बोकडाला भेट देऊन मी इन्स्पेक्शन बंगल्यावर परतत होतो तेव्हा गावातच मला निरोप मिळाला की रुद्रप्रयागमध्ये माझ्या उपस्थितीची तातडीची गरज आहे,कारण आदल्या रात्री आणखी एका माणसाचा बळी गेलाय.निरोप देणाऱ्या माणसाला ही घटना नक्की कुठे घडली त्याबद्दल जास्त माहिती नव्हती,पण नरभक्षकाने पगमार्कस असं दाखवत होते की आमचा गावापर्यंत पाठलाग केल्यानंतर बिबळ्या परत शेळ्यांच्या वाटेवर गेला होता व वळणावरून उजवीकडे गेला होता.
त्यामुळे माझा अंदाज असा होता की आमच्यापैकी कोणालाही उचलण्यात अपयश आल्यावर त्याने डोंगराच्या वरच्या बाजूला जाऊन तिथे शिकार साधली असणार.माझा हा अंदाज खरा ठरल्याचं नंतर सिद्ध झालं.बंगल्यावर आलो तसा मला इबॉटसन नंदराम नावाच्या एका माणसाशी बोलत असलेला दिसला.आम्ही काल बोकडाजवळ बसलो होतो.त्या ठिकाणापासून चार मैलांवर नंदरामचं गाव होतं.या गावाच्या वरच्या बाजूला अर्ध्या मैलावर एका खोल घळीच्या पलीकडे गवय्या नावाच्या अस्पृश्य जातीच्या माणसाने जंगलाचा एक छोटा भाग साफ करून त्यावर घर बांधलं होतं.या घरात तो त्याची आई,बायको,तीन पोरांबरोबर राहत होता. त्या दिवशी अगदी पहाटे नंदरामला गवय्याच्या घराकडून रडण्याचा आवाज आला.त्याने ओरडून 'काय प्रकार आहे?' असे विचारलं तेव्हा त्याला सांगितलं गेलं की अर्ध्या तासापूर्वी घराच्या मालकाला नरभक्षकाने उचलून नेलंय.ताबडतोब धावतपळत ही खबर द्यायला नंदराम बंगल्यावर आला होता.इबॉटसनने त्याच्या अरबी व इंग्लिश घोड्यांवर खोगिरं घातली.भरपेट ब्रेकफास्ट करून आणि रस्ता दाखवायला नंदरामला बरोबर घेऊन आम्ही निघालो. त्या पहाडी भागात पायवाटा अशा अजिबात नव्हत्या.फक्त गुरांच्या आणि बकऱ्यांच्या अवघड वाटा होत्या.मोठ्या आकाराच्या इंग्लिश घोड्यांना त्या वाटावरची वळणं घ्यायला अवघड पडायला लागलं तसं आम्ही घोडे परत पाठवले व उरलेला चढाचा रस्ता पायीच तुडवाले तसं जंगलातल्या साफ केलेल्या जागेवर आम्ही पोचलो तशा आम्हाला घरातल्या दोन बायका भेटल्या. अजूनही त्यांना आपला 'मालक' जिवंत असेल अशी आशा होती हे सरळ दिसत होतं.त्यांनी आम्हाला गवय्या दरवाजाजवळ बसलेला असताना बिबळ्याने त्याला कुठून उचललं ती जागा दाखवली.त्या दुर्दैवी माणसाला बिबळ्याने गळ्यावरच पकडलं होतं.त्यामुळे त्याला ओरडताही आलं नव्हतं.त्यानंतर १००-१५० यार्ड ओढून नेऊन त्याला ठार मारलं होतं.तिथून पुढे ४०० यार्ड ओढत नेऊन एका छोट्या झुडुपाखालच्या खळग्यात टाकून दिलं होतं. बायकांचं रडणं व नंदरामच्या घातलेल्या हाकांमुळे खाताना त्याला व्यत्यय आला असावा. त्यामुळे फक्त गळा,जबडा व खांद्याचा आणि मांडीचा थोडासा भाग खाऊन तो निघून गेला होता.भक्ष्याच्या आसपास कुठेही,बसता येईल असं सोयीचं झाड नव्हतं.त्यामुळे आम्ही मृतदेहात खाल्लेल्या ठिकाणी विष पेरून ठेवलं.आता संध्याकाळ व्हायला सुरुवात झाल्याने आम्ही तो खळगा दिसेल इतपत दूर डोंगरावर एका ठिकाणी जागा घेतली.बिबळ्या आसपासच कुठेतरी होता हे निश्चित.पण दोन तास बसूनसुद्धा आम्हांला काही दिसलं नाही.नंतर आम्ही आम्हाला दिलेला कंदील पेटवून इन्स्पेक्शन बंगल्यावर परतलो.दुसऱ्या दिवशी पहाटे अंधार असतानाच आम्ही उठलो आणि अगदी तांबडं फुटत असतानाच परत एकदा त्याच जागी तासभर बसलो पण आम्हाला ना काही दिसलं ना काही ऐकायला आलं.उन्हं चांगली वर आल्यावर आम्ही मृतदेहाजवळ आलो आणि पाह्यलं तर विष पेरलेल्या भागांना बिबळ्याने तोंडही लावलं नव्हतं.
पण दुसरा खांदा व पाय खाल्ला होता. त्यानंतर त्याने काही अंतर तो मृतदेह ओढत नेऊन एका झुडुपाच्या खाली ठेवून दिला होता.
याही ठिकाणी बसायला योग्य असं झाड जवळपास नव्हतं.त्यामुळे बरीच चर्चा केल्यावर आम्ही एक योजना निश्चित केली.इबॉटसनने डोंगर उतरून एक मैलावरच्या गावात जाऊन एका मोठ्या आंब्याच्या झाडावर मचाण बांधून बसावं व रात्र तिथेच काढावी तर मी भक्ष्यापासून ४०० यार्डावर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, जिथे आम्हाला आदल्या दिवशी पगमार्कस दिसले होते तिथे बसावं.यावेळी मी जे झाड निवडलं ते ऱ्होडोडेंड्रॉनचं मोठं झाड होतं.जमीनीपासून पंधरा फूटांवर ते काही वर्षापूर्वी तोडलं गेलं होतं आणि त्या तोडलेल्या ठिकाणी चारही बाजूला त्याला मजबूत फांद्या फुटल्या होत्या.त्या फांद्याच्या मधोमध तुटलेल्या खोडावर बसलो तर मला छान बैठकही मिळणार होती आणि छान आडोसासुद्धा. माझ्याबरोबर समोर दाट जंगल असलेला डोंगर होता व झाडाखालची बांबूची वाढही चांगली दाट होती.डोंगराच्या अंगावरूनच पूर्वपश्चिम अशी एक पायवाट जात होती आणि माझं झाड या आडव्या पायवाटेच्या खाली उतारावर दहा फूटांवर होतं.माझ्या जागेवरून मला या आडव्या पायवाटेचा दहा यार्डाचा भाग तेवढा दिसत होता.ही वाट माझ्या डाव्या बाजूला एक घळ ओलांडून त्याच उंचीवरून पुढे गेली होती आणि उजव्या बाजूला तीनशे यार्डावर जिथे भक्ष्य ठेवलं होतं त्या झुडुपाच्या थोडी खालून गेली होती.
पायवाट ज्या ठिकाणी घळीत उतरत होती त्या ठिकाणी पाणी नव्हतं.पण तीस यार्ड खाली व बरोबर माझ्या झाडाखाली मुळांपासून ३-४ पावलांवर दोन तीन छोटी डबकी होती.तिथूनच गावाला व शेतीवाडीला पाणी देणारा झरा सुरू होत होता.माझ्यापासून चारशे यार्ड दूर डोंगरावर गवय्याचं घर होतं.तिथून एक छोटीशी वाट निघून त्या आडव्या पायवाटेवर मला दिसणाऱ्या दहा यार्ड पट्ट्यातच येऊन मिळत होती.या छोट्या वाटेवर तीस यार्डावर एक वळण होतं व याच ठिकाणी एक छोटासा खोलगट भाग सुरू होऊन आडव्या पायवाटेपर्यंत गेला होता.वरच्या छोट्या वाटेवर हा खोलगट भाग जिथून सुरू होता ते ठिकाण व जिथे तो खालच्या पायवाटेवर येऊन मिळत होता ते ठिकाण मात्र मला दिसत नव्हतं.
त्या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाश होता त्यामुळे टॉर्चची गरज नव्हती.बिबळ्या आडव्या पायवाटेवरून किंवा गवय्याच्या घरावरून येणाऱ्या वाटेवरून, कुठूनही आला तरी मला वीस ते चाळीस यार्डावरून सोपा शॉट मिळणार होता.
मी इबॉटसनला सोडायला काही अंतर डोंगर उतरून गेलो व जसा सूर्यास्त जवळ यायला लागला तसा झाडावर येऊन बसलो.काही मिनिटांनी तीन कालीज फिझन्टस,
मादी व एक पिल्लू-डोंगरावरून खाली आले व झाडाखालच्या झऱ्यावर पाणी पिऊन आले तसे निघूनही गेले.दोन्ही वेळेला ते माझ्या झाडाखालून गेले,पण त्यांनी मला पाह्यलं नाही याचा अर्थ माझं लपणं निर्दोष होतं.
रात्रीचा पहिला प्रहर शांततेत गेला पण आठ वाजता भक्ष्याच्या दिशेकडून एका भेकराने अलार्म कॉल द्यायला सुरुवात केली.बिबळ्या आला होता पण मला दिसत असलेल्या दोन्ही वाटांवरून तो भक्ष्यापर्यंत गेला नव्हता.
काही वेळ भुंकल्यावर भेकर थांबलं व दहा वाजेपर्यंत सर्व काही शांत होतं.आता भेकर परत भुंकायला लागलं.याचा अर्थ बिबळ्या दोन तास भक्ष्यावर होता म्हणजे भरपेट खाण्याइतपत व विषाचा पुरेसा डोस अंगात भिनण्या -
इतपत वेळ तो तिथे होता.यावेळी आम्ही भरपूर विष वापरलं होतं आणि त्या कॅप्सूल्स मृतदेहाच्या अंगात अगदी खोलवर पुरून ठेवल्या होत्या.क्षणभरही डोळे न मिटता मी समोरच्या डोंगरावर नजर लावून बसलो होतो.
चंद्रप्रकाश इतका तेजस्वी होता की मला गवताचं पात न् पातं दिसत होतं.साधारण दोन वाजता गवय्याच्या घराच्या दिशेकडून बिबळ्या येत असल्याचं मला ऐकायला आलं.
कारण तो चालताना आवाज यावा म्हणून मी काल त्या वाटेवर वाळून कडकडीत झालेला पालापाचोळा पसरून ठेवला होता.तो ज्या निष्काळजीपणे आणि आवाज न होण्याचा कोणताही प्रयत्न,न करता चालत होता त्यामुळे माझ्या लक्षात आलं की त्याचं एकूण लक्षण काही ठीक दिसत नाहीये.वळणावर तो क्षणभर थांबला,नंतर वाट सोडून त्या खोलगट भागात शिरला आणि त्यातूनच चालत खालच्या आडव्या पायवाटेवर आला.इथे तो परत थांबला.रायफल गुडघ्यांवर आडवी ठेवून आणि दोन्ही हात त्यावर सज्ज ठेवून मी अजिबात आवाज न करता बराच वेळ बसून राहिलो.तो वाटेवरून येणार याची खात्री असल्याने मी ठरवलं होतं की त्याला झाडासमोरून जाऊ द्यायचं आणि तो मला बघू शकेल याची शक्यता संपुष्टात आल्यावर रायफल खांद्याला लावून मला पाहिजे तिथे नेम धरून ट्रीगर दाबायचा.काही वेळ त्याचं डोकं फांद्यामधून दिसेल याची मी वाट पाह्यली व जेव्हा तणाव असह्य झाला तेव्हा मला तो बिबळ्या पायवाटेच्या बाजूला उडी मारून तिरप्या रेषेत बुप झाडाच्या दिशेने येताना ऐकायला आलं.काही क्षण मला वाटलं की काहीतरी चमत्कार घडून त्याने मला पाह्यलं असावं आणि आता पहिल्या भक्ष्याची चव न आवडल्याने दुसरा बळी मिळवण्याचा त्याचा इरादा असावा.पण पायवाट सोडून येण्यामध्ये त्याचा हेतू माझ्याकडे येण्याचा नसून खालच्या झऱ्यावर शॉर्टकट्ने येण्याचा होता.कारण एकदाही न थांबता तो माझं झाड ओलांडून गेला व दुसऱ्या क्षणाला मला तो घाईघाईने आवाज करत पाणी पितानाचा,'लपलप' आवाज ऐकायला आला.त्याच्या एकंदरीत वागणुकीवरून व पाणी पिण्याच्या पद्धतीवरून आता नक्की वाटत होतं की त्याने विषाचा चांगलाच डोस खाल्ला आहे,पण सायनाईडचा मला पूर्वी काहीच अनुभव नसल्याने त्याचा परिणाम दिसायला किती वेळ लागतो याची मला काहीच कल्पना नव्हती.आता झाडाखालचा आवाज बंद होऊनसुद्धा दहा मिनिटं झाली होती आणि बहुधा तो झऱ्याजवळच मरून पडला असावा असं मला वाटायला लागलं तेवढ्यात मी त्याला घळीपलीकडच्या डोंगरावर चढून जात असताना पाहिलं.घळीपलीकडे पायवाटेवर आल्यानंतर त्याचा आवाज बंद झाला.गवय्याच्या घराच्या दिशेकडून वाटेवरून येताना, खोलगट भागातचालताना,
झाडाकडे येताना, पाणी पिताना व शेवटी घळीपलीकडे जाताना एकदाही मला तो दिसू शकला नव्हता.योगायोगाने म्हणा किंवा हेतूपूर्वक म्हणा त्याने स्वतःला सतत कोणत्या ना कोणत्या अशा आडोशाखालीच ठेवलं होतं की जिथे अगदी लख्ख चंद्रप्रकाशही पोचू शकणार नाही.आता माझी एक संधी तर हुकली होती,पण जर नैनितालच्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सायनाइड इतकं प्रभावी असेल तर अजूनही आशा होतीच.
उरलेली रात्र मी तशीच जागून काढली.सकाळी इबॉटसन आला व चहा करून पिता पिता मी त्याला रात्रीची घटना सविस्तर सांगितली. भक्ष्याला भेट दिल्यानंतर कळलं की पहिल्या दिवशी अर्धवट खाल्लेला पायाचा भाग त्याने संपूर्ण खाल्ला होता.त्यामध्ये आम्ही विषाचा संपूर्ण डोस पेरला गेला होता.याशिवाय डावा खांदा व पलीकडचा विष पेरून ठेवलेला भागही त्याने खाऊन संपवला होता.
आता त्याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं होतं.त्यामुळे इबॉटसनबरोबर आलेला पटवारी आता कामाला लागला.
दुपारपर्यंत त्याने शंभर माणसं जमवली.त्यांची एक रांग करून बिबळ्या गेला होता त्या दिशेचा संपूर्ण डोंगराचा भाग आम्ही पिंजून काढला.
कालच्या माझ्या झाडापासून अर्ध्या मैलावर ज्या दिशेला बिबळ्या जाताना मी ऐकलं होतं त्या दिशेला काही मोठमोठ्या शिळा होत्या आणि त्यांच्या तळाशीच बिबळ्या आत जाऊ शकेल इतपत मोठी खोलवर गेलेली गुहा होती.गुहेच्या तोंडावरच बिबळ्याने जमीन खरवडली होती. विष्ठाही केली होती... त्या विष्ठेत त्याने संपूर्ण गिळलेलं भक्ष्याचं एक बोट सापडलं.बऱ्याच उत्साही लोकांनी इकडे तिकडे फिरून दगडधोंडे आणले आणि ते गुहेच्या तोंडाशी रचून आम्ही ती गुहा पूर्ण सीलबंद करून टाकली.आता आत लपलेला बिबळ्या बाहेर पडण्याची शक्यता अजिबात उरली नाही.
दुसऱ्या दिवशी मी एक इंच जाडीच्या तारेच्या जाळीचं भेंडोळं व तंबू लावताना वापरायच्या लोखंडी मेखा घेऊन आलो.दगडधोंडे बाजूला काढून आम्ही त्या गुहेचं तोंड जाळीने बंद करून टाकलं.त्यानंतरचे दहा दिवस मी त्या गुहेला सकाळ-संध्याकाळ भेट देत होतो व त्या काळात नरभक्षकाची कोणतीही बातमी न आल्याने दर दिवशी माझ्या आशा उंचावत चालल्या की पुढच्या भेटीत तरी मला तो बिबळ्या गुहेतच मेला आहे याचे काही निर्देश मिळतील.दहाव्या दिवशी मी गुहेला भेट देऊन परत आलो तेव्हा इबॉटसनने एका अशुभ बातमीनेच माझं स्वागत केलं.रुद्रप्रयागपासून पाच मैलांवरच्या व बद्रीनाथ यात्रा मार्गाच्या वरच्या बाजूला एका मैलावरच्या गावात एका बाईचा बळी गेला होता.
नक्कीच.... अर्सेनिक व स्ट्रायक्लीनचं विष पचवणाऱ्या आणि उलट त्यामुळे उत्तेजित होणाऱ्या जनावरांसाठी सायनाईड हे योग्य विष नसणार ! बिबळ्याने अंगात विष पचवलं होतं ते संशयातीत होतं.तो गुहेत शिरला हे ही नक्की होतं.कारण गुहेत शिरताना त्याची पाठ जिथे घासली गेली होती तिथे खडकाला त्याचे केस चिकटले होते.कदाचित ओव्हरडोस हे विषाचा परिणाम न होण्याचं कारण असावं आणि लांब कुठेतरी त्या गुहेला दुसरं तोंड असावं ज्यातून तो निसटला असावा.
तरीही नरभक्षकाच्या सहवासात आठ वर्ष काढलेल्या गढवाली जनतेची,ते जनावर नसून सैतानी शक्ती आहे आणि अग्निशिवाय त्याला मारण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही अशी अंधश्रद्धा असावी ह्या गोष्टीचं आता मात्र मला अजिबात आश्चर्य वाटेनासं झालं होतं.
२२.०५.२४ या लेखमालेतील पुढील भाग…!