* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: खेळ महत्वाचा - The game is important

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२८/१२/२४

खेळ महत्वाचा - The game is important

"अधूनमधून थोडासा अवखळपणा करणं सुज्ञ माणसांना नेहमीच आवडतं." - रोनाल्ड डल


'मेरी पॉपिन्स' या अतिशय दर्जेदार सांगीतिक चित्रपटाच्या शेवटी शेवटी कंठ दाटून आलेला आणि दुःखीकष्टी मिस्टर बँक्स घरी येतो.कामावरून काढून टाकलेला,हाकलून दिला गेलेला,रस्त्यावर ढकलून दिला गेलेला मिस्टर बँक्स ! मात्र घरी पोहचताच तो कमालीचा खूश होतो.त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून जात असतो!त्याच्या स्वभावाशी जराही साधर्म्य न साधणारा तो आनंद बघून त्याच्या नोकरालाही वाटतं की,त्याचे साहेब आज त्यांचा नेहमीचा तंग चेहऱ्याचा मुखवटा बाहेरच फेकून आले असावेत.त्याच्या मुलाच्याही लक्षात येतं,'हे माझे नेहमीचे डेंड नाहीयेत ! ही कुणीतरी नवीनच व्यक्ती आहे.' मुलांची फाटलेली पतंग दुरुस्त करून आणत मुलांच्या हातात देऊन ते जेव्हा गाणं गायला लागतात, "चला मुलांनो पतंग उडवू या" तेव्हा तर मुलं थक्कच होतात.मिस्टर बँक्स त्याच्या बँकेच्या नेहमीच्या रटाळ आणि कंटाळवाण्या कामातून मुक्त होतो आणि त्याच्या आत दडलेलं लहान मूल अचानक जागं होतं.त्यांच्यात नव्याने दिसून आलेली कमालीची प्रसन्नता आणि त्याचा खुललेला चेहरा बघून त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना वाटत होतं,आधीच्या आपल्या घरातलं उदासवाणं वातावरण कुठेतरी पळून गेलंय ! आता घरात भरून राहिलाय फक्त आनंद आणि सौहार्द !


ही एक काल्पनिक कथा आहे,हे अगदी खरंय ! पण आपल्यातला खेळकरपणा जपला गेला,तर त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर किती जबदरस्त आणि सकारात्मक प्रभाव पडतो,त्याचं या कथेत अतिशय सुंदर प्रकारे चित्रण केलं आहे.


आपल्यापैकी बहुतांश लोकांना लहानपणी खेळायचं कसं याचं औपचारिक शिक्षण कधीच दिलं जात नाही. आपणच अगदी नैसर्गिकपणे,अगदी स्वाभाविकपणेच खेळायला शिकतो.एक चित्र मनाशी उभं करून बघा.


लहान बाळाला कुकीऽऽ कुकीऽऽ असं म्हणत त्याची आई त्याच्याशी खेळतेय आणि ते बाळ निखळ आनंदात रमून गेलंय.

छोट्या मुलांचा एखादा गट लुटुपुटीचे काही खेळ प्रत्यक्षात ते सगळं घडतंय असं मनाशी कल्पून, त्यांचं जे काही ज्ञान आहे,ते त्यात ओतून अगदी समरसून सगळी वातावरण निर्मिती करत त्यात दंग झालेला आहे. Mihaly Csikszentminalyi म्हणतात,त्याप्रमाणे एखादं मूल जुन्या पुठ्ठ्यांचे चौकोनी तुकडे जमवून त्यातून स्वतःसाठी राजवाडा उभा करण्यासाठी धडपडत असतं,त्या वेळी ते किती एकाग्रपणे त्याचं काम करताना दिसतं,

तेही आपण अनुभवलेलं असतं.पण आपलं वय वाढत जातं,तशा गोष्टी बदलत जातात.आपल्या मनावर असं बिंबवलं जातं की,खेळणं ही अगदीच बिनमहत्त्वाची बाब आहे


त्यात फक्त वेळ वाया जातो.खेळत बसण्याची आपल्याला अगदीच गरज नसते.खेळण्याची आवड असणं म्हणजे पोरकटपणा! दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की,हे असे नकारात्मकता ठासून भरलेले संदेश येतात, ते विचारांना चालना देणारे खेळ खेळण्यासाठी जिथे उत्तेजन दिलं गेलं पाहिजे,अशाच ठिकाणांहून ! खरं म्हणजे खेळाच्या बाबतीत कुणाचीही गळचेपी होता कामा नये !


(खेळा - तुमच्यातल्या सुज्ञ बालकाला कवेत घ्या.

इसेंशियलिझम -ग्रेग मॅकेऑन - अनुवाद - संध्या रानडे,मायमिरर पब्लिशिंग हाऊस,)


ग्रीक शब्द Schole पासूनच School या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे.याचा अर्थ आहे,विश्रांतीचा किंवा फुरसतीचा वेळ.मात्र औद्योगिक क्रांतीच्या काळात उदयाला आलेल्या आपल्या आधुनिक शाळांनी मात्र विश्रांती किंवा फुरसतीचे क्षण ही संकल्पना पारच हद्दपार करून टाकली आहे. 


शिक्षणातून बराचसा आनंदही काढून घेतला गेला आहे. 


शाळांमधून मुलांच्या निर्मितीक्षमतेला वाव मिळावा यासाठी स्वतःचं आयुष्य वेचणारे सर केन रॉबिन्सन, यांच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आलीय ती म्हणजे, मुलांच्या निर्मितीक्षमतेला खतपाणी घालून ती फुलवण्याऐवजी शाळांचा मुलांमधली ती क्षमता मारून टाकण्याकडेच अधिक कल दिसून येतो.ते म्हणतात : "झटपट खाद्यपदार्थांसारखी (Fast Food) शिक्षण क्षेत्रातली झटपट ज्ञान या संकल्पनेत बसणारी संस्कृती शाळा विकत घेत सुटली आहे आणि ही संस्कृती 'फास्ट फूड' जसं आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतं, आपलं शरीर दुर्बल करून टाकतं,तशाच प्रकारे आपल्यातली ऊर्जा,आपल्यातलं चैतन्य या गोष्टींना दुर्बलतेकडे ढकलते आहे.माणसाने जे जे साध्य केलं आहे,ते त्याच्यातल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर साध्य केलंय आणि माझा असा ठाम विश्वास आहे की,ही नवी संस्कृती आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या मुलांना ज्या प्रकारचं शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो आहोत,त्याच्यासाठी अत्यंत धोकादायक आहे." त्यांच्या या बोलण्यात निश्चितच तथ्य आहे.


खेळांसारख्या गोष्टी अगदीच बिनमहत्त्वाच्या असतात, ही कल्पना आपण सज्ञान वयात,प्रौढत्वात पोचतो, तोपर्यंत आपल्या मनात अगदी रुजून गेलेली असते.


आणि त्यानंतर तिची पाळंमुळं अधिकाधिक घट्ट होत जातात.

विशेषतः आपण आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवेश करतो त्या वेळी ! यात खेदाची बाब ही आहे की, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच कंपन्या खेळाला उत्तेजन देतात.बाकीच्या नकळत का होईना,पण खेळाला कमी लेखतात.हेही खरं आहे की, काही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी निर्मितीक्षमतेला खेळ पूरक ठरतो,ही वस्तुस्थिती वरवर तरी मान्य करतात. पण त्यासाठी फारसा पुढाकार घेत नाहीत.

मात्र अजूनही अशा बऱ्याच कंपन्या आहेत,ज्या खेळाला पोषक ठरेल, खेळातूनच कर्मचाऱ्यांना संशोधनासाठी उत्तेजन देईल, अशा त-हेची संस्कृती स्वतःच्या कंपनीत रुजवण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावलं उचलत नाहीत.


या सर्व गोष्टींचं आपल्याला खरं म्हणजे जराही नवल वाटायला नको.कारण आधुनिक पद्धतीने काम करणाऱ्या संस्था जन्माला आल्या,त्याच मुळी औद्योगिक क्रांतीतून ! त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा पायाच मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन करण्याच्या विचारातून घातला गेलाय.


याही पुढे जाऊन विचार करायचा ठरवलं,तर असं लक्षात येतं की,सुरुवातीच्या काळातला कंपन्यांमधला अधिकारी वर्ग खेळाला उत्तेजन देणारं वातावरण अजिबातच न जोपासणाऱ्या लष्करापासून कामाची स्फूर्ती घेणारा होता.(आणि खरं सांगायचं तर लष्कराची भाषा अजूनही अनेक संस्थांमधून वापरली जाते. संस्थेतले 'आघाडीचे' कर्मचारी (Front line) असा उल्लेखही अगदी सहजपणे केला जातो. तसंच 'कंपनी' हा शब्दही लष्करातल्या सैनिकांच्या तुकड्यांसाठी वापरला जातो.) औद्योगिक पर्व हा शब्द खरं म्हणजे आपल्यासाठी कधीच भूतकाळात जमा झाला आहे. पण तरीही त्या वेळच्या चालीरिती, शत्या काळातल्या बांधकामाच्या रचना आणि पद्धती यांनी आधुनिक संस्थांमध्ये अजूनही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे.


खेळ ही आजही माझ्या दृष्टीने अशी गोष्ट आहे,जी फक्त आपल्या निखळ आनंदासाठी आपण करायची असते. कशासाठी साधन म्हणून किंवा काही तरी साध्य करायचं आहे,म्हणून तिचा वापर करायचा नसतो. 


मग ते पतंग उडवणं असो,संगीताचा आनंद घेणं असो किंवा बेसबॉल खेळणं असो.हे सगळं कदाचित अनावश्यक गोष्टी या सदरात मोडत असेलही.आणि बरेचदा त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं जातं ही वस्तुस्थिती आहे.पण खरं तर खेळ बऱ्याच दृष्टींनी आवश्यक असतो.स्टुअर्ट ब्राऊन हे 'नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर प्ले' या संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांनी जवळ जवळ सहा हजार लोकांच्या 'खेळाच्या इतिहासाचा' सखोल अभ्यास केला आहे आणि त्यातून त्यांनी असं अनुमान काढलं आहे की,तुमच्या वैयक्तिक आरोग्यापासून,ते तुमच्या लोकांशी असलेल्या संबंधांपर्यंत आणि तुमच्या शिक्षणापासून ते तुमच्या कामाच्या ठिकाणी नवसंशोधनाच्या बाबतीतली तुमची क्षमता वाढवण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत तुम्हाला अगदी जाणवेल इतक्या मोठ्या प्रमाणावर सक्षम करण्यामध्ये खेळाची भूमिका अत्यंत प्रभावी ठरते.ते म्हणतात, 


"खेळ हा तुमच्या मेंदूचा लवचीकपणा,ग्रहणशक्ती आणि तुमच्यातली निर्मितीक्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करतो." ते थोडक्यात असं सांगतात,"खेळाइतक्या सहजतेने दुसरी कुठलीच गोष्ट मेंदूला प्रज्वलित करू शकत नाही."


अनावश्यकतावादी


खेळ ही क्षुल्लक,बिनमहत्त्वाची बाब समजतो.


असंही समजतो की खेळ ही एक निर्मितीशून्य पद्धतीने वेळ वाया घालवणारी गोष्ट आहे.


आवश्यकतावादी


खेळाचं महत्त्व माहीत असतं.


त्याला हेही माहीत असतं की,खेळामुळे शोध घेण्यासाठी चालना मिळते.


खेळ आणि मन


खेळ हा सगळ्यांच्याच आयुष्यात किती महत्त्वाचा आहे, हे सांगताना कितीही बोललं,तरी ते कमीच आहे.प्राणी जगताचा सखोल अभ्यास केला गेला,त्या वेळी असं लक्षात आलं आहे की,खेळ हा बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य वाढीस लागण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.त्यामुळेच सर्व प्रकारच्या प्रजातींचं अस्तित्वही टिकून राहू शकतं.बॉब फॅगन हे संशोधक पंधरा वर्षं 'ग्रिझली बेअर' जातीच्या अस्वलांचा सातत्याने अभ्यास करत होते.त्यांना असं आढळून आलं आहे की, जी अस्वलं भरपूर खेळत होती,ती दीर्घकाळ जगत होती.याचं कारण काय असं त्यांना विचारलं,तेव्हा ते म्हणाले,या जगाने सातत्याने पुढे टाकलेली वेगवेगळी आव्हानं आणि इथली अशाश्वतता यांना सामोरं जाणं, वरचेवर बदलणाऱ्या या ग्रहावर टिकून राहणं,या गोष्टी त्यांना खेळामुळेच शिकता आल्या."


जॉन पँकसेप यांनी त्यांच्या Affective Neuroscience: The Foun- dations of Human and Animal Emotions यात साधारण अशाच प्रकारचा निष्कर्ष काढला आहे.त्यांनी असं लिहिलं आहे की,एक गोष्ट अगदी खात्रीलायकपणे सांगता येते,ती म्हणजे प्राणी खेळत असतात,त्या वेळी अधिक लवचीकपणा आणि निर्मितीशील पद्धती वापरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो."


मात्र तरीही,स्टुअर्ट ब्राऊन लिहितात,मनुष्य जात ही सर्वात अधिक खेळणारी आहे आणि सर्वोत्तम खेळाडूही आहे.आपण खेळण्यासाठी घडलो आहोत आणि सर्वोत्तम खेळाडू आहोत.


शिलल्क राहिलेला भाग..पुढील लेखामध्ये…!


महत्त्वाची नोंद वाचणीय - पुस्तकाचं संपादन करणारे एक जण म्हणतात,तसं,वाचकांचे आयुष्य शक्य तेवढं आरामदायी करणं,हेच माझं काम आहे.कोणत्याही पुस्तकातला महत्त्वाचा संदेश किंवा त्यातून काही घेण्यासारखं असेल,तर ते वाचकांपर्यंत शक्य तितक्या स्पष्टपणे पोहोचवणे हेच माझे उद्दिष्ट असतं.