आद्य पक्षी चित्रकार जॉन जेम्स ऑधुबाँ हा १९व्या शतकातला निसर्ग चित्रकार केवळ निरीक्षणांतून पक्ष्यांची अफलातून चित्रं काढत असे.या चित्रांनी अमेरिकेतल्या पक्षीशास्त्राच्या अभ्यासाला दिशा मिळाली.आज दोनशे वर्षांनंतरही 'द ऑधुबाँ सोसायटी' मार्फत त्याने पक्षीमित्रांच्या मनात आदरस्थान मिळवलेलं आहे.या झंगड चित्रकाराची ही कथा
▶ जॉन जेम्स ऑद्युबाँ हे नाव बहुतेक निसर्गप्रेमींना ठाऊक असतं,ते त्याच्या अमेरिकी पक्ष्यांच्या चित्रांमुळे.
ऑद्युबाँला चित्रकलेची नैसर्गिक देणगी लाभलेली होती.
त्याने उत्तर अमेरिकी खंड उभं आडवं पिंजून काढलं;त्या भटकंतीमध्ये दिसलेल्या सर्व पक्ष्यांची आणि प्राण्यांची जिवंत वाटावीत अशी चित्रं त्याने स्वप्रयत्नांनी रेखाटली.
ऑद्युबाँची ही चित्रं पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं.चित्रकलेच्या या एक तपाच्या तपश्चर्येतून 'द बर्ड्स ऑफ अमेरिका (१८२७-३९)' याची निर्मिती झाली.
आजही ते कार्य जाणकारांना वंदनीय वाटतं.त्याचं तितकंच महत्त्वाचं पण दुर्लक्षित कार्य म्हणजे 'द व्हिव्हिपेरस क्काडुपेड्स ऑफ अमेरिका'. (गर्भाशयात वाढून जन्म घेणारे अमेरिकी चतुष्पाद) (१८४५-१८४८).
ऑद्युबाँ पक्षी ओळखून त्यांना शास्त्रीय नावंही देई.
त्याकामीही त्याचा कुणीच गुरू नव्हता.ऑद्युबाँचं एकूणच आयुष्य अतिशय चित्तचक्षुःचमत्कारिक होतं.त्याला साहसाची आवड होती.स्टारट्रेकचं बोधवाक्य 'व्हेअर नो मॅन हॅज गॉन बीफोर' हे त्याने शे-दीडशे वर्षं आधीच आत्मसात केलं होतं.
मी जुन्या पुस्तक-मासिकांच्या शोधात हिंडायचो, त्या काळात एक दिवस ऑद्युबाँ सोसायटीचं निसर्गविषयक आणि निसर्ग संरक्षणविषयक नियतकालिक माझ्या हाती लागलं. संपादकीयाच्या वरती नेहमीप्रमाणे संपादकाचं छायाचित्र छापायचं सोडून एका पदकाचं चित्र छापलेलं होतं.त्या पदकाच्या मध्यभागी ऑधुवाँचं चित्र होतं आणि भोवती'अमेरिकन ऑद्युबाँ सोसायटी'असा मजकूर होता.ते वाचून आणि पाहून मी खूप प्रभावित झालो.ऑद्युबाँबद्दल त्या आधीही मी वाचलेलं होतं.त्यामुळेच जेव्हा एका प्रदर्शनात त्याच्यावरचं एक छोटेखानी पुस्तक दिसलं,
त्याक्षणीच मी ते उचललं होतं.'द इसेन्शियल जॉन जेम्स ऑद्युबाँ' हे ते पुस्तक; अवघ्या ११२ पानांचं.त्याची लेखिका आहे अँनेट ब्लाउगुंड.
जॉन जेम्स ऑद्युबाँच्या पूर्वायुष्याची जी त्रोटक खरी माहिती एकत्रित करण्यात आली आहे, त्यानुसार झाँ आद्युबाँ या दर्यावर्दी कप्तानाचा तो मुलगा होता.वडील मालदार होते.त्यांनी सेंट डॉर्मिगे बेटावर (म्हणजे आताचं हैती) बरीच जमीन खरेदी केली होती.हे बेट त्यावेळी फ्रेंच वसाहतीचा भाग होतं. झाँ आद्युबाँनी आपल्या इस्टेटीवर एक बाई ठेवली होती.तिचं नाव जोआन राबीन.या विवाहबाह्य संबंधातून झालेला मुलगा म्हणजे झाँ (ज्युनिअर).झाँ (धाकटा) याचा जन्म २५ एप्रिल १७८५ या दिवशी झाला.साहसाची आवड,कामाचा पिच्छा पुरवून ते पूर्ण करणं,एकाग्रता आदी गुण त्याला वडिलांकडून वारसा म्हणून मिळाले;तर चित्रकलेचा वारसा त्याला आईकडून मिळाला.त्याच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्याच्या आईचं निधन झालं.त्यामुळे तान्ह्या झाँला त्याच्या वडिलांकडे फ्रान्समध्ये पाठवण्यात आलं.तिथे त्याच्या वडिलांच्या धर्मपत्नीने त्याचं संगोपन केलं. १७९४ मध्ये नऊ वर्षांच्या झाँला त्याच्या वडिलांनी आणि सावत्र आईने दत्तक घेऊन त्याला ऑद्युबाँ घराण्याचं नाव वापरायचा मार्ग मोकळा करून दिला.तो अकरा वर्षांचा असताना वडिलांनी त्याला नौदलात भरती करण्याच्या दृष्टीने नेव्हल ॲकॅडेमीत दाखल केलं.तिथे त्याने तीन वर्ष कशीबशी पार पाडली; तेव्हा हा मुलगा नौदलात जाण्याच्या लायकीचा नाही,याबद्दल त्याच्या वडिलांची खात्री पटली.
अशा प्रकारच्या कोणत्याही प्रशिक्षणापेक्षा झाँचा वन्य पशू-पक्ष्यांकडे अधिक कल होता.जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तो वडिलांच्या इस्टेटीतील आणि आजूबाजूच्या वनात जात असे;तिथे पेस्टल रंग आणि ग्राफाइटच्या साहाय्याने वन्यजीवांचं रेखाटन करत असे.
तो ही रेखाटनं करायला कुठे आणि कसा शिकला हे एक कोडंच आहे;पण या बाबतीत त्याला कुठलाही गुरू नसावा;एकलव्याच्या निष्ठेने,हौशी चित्रकारांसाठी त्याकाळी उपलब्ध असलेली पुस्तकं वाचूनच तो चित्रकार बनला असावा.वयाच्या अठराव्या वर्षी ऑद्युबाँने नेपोलियनच्या लष्कर भरतीतून सुटका व्हावी म्हणून अमेरिकेत पळ काढला.त्याने आता 'झाँ' हे नाव बदलून 'जॉन' हे इंग्लिश नाव लावायला सुरुवात केली. नाव बदलणं त्याला जमून गेलं तरी त्याच्या उच्चारण पद्धतीतून त्याचं फ्रेंच मूळ अखेरपर्यंत लक्षात येत असे.१८१२ मध्ये त्याने अमेरिकी नागरिकत्व मिळवलं.अमेरिकेत त्याच्या वडिलांनी फिलाडेल्फियाच्या जवळ खूप वर्षांपूर्वी एक शेत खरेदी केलं होतं.त्याची जबाबदारी आता जॉनवर सोपवण्यात आली.हे जॉनच्या पथ्यावरच पडलं. इथे त्याने अमेरिकेतील पक्ष्यांची रेखाटनं करायला सुरुवात केली.त्यामुळे त्याचं शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलं.हळूहळू त्याने नव्या पक्ष्यांच्या शोधात दूरवर भटकायला सुरुवात केली.ऑधुबाँच्या स्थलांतरामागे आणखी एक कारण होतं.आपण अनौरस आहोत,ही भावना बालपणापासून त्याला सतावत असे.यामुळेच आपण स्वतंत्रपणे मोठं व्हायचं ही जिद्द,कष्ट करण्याची क्षमता,खोटा मोठेपणा आणि स्वतःबद्दल खऱ्या-खोट्या आख्यायिका निर्माण करणं,ही वृत्ती त्याच्या अंगी बाणली असावी. कारण पुढे त्याच्या हयातीतच त्याच्याबद्दलच्या काही दंतकथा निर्माण झाल्या होत्या.आद्युबाँबद्दलची एक अफलातून आख्यायिका म्हणजे तो राजपुत्र होता.फ्रान्सचा राजा सोळाव्या लुईचा हरवलेला मुलगा म्हणजे ऑद्युबाँ ही अफवा कुणी आणि कशी पसरवली हे कळायला मार्ग नाही;पण ती दीर्घकाळ अमेरिकेत प्रचलित होती.दुसरी एक अशीच कहाणी म्हणजे फ्रान्सचा विख्यात चित्रकार झाक्कस लुईस डेव्हीड (१७४८-१८२५) याच्याकडे ऑद्युबाँचं चित्रकारीचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं होतं.
ऑद्युबाँच्या चित्रांवर त्या चित्रकाराचा प्रभाव होता,हे निश्चित.मात्र त्याच्याकडून ऑद्युबाँने थेट प्रशिक्षण घेतल्याचा पुरावा उपलब्ध नाही.आणखी एका जबरदस्त हकीकतीला तर ऑद्युबाँनेच खतपाणी घातलं असं म्हटलं जातं;ती म्हणजे,अमेरिकेत गौरवर्णीयांच्या दृष्टीने आदराला पात्र असा शिकारी डॅनिएल बून (१७३४-१८२०) याच्याबरोबर ऑद्युबाँ अनेक शिकारी मोहीमांमध्ये साथीदार म्हणून वावरला होता.या अफवेचा ऑद्युबाँने त्याच्या चित्रांच्या प्रसिद्धीसाठी फायदा करून घेतला होता,असंही म्हटलं जातं.
ऑद्युबाँला जनसंपर्काची हातोटी लाभलेली होती.त्याच्या साहसी प्रतिमेची वृद्धी करायला तो या दंतकथांचा उपयोग करून घेत असे असंही म्हटलं जातं.ऑद्युबाँचे टीकाकार मात्र ऑद्युबाँने त्याच्याबद्दलच्या आख्यायिका तयार व्हायला स्वतःच खूप हातभार लावला होता,त्या अमेरिकाभर कशा पसरतील याबद्दलही तो प्रयत्नशील असे,असं म्हणतात.याच दंतकथांच्या पसाऱ्यातून अनेक अभ्यासकांनी त्याच्या आयुष्याचं खरंखुरं चित्र रंगवलं,तेही 'सत्य हे कल्पिताहून अद्भुत असतं' या उक्तीचा प्रत्यय आणून देणारं आहे,यात शंकाच नाही.रानावनात हिंडताना जॉनजवळ कायम एक स्केच पॅड,पेन्सिली आणि त्याआधीच्या पक्षीतज्ज्ञांची संदर्भ पुस्तकं असत.त्या काळात ही पुस्तकं चुकीच्या माहितीने भरलेली तर होतीच;पण त्यातली माहिती ही अगदी त्रोटक आणि अपूर्ण स्वरूपाची असे.त्या काळातील इतर अनेक निसर्गशास्त्रज्ञांप्रमाणेच जॉनने स्वतःच पक्ष्यांबद्दल अधिक आणि अधिकृत माहिती मिळवायला सुरुवात केली.त्याचबरोबर प्रत्येक भटकंतीत तो पक्ष्यांची घरटी,त्यांची अंडी, पिसं,मृतदेह तसंच खारी,रॅकूल,
ओपोसम,साप, सरडे आणि बेडूकही गोळा करू लागला. मारलेल्या पशुपक्ष्यांच्या मृतदेहांमध्ये भुस्सा किंवा पेंढा भरून तो ते जतन करू लागला. त्यासाठी त्याने यातील तज्ज्ञ लोकांशी ओळखी वाढवल्या.पक्ष्यांचं जीवन समजावून घेण्यासाठी त्यांच्या पायात पातळ पत्र्याची कडी बसवायचा उद्योग करणाऱ्या काही आद्य पक्षी निरीक्षकांमध्ये त्याचा समावेश होतो.त्याकाळात ऑधुबॉ या पक्ष्यांच्या पायांवर चांदीची वळी चढवत असे.पक्ष्यांची वर्तणूक नोंदवण्यासाठी निरीक्षणं करताना तो तासन् तास निश्चल बसून राहत असेच;पण तहानभूक विसरून त्यांचा नंतर पाठलाग करायचा प्रयत्न करत असे.
या भटकंतीच्या काळात तो शिकार करायला शिकला.
त्याची ख्याती एक नेमबाज म्हणून दुनियाभर पसरली.
त्याची दुनिया अर्थात अमेरिकेपुरती मर्यादित होती पण बोलताना तो जग फिरल्यासारखा बोलत असे.तो ज्या शहरात जाई तिथे कायम सर्व प्रकारच्या पार्ट्यांमध्ये त्याचा सहभाग असे.त्याच्या वाक् चातुर्याने तो तरुणींवर छाप पाडण्यात यशस्वी होई.यातच कदाचित त्याची स्वतःबद्दल आख्यायिका निर्माण करण्याची वृत्ती दडलेली असावी.ऑद्युबाँची पहिली पेंटिंग्ज स्थिर बसलेल्या पक्ष्यांची होती.त्यांतली अनेक चित्रं काहीशी हौशी चित्रकारी दाखवतात.त्या काळात त्याच्यावर जॉर्जेस लुई लक्लर्क,कोम्ते द बफाँ या चित्रकारांचा प्रभाव होता,हे स्पष्ट होतं. त्याच्यावर आणखीही एका चित्रकाराचा प्रभाव सुरुवातीच्या काळात जाणवतो,असं त्याच्या चरित्रकारांचं म्हणणं आहे.तो चित्रकार म्हणजे पंधराव्या लुईच्या दरबारात असलेला झाँबाहिस्ते उड्री.
लवकरच ऑद्युबाँच्या लक्षात आलं,की स्थिर बसणं हा खरं तर पक्ष्यांचा स्वभाव नाही.त्यामुळे तो चित्रातून पक्षी सजीव कसे भासतील यावर उपाय शोधू लागला.त्यावर उपाय सापडण्याआधीच त्याचं आयुष्य सजीव करणारी एक घटना घडली.जॉन त्याचे शेजारी मिस्टर ब्लेकवेल यांची मुलगी ल्युसी हिच्या प्रेमात पडला. ल्युसीलाही हा मुलगा आवडला.त्यांचं लग्न होण्यात त्यामुळे कुठलीच अडचण आली नाही.
पक्ष्यांच्या नादात हिंडणाऱ्या जॉनचं त्याच्या त्या इस्टेटीकडे अजिबातच लक्ष नव्हतं.कर्ज फेडण्यासाठी मग हा सर्व जमीन जुमला त्याला विकावा लागला.कर्ज फेडून उरलेल्या पैशांसह इ.स.१८१० मध्ये तो आपल्या कुटुंबासह केंटकी राज्यातील हेंडर्सन या गावी राहायला लागला. त्याचा मित्र आणि व्यावसायिक भागीदार फर्डिनांड रोझीयर हाही तिथे आला.त्या दोघांनी तिथे एक व्यापारी केंद्र म्हणजे 'ट्रेडिंग पोस्ट' स्थापन केलं.
यासाठी त्यांनी मिसुरी राज्यातील सेंट जेनेव्हीव्ह येथे एक वखारही प्रस्थापित केली.दुर्दैवाने याच वेळी युरोपमध्ये नेपोलियनने युद्ध चालवलं होतं.त्यामुळे अमेरिकेने आयातीवर बंदी घातली आणि हा ऑधुबाँचा उद्योग अल्पायुषीच ठरला.मग ऑधुबॉंने हेंडर्सनमध्ये एक दुकान टाकलं.वाणसामानासह सर्व विक्री केंद्र असं याचं स्वरूप होतं.या व्यावहारिक निर्णयाचा त्याला फायदा झाला.त्याने काही जमीन विकत घेतली;तिथे एक घरही बांधलं.तोपर्यंत त्याने २०० पेंटिंग्ज चितारली होती. दुर्दैवाने ही पेंटिंग्ज उंदरांनी खाऊन टाकली.याच सुमारास त्याने एका व्यवसायात पुन्हा मार खाल्ला.त्याला कर्ज झालं.ते कर्ज फेडता आलं नाही म्हणून १८१९ मध्ये त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता.तेव्हा घर आणि जमीन विकून तो तुरुंगातून सुटला;पण त्याचं दिवाळं निघालेलं होतं.यामुळे काही काळ तो नैराश्याच्या गर्तेत सापडला;पण लवकरच त्याने स्वतःला सावरलं.तुरुंगात असतानाही पक्ष्यांची चित्रं रंगवणं त्याने थांबवलेलं नव्हतं.तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने उत्तर अमेरिका खंडातले जास्तीत जास्त पक्षी रेखाटून 'ऑर्निथॉलॉजिकल सर्व्हे ऑफ अमेरिका' म्हणजे अमेरिकेतील पक्ष्यांचे सचित्र चित्रण पूर्ण करण्याचा निश्चय केला.यातली बरीचशी तैलचित्रं तो पाच ते पंचवीस डॉलर्सना विकू लागला.
उत्तर अमेरिकेतील पक्ष्यांची चित्रं रेखाटण्यामागे ऑद्युबाँचे तीन हेतू होते - याआधी ज्यांनी ज्यांनी हे काम हाती घेतलं होतं,त्यांच्यापेक्षा जास्त अचूक,बिनचूक,शास्त्रशुद्ध अशी चित्रं काढून कीर्ती मिळवणं,पक्षी निरीक्षणाबद्दल जागृती निर्माण करणं,तसंच भरपूर पैसा कमावणं. यासाठी ऑद्युबाँ कित्येक दिवस रानावनात एकटा भटकायचा.
एखादा नवा पक्षी दिसला की तो त्याचा पाठलाग करत असे;त्या पक्ष्याच्या सवयी आणि राहण्याच्या ठिकाणाचा शोध घेण्याकरता हरत-हेचे प्रयत्न करत असे.या प्रकारच्या संशोधनात अनेक संकटं येतात याची वाच्यता तो त्याच्या घरात कधीही करीत नसे. घरच्यांनी उगीच चिंता करत बसावं,हे त्याला मान्य होणारं नव्हतं.
१८२० मध्ये ऑद्युबाँला सिनसिनाटी महाविद्यालयाच्या वेस्टर्न म्युझियममध्ये टॅक्सीडर्मिस्ट आणि प्राणी-पक्ष्याच्या मृतदेहांच्या मागे त्यांची नैसर्गिक पार्श्वभूमी रंगवण्याचं काम मिळालं.त्यामुळे तो कुटुंबियांसह सिनसिनाटीला राहायला लागला.हे संग्रहालय स्थापन करणारा डॅनियल ड्रेक ऑद्युबाँच्या कामाच्या प्रेमात पडला होता. त्यामुळे त्यानेच ऑद्युबाँच्या निसर्गचित्रांचं पहिलं प्रदर्शन भरवलं.टॅक्सीडर्मीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी ऑद्युबाँने सिनसिनाटीत चित्रकला प्रशिक्षण वर्ग सुरू केला.सुरुवातीलाच त्याला पंचवीस विद्यार्थी मिळाले.त्यातलाच एक विद्यार्थी जोसेफ मेसन;पुढे 'बर्ड्स ऑफ अमेरिका' या महापक्षिकोशनिर्मितीत ऑद्युबाँने त्याला सहकारी म्हणून स्थान दिलं. ऑद्युबाँची पक्ष्यांची चित्रं आणि त्याला शास्त्रीय पार्श्वभूमीची जोड या प्रकल्पातल्या त्याच्या सहकाऱ्यांमध्ये मेसनने कायमच त्याचा उजवा हात म्हणून काम केलं.संपूर्ण उत्तर अमेरिकेतील पक्ष्यांच्या चित्रीकरणासाठी,त्यांच्या सवयी अभ्यासण्यासाठी ऑद्युबाँने मिसुरी नदीच्या दक्षिण भागात प्रवास करायचं ठरवलं,त्यावेळी उत्तर अमेरिकेचा बराच मोठा भूभाग तेथील स्थानिक मूळ रहिवासी टोळ्यांच्या अधिपत्त्याखाली होता.गोऱ्या अमेरिकेच्या सीमांचा विस्तार करणाऱ्यांना तेव्हा 'फ्रंटियर्स मेन' म्हणण्यात येत असे.ऑद्युबाँ बरेचदा त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखाच वेष परिधान करून भटकत असे.कातडी कपडे,तशीच पादत्राणं आणि अमेरिकी रानगव्यांच्या कातड्याचा लांब कोट,या वेषात त्याची भटकंती सुरू होती.१८२२ नंतरच्या त्याच्या भटकंतीच्या प्रत्येक दिवसातील बारीक सारीक घटनांची तो नोंद ठेवत होता.याखेरीज नातेवाईक,जवळचे मित्र,ओळखीपाळखीचे लोक आणि व्यावसायिक परिचितांना त्याने शेकडो पत्रं लिहिली.
(हटके भटके, अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन) दुर्दैवाने त्याच्या नातीने त्याच्या बऱ्याच नोंदवह्यांची वाट लावली;कच्ची रेखाटनं विकून टाकली.
ऑद्युबाँ हा रानावनात हिंडणारा मुक्त माणूस होता.त्याच्या पत्रात (त्याच्या नातीच्या मते) काही वेळा अशिष्ट भाषा असे;तर नोंदवह्या असंस्कृत वर्णनांनी भरलेल्या असत.
तिच्या काटछाटीतून जी कागदपत्रं वाचली त्यांवरून हा चित्रकार जेवढा रगेल आणि रंगेल होता,तितकीच त्याच्या स्वभावाला दुसरी एक हळुवार आणि नाजूक भावनिक बाजूही होती,हे स्पष्ट होतं.कष्टप्रद जीवन जगताना त्याची स्वप्नाळू वृत्तीही त्याने कायमच जागृत ठेवली होती.त्याची भाषा ओघवती होती.
शब्दांच्या साहाय्याने परिस्थिती जिवंत करण्याचं कौशल्यही त्याच्याजवळ होतं.
त्याच्या पत्रांमधून आणि नोंदवह्यांमधून, कामासाठी कुटुंबियांपासून दूर राहावं लागतं याबद्दल त्याला खेद वाटे,तो सतत कुटुंबीयांबद्दल चिंताग्रस्त असे,हेही दिसून येतं.या नोंदींमधूनच त्याने 'बर्डस ऑफ नॉर्थ अमेरिका' या ग्रंथाच्या निर्मितीचा निर्णय का घेतला तेही स्पष्ट होतं. त्याआधीच्या 'अमेरिकन ऑर्निथॉलॉजी' सारख्या पुस्तकांत अनेक उणीवा होत्या.चुकीची आणि अपूर्ण माहिती,रंगांची गल्लत,चित्रांमधली गफलत यांमुळे संदर्भग्रंथ म्हणून ती पुस्तकं वापरताना निराशाच पदरी येत असे.'अमेरिकन ऑर्निथॉलॉजी' हे अमेरिकी पक्ष्यांबद्दल पहिलं पुस्तक.ते अलेक्झांडर विल्सन याच्या प्रयत्नातून तयार झालं.या पुस्तकातली सगळी चित्रं स्थिर बसलेल्या पक्ष्यांची एक बाजू (प्रोफाइल) दाखवणारी चित्रं होती. ऑद्युबाँने आपल्या ग्रंथात पक्ष्यांच्या प्रत्यक्ष आकाराची (लाईफ साईज) चित्रं द्यायची, ती सुद्धा त्या पक्ष्यांच्या वैशिष्ट्यांसह असतील याची काळजी घ्यायची,असा निर्णय घेतला.
याच काळात अमेरिकेत वनस्पतीशास्त्र आणि कीटकशास्त्रात पथदर्शी असं आद्यकार्य सुरू झालेलं होतं;बरेच हौशी संशोधक नवनवे प्राणी जगापुढे आणत होते;चतुष्पाद,वनस्पती,कीटक आणि पक्षी यांचं शास्त्रशुद्ध वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली होती;प्राणीशास्त्रात बरेच संदर्भग्रंथ प्रकाशित होत होते.ऑद्युबाँवर त्या साऱ्याचा प्रभाव पडला.त्या काळात इंग्लंडमध्ये तर निसर्गशास्त्र जोरात होतं.पुस्तकं,छापील चित्रं आणि विविध देशांमधून येणारे वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने यांचा संग्रह केला जात होता; ब्रिटिश म्युझियमचा पाया घातला गेला होता. ऑद्युबाँची कीर्ती ब्रिटनमध्येही पसरली होती. चार्ल्स डार्विन यांनीही त्यांच्या संशोधनात ऑद्युबाँचे संदर्भ वापरले होते.युरोपात छपाईकला सुरू झाल्यानंतर पुस्तकं क्रमशः छापायला सुरुवात झाली.विल्सनचं 'अमेरिकन ऑर्निथॉलॉजी' आणि मार्क केट्सबीचं 'द नॅचरल हिस्टरी ऑफ कॅरोलायना,
फ्लोरिडा अँड द बहामा आयलंड्स' ही चित्रपुस्तकं अशीच क्रमशः छापून विकली गेली होती.
१८३५ मध्ये ब्रिटिशांबरोबरचं युद्ध संपल्यानंतर हळूहळू अमेरिकेत आर्थिक सुबत्ता डोकावू लागली होती.
अमेरिकेतील धनिक वर्ग आता निसर्गचित्रात पैसे गुंतवू लागला होता.याचा ऑद्युबाँच्या प्रकल्पाला फायदाच झाला. ऑद्युबाँला चित्रकलेचं वैचारिक शिक्षण मिळालेलं नव्हतं.त्यामुळे त्याने वेळोवेळी चित्रकलेची वेगवेगळी तंत्रं हाताळली.अमेरिकी पक्ष्यांची आणि वन्यप्राण्यांची चित्र काढणं यावर त्याचा प्रमुख भर होता.चित्रांमध्ये पक्ष्यांच्या पिसांच्या रंगछटांमधील बारकावे उतरावेत यासाठी तो खूप मेहनत घेत असे.त्यासाठी त्या काळातील आघाडीच्या चित्रकारांचा तो निःसंकोच सल्ला घेत असे.त्याला तैलचित्रं फारशी जमली नाहीत;मात्र जलरंगात चित्र रंगवण्यात त्याचा हातखंडा होता.त्याची 'पॅसेंजर पिजन' आणि 'कॅरोलायना पॅराकीट्स'ची चित्रं याची साक्ष आहेत.ऑद्युबाँच्या काळात हे पक्षी अमेरिकेत संख्येने प्रचंड होते;पण त्यांची वारेमाप हत्या झाल्याने ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत कायमस्वरूपी नाहीसे झाले.ऑद्युबाँने या पक्ष्यांची रंगवलेली चित्रं इतकी काव्यात्म आहेत,की त्यामुळे त्यांच्या नामशेष होण्याबद्दलचा खेद वाढीस लागतो.
पक्ष्यांची जलरंगातील भरपूर चित्रं काढून झाल्यावर ऑद्युबाँ या चित्रांची एन्ग्रेव्हिंग करणाऱ्या,छपाई करणाऱ्याच्या शोधात फिलाडेल्फियास पोहोचला.त्या काळात फिलाडेल्फिया ही अमेरिकेची सांस्कृतिक आणि वैज्ञानिक राजधानी होती.तिथे अमेरिकी संघराज्यातील सर्वोत्कृष्ट छपाई होत असे.
या भागातील उर्वरित भाग ..२३.०६.२४ या लेखामध्ये..