवराया तोडल्या गेल्या.


पण काही वर्षांतच ह्या देवराया अनेक दृष्टींनी मोलाच्या ठरल्या होत्या.विशेषतः त्यांच्यामुळे कुमरी शेती करताना लावलेल्या आगी पसरत नव्हत्या असे ध्यानात आले.मग ह्यातील काहींची पुनर्स्थापना करण्यात आली.१९९२ च्या सुमारास ह्या सगळ्याचा अभ्यास करायला मी सांगछू नावाच्या गावात जाऊन राहिलो होतो.निसर्गरम्य प्रदेश;खूप खूषीत राहिलो,मग काही वर्षांनी पुन्हा मणिपूरला गेलो.सांगछूची चौकशी केली.धक्काच बसला.सांगछूवर नागांचा जोरकस हल्ला झाला.अनेक लोक मारले गेले.सारा गाव, सारी शेती,बागायत जाळून बेचिराख करण्यात आली.जे जगले-वाचले ते गाव सोडून पळून गेले.आता तो मुलूख उजाड होता.शत्रुसमाजावर नुसता हल्ला करायचा नाही,तर त्यांना पराभूत केल्यावर त्यांचा मुलूख पुरा बेचिराख करून त्यांना देशोधडी लावायचे असे डावपेच पुरातन काळापासून प्रचलित आहेत.


परिजन आणि ऊर्वीजन


मानवाने निसर्गाशी,इतर जीवजातींहून खूपच जटिल,

अनेक पदरी नाते उभारले आहे.अगदी प्राथमिक अवस्थेत शिकार करणाऱ्या मानवाचा आहारसुद्धा इतर कोणत्याही प्राण्याहून वैविध्य संपन्न होता.तो इतर कोणत्याही पशूला,

अशक्य अशा हत्तींसारख्या महाकाय पशुंची शिकार करे, याबरोबरच कीटकभक्षक पक्ष्यांप्रमाणे मुंगळे-वाळव्यांनाही मटकावे. पाणकावळ्यांसारखे मासे,झिंगे पकडे,आणि त्या पाण्यातले शेवाळही खाई.रानडुकरांसारखे भूमिगत कंद उकरून खाई,आणि वटवाघळांसारखे आंबे-फणसही.

यापुढे जाऊन पीठ करून,आगीत भाजून गहू- ज्वारी सारख्या गवतांचे बी सुद्धा वापरी.आरंभी शिकार,फळे, कंदमुळे गोळा करण्यावर गुजराण करण्याच्या काळात समाज रक्ताच्या नात्यांनी बांधलेल्या छोट्या-छोट्या टोळ्यांत संघटित झालेले होते. शेती,पशुपालनाची सुरुवात झाल्यावर ही परिस्थिती बदलू लागली.आता रोजच्या रोज भटकंती करून आहार गोळा करण्याची आवश्यकता नव्हती.कणगीत भरून ठेवलेले धान्य केव्हाही वापरता येऊ लागले.पाळीव पशूचे दूध घरच्या घरी उपलब्ध झाले.हवे तेव्हा त्यांचे मांसही खाता येई.ह्यामुळे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना स्वतःचे अन्न गोळा करण्याची जबाबदारी राहिली नाही.रेमंड डास्मान या परिसरशास्त्रज्ञाने अशा पंचक्रोशीतील निसर्गसंपत्तीवर गुजराण करणाऱ्या,शिकारी, निसर्गोपज संग्रहक,अथवा बाहेरील संसाधनांवर निर्भरित नसलेली,कमी उत्पादक,

कोरडवाहू शेती करणाऱ्या मानव समाजांना परिजन अबवा ecosystem people अशी संज्ञा सुचवली आहे.जास्त सुपीक भूभागातील उत्पादक शेती, पशुपालनाच्या मुलखात तर पुरेशा अन्नोत्पादनासाठी सर्वांनीच शेती किंवा पशुपालन करायची आवश्यकता राहात नाही.मग अशा समाजात श्रमविभागणी सुरू होते. 


मुबलक अन्नाचा फायदा घेऊन समाजात छोट्या-छोट्या टोळ्यांच्या जागी गावे वसायला लागतात.रक्ताच्या नात्यांनी बांधलेल्या निरनिराळ्या टोळ्या एकत्र येऊन,

अनेकदा परकी टोळ्यांशी सलोखा साधून,वस्ती करू लागतात. कुशल कारागीर,व्यापारी,पुजारी,योद्धे,शासक असे वर्ग निर्माण होऊ लागतात.केवळ वस्तीच्या आसमंतातील संसाधनेच उपलब्ध न राहता दूर दूर अंतरावरून निरनिराळी संसाधने,उत्पादने आणून त्यांचा वापर करणे शक्य होते.रेमंड डास्मानने अशी दूरदुरून आणलेली संसाधने वापरणाऱ्या मानव समाजांना ऊर्वीजन अथवा biosphere people असे नामाभिधान सुचवले आहे.इजिप्त देशातल्या नाईल नदीच्या खोऱ्यात पुराचे पाणी दुथडी वाहून त्याबरोबर येणाऱ्या गाळातून अतिशय सुपीक,शेतीला योग्य जमीन निर्माण होते.ह्या शेतीतून अतिरिक्त उत्पादनाची जी रेलचेल शक्य झाली त्याच्या आधारावर येथे जगातील एक पुरातन सभ्यता सुमारे सात हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आली.इथल्या कारागीर वर्गाने तांब्याचा वापर सुरू केला,सुंदर सुंदर बरण्या,छोट्या छोट्या मूर्ती घडवल्या. व्यापारी शेकडो किलोमीटरवरून उपकरणांसाठी खास गुणवत्तेचे दगड आणवू लागले.व्यापाराचे हिशोब ठेवता ठेवता लेखन कला अस्तित्वात आली.नाईलचे वार्षिक पूर केव्हा येतील हे भाकीत करण्यासाठी काळजीपूर्वक खगोल निरीक्षण सुरू झाले,पंचांगे रचली गेली.ह्या सगळ्या समाजाला बांधणारे व मोठ्या प्रदेशाचे भरपूर अतिरिक्त उत्पादन स्वतःकडे खेचून घेणारे शासक अस्तित्वात आले.हे शासक ऊर्वीजनांचे नामी उदाहरण आहे.अशा रीतीने समाज वेगवेगळ्या थरांत विभाजित होऊ लागल्यावर वरिष्ठ थरातल्या व्यक्तींना आपला दिमाख मिरवण्यासाठी आपण किती उधळपट्टी करू शकतो-आपण धुरंधर किती धुरा वाहू शकतो - हे दाखवण्याची हौस साहजिकच निर्माण झाली. इजिप्तमधल्या मोराच्या पिसाऱ्यासारख्या ह्या लोढण्यांचा,धुरांचा सुप्रसिद्ध आविष्कार म्हणजे भव्य पिरॅमिड.पिरॅमिड बांधले गेले समाजातल्या खास प्रतिष्ठा लाभलेल्या व्यक्तींना त्यांचा दिमाख मृत्यूनंतरही मिरवत राहता यावा ह्या हेतून.अशा पिरॅमिडमध्ये खास उपचार करून त्यांचे मृतदेह आणि त्यांना मृत्यूनंतर उपलब्ध हव्या म्हणून अनेक वस्तू ठेवल्या जात.


त्या देहांचे वेष्टन म्हणून बांधलेले चौरस पायावर उभारलेल्या शंकूच्या आकाराचे हे पिरॅमिड आकाराने प्रचंड असत.गिज़ाचा चार हजार पाचशे वर्षांपूर्वी बांधलेला सुविख्यात पिरामिड जवळजवळ दीडशे मीटर उंच आहे.त्याच्या चौरस पायाची एकेक बाजू दोनशे तीस मीटर लांब आहे.हा बांधायला मोठ मोठे दगड खूप अंतरांवरून आणले गेले.तब्बल तीस वर्षे एका वेळी दहा- दहा हजार मजुरांनी खपून हा पिरामिड पुरा केला.म्हणजे एका मृत राजाचा दिमाख अनंत कालपर्यंत टिकून राहावा ह्या इच्छेने एवढे प्रचंड अतिरिक्त अन्नोत्पादन,एवढे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम ओतले गेले ! 


एका धुरंधराचा केवढा भार भुईवर,आणि समाजातल्या इतर नर-नारींवर पडला आहे! मानवी समाज एकमेकांना मदत करण्यातून सर्वांचे हित साधण्याच्या व्यवहारांवर पोसले गेले.परंतु मानवाच्या ज्ञान-तंत्रज्ञान विकासातून त्याची निसर्गावरची पकड जसजशी बळकट होत गेली,

निसर्गाकडून मानवाला हवीशी अधिकाधिक उत्पादने मिळवता येऊ लागली, आयुधांद्वारे निसर्गाला वाकवता येऊ लागले, तसतसे मानवी समाजांतले परस्परसंबंधही बदलले. एकमेकांच्यातली देवाण-घेवाण अधिकाधिक एकतर्फी होऊ लागली. 


समाजातील काही व्यक्ती बलदंड बनल्या आणि इतरांना फारसे काही न देता त्यांच्याकडून खूप हिरावून घेऊ लागल्या.इजिप्तच्या एका फारोहाच्या मरणोत्तर सुखासाठी दहा-दहा हजार लोकांनी तीस- तीस वर्षे खपणे हे ह्याचेच द्योतक आहे.


१६.०५.२४ या लेखमालेतील पुढील भाग..



१५/६/२४

संघर्ष हेच जीवन / Struggle is life...

संघर्षातून विजय मिळतो…डॉ.अथर्व गोधंळी


ख्रिस्तोपर मोरले यांनी एका ठिकाणी सांगितले आहे.

जेव्हा तुम्ही तुमचा रस्ता तुमच्या प्रकाशात निवडता आणि त्याचा बिनशर्त स्वीकार करता,तेव्हा यश तुमचेच असते.


या पृथ्वीवर प्रत्येक माणसाची अशी एक स्वतःची कथा असते.ज्यातून तो माणूस घडत जातो. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्या आसपास आपणाला दिसणारी,भेटणारी जी माणसं असतात.त्यांना आपण खरोखरच ओळखतो का? कधीतरी जगावेगळं काम करणाऱ्या माणसाचा सन्मान झाला की आपणा सर्वांची नजर त्या व्यक्तीला शोधायला लागते.यशस्वी झालेल्या माणसाच्या यशाचे आपण कौतुक करतो.पण ते यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष.तर त्या यशामध्ये त्याला सोबत करणारे यांची आपण फारशी नोंद घेत नाही.(ती घेणं गरजेचे असते.)


अशा वारंवार संघर्षातूनच ते विश्वविक्रमी बनतात.या विक्रमविराचं जगावेगळं वैशिष्ट्य म्हणजे तो नम्र असतो व त्याचे पाय जमिनीवर असतात.'प्रत्येक दिवशी मी शंभर वेळा स्वतःला आठवण करून देतो की,माझं अंतर्गत आणि बाह्य जीवन इतर लोकांच्या-

जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टावर अवलंबून आहे,आणि त्यापासून जे काही मला मिळालं आहे आणि आत्ताही मला मिळत आहे,तेवढे कष्ट मीही करून त्याची परतफेड केली पाहिजे.'अल्बर्ट आईनस्टाईन,नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ,

हा नम्रपणाच काळजाला जाणीवपूर्वक भिडतो.

आणि आपणही नकळत नम्र होऊन जातो.


वृत्तपत्राच्या एका तुकड्यामुळे माणसाच आयुष्य बदलत असेल तर संपूर्ण वर्तमानपत्र संपुर्ण मानवी जीवन बदलू शकते.


आईच्या गोष्टी ऐकता ऐकता आपण मोठे होतो. अशीच एक गोष्ट कोल्हापूर जवळील टोप गावामध्ये अथर्व याला त्याच्या आईने सांगितली. चपाती करत असताना चपातीच्या खाली ठेवण्यासाठी एक कागद घेऊन ये असं तिने अथर्वला सांगितले.अथर्व तो कागद घेऊन आला चपाती खाली तो कागद ठेवत असताना आईने एक बातमी वाचली.तो कागद म्हणजे वृत्तपत्र होते.ती बातमी होती.वेदांगी कुलकर्णी यांनी १५९ दिवसांमध्ये..२९ हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास केला.आणि इथूनच सुरु झाला.विश्वविक्रमाचा थरार..


आणि त्याच वेळी अथर्वने एक जगतिक विश्वविक्रम करायचे ठरविले.त्याच स्वप्नांची पुर्तता म्हणजे २९६ कि.मी.अंतर १२ तासांमध्ये पुर्ण करुन विश्वविक्रम केला.त्यावेळी तो वी मध्ये शिकत होता.तत्पूर्वी वी मध्ये असताना त्याने ने ११ व्या वर्षी तायक्वांदो मध्ये ब्लॅक बेल्ट मिळविले,आणि त्यातीलच १८ व्या वर्षी सेकंड दान ब्लॅक बेल्ट मिळविले.अथर्व संदीप गोधंळी त्याच्याकडे साधीच सायकल होती.


विश्वविक्रमाबद्दल अथर्व घरी वडिलांना बोलला.त्यावेळेला वडील म्हणाले,ज्यावेळी जोतिबाला दहा राऊंड तु मारशील त्यावेळी मी तुला गिअरची रेसिंग सायकल घेतो.मग पहाटे वाजता दिवस सुरू झाला.कुणीही मार्गदर्शक नव्हता.वडील हेच मार्गदर्शक व गुरू होते.जे नेहमीच मोटारसायकल वरून त्याच्या सोबत असायचेत.सराव,क्लास,शाळा यामध्ये कधीतरी झोप पुर्ण होत नसायची..पण लवकर उठून सराव करुन अभ्यासही जोमाने करायचा.


या विश्वविक्रमाच्या अनुषगांने पत्रकार श्रध्दा जोगळेकर यांचे मौलीक मार्गदर्शन त्यांना मिळाले. मग सुरू झाला सराव..आणि फक्त सराव..


विश्वविक्रम करण्याचे अनुषंगाने ज्या काही गोष्टी असतात जे काय मार्गदर्शन असतं.ते अतिशय महत्त्वाचे असे मार्गदर्शन कोल्हापुरातील प्रसिद्ध अमोल कोरगांवकर(बाबा) यांनी केले.


विश्वविक्रम करण्यासाठी आहार,सरावाची योग्य पद्धत काही व्यायामाचे प्रकार,यासाठी अनुभवी मार्गदर्शन गरजेचे होते.कारण हा २९६ कि.मी.प्रवास फारच कठीण होता.त्यासाठी कोच म्हणून आकाश कोरगावकर जे कोल्हापुरातील पहिले आयर्न मॅन आहेत.त्यांचे मार्गदर्शन लाभले.


या अगोदर अशाच ६ रेकॉर्डची नोंद झाली होती.पण ते रेकॉर्ड वयाच्या १६ वर्षाखालील होते,व ते १२ तासांमध्ये केले गेले होते.अथर्व हा बहाद्दर होता,अवघ्या १४ वर्षाचा.स्वतः वरील विश्वासावर मजबूत विश्वास असणारा..नविन जीवनाला सुरुवात करणारा.


या विश्वविक्रमाची नोंद घेण्यासाठी टीम प्रत्यक्ष स्थळी हजर होती.बारा तासाचे संपूर्ण चित्रण जतन करून ठेवलेलं आहे.


आणि तो क्षण आला ज्यावेळी त्याने पुर्वीचे असणारे १६ वर्षाखालील ६ रेकॉर्ड वयाच्या १४ व्या वर्षी २४० कि.मी.चे अंतर अवघ्या ९ तास ४५ मिनीटात पुर्ण केले.अगोदरच्या रेकॉर्ड नुसार ते ६ रेकॉर्ड पुर्ण करण्यासाठी १२ लागले होते.


ही घटना म्हणजे आनंदाची कधीही न संपणारी भेट होती.आई बाबा यांना आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं होतं.वडिलांनी तर तो क्षण आनंदाने नाचून साजरा केला.


अथर्वच्या नावे ११ विश्वकॉर्ड आहेत.अनेक शाळा महाविद्यालय संस्थांच्याकडून मानसन्मान व ३० ते ३५ पुरस्कार मिळालेले आहेत.


ट्रायथलॉन हा एक खेळातील प्रकार आहे.यामध्ये १.८ कि.मी.पोहणे,९० कि.मी,सायकलिंग,२१ कि.मी,पळणे सलग ९ तासात पुर्ण करण्याचा  अवधी असतो.तो त्याने अवघ्या ६ तास ३४ मिनीटात पुर्ण केला.व नवीन विश्वविक्रम केला.यासाठी त्याने अविरतपणे ४० दिवस सराव केला,जो खुपच कमी कालावधीचा होता.


२०१९ साली त्याला द डायसेस ऑफ एशिया चेन्नई तामिळनाडू यांचेकडून डॉक्टरेट इन अँथलँटिक ही पदवी बहाल करण्यात आली.यामुळे संपूर्ण भारतातून सर्वात लहान वयात डॉक्टरेट मिळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.१४ वर्षांचा डॉ.अथर्व संदीप गोंधळी 'रस्ता सुरक्षा'चा बॅण्ड ॲम्बॅसडर आहे.जनजागृतीसाठी आरटीओकडून सन्मान मिळाला आहे.


डॉक्टर आई-बाबांच्या पोटी जन्माला आलेला अथर्व खूपच नम्र आणि प्रामाणिक आहे. विश्वविक्रम करूनही त्यांने नम्रपर्वक आईबद्दल एक आठवण सांगितली.मी पहाटे ४ वाजता सरावासाठी बाहेर पडत असताना,आई मला चपाती भाजी करून द्यायची.ही आठवण सांगत असताना त्याच्या डोळ्याच्या कडा नकळत ओल्या झालेल्या दिसल्या.


कृत्रिम बुद्धिमत्ता,यंत्रमानवाच्या या धावत्या जगामध्ये माणूस व त्याची भावनिक संवेदनशीलता जतन करून,संस्कारशील जीवन घडविणे दिवसागणिक कठीण होत असताना, एक चांगला माणूस घडविण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद व अनुकरणीय असे आहे.जर वृत्तपत्राचा तो तुकडा तुम्हाला मिळालाच नसता तर हे स्वप्न पूर्ण झालं असतं का? त्यांनी नम्रपणे सांगितलं,ज्या वेगाने ते पूर्ण झालं त्या वेगाने ते पूर्ण झालं नसते.


काचेच्या,स्टेनलेस स्टीलच्या,एअर कंडीशनच्या,

स्टीरीओ फोनिक डेक सिस्टिम असलेल्या आणि एकलकोंड्या अशा कोशामधे गुरफटून राहणं हे अमानुषच आहे.सहजीवन,सहकार्य,पाहणे आणि दाखवणे या माणसांच्या मूळ प्रवृत्तिपासून दूर जाण्यासारखं आहे हे.मानसशास्त्रज्ञ याला व्यक्तिमत्त्वाचं विघटन म्हणतात. 


अथर्वची ही यशोगाथा सहज,नैसर्गिक पध्दतीने जीवन जगता येते,हे सांगत आहे.त्यांचे कुटुंब व या यशामध्ये असणाऱ्या सर्वांचे तो नम्रपणे आभार मानतो.कल्लेश्वर ग्रुप,टोप यांचाही तो आवर्जून उल्लेख करतो.


आपल्या वयाच्या मुलांना दिलेला संदेश बरचं काही सांगून जातो,अथर्व म्हणतो,निर्मात्याने प्रत्येकालाच वैशिष्ट्यपूर्ण बनविलेले आहे.प्रत्येकाने हे ओळखणे.मोठी मोठी स्वप्ने पहा.व ती पुर्ण करण्यासाठी संघर्ष करा.कारण संघर्ष म्हणजेच जीवन… 


विजय गायकवाड,विशेष प्रतिनिधी,कोल्हापूर,

दै.धर्मयोध्दा..पुर्वप्रसिध्दी दै.धर्मयोध्दा,सर्व संपादकीय मंडळाचे,व टिमचे आभार व धन्यवाद…


प्रतिक्रिया…


वाह,खूप सुंदर लेख.प्रत्येकाच्या आयुष्यात संधी अनेक रूपाने येत असते. फक्त संधी ओळखता आली पाहिजे.त्या संधीचे नेमके महत्व ओळखून प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. नेमकं हेच अथर्वच्या रेकॉर्ड मधून कळून येतं.


    चपाती गोल करण्यासाठी आणलेला एक पेपरचा तुकडा त्याला पाहून गोल असणाऱ्या पृथ्वीतलावर अथर्वने स्वतःच अस्तित्व सिद्ध केलं याला म्हणतात संधी पकडणे. यासाठी अथर्व,त्याचे आई वडील,आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचे खूप खूप अभिनंदन.या अथर्वचे यश आपल्यापर्यंत पोहोचवून अनेक अथर्व निर्माण करण्याच्या हेतूने अतिशय सुंदर लेख लिहिणाऱ्या विजय गायकवाड यांचे सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन.- माधव गव्हाणे,सेलू, परभणी जिल्हा.