* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: संघर्ष हेच जीवन / Struggle is life...

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/६/२४

संघर्ष हेच जीवन / Struggle is life...

संघर्षातून विजय मिळतो…डॉ.अथर्व गोधंळी


ख्रिस्तोपर मोरले यांनी एका ठिकाणी सांगितले आहे.

जेव्हा तुम्ही तुमचा रस्ता तुमच्या प्रकाशात निवडता आणि त्याचा बिनशर्त स्वीकार करता,तेव्हा यश तुमचेच असते.


या पृथ्वीवर प्रत्येक माणसाची अशी एक स्वतःची कथा असते.ज्यातून तो माणूस घडत जातो. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्या आसपास आपणाला दिसणारी,भेटणारी जी माणसं असतात.त्यांना आपण खरोखरच ओळखतो का? कधीतरी जगावेगळं काम करणाऱ्या माणसाचा सन्मान झाला की आपणा सर्वांची नजर त्या व्यक्तीला शोधायला लागते.यशस्वी झालेल्या माणसाच्या यशाचे आपण कौतुक करतो.पण ते यश मिळवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष.तर त्या यशामध्ये त्याला सोबत करणारे यांची आपण फारशी नोंद घेत नाही.(ती घेणं गरजेचे असते.)


अशा वारंवार संघर्षातूनच ते विश्वविक्रमी बनतात.या विक्रमविराचं जगावेगळं वैशिष्ट्य म्हणजे तो नम्र असतो व त्याचे पाय जमिनीवर असतात.'प्रत्येक दिवशी मी शंभर वेळा स्वतःला आठवण करून देतो की,माझं अंतर्गत आणि बाह्य जीवन इतर लोकांच्या-

जिवंत किंवा मृत लोकांच्या कष्टावर अवलंबून आहे,आणि त्यापासून जे काही मला मिळालं आहे आणि आत्ताही मला मिळत आहे,तेवढे कष्ट मीही करून त्याची परतफेड केली पाहिजे.'अल्बर्ट आईनस्टाईन,नोबेल पुरस्कार विजेते भौतिकशास्त्रज्ञ,

हा नम्रपणाच काळजाला जाणीवपूर्वक भिडतो.

आणि आपणही नकळत नम्र होऊन जातो.


वृत्तपत्राच्या एका तुकड्यामुळे माणसाच आयुष्य बदलत असेल तर संपूर्ण वर्तमानपत्र संपुर्ण मानवी जीवन बदलू शकते.


आईच्या गोष्टी ऐकता ऐकता आपण मोठे होतो. अशीच एक गोष्ट कोल्हापूर जवळील टोप गावामध्ये अथर्व याला त्याच्या आईने सांगितली. चपाती करत असताना चपातीच्या खाली ठेवण्यासाठी एक कागद घेऊन ये असं तिने अथर्वला सांगितले.अथर्व तो कागद घेऊन आला चपाती खाली तो कागद ठेवत असताना आईने एक बातमी वाचली.तो कागद म्हणजे वृत्तपत्र होते.ती बातमी होती.वेदांगी कुलकर्णी यांनी १५९ दिवसांमध्ये..२९ हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास केला.आणि इथूनच सुरु झाला.विश्वविक्रमाचा थरार..


आणि त्याच वेळी अथर्वने एक जगतिक विश्वविक्रम करायचे ठरविले.त्याच स्वप्नांची पुर्तता म्हणजे २९६ कि.मी.अंतर १२ तासांमध्ये पुर्ण करुन विश्वविक्रम केला.त्यावेळी तो वी मध्ये शिकत होता.तत्पूर्वी वी मध्ये असताना त्याने ने ११ व्या वर्षी तायक्वांदो मध्ये ब्लॅक बेल्ट मिळविले,आणि त्यातीलच १८ व्या वर्षी सेकंड दान ब्लॅक बेल्ट मिळविले.अथर्व संदीप गोधंळी त्याच्याकडे साधीच सायकल होती.


विश्वविक्रमाबद्दल अथर्व घरी वडिलांना बोलला.त्यावेळेला वडील म्हणाले,ज्यावेळी जोतिबाला दहा राऊंड तु मारशील त्यावेळी मी तुला गिअरची रेसिंग सायकल घेतो.मग पहाटे वाजता दिवस सुरू झाला.कुणीही मार्गदर्शक नव्हता.वडील हेच मार्गदर्शक व गुरू होते.जे नेहमीच मोटारसायकल वरून त्याच्या सोबत असायचेत.सराव,क्लास,शाळा यामध्ये कधीतरी झोप पुर्ण होत नसायची..पण लवकर उठून सराव करुन अभ्यासही जोमाने करायचा.


या विश्वविक्रमाच्या अनुषगांने पत्रकार श्रध्दा जोगळेकर यांचे मौलीक मार्गदर्शन त्यांना मिळाले. मग सुरू झाला सराव..आणि फक्त सराव..


विश्वविक्रम करण्याचे अनुषंगाने ज्या काही गोष्टी असतात जे काय मार्गदर्शन असतं.ते अतिशय महत्त्वाचे असे मार्गदर्शन कोल्हापुरातील प्रसिद्ध अमोल कोरगांवकर(बाबा) यांनी केले.


विश्वविक्रम करण्यासाठी आहार,सरावाची योग्य पद्धत काही व्यायामाचे प्रकार,यासाठी अनुभवी मार्गदर्शन गरजेचे होते.कारण हा २९६ कि.मी.प्रवास फारच कठीण होता.त्यासाठी कोच म्हणून आकाश कोरगावकर जे कोल्हापुरातील पहिले आयर्न मॅन आहेत.त्यांचे मार्गदर्शन लाभले.


या अगोदर अशाच ६ रेकॉर्डची नोंद झाली होती.पण ते रेकॉर्ड वयाच्या १६ वर्षाखालील होते,व ते १२ तासांमध्ये केले गेले होते.अथर्व हा बहाद्दर होता,अवघ्या १४ वर्षाचा.स्वतः वरील विश्वासावर मजबूत विश्वास असणारा..नविन जीवनाला सुरुवात करणारा.


या विश्वविक्रमाची नोंद घेण्यासाठी टीम प्रत्यक्ष स्थळी हजर होती.बारा तासाचे संपूर्ण चित्रण जतन करून ठेवलेलं आहे.


आणि तो क्षण आला ज्यावेळी त्याने पुर्वीचे असणारे १६ वर्षाखालील ६ रेकॉर्ड वयाच्या १४ व्या वर्षी २४० कि.मी.चे अंतर अवघ्या ९ तास ४५ मिनीटात पुर्ण केले.अगोदरच्या रेकॉर्ड नुसार ते ६ रेकॉर्ड पुर्ण करण्यासाठी १२ लागले होते.


ही घटना म्हणजे आनंदाची कधीही न संपणारी भेट होती.आई बाबा यांना आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं होतं.वडिलांनी तर तो क्षण आनंदाने नाचून साजरा केला.


अथर्वच्या नावे ११ विश्वकॉर्ड आहेत.अनेक शाळा महाविद्यालय संस्थांच्याकडून मानसन्मान व ३० ते ३५ पुरस्कार मिळालेले आहेत.


ट्रायथलॉन हा एक खेळातील प्रकार आहे.यामध्ये १.८ कि.मी.पोहणे,९० कि.मी,सायकलिंग,२१ कि.मी,पळणे सलग ९ तासात पुर्ण करण्याचा  अवधी असतो.तो त्याने अवघ्या ६ तास ३४ मिनीटात पुर्ण केला.व नवीन विश्वविक्रम केला.यासाठी त्याने अविरतपणे ४० दिवस सराव केला,जो खुपच कमी कालावधीचा होता.


२०१९ साली त्याला द डायसेस ऑफ एशिया चेन्नई तामिळनाडू यांचेकडून डॉक्टरेट इन अँथलँटिक ही पदवी बहाल करण्यात आली.यामुळे संपूर्ण भारतातून सर्वात लहान वयात डॉक्टरेट मिळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.१४ वर्षांचा डॉ.अथर्व संदीप गोंधळी 'रस्ता सुरक्षा'चा बॅण्ड ॲम्बॅसडर आहे.जनजागृतीसाठी आरटीओकडून सन्मान मिळाला आहे.


डॉक्टर आई-बाबांच्या पोटी जन्माला आलेला अथर्व खूपच नम्र आणि प्रामाणिक आहे. विश्वविक्रम करूनही त्यांने नम्रपर्वक आईबद्दल एक आठवण सांगितली.मी पहाटे ४ वाजता सरावासाठी बाहेर पडत असताना,आई मला चपाती भाजी करून द्यायची.ही आठवण सांगत असताना त्याच्या डोळ्याच्या कडा नकळत ओल्या झालेल्या दिसल्या.


कृत्रिम बुद्धिमत्ता,यंत्रमानवाच्या या धावत्या जगामध्ये माणूस व त्याची भावनिक संवेदनशीलता जतन करून,संस्कारशील जीवन घडविणे दिवसागणिक कठीण होत असताना, एक चांगला माणूस घडविण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद व अनुकरणीय असे आहे.जर वृत्तपत्राचा तो तुकडा तुम्हाला मिळालाच नसता तर हे स्वप्न पूर्ण झालं असतं का? त्यांनी नम्रपणे सांगितलं,ज्या वेगाने ते पूर्ण झालं त्या वेगाने ते पूर्ण झालं नसते.


काचेच्या,स्टेनलेस स्टीलच्या,एअर कंडीशनच्या,

स्टीरीओ फोनिक डेक सिस्टिम असलेल्या आणि एकलकोंड्या अशा कोशामधे गुरफटून राहणं हे अमानुषच आहे.सहजीवन,सहकार्य,पाहणे आणि दाखवणे या माणसांच्या मूळ प्रवृत्तिपासून दूर जाण्यासारखं आहे हे.मानसशास्त्रज्ञ याला व्यक्तिमत्त्वाचं विघटन म्हणतात. 


अथर्वची ही यशोगाथा सहज,नैसर्गिक पध्दतीने जीवन जगता येते,हे सांगत आहे.त्यांचे कुटुंब व या यशामध्ये असणाऱ्या सर्वांचे तो नम्रपणे आभार मानतो.कल्लेश्वर ग्रुप,टोप यांचाही तो आवर्जून उल्लेख करतो.


आपल्या वयाच्या मुलांना दिलेला संदेश बरचं काही सांगून जातो,अथर्व म्हणतो,निर्मात्याने प्रत्येकालाच वैशिष्ट्यपूर्ण बनविलेले आहे.प्रत्येकाने हे ओळखणे.मोठी मोठी स्वप्ने पहा.व ती पुर्ण करण्यासाठी संघर्ष करा.कारण संघर्ष म्हणजेच जीवन… 


विजय गायकवाड,विशेष प्रतिनिधी,कोल्हापूर,

दै.धर्मयोध्दा..पुर्वप्रसिध्दी दै.धर्मयोध्दा,सर्व संपादकीय मंडळाचे,व टिमचे आभार व धन्यवाद…


प्रतिक्रिया…


वाह,खूप सुंदर लेख.प्रत्येकाच्या आयुष्यात संधी अनेक रूपाने येत असते. फक्त संधी ओळखता आली पाहिजे.त्या संधीचे नेमके महत्व ओळखून प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. नेमकं हेच अथर्वच्या रेकॉर्ड मधून कळून येतं.


    चपाती गोल करण्यासाठी आणलेला एक पेपरचा तुकडा त्याला पाहून गोल असणाऱ्या पृथ्वीतलावर अथर्वने स्वतःच अस्तित्व सिद्ध केलं याला म्हणतात संधी पकडणे. यासाठी अथर्व,त्याचे आई वडील,आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचे खूप खूप अभिनंदन.या अथर्वचे यश आपल्यापर्यंत पोहोचवून अनेक अथर्व निर्माण करण्याच्या हेतूने अतिशय सुंदर लेख लिहिणाऱ्या विजय गायकवाड यांचे सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन.- माधव गव्हाणे,सेलू, परभणी जिल्हा.