* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२५/७/२४

रक्ताभिसरण / Circulation


माणसाच्या शरीरात कोणते अवयव कुठे आहेत आणि त्यांची रचना कशी आहे,हे ॲनॅटॉमीमध्ये समजल्यानंतर हे अवयव नेमके काय आणि कसं काम करतात याचं ज्ञान फिजिओलॉजी म्हणजेच शरीरक्रिया या विज्ञान शाखेमध्ये येतं.पूर्वी ग्रीकांनी यामध्ये काम करायचा प्रयत्न केला होता.पण त्यांनी काढलेले बरेचसे निष्कर्ष हे चुकीचे होते! त्यांनी हृदयाचं काम काय असतं हे पूर्णपणे चुकीचं सांगितलं होतं.हृदय हे रक्त उपसतं. पण हृदयात रक्त कुठून येतं आणि ते कुठे जातं हे ग्रीकांना समजलं नव्हतं.

शिवाय,ग्रीकांना व्हेन्स म्हणजे शिरा याच फक्त रक्तवाहिन्या असतात असं वाटत होतं.आणि आर्टरीजमध्ये (धमन्यांमध्ये) चक्क हवा भरलेली असते असं त्यांना वाटायचं.आर्टरी हा ग्रीक शब्दच मुळी हवा वाहून नेणारी नळी या अर्थाचा आहे!


मध्यंतरी अलेक्झांड्रियातल्या हिरोफिलसनं ख्रिस्तपूर्व काही काळापूर्वी आर्टरीज (धमन्या) आणि व्हेन्स (शिरा) या दोन्हींमधून रक्त वाहत असतं आणि आर्टरीज आणि व्हेन्स या दोन्हीही हृदयाला जोडलेल्या असतात,हे सांगितलं होतं.पण हृदयापासून लांब या रक्तवाहिन्या पुन्हा कुठं जोडल्या जातात हे कळायला काही मार्ग नव्हता. कारण या रक्तवाहिन्यांना त्या जसजशा हृदयापासून लांब जातील तसतसे अनेक लहान लहान फाटे फुटत जात होते आणि नंतर तर हे फाटे डोळ्यांना दिसणार नाहीत इतके लहान झाले होते आणि हा प्रश्न कितीतरी वर्षं अनुत्तरित राहिला होता.


यावर गेलननं मात्र विचार मांडला होता. हृदयाच्या स्नायूंमध्ये छिद्रं असतात आणि त्यातून रक्त पुन्हा आर्टरीज आणि व्हेन्स यांच्यात ये-जा करतं असं त्यानं सांगितलं होतं.अर्थात,ही छिद्रं कुणालाच दिसली नाहीत,पण गेलननं सांगितलं आहे म्हणून ती आहेत असं मानणाऱ्या अनेक पिढ्या आणि अनेक शतकं मध्ये गेली होती.


त्यातूनच इटालियन अनॅटॉमिस्ट हिरोनिमस फॅब्रिकस (Hieronymus Fabricius) (१५३७ ते १६१९) यानं 'दे फॉर्मेटे फिटू' या नावाचा गर्भ कसा वाढ जातो याबद्दलही एक छान पुस्तक लिहिलं.यामुळेच त्याला 'अँब्रियॉलॉजीचा जनक' म्हणतात. त्यानंच आपल्या घशातून आवाज येण्यासाठी लॅरिंग्ज कारणीभूत असतात हे सांगितलं आणि प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार आपल्या डोळ्यांतली बाहुली (प्यूपिल) लहानमोठं होतं हेही सांगितलं.


फॅब्रिकसनं मोठ्या व्हेन्समध्ये (शिरांमध्ये) रक्त एकाच दिशेनं जाण्यासाठी (दूरच्या अवयवांकडून हृदयाकडे) व्हॉल्व्हज असतात असं दाखवून दिलं होतं.या व्हॉल्व्हजमुळेच रक्त लांबच्या अवयवांकडून गुरुत्वाकर्षणानं पुन्हा मागे न जाता हृदयाकडे जातं हे त्यानं दाखवून दिलं होतं. आपल्या 'दे व्हेनारम ऑस्टिओलिस' (De Venarum Ostiolis) या पुस्तकात त्यानं हे लिहिलंही होतं.पण हे तर गेलनच्या विचारांना छेद देणारं होतं. कारण गेलनच्या म्हणण्याप्रमाणे रक्त व्हेन्समधून दोन्ही दिशांनी ये-जा करत असतं.हे चुकीचं आहे हे जाणवलेलं असूनही फॅब्रिकसनं गेलनविरुद्ध मत मांडायचं धाडस केलं नाही.त्यानं फक्त व्हॉल्व्हज हे रक्त मागे जायची गती कमी करतात असं सांगितलं !


हे सांगण्याची छाती मात्र त्याच्या पुढच्या पिढीतल्या त्याच्याच विद्यार्थ्याला झाली. तसंही पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा भीड कमीच बाळगते म्हणा! इथेही तेच झालं


फॅब्रिकसच्या या शिष्यानं व्हेन्समधून रक्त एकाच दिशेनं जातं हे आपल्याच गुरूनं शिकवलेलं तत्त्व तर सांगितलंच,पण ते पुढे नेऊन रक्ताभिसरणाचं कोडं सोडवलं तो महारथी होता इंग्लिश वैज्ञानिक विल्यम हार्वे! त्याच्या या शोधामुळे खरं तर बायॉलॉजीचं विश्वच ढवळून निघालं होतं.


तो काळच फार भारावलेला होता.एकीकडे गेलनचं म्हणणं खोडून काढणारा फॅब्रिकस आणि रक्ताभिसरणाचं गूढ शोधणारा हार्वे हे गुरू-शिष्य आणि दुसरीकडे कोपर्निकसच्याही पुढे मजल मारलेला गॅलिलिओ.या मंडळींनी विज्ञानाचा चेहराच बदलायचा विडा उचलला होता जणू!


माणसाच्या शरीरात रक्त कुठे आणि कसं तयार होतं,त्यानंतर त्याच्यावर काय प्रक्रिया होतात,मग शरीरातून रक्ताचा प्रवास कसा होतो.या सगळ्या गोष्टींविषयी सगळ्यांना पूर्वीपासून कुतूहल वाटत असलं तरी सोळाव्या शतकापर्यंत त्यासंबंधी भरीव असं काम कुणी केलं नव्हतं.अंदाजानं या संदर्भातल्या अनेक गोष्टींविषयीचे निष्कर्ष काढले जायचे.विल्यम हार्वे (१५७८ ते १६५७) या ब्रिटिश डॉक्टरनं यासंबंधीच्या सगळ्या गैरसमजांवर पडदा टाकत माणसाच्या हृदयाचं एखाद्या पंपासारखं रक्त उपसायचं काम कसं चालतं याविषयी प्रथमच सखोल विवेचन केलं.किंबहुना रक्त शरीरातून फिरवायचं काम हृदय करतं हे त्यानं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यावर कोणीही विश्वास ठेवेना.माणूस आणि इतर सस्तन प्राण्यांच्या बाबतीत पुरुषाच्या वीर्यातले शुक्राणू आणि स्त्रीच्या गर्भाशयातलं बीजांड यांच्या संयोगातून नवा जीव निर्माण होतो अशी संकल्पना मांडणाराही तो पहिलाच संशोधक होता.


इंग्लंडमधल्या केंट परगण्यातल्या फॉकस्टोन या गावात एका प्रतिष्ठित घराण्यात हार्वे जन्मला.त्याचे वडील त्या गावाचे महापौर होते.त्यांना एकूण ९ मुलं होती.विल्यम हा त्यांच्यापैकी सगळ्यात मोठा होता. केंटबरीच्या किंग्ज स्कूलमध्ये त्याचं प्राथमिक शिक्षण झालं.सुरुवातीला हार्वेनं लॅटिन भाषा शिकण्यावर लक्ष केंद्रित केलं.वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.

१५९७ साली हार्वेनं केंब्रिज विद्यापीठाच्या आधिपत्याखाली असलेल्या गॉनव्हील अँड कायस कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली.हे कॉलेज सुरू करणाऱ्यांपैकी एक असलेला जॉन कायस तिथल्या विद्यार्थ्यांना अनुभव मिळवण्यासाठी परदेशी जाऊन काम करायचा सल्ला नेहमी देई.तो वंद्य मानून हार्वे इटलीतल्या पडुआ विद्यापीठात गेला.तिथे त्याला शिकवायला हिरोनायमस फॅब्रिशियस आणि ॲरिस्टॉटलच्या विचारांना पुढे नेणारा सेसार मोंडिनी हे होते. १६०२ साली हार्वेनं आपलं शिक्षण पूर्ण केलं.इंग्लंडमध्ये परतल्यावर त्यानं आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली.लंडनमधल्या लॅन्सेलट ब्राऊन नावाच्या एका प्रख्यात डॉक्टरच्या एलिझाबेथ नावाच्या मुलीशी त्यानं लग्न केलं.त्यांना मूल मात्र झालं नाही.


सजीव- अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन


हार्वेनं आता लंडनमध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता.१६०९ ते १६४३ या काळात त्यानं सेंट बार्थोलोमेव्ज नावाच्या इस्पितळात काम केलं. तिथे त्याला वर्षाला फक्त ३३ पौंड्स इतका क्षुल्लक पगार मिळत असे.रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचाही तो सभासद होता.हार्वेच्या शिकवण्याची काही ठळक वैशिष्ट्यं होती.त्याचा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यावर भर असे.तो कधीही दुसऱ्या कुणावर टीका करायच्या भानगडीत पडत नसे.विद्यार्थ्यांना काहीतरी अर्धवट माहिती देणं,काहीतरी चुकीचं सांगणं,त्यांचा गोंधळ उडेल अशी भाषा वापरणं अशा गोष्टी तो टाळायचा.


शिल्लक राहिलेला भाग पुढील २७.०७.२४ या लेखामध्ये


एक वेगळी वाचणीय नोंद - १६७२ च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीजवळच्या एका छोट्याशा वाडीवर एक स्त्री प्रवाशांच्या राहण्याजेवण्याची सोय करत होती असा स्वतंत्र व्यवसाय करणारी त्या काळातली ती स्त्री 


दिवसभराच्या प्रवासानं आम्ही खूप थकलो होतो.ऊनही जास्तच होतं.दुपारी तीनच्या सुमारास आम्ही 'नेसरी'( कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील गाव.गडहिंग्लजच्या दक्षिणेस दहा मैलांवर.घटप्रभा नदीच्या उत्तरेस एक मैलांवर.) गावाजवळ होतो.दिवसभर खूपच दमछाक झाल्यानं तिथंच थांबलो.शहर अगदी मोकळ्या अशा ऐसपैस जागेवर वसलं होतं.संपूर्ण शहराला दगडी तटबंदी होती.इथं घोडदळाच्या काही तुकड्याही तैनात केलेल्या दिसल्या.बादशहाच्या मृत्यूच्या बातमीमुळं काही दगाफटका होऊ नये,कटकारस्थानं होऊ नये किंवा बंड होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली होती.मला या शहरात चार रुपयांची जकात मागितल्यानं थोडी वादावादीही झाली.अखेर ती जकात भरून आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला अगदी सूर्य मावळेपर्यंत.रात्री आम्ही एका मोठ्या गावात पोहोचलो.या गावाचं नाव होतं 'जबरी.(नेसरी पासून आठ किलोमीटर वर असणारे ही जांभूळवाडी )


याही गावाला दगडी तटबंदी होती.रात्रीचं जेवण आणि मुक्कामासाठी माझे सेवक मला इथल्या सभ्य स्त्रीच्या घरी घेऊन गेले.तिनं माझं अगदी आपुलकीनं स्वागत केलं आणि तिच्या घरीच मुक्काम करण्याची विनंती केली.

तिला तीन मुलीही होत्या.अत्यंत देखण्या आणि नम्र.त्या मुलींनी माझी सगळी चौकशी केली.मला काय हवं नको ते पाहिलं.एका मुलीनं जेवणासाठी कोंबडी,तांदूळ,अंडी,

तेल,तूप असं सगळं सामान आणलं.या साहित्याला माझ्या नोकरांना तिनं स्पर्शही करू दिला नाही.तर दुसरीनं स्वयंपाकासाठी लाकूड,पाणी,भांडी आणि निखारे आणले.या दोघींची ही गडबड सुरू असताना तिसरी माझी झोपण्याची व्यवस्था करत होती.तिनं आमच्यासाठी गाद्या घातल्या. उशी आणि पांघरुणाची व्यवस्था केली.तीही अगदी नीटनेटकी.या छोट्याशा खेड्यात राहण्या-जेवणाची इतकी स्वच्छ आणि आटोपशीर व्यवस्था पाहून मी अचंबितच झालो होतो.अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या शहरातसुद्धा अशा सोयीसुविधा मला मिळाल्या नसत्या.विशेष म्हणजे इथं राहणारे लोक फक्त जनावरांचे कळप सांभाळतात. (बहुधा कॅरेचा मुक्काम धनगरवस्तीवर पडला असावा.)


 भारत आणि पूर्वेकडील प्रदेशातील प्रवास खंड १ (सन १६७२ ते १६७४ ) बार्थ लेमी ॲबेकॅरेअनुवाद-संपादन सदानंद कदम,दीपा माने - बोरकर,प्रकाशक-अक्षर दालन,कोल्हापूर






२३/७/२४

कटपयादी संख्येचे गूढ - The mystery of serial numbers

एक विस्तीर्ण पसरलेलं तळं आहे.त्याच्या किनाऱ्यावर एक झाड आहे.तळ्यात गोपी स्नान करताहेत आणि किनाऱ्याजवळच्या झाडावर गोपींची वस्त्रे घेतलेला कृष्ण बसलेला आहे.हे तसे अनेक चित्रांत / चित्रपटांत दिसलेले दृश्य. मात्र येथे नारद मुनींचा प्रवेश होतो.ते त्या गोपींशी संवाद साधतात.त्यांना विचारतात की कृष्ण हा लंपट,त्रास देणारा,खोड्या काढणारा वाटतो काय?


प्रत्येक गोपिकेशी वेगवेगळा संवाद साधताना नारदांना जाणवतं,ह्या गोपी कृष्णाला लंपट वगैरे मानत नाहीत,तर त्यांना कृष्ण हा अत्यंत प्रिय आहे.तो त्यांच्या जवळ आहे.अगदी जवळ. म्हणजे किती? तर प्रत्येक गोपिके

पासून समान अंतरावर आहे.मध्ये उभा असलेला कृष्ण अन् त्याच्या भोवती समान अंतरावर उभ्या असलेल्या गोपिका.अर्थात त्या सर्व गोपिका एका वर्तुळाच्या स्वरूपात उभ्या आहेत,ज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे कृष्ण..! ह्या अशा रचनेबद्दल संस्कृतमध्ये एक श्लोक आहे.असं म्हणतात हा श्लोक महाभारताच्या काही 'हरवलेल्या' श्लोकांपैकी आहे -


गोपीभाग्यमधुव्रात-शृङ्गिशोदधिसन्धिग । खलजीवितखाताव गलहालारसंधर ।।


ह्या श्लोकाची गंमत आहे.हा श्लोक वाटतो तर श्रीकृष्णाच्या स्तुतीचा.पण त्याचबरोबर ह्या श्लोकात शंकराची स्तुती पण दडलेली आहे. पूर्वीच्या शैव-वैष्णव वादाच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं आहे.पण याहूनही महत्त्वाचं एक गूढ ह्या ग्लोकात लपलंय.श्रीकृष्ण आणि गोपींमध्ये जे केंद्र वर्तुळाचं सुरेख नातं तयार झालं आहे, त्या नात्याची गणितीय परिभाषा ह्या श्लोकात लपलेली आहे.आणि या परिभाषेतूनच (पाय) ची बिनचूक किंमत समोर येतेय..!


गोपिकांनी निर्माण केलेल्या वर्तुळाचा परीघ काढायचा असेल तर आजच्या गणितात सूत्र आहे:


परीघ = २ π ( पाय )


r म्हणजे वर्तुळाची त्रिज्या,अर्थात कृष्ण आणि गोपींमधलं समसमान अंतर.यात π (pie) ची निश्चित संख्या अनेक शतकं माहीत नव्हती.π ला 22/ 7 असंही लिहिलं जातं.

अर्थात 3.14. मात्र ह्या श्लोकात π (पाय) ची किंमत दशांशाच्या पुढे ३१ आकड्यांपर्यंत दिलेली आहे.आता श्लोकात लपलेले हे आकडे कसे बघायचे?याचं उत्तर आहे कटपयादी संख्या.


π पायची किंमत 3.141,5926535,

8979323846,2643383279502,8841971693993751


कटपयादी ही अगदी प्राचीन काळापासून एखाद्या संख्येला अथवा आकड्यांना कूटबद्ध (encrypt) करण्याची पद्धत आहे.संस्कृतच्या वर्णमालेत जी अक्षरं आहेत,त्यांना १ ते ० अशा आकड्यांबरोबर जोडलं तर कटपयादी संख्या तयार होते.


या कटपयादी संख्येतील कूट भाषा समजण्यासाठी ह्या श्लोकाची मदत होते -


का दि नव,टा दि नव

पा दि पंचक,

या दि अष्टक 

क्ष शून्यम.


याचा अर्थ असा सर्व अक्षरांना प्रत्येकी एक अंक दिला आहे.त्याचे कोष्टक पुढीलप्रमाणे:


क पासून नऊ असे क्रमाने १ ते ९: क = १,ख = २,ग = ३,घ = ४,ड़् = ५,च = ६,छ = ७,ज = ८ झ = ९,


ट पासून नऊ असे क्रमाने १ ते ९: ट = १,ठ = २,ड = ३,ढ = ४,ण = ५, त = ६,थ = ७,द = ८,ध = ९


प पासून पाच असे क्रमाने १ ते ५: प = १,फ = २,ब = ३,भ = ४, म = ५.


य पासून आठ असे क्रमाने १ ते ८: य = १,र = २,ल = ३,व = ४,श = ५,ष = ६,स = ७,ह = ८,क्ष = ०


म्हणजे आता आपल्या श्लोकाची संख्या येते-


गोपीभाग्यमधुव्रात गो ३,पी१,भा-४,ग्य (यात मूळ अक्षर 'य' आहे) १,म - ५,धु -९…. म्हणजेच ३.१४१५९... ही किंमत आहे,π ची.


अर्थात शेकडो वर्षांपूर्वी वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी π(पाय) ह्या गुणोत्तराची (ratio ची) किंमत इतक्या खोलात जाऊन कशी काय काढता आली,हा प्रश्न शिल्लक राहतोच.


पृथ्वीचा परीघ,चंद्राचा परीघ यांच्या संख्या भारतीय ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वीपासून आढळतात.

आजच्या अत्याधुनिकतंत्रज्ञानाद्वारे काढले गेलेले परीघ किंवा व्यास,हे वेदग्रंथांच्या विभिन्न श्लोकांमधून / सूक्तांमधून काढलेल्या संख्येच्या अगदी जवळ आहेत.उदा.आर्यभटने पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने अर्थात ३९,९६८ कि.मी.आहे हे सांगितले होते.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा व्यास ४०,०७५ किमी. आहे,हे सिद्ध झाले आहे.


(पाय) ही संकल्पना किती जुनी आहे? इसवी सनापूर्वी साधारण अडीचशे वर्षांपूर्वी कोपर्निकसने याचा वापर केलेला आढळतो. त्याहीपूर्वी,म्हणजे इसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकात मिस्रमधे पायचा उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य विज्ञानाचा बराच इतिहास जतन करून ठेवला असल्याने तेथे असे पुरावे आढळतात. आक्रमकांनी ह्या पुराव्यांना नष्ट केले नसल्याने आजही जुन्या बऱ्याच गोष्टी उपलब्ध आहेत.


आपल्या भारतात मात्र असे नाही.येणाऱ्या आक्रमकांनी येथील ज्ञानाची साधनेच नष्ट केल्यामुळे जुन्या खुणा सापडणं अत्यंत कठीणआहे.तरीही (पाय) चा उल्लेख इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या शल्ब सूत्रात आढळतो.मात्र π (पाय) ह्या संकल्पनेचे अस्तित्व आणि त्याची अचूकता ही बऱ्याच पूर्वीपासून भारतीयांना माहीत असावी, असं वाटण्याला भरपूर जागा आहे.


बऱ्याच नंतर,म्हणजे पाचव्या शतकाच्या सुरुवातीला आर्यभटने π(पाय) ची किंमत दशांश चिन्हाच्या चार आकड्यापर्यंत बरोबर शोधून काढली असल्यामुळे पायच्या शुद्ध रूपातील संख्येचा मान आर्यभटकडे जातो. 


पुढे कटपयादी सूत्र वापरून केलेला श्लोक हाती आला अन् पायची किंमत दशांशानंतर ३१ आकड्यापर्यंत मिळाली.


कटपयादी संख्येचा उपयोग केवळ गणितामध्ये होतो असे नाही,तर रागदारी,खगोलशास्त्र अशा अनेक ठिकाणी कटपयादीचा वापर झालेला आहे.दाक्षिणात्य संगीतात,

विशेषतःकर्नाटक संगीतात,कटपयादीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला आहे.कटपयादीच्या मदतीने वेगवेगळे राग व त्यांच्या स्वरमालिका लक्षात ठेवणे सोपे जाते.


इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी झालेल्या पिंगलाचार्यांनी कटपयादी संख्येचे प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने केले.पिंगलाचार्य हे व्याकरण महर्षी पाणिनींचे बंधू होते.


वेदांच्या वृतांमध्ये लघु-गुरु पद्धत वापरली जाते. ही काहींशी आजच्या संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या 'बायनरी' पद्धतीसारखी आहे.मात्र यात लघु हा १ आणि गुरु हा ० या आकड्याने दर्शवला जातो.याचा वापर पिंगलाचार्यांनी तयार केलेली कटपयादी सूत्रे आहेत


म - ००० 

र - ०१०

य - ००१

भ - ०११

य - १००

स - ११०

ज - १०१

न - १११


अर्थात,कटपयादी संख्येच्या माध्यमातून आपल्या देशात हजारो वर्षांपासून गणित,खगोलशास्त्र,छंदशास्त्र,

संगीत यांचा अभ्यास होत आलेला आहे.आणि अशा ह्या संख्येच्या मदतीने π(पाय) ची किंमत दशांशाच्या ३१व्या स्थानापर्यंत काढणं आणि ती एखाद्या सकालमबिने (एम्बेड करणं) हे अद्भुताच्याच श्रेणीत येतं..!


टिप - कटप यादी संख्या मुळ पुस्तकात आपण पाहू शकता.भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन



२१/७/२४

चिनी आणि मोगल The Chinese and the Mughals

बुद्धाने जातिभेद नाकारले होते.परंतु भारतीय समाजात जातिभेद विरून जाऊ शकले नाहीत व शेवटी बौद्ध धर्मच लयाला गेला.पण भारताबाहेर ईशान्येस चीन,कोरिया,

मंगोलिया, जपानपर्यंत व आग्नेयेस ब्रह्मदेश थायलंड, कंबोडिया,इन्डोनेशियापर्यंत बौद्ध धर्म फैलावला. चीनच्या यांगत्से व पिवळ्या नद्यांच्या खोऱ्यांतल्या सुपीक मैदानात नाईल नदीच्या खोऱ्यासारखीच समृद्ध शेती होत होती.

तिच्या जोरावर कारागिरी,विद्याव्यासंग पोसले होते. जेव्हा भारतातून बौद्ध भिक्खु चीनमध्ये पोचले, तेव्हा त्यांनी आणलेले आयुर्वेदाचे ज्ञान चिन्यांना हवे होते,म्हणून त्यांचे स्वागत केले गेले.त्यांना राजदरबारात नेले.तिथे त्यांनी राजासमोर लवण्यास नकार दिला;म्हणाले,आम्ही फक्त बुद्धापुढे वाकतो.खरे तर ह्या उर्मटपणाबद्दल त्यांना देहदंड देण्याची रूढी होती; पण चीनच्या सम्राटाने त्यांना माफी दिली. बौद्ध धर्माचा प्रचार करण्याची मुभा दिली.चिनी लोक शोध लावण्यात पटाईत.बुद्धाचा संदेश पसरवण्यासाठी त्याच्या चिक्कार प्रती काढायला हव्यात.हाताने लिहीत बसण्यात फार वेळ जातो, श्रम लागतात.मग त्यांनी इसवी सनपूर्व दोनशे वर्षे बांबूचा कागद बनवण्याची कृती शोधून काढली आणि ब्लॉक प्रिन्टिंगचीही.


युरोपीय बढाई मारतात की जगात प्रथम जर्मनीत गुटेन्बर्गने शतकात मुद्रणकलेचा शोध लावून बायबल छापले.पण त्याच्या तब्बल अठरा शतके आधीच चिनी बुद्धाचा संदेश छापू लागले होते. चिन्यांनीच होकायंत्राचा,

बंदुकीच्या दारूचा, अग्निबाणांचा शोध लावला.ज्ञानाच्या इतरही अनेक शाखांत चिन्यांनी उत्तम प्रगती केली. 


चिनी समाज भारतीय समाजासारखा जाती-पातींनी चिराळलेला नव्हता.चिन्यांना अंगभूत बुद्धीच्या बळावर मॅन्डारिन ह्या शासकवर्गात प्रवेश करून समाजात वर येता येणे शक्य होते.ह्या सर्व वैशिष्ट्यांमुळे पंधरा -

सोळाव्या शतकांपर्यंत चीन हा जगातला ज्ञान- तंत्रज्ञानात अग्रेसर देश होता.


चीनचाच उत्तरेचा शेजारी मंगोलिया.इथे सुपीक शेती बिलकूल नव्हती,होते फिरस्त्यांचे पशुपालन.ते घोड्यांवर बसून गुरांचे कळप हाकत हाकत कुरणांच्या शोधात हिंडायचे.अशा जीवनशैलीतून इतर समाजांवर आक्रमण करण्यासाठी उपयुक्त अशी अनेक तंत्रे,कौशल्ये पोसली जातात.साडेतीन हजार वर्षांपूर्वी वैदिक संस्कृती अशाच समाजांत निर्माण झाली होती, आणि भारतात फैलावली होती.इसवी सनाच्या बाराव्या शतकात मंगोलियात अशाच समाजात 'झाले बहु,होतील बहु,परंतु ह्यासम हा' असा चेंगीजखान हा डोकेबाज,धीट पुढारी जन्मला. त्याने घोडे भरधाव दौडत असताना दोनही हात सोडून धनुष्याने बाण मारण्याचे तंत्र विकसित केले.रात्री रंगीत दिवे वापरत सैन्याच्या सुसूत्र हालचाली करण्याचे तंत्र विकसित केले.

अशा युद्धतंत्रांच्या बळावर त्याने इराकपासून पूर्ण मध्य आशिया व हंगेरी- रशियाच्या बऱ्याचशा भागासकट थेट चीन- कोरियापर्यंत पसरलेले विस्तृत साम्राज्य स्थापले.

इटलीतल्या व्हेनिस ह्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या शहराला त्याच्या सैन्याने वेढा घातला होता.हे साम्राज्य नीट हाकण्यासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने संदेश पोहोचले पाहिजेत. त्यासाठी त्याने वीस-तीस किलोमीटरच्या अंतरांवर घोड्यांची ठाणी बसवली.तिथे नेहमी ताज्या दमाचे घोडे व घोडेस्वार सज्ज असायचे. चेंगीजखानाचा कोणताही खलिता घेऊन स्वार निघाला की तो भरधाव पुढच्या ठाण्यापर्यंत जायचा.तिथून तातडीने नवा स्वार निघायचा. अजिबात वेळ न गमावता हवे तिथे संदेश पोचवला जायचा.वाटेत जर घोड्याला काहीही दुखापत झाली,तर जो पहिला घोडा भेटेल, त्याला ताब्यात घेऊन पुढची दौड सुरू व्हायची. कोणी ह्या कामासाठी घोडा द्यायला नाकारले, तर त्याला देहदंड ठोठावला जायचा. प्रतिभाशाली चेंगीजखानाने युद्धनीतीत, शासननीतीत अशी अनेक नवनवी स्मरुके निर्मिली.त्याच्या साम्राज्याबरोबर तीही फैलावली. वर आपण उल्लेख केला होता की संत ज्ञानेश्वरांनी निर्मिलेली स्मरुके फैलावली. पण त्यांच्या ह्या प्रतिभेला कदाचित आधारभूत असलेली जनुके त्यांच्या बरोबरच लयाला गेली असावीत.चेंगीजखानचे असे झाले नाही.आजच्या शास्त्रीय प्रगतीमुळे मानवाच्या आनुवंशिकतेचा आधार असणारे रेणू अभ्यासून जनुकांचा प्रसार कसा होतो ह्याचा अभ्यास साध्य झाला आहे.मध्य आशियाच्या मोठ्या पट्ट्यात आज एक विशिष्ट जनुकसंच प्रचंड प्रमाणात आढळतो.हा कुठून आला? जवळजवळ नक्की की चेंगीजखानापासूनच ह्या खास जनुकसंचाचा उगम झाला असावा.तेव्हा चेंगीजखानाने निर्मिलेले अनेक स्मरुक जसे वेगाने पसरले,तसे जोडीनेच त्याचे जनुकही फैलावले असावेत ! अशा साऱ्या घडामोडींतून चेंगीजखानाने चीनपासून ते अरब देश व युरोपपर्यंत दळणवळण सुरू केले.त्यातून चीनमधले बंदुकीच्या दारूसारखे शोध प्रथम अरबांपर्यंत व नंतर युरोपात पोचले.चीनच्या रेशीम आणि इतर अनेक उत्पादनांना युरोपात मोठी मागणी होती. ह्यातून जो व्यापार सुरू झाला त्यातून आर्थिक उलाढालींना मोठी चालना मिळाली.इटलीत जो पैसा लोटला,त्यातून युरोपात बाराव्या शतकानंतर एक नवचैतन्य बहरले.


युरोप….


प्राचीन ग्रीक संस्कृतीत अगणित देवांची आणि निसर्गाचीही पूजा चालू होती.अशा वातावरणात अतिशक्तिमान केन्द्रीय शासनाला वाव नव्हता, आणि एकूण परिस्थिती मुक्त विचारांना, अभिव्यक्तीला अनुकूल होती.साहजिकच ग्रीसमध्ये बुद्ध कालापासून इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांपर्यंत ज्ञान - विज्ञान-साहित्य शिल्प बहरली होती.ईसाई धर्मानुसार राजा हा ईश्वरी अंश आहे असा अर्थ लावता येत होता.तेव्हा राजसत्तांच्या पाठिंब्यातून ग्रीसमध्ये व हळूहळू सर्वच युरोपभर ईसाई धर्माचा प्रसार झाला.आता बायबलात दिले तेच सत्य,

इतर पाखंड,व हे पाखंड जबरदस्तीने दडपणे समर्थनीय आहे अशी विचारसरणी फैलावली व ज्ञान विज्ञानाचा झपाट्याने ऱ्हास झाला.युरोपीय प्लेटो,

सॉक्रेटिस,ॲरिस्टॉटल,आर्किमिडिज अशा विद्वानांचे लिखाण पूर्ण विसरून गेले.ग्रीसच्या पूर्वीच इजिप्त, इराकसारख्या अरब देशांत आधुनिक ज्ञान - विज्ञानाची भरभराट झाली होती.ह्या देशांचा ग्रीसशी जवळचा संपर्क होता.ईसाई धर्माच्या प्रसाराबरोबर ग्रीसमधल्या ज्ञान विज्ञानाचा नाश झाला तेव्हा त्या साहित्याचा अरबी भाषेत अनुवाद करून अरबांनी हे ज्ञान जिवंत ठेवले;ते त्यात भरही घालत राहिले.(वारुळ पुराण,माधव गाडगीळ,

ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन) युरोपात बाराव्या शतकानंतर जेव्हा ज्ञान - विज्ञानाची जोपासना पुनश्च सुरू झाली,तेव्हा अरबांनी जपलेल्या ग्रिट ज्ञान- विज्ञानाचे पुनरुज्जीवन केले गेले.


हे होत असताच युरोपावर अनेक संकटे आली.विशेषत:

तेराशे साठपासून सोळाशे सदुसष्टपर्यंत प्लेगच्या एकामागून एक साथी येत राहून लोक मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले.पंधराशे पन्नास पासून अठराशे पन्नास पर्यंत एक छोटे हिमयुग सुरू होऊन शेतीचे उत्पन्न खूप घटले. ह्या शतकांत जंगलांची बेसुमार तोड होऊन हिवाळ्यात उबेला जाळायला लाकूडही मिळेना


ह्या सगळ्या अडचणींना तोंड द्यायला भक्कम ज्ञान - विज्ञानाची मोठी मदत होईल ही जाणीव युरोपात पसरली,

आणि ह्या मंथनातून वस्तुनिष्ठता,तर्कशुद्धता व मांडणीतून जे पडताळता येतील असे काही तरी वेगळे,नवे निष्कर्ष काढण्याची क्षमता ह्या तीन महत्त्वाच्या पैलूंवर आधारित वैज्ञानिक कार्यपद्धती विकसित झाली.ज्ञानसर्जनाच्या इतर साऱ्या प्रणालींहून अतिशय वेगाने वैज्ञानिक कार्यपद्धतीद्वारा नवे ज्ञान निर्माण करता येते.युरोपात सतराव्या शतकापर्यंत ही कार्यपद्धती नेटकेपणे कार्यरत करण्यासाठी विद्यापीठे,वैज्ञानिकांच्या संघटना, संशोधन केन्द्रे प्रस्थापित केली गेली,आणि विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती झपाट्याने सुरू झाली.ह्यातून निर्माण झालेल्या ज्ञानाचा वेगवेगळ्या प्रकारे फायदा उठवता आला.ह्यात खास महत्त्वाची होती दोन क्षेत्रे नौकानयन आणि युद्धकला.नौकानयनासाठी खगोलशास्त्र फार उपयुक्त होते,आणि इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील अरब - ग्रीक खगोलशास्त्रज्ञ टोलेमीच्या काळापासून पंधरा- सोळाव्या शतकापर्यंत युरोपात पूर्णपणे थंडावलेल्या खगोलशास्त्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली.


वस्तुनिष्ठता हे विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण आहे,तेव्हा खगोलशास्त्राच्या प्रगतीसाठी काटेकोरपणे केलेली निरीक्षणे फार महत्वाची होती.ही गोळा करण्यात सर्वांहून मोठे,महत्त्वाचे योगदान केले मर्डेकरांनी खास उल्लेखिलेल्या टैको ब्राहीनी.ह्या काळात सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या शास्त्रीय संशोधनात अनेक युरोपीय श्रीमंतांनी पुढाकार घेतला,तसाच हा टैको ब्राही 


डेन्मार्कच्या राजदरबारातला एक उमराव होता.

पण एक दरबारी म्हणून त्याचा अंतही एका राजदरबारातल्या मेजवानीत विलक्षण प्रकारे झाला.अशा मेजवानीत भरपूर मद्यपान व्हायचे,तेव्हा मूत्राशये गच्च भरून जायची.पण इतरांच्या आधी उठणे हे शिष्टाचारा

विरुद्ध होते.तेव्हा दाबून धरणे भाग असायचे.एका मेजवानीत हे मर्यादेबाहेर गेले.मग टैको ब्राहीची कोंडलेली लघवी कायमचीच रोखली जाऊन तो नंतर अकरा दिवसांनी स्वर्गवासी झाला.मरताना त्याने स्वतःबद्दल लिहून ठेवले. टैको ब्राही एका सिद्धपुरुषासारखा जगला आणि महामूर्खासारखा मेला ! 


भारत पादाक्रान्त करण्यात इंग्रजांना नौकानयन आणि युद्धकला ह्या दोनही सामर्थ्यांचा प्रचंड फायदा झाला.

मराठ्यांच्या आरमारातल्या नौका खोल समुद्रात जाऊ शकत नव्हत्या,तर इंग्रजांची गलबते साता समुद्रांना सहज ओलांडू लागली होती.वैज्ञानिक कार्यपद्धतीतून युद्धकलेत कशी सरशी करता आली ह्याचे नेटके उदाहरण आहे.


म्हैसूरच्या टिपू सुलतानाबरोबरच्या लढाया. चिन्यांनी शतकातच रॉकेट,अग्निबाण शोधले होते.तिथून ते भारतात पोहोचले होते.म्हैसूरचा टिपू सुलतान ते युद्धात वापरत होता.१७८० मध्ये इंग्रजांची म्हैसूर सेनेशी पहिली लढाई झाली.त्यात टिपूच्या सैन्याने केलेल्या अग्निबाणांच्या माऱ्यातून इंग्रज फौज चक्रावून गेली,धूम पळाली.पण हा पराभव स्वीकारताना इंग्रजांनी वापरलेले,न फुटलेले अग्निबाण गोळा करून मायदेशी पाठवले.इंग्रजांचा दारूगोळ्याचा कारखाना वूलवर्थ गावी होता.त्या कारखान्याला जोडून दारूगोळा अधिकाधिक परिणामकारक बनवण्याचे संशोधन चालायचे.त्या प्रयोगशाळेत सापडलेल्या अग्निबाणांचा अभ्यास करून त्यांनी त्यांना कसे तोंड द्यायचे याचे डावपेच रचले. स्वतःबनवण्याचे प्रयत्न सुरू केले.दरम्यान टिपूला शास्त्रीय संशोधन हा विषयच ठाऊक नव्हता.तेव्हा इंग्रजांबरोबरच्या १७९२ च्या पुढच्या लढाईत टिपूचे युद्धतंत्र 'जैसे थे' होते. इंग्रजांचे पुढे गेले होते.म्हणून 'थांबला तो संपला' या न्यायाने दुसऱ्या लढाईत इंग्रजांनी टिपूचा धुव्वा उडवला.मराठ्यांची पण हीच गत होती.

इतिहासाचार्य राजवाडे सांगतात की एवढ्या बुद्धिमान नाना फडणवीसांच्या संग्रहात इंग्रजांकडून पकडलेल्या दुर्बिणी, होकायंत्रे होती;पण त्यांचा उपयोग काय,याचा

त्याने काहीही विचार केल्याची नोंद नाही.


एक महत्त्वाची नोंद - रॉबर्ट बेरोन वोन हेन गेल्डर्न (१८८५ - १९६८) या लांबलचक नावाचा नामांकित ऑस्ट्रियन एंथ्रोपोलोजिस्ट होऊन गेला.हा विएन्ना विद्यापीठात शिकला.पुढे १९१० मध्ये भारत आणि ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर आला. 


भारतीयांच्या प्रगत ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल वाटले म्हणून त्याने अभ्यास सुरू केला. 


त्याने दक्षिण-पूर्व देशांबद्दल प्रचंड संशोधन केले.आणि त्याच्या पूर्ण अभ्यासाअंती त्याने ठामपणे असे मांडले की,भारतीय जहाजे,कोलंबसच्या कितीतरी आधी मेक्सिको आणि पेरूमधे जात होती!भारतीय नौकांचा प्रवास विश्वव्यापी होत होता.याचा यापेक्षा दुसरा कुठला स्पष्ट पुरावा हवा आहे..? आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंबसने शोधलं आणि भारताचा 'शोध' (!) वास्को-डी-गामा ने लावला!!मुळात वास्को-डी-गामा हाच भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला.

डॉ.हरिभाऊ (विष्णू श्रीधर) वाकणकर हे उज्जैनचे प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता.भारतातील सर्वांत प्राचीन वसाहतीचा पुरावा म्हणून ज्या 'भीमबेटका' गुहांचा उल्लेख होतो,त्या डॉ.वाकणकरांनीच शोधून काढलेल्या आहेत.


डॉ.वाकणकर त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात इंग्लंडला गेले होते.तिथे एका संग्रहालयात त्यांना वास्को-डी-गामाची दैनंदिनी ठेवलेली दिसली.ती त्यांनी बघितली आणि त्याचा अनुवाद वाचला.


त्यात वास्को-डी-गामाने तो भारतात कसा पोहोचला याचे वर्णन केले आहे.वास्को-डी-गामाचे जहाज जेव्हा आफ्रिकेतील जान्जीबारला आले,तेव्हा त्याने तिथे त्याच्या जहाजाच्या तिप्पट आकाराचे मोठे जहाज बघितले.


एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला. 'चंदन' नावाचा तो भारतीय व्यापारी अत्यंत साध्या वेषात खाटेवर बसला होता.जेव्हा वास्को-डी-गामाने भारतात येण्याची इच्छा दाखविली,तेव्हा सहजपणे त्या भारतीय व्यापाऱ्याने सांगितले,'मी उद्या भारतात परत चाललोय.तू माझ्या मागोमाग ये...'


आणि अशा रीतीने वास्को-डी-गामा भारताच्या किनाऱ्याला लागला..!!


दुर्दैवाने आजही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांत 'वास्को-डी- गामाने भारताचा 'शोध' लावला असा उल्लेख असतो..!!'


भारताचे नौकानयन शास्त्र.. (भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )






१९/७/२४

बंडखोर मुसा / Rebel mouse

मूसा आता धनगर बनला.वाळवंटाच्या कडेला असलेल्या ओसाड भागात,डोंगर-पहाडात तो राही.त्याच्या शिक्षणातील नवीन प्रकरण जणू सुरू झाले.

विद्यापीठातील धुळीने भरलेली ती हस्तलिखित सोडून तो बाहेर पडला.मृतांच्या छायामय जीवितांविषयीच्या कल्पना व कथा सोडून तो बाहेर पडला.आता रात्रीच्या वेळेस तो आकाशातील तारे बघे.ईश्वराची ती जळजळीत तेजोमय लिपी आकाशपटावर तो पाही. 


इजिप्शियन लोक गाय,कुत्रा वगैरेंनाही देव मानीत.मूसाने ईश्वराविषयींच्या या साऱ्या पोरकट कल्पना आपल्या मनातून काढून टाकल्या.तो निराळा नवा देव शोधू लागला.अधिक उदात्त, भव्य व दिव्य असा परमेश्वर तो पाहू लागला. वाळवंटात उठणाऱ्या वादळांवर स्वार झालेला असा परमेश्वर कधी त्याला दिसे.मेघांच्या गर्जनेत,विजांच्या कडकडाटात त्या प्रभूचा आवाज त्याला ऐकू येई आणि सकाळी सूर्याचे किरण येत,वाळवंटातील झुडपांवर ते किरण पडत;आणि ती झुडपे पेटल्याप्रमाणे दिसत.त्या प्रदीप्त झुडपांत प्रभूचे मुखमंडल जणू तो प्रत्यक्ष समोर पाही.मूसाला नवीन परमेश्वर सापडला. त्या वाळवंटात त्याला नवा देव मिळाला.हा परमेश्वर भयंकर होता.ओसाड रानावनात सापडलेला तो परमेश्वर होता.

अरबी लोकांच्या परमेश्वराप्रमाणे कठोर व उग्र असा हा प्रभू होता. पर्वतांवरून उड्डाण करणारा,वाळवंटातून पार जाणारा.भव्य भडक अशा तंबूत राहणारा,असा हा परमेश्वर होता.लोक झोपले असता त्यांना तो सांभळतो;

त्यांना युद्धात घेऊन जातो;निर्दयपणे आपल्या लोकांच्या शत्रूचा निःपात करतो; वाऱ्याप्रमाणे स्वतःचे मन बदलतो;

मनात येईल तसे करतो;अपमानाचा पटकन् सूड घेतो;खोटे सांगून हेतुसिद्धी होत असेल तर हा देव खोटे बोलायलाही मागे-पुढे पाहत नाही.हा असा देव आहे,की अन्याय ज्याला सहन होत नाही; परकीयांविषयीही तो उदारता दाखवितो,पोरक्या पोरांचा तो प्रेमळ पिता बनतो;गरिबांवर दया करतो.अरबस्तानातील बदाऊनमध्ये जे जे गुण व

दुर्गुण आहेत,ते थोडक्यात या देवाच्या ठायी आहेत.

जणू मूसाने आरशात पाहिले आणि स्वतःच्याच स्वरूपात त्याला परमेश्वर आढळला. मूसाने जिहोवाचे जे चित्र रंगविले आहे, ते त्याचे स्वतःचेच अनंत पटीने वाढवलेले असे चित्र आहे.


मूसा पुष्कळ वर्षे वाळवंटातच राहिला. 


वाळवंटातील ती अनंत शांती त्याला आवडे.त्या गंभीर शांतीने मूसाचे विचार वाढले.विचारांचा विकास व्हायला अवसर मिळाला.वाळवंटातील अपार शांती,तेथील ते निःस्तब्ध अनंत आकाश यांच्या संगतीत त्याच्या गूढ स्वभावाला,त्याच्या चिंतनशील मनाला भरपूर खाद्य मिळाले.एका सुखवस्तू बदाऊन सरदाराच्या मुलीशी त्याने लग्न लावले आणि चिंतनशील शांत जीवन तो कंठू लागला.परंतु इजिप्तमध्ये ज्या गुलामांना सोडून आला होता,त्यांच्याविषयीचा विचार त्याला सचिंत करी.आपल्या बदाऊन मित्रांजवळ त्यांच्याविषयी तो बोले.त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाविषयी व आजच्या अधःपतित स्थितीविषयी तो सांगे.आपल्या या हतपतित बंधूंची करुण-कहाणी ऐकून बदाऊन सहानुभूती प्रकट करीत.

इजिप्तमधील हे लोक त्यांचेच होते. बदाऊनांचाही अब्राहम हाच मूळ पुरुष.ज्या अब्राहमने आपल्या जातीला नवनवे स्थान मिळावे म्हणून सर्व वाळवंटातून धैर्याचे नवतेज पेटवले,तोच अब्राहम अरब बदाऊनांचा व इजिप्तमधील दास्यमग्न ज्यूंचा पूर्वज.


हळूहळू मूसाच्या मनात एक विचार आला. इजिप्तमधील दास्यमग्न ज्यूंनी इकडे पळून यावे; व वाळवंटात स्वतंत्र व्हावे,असे त्याला वाटले आणि नंतर पूर्वजांचे ते पहिले स्थान कनान तिथेही या सर्वांना आपण घेऊन जाऊ असे त्याला वाटले.ज्यूंना त्यांचे पहिले स्थान परत देणे,त्यांची जुनी मातृभूमी त्यांना परत देणे, त्यांना नवधर्म देणे ! किती महनीय उदात्त असे हे ध्येय ! हे भव्यदिव्य स्वप्न मनात खेळवीत मूसा सिनाई पर्वतावर शेळ्या-मेंढ्या चारीत बसे.


याच सुमारास इजिप्तमधील राजा मरण पावला. नवीन राजा गादीवर बसला.इजिप्तमधून पूर्वेकडे येणाऱ्या कारवानांच्या तोंडून तिकडील या घडामोडी मूसाला कळल्या.कृती करायला योग्य संधी आली होती.आणि मूसा पुन्हा इजिप्तमध्ये गेला.तो त्या गुलामांत सर्वत्र हिंडूफिरू लागला. बंड करा असे तो त्यांना सांगू लागला.

कामाची हत्यारे खाली ठेवा.संप करा,काम बंद पाडा. दगड वाहू नका;चढवू नका;विटा भाजू नका. असे तो सांगू लागला.जुलमी धन्याचे काम काय म्हणून करावयाचे ?


इजिप्शियन राजपुत्र असणारा मूसा, अरबस्तानात धनगर होऊन राहणारा मूसा आता इजिप्शियन श्रमजीवींचा बंडखोर पुढारी झाला.इतिहासातील विटा भाजणाऱ्या कामगारांचे पहिले संघटन त्याने निर्मिले.ते पहिले कामगार युनियन.


मूसाने इजिप्शियन राजाकडे ज्यूंना मुक्त करा असा अर्ज केला.परंतु राजाने प्रथम लक्ष दिले नाही.परंतु पुढे आपले मन बदलले.हे ज्यू दास रोगग्रस्त होते.हे मरतुकडे होते.

अत्यंत गलिच्छ वसतीत राहात.इजिप्त राष्ट्राला अशा लोकांपासून भय आहे,असे राजाला वाटले. इजिप्तमधील कितीतरी रोगांच्या साथी ज्यूंच्या या भिकार वसतीत प्रथम सुरू होत.मूसानेही ज्यूंना स्वच्छ सांगितले की इजिप्तमधील दहा प्लेगांची जबाबदारी तुमच्यावर आहे.तुमच्या डोक्यावर ते पाप आहे.शेवटी जेव्हा मूसाच्या नेतृत्वाखाली ज्यू इजिप्तमधून निघाले तेव्हा त्यांना परवानगी देताना इजिप्शियन राजाला वाईट न वाटता उलट आनंदच झाला.


ज्यूंचे हे महाप्रयाण त्यांच्या इतिहासात जरी अत्यंत महत्त्वाचे असले,तरी इजिप्शियनांच्या इतिहासात त्याला मुळीच महत्त्व नाही.जणू एक साधी क्षुद्र गोष्ट असे त्यांना वाटले.जुन्या करारात या महाप्रयाणाच्या यात्रेची भव्य,

भडक कथा रंगवलेली आहे.प्राचीन काळी प्रत्येक राष्ट्रांच्या इतिहासात सत्य व कल्पना यांचे मिश्रण केलेले असे.सत्यकथांत कल्पना मिसळलेली असे. ऐतिहासिक कादंबरी वा नाटक तयार केले जाई.


मूसाबरोबर जे ज्यू आले ते रांगडे होते.त्याच्यांत ऐक्य नव्हते.वृत्तीने ते भांडखोर होते.त्यांची नीट संघटना नव्हती.

परंतु मूसाच्या अलौकिक प्रतिभेने व बुद्धीने या लोकांची अभेद्य अशी एकजूट जन्माला आली.हे अभंग ऐक्य एकाएकी निर्माण झाले नाही.मूसाला त्यासाठी कितीतरी वर्षे प्रयत्न करावा लागला.या ज्यूंचे एक राष्ट्र बनविण्यापूर्वी मूसाने त्यांना नवीन स्मृती दिली; नवीन कायदे दिले.त्या ज्यू मध्ये एक नवीन प्राण त्याने फुंकिला.

मूसा जन्मजात पुढारी होता.या ज्यूंच्या साध्या मनावर परिणाम करण्यासाठी त्याने भव्यदिव्य विधी निर्माण केले.मानवी मनाला स्तंभित करणाऱ्या भव्य अशा नैसर्गिक स्थानी हे विधी करावयाचे,यासाठी त्याने तो सिनाई पर्वत पसंत केला.सिनाई पर्वताची ती काळीकभिन्न अशी,मेघांना फोडून वर जाणारी पाच शिखरे;पांढऱ्या वाळूचे धो ऽ करणारे लोंढे, सिनाई पर्वतावरील ते दगडधोंडे,ते कडे,ज्यांतून ईश्वराचे अट्टाहास्य जणू प्रतिध्वनित होई,ईश्वराचे आदेश जणू जेथून उद्घोषिले जात आहेत असे वाटे;अशी ही सिनाई पर्वताची जागा म्हणजे योग्य असे भव्य व्यासपीठ होते.या व्यासपीठावर बसून स्वर्ग व पृथ्वी एकत्र आणणे शक्य झाले असते..या सिनाई पर्वतावर बसून मूसाने आपला तो नवधर्म दिला.ते अर्धवट रानटी व अर्धवट उदात्त असे नीतिशास्त्र त्याने दिले.त्या नीतिशास्त्राने आजपर्यंत मानवांना मार्गही दाखविला आहे व पदच्युतही केले आहे. मूसाच्या या उपदेशात जरी प्रसंगविशेषी क्रौर्य दिसत असले,कोठे कोठे जरी बालिशता असली, तरी मानवी हृदयात मानवी विचार ओतण्याचा इतिहासकाळातील तो पहिला थोर प्रयत्न होता. त्याने तुझा डोळा फोडला तर तू त्याचा डोळा फोड,असे तो शिकवितो.परंतु त्या आरंभीच्या रानटी अवस्थेतून जो नुकताच बाहेर पडत आहे, त्याच्यापासून तुम्ही असे आदेश ऐकलेत तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे ते काय ? परंतु मूसाने गरिबांवर प्रेम करा व परकीयालाही सहानुभूती द्या,असेही सांगितले आहे.आजचा सुसंस्कृत समजला जाणारा विसाव्या शतकातील मनुष्य हा गरिबांना प्रेम देणे व परकीयांस सहानुभूती दाखविणे,एवढे तरी करतो का? मूसाचा उपदेश तीन हजार वर्षे झाली तरीही आपण अद्याप आपलासा केला नाही.मूसा जितका उंच चढला,तितके तीन हजार वर्षे झाली,तरी आपण चढलो नाही.मूसा आपल्यापुढे गेलेला आहे.आणि आपण अद्याप मागासलेले व रानटी आहोत.या मुसानेच मनुष्याचे बळी देऊ नये म्हणून शिकविले,हे आपण विसरता कामा नये.मूसाची ही उदार आज्ञा,त्याची ही प्रेमळ शिकवण अद्यापही आपण ऐकिली नाही. १९१४मध्ये लाखो आईबापांनी आपल्या मुलांचे युद्ध देवाला बळी दिले.


असे सांगतात,की ध्येयाला पोहोचण्यापूर्वीच मूसा मेला.

जो प्रदेश त्याला पुन्हा मिळावावयाचा होता,तिथे जाण्यापूर्वीच तो देवाघरी गेला.त्याने ज्या कामाचा आरंभ केला होता ते पुढे दुर्बळांच्या अंगावर पडले.त्यांना ते झेपेना,पार पाडता येईना.जगातील मोठ्यांतील मोठ्या क्रांतिकारकांच्या बाबतीत सदैव हीच गत झाली आहे.

मूसापासून तो लेनिनपर्यंत हाच दुर्दैवी अनुभव.परंतु मरण्यापूर्वी मूसाने स्वतःच्या दुबळ्या लोकांतील दुबळेपणा झडझडून पार फेकून दिला होता.वाळवंटातील स्वच्छ व जोरदार वारे आणून तो रोगटपणा त्याने नष्ट केला होता.त्याने जगायला नालायक असणाऱ्या जुनाट दुबळ्या दुर्बलांना खुशाल मरू दिले. त्यांच्याऐवजी नव्या दमाची,उत्साही अशी अग्रेसरांची पिढी त्याने उभी केली.

मृतप्राय लोकांतील निराश असा अवशिष्ट भाग त्याने वाळवंटात आणला आणि त्याच्याकडून संघटित असे नवराष्ट्र त्याने निर्मिले.हे राष्ट्र कधी मरणार नाही,मरायला कधीही तयार होणार नाही.


१७.०७.२४ या लेखातील शेवटचा दुसरा भाग..





१७/७/२४

बंडखोर राजपुत्र मुसा/The rebel prince Musa

प्राचीन काळातील बहुतेक राष्ट्रे आता नामशेष झाली आहेत,हे मागील आपण पाहिले.त्यांतील काही राष्ट्रे अद्याप जीव धरून कशीतरी राहिली आहेत.परंतु त्यांचा इतका अधःपात झाला आहे, की कित्येक शतकांत त्यांच्यामध्ये एकही महापुरुष जन्मला नाही.परंतु प्राचीन काळची तीन राष्ट्र अद्याप जगली आहेत;जगली आहेत एवढेच नव्हे,तर मानवी संस्कृती व सुधारणा यांवर प्रभावी परिणाम ती सारखी करीत आहेत; आजही करून राहिली आहेत.कोणती ही तीन राष्ट्रे ? चिनी लोक,हिंदू लोक व ज्यू लोक यांची राष्ट्रे.ही तीन राष्ट्र का बरे टिकली?आपण याचे कारण पाहू तर आश्चर्यकारक शोध लागेल.आपणास असे दिसून येईल की,हिंदू,चिनी व ज्यू या लोकांनी निराळ्याच प्रकारच्या वीरपुरुषाला वंदनीय ठरविले,वीरत्वाचा,

विभूतिमत्वाचा निराळाच आदर्श त्यांनी मानला.युद्धवीर दूर करून ज्ञानवीराला त्यांनी पूजिले.तलवार गाजवणाऱ्यापेक्षा नवीन हितकर विचार देणाऱ्या महापुरुषाला त्यांनी श्रेष्ठ मानले.हे लोकही त्यांच्या आरंभीच्या इतिहासकाळी कमी युद्धोत्सुक होते असे नाही.त्या काळात जगातील अन्नाचा साठा फार कमी असे.स्वतःचा भाग मिळावा म्हणून सर्वांना निकराने लढावे लागे. परंतु लवकरच या तीन लोकांत असे पुरुष जन्माला आले,की जे शांतीचे स्वप्न रंगवू लागले.आसपास विजिगीषू अशा महत्त्वाकांक्षी युद्धोत्सुक राष्ट्रांचा गराडा असता या लोकांत असे महापुरुष जन्मू लागले,की जे शांतिधर्माविषयी बोलत; शांतीचा संदेश देत; शांतीचा स्वप्ने बघत.चीनमध्ये कन्फ्यूत्सी (कन्फ्यूशियस) व लाओत्सी झाले.भारतात बुध्द व महावीर जन्मले.ज्यू लोकांमध्ये ॲमास,इसैय्या वगैरे कितीतरी शांतिदूत झाले.या पुरुषांनी आपापल्या देशवासियांच्या हृदयात नवीन उदार आशा-आकांक्षा ओतल्या.त्यांनी तिथे शांतीची इच्छा व प्रेरणा रुजविली.स्वतःजगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या;नांदा व नांदवा,हा त्यांचा संदेश होता.शांतीचे प्रेषित ज्या या तीन राष्ट्रांनी दिले,तीच राष्ट्र अद्याप जिवंत आहेत;केवळ मेल्याप्रमाणे जगत नसून त्यांच्यात आध्यात्मिक सामर्थ्य व तेज अद्याप तळपत आहे.त्यांचा तो वैचारिक व अंतरिक जोम अद्याप आहे.

युद्धप्रिय राष्ट्रांनी स्वतःच स्वतःला खच्ची करून जणू घेतले; स्वतःची शक्ती नष्ट करून ती मातीत गाडली. हिंदू,चिनी व ज्यू लोकांनी स्वतःची शक्ती वाया जाऊ दिली नाही.म्हणून अद्याप ही राष्ट्र नीट उभी आहेत.नाना विरोध व आपत्ती आल्या. नाना कठीण प्रसंगांतून त्यांना जावे लागले, प्रचंड लाटा आल्या व ही राष्ट्रे गिळंकृत केली जाणार,असे वाटले.परंतु नाही,ही राष्ट्र टिकली एवढेच नव्हे;तर आजही सन्यत्सेन,वर्गसाँ व आईन्साटाईन,गांधी व टागोर अशी महान माणसे या राष्ट्रांनी दिली आहेत.


राष्ट्राच्या जीवन-मरणाचा एक निश्चित नियम आहे,असे म्हणावेसे वाटते..हा नियम थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल;ज्या राष्ट्राचे जीवन दीर्घतम असते ती पृथ्वीवरची अत्यंत शांतीप्रधान राष्ट्रे असतात.म्हणजेच दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल,की जी राष्ट्रे रणवीरांना सोडून विचारवीरांना व ज्ञानदेवांना भजतात,ती राष्ट्र तरतात.


जगातील महान प्रेषितांपैकी पहिल्याने होऊन गेलेल्यांत मूसा (मोझेस) हा आहे.मूठभर अर्धवट रानटी गुलांमांना त्याने जवळ घेतले;व त्यांना धर्म दिला.आणि त्यांची अशी एक प्राणमय संघटना बनविला,

की तिच्यामुळे आज तीन हजार वर्षे लोटली,तरीही ज्यू समाज टिकला आहे;व आणखी तीन हजार वर्षे लोटली तरी टिकेल,असे म्हणायला हरकत नाही.


मूसा झालाच नाही,असे कोणीकोणी म्हणतात. होमर झाला नाही,ख्रिस्त झाला नाही, शेक्सपीअर झाला नाही.असेही म्हणणारे काही आहेत.जगातील महापुरुषांचा अर्थ ज्यांना समजत नाही असे क्षुद्र लोक असे महापुरुष झालेच नाहीत असे म्हणून मोकळे होतात. म्हणजे मग त्या महापुरुषांच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याची वा समजून देण्याची गरजच उरत नाही.ईश्वराने जर खरोखर मूसाला जन्माला घातले नसेल तर त्या काल्पनिक मूसाला निर्मून जुन्या बायबलाच्या निर्मात्यांनी ईश्वराला त्याची चूक पटवून दिली हे बरे केले.त्या प्राचीन ज्यूंना एकत्र आणू शकणाऱ्या महापुरुषाची नितांत आवश्यकता होती.त्यांचे राष्ट्र बनवणारा राष्ट्रपुरुष त्यांना हवा होता.आणि हे महान कार्य ज्याने यशस्वी रीतीने पार पाडले,तो हा मूसा होय.हा मूसा खरोखरच,हाडामांसाचा असा इजिप्तमध्ये जन्मलेला असो,वा लोकांच्या हृदयात विराजमान असणारी ही एक काल्पनिक विभूती असो; ज्यूंच्या हृदयातील हा मूसा त्यांना निराशेच्या रानावनातून पुन्हापुन्हा नवीन देवांकडे नेतो. नवीन नवीन आशा त्यांना देतो;नवीननवीन कर्मे त्यांना करायला लावतो.


मूसा ही काल्पनिक व्यक्ती असली,तरी ज्यूंचा भवितव्याला तिने प्रत्यक्ष झालेल्या एखाद्या मूसा व्यक्तीपेक्षा कमी वळण दिले आहे असे नाही. काल्पनिक वा सत्यमय अशा या मूसाने ज्यूंचे भवितव्य बनविले आहे.ज्यूंच्या भवितव्यावर त्याने अपरंपार परिणाम केले आहेत, इतिहासातील खरीखुरी एक व्यक्ती या दृष्टीने त्याच्याकडे आपण पाहू या.


जुन्या करारातील कथेप्रमाणे,ज्यू आईबापांच्या पोटी मूसा जन्मला;परंतु एका इजिप्शियन राजकन्येने स्वतःचा मुलगा म्हणून त्याला वाढविले.राणी नील नदीवर स्नानास गेली होती. त्या वेळेस तिला हा बाळ पाण्यावर तरंगताना आढळला.तिने तो राजवाड्यात आणला.


ही कथा जरा काल्पनिक वाटते.ज्याची जन्मकथा अशा असंभाव्य गोष्टीत गुरफटलेली आहे.असा मूसा हा इतिहासातील पहिलाच मनुष्य नव्हे, सुमेरियन लोकांचा राजा पहिला सारगान हासुद्धा नदीतील एका नावेत आढळला,अशी गोष्ट आहे.राजघराण्यातील अविवाहित स्त्रिया आपल्या मुलांची जन्मकथा अशा चमत्कारांनीच सांगत असत.जणू ती पद्धत पडून गेली होती..


गोष्ट बहुधा अशी असावी,की ज्यू पुरुषापासून इजिप्शियन राजकन्येला हा बाळ झाला असावा. मूसाचा हा असा आकस्मिक जन्म झाला. इजिप्शियन व ज्यू दोघांनाही या बाळाची जन्मकथा लपविण्याची इच्छा असणे स्वाभाविक होते.म्हणून जुन्या करारात अशी ही कल्पनारंजित कथा सांगितली गेली.



परंतु हा सारा तर्क आहे.काही असो.मूसाचे आईबाप कोण होते,हा प्रश्न काही महत्त्वाचा नाही.त्याच्या अंगात ज्यू रक्त होते ही गोष्टी खरी, इजिप्शियन राजपुत्राप्रमाणे तो वाढविला गेला हेही खरे,या दोन बाबींत एक मेळ आहे.

त्याचे मूसा हे नावही इजिप्शियन आहे.मूसा या शब्दाचा अर्थ अमक्या अमक्याचा मुलगा असा आहे.मूसाचा स्वभावही अगदी ज्यू होता.


मूसाच्या बालपणीची फारशी माहिती नाही. धर्मोपदेशकाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते.लहान वयातच थोर राजा अखनटन याच्या शिकवणीशी त्याचा परिचय झाला.अखनटन हा इजिप्तचा शहाणा राजा एकेश्वरीमताचा त्याने शोध लावला होता.लोक त्याला वेडा मानीत.मूसा वयाने मोठा झाला.हेलिमोपॉलिस (म्हणजे सूर्याचे शहर) येथील धर्ममंदिरात शिक्षणार्थ तो जाई.तो दाढीमिशा काढी.चेंडूचे खेळ खेळे. विद्यार्थ्यांच्या मंडळांत भाग घेई.तो लवकरच एक मातब्बर इजिप्शियन सरदार झाला असता. मेल्यावर सुंदरशा मातीत (शवपेटिकेत) त्याचा देह मसाल्यात.घालून ठेवला गेला असता.परंतु मुसा बंडखोर होता.तो ज्यू होता.


खालच्या वर्गाच्या लोकांत तो जाऊ येऊ लागला. त्यांच्या भिकार वस्तीत बसू उठू लागला. शहरातील इमारतींना लागणाऱ्या विटा भाजणाऱ्या मजुरांजवळ खरोखरच तो बोलत बसे.या श्रमजीवी लोकांजवळ बोलणे त्याला आवडू लागले.बरे आहेत हे लोक,असे त्याला वाटले.

इजिप्शियन लोकांचा जसा इतिहास होता, तसा यांचाही इतिहास होता.त्यांच्यातही मोठमोठे लोक होऊन गेले होते.त्यांच्या इतिहासातही सुवर्णक्षण येऊन गेले होते.हे लोक मूसाला म्हणाले,थोर अब्राहम आमचा पूर्वज,त्याने ऊर हे खाल्डियन शहर सोडले.स्वातंत्र्याचा शोध करीत तो निघाला.त्याने समुद्र व वाळवंट यांच्यामध्ये एका प्रदेशात हे नवीन स्वातंत्र्य स्थापिले.काही काळ अब्राहम व त्याचे अनुयायी तिथे राहिले. गुराढोरांची त्यांची खिल्लारे वाढली.शेळ्यामेंढ्या वाढल्या.ते सुखी व संपन्न झाले.परंतु ज्यू म्हणजे अज्ञात व अस्थिर लोकांचे राष्ट्र.स्वस्थ बसणे त्यांना माहीत नाही.एका देशातून दुसऱ्या देशात असे करीत सर्व पृथ्वीवर भटकणे,हेच जणू त्यांच्या नशिबी आणि आता आम्ही या इजिप्शियन राजाच्या राज्यात आलो आहोत. आम्ही आज दास झालो आहोत.तरीही थोर पूर्वजांचा आम्हाला अभिमान वाटतो.


ज्यू लोक त्यांचा इतिहास याचे मूसाला आकर्षण वाटले.

तो या ज्यू श्रमजीवींना भेटायला वरचेवर जाऊ लागला.

मूसाची ही विचित्र वर्तणूक पाहून त्याचे पांढरपेशे प्रतिष्ठित मित्र त्याची गंमत करीत.परंतु पुढेपुढे त्याच्या या वर्तनाचा ते धिक्कार करू लागले.त्यांना ते बिलकूल पसंत नव्हते.

त्या असंस्कृत व परकी सेमिटिक भुक्कडांकडे जात जाऊ नकोस,असे राजाने मूसाला बजावले.मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन


परंतु मूसाने या धमक्यांकडे व सूचनांकडे लक्ष दिले नाही.एकदा हे ज्यू गुलाम काम करीत असता मूसा तिथे गेला होता.एक इजिप्शियन सरदार एका गुलामाला निर्दयपणे फटके मारीत होता.मूसा संतापला.त्याने इजिप्शियानावर प्रहार केला व त्याला तिथल्या तिथे ठार केले.एका ज्यू गुलामाची बाजू घेऊन इजिप्शियन ठार करणे म्हणजे अक्षम्य अपराध होता.मूसाला प्राणरक्षणार्थ वाळवंटात पळावे लागले.


उर्वरित शिल्लक भाग…पुढील भागात


तळटीप - दिनांक - १५.०७.२४ या दिवशी प्रसारित झालेला प्लेटोचा संदर्भ / A reference to Plato हा लेख पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी,साने गुरुजी,इंद्रनील प्रकाशन कोल्हापूर या पुस्तकातील आहे.