* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: रक्ताभिसरण / Circulation

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२५/७/२४

रक्ताभिसरण / Circulation


माणसाच्या शरीरात कोणते अवयव कुठे आहेत आणि त्यांची रचना कशी आहे,हे ॲनॅटॉमीमध्ये समजल्यानंतर हे अवयव नेमके काय आणि कसं काम करतात याचं ज्ञान फिजिओलॉजी म्हणजेच शरीरक्रिया या विज्ञान शाखेमध्ये येतं.पूर्वी ग्रीकांनी यामध्ये काम करायचा प्रयत्न केला होता.पण त्यांनी काढलेले बरेचसे निष्कर्ष हे चुकीचे होते! त्यांनी हृदयाचं काम काय असतं हे पूर्णपणे चुकीचं सांगितलं होतं.हृदय हे रक्त उपसतं. पण हृदयात रक्त कुठून येतं आणि ते कुठे जातं हे ग्रीकांना समजलं नव्हतं.

शिवाय,ग्रीकांना व्हेन्स म्हणजे शिरा याच फक्त रक्तवाहिन्या असतात असं वाटत होतं.आणि आर्टरीजमध्ये (धमन्यांमध्ये) चक्क हवा भरलेली असते असं त्यांना वाटायचं.आर्टरी हा ग्रीक शब्दच मुळी हवा वाहून नेणारी नळी या अर्थाचा आहे!


मध्यंतरी अलेक्झांड्रियातल्या हिरोफिलसनं ख्रिस्तपूर्व काही काळापूर्वी आर्टरीज (धमन्या) आणि व्हेन्स (शिरा) या दोन्हींमधून रक्त वाहत असतं आणि आर्टरीज आणि व्हेन्स या दोन्हीही हृदयाला जोडलेल्या असतात,हे सांगितलं होतं.पण हृदयापासून लांब या रक्तवाहिन्या पुन्हा कुठं जोडल्या जातात हे कळायला काही मार्ग नव्हता. कारण या रक्तवाहिन्यांना त्या जसजशा हृदयापासून लांब जातील तसतसे अनेक लहान लहान फाटे फुटत जात होते आणि नंतर तर हे फाटे डोळ्यांना दिसणार नाहीत इतके लहान झाले होते आणि हा प्रश्न कितीतरी वर्षं अनुत्तरित राहिला होता.


यावर गेलननं मात्र विचार मांडला होता. हृदयाच्या स्नायूंमध्ये छिद्रं असतात आणि त्यातून रक्त पुन्हा आर्टरीज आणि व्हेन्स यांच्यात ये-जा करतं असं त्यानं सांगितलं होतं.अर्थात,ही छिद्रं कुणालाच दिसली नाहीत,पण गेलननं सांगितलं आहे म्हणून ती आहेत असं मानणाऱ्या अनेक पिढ्या आणि अनेक शतकं मध्ये गेली होती.


त्यातूनच इटालियन अनॅटॉमिस्ट हिरोनिमस फॅब्रिकस (Hieronymus Fabricius) (१५३७ ते १६१९) यानं 'दे फॉर्मेटे फिटू' या नावाचा गर्भ कसा वाढ जातो याबद्दलही एक छान पुस्तक लिहिलं.यामुळेच त्याला 'अँब्रियॉलॉजीचा जनक' म्हणतात. त्यानंच आपल्या घशातून आवाज येण्यासाठी लॅरिंग्ज कारणीभूत असतात हे सांगितलं आणि प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार आपल्या डोळ्यांतली बाहुली (प्यूपिल) लहानमोठं होतं हेही सांगितलं.


फॅब्रिकसनं मोठ्या व्हेन्समध्ये (शिरांमध्ये) रक्त एकाच दिशेनं जाण्यासाठी (दूरच्या अवयवांकडून हृदयाकडे) व्हॉल्व्हज असतात असं दाखवून दिलं होतं.या व्हॉल्व्हजमुळेच रक्त लांबच्या अवयवांकडून गुरुत्वाकर्षणानं पुन्हा मागे न जाता हृदयाकडे जातं हे त्यानं दाखवून दिलं होतं. आपल्या 'दे व्हेनारम ऑस्टिओलिस' (De Venarum Ostiolis) या पुस्तकात त्यानं हे लिहिलंही होतं.पण हे तर गेलनच्या विचारांना छेद देणारं होतं. कारण गेलनच्या म्हणण्याप्रमाणे रक्त व्हेन्समधून दोन्ही दिशांनी ये-जा करत असतं.हे चुकीचं आहे हे जाणवलेलं असूनही फॅब्रिकसनं गेलनविरुद्ध मत मांडायचं धाडस केलं नाही.त्यानं फक्त व्हॉल्व्हज हे रक्त मागे जायची गती कमी करतात असं सांगितलं !


हे सांगण्याची छाती मात्र त्याच्या पुढच्या पिढीतल्या त्याच्याच विद्यार्थ्याला झाली. तसंही पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा भीड कमीच बाळगते म्हणा! इथेही तेच झालं


फॅब्रिकसच्या या शिष्यानं व्हेन्समधून रक्त एकाच दिशेनं जातं हे आपल्याच गुरूनं शिकवलेलं तत्त्व तर सांगितलंच,पण ते पुढे नेऊन रक्ताभिसरणाचं कोडं सोडवलं तो महारथी होता इंग्लिश वैज्ञानिक विल्यम हार्वे! त्याच्या या शोधामुळे खरं तर बायॉलॉजीचं विश्वच ढवळून निघालं होतं.


तो काळच फार भारावलेला होता.एकीकडे गेलनचं म्हणणं खोडून काढणारा फॅब्रिकस आणि रक्ताभिसरणाचं गूढ शोधणारा हार्वे हे गुरू-शिष्य आणि दुसरीकडे कोपर्निकसच्याही पुढे मजल मारलेला गॅलिलिओ.या मंडळींनी विज्ञानाचा चेहराच बदलायचा विडा उचलला होता जणू!


माणसाच्या शरीरात रक्त कुठे आणि कसं तयार होतं,त्यानंतर त्याच्यावर काय प्रक्रिया होतात,मग शरीरातून रक्ताचा प्रवास कसा होतो.या सगळ्या गोष्टींविषयी सगळ्यांना पूर्वीपासून कुतूहल वाटत असलं तरी सोळाव्या शतकापर्यंत त्यासंबंधी भरीव असं काम कुणी केलं नव्हतं.अंदाजानं या संदर्भातल्या अनेक गोष्टींविषयीचे निष्कर्ष काढले जायचे.विल्यम हार्वे (१५७८ ते १६५७) या ब्रिटिश डॉक्टरनं यासंबंधीच्या सगळ्या गैरसमजांवर पडदा टाकत माणसाच्या हृदयाचं एखाद्या पंपासारखं रक्त उपसायचं काम कसं चालतं याविषयी प्रथमच सखोल विवेचन केलं.किंबहुना रक्त शरीरातून फिरवायचं काम हृदय करतं हे त्यानं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यावर कोणीही विश्वास ठेवेना.माणूस आणि इतर सस्तन प्राण्यांच्या बाबतीत पुरुषाच्या वीर्यातले शुक्राणू आणि स्त्रीच्या गर्भाशयातलं बीजांड यांच्या संयोगातून नवा जीव निर्माण होतो अशी संकल्पना मांडणाराही तो पहिलाच संशोधक होता.


इंग्लंडमधल्या केंट परगण्यातल्या फॉकस्टोन या गावात एका प्रतिष्ठित घराण्यात हार्वे जन्मला.त्याचे वडील त्या गावाचे महापौर होते.त्यांना एकूण ९ मुलं होती.विल्यम हा त्यांच्यापैकी सगळ्यात मोठा होता. केंटबरीच्या किंग्ज स्कूलमध्ये त्याचं प्राथमिक शिक्षण झालं.सुरुवातीला हार्वेनं लॅटिन भाषा शिकण्यावर लक्ष केंद्रित केलं.वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.

१५९७ साली हार्वेनं केंब्रिज विद्यापीठाच्या आधिपत्याखाली असलेल्या गॉनव्हील अँड कायस कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली.हे कॉलेज सुरू करणाऱ्यांपैकी एक असलेला जॉन कायस तिथल्या विद्यार्थ्यांना अनुभव मिळवण्यासाठी परदेशी जाऊन काम करायचा सल्ला नेहमी देई.तो वंद्य मानून हार्वे इटलीतल्या पडुआ विद्यापीठात गेला.तिथे त्याला शिकवायला हिरोनायमस फॅब्रिशियस आणि ॲरिस्टॉटलच्या विचारांना पुढे नेणारा सेसार मोंडिनी हे होते. १६०२ साली हार्वेनं आपलं शिक्षण पूर्ण केलं.इंग्लंडमध्ये परतल्यावर त्यानं आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली.लंडनमधल्या लॅन्सेलट ब्राऊन नावाच्या एका प्रख्यात डॉक्टरच्या एलिझाबेथ नावाच्या मुलीशी त्यानं लग्न केलं.त्यांना मूल मात्र झालं नाही.


सजीव- अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन


हार्वेनं आता लंडनमध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता.१६०९ ते १६४३ या काळात त्यानं सेंट बार्थोलोमेव्ज नावाच्या इस्पितळात काम केलं. तिथे त्याला वर्षाला फक्त ३३ पौंड्स इतका क्षुल्लक पगार मिळत असे.रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचाही तो सभासद होता.हार्वेच्या शिकवण्याची काही ठळक वैशिष्ट्यं होती.त्याचा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यावर भर असे.तो कधीही दुसऱ्या कुणावर टीका करायच्या भानगडीत पडत नसे.विद्यार्थ्यांना काहीतरी अर्धवट माहिती देणं,काहीतरी चुकीचं सांगणं,त्यांचा गोंधळ उडेल अशी भाषा वापरणं अशा गोष्टी तो टाळायचा.


शिल्लक राहिलेला भाग पुढील २७.०७.२४ या लेखामध्ये


एक वेगळी वाचणीय नोंद - १६७२ च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेसरीजवळच्या एका छोट्याशा वाडीवर एक स्त्री प्रवाशांच्या राहण्याजेवण्याची सोय करत होती असा स्वतंत्र व्यवसाय करणारी त्या काळातली ती स्त्री 


दिवसभराच्या प्रवासानं आम्ही खूप थकलो होतो.ऊनही जास्तच होतं.दुपारी तीनच्या सुमारास आम्ही 'नेसरी'( कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील गाव.गडहिंग्लजच्या दक्षिणेस दहा मैलांवर.घटप्रभा नदीच्या उत्तरेस एक मैलांवर.) गावाजवळ होतो.दिवसभर खूपच दमछाक झाल्यानं तिथंच थांबलो.शहर अगदी मोकळ्या अशा ऐसपैस जागेवर वसलं होतं.संपूर्ण शहराला दगडी तटबंदी होती.इथं घोडदळाच्या काही तुकड्याही तैनात केलेल्या दिसल्या.बादशहाच्या मृत्यूच्या बातमीमुळं काही दगाफटका होऊ नये,कटकारस्थानं होऊ नये किंवा बंड होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली होती.मला या शहरात चार रुपयांची जकात मागितल्यानं थोडी वादावादीही झाली.अखेर ती जकात भरून आम्ही पुढचा प्रवास सुरू ठेवला अगदी सूर्य मावळेपर्यंत.रात्री आम्ही एका मोठ्या गावात पोहोचलो.या गावाचं नाव होतं 'जबरी.(नेसरी पासून आठ किलोमीटर वर असणारे ही जांभूळवाडी )


याही गावाला दगडी तटबंदी होती.रात्रीचं जेवण आणि मुक्कामासाठी माझे सेवक मला इथल्या सभ्य स्त्रीच्या घरी घेऊन गेले.तिनं माझं अगदी आपुलकीनं स्वागत केलं आणि तिच्या घरीच मुक्काम करण्याची विनंती केली.

तिला तीन मुलीही होत्या.अत्यंत देखण्या आणि नम्र.त्या मुलींनी माझी सगळी चौकशी केली.मला काय हवं नको ते पाहिलं.एका मुलीनं जेवणासाठी कोंबडी,तांदूळ,अंडी,

तेल,तूप असं सगळं सामान आणलं.या साहित्याला माझ्या नोकरांना तिनं स्पर्शही करू दिला नाही.तर दुसरीनं स्वयंपाकासाठी लाकूड,पाणी,भांडी आणि निखारे आणले.या दोघींची ही गडबड सुरू असताना तिसरी माझी झोपण्याची व्यवस्था करत होती.तिनं आमच्यासाठी गाद्या घातल्या. उशी आणि पांघरुणाची व्यवस्था केली.तीही अगदी नीटनेटकी.या छोट्याशा खेड्यात राहण्या-जेवणाची इतकी स्वच्छ आणि आटोपशीर व्यवस्था पाहून मी अचंबितच झालो होतो.अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा एखाद्या मोठ्या शहरातसुद्धा अशा सोयीसुविधा मला मिळाल्या नसत्या.विशेष म्हणजे इथं राहणारे लोक फक्त जनावरांचे कळप सांभाळतात. (बहुधा कॅरेचा मुक्काम धनगरवस्तीवर पडला असावा.)


 भारत आणि पूर्वेकडील प्रदेशातील प्रवास खंड १ (सन १६७२ ते १६७४ ) बार्थ लेमी ॲबेकॅरेअनुवाद-संपादन सदानंद कदम,दीपा माने - बोरकर,प्रकाशक-अक्षर दालन,कोल्हापूर