* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: रमणीय वार्धक्य / A delightful old age

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/१/२५

रमणीय वार्धक्य / A delightful old age

वयावर विवेचन करण्याआधी मला त्वचेवर बोलायला पाहिजे.पण त्वचेचा झाडाशी काय संबंध ?आधी मी हा विषय मानवी दृष्टिकोनातून मांडतो. 


आपल्या शरीराला बाहेरच्या जगापासून सुरक्षित ठेवण्याचे कार्य त्वचेकडून होतं.त्वचेमुळे शरीरातील द्रव्ये आणि अवयव आत बंदिस्त राहतात.हे करत असताना त्वचेतून आर्द्रता आणि वायूसुद्धा शोषले जात असतात.याव्यतिरिक्त त्वचेमुळे विषाणूंपासूनही सुरक्षा मिळते. त्वचा स्पर्शाला संवेदनशील असते.काही स्पर्श हवेहवेसे वाटतात तर काही स्पर्शातून वेदना होतात आणि वेदनादायी स्पर्शाला बचावात्मक प्रतिसाद दिला जातो.


त्वचेची सक्षम भूमिका वयोमानपरत्वे कमी होत जाते. त्यावर सुरकुत्या येतात आणि समोरच्याला आपल्या वयाचा अंदाज येतो.त्वचेचे पुनरुज्जीवन फारसे आकर्षक नसते.प्रत्येक माणूस रोज ०.०५ औंस त्वचा झडत असतो दररोज त्वचेचे दहा अब्ज कण गळून पडतात.म्हणजेच वर्षाकाठी आपली एक पाउंड त्वचा गळून जाते.हे काही फार आकर्षक नसतं,पण मेलेली त्वचा झडून जाणं हे देहासाठी उपयुक्त असतं.त्यामुळे आपले बाहेरील अवयव निरोगी राहतात. लहान असताना आपली वाढ होऊ देण्याकरता त्वचा झडणं आवश्यक असते.अशा प्रकारे जुनी त्वचा झडून नवीन लवचीक त्वचा आली नसती तर आपण फुटून गेलो असतो.


पण या सगळ्याचा झाडाशी काय संबंध? त्यांच्यातही असंच असतं.फक्त त्यांच्याबाबतीत बोलताना भाषा बदलते.

बीच,ओक,स्प्रूस आणि इतर झाडांच्या त्वचेला 'साल' म्हणतात.

मानवाप्रमाणेच झाडाचं सालही आतल्या अवयवांना संरक्षण देतं.साल नसतं तर झाड सुकून गेलं असतं.बुरशीला सशक्त ओलसर लाकडात तग धरता येत नाही,पण तीच बुरशी या कोरड्या लाकडाला खाऊन टाकते.कीटकांनाही ओलसर लाकूड फारसं रुचत नाही.साल शाबूत असलं की त्यांना झाडावर आक्रमण करता येत नाही.आपल्या शरीरात जेवढं पाणी असते जवळजवळ तितकंच झाडात असतं. म्हणून साल असलेल्या झाडाला कीटकांपासून संरक्षण मिळतं कारण पाणी असलेल्या झाडात ते गुदमरून मरून जातील.सालाला इजा ही माणसाच्या त्वचेला जखम होण्याइतकीच त्रासदायक असते. 


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन


आणि म्हणूनच झाडेही आपल्यासारख्याच संरक्षण प्रक्रियेचा वापर करून सालाला इजा होऊ देत नाहीत. दर वर्षी सशक्त झाडाच्या घेरात अर्धा ते एक इंच वाढ होते.पण यामुळे सालात फट पडणार नाही का? खरंतर पडली पाहिजे.असे होऊ नये म्हणून ते विशाल वृक्ष आपली त्वचा सारखी पुनरुज्जीवित करीत असतात.यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात कात टाकावी लागते.

आपल्यापेक्षा झाडाच्या सालीचे ढलपे मोठे असतात.ते आठ इंचापर्यंत असू शकतात.वादळी वाऱ्यानंतर झाडाखाली सालीचे मोठे तुकडे पडलेले दिसतात.पाईन वृक्षाचे लाल साल मातीत सहज दिसून येते.पण प्रत्येक झाड अशाप्रकारे कात टाकत नाही. 


काही झाडं सतत कात टाकत असतात.(अशांना एँटी-डॅडरफ शाम्पू द्यायला हवा !) आणि काही सांभाळून कात टाकतात.कोण कशाप्रकारे कात टाकतं हे झाडाकडे बघून लगेच कळून येतं.

आपल्याला जो दिसतो तो सालाचा सर्वांत बाहेरचा भाग असतो.

मृत पेशींपासून बनलेला झाडाचा हा भाग एक सुरक्षित कवच तयार करतो.आणि या सालामुळे झाडाची प्रजाती ओळखू येते.

मोठ्या वृक्षात हे जास्त स्पष्ट दिसतं कारण सालीला विशिष्ट प्रकारे सुरकुत्या पडतात.तारुण्यात या झाडांचं साल बाळाच्या कातडीसारखं नितळ असतं.वय वाढल्यावर त्यांना सुरकुत्या येऊ लागतात.झाडाला खालपासून सुरकुत्या पडू लागतात आणि वयाबरोबर ही प्रक्रिया वाढू लागते.वय वाढलं की सुरकुत्या खोल जाऊ लागतात.प्रत्येक प्रजातीमध्ये याचा वेग बदलतो.पाईन, ओक,बर्च आणि डग्लस फर मध्ये हे लहानपणातच सुरू होतं.पण बीच आणि सिल्व्हर फरचं साल अनेक वर्षं नितळ राहतं.झाड आपली कात किती वेगाने टाकतं यावर सर्व अवलंबून असतं.


दोनशे वर्ष आपली चंदेरी-करडी साल गुळगुळीत ठेवणाऱ्या बीच वृक्षाच्या सालीचे पुनरुज्जीवन इतर वृक्षांच्या मानाने भरभर होते.

यामुळे त्यांची कात पातळ आणि खोडाला चिकटून राहते आणि म्हणून त्यात भेगा पडत नाहीत.सिल्वर फरचे ही असेच असते.पण पाईन मात्र याबाबतीत आळशी असतो.काहीतरी अज्ञात कारणांमुळे त्यांना आपल्या सालापासून वेगळं व्हायचं नसतं.कदाचित त्यामुळे मिळणारी सुरक्षा त्यांना हवीहवीशी वाटत असेल.कारण काही का असेना,ते आपली कात अतिशय संथ गतीने टाकतात.त्यामुळे त्यांचं साल जाडजूड आणि कणखर होतं.याचा अर्थ त्यांच्या सालीच्या सर्वांत बाहेरील थर त्यांच्या तारुण्यात तयार झालेला असतो आणि त्याच्या भेगा नवीन बनलेल्या आतल्या सालीपर्यंत पोचतात.तर जेवढ्या भेगा खोल असतील तेवढं संथ गतीने झाड आपली कात टाकतं.वयाप्रमाणे हे झाडाचं असं वागणं अधिकाधिक दिसू लागतं.


प्रौढ अवस्थेत आल्यावर हीच गोष्ट बीच वृक्षांमध्येही दिसू लागते.

या वयात त्यांच्या सालाला खालपासून सुरकुत्या पडू लागतात.या सुरकुत्यांमध्ये पावसामुळे आर्द्रता असते आणि इथे शेवाळ्याची वसाहत स्थापली जाऊ लागते.शेवाळ्याची हिरवाई किती उंचीवर पसरली आहे,यावरून बीच वृक्षाच्या वयाचा अंदाज घेता येतो, शेवाळं जितकं जास्त उंच तितकं झाडाचं वय जास्त.


प्रत्येक झाड वेगळं असल्यामुळे त्याला सुरकुत्या कधी पडणार यातही फरक पडतो.काही झाडांना तारुण्यातच सुरकुत्या येतात तर काहींना उशिरा.ज्या जंगलाचं मी व्यवस्थापन करतो तिथे काही शंभर वर्षं जुने बीच वृक्ष वरपासून खालपर्यंत खडबडीत सालाने घेरले आहेत.हे जनुकीय ठेवणीमुळे होतं की झाडाच्या वागणुकीमुळे यावर संशोधन व्हायला हवं.पण यातील काही गोष्टी मात्र मानवी परिस्थितीशी जुळतात.आपल्या बागेतल्या पाईन वृक्षाला खोल भेगा असतात हे काही फक्त वयामुळे नाही.शंभर वर्षे वयाला नुकतेच पोहोचल्यावर ते तारुण्यातून प्रौढावस्थेकडे जात असतात.इथले वनरक्षकाचे घर १९३४ साली बांधले आहे.

तेव्हापासून छान ऊन येणाऱ्या जागेत हे पाईन वाढत आहेत.घर बांधण्यासाठी जेव्हा काही वृक्ष काढले गेले तेव्हापासून त्यांना जास्तच ऊन मिळत आहे.जास्त ऊन,जास्त सूर्य म्हणजे जास्त अतिनील रेडिएशन (उत्सर्जन).या उत्सर्जनाचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि झाडातही तेच होते.झाडाच्या सालीचा सर्वांत बाहेरचा भाग कडक असतो म्हणूनच त्याला जास्त भेगा जातात


मी वर सांगितलेले हे बदल कधीकधी 'त्वचेच्या रोगा' मुळे होऊ शकतात.जसं यौवनातल्या मुलांना आलेल्या मुरूम पुटकुळ्यांचे डाग आयुष्यभर राहू शकतात तसंच झाडाच्या सालीवरही बार्क माशी आक्रमणाचे डाग राहू शकतात.अशा वेळेस सुरकुत्या पडत नाहीत पण सालीवर हजारो बारीक भोकं पडतात आणि वार्धक्यापर्यंत तशीच राहतात.काही आजारी झाडांना त्वचेवर चिघळलेल्या ओल्या जखमा होतात.यामध्ये सूक्ष्मजिवाणू शिरतात आणि तो भाग काळा पडतो. त्वचा ही माणसाच्या आरोग्याचा आरसा असते,हे काही फक्त मानवाला लागू नाही.


जंगलाच्या परिसंस्थेत वयस्कर झाडांची एक विशिष्ट भूमिका असते.मध्य युरोपमध्ये एकही जुनं जंगल राहिलेलं नाही.एका ठिकाणी दोनशे ते तीनशे वर्ष जुनी झाडं आहेत तेच काय ते एक उरलं आहे.हे जोपर्यंत अजून वयोवृद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला कॅनडाच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्राचीन झाडांकडून त्यांचं महत्त्व समजून घ्यावं लागेल.


मॉन्टरियलच्या मॅक गिल विद्यापीठाचा झो लिंडो याने पाचशे वर्षं जुन्या सिटका स्प्रूस झाडावर संशोधन केलं. सर्वप्रथम तिला सगळ्या खोडांवर आणि फांद्यांच्या बेचक्यांमध्ये अतिशय जुनं शेवाळं सापडलं.यामध्ये नील-हरित शेवाळ्याने आपली वसाहत केली होती.हे शेवाळं हवेतील नत्र घेऊन त्यावर प्रक्रिया करतात आणि झाडांना वापरता येईल अशा स्थितीत त्याचं रूपांतर करतात.पाऊस आला की हे नैसर्गिक खत झाडाच्या मुळापाशी जाऊन पडतं.अशाप्रकारे वयस्कर झाडामुळे जंगलाला नैसर्गिक खत मिळतं आणि नवीन रोपांना पोषण.तारुण्यातल्या झाडांवर शेवाळं नसतं कारण शेवाळं वाढायला काही दशकं लागतात.


सुरकुत्या आणि शेवाळाव्यतिरिक्त झाडात आणखी काही बदल होतात ज्यामुळे त्याचं वय दिसून येतं. उदाहरणार्थ,झाडाच्या टोकाचं आच्छादन पहा.माझ्याही डोक्यावर असंच आच्छादन आहे पण आता ते विरळ होत चाललं आहे.झाडांच्या सर्वांत उंच फांद्यांवर ही अशीच परिस्थिती असते.झाडांच्या प्रजाती प्रमाणे साधारण शंभर ते तीनशे वर्षांत त्यांची नवीन वाढ कमी कमी होत जाते.पानझड करणाऱ्या झाडांमध्ये फांद्या खुरट्या होत गेल्याने वेड्यावाकड्या वक्र, अर्थराइटिस झालेल्या बोटांसारख्या दिसतात. 


सूचीपर्णी झाडांच्या सरळसोट खोडातल्या सर्वांत वरच्या भागात होणारी वाढ जवळजवळ थांबून जाते.या वयात स्प्रूसची वाढ जवळजवळ पूर्णपणे थांबते पण सिल्वर फर मात्र वाढत राहतात.त्यांची वाढ वरच्या फांद्यांमध्ये न होता खालच्या फांद्यात झाल्याने या झाडाचा वरचा भाग एखाद्या मोठ्या पक्ष्याने आपले मोठे घरटे झाडावर बांधल्या सारखा दिसू लागतो.जर्मनीत करकोच्यांची घरटी मुबलक असतात,त्यामुळे यालाही ते करकोच्याचे घरटे म्हणतात.


पाईन आपली ही वाढ सर्व बाजूनी सारखी नियमित करतो,त्यामुळे त्यांचे आच्छादन एकसारखे राहाते.पण प्रत्येक झाड काही काळानंतर आपली उंची वाढवणं थांबवतं.


त्यांची मुळे आपल्या वाहिन्यातून पोषणद्रव्ये वरपर्यंत पोचवणे बंद करतात कारण यात खूप ऊर्जा खर्ची पडते,जे वार्धक्यात शक्य होत नाही. मग उंच वाढण्याऐवजी झाड आडवं वाढू लागते.(काही माणसांचंही असंच होतं,नाही का?) शक्ती कमी झाल्यामुळे प्रौढ वयात गाठलेली उंची सांभाळणं आता झाडाला जड जाते.


सर्वप्रथम सर्वांत वरच्या भागापर्यंत खाद्य पोहोचू शकत नाही त्यामुळे तिथल्या फांद्या मरून जातात.आणि ज्याप्रमाणे वयस्कर माणसाचे वजन कमी होतं तसंच झाडांचंही होऊ लागतं.वादळ वाऱ्याने या मेलेल्या फांद्या मोडून गेल्या की झाड थोडं ताजंतवानं दिसू लागतं.दरवर्षी हे होत जातं,त्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही.काही दिवसांनी फक्त खालच्या फांद्यांची दाटी राहते.काही वर्षांत त्याही मरून जातील पण झाडावर तशाच टिकून राहतील.

आता मात्र झाडाला आपलं वार्धक्य लपवता येत नाही.


अशा वेळेस झाडाच्या आयुष्यात पुन्हा सालाला महत्त्व येते.त्या वरच्या छोट्या ओलसर जखमा बुरशीला आमंत्रण देतात.आणि काही काळातच बुरशी आपली बशीसारखी दिसणारी फळं तयार करतात.ही बुरशी सालाच्या खाली जाऊन लाकडाच्या आतपर्यंत पोचते.काही प्रजातीमध्ये ती झाडाची साखर खाऊ लागते तर काही प्रजातीतून सेल्युलोज आणि लिग्निनसुद्धा फस्त केले जाते.यामुळे झाडाचा सांगाडा आता कुजू लागतो आणि त्याची पावडर होऊ लागते.इतके वर्षे झाडांनी या प्रक्रियेपासून स्वतःचा बचाव केलेला असतो.जखमेच्या दोन्ही बाजूने लाकडाची वाढ होत राहते आणि त्याच्या जाड कडा तयार होतात.यामुळे अजून काही दिवस तरी थंडीच्या वाऱ्यापासून झाडाच्या या कमकुवत भागाचे संरक्षण होते.पण तो दिवस उजाडतो ज्या दिवशी सगळं संपून जातं.


झाडाचा बुंधा मोडतो आणि झाडाचं आयुष्य संपतं.अशा वेळेस खालची रोपटी 'गेला बुवा एकदाचा!' म्हणत निःश्वास सोडत असतील कदाचित ! येणाऱ्या काळात त्यांची वाढ पटपट होऊन वरचा प्रवास सुरू होईल.पण त्या वठलेल्या झाडापासूनही जंगलाला अजून शंभर एक वर्षे तरी सेवा मिळत राहणार असतात.