* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जीवघेणे संघर्ष / Fatal Conflict

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१७/६/२४

जीवघेणे संघर्ष / Fatal Conflict

दीड-दोन लाख वर्षांपूर्वी मानवजातीच्या अगदी छोट्या-छोट्या टोळ्या खूप विखुरलेल्या असणार.त्यांची परस्परांशी स्पर्धा,संघर्ष संभाव्य नव्हता.त्यांची संख्या अगदी सावकाशीने वाहत राहिली असणार आणि जशी वाढली,तसे ते नव-नव्या मुलखात पसरले असणार,या वेळीही निश्चितच हे आमच्या टोळीतील,हे परके असा आपपर भाव असणार,पण त्यातून एकमेकांना विखरून राहणे हीच महत्त्वाची निष्पत्ती असावी. अशा विखुरण्याला माणसाचे ज्ञानसंपादन हा मोठा आधार असावा.कारण ह्या ज्ञानाच्या जोरावर माणूस नव-नव्या परिसरांना जुळवून घेत,तिथला आहार,तिथल्या धोक्यांना समजावून घेत पसरू लागला.केवळ शिकार व अन्य आहार गोळा करणारे मानवी समाज पार ध्रुवप्रदेशाजवळील बर्फील्या प्रदेशापासून अंदमान बेटांवरच्या वर्षावतात पसरलेले आहेत.अनेक दशसहस्र वर्षे ते असे पसरत असता परस्परांशी संघर्ष टाळत राहिले असणार.पण संघप्रिय मानव मोठ-मोठ्या आकारांच्या पशूची शिकार करण्यात तरबेज झाला होता. एक सामाजिक पशू म्हणून मुंग्या मधमाशांप्रमाणे तो आपल्या संघाच्या भल्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायला,जरूर तर प्राणार्पण करायला प्रवृत्त झालेला असणार.


ह्या पार्श्वभूमीवर जेव्हा माणसाच्या टोळक्यांना आता नव्या प्रदेशावर पसरायला वाव राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली,तेव्हा त्यांच्यात जीवघेणे संघर्ष सुरू होणे अपेक्षित होते.असे संघर्ष उफाळल्यावर आपपर भाव,स्वकीय आणि परकीय,मित्र आणि शत्रू अशा भावना तीव्र होत गेल्या असणार.मानवी टोळक्यांत असे जीवघेणे संघर्ष केव्हा सुरू झाले? सुमारे बारा हजार वर्षांपासून भाल्यांसारखी प्रक्षेपक आयुधे वापरत लढाया सुरू झाल्या असाव्यात.ह्या काळानंतर हिंसेत कवट्या फुटलेल्या अनेक जणांचे अवशेष सापडू लागतात.अशा लढाया सुरू झाल्यावर स्वकीयांशी कसे वागावे आणि परकीयांशी कसे वागावे ह्याची अगदी विभिन्न नीतिमूल्ये विकसित झाली असावीत.एका जमातीला दुसरी

बरोबरच्या संघर्षात यशस्वी व्हायला स्वकीयांना संघटित करण्याच्या नेतृत्व कौशल्याची आणि परकीयांशी लढताना धैर्य, शौर्य ह्या गुणांची मदत झाली असणार.ह्या प्रवृत्ती,ही गुणवैशिष्ट्ये पोसली गेली असणार.करुणा,मैत्री,

माया स्वकीयांसाठी; क्रौर्य,शत्रुत्व परकीयांसाठी अशी मानवी मूल्येही उद्भवली असणार.ह्या आपल्यातल्यांशी आणि परक्यांशी वागण्याच्या अगदी वेगळ्या भावनांमुळे क्रौर्य कोणते आणि शौर्य कोणते,सद्वर्तन कोणते आणि दुराचार कोणता हे वेगवेगळ्या समाजातले लोक अगदी वेगवेगळ्या मापाने ठरवू शकतात. 


२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात कसाबने अनेक नागरिकांचे बळी घेतले.

भारतीयांना हे क्रूर,घृणास्पद वाटले.पण काही जिहादाच्या पुरस्कर्त्यांना ही एका शूर धर्मवीराची कर्तबगारी भासली.


जमाती-जमातींतील रक्तलांच्छित संघर्ष ईशान्य भारतात अगदी अलीकडे-अलीकडेपर्यंत चालू आहेत.शत्रू समाजावर हल्ले करून त्यांची मुंडकी कापून आणणे हे शौर्याचे लक्षण होते.नागा योद्ध्यांच्या घरांच्या प्रवेश -

द्वारावर अशी मुंडकी अभिमानाने ठोकून लावलेली असत.अजूनही नागा- कुकी जमातींतले असे संघर्ष संपलेले नाहीत.वीस वर्षांपूर्वी मी मणिपूरच्या चुर्चांदपूरच्या डोंगरात गांगटे नावाच्या कुकी समाजाच्या एका गावाचा अभ्यास केला.हे गाव आता जवळजवळ पूर्णपणे ख्रिस्तीधर्माचे बनलेले आहे.असे धर्मांतर १९५५ च्या सुमारास झाले.तत्पूर्वी ह्या मुलखात जवळपास एक-पंचमांश भूभाग जलभाग देवराया,देवडोह म्हणून पूर्णपणे नैसर्गिक आवरणाखाली राखून ठेवलेला होता.

धर्मांतरानंतर आता पारंपरिक निसर्गपूजा बंद केली पाहिजे म्हणून सगळ्या देवराया तोडल्या गेल्या.


पण काही वर्षांतच ह्या देवराया अनेक दृष्टींनी मोलाच्या ठरल्या होत्या.विशेषतः त्यांच्यामुळे कुमरी शेती करताना लावलेल्या आगी पसरत नव्हत्या असे ध्यानात आले.मग ह्यातील काहींची पुनर्स्थापना करण्यात आली.१९९२ च्या सुमारास ह्या सगळ्याचा अभ्यास करायला मी सांगछू नावाच्या गावात जाऊन राहिलो होतो.निसर्गरम्य प्रदेश;खूप खूषीत राहिलो,मग काही वर्षांनी पुन्हा मणिपूरला गेलो.सांगछूची चौकशी केली.धक्काच बसला.सांगछूवर नागांचा जोरकस हल्ला झाला.अनेक लोक मारले गेले.सारा गाव, सारी शेती,बागायत जाळून बेचिराख करण्यात आली.जे जगले-वाचले ते गाव सोडून पळून गेले.आता तो मुलूख उजाड होता.शत्रुसमाजावर नुसता हल्ला करायचा नाही,तर त्यांना पराभूत केल्यावर त्यांचा मुलूख पुरा बेचिराख करून त्यांना देशोधडी लावायचे असे डावपेच पुरातन काळापासून प्रचलित आहेत.


परिजन आणि ऊर्वीजन


मानवाने निसर्गाशी,इतर जीवजातींहून खूपच जटिल,

अनेक पदरी नाते उभारले आहे.अगदी प्राथमिक अवस्थेत शिकार करणाऱ्या मानवाचा आहारसुद्धा इतर कोणत्याही प्राण्याहून वैविध्य संपन्न होता.तो इतर कोणत्याही पशूला,

अशक्य अशा हत्तींसारख्या महाकाय पशुंची शिकार करे, याबरोबरच कीटकभक्षक पक्ष्यांप्रमाणे मुंगळे-वाळव्यांनाही मटकावे. पाणकावळ्यांसारखे मासे,झिंगे पकडे,आणि त्या पाण्यातले शेवाळही खाई.रानडुकरांसारखे भूमिगत कंद उकरून खाई,आणि वटवाघळांसारखे आंबे-फणसही.

यापुढे जाऊन पीठ करून,आगीत भाजून गहू- ज्वारी सारख्या गवतांचे बी सुद्धा वापरी.आरंभी शिकार,फळे, कंदमुळे गोळा करण्यावर गुजराण करण्याच्या काळात समाज रक्ताच्या नात्यांनी बांधलेल्या छोट्या-छोट्या टोळ्यांत संघटित झालेले होते. शेती,पशुपालनाची सुरुवात झाल्यावर ही परिस्थिती बदलू लागली.आता रोजच्या रोज भटकंती करून आहार गोळा करण्याची आवश्यकता नव्हती.कणगीत भरून ठेवलेले धान्य केव्हाही वापरता येऊ लागले.पाळीव पशूचे दूध घरच्या घरी उपलब्ध झाले.हवे तेव्हा त्यांचे मांसही खाता येई.ह्यामुळे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना स्वतःचे अन्न गोळा करण्याची जबाबदारी राहिली नाही.रेमंड डास्मान या परिसरशास्त्रज्ञाने अशा पंचक्रोशीतील निसर्गसंपत्तीवर गुजराण करणाऱ्या,शिकारी, निसर्गोपज संग्रहक,अथवा बाहेरील संसाधनांवर निर्भरित नसलेली,कमी उत्पादक,

कोरडवाहू शेती करणाऱ्या मानव समाजांना परिजन अबवा ecosystem people अशी संज्ञा सुचवली आहे.जास्त सुपीक भूभागातील उत्पादक शेती, पशुपालनाच्या मुलखात तर पुरेशा अन्नोत्पादनासाठी सर्वांनीच शेती किंवा पशुपालन करायची आवश्यकता राहात नाही.मग अशा समाजात श्रमविभागणी सुरू होते. 


मुबलक अन्नाचा फायदा घेऊन समाजात छोट्या-छोट्या टोळ्यांच्या जागी गावे वसायला लागतात.रक्ताच्या नात्यांनी बांधलेल्या निरनिराळ्या टोळ्या एकत्र येऊन,

अनेकदा परकी टोळ्यांशी सलोखा साधून,वस्ती करू लागतात. कुशल कारागीर,व्यापारी,पुजारी,योद्धे,शासक असे वर्ग निर्माण होऊ लागतात.केवळ वस्तीच्या आसमंतातील संसाधनेच उपलब्ध न राहता दूर दूर अंतरावरून निरनिराळी संसाधने,उत्पादने आणून त्यांचा वापर करणे शक्य होते.रेमंड डास्मानने अशी दूरदुरून आणलेली संसाधने वापरणाऱ्या मानव समाजांना ऊर्वीजन अथवा biosphere people असे नामाभिधान सुचवले आहे.इजिप्त देशातल्या नाईल नदीच्या खोऱ्यात पुराचे पाणी दुथडी वाहून त्याबरोबर येणाऱ्या गाळातून अतिशय सुपीक,शेतीला योग्य जमीन निर्माण होते.ह्या शेतीतून अतिरिक्त उत्पादनाची जी रेलचेल शक्य झाली त्याच्या आधारावर येथे जगातील एक पुरातन सभ्यता सुमारे सात हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आली.इथल्या कारागीर वर्गाने तांब्याचा वापर सुरू केला,सुंदर सुंदर बरण्या,छोट्या छोट्या मूर्ती घडवल्या. व्यापारी शेकडो किलोमीटरवरून उपकरणांसाठी खास गुणवत्तेचे दगड आणवू लागले.व्यापाराचे हिशोब ठेवता ठेवता लेखन कला अस्तित्वात आली.नाईलचे वार्षिक पूर केव्हा येतील हे भाकीत करण्यासाठी काळजीपूर्वक खगोल निरीक्षण सुरू झाले,पंचांगे रचली गेली.ह्या सगळ्या समाजाला बांधणारे व मोठ्या प्रदेशाचे भरपूर अतिरिक्त उत्पादन स्वतःकडे खेचून घेणारे शासक अस्तित्वात आले.हे शासक ऊर्वीजनांचे नामी उदाहरण आहे.अशा रीतीने समाज वेगवेगळ्या थरांत विभाजित होऊ लागल्यावर वरिष्ठ थरातल्या व्यक्तींना आपला दिमाख मिरवण्यासाठी आपण किती उधळपट्टी करू शकतो-आपण धुरंधर किती धुरा वाहू शकतो - हे दाखवण्याची हौस साहजिकच निर्माण झाली. इजिप्तमधल्या मोराच्या पिसाऱ्यासारख्या ह्या लोढण्यांचा,धुरांचा सुप्रसिद्ध आविष्कार म्हणजे भव्य पिरॅमिड.पिरॅमिड बांधले गेले समाजातल्या खास प्रतिष्ठा लाभलेल्या व्यक्तींना त्यांचा दिमाख मृत्यूनंतरही मिरवत राहता यावा ह्या हेतून.अशा पिरॅमिडमध्ये खास उपचार करून त्यांचे मृतदेह आणि त्यांना मृत्यूनंतर उपलब्ध हव्या म्हणून अनेक वस्तू ठेवल्या जात.


त्या देहांचे वेष्टन म्हणून बांधलेले चौरस पायावर उभारलेल्या शंकूच्या आकाराचे हे पिरॅमिड आकाराने प्रचंड असत.गिज़ाचा चार हजार पाचशे वर्षांपूर्वी बांधलेला सुविख्यात पिरामिड जवळजवळ दीडशे मीटर उंच आहे.त्याच्या चौरस पायाची एकेक बाजू दोनशे तीस मीटर लांब आहे.हा बांधायला मोठ मोठे दगड खूप अंतरांवरून आणले गेले.तब्बल तीस वर्षे एका वेळी दहा- दहा हजार मजुरांनी खपून हा पिरामिड पुरा केला.म्हणजे एका मृत राजाचा दिमाख अनंत कालपर्यंत टिकून राहावा ह्या इच्छेने एवढे प्रचंड अतिरिक्त अन्नोत्पादन,एवढे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम ओतले गेले ! 


एका धुरंधराचा केवढा भार भुईवर,आणि समाजातल्या इतर नर-नारींवर पडला आहे! मानवी समाज एकमेकांना मदत करण्यातून सर्वांचे हित साधण्याच्या व्यवहारांवर पोसले गेले.परंतु मानवाच्या ज्ञान-तंत्रज्ञान विकासातून त्याची निसर्गावरची पकड जसजशी बळकट होत गेली,

निसर्गाकडून मानवाला हवीशी अधिकाधिक उत्पादने मिळवता येऊ लागली, आयुधांद्वारे निसर्गाला वाकवता येऊ लागले, तसतसे मानवी समाजांतले परस्परसंबंधही बदलले. एकमेकांच्यातली देवाण-घेवाण अधिकाधिक एकतर्फी होऊ लागली. 


समाजातील काही व्यक्ती बलदंड बनल्या आणि इतरांना फारसे काही न देता त्यांच्याकडून खूप हिरावून घेऊ लागल्या.इजिप्तच्या एका फारोहाच्या मरणोत्तर सुखासाठी दहा-दहा हजार लोकांनी तीस- तीस वर्षे खपणे हे ह्याचेच द्योतक आहे.


१६.०५.२४ या लेखमालेतील पुढील भाग..