* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बंडखोर राजपुत्र मुसा/The rebel prince Musa

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१७/७/२४

बंडखोर राजपुत्र मुसा/The rebel prince Musa

प्राचीन काळातील बहुतेक राष्ट्रे आता नामशेष झाली आहेत,हे मागील आपण पाहिले.त्यांतील काही राष्ट्रे अद्याप जीव धरून कशीतरी राहिली आहेत.परंतु त्यांचा इतका अधःपात झाला आहे, की कित्येक शतकांत त्यांच्यामध्ये एकही महापुरुष जन्मला नाही.परंतु प्राचीन काळची तीन राष्ट्र अद्याप जगली आहेत;जगली आहेत एवढेच नव्हे,तर मानवी संस्कृती व सुधारणा यांवर प्रभावी परिणाम ती सारखी करीत आहेत; आजही करून राहिली आहेत.कोणती ही तीन राष्ट्रे ? चिनी लोक,हिंदू लोक व ज्यू लोक यांची राष्ट्रे.ही तीन राष्ट्र का बरे टिकली?आपण याचे कारण पाहू तर आश्चर्यकारक शोध लागेल.आपणास असे दिसून येईल की,हिंदू,चिनी व ज्यू या लोकांनी निराळ्याच प्रकारच्या वीरपुरुषाला वंदनीय ठरविले,वीरत्वाचा,

विभूतिमत्वाचा निराळाच आदर्श त्यांनी मानला.युद्धवीर दूर करून ज्ञानवीराला त्यांनी पूजिले.तलवार गाजवणाऱ्यापेक्षा नवीन हितकर विचार देणाऱ्या महापुरुषाला त्यांनी श्रेष्ठ मानले.हे लोकही त्यांच्या आरंभीच्या इतिहासकाळी कमी युद्धोत्सुक होते असे नाही.त्या काळात जगातील अन्नाचा साठा फार कमी असे.स्वतःचा भाग मिळावा म्हणून सर्वांना निकराने लढावे लागे. परंतु लवकरच या तीन लोकांत असे पुरुष जन्माला आले,की जे शांतीचे स्वप्न रंगवू लागले.आसपास विजिगीषू अशा महत्त्वाकांक्षी युद्धोत्सुक राष्ट्रांचा गराडा असता या लोकांत असे महापुरुष जन्मू लागले,की जे शांतिधर्माविषयी बोलत; शांतीचा संदेश देत; शांतीचा स्वप्ने बघत.चीनमध्ये कन्फ्यूत्सी (कन्फ्यूशियस) व लाओत्सी झाले.भारतात बुध्द व महावीर जन्मले.ज्यू लोकांमध्ये ॲमास,इसैय्या वगैरे कितीतरी शांतिदूत झाले.या पुरुषांनी आपापल्या देशवासियांच्या हृदयात नवीन उदार आशा-आकांक्षा ओतल्या.त्यांनी तिथे शांतीची इच्छा व प्रेरणा रुजविली.स्वतःजगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या;नांदा व नांदवा,हा त्यांचा संदेश होता.शांतीचे प्रेषित ज्या या तीन राष्ट्रांनी दिले,तीच राष्ट्र अद्याप जिवंत आहेत;केवळ मेल्याप्रमाणे जगत नसून त्यांच्यात आध्यात्मिक सामर्थ्य व तेज अद्याप तळपत आहे.त्यांचा तो वैचारिक व अंतरिक जोम अद्याप आहे.

युद्धप्रिय राष्ट्रांनी स्वतःच स्वतःला खच्ची करून जणू घेतले; स्वतःची शक्ती नष्ट करून ती मातीत गाडली. हिंदू,चिनी व ज्यू लोकांनी स्वतःची शक्ती वाया जाऊ दिली नाही.म्हणून अद्याप ही राष्ट्र नीट उभी आहेत.नाना विरोध व आपत्ती आल्या. नाना कठीण प्रसंगांतून त्यांना जावे लागले, प्रचंड लाटा आल्या व ही राष्ट्रे गिळंकृत केली जाणार,असे वाटले.परंतु नाही,ही राष्ट्र टिकली एवढेच नव्हे;तर आजही सन्यत्सेन,वर्गसाँ व आईन्साटाईन,गांधी व टागोर अशी महान माणसे या राष्ट्रांनी दिली आहेत.


राष्ट्राच्या जीवन-मरणाचा एक निश्चित नियम आहे,असे म्हणावेसे वाटते..हा नियम थोडक्यात पुढीलप्रमाणे सांगता येईल;ज्या राष्ट्राचे जीवन दीर्घतम असते ती पृथ्वीवरची अत्यंत शांतीप्रधान राष्ट्रे असतात.म्हणजेच दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल,की जी राष्ट्रे रणवीरांना सोडून विचारवीरांना व ज्ञानदेवांना भजतात,ती राष्ट्र तरतात.


जगातील महान प्रेषितांपैकी पहिल्याने होऊन गेलेल्यांत मूसा (मोझेस) हा आहे.मूठभर अर्धवट रानटी गुलांमांना त्याने जवळ घेतले;व त्यांना धर्म दिला.आणि त्यांची अशी एक प्राणमय संघटना बनविला,

की तिच्यामुळे आज तीन हजार वर्षे लोटली,तरीही ज्यू समाज टिकला आहे;व आणखी तीन हजार वर्षे लोटली तरी टिकेल,असे म्हणायला हरकत नाही.


मूसा झालाच नाही,असे कोणीकोणी म्हणतात. होमर झाला नाही,ख्रिस्त झाला नाही, शेक्सपीअर झाला नाही.असेही म्हणणारे काही आहेत.जगातील महापुरुषांचा अर्थ ज्यांना समजत नाही असे क्षुद्र लोक असे महापुरुष झालेच नाहीत असे म्हणून मोकळे होतात. म्हणजे मग त्या महापुरुषांच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याची वा समजून देण्याची गरजच उरत नाही.ईश्वराने जर खरोखर मूसाला जन्माला घातले नसेल तर त्या काल्पनिक मूसाला निर्मून जुन्या बायबलाच्या निर्मात्यांनी ईश्वराला त्याची चूक पटवून दिली हे बरे केले.त्या प्राचीन ज्यूंना एकत्र आणू शकणाऱ्या महापुरुषाची नितांत आवश्यकता होती.त्यांचे राष्ट्र बनवणारा राष्ट्रपुरुष त्यांना हवा होता.आणि हे महान कार्य ज्याने यशस्वी रीतीने पार पाडले,तो हा मूसा होय.हा मूसा खरोखरच,हाडामांसाचा असा इजिप्तमध्ये जन्मलेला असो,वा लोकांच्या हृदयात विराजमान असणारी ही एक काल्पनिक विभूती असो; ज्यूंच्या हृदयातील हा मूसा त्यांना निराशेच्या रानावनातून पुन्हापुन्हा नवीन देवांकडे नेतो. नवीन नवीन आशा त्यांना देतो;नवीननवीन कर्मे त्यांना करायला लावतो.


मूसा ही काल्पनिक व्यक्ती असली,तरी ज्यूंचा भवितव्याला तिने प्रत्यक्ष झालेल्या एखाद्या मूसा व्यक्तीपेक्षा कमी वळण दिले आहे असे नाही. काल्पनिक वा सत्यमय अशा या मूसाने ज्यूंचे भवितव्य बनविले आहे.ज्यूंच्या भवितव्यावर त्याने अपरंपार परिणाम केले आहेत, इतिहासातील खरीखुरी एक व्यक्ती या दृष्टीने त्याच्याकडे आपण पाहू या.


जुन्या करारातील कथेप्रमाणे,ज्यू आईबापांच्या पोटी मूसा जन्मला;परंतु एका इजिप्शियन राजकन्येने स्वतःचा मुलगा म्हणून त्याला वाढविले.राणी नील नदीवर स्नानास गेली होती. त्या वेळेस तिला हा बाळ पाण्यावर तरंगताना आढळला.तिने तो राजवाड्यात आणला.


ही कथा जरा काल्पनिक वाटते.ज्याची जन्मकथा अशा असंभाव्य गोष्टीत गुरफटलेली आहे.असा मूसा हा इतिहासातील पहिलाच मनुष्य नव्हे, सुमेरियन लोकांचा राजा पहिला सारगान हासुद्धा नदीतील एका नावेत आढळला,अशी गोष्ट आहे.राजघराण्यातील अविवाहित स्त्रिया आपल्या मुलांची जन्मकथा अशा चमत्कारांनीच सांगत असत.जणू ती पद्धत पडून गेली होती..


गोष्ट बहुधा अशी असावी,की ज्यू पुरुषापासून इजिप्शियन राजकन्येला हा बाळ झाला असावा. मूसाचा हा असा आकस्मिक जन्म झाला. इजिप्शियन व ज्यू दोघांनाही या बाळाची जन्मकथा लपविण्याची इच्छा असणे स्वाभाविक होते.म्हणून जुन्या करारात अशी ही कल्पनारंजित कथा सांगितली गेली.



परंतु हा सारा तर्क आहे.काही असो.मूसाचे आईबाप कोण होते,हा प्रश्न काही महत्त्वाचा नाही.त्याच्या अंगात ज्यू रक्त होते ही गोष्टी खरी, इजिप्शियन राजपुत्राप्रमाणे तो वाढविला गेला हेही खरे,या दोन बाबींत एक मेळ आहे.

त्याचे मूसा हे नावही इजिप्शियन आहे.मूसा या शब्दाचा अर्थ अमक्या अमक्याचा मुलगा असा आहे.मूसाचा स्वभावही अगदी ज्यू होता.


मूसाच्या बालपणीची फारशी माहिती नाही. धर्मोपदेशकाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते.लहान वयातच थोर राजा अखनटन याच्या शिकवणीशी त्याचा परिचय झाला.अखनटन हा इजिप्तचा शहाणा राजा एकेश्वरीमताचा त्याने शोध लावला होता.लोक त्याला वेडा मानीत.मूसा वयाने मोठा झाला.हेलिमोपॉलिस (म्हणजे सूर्याचे शहर) येथील धर्ममंदिरात शिक्षणार्थ तो जाई.तो दाढीमिशा काढी.चेंडूचे खेळ खेळे. विद्यार्थ्यांच्या मंडळांत भाग घेई.तो लवकरच एक मातब्बर इजिप्शियन सरदार झाला असता. मेल्यावर सुंदरशा मातीत (शवपेटिकेत) त्याचा देह मसाल्यात.घालून ठेवला गेला असता.परंतु मुसा बंडखोर होता.तो ज्यू होता.


खालच्या वर्गाच्या लोकांत तो जाऊ येऊ लागला. त्यांच्या भिकार वस्तीत बसू उठू लागला. शहरातील इमारतींना लागणाऱ्या विटा भाजणाऱ्या मजुरांजवळ खरोखरच तो बोलत बसे.या श्रमजीवी लोकांजवळ बोलणे त्याला आवडू लागले.बरे आहेत हे लोक,असे त्याला वाटले.

इजिप्शियन लोकांचा जसा इतिहास होता, तसा यांचाही इतिहास होता.त्यांच्यातही मोठमोठे लोक होऊन गेले होते.त्यांच्या इतिहासातही सुवर्णक्षण येऊन गेले होते.हे लोक मूसाला म्हणाले,थोर अब्राहम आमचा पूर्वज,त्याने ऊर हे खाल्डियन शहर सोडले.स्वातंत्र्याचा शोध करीत तो निघाला.त्याने समुद्र व वाळवंट यांच्यामध्ये एका प्रदेशात हे नवीन स्वातंत्र्य स्थापिले.काही काळ अब्राहम व त्याचे अनुयायी तिथे राहिले. गुराढोरांची त्यांची खिल्लारे वाढली.शेळ्यामेंढ्या वाढल्या.ते सुखी व संपन्न झाले.परंतु ज्यू म्हणजे अज्ञात व अस्थिर लोकांचे राष्ट्र.स्वस्थ बसणे त्यांना माहीत नाही.एका देशातून दुसऱ्या देशात असे करीत सर्व पृथ्वीवर भटकणे,हेच जणू त्यांच्या नशिबी आणि आता आम्ही या इजिप्शियन राजाच्या राज्यात आलो आहोत. आम्ही आज दास झालो आहोत.तरीही थोर पूर्वजांचा आम्हाला अभिमान वाटतो.


ज्यू लोक त्यांचा इतिहास याचे मूसाला आकर्षण वाटले.

तो या ज्यू श्रमजीवींना भेटायला वरचेवर जाऊ लागला.

मूसाची ही विचित्र वर्तणूक पाहून त्याचे पांढरपेशे प्रतिष्ठित मित्र त्याची गंमत करीत.परंतु पुढेपुढे त्याच्या या वर्तनाचा ते धिक्कार करू लागले.त्यांना ते बिलकूल पसंत नव्हते.

त्या असंस्कृत व परकी सेमिटिक भुक्कडांकडे जात जाऊ नकोस,असे राजाने मूसाला बजावले.मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन


परंतु मूसाने या धमक्यांकडे व सूचनांकडे लक्ष दिले नाही.एकदा हे ज्यू गुलाम काम करीत असता मूसा तिथे गेला होता.एक इजिप्शियन सरदार एका गुलामाला निर्दयपणे फटके मारीत होता.मूसा संतापला.त्याने इजिप्शियानावर प्रहार केला व त्याला तिथल्या तिथे ठार केले.एका ज्यू गुलामाची बाजू घेऊन इजिप्शियन ठार करणे म्हणजे अक्षम्य अपराध होता.मूसाला प्राणरक्षणार्थ वाळवंटात पळावे लागले.


उर्वरित शिल्लक भाग…पुढील भागात


तळटीप - दिनांक - १५.०७.२४ या दिवशी प्रसारित झालेला प्लेटोचा संदर्भ / A reference to Plato हा लेख पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी,साने गुरुजी,इंद्रनील प्रकाशन कोल्हापूर या पुस्तकातील आहे.