* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: गोतावळा / diving

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३/१/२५

गोतावळा / diving



नियोजन कशासाठी चाललंय हे तिच्या समजण्यापलीकडचं होतं….. कथा पुढे सुरू...!!


ज्यांचं तोंड बघून वर्षे झाली,ज्यांच्याशी फोनवरसुद्धा बोलणं होत नाही,त्यांच्यासाठी इतका खरेदी कशाला?आनंद फक्त मिळवायचा नाही,तर तो आपल्या लोकांसोबत वाटल्यास द्विगुणित होतो.

यावर्षी आपली दोन्ही मुलं सहकुटुंब इतके दिवस रहायला येणार म्हणून आई-वडिलांना काय करू अन् काय नको झालं होतं.घर सारवून नीट लावून घेतलं. 


अंथरुण-पांघरुण धुवून वाळवून आणलं.पोरांच्या आवडीचं गोडधोड करायला घेतलं.बहिणींना,मावशांना रहायला बोलावलं.

पोरांनी त्यांच्या मामाच्या गावी जायचा बेत केला होता.आईच्या हातचं आवडणारं सगळे पदार्थ आधीच सांगून ठेवलेले.आल्यावर रोज काहीतरी स्पेशल करायचा बेत ठरला.गावाच्या रस्त्याला धावणाऱ्या गाड्या गाव जसजसं जवळ करतील,तसं आठवणींचा पूर चढायला लागला.बायको,पोरांना हे सगळं नवीन होतं;


पण सत्यजित आणि त्याच्या भावाला आपण चुकलेल्या वाटेवर परत फिरल्यासारखं वाटत होतं.घरी पोहोचल्यावर आपुलकीनं झालेलं आदरातिथ्य पोरांना नवखं वाटत होतं.


गाडीतनं उतरताच गल्लीतल्या आया-बाया घरातनं डोकावून बघत होती. पोरं-बाळं गाडीभोवती घुटमळत होती. कधीही न बघितलेले चेहरे हसून कुरवाळत होते. डोकीवरून,पाठीवरून हात फिरवत होते.कोणी गालगुच्चे घेत होतं,तर कोणी तपकीर लावलेल्या तोंडानं मुका घेत होतं.त्यामुळं पोरांची तोंडं किळसवाणी झाली


एखादा बापय तंबाखू मळून थापायचा आणि त्याचा धुसकारा उडाला की पोरांना ठसका यायचा. 


घरादारातनं बिनधास्त फिरणाऱ्या कोंबड्यांचं कौतुक वाटायचं;पण मधेच एखादी कोंबडी बुळकांडी सोडायची.मग आजी कागदाच्या तुकड्यानं कोंबडीची शिट उचलून भुई पुसून कागद फेकायची. 


मळकट-कळकट कपड्यात शेतावर जाणारी मंडळी विचारपूस करायची.डोक्यावर वैरणीचा भारा घेऊन अनवाणी खड्ड्यातनं चालत येणाऱ्या बाया-बापड्यांच्या पायाला लागलेला चिखल बघून पोरं विचारायला लागली,ही लोकं चप्पल का घालत नाहीत. यांच्या पायाला खडे टोचत नाही का?यांना उन्हात काम करताना चटके कसे बसत नाहीत?


आयुष्यभर परिस्थितीचं चटकं सहन केल्यावर ज्यांच्या काळजात दुःख खोलवर रुतलंय त्यांना कसलं उन्हाचं चटकं बसतील अन् कसला काटा किंवा खडा रुततोय. शरीराचं अन् जिभेचं चोचलं पुरवणाऱ्या शहरी मंडळींना शेतकऱ्यांच्या वेदना कशा जाणवतील?


म्हशीची धार कशी काढतात,हे दाखविताना सत्यजितनं मुलांना जनावरांच्या गोठ्यात आणलं.आजोबा खराट्यानं शेण पाठीमागं सारत होते.बैलांच्या समोर पाण्याची बादली ठेवली होती.इतक्यात एक म्हैस चिप्पाळली.त्याच्या शेणाच शिंतोडं सगळ्यांच्या अंगावर उडालं.शेणाच्या वासानं मुलं नाक धरून मागं सरकली


हे बघून आजोबा हसायला लागलं.त्यांची कापडं आधीच शेणानं आणि मातीनं माखलेली.धाकटी मुलगी बडबडली,"किती डर्टी आहे..?" सत्यजितनं उत्तर दिलं, "ती त्यांची ड्युटी आहे..."


"व्हॉट नॉन सेन्स इज दिस?"


"धिस इज शेणस्;याला शेण म्हणतात.यानेच गोवऱ्या थापतात.त्या जाळून जेवण शिजवितात.त्याची राख दात घासायला वापरतात.

त्या राखेनं घासलेलं दात कुठल्याही टूथपेस्टपेक्षा स्वच्छ असतात.आम्ही लहानपणी या राखेनंच दात घासत होतो..."


"हॉट रब्बीश..."


"रब्बीश नाही,रब करायचं,घासायचं.या शेणानं जमीन सारवायचो.

आम्हाला शाळेत भुई सारवायला लावायचे. तुमच्यासारखं बेंच नव्हते बसायला.आम्ही भुईवर बसायचो."


सत्यजित जे काही सांगायचा ते मुलांना नवलच वाटायचं.हात धुवून आजोबा कासांडी घेऊन धार काढायला बसले.पहिला तांब्या भरल्यावर तो सत्यजितला दिला.धारोष्ण दूध मुलांना प्यायला दिलं. आकडी दुधाचा वास आणि चव मुलांना खूप आवडली. दूध काढण्यासाठी लागणाऱ्या कष्टाची जाणीव त्यांना नव्हती.पैसे दिलं की डेअरीतून दुधाची पिशवी मिळते इतकं सोप्पं असतं दूध आणणं.गंमत म्हणून पोरांच्या डोक्यावर वैरणीचं ओझं ठेवलं,तेव्हा ती भेलकांडायला लागली.मुलांना या सगळ्यांची गंमत वाटायची.गावात पिझ्झा,बर्गर नाही;पण आजीनं बनविलेली भाकरी चुलीवर कडक भाजली की त्याची चव पिझ्झापेक्षा भारी होती.कोवळ्या ज्वारीचा आणि हरभऱ्याचा हुर्डा, मीठ,लिंबू लावून चरचरीत लागायचा.शेताच्या बांधावर बसून ऊस खाताना सत्यजितला बालपण आठवलं. 


आजोबांनी विळ्यानं सोलून फक्त उसाचा गरा नातवंडांना खायला दिला,तरी तो पोरांना चावता येत नव्हता.गवत कापताना आजोबांच्या हाताला विळ्यानं कापलं होतं.त्या बोटाला जाडजूड फडक्यात हळद गुंडाळून लावली होती.त्याच हातानं ऊस सोलताना आजोबांच्या हाताला कळ यायची.


ते मधेच हात झाडायचे;पण नातवाला ऊस सोलून देण्यात त्यांना आनंद वाटत होता.बोटाला बांधलेला मळकट कापडाचा तुकडा बघून नातवानं विचारलं,


"आजोबा,तुम्ही बँडेज का नाही लावलं ?"


यावर आजोबा हसतच म्हणाले,"बाळ,शेतात काम करताना अचानक कापलं तर तिथं कुठनं आणणार बँडेज ? तुझ्या आजीनं पटकन् पदराचा तुकडा फाडला अन् गुंडाळला.औषध म्हणून पूर्वी रानातली माती लावली तरी जखम बरी व्हायची.आता पिकांवर औषध मारून आणि खत टाकून मातीचा कस गेलाय.तुझी आजी तर पूर्वी मातीचा खडा खायची इतकी मातीला चव होती." माती खायची म्हटल्यावर पोरांना विचित्र वाटलं म्हणून त्यांनी विचारलं,

मग त्यांच्या तोंडात, पोटात जंतू जात नव्हते का?"


"कसलं जंतू जातात ? पुन्हा तपकिरीचा बार भरला की, सगळं जंतू बेशुद्ध पडायचं."आजोबा हासतंच म्हणाले.


"तपकीर..! ते काय असतं?" पोरांनी उत्सुकतेनं विचारलं.


"तो तंबाखूचा एक प्रकार आहे.किराणा दुकानातच मिळते;पण त्याचा वास आणि चव काय चांगली नसते. त्याची नशा होते आणि व्यसन लागतं. ्त्याच्या वासानं डोळं भनभनतात."


"तरीही आजी तपकीर वापरायच्या आणि तुम्ही काही बोलत नव्हता?" पोरांनी विचारलं.


"शेतात काम करताना एकमेकांच्या संगतीनं लागली सवय.

कामाचा थकवा घालवायला बायकांना तपकीर आणि पुरुषांना तंबाखूची सवय लागते.खरं तर ते चांगलं नाही;पण एकदा सवय लागली की सुटत नाही.म्हणून वाईट गोष्टींची संगत करू नये.हा घ्या गरा. याची सवय लागत नाही..." असं म्हणत आजोबांनी विषय बदलला.


चार-पाच दिवस पोरांनी धमाल केली.सगळी कामं सोडून आजी-आजोबा पोरांना,नातवांना काहीबाही करून घालण्यात रमली होती.परत जाण्याची तयारी सुरू झाली तसा आजी-आजोबांचा चेहरा उतरला. 


पोरांना देण्यासाठी गूळ,शेंगा,तांदूळ यांची बांधाबांध सुरू झाली;

पण मनातील खिन्नता डोळ्यांत दिसत होती. इतकी वर्षे नजरेसमोर नसणारा गोतावळा अचानक आठ-दहा दिवस रहायला आला.घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटत होतं.नातवंडांच्या कल्ल्यात भिंतीसुद्धा बोलायला लागल्या होत्या.


शिकल्या सवरल्या पोरांनी कामधंद्यासाठी गाव सोडलं.त्यांना गावाची पांढरी परकी अन् घरं पोरकी झाली.पोटापाण्याच्या नादात पोटची पोरं दूर गेली. 


त्यांनी शहरात जाऊन मोठ्या पगाराची नोकरी केली. बक्कळ पैसा कमवला.घर, गाडी घेतली.चांगलीचुंगली कपडे घेतात.हॉटेलात जेवायला जातात.विमानानं फिरतात.जे गावात राहून कधीच मिळालं नसतं,ते सगळं सुख अनुभवतात;पण गावातल्या गोतावळ्यात राहून मिळणारं सुख त्यांना अनुभवता आलं नाही. 


सत्यजितच्या वर्गातला रंगा जास्त शिकला नाही.तो गावात राहतो.शेजापाजारच्या गावात आठवड्याच्या बाजारात भाजीपाल्याचा व्यापार करतो.शेती करतो. त्याची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात.रंगाची बायको अधून-मधून सासू-सासऱ्यांसोबत हुज्जत घालते.भांडणं होतात;पण रोज रात्री एकाच छताखाली असतात.आदल्या रात्री भांडण झालं,रुसवा फुगवा झाला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून एकत्र चहा पितात.इतकी वर्षं रिकामं असणारं घर अचानक भरून गेलं आणि आज परत रिकामं होणार,या विचारानं आजी-आजोबांना भरून आलं. 


पोरांना निरोप देताना हसत-हसत द्यावा.डोळ्यात पाणी आणायचं नाही,असं आजीनं मनोमन ठरवलं.लांबच्या प्रवासाला जाताना पोरांना अपशकून नको असं आजोबा म्हणाले.निरोपाच्या हातवाऱ्या करत गाड्या निघून गेल्या.त्याच्या वाटेवर उडणारा धुरळा डोळ्यांत गेल्यानं आजी-आजोबांनी डोळं पुसलं. 


सत्यजित जाताना जमलेलं भाऊबंद आपापल्या घरी गेलं.रिकामं घर दोघांना खायला उठलं.आजोबांनी शेतात जनावरांना चारापाणी करीत वेळ घालवला. आजी मात्र तोंडाला पदर लावून चुलीसमोर गप्प बसून होती.दुपारचं उरलेलं जेवण संध्याकाळी पुरवून खायचं म्हणून तिनं स्वयंपाक केला नाही.लांबचा प्रवास करून घरी पोहोचायला सत्यजितला उशीर झाला. 


प्रवासात कंटाळल्यामुळं बायकोनं हॉटेलात जेवणाचा बेत केला.पोरांनी छान पिझ्झाची ऑर्डर दिली. सत्यजितनं सुखरूप पोहोचलो म्हणून आई-बाबांना सांगायला फोन केला.पोरांच्या फोनची वाट बघत बसलेल्या म्हातारा-म्हातारीनं जेवायला वाढून घेतलं. आठ-दहा दिवस गोतावळ्यात बसून सवय लागलेल्या या दोघांना जेवताना गदगदून आलं.पुढ्यात भरलेलं ताट होतं; पण तोंडात घास फिरत होता.दोघांच्याही डोळ्यांत पाणी तरळलं होतं;पण पुसायला गोतावळा नव्हता.


०१.०१.२५ या कथेतील दुसरा भाग…