* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/१/२५

रमणीय वार्धक्य / A delightful old age

वयावर विवेचन करण्याआधी मला त्वचेवर बोलायला पाहिजे.पण त्वचेचा झाडाशी काय संबंध ?आधी मी हा विषय मानवी दृष्टिकोनातून मांडतो. 


आपल्या शरीराला बाहेरच्या जगापासून सुरक्षित ठेवण्याचे कार्य त्वचेकडून होतं.त्वचेमुळे शरीरातील द्रव्ये आणि अवयव आत बंदिस्त राहतात.हे करत असताना त्वचेतून आर्द्रता आणि वायूसुद्धा शोषले जात असतात.याव्यतिरिक्त त्वचेमुळे विषाणूंपासूनही सुरक्षा मिळते. त्वचा स्पर्शाला संवेदनशील असते.काही स्पर्श हवेहवेसे वाटतात तर काही स्पर्शातून वेदना होतात आणि वेदनादायी स्पर्शाला बचावात्मक प्रतिसाद दिला जातो.


त्वचेची सक्षम भूमिका वयोमानपरत्वे कमी होत जाते. त्यावर सुरकुत्या येतात आणि समोरच्याला आपल्या वयाचा अंदाज येतो.त्वचेचे पुनरुज्जीवन फारसे आकर्षक नसते.प्रत्येक माणूस रोज ०.०५ औंस त्वचा झडत असतो दररोज त्वचेचे दहा अब्ज कण गळून पडतात.म्हणजेच वर्षाकाठी आपली एक पाउंड त्वचा गळून जाते.हे काही फार आकर्षक नसतं,पण मेलेली त्वचा झडून जाणं हे देहासाठी उपयुक्त असतं.त्यामुळे आपले बाहेरील अवयव निरोगी राहतात. लहान असताना आपली वाढ होऊ देण्याकरता त्वचा झडणं आवश्यक असते.अशा प्रकारे जुनी त्वचा झडून नवीन लवचीक त्वचा आली नसती तर आपण फुटून गेलो असतो.


पण या सगळ्याचा झाडाशी काय संबंध? त्यांच्यातही असंच असतं.फक्त त्यांच्याबाबतीत बोलताना भाषा बदलते.

बीच,ओक,स्प्रूस आणि इतर झाडांच्या त्वचेला 'साल' म्हणतात.

मानवाप्रमाणेच झाडाचं सालही आतल्या अवयवांना संरक्षण देतं.साल नसतं तर झाड सुकून गेलं असतं.बुरशीला सशक्त ओलसर लाकडात तग धरता येत नाही,पण तीच बुरशी या कोरड्या लाकडाला खाऊन टाकते.कीटकांनाही ओलसर लाकूड फारसं रुचत नाही.साल शाबूत असलं की त्यांना झाडावर आक्रमण करता येत नाही.आपल्या शरीरात जेवढं पाणी असते जवळजवळ तितकंच झाडात असतं. म्हणून साल असलेल्या झाडाला कीटकांपासून संरक्षण मिळतं कारण पाणी असलेल्या झाडात ते गुदमरून मरून जातील.सालाला इजा ही माणसाच्या त्वचेला जखम होण्याइतकीच त्रासदायक असते. 


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन


आणि म्हणूनच झाडेही आपल्यासारख्याच संरक्षण प्रक्रियेचा वापर करून सालाला इजा होऊ देत नाहीत. दर वर्षी सशक्त झाडाच्या घेरात अर्धा ते एक इंच वाढ होते.पण यामुळे सालात फट पडणार नाही का? खरंतर पडली पाहिजे.असे होऊ नये म्हणून ते विशाल वृक्ष आपली त्वचा सारखी पुनरुज्जीवित करीत असतात.यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात कात टाकावी लागते.

आपल्यापेक्षा झाडाच्या सालीचे ढलपे मोठे असतात.ते आठ इंचापर्यंत असू शकतात.वादळी वाऱ्यानंतर झाडाखाली सालीचे मोठे तुकडे पडलेले दिसतात.पाईन वृक्षाचे लाल साल मातीत सहज दिसून येते.पण प्रत्येक झाड अशाप्रकारे कात टाकत नाही. 


काही झाडं सतत कात टाकत असतात.(अशांना एँटी-डॅडरफ शाम्पू द्यायला हवा !) आणि काही सांभाळून कात टाकतात.कोण कशाप्रकारे कात टाकतं हे झाडाकडे बघून लगेच कळून येतं.

आपल्याला जो दिसतो तो सालाचा सर्वांत बाहेरचा भाग असतो.

मृत पेशींपासून बनलेला झाडाचा हा भाग एक सुरक्षित कवच तयार करतो.आणि या सालामुळे झाडाची प्रजाती ओळखू येते.

मोठ्या वृक्षात हे जास्त स्पष्ट दिसतं कारण सालीला विशिष्ट प्रकारे सुरकुत्या पडतात.तारुण्यात या झाडांचं साल बाळाच्या कातडीसारखं नितळ असतं.वय वाढल्यावर त्यांना सुरकुत्या येऊ लागतात.झाडाला खालपासून सुरकुत्या पडू लागतात आणि वयाबरोबर ही प्रक्रिया वाढू लागते.वय वाढलं की सुरकुत्या खोल जाऊ लागतात.प्रत्येक प्रजातीमध्ये याचा वेग बदलतो.पाईन, ओक,बर्च आणि डग्लस फर मध्ये हे लहानपणातच सुरू होतं.पण बीच आणि सिल्व्हर फरचं साल अनेक वर्षं नितळ राहतं.झाड आपली कात किती वेगाने टाकतं यावर सर्व अवलंबून असतं.


दोनशे वर्ष आपली चंदेरी-करडी साल गुळगुळीत ठेवणाऱ्या बीच वृक्षाच्या सालीचे पुनरुज्जीवन इतर वृक्षांच्या मानाने भरभर होते.

यामुळे त्यांची कात पातळ आणि खोडाला चिकटून राहते आणि म्हणून त्यात भेगा पडत नाहीत.सिल्वर फरचे ही असेच असते.पण पाईन मात्र याबाबतीत आळशी असतो.काहीतरी अज्ञात कारणांमुळे त्यांना आपल्या सालापासून वेगळं व्हायचं नसतं.कदाचित त्यामुळे मिळणारी सुरक्षा त्यांना हवीहवीशी वाटत असेल.कारण काही का असेना,ते आपली कात अतिशय संथ गतीने टाकतात.त्यामुळे त्यांचं साल जाडजूड आणि कणखर होतं.याचा अर्थ त्यांच्या सालीच्या सर्वांत बाहेरील थर त्यांच्या तारुण्यात तयार झालेला असतो आणि त्याच्या भेगा नवीन बनलेल्या आतल्या सालीपर्यंत पोचतात.तर जेवढ्या भेगा खोल असतील तेवढं संथ गतीने झाड आपली कात टाकतं.वयाप्रमाणे हे झाडाचं असं वागणं अधिकाधिक दिसू लागतं.


प्रौढ अवस्थेत आल्यावर हीच गोष्ट बीच वृक्षांमध्येही दिसू लागते.

या वयात त्यांच्या सालाला खालपासून सुरकुत्या पडू लागतात.या सुरकुत्यांमध्ये पावसामुळे आर्द्रता असते आणि इथे शेवाळ्याची वसाहत स्थापली जाऊ लागते.शेवाळ्याची हिरवाई किती उंचीवर पसरली आहे,यावरून बीच वृक्षाच्या वयाचा अंदाज घेता येतो, शेवाळं जितकं जास्त उंच तितकं झाडाचं वय जास्त.


प्रत्येक झाड वेगळं असल्यामुळे त्याला सुरकुत्या कधी पडणार यातही फरक पडतो.काही झाडांना तारुण्यातच सुरकुत्या येतात तर काहींना उशिरा.ज्या जंगलाचं मी व्यवस्थापन करतो तिथे काही शंभर वर्षं जुने बीच वृक्ष वरपासून खालपर्यंत खडबडीत सालाने घेरले आहेत.हे जनुकीय ठेवणीमुळे होतं की झाडाच्या वागणुकीमुळे यावर संशोधन व्हायला हवं.पण यातील काही गोष्टी मात्र मानवी परिस्थितीशी जुळतात.आपल्या बागेतल्या पाईन वृक्षाला खोल भेगा असतात हे काही फक्त वयामुळे नाही.शंभर वर्षे वयाला नुकतेच पोहोचल्यावर ते तारुण्यातून प्रौढावस्थेकडे जात असतात.इथले वनरक्षकाचे घर १९३४ साली बांधले आहे.

तेव्हापासून छान ऊन येणाऱ्या जागेत हे पाईन वाढत आहेत.घर बांधण्यासाठी जेव्हा काही वृक्ष काढले गेले तेव्हापासून त्यांना जास्तच ऊन मिळत आहे.जास्त ऊन,जास्त सूर्य म्हणजे जास्त अतिनील रेडिएशन (उत्सर्जन).या उत्सर्जनाचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि झाडातही तेच होते.झाडाच्या सालीचा सर्वांत बाहेरचा भाग कडक असतो म्हणूनच त्याला जास्त भेगा जातात


मी वर सांगितलेले हे बदल कधीकधी 'त्वचेच्या रोगा' मुळे होऊ शकतात.जसं यौवनातल्या मुलांना आलेल्या मुरूम पुटकुळ्यांचे डाग आयुष्यभर राहू शकतात तसंच झाडाच्या सालीवरही बार्क माशी आक्रमणाचे डाग राहू शकतात.अशा वेळेस सुरकुत्या पडत नाहीत पण सालीवर हजारो बारीक भोकं पडतात आणि वार्धक्यापर्यंत तशीच राहतात.काही आजारी झाडांना त्वचेवर चिघळलेल्या ओल्या जखमा होतात.यामध्ये सूक्ष्मजिवाणू शिरतात आणि तो भाग काळा पडतो. त्वचा ही माणसाच्या आरोग्याचा आरसा असते,हे काही फक्त मानवाला लागू नाही.


जंगलाच्या परिसंस्थेत वयस्कर झाडांची एक विशिष्ट भूमिका असते.मध्य युरोपमध्ये एकही जुनं जंगल राहिलेलं नाही.एका ठिकाणी दोनशे ते तीनशे वर्ष जुनी झाडं आहेत तेच काय ते एक उरलं आहे.हे जोपर्यंत अजून वयोवृद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला कॅनडाच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्राचीन झाडांकडून त्यांचं महत्त्व समजून घ्यावं लागेल.


मॉन्टरियलच्या मॅक गिल विद्यापीठाचा झो लिंडो याने पाचशे वर्षं जुन्या सिटका स्प्रूस झाडावर संशोधन केलं. सर्वप्रथम तिला सगळ्या खोडांवर आणि फांद्यांच्या बेचक्यांमध्ये अतिशय जुनं शेवाळं सापडलं.यामध्ये नील-हरित शेवाळ्याने आपली वसाहत केली होती.हे शेवाळं हवेतील नत्र घेऊन त्यावर प्रक्रिया करतात आणि झाडांना वापरता येईल अशा स्थितीत त्याचं रूपांतर करतात.पाऊस आला की हे नैसर्गिक खत झाडाच्या मुळापाशी जाऊन पडतं.अशाप्रकारे वयस्कर झाडामुळे जंगलाला नैसर्गिक खत मिळतं आणि नवीन रोपांना पोषण.तारुण्यातल्या झाडांवर शेवाळं नसतं कारण शेवाळं वाढायला काही दशकं लागतात.


सुरकुत्या आणि शेवाळाव्यतिरिक्त झाडात आणखी काही बदल होतात ज्यामुळे त्याचं वय दिसून येतं. उदाहरणार्थ,झाडाच्या टोकाचं आच्छादन पहा.माझ्याही डोक्यावर असंच आच्छादन आहे पण आता ते विरळ होत चाललं आहे.झाडांच्या सर्वांत उंच फांद्यांवर ही अशीच परिस्थिती असते.झाडांच्या प्रजाती प्रमाणे साधारण शंभर ते तीनशे वर्षांत त्यांची नवीन वाढ कमी कमी होत जाते.पानझड करणाऱ्या झाडांमध्ये फांद्या खुरट्या होत गेल्याने वेड्यावाकड्या वक्र, अर्थराइटिस झालेल्या बोटांसारख्या दिसतात. 


सूचीपर्णी झाडांच्या सरळसोट खोडातल्या सर्वांत वरच्या भागात होणारी वाढ जवळजवळ थांबून जाते.या वयात स्प्रूसची वाढ जवळजवळ पूर्णपणे थांबते पण सिल्वर फर मात्र वाढत राहतात.त्यांची वाढ वरच्या फांद्यांमध्ये न होता खालच्या फांद्यात झाल्याने या झाडाचा वरचा भाग एखाद्या मोठ्या पक्ष्याने आपले मोठे घरटे झाडावर बांधल्या सारखा दिसू लागतो.जर्मनीत करकोच्यांची घरटी मुबलक असतात,त्यामुळे यालाही ते करकोच्याचे घरटे म्हणतात.


पाईन आपली ही वाढ सर्व बाजूनी सारखी नियमित करतो,त्यामुळे त्यांचे आच्छादन एकसारखे राहाते.पण प्रत्येक झाड काही काळानंतर आपली उंची वाढवणं थांबवतं.


त्यांची मुळे आपल्या वाहिन्यातून पोषणद्रव्ये वरपर्यंत पोचवणे बंद करतात कारण यात खूप ऊर्जा खर्ची पडते,जे वार्धक्यात शक्य होत नाही. मग उंच वाढण्याऐवजी झाड आडवं वाढू लागते.(काही माणसांचंही असंच होतं,नाही का?) शक्ती कमी झाल्यामुळे प्रौढ वयात गाठलेली उंची सांभाळणं आता झाडाला जड जाते.


सर्वप्रथम सर्वांत वरच्या भागापर्यंत खाद्य पोहोचू शकत नाही त्यामुळे तिथल्या फांद्या मरून जातात.आणि ज्याप्रमाणे वयस्कर माणसाचे वजन कमी होतं तसंच झाडांचंही होऊ लागतं.वादळ वाऱ्याने या मेलेल्या फांद्या मोडून गेल्या की झाड थोडं ताजंतवानं दिसू लागतं.दरवर्षी हे होत जातं,त्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही.काही दिवसांनी फक्त खालच्या फांद्यांची दाटी राहते.काही वर्षांत त्याही मरून जातील पण झाडावर तशाच टिकून राहतील.

आता मात्र झाडाला आपलं वार्धक्य लपवता येत नाही.


अशा वेळेस झाडाच्या आयुष्यात पुन्हा सालाला महत्त्व येते.त्या वरच्या छोट्या ओलसर जखमा बुरशीला आमंत्रण देतात.आणि काही काळातच बुरशी आपली बशीसारखी दिसणारी फळं तयार करतात.ही बुरशी सालाच्या खाली जाऊन लाकडाच्या आतपर्यंत पोचते.काही प्रजातीमध्ये ती झाडाची साखर खाऊ लागते तर काही प्रजातीतून सेल्युलोज आणि लिग्निनसुद्धा फस्त केले जाते.यामुळे झाडाचा सांगाडा आता कुजू लागतो आणि त्याची पावडर होऊ लागते.इतके वर्षे झाडांनी या प्रक्रियेपासून स्वतःचा बचाव केलेला असतो.जखमेच्या दोन्ही बाजूने लाकडाची वाढ होत राहते आणि त्याच्या जाड कडा तयार होतात.यामुळे अजून काही दिवस तरी थंडीच्या वाऱ्यापासून झाडाच्या या कमकुवत भागाचे संरक्षण होते.पण तो दिवस उजाडतो ज्या दिवशी सगळं संपून जातं.


झाडाचा बुंधा मोडतो आणि झाडाचं आयुष्य संपतं.अशा वेळेस खालची रोपटी 'गेला बुवा एकदाचा!' म्हणत निःश्वास सोडत असतील कदाचित ! येणाऱ्या काळात त्यांची वाढ पटपट होऊन वरचा प्रवास सुरू होईल.पण त्या वठलेल्या झाडापासूनही जंगलाला अजून शंभर एक वर्षे तरी सेवा मिळत राहणार असतात.




३/१/२५

गोतावळा / diving



नियोजन कशासाठी चाललंय हे तिच्या समजण्यापलीकडचं होतं….. कथा पुढे सुरू...!!


ज्यांचं तोंड बघून वर्षे झाली,ज्यांच्याशी फोनवरसुद्धा बोलणं होत नाही,त्यांच्यासाठी इतका खरेदी कशाला?आनंद फक्त मिळवायचा नाही,तर तो आपल्या लोकांसोबत वाटल्यास द्विगुणित होतो.

यावर्षी आपली दोन्ही मुलं सहकुटुंब इतके दिवस रहायला येणार म्हणून आई-वडिलांना काय करू अन् काय नको झालं होतं.घर सारवून नीट लावून घेतलं. 


अंथरुण-पांघरुण धुवून वाळवून आणलं.पोरांच्या आवडीचं गोडधोड करायला घेतलं.बहिणींना,मावशांना रहायला बोलावलं.

पोरांनी त्यांच्या मामाच्या गावी जायचा बेत केला होता.आईच्या हातचं आवडणारं सगळे पदार्थ आधीच सांगून ठेवलेले.आल्यावर रोज काहीतरी स्पेशल करायचा बेत ठरला.गावाच्या रस्त्याला धावणाऱ्या गाड्या गाव जसजसं जवळ करतील,तसं आठवणींचा पूर चढायला लागला.बायको,पोरांना हे सगळं नवीन होतं;


पण सत्यजित आणि त्याच्या भावाला आपण चुकलेल्या वाटेवर परत फिरल्यासारखं वाटत होतं.घरी पोहोचल्यावर आपुलकीनं झालेलं आदरातिथ्य पोरांना नवखं वाटत होतं.


गाडीतनं उतरताच गल्लीतल्या आया-बाया घरातनं डोकावून बघत होती. पोरं-बाळं गाडीभोवती घुटमळत होती. कधीही न बघितलेले चेहरे हसून कुरवाळत होते. डोकीवरून,पाठीवरून हात फिरवत होते.कोणी गालगुच्चे घेत होतं,तर कोणी तपकीर लावलेल्या तोंडानं मुका घेत होतं.त्यामुळं पोरांची तोंडं किळसवाणी झाली


एखादा बापय तंबाखू मळून थापायचा आणि त्याचा धुसकारा उडाला की पोरांना ठसका यायचा. 


घरादारातनं बिनधास्त फिरणाऱ्या कोंबड्यांचं कौतुक वाटायचं;पण मधेच एखादी कोंबडी बुळकांडी सोडायची.मग आजी कागदाच्या तुकड्यानं कोंबडीची शिट उचलून भुई पुसून कागद फेकायची. 


मळकट-कळकट कपड्यात शेतावर जाणारी मंडळी विचारपूस करायची.डोक्यावर वैरणीचा भारा घेऊन अनवाणी खड्ड्यातनं चालत येणाऱ्या बाया-बापड्यांच्या पायाला लागलेला चिखल बघून पोरं विचारायला लागली,ही लोकं चप्पल का घालत नाहीत. यांच्या पायाला खडे टोचत नाही का?यांना उन्हात काम करताना चटके कसे बसत नाहीत?


आयुष्यभर परिस्थितीचं चटकं सहन केल्यावर ज्यांच्या काळजात दुःख खोलवर रुतलंय त्यांना कसलं उन्हाचं चटकं बसतील अन् कसला काटा किंवा खडा रुततोय. शरीराचं अन् जिभेचं चोचलं पुरवणाऱ्या शहरी मंडळींना शेतकऱ्यांच्या वेदना कशा जाणवतील?


म्हशीची धार कशी काढतात,हे दाखविताना सत्यजितनं मुलांना जनावरांच्या गोठ्यात आणलं.आजोबा खराट्यानं शेण पाठीमागं सारत होते.बैलांच्या समोर पाण्याची बादली ठेवली होती.इतक्यात एक म्हैस चिप्पाळली.त्याच्या शेणाच शिंतोडं सगळ्यांच्या अंगावर उडालं.शेणाच्या वासानं मुलं नाक धरून मागं सरकली


हे बघून आजोबा हसायला लागलं.त्यांची कापडं आधीच शेणानं आणि मातीनं माखलेली.धाकटी मुलगी बडबडली,"किती डर्टी आहे..?" सत्यजितनं उत्तर दिलं, "ती त्यांची ड्युटी आहे..."


"व्हॉट नॉन सेन्स इज दिस?"


"धिस इज शेणस्;याला शेण म्हणतात.यानेच गोवऱ्या थापतात.त्या जाळून जेवण शिजवितात.त्याची राख दात घासायला वापरतात.

त्या राखेनं घासलेलं दात कुठल्याही टूथपेस्टपेक्षा स्वच्छ असतात.आम्ही लहानपणी या राखेनंच दात घासत होतो..."


"हॉट रब्बीश..."


"रब्बीश नाही,रब करायचं,घासायचं.या शेणानं जमीन सारवायचो.

आम्हाला शाळेत भुई सारवायला लावायचे. तुमच्यासारखं बेंच नव्हते बसायला.आम्ही भुईवर बसायचो."


सत्यजित जे काही सांगायचा ते मुलांना नवलच वाटायचं.हात धुवून आजोबा कासांडी घेऊन धार काढायला बसले.पहिला तांब्या भरल्यावर तो सत्यजितला दिला.धारोष्ण दूध मुलांना प्यायला दिलं. आकडी दुधाचा वास आणि चव मुलांना खूप आवडली. दूध काढण्यासाठी लागणाऱ्या कष्टाची जाणीव त्यांना नव्हती.पैसे दिलं की डेअरीतून दुधाची पिशवी मिळते इतकं सोप्पं असतं दूध आणणं.गंमत म्हणून पोरांच्या डोक्यावर वैरणीचं ओझं ठेवलं,तेव्हा ती भेलकांडायला लागली.मुलांना या सगळ्यांची गंमत वाटायची.गावात पिझ्झा,बर्गर नाही;पण आजीनं बनविलेली भाकरी चुलीवर कडक भाजली की त्याची चव पिझ्झापेक्षा भारी होती.कोवळ्या ज्वारीचा आणि हरभऱ्याचा हुर्डा, मीठ,लिंबू लावून चरचरीत लागायचा.शेताच्या बांधावर बसून ऊस खाताना सत्यजितला बालपण आठवलं. 


आजोबांनी विळ्यानं सोलून फक्त उसाचा गरा नातवंडांना खायला दिला,तरी तो पोरांना चावता येत नव्हता.गवत कापताना आजोबांच्या हाताला विळ्यानं कापलं होतं.त्या बोटाला जाडजूड फडक्यात हळद गुंडाळून लावली होती.त्याच हातानं ऊस सोलताना आजोबांच्या हाताला कळ यायची.


ते मधेच हात झाडायचे;पण नातवाला ऊस सोलून देण्यात त्यांना आनंद वाटत होता.बोटाला बांधलेला मळकट कापडाचा तुकडा बघून नातवानं विचारलं,


"आजोबा,तुम्ही बँडेज का नाही लावलं ?"


यावर आजोबा हसतच म्हणाले,"बाळ,शेतात काम करताना अचानक कापलं तर तिथं कुठनं आणणार बँडेज ? तुझ्या आजीनं पटकन् पदराचा तुकडा फाडला अन् गुंडाळला.औषध म्हणून पूर्वी रानातली माती लावली तरी जखम बरी व्हायची.आता पिकांवर औषध मारून आणि खत टाकून मातीचा कस गेलाय.तुझी आजी तर पूर्वी मातीचा खडा खायची इतकी मातीला चव होती." माती खायची म्हटल्यावर पोरांना विचित्र वाटलं म्हणून त्यांनी विचारलं,

मग त्यांच्या तोंडात, पोटात जंतू जात नव्हते का?"


"कसलं जंतू जातात ? पुन्हा तपकिरीचा बार भरला की, सगळं जंतू बेशुद्ध पडायचं."आजोबा हासतंच म्हणाले.


"तपकीर..! ते काय असतं?" पोरांनी उत्सुकतेनं विचारलं.


"तो तंबाखूचा एक प्रकार आहे.किराणा दुकानातच मिळते;पण त्याचा वास आणि चव काय चांगली नसते. त्याची नशा होते आणि व्यसन लागतं. ्त्याच्या वासानं डोळं भनभनतात."


"तरीही आजी तपकीर वापरायच्या आणि तुम्ही काही बोलत नव्हता?" पोरांनी विचारलं.


"शेतात काम करताना एकमेकांच्या संगतीनं लागली सवय.

कामाचा थकवा घालवायला बायकांना तपकीर आणि पुरुषांना तंबाखूची सवय लागते.खरं तर ते चांगलं नाही;पण एकदा सवय लागली की सुटत नाही.म्हणून वाईट गोष्टींची संगत करू नये.हा घ्या गरा. याची सवय लागत नाही..." असं म्हणत आजोबांनी विषय बदलला.


चार-पाच दिवस पोरांनी धमाल केली.सगळी कामं सोडून आजी-आजोबा पोरांना,नातवांना काहीबाही करून घालण्यात रमली होती.परत जाण्याची तयारी सुरू झाली तसा आजी-आजोबांचा चेहरा उतरला. 


पोरांना देण्यासाठी गूळ,शेंगा,तांदूळ यांची बांधाबांध सुरू झाली;

पण मनातील खिन्नता डोळ्यांत दिसत होती. इतकी वर्षे नजरेसमोर नसणारा गोतावळा अचानक आठ-दहा दिवस रहायला आला.घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटत होतं.नातवंडांच्या कल्ल्यात भिंतीसुद्धा बोलायला लागल्या होत्या.


शिकल्या सवरल्या पोरांनी कामधंद्यासाठी गाव सोडलं.त्यांना गावाची पांढरी परकी अन् घरं पोरकी झाली.पोटापाण्याच्या नादात पोटची पोरं दूर गेली. 


त्यांनी शहरात जाऊन मोठ्या पगाराची नोकरी केली. बक्कळ पैसा कमवला.घर, गाडी घेतली.चांगलीचुंगली कपडे घेतात.हॉटेलात जेवायला जातात.विमानानं फिरतात.जे गावात राहून कधीच मिळालं नसतं,ते सगळं सुख अनुभवतात;पण गावातल्या गोतावळ्यात राहून मिळणारं सुख त्यांना अनुभवता आलं नाही. 


सत्यजितच्या वर्गातला रंगा जास्त शिकला नाही.तो गावात राहतो.शेजापाजारच्या गावात आठवड्याच्या बाजारात भाजीपाल्याचा व्यापार करतो.शेती करतो. त्याची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात.रंगाची बायको अधून-मधून सासू-सासऱ्यांसोबत हुज्जत घालते.भांडणं होतात;पण रोज रात्री एकाच छताखाली असतात.आदल्या रात्री भांडण झालं,रुसवा फुगवा झाला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून एकत्र चहा पितात.इतकी वर्षं रिकामं असणारं घर अचानक भरून गेलं आणि आज परत रिकामं होणार,या विचारानं आजी-आजोबांना भरून आलं. 


पोरांना निरोप देताना हसत-हसत द्यावा.डोळ्यात पाणी आणायचं नाही,असं आजीनं मनोमन ठरवलं.लांबच्या प्रवासाला जाताना पोरांना अपशकून नको असं आजोबा म्हणाले.निरोपाच्या हातवाऱ्या करत गाड्या निघून गेल्या.त्याच्या वाटेवर उडणारा धुरळा डोळ्यांत गेल्यानं आजी-आजोबांनी डोळं पुसलं. 


सत्यजित जाताना जमलेलं भाऊबंद आपापल्या घरी गेलं.रिकामं घर दोघांना खायला उठलं.आजोबांनी शेतात जनावरांना चारापाणी करीत वेळ घालवला. आजी मात्र तोंडाला पदर लावून चुलीसमोर गप्प बसून होती.दुपारचं उरलेलं जेवण संध्याकाळी पुरवून खायचं म्हणून तिनं स्वयंपाक केला नाही.लांबचा प्रवास करून घरी पोहोचायला सत्यजितला उशीर झाला. 


प्रवासात कंटाळल्यामुळं बायकोनं हॉटेलात जेवणाचा बेत केला.पोरांनी छान पिझ्झाची ऑर्डर दिली. सत्यजितनं सुखरूप पोहोचलो म्हणून आई-बाबांना सांगायला फोन केला.पोरांच्या फोनची वाट बघत बसलेल्या म्हातारा-म्हातारीनं जेवायला वाढून घेतलं. आठ-दहा दिवस गोतावळ्यात बसून सवय लागलेल्या या दोघांना जेवताना गदगदून आलं.पुढ्यात भरलेलं ताट होतं; पण तोंडात घास फिरत होता.दोघांच्याही डोळ्यांत पाणी तरळलं होतं;पण पुसायला गोतावळा नव्हता.


०१.०१.२५ या कथेतील दुसरा भाग…

१/१/२५

गोतावळा / diving

सकाळी उठल्याबरोबर फोन वाजला.समोरून कार्यालयातील सहकर्मचारी सत्यजित धीरगंभीर आवाजात सांगू लागला,

"अरे,आपले शेवाळे सर पहाटे गेले.झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात न्यायची उसंतसुद्धा मिळाली नाही."


"बाप रे.. काय सांगतोस काय ?"


"हो ना,माझा तर विश्वासच बसला नाही पहिल्यांदा.. पण लागोपाठ दोघांचा फोन आला,मग मी तुला फोन केला.आपल्याला जावं लागेल."


"बरं ठीक आहे.मी तुला घ्यायला येतो.दोघं एकत्रच जाऊ,"असं म्हणत फोन ठेवला.शेवाळे सर म्हणजे सत्यजितचे वरिष्ठ,अतिशय हुशार आणि उच्चशिक्षित. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडीशेजारच्या छोट्याशा खेड्यातले.गाव तसं दुष्काळी.

लहरी पाऊस पडेल तेव्हा पडेल.पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.हंगामी शेती पावसाच्या भरोशावर. पिकंल तेवढा शाळू.एक मात्र चांगलं.शाळू पिकला की मोत्यासारखा.

घरखर्चाला रोजंदारीवर काम करून काय मिळतील ते चार पैसे.आई-वडील रोजंदारीसाठी लांबच्या गावी गेले की पोरांच्या शाळेची हेळसांड व्हायची.मग पोरं जरा हाताखाली आली की त्यांना आई-वडील सोबत घेऊन जायचे.शेवाळे सरांच्या आई- वडिलांची परिस्थिती काही फार चांगली नव्हती.मात्र पोरगा शाळेत हुशार आहे असं गुरुजींनी सांगितलं आणि त्यांनीच पुढच्या शिक्षणासाठी खर्चापाण्याची सोय केली म्हणून पुढचं शिक्षण घेतलं.शेवाळे सर सोलापुरात अभियांत्रिकी पदवी घेऊन पुण्यात नोकरीला आले. 


काही दिवस नोकरी केल्यानंतर साठलेल्या पैशांतून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले.तिथंच आठ-दहा वर्षे नोकरी करून बक्कळ पैसा कमावला.परत येऊन पुण्यात घर घेतलं.सोबत काम करणाऱ्या मुलीशी लग्न करून पुण्यातच स्थायिक झाले.

दरम्यानच्या काळात गाव आणि गावातील माणसं यांचा संपर्क तुटला.केवळ आणि केवळ एकच उद्देश बक्कळ पैसा कमवणे आणि उच्च पदावर जाणे.कंपनीच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी ते हाताखालच्या कर्मचाऱ्यांसोबत अतिशय निष्ठूर आणि कामापुरतं संबंध ठेवायचे. कामासमोर कुणाच्या अन् कसल्याही सुख-दुःखाशी यांना काहीही देणं-घेणं नव्हतं.हातातलं काम वेळेवर पूर्ण झालं पाहिजे इतकंच.कामकाजादिवशी कुणाच्या लग्नाला जाणं नाही,कुणाचा वाढदिवस असो,बारसं, मुंज असो किंवा नातेवाईकांचं आजारपण असलं,तरी सुट्टीदिवशी भेटायला जा म्हणत कामाला दांडी मारून जाऊ देत नव्हते.माणूस मेला तरी घरच्यांना भेटायला संध्याकाळी जावा.म्हणे तुम्ही जाऊन काही आजारी माणूस बरा होणार नाही अन् मेलेला माणूस जिवंत होणार नाही.तुमच्या अनुपस्थितीत कोणताही कार्यक्रम थांबणार नाही;

पण कंपनीचं काम थांबवून चालणार नाही.आता हेच शेवाळे साहेब गेले.यांच्याशिवाय कंपनी बंद पडणार आहे की काय कोणास ठाऊक ?


घाईगडबडीत सत्यजित आणि मी शेवाळे सरांच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलो.पार्किंगमध्ये पाच-सहाजण जमले होते.त्यात ऑफिसमधलेच दोघेजण होते. गावावरून काही मंडळी येत आहेत,तोपर्यंत थांबायचं होतं.अजून दोन तास तरी लागतील.

सरांच्या अपार्टमेंटमधल्या इतर लोकांना झालेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती.प्रत्येकजण आपापल्या कामावर जाण्याच्या घाईत होता.मुलांना शाळेत पाठवायची लगबग सुरू होती.


पार्किंगमध्ये असं आम्हाला उभा राहिलेलं बघून एक-दोघांनी संशयानं विचारलं,

"काय झालंय,का थांबलाय..?"


शेवाळे सरांच्या निधनाची त्यांना कल्पनाच नव्हती आणि कोण शेवाळे,हे बऱ्याचजणांना माहीत नव्हतं. 


प्रत्येकाला आपल्या बिल्डिंगमधल्या शेजारच्या तीन-चार मजल्यांवरील काही घरांची माहिती होती;पण शेवाळे सर काही फार कोणात मिसळत नव्हते.त्यांच्या मजल्यावरील काही कर्ती मंडळी कामावर निघून गेली. घरातील इतर मंडळी शेवाळे वहिनींना भेटून परत आपापल्या घरात जाऊन दाराला कान लावून बसलेली. प्रेत न्यायला आले की बाहेर येऊ,विनाकारण इतका वेळ ताटकळत कशाला बसायचं? गावाकडच्या लोकांना यायला किती वेळ लागेल कोण जाणं?इतरांच्या घरी अगदी कुकरच्या शिट्या वाजत होत्या.फोडणीचा वास येत होता.कोणाचंही काहीही काम थांबलं नव्हतं.थोड्या वेळानं मी,सत्यजित आणि त्यांच्या मित्रांनी शेजारच्या हॉटेलात जाऊन चहा,नाष्टा केला.


काही वेळानं दोन जीप भरून गावाकडील २०-२५ जण आले.त्यात पाच- सहा महिला होत्या.त्यांनी गाडीतनं उतरताच भोकांड पसरून रडायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजानं अपार्टमेंटमध्ये गोंधळ उडाला. तिथल्या लोकांनी लहान मुलांच्या कानावर हात ठेवले. मिरवणुकीतल्या डॉल्बीच्या आवाजानं त्यांच्या कानाला त्रास होत नाही;पण गावाकडच्या साध्याभोळ्या बायकांच्या हंबरडा फोडून रडण्यामुळं मुलं घाबरत होती. गावाकडून आलेल्या महिलांमध्ये एक चुलतबहीण,दोन चुलत्या,एक मावशी होती.पुरुष मंडळींनी जमलेल्या लोकांबरोबर चर्चा करून प्रेत गावी घेऊन जाता येईल का,याची चाचपणी केली.आधीच - मृत्यू होऊन पाच-सहा तास झाले होते.शरीर फुगायला लागलं होतं.गावी न्यायला अजून पाच-सहा तास लागतील.त्यापेक्षा इथंच विधी करावेत असं ठरलं. 


शिक्षण घेऊन नोकरीधंद्यासाठी ज्यांनी गावाकडं पाठ फिरवली आणि शहरात स्थायिक झाले,त्यांना मेल्यावरपण गावाची पांढरी नशिबात नव्हती.


खांदा द्यायला गावातली दोघं पुढं आली.सगळ्यांना तेराव्या दिवशी परत पुण्यात येणं शक्य नव्हतं.अजून दोनजण कोणतरी पाहिजे होतं.प्रत्येकजण एकमेकांच्या तोंडाकडं बघायला लागला.

प्रत्येकाला कामाला जायचं होतं.खांदा द्यायला कोणी पुढं येत नव्हतं.शेवाळे सर लग्नाआधी या उच्चभ्रू सोसायटीत रहायला येण्यापूर्वी धायरीत रहात होते.तिथल्या गणपती मंडळाचे काहीजण आलेले.त्यातील दोघांनी खांदा दिला.ना भावकी ना जातकुळी विचारली.ज्यानं पैसा आणि कामाशिवाय दुसरा विचार केला नाही,माणसं जोडली नाहीत,त्याला खांद्या द्यायला कोणी तयार नव्हतं.देव न करो, अत्यंविधी करणं आणि त्यासाठी मनुष्यबळ पुरवणं हा व्यवसाय होऊ नये.खांदा द्यायला पगारी माणसं बोलवायला लागू नयेत म्हणजे माणुसकी जिंकली.


सर्व विधी आटोपून घरी यायला दुपार ओलांडली.आज ऑफिसला जायची इच्छा नव्हती.शेवाळे सरांच्या माघारी आज पहिल्यांदा तिथं एकावेळी पाच- सहाजण गैरहजर होते.तेही त्यांच्यामुळं.आता कंपनीचे कसे होणार याचा विचार कोण करीत असेल ?


वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून घरी परत येताना सत्यजितच्या गाडीत रेडिओवर पकंज उदास यांचं 'चिठ्ठी न कोई संदेश..' हे गाणं ऐकता ऐकता सत्यजित त्याच्या बालपणात पोहोचला.'गावातल्या त्या गल्लीबोळातनं हुंदडणं,शेताच्या बांधावरून उड्या मारणं,नदीवर पोहायला जाणं,शेतात भाजलेल मक्याचं कणीस खाणं,ओढ्याच्या काठावरच्या देवीला कोंबडं कापणं,भरउन्हात शेतात नांगरणी करणं,झाडाखाली बसून चटणी,भाकरी,कांदा खाऊन ढेकर देणं,कुणाच्या तरी कार्यक्रमात रस्त्यावर पंक्तीत बसून पत्रावळीत शिरा-भात खाणं,सगळं सगळं काही विसरून गेलो. 


आपण फक्त पैसा कमवायला शिकलो.माणसं कधी कमवणार? पैसा कमवून सुखी व्हायच्या नादात सुख नेमकं कशात आहे, तेच कळालं नाही. त्या सुखाच्या शोधात आपण परत गावी गेलं पाहिजे. आई-वडिलांसोबत चार-आठ दिवस राहिलं पाहिजे. आपल्या मुलांना तर त्या जीवनशैलीची सुतराम कल्पना नाही.चॅट सेंटरला स्वीटकॉर्न खाणाऱ्या पोरांना बाभळीच्या शिऱ्यावर भाजलेल्या कणसांची चव कशी कळणार?'


सत्यजितनं त्याच्या धाकट्या भावाला फोन केला.तो मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे.त्याची बायको नाशिकची.

आठवडाभर पेशंट तपासायचं आणि कधीतरी सुट्टी मिळाली तर लोणावळा किंवा माथेरानला फिरायचं,नाही तर बायकोच्या माहेरी.हे ठरलेलं.स्वतःचे आई-वडील गावाकडं आपली वाट बघत असतील असं कधीच वाटलं नाही.मुलं त्यांच्या संसारात रमलीत. उगाच त्यांना येण्या-जाण्याची दगदग नको म्हणून वाटंला डोळं लावून बसलेले भाबडे आई-वडील;त्यांना काय माहीत मुलं पिकनिकला जाताना किती आणि कसा प्रवास करतात.वर्षातनं एकदा गावी येणाऱ्या पोरांना नातेवाईक आणि मित्रांना भेटायला वेळ पुरत नाही.वडिलांनी लपवून ठेवलेलं आजारपण दिसलं की, दवाखान्याच्या फेऱ्या करण्यात पोरांची सुट्टी संपायची म्हणून होणारा त्रास लपवायचे.यावेळी मात्र दोघांनी एकत्र सहपरिवार आठ-दहा दिवस घरी जाऊन रहायचा बेत ठरविला.हे कळताच आई-वडिलांना भरून आलं.


इकडं इतक्या मोठ्या सुट्टीसाठी गावी जायची लगबग सुरू झाली.पोरांचं सुट्टीतीलं वर्ग,शिबिरं सगळं काही रद्द केलं.बऱ्याच वर्षांनी सत्यजितनं आईसाठी साडी आणि वडिलांसाठी धोतर अन् सदऱ्यासाठी कापड घेतलं.चुलता-चुलती,चुलतभाऊ,त्यांची मुलं प्रत्येकासाठी काही ना काही खरेदी केलं.सगळा तामझाम बघून बायकोला काही कळेनासं झालं.अचानक इतका खर्च करून हे सगळं नियोजन कशासाठी चाललंय हे तिच्या समजण्यापलीकडे होतं.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…


३०/१२/२४

खेळ महत्वाचा - The game is important

आपण खेळण्यासाठी घडलो आहोत आणि खेळण्यातूनच घडलेलो आहोत.आपण ज्या वेळी खेळते असतो,त्या वेळी आपल्यातल्या मानवतेचं विशुद्ध दर्शन आपल्या खेळातून घडवण्यात आपण मग्न असतो. आपल्यातल्या वैयक्तिक सच्चेपणाचं दर्शन इतरांना घडत असतं.ज्या ज्या वेळी आपल्याला खूप प्रफुल्लित, तरतरीत वाटत असतं,त्या वेळी आपल्या खेळातून आपल्या स्मरणात राहिलेले सर्वोत्तम क्षणच आपल्याला आठवतात,यात नवल ते काय?"


खेळामुळे आपल्या मनाच्या कक्षा अधिक विस्तारतात, आणि त्यामुळेच सखोल शोध घेण्याची क्षमताही वाढते.नवीन कल्पना मनात रुजवून घेणं किंवा जुन्याच कल्पनांवर नव्याने प्रकाश टाकणं आपल्याला सहज जमतं.खेळ आपल्याला अधिक चौकस वृत्ती बहाल करतो, नावीन्यपूर्ण गोष्टींशी समरस होण्याचं भान देतो, अधिक कार्यरत राहण्यासाठी मदत करतो. 


आवश्यकतावादी व्यक्तीच्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी खेळ ही एक पायाभूत गरज आहे, कारण त्याच्यामुळेच शोधक वृत्तीला तीन विशिष्ट अशा मार्गांनी चालना मिळते, एक प्रकारचं इंधनच खेळामुळे तिला मिळतं,असंही म्हणता येईल.


एक म्हणजे,खेळामुळे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची व्याप्ती वाढते.आपण एरव्ही ज्या पर्यायांचा विचार करणं तर दूरच,पण ज्यांच्याकडे वळूनही पाहिलं नसतं त्यांच्यातल्या शक्यता आपण पाहू शकतो.एरवी ज्यांचा संबंध जोडण्याचं आपल्याला सुचलं नसतं,त्या दोन पर्यायांमधला संबंध शोधण्याचा प्रयत्न आपण करतो.खेळामुळे आपल्या मनाची सर्व कवाडं खुली होतात.आपला दृष्टिकोन विशाल होतो. आपल्या काही चुकीच्या आणि जुन्या समजुतींना आव्हान देण्याची समर्थता आपल्यात येते आणि ज्या कल्पना आपण तपासूनही पाहिलेल्या नसतात,त्यांचं स्वागत करण्यासाठी आपलं मन तयार होतं.खेळामुळे आपल्यात होणारा आणखी एक बदल म्हणजे,आपण आपल्या जाणिवांना विस्तारण्याची परवानगी देतो आणि त्यामुळे नवनवीन गोष्टी,कल्पना आपल्याला सुचत जातात.


अल्बर्ट आईनस्टाईन यांनी एकदा म्हटलं होतं तसं : मी जेव्हा मला स्वतःला किंवा माझ्या विचार करण्याच्या पद्धतींना तपासून बघतो,त्या वेळी मी अशा निष्कर्षाप्रत येतो की,कल्पनाविलासाची जी देणगी असते,ती मला माझ्यातल्या गुणांपेक्षा,क्षमतेपेक्षाही अधिक मोलाची वाटते.कारण तिच्यातून मला सकारात्मक ज्ञान मिळवता येतं.


दुसऱ्या प्रकारे खेळाचा होणारा फायदा असा आहे की, तुम्ही जर कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असाल, तर त्यावरचा रामबाण उपाय आहे तो म्हणजे खेळ. 


कारण ताण हा निर्मितीक्षमतेचा शत्रू आहे.विश्वास बसणं जरा कठीण आहे,पण ताण आपल्यातली निर्मितीक्षमता,चौकसवृत्ती आणि शोधक स्वभाव,या गोष्टींसाठी उपयुक्त असणारे आपल्या मेंदूचे महत्त्वपूर्ण भागच दुबळे करून टाकतो,त्यांचं काम अक्षरशः बंद पाडतो.असं काही घडल्यानंतर तुम्हाला किती मानसिक त्रास होईल,याची कल्पना करणंसुद्धा तुम्हाला नकोसं वाटेल.कामाचा तुमच्या मनावर खूप ताण आहे,आणि त्याच वेळी सगळ्या गोष्टी चुकताहेत,विपरीत काहीतरी घडतंय.तुम्हाला तुमच्या किल्ल्या सापडत नाहीयेत, येता-जाता तुम्ही कशावर तरी आपटत आहात.एक अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट तुम्ही घरीच स्वयंपाक

घरातल्या टेबलावर विसरून आला आहात. 


अलिकडच्या काळात झालेल्या संशोधनातून असं दिसून येत आहे की,आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागातल्या हालचाली ताणामुळे अधिक क्रियाशील होतात (The Amygdala) आणि त्याच वेळी मेंदूचा जो भाग ज्ञान मिळवण्याच्या कामासाठी (The Hippocampus) जबाबदार असतो त्याची क्रियाशीलता हा ताण कमी करत असते.या सर्व प्रक्रियेचा परिणाम म्हणजे आपण स्वच्छपणे विचार करण्याची आपली क्षमताच हरवून बसतो.


माझ्या स्वतःच्या मुलांमध्ये हे असे विचित्र परिणाम झाले त्या वेळी खेळाने सर्व परिस्थिती कशी आटोक्यात आणली,ते मी अनुभवलं आहे.ज्या वेळी एखाद्या गोष्टीचा त्यांच्या मनावर ताण असतो,

सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाताहेत असं लक्षात येतं,त्या वेळी मी त्यांना चित्रकलेत मन रमवायला सांगतो आणि याचा सुपरिणाम लगेचच दिसून येतो.त्यांच्या मनावरचा ताण कुठल्याकुठे पळून जातो आणि त्यांची शोधक वृत्ती परत येते.आता तिसरा फायदा ! एडवर्ड एम. हॅलोवेल हे एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत,आणि मेंदूच्या कार्यासंबंधात त्यांचा खास अभ्यास आहे.ते म्हणतात

की,खेळामुळे मेंदूच्या अंमलबजावणी करण्याच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होतो.त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय,मेंदूच्या अंमलबजावणी कार्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गोष्टी आहेत,त्या म्हणजे योजना आखणं,त्यांचे अग्रक्रम ठरवणं,कोणतं कार्य कधी करायचं ते ठरवणं,कामासंदर्भातल्या अपेक्षा ठेवणं, प्रतिनिधिक गोष्टी ठरवणं,निर्णय घेणं,विश्लेषण करणं थोडक्यात सांगायचं तर व्यवसाय उत्तम तऱ्हेने चालवण्यासाठी एका कार्यकारी अधिकाऱ्याला प्रभुत्व मिळवण्यासाठी गरजेची असलेली जवळ जवळ सगळीच कौशल्यं मेंदूजवळ असतात आणि खेळामुळे ही कौशल्यं अधिक उजळून निघतात.


खेळ मेंदूच्या त्या भागांना चालना देतो,जे दोन प्रकारे त्यांचं कार्य करतात.काळजीपूर्वक,तर्कशुद्ध कारणमीमांसा करून आणि मुक्तपणे,कोणतीही बंधनं न मानता ते शोधक वृत्तीचा वापर करण्याचे संदेश देतात. म्हणूनच खेळत असतानाच्याच काळात अत्यंत महत्त्वपूर्ण विचार कुणालाही सुचले,तर त्यात नवल वाटायला नको. 


हॅलोविल लिहितात : पृथ्वी गोल आहे हा शोध कोलंबसला लागला तेव्हा तो खेळातच रमलेला होता. सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद खाली पडताना न्यूटनने पाहिलं आणि गुरुत्वाकर्षणाच्या ताकदीचा शोध त्यांना लागला,त्या वेळी तेही काहीतरी खेळतच होते. वॅटसन आणि क्रिक डी.एन.ए.मॉलिक्यूलच्या संभाव्य आकाराबद्दल खेळकरपणे चर्चा करत होते,त्याच वेळी त्यांना डबल हेलिकसच्या संरचनेची कल्पना आली. Iambic meter या संकल्पनेशी शेक्सपिअर आयुष्यभर खेळले.मोझार्ट यांनी त्यांच्या हयातीतला जागेपणीचा एक क्षणही खेळाशिवाय वाया घालवला नाही.आईनस्टाईन यांचे 'थॉट एक्सपरिमेंटस्' हे स्वतःच्या मनाशी खेळण्याचं उत्तम उदाहरण आहे.


काम आणि खेळ


काही कल्पक कंपन्यांनी अखेर खेळाचं मूल्य काय आणि किती आहे, हे जाणून घेतलं आहे.ट्विटरचे सीईओ डिक कॉस्टोलो यांनी विनोदाच्या माध्यमातून खेळाला पुढे आणलं आहे,ते त्यांच्या कंपनीतच ! त्यांनी त्यासाठी आयत्या वेळी सुचेल त्याप्रमाणे विनोदाचं सादरीकरण करण्यासाठी एक जागा ठेवली आहे. सुरुवातीच्या काळात स्वतःएक स्टँडअप कॉमेडियन असल्यामुळे त्यांना याची कल्पना आहे की असं आयत्या वेळी सादरीकरण करण्याच्या क्रियेत लोकांना स्वतःच्या मेंदूला जरा ताण द्यावा लागतो.त्यामुळे त्यांच्या विचारात एक प्रकारचा लवचीकपणा येतो,त्यातून चाकोरीबाहेरचं काही तरी त्यांना सापडतं,त्यांच्या निर्मितीक्षमतेचाही त्यात कस लागतो.


इतर काही कंपन्या खेळकर वातावरण जपण्यासाठी सभोवतालच्या वातावरणात बदल घडवून आणतात.आई.

डी.ई.ओ.मध्ये त्यांच्या मीटिंग्ज त्यांनी छोट्याशा बसमध्ये घ्यायला सुरुवात केली आहे.गुगल कंपनीच्या हॉल्समध्ये एखाद्या ठिकाणी अचानकच तुम्ही गुलाबी फ्लेमिंगोजच्या आवरणाखाली असलेल्या भल्यामोठ्या डायनॉसॉरवर आदळू शकता.(अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत.) पिक्सर स्टुडिओजमध्ये कलाकारांच्या ऑफिसेसची वेगवेगळ्या प्रकारे सजावट केलेली आहे. काहींचं स्वरूप जुन्या काळातल्या पाश्चिमात्य सलॉनसारखं आहे,काही लाकडापासून बनवलेल्या झोपड्यांसारखी ! अशाच एका ऑफिसला मी भेट दिली होती,तिथे जमिनीपासून छतापर्यंत सर्वत्र 'स्टारवॉर्स' मधल्या पात्रांच्या छोट्याछोट्या मूर्ती ठेवलेल्या होत्या.


माझ्या माहितीतल्या एका यशस्वी महिलेने एका प्रकाशन संस्थेमधल्या तिच्या ऑफिसच्या एका टेबलावर एक स्टेपल्सपासून तयार केलेलं 'इझी बटण' ठेवलं होतं.ज्या ज्या वेळी तिच्या ऑफिसमध्ये आलेली माणसं जायला निघत,त्या वेळी या मोठ्याशा बटणावर हात दाबून बघण्याचा बालीश आनंद घेण्याचा मोह त्यांना होत असे.तसं ते दाबलं की,त्यातून आधीच ध्वनिमुद्रित करून ठेवलेलं 'हे तर अगदीच सोपं होतं' हे वाक्य मोठ्या आवाजात संपूर्ण ऑफिसला ऐकू जात असे. त्याच संस्थेतल्या खालच्या हॉलमधल्या स्वतःच्या ऑफिसमध्ये दुसऱ्या एका बाईंनी लहान मुलांच्या पुस्तकातली चित्रं फ्रेम करून लावली होती.लहान वयात घेतलेल्या आनंदाची आठवण ही चित्रं तिला करून देत असत.टेबलवरची खेळणी,फ्लेमिंगोच्या आवरणाखाली असलेले डायनॉसॉर्स आणि काहीतरी करण्याच्या तयारीत असलेली खेळण्यातली पात्रं, या सर्व चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी कुणाकुणाला क्षुल्लक वाटू शकतात.पण कदाचित याच्या विरुद्धही असू शकतं,हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 


खेळ ही एक बिनमहत्त्वाची आणि क्षुल्लक बाब आहे, अशी ठाम समजूत असणाऱ्या अनावश्यकतावाद्यांना या त-हेचे वेगवेगळे प्रयत्न हे एक प्रकारचं आव्हान आहे. या आव्हानांशी सामना करत बसण्याऐवजी खेळ ही निर्मितीक्षमता आणि शोधकवृत्तीकडे आपल्याला नेणारी एक सुंदर गोष्ट आहे,ही भावना अनावश्यकतावाद्यांनी समजून घ्यायला हवी.


काय महत्त्वाचं आहे,हे ठरवण्यासाठीच फक्त खेळाची गरज नाहीये तर खेळ ही एक स्वयंपूर्ण गोष्ट आहे.


म्हणूनच आता एका गोष्टीवर आपल्याला विचार करायला हवा की,खेळाला आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आणि आपल्या आयुष्यातही कशा प्रकारे सामावून घेऊ शकतो? ब्राऊन यांनी त्यांच्या पुस्तकात एक छोटीशी पुस्तिकाही अंतर्भूत केलेली आहे आणि यामागे त्यांचा मूळ हेतू वाचकांना स्वतःला खेळाशी कसं जोडून घेता येईल,हे समजावून सांगण्याचाच आहे.ते असं सुचवतात की,वाचकांनी त्यांच्या भूतकाळात डोकावून बघत खेळांच्या आठवणी काढाव्यात.लहान असताना तुम्ही अशा कोणत्या गोष्टी करत होतात,ज्या तुम्हाला उत्तेजित करत असत ? आज त्या गोष्टी कश प्रकारे तुम्हाला पुन्हा एकदा करता येतील ?


२८.१२.२४ या लेखातील शेवटचा भाग…

२८/१२/२४

खेळ महत्वाचा - The game is important

"अधूनमधून थोडासा अवखळपणा करणं सुज्ञ माणसांना नेहमीच आवडतं." - रोनाल्ड डल


'मेरी पॉपिन्स' या अतिशय दर्जेदार सांगीतिक चित्रपटाच्या शेवटी शेवटी कंठ दाटून आलेला आणि दुःखीकष्टी मिस्टर बँक्स घरी येतो.कामावरून काढून टाकलेला,हाकलून दिला गेलेला,रस्त्यावर ढकलून दिला गेलेला मिस्टर बँक्स ! मात्र घरी पोहचताच तो कमालीचा खूश होतो.त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून जात असतो!त्याच्या स्वभावाशी जराही साधर्म्य न साधणारा तो आनंद बघून त्याच्या नोकरालाही वाटतं की,त्याचे साहेब आज त्यांचा नेहमीचा तंग चेहऱ्याचा मुखवटा बाहेरच फेकून आले असावेत.त्याच्या मुलाच्याही लक्षात येतं,'हे माझे नेहमीचे डेंड नाहीयेत ! ही कुणीतरी नवीनच व्यक्ती आहे.' मुलांची फाटलेली पतंग दुरुस्त करून आणत मुलांच्या हातात देऊन ते जेव्हा गाणं गायला लागतात, "चला मुलांनो पतंग उडवू या" तेव्हा तर मुलं थक्कच होतात.मिस्टर बँक्स त्याच्या बँकेच्या नेहमीच्या रटाळ आणि कंटाळवाण्या कामातून मुक्त होतो आणि त्याच्या आत दडलेलं लहान मूल अचानक जागं होतं.त्यांच्यात नव्याने दिसून आलेली कमालीची प्रसन्नता आणि त्याचा खुललेला चेहरा बघून त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना वाटत होतं,आधीच्या आपल्या घरातलं उदासवाणं वातावरण कुठेतरी पळून गेलंय ! आता घरात भरून राहिलाय फक्त आनंद आणि सौहार्द !


ही एक काल्पनिक कथा आहे,हे अगदी खरंय ! पण आपल्यातला खेळकरपणा जपला गेला,तर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर किती जबदरस्त आणि सकारात्मक प्रभाव पडतो,त्याचं या कथेत अतिशय सुंदर प्रकारे चित्रण केलं आहे.


आपल्यापैकी बहुतांश लोकांना लहानपणी खेळायचं कसं याचं औपचारिक शिक्षण कधीच दिलं जात नाही. आपणच अगदी नैसर्गिकपणे,अगदी स्वाभाविकपणेच खेळायला शिकतो.एक चित्र मनाशी उभं करून बघा.


लहान बाळाला कुकीऽऽ कुकीऽऽ असं म्हणत त्याची आई त्याच्याशी खेळतेय आणि ते बाळ निखळ आनंदात रमून गेलंय.

छोट्या मुलांचा एखादा गट लुटुपुटीचे काही खेळ प्रत्यक्षात ते सगळं घडतंय असं मनाशी कल्पून, त्यांचं जे काही ज्ञान आहे,ते त्यात ओतून अगदी समरसून सगळी वातावरण निर्मिती करत त्यात दंग झालेला आहे. Mihaly Csikszentminalyi म्हणतात,त्याप्रमाणे एखादं मूल जुन्या पुठ्ठ्यांचे चौकोनी तुकडे जमवून त्यातून स्वतःसाठी राजवाडा उभा करण्यासाठी धडपडत असतं,त्या वेळी ते किती एकाग्रपणे त्याचं काम करताना दिसतं,

तेही आपण अनुभवलेलं असतं.पण आपलं वय वाढत जातं,तशा गोष्टी बदलत जातात.आपल्या मनावर असं बिंबवलं जातं की,खेळणं ही अगदीच बिनमहत्त्वाची बाब आहे


त्यात फक्त वेळ वाया जातो.खेळत बसण्याची आपल्याला अगदीच गरज नसते.खेळण्याची आवड असणं म्हणजे पोरकटपणा! दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की,हे असे नकारात्मकता ठासून भरलेले संदेश येतात, ते विचारांना चालना देणारे खेळ खेळण्यासाठी जिथे उत्तेजन दिलं गेलं पाहिजे,अशाच ठिकाणांहून ! खरं म्हणजे खेळाच्या बाबतीत कुणाचीही गळचेपी होता कामा नये !


(खेळा - तुमच्यातल्या सुज्ञ बालकाला कवेत घ्या.

इसेंशियलिझम -ग्रेग मॅकेऑन - अनुवाद - संध्या रानडे,मायमिरर पब्लिशिंग हाऊस,)


ग्रीक शब्द Schole पासूनच School या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे.याचा अर्थ आहे,विश्रांतीचा किंवा फुरसतीचा वेळ.मात्र औद्योगिक क्रांतीच्या काळात उदयाला आलेल्या आपल्या आधुनिक शाळांनी मात्र विश्रांती किंवा फुरसतीचे क्षण ही संकल्पना पारच हद्दपार करून टाकली आहे. 


शिक्षणातून बराचसा आनंदही काढून घेतला गेला आहे. 


शाळांमधून मुलांच्या निर्मितीक्षमतेला वाव मिळावा यासाठी स्वतःचं आयुष्य वेचणारे सर केन रॉबिन्सन, यांच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आलीय ती म्हणजे, मुलांच्या निर्मितीक्षमतेला खतपाणी घालून ती फुलवण्याऐवजी शाळांचा मुलांमधली ती क्षमता मारून टाकण्याकडेच अधिक कल दिसून येतो.ते म्हणतात : "झटपट खाद्यपदार्थांसारखी (Fast Food) शिक्षण क्षेत्रातली झटपट ज्ञान या संकल्पनेत बसणारी संस्कृती शाळा विकत घेत सुटली आहे आणि ही संस्कृती 'फास्ट फूड' जसं आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतं, आपलं शरीर दुर्बल करून टाकतं,तशाच प्रकारे आपल्यातली ऊर्जा,आपल्यातलं चैतन्य या गोष्टींना दुर्बलतेकडे ढकलते आहे.माणसाने जे जे साध्य केलं आहे,ते त्याच्यातल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर साध्य केलंय आणि माझा असा ठाम विश्वास आहे की,ही नवी संस्कृती आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या मुलांना ज्या प्रकारचं शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो आहोत,त्याच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे." त्यांच्या या बोलण्यात निश्चितच तथ्य आहे.


खेळांसारख्या गोष्टी अगदीच बिनमहत्त्वाच्या असतात, ही कल्पना आपण सज्ञान वयात,प्रौढत्वात पोचतो, तोपर्यंत आपल्या मनात अगदी रुजून गेलेली असते.


आणि त्यानंतर तिची पाळंमुळं अधिकाधिक घट्ट होत जातात.

विशेषतः आपण आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवेश करतो त्या वेळी ! यात खेदाची बाब ही आहे की, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कंपन्या खेळाला उत्तेजन देतात.बाकीच्या नकळत का होईना,पण खेळाला कमी लेखतात.हेही खरं आहे की, काही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी निर्मितीक्षमतेला खेळ पूरक ठरतो,ही वस्तुस्थिती वरवर तरी मान्य करतात. पण त्यासाठी फारसा पुढाकार घेत नाहीत.

मात्र अजूनही अशा बऱ्याच कंपन्या आहेत,ज्या खेळाला पोषक ठरेल, खेळातूनच कर्मचाऱ्यांना संशोधनासाठी उत्तेजन देईल, अशा त-हेची संस्कृती स्वतःच्या कंपनीत रुजवण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावलं उचलत नाहीत.


या सर्व गोष्टींचं आपल्याला खरं म्हणजे जराही नवल वाटायला नको.कारण आधुनिक पद्धतीने काम करणाऱ्या संस्था जन्माला आल्या,त्याच मुळी औद्योगिक क्रांतीतून ! त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा पायाच मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन करण्याच्या विचारातून घातला गेलाय.


याही पुढे जाऊन विचार करायचा ठरवलं,तर असं लक्षात येतं की,सुरुवातीच्या काळातला कंपन्यांमधला अधिकारी वर्ग खेळाला उत्तेजन देणारं वातावरण अजिबातच न जोपासणाऱ्या लष्करापासून कामाची स्फूर्ती घेणारा होता.(आणि खरं सांगायचं तर लष्कराची भाषा अजूनही अनेक संस्थांमधून वापरली जाते. संस्थेतले 'आघाडीचे' कर्मचारी (Front line) असा उल्लेखही अगदी सहजपणे केला जातो. तसंच 'कंपनी' हा शब्दही लष्करातल्या सैनिकांच्या तुकड्यांसाठी वापरला जातो.) औद्योगिक पर्व हा शब्द खरं म्हणजे आपल्यासाठी कधीच भूतकाळात जमा झाला आहे. पण तरीही त्या वेळच्या चालीरिती, शत्या काळातल्या बांधकामाच्या रचना आणि पद्धती यांनी आधुनिक संस्थांमध्ये अजूनही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे.


खेळ ही आजही माझ्या दृष्टीने अशी गोष्ट आहे,जी फक्त आपल्या निखळ आनंदासाठी आपण करायची असते. कशासाठी साधन म्हणून किंवा काही तरी साध्य करायचं आहे,म्हणून तिचा वापर करायचा नसतो. 


मग ते पतंग उडवणं असो,संगीताचा आनंद घेणं असो किंवा बेसबॉल खेळणं असो.हे सगळं कदाचित अनावश्यक गोष्टी या सदरात मोडत असेलही.आणि बरेचदा त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं जातं ही वस्तुस्थिती आहे.पण खरं तर खेळ बऱ्याच दृष्टींनी आवश्यक असतो.स्टुअर्ट ब्राऊन हे 'नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्ले' या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी जवळ जवळ सहा हजार लोकांच्या 'खेळाच्या इतिहासाचा' सखोल अभ्यास केला आहे आणि त्यातून त्यांनी असं अनुमान काढलं आहे की,तुमच्या वैयक्तिक आरोग्यापासून,ते तुमच्या लोकांशी असलेल्या संबंधांपर्यंत आणि तुमच्या शिक्षणापासून ते तुमच्या कामाच्या ठिकाणी नवसंशोधनाच्या बाबतीतली तुमची क्षमता वाढवण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत तुम्हाला अगदी जाणवेल इतक्या मोठ्या प्रमाणावर सक्षम करण्यामध्ये खेळाची भूमिका अत्यंत प्रभावी ठरते.ते म्हणतात, 


"खेळ हा तुमच्या मेंदूचा लवचीकपणा,ग्रहणशक्ती आणि तुमच्यातली निर्मितीक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतो." ते थोडक्यात असं सांगतात,"खेळाइतक्या सहजतेने दुसरी कुठलीच गोष्ट मेंदूला प्रज्वलित करू शकत नाही."


अनावश्यकतावादी


खेळ ही क्षुल्लक,बिनमहत्त्वाची बाब समजतो.


असंही समजतो की खेळ ही एक निर्मितीशून्य पद्धतीने वेळ वाया घालवणारी गोष्ट आहे.


आवश्यकतावादी


खेळाचं महत्त्व माहीत असतं.


त्याला हेही माहीत असतं की,खेळामुळे शोध घेण्यासाठी चालना मिळते.


खेळ आणि मन


खेळ हा सगळ्यांच्याच आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, हे सांगताना कितीही बोललं,तरी ते कमीच आहे.प्राणी जगताचा सखोल अभ्यास केला गेला,त्या वेळी असं लक्षात आलं आहे की,खेळ हा बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य वाढीस लागण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यामुळेच सर्व प्रकारच्या प्रजातींचं अस्तित्वही टिकून राहू शकतं.बॉब फॅगन हे संशोधक पंधरा वर्षं 'ग्रिझली बेअर' जातीच्या अस्वलांचा सातत्याने अभ्यास करत होते.त्यांना असं आढळून आलं आहे की, जी अस्वलं भरपूर खेळत होती,ती दीर्घकाळ जगत होती.याचं कारण काय असं त्यांना विचारलं,तेव्हा ते म्हणाले,या जगाने सातत्याने पुढे टाकलेली वेगवेगळी आव्हानं आणि इथली अशाश्वतता यांना सामोरं जाणं, वरचेवर बदलणाऱ्या या ग्रहावर टिकून राहणं,या गोष्टी त्यांना खेळामुळेच शिकता आल्या."


जॉन पँकसेप यांनी त्यांच्या Affective Neuroscience: The Foun- dations of Human and Animal Emotions यात साधारण अशाच प्रकारचा निष्कर्ष काढला आहे.त्यांनी असं लिहिलं आहे की,एक गोष्ट अगदी खात्रीलायकपणे सांगता येते,ती म्हणजे प्राणी खेळत असतात,त्या वेळी अधिक लवचीकपणा आणि निर्मितीशील पद्धती वापरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो."


मात्र तरीही,स्टुअर्ट ब्राऊन लिहितात,मनुष्य जात ही सर्वात अधिक खेळणारी आहे आणि सर्वोत्तम खेळाडूही आहे.आपण खेळण्यासाठी घडलो आहोत आणि सर्वोत्तम खेळाडू आहोत.


शिलल्क राहिलेला भाग..पुढील लेखामध्ये…!


महत्त्वाची नोंद वाचणीय - पुस्तकाचं संपादन करणारे एक जण म्हणतात,तसं,वाचकांचे आयुष्य शक्य तेवढं आरामदायी करणं,हेच माझं काम आहे.कोणत्याही पुस्तकातला महत्त्वाचा संदेश किंवा त्यातून काही घेण्यासारखं असेल,तर ते वाचकांपर्यंत शक्य तितक्या स्पष्टपणे पोहोचवणे हेच माझे उद्दिष्ट असतं.