* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३१/३/२५

पांडूतात्या / Pandutatya

दिसभर ढेकळं तुडवत बैलांच्या मागनं चालून चालून दमलेल्या पांडूतात्यानं दिस मावळायला आल्यावर औत सोडलं.बैलं दावणीला बांधली. उन्हातान्हात नांगर वढून वढून बैलंबी दमली हुती. ढेकळात ठेचकाळून तात्याचं पाय भरून आलं हुतं. त्याकडं दुर्लक्ष करत तात्यानं कावड घिऊन हिर गाठली.कावडीनं दोन हेलपाट्यात चार बारड्या पाणी आणलं.दोन्ही बैलास्नी आणि म्हशीला पाणी पाजलं.त्येंच्या म्होरं वैरण टाकली आणि मग तंबाखू मळीत मेडीला टेकून निवांत बसला.तेवढाच काय तो त्येच्यासाठी आराम.नायतर हातरुणावर पाठ टेकूपतूर त्येचं काम काही संपत नव्हतं.

घरला जायचं,भाकरतुकडा खायचा,कुत्र्यासाठी भाकरी बांधून घ्यायची आणि परत वस्तीवर झोपायला यायचं,हा त्येचा रोजचा नेम.वैरण ठेवलेल्या बाजूला दोन मेडीच्या मधे माच्या बांधल्याला.त्यावर पिंजार टाकून गुबगुबीत गादी केल्याली.पिंजारावर घोंगडं टाकलं की ऊब यायची.उशाला पिंजाराची पेंडी ठेवल्याली.त्येच्याखाली चुना-तंबाखूचा बटवा असायचा.तात्याची जगायेगळी गादी हुती ती. तंबाखू मळून झाल्यावर बटवा परत जाग्यावर ठेवणार तवर वरच्या बांधावरनं हाक आली, 


"पांडूतात्या... ओ... तात्या..."


"का रं... कोण हाय?" तात्यानं इचारलं.


"मी हाय नामू... तुमच्या घरात भांडणं लागल्याती.या लवकर." शेजारच्या नामूआण्णांनं सांगितलं, तसा पांडूतात्या हालला.

टाविल खांद्यावर टाकला आणि वाटंत कुठंबी न थांबता थेट घर गाठलं.


घरात त्येची कारभारीन आणि थोरल्या भावाची मालकीण जोरानं भांडत हुत्या.निमित्त काय तर तात्याच्या सात वर्षाच्या लेकान फेकल्याला खडा थोरल्या भावाच्या कोंबडीला लागला हुता.कोबंडी काय मेली नव्हती;पण भावाची बायको रामानं लालेलाल झाली हती.तिनं पोराला थोबाडात हाणली तसं भांडाण पेटलं,ते वाढत वाढत रानाच्या वाटणीवर गेल.


दादा आणि वहिनी आपल्या बायकोसोबत हातवारे करून भांडताना बघून तात्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.म्या घरात नसताना तुमी माझ्या लेकराला मारलसा का,असं म्हणत तात्याचा पारा चढला तसं दादानं दारामाग ठेवल्याली कुराड तात्याच्या अंगावर उगारली.बरं झालं नामूआण्णा मागच्या अंगाला हत म्हणून.त्येंनी तशीच कुराड

हिसकावून घेतली.बाकीच्यांनी दोघास्नी आपापल्या घरात ढकललं.दाराला बाहेरन कडी लावली.थोडा वाडूळ तोंडाची बडबड चालूच हुती.मग नामून थोरल्या गड्याच्या नादी लागू नकोस म्हणून पाडूंतात्याची समजूत काढली.एकमेकीला शिव्या हासडत दोघी जावा जावांनी भाकरी थापल्या. कालवण शिजलं नव्हतं.भांडणामुळं येळ निघून गेली हुती.

वातावरण निवाळल्यावर नामूआण्णा निघून गेलं.तात्यांनं न्हानीत चूळ भरली.दुधात दोन भाकरी कुस्करून त्या वरापल्या.कुत्र्यासाठी भाकरी बांधून घेतली.कंदिलाची वात मोठी केली अन् तो वस्तीवर झोपायला निघाला.


रानाच्या वाटणीत टिचभर बांध इकडे-तिकडं झाला आसल म्हणून थोरल्या भावानं कुराड घिऊन अंगावर यावं आणि कोंबडीला खडा लागला म्हणून वहिनीनं पोराला थोबाडीत मारावी,हे काय तात्याला पटलं नव्हतं.त्येचं डोस्कं रागानं भणभणत हुतं. वस्ती जवळ येईल तसं कुत्र्याचा भुकण्याचा आवाज कानावर येताच तात्या भानावर आला. आज लईच येळ झाल्यामुळं कुत्रं भुकत आसल असं तात्याला वाटलं.तरी एवढ्या जोरात भुकणार नाय याची त्याला खात्री हुती.

कायतरी इपरीत घडलं असणार,या इचारानं तात्या झाप झाप पावलं टाकत वस्तीवर आला.समोर बघतो तर रोजच्यासारखं बैलांनी वैरण खाल्ली नव्हती,त्यामुळं ती तशीच राहिली हुती.दोन्ही बैलांनी नाचून नाचून गोठ्यात धुडगूस घातला हुता.मानंला हासडं मारून मारून खुट्टा ढिला केल्याला.

येसनीनं नाकातलं रगात गळत हुतं.दोन्ही बाजूचा खुट्टा ढिला केला हुता.छपराच्या मेडीला बांधलेल्या कुत्र्यानंपण पायानं उकरून उकरून जमिनीत खड्डा पाडला हुता.तात्या बस्तीत आल्यावरबी त्ये भुकतच हुतं.


अगोदरच घरातल्या भांडणानं संतापलेल्या तात्यानं आड्याला आडकिवलेला चाबूक काढला आणि मागचा पुढचा इचार न करता त्येच्या दांड्यानं बैलांची पाठवानं चोपली.पुढ्यात टाकल्याली वैरण खाल्ली नाय.हांबरून आणि नाचून सगळा गोठा उदसलाय.मारल्यापुरतं बैलं शांत झाली.कुत्र्याला भांड्यात भाकरी कालवून ठेवली.बैलाच्या पाठीवर हात फिरीवला,तरी बैलांनी वैरनीला त्वांड लावलं नाय.पाणी पाजून बघुया म्हणून भरल्याली बारडी दोन्ही बैलांच्या पुढ्यात ठेवली.एकानंबी पाणी पिलं नाय.कुत्र्याच्या पुढ्यात भाकरी तशीच.त्येचं त्वांड काय केल्या बंद हुईत नव्हतं.सारखं पायांनी माती उडवीत ते बांधलेल्या मेडीला हासडा मारीत हुतं.आता तात्याला काही कळायला मार्ग नव्हता.


वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


तात्याच्या वस्तीवरची ही धांदल आजूबाजूच्या वस्तीवर झोपायला येणाऱ्यांच्या ध्येनात आली. कुत्र्याचा आवाज बराच येळ झाला थांबत नव्हता, म्हणून दोघं-तिघं तात्याच्या छपरात शिरली.एकानं सांगितलं बैलाच्या पायात काटाबिटा हाय का बघ, कोण म्हटलं कानात गोम गेलीया का बघ,कोण म्हणतं शिंगाखाली गोचीड हाय का बघ,तर कोण म्हणतं कुणीतरी करणी करून लिंबू-मिरची बांधल्यात का बघ... प्रत्येकाच्या मनाला ईल त्यो उपाय सांगत हुता;पण बैलं काय थांबनात.कुत्र्याचा आवाज वाढतच हुता.घरात भांडणाचा धुडगूस झाला हुता.आता हितंबी तेच.बैलांनं खुट्टा चांगलाच ढिला केला हुता.परत दगडांनी ठेचून खुट्टा घट्ट केला.बैलाच्या अंगात ताप हाय का बघितलं,तर तेबी नाय.त्यात आज बैलास्नी पेंड आणायची इसारली हुती.तात्याला वाटलं वाळकी वैरन नको आसल म्हणून त्येनं कोपऱ्यातली वल्ली वैरन बैलांच्या म्होरं इस्काटली.पर बैलांनी वैरनीकडं ढुंकूनबी बघितलं नाय.त्येंची दावं तोडायची खटपट चालूच हुती.

तात्याला परत राग यायला लागला. परत चाबकाची वादी दांड्याला गुंडाळली आणि दांड्यानं बैलांची पाठवान झोडपायला सुरुवात केली.कुत्र्याचा भुकण्याचा आवाज बदलला.ते आता रडायला लागलं.कुत्रं रडणं म्हणजे आपशकुन.रात्रीच्या येळंला कुत्रं रडतंय म्हंजी कायतरी वाईट घडणार ! बैलाला मारील तितका त्येचा नाच वाढतच चालल्याला.एका हासड्यात बैलाची येसण तुटली.तोंडातनं फेसाची आन् नाकातनं रक्ताची धार गळत हुती.येसणीसंगं दावी गळ्यातनं बाजूला झाली.बैलानं शेपूट वर करून पुढं झेप घेतली.मागं पांडूतात्यानं मारायला उगारलेला हात हवेतच थांबविला.दावं तोडून बैल कुठं निघाला म्हणून त्यो बघत उभा राहिला.तवर बैलानं छपरातला माच्या गाठला.त्यावर टाकल्याल्या पिंजारात शिंग खुपसलं आणि तसंच सगळं पिंजार उदसून छपराबाहेर फेकलं.त्या पिंजरासंगं त्यात पेंडीच्या उबीला बसलेला नाग धापकन् पडला आणि सळसळ करत वढ्याच्या अंगाला पळाला.

शिंगात अडकल्यालं पिंजार हालवून पाडीत नाग गेला त्या दिशेला बैल बघू लागला.तात्या घराकडं गेल्यावर एक नाग माच्यावरच्या पिंजारात येऊन इटुळं घालून बसल्याला बैलानी आन कुत्र्यान बघितल हत. आपला धनी त्या माच्यावर झोपायला गेला तर उशाखाली बसल्याला नाग दगा देणार,हे त्या मुक्या जनावरांनी चांगलंच जाणलं हुतं. बैलानं शिंगांनी पिंजरासकट नाग उचलून बाहेर फेकल्यालं बघून पांडूतात्यानं तोंडावर हात मारून घेतला. त्येच्या हातातला चाबूक आपोआपच गळून खाली पडला. कुत्र्याचं भुकणं थांबलं.

सगळी जनावरं जागच्या जागी शांत झाली.बघायला जमलेल्या शेतकऱ्यांनी डोसक्याला हात लावला.इतका वाडूळ कुणालाच काय सुचलं नव्हतं.नाग सळसळत जाताना बघितल्यावर सगळ्यांच्या छातीत धस्स झालं. उडाल्याला नाग आपल्या अंगावर पडला असता तर काय झालं असतं,या इचारानं सगळी टरकली हुती; पण बैलांनी त्येचा विचार केला नाय.सगळीजण तात्याच्या बैलाचं कौतुक करायला लागली.

एकानं पळत तात्याच्या घरात जाऊन हळद आणली. त्येच्या मागोमाग तात्याची बायको आणि पोरगं पळत आलं.धन्याला वाचविण्यासाठी बैलानं येसन तोडून नाक फाडून घेतलं हुतं.

तात्यानं हळूवार हातानं तेच्या नाकपुडीला हळद लावली.

बैलाच्या पाठीवर चाबकाचं वळ बघून त्याच्या बायकोला गहिवरून आलं.रागाच्या भरात आपण काय केलं... मुक्या जनावराला किती बदडलं म्हणून तात्या डोस्कं बडवून घ्यायला लागला.बाजूच्या शेतकऱ्यांनी तात्याची समजूत काढून शांत केलं.


 बैल परत दावणीला येऊन उभा राहिला. पांडुतात्यानं बैलांच्या गळ्यात हात घातला. वशिंडावरून हात फिरीवला आणि ढसाढसा रडायला लागला.बैलाच्या पाठीवर चाबकाच्या दांड्याचं वळ उठलं हुतं.बैल मान झाडून शांत उभा राहिला.कुत्र्यानं तात्याचं पाय चाटायला सुरुवात केली.तात्या बैलाचं मुकं घ्यायला लागला.बैलाच्या तोंडातनं फेसाची धार लागली हुती.त्यात नाकातलं रगात मिसळल्या -

मुळं फेस लालभडक दिसत हुता. टिचभर जमिनीसाठी सख्खा भाऊ जीव घेण्यासाठी कुराड घिऊन अंगावर धावून आला आणि या मुक्या जनावरानं माझा जीव वाचविण्यासाठी माझाच मार खाल्ला.त्यास्नी जे कळलं ते माझ्या ध्यानात आलं नाय.बैलाच्या साऱ्या अंगावरनं हात फिरवित पांडूतात्या रातभर दावनीत बसून राहिला.

२९/३/२५

बुलबुल / Nightingale

एकदा निगडीमध्ये कुणाच्या तरी घरी गॅलरीमधल्या जाईच्या वेलीवर बुलबुल पक्ष्यांच्या जोडीने घरटं विणलं आणि त्यात तीन अंडी घातली.थोड्याच दिवसांत त्यातून इवल्याशा पिल्लांनी जन्म घेतला. बुलबुल आई-बाबा आपल्या बछड्यांना मोठ्या प्रेमाने भरवू लागले.दिवसभर चोची उघडून ती पिल्लं जे मिळेल ते गट्टम करून चिवचिवाट करायची;पण पिल्लं मोठी होण्याआधीच एका साळुंकीने त्यांच्या घरट्यावर हल्ला केला आणि घरटं वेलीवरून गॅलरीमध्ये पडलं.

घरातल्या लहानग्यांनी साळुंकीला हुसकावून लावलं. पिल्लांना घरट्यासकट पुठ्ठ्याच्या एका छोट्या बॉक्समध्ये ठेवून पार्कवर आणलं.


आम्ही त्या पिल्लांना ताब्यात घेतलं.चमचाभर मध-पाणी मिसळून ड्रॉपरने थोडे थेंब पिल्लांच्या चोचीमध्ये सोडले.

हरवलेल्या आई-बाबांच्या शोधात ती इवलीशी पिल्लं चोची पसरवून चिवचिवाट करत होती.मध-पाणी मिळाल्यावर ती थोडी शांत झाली. थोड्याच वेळात केळ्याचे तुकडे भरवल्यावर त्यांचा पोटोबा थंड झाला.त्या पिल्लांना आमच्या ताब्यात द्यायला आलेले सगळे बाळगोपाळ आनंदी चेहऱ्याने त्यांच्या आई-बाबांबरोबर निघून गेले. पार्कचं रोजचं काम उरकून मी पिल्लांसाठी बाजारातून पपई,केळी आणि चिक्कू आणले.


आमच्याकडचा एक जुना छोटा पिंजरा जिन्याखालून बाहेर काढला,बागेतल्या नळाखाली चांगला खंगाळून घेतला.

बागेतल्या बांबूच्या कोवळ्या फांद्या सिकेटरने छाटून कोवळ्या पानांसहच त्या पिंजऱ्यामध्ये आडव्या तिडव्या कोंबून लावल्या.त्यामुळे पिल्लांसाठी आपोआप उबदार जागेची सोय झाली.पाणी पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी एक मजबूत दगडी वाटी स्वच्छ पाण्याने भरून ठेवली.


आता आमच्या घरी या तीन चिमुकल्या नव्या पाहुण्यांची चहल-पहल वाढली.दररोज सकाळी त्या पिल्लांना भरवण्याचं काम माझ्याकडे होतं.केळी, चिक्कू आणि पपईचे अगदी बारीक बारीक तुकडे चिरून मी छोट्या व्टिझरने त्यांच्या चोचींमध्ये आळीपाळीने भरवत असे.शिवाय थोडंसं मध-पाणीही हलकेच त्यांच्या चोचीमध्ये सोडून त्या तिघांना सकाळच्या कोवळ्या उन्हासाठी बंगल्याच्या बागेमध्ये ठेवत असे.त्यानंतर पुन्हा गरज लागली तर मी,प्रतिभा किंवा तेजस यांच्यापैकी कुणी तरी पिल्लांना भरवत असू.असा दिनक्रम पुढे दोन-तीन आठवडे चालू राहिला.दरम्यानच्या काळात ती पिल्लं पिंजऱ्यामधेच सफाईने उडायला लागली होती.एकदा असंच पिल्लांना उन्हात ठेवून मी तिथल्याच आरामखुर्चीत बसून शांतपणे पेपर वाचत होतो.अचानक मला पिंजऱ्याभोवती आणखी पाच-सहा मोठे बुलबुल पक्षी घोटाळताना दिसले.चिवचिवाट करत ते पिल्लांभोवती फिरले आणि थोड्या वेळात गायब झाले. 


त्यांच्या या वागण्याचा अर्थ मला मात्र त्या वेळी समजला नाही.मी उत्सुकतेने निरीक्षण सुरू केलं.अवघ्या पाच-सहा मिनिटांतच ते बुलबुल परत आले आणि पिंजऱ्याजवळ घुटमळायला लागले. 


पिंजऱ्यामधली पिल्लंही ताबडतोब आतल्या आत पंखांचा फडफडाट करत उडून जाळीजवळ आली. मोठ्या बुलबुलांनी पिल्लांसाठी किडे धरून आणले होते.अधाश्यासारख्या चोची उघडून पिल्लांनी हा नवा खाऊ आनंदाने गट्टम करून टाकला.हे बघून मी आश्चर्यचकित झालो.


बुलबुल पक्ष्यांनी मला वाइल्डलाइफ मॅनेजमेंटचा यापूर्वी फक्त वाचनातच आलेला एक नवा धडा अचानक शिकवला होता.


गेले काही दिवस मी त्या पिल्लांना केळी,पपई, चिक्कू आणि इतर फळांचे तुकडे खायला घालून ग्लुकोज आणि फ्रक्टोज पुरवण्याचा प्रयत्न करत होतो.पण,त्यांच्या शारीरिक वाढीला प्रोटीन्सचीही गरज असते,प्रोटीन्समुळे पिल्लांच्या पंखांमधल्या स्नायूंमध्ये उडण्याची ताकद येते,हे रहस्य मला त्या वेळी त्या मोठ्या बुलबुलांनी दाखवून दिलं.त्यानंतर मात्र मी या पिल्लांना छोटे-मोठे किडे आणि गांडुळं गोळा करून खायला घालू लागलो. 


(सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन,पुणे)


पुढच्या १०-१२ दिवसांतच सगळी पिल्लं पुन्हा त्यांच्या त्यांच्या अधिवासात उडण्यासाठी तयार असल्याचं मला जाणवलं.

त्यामुळे सकाळच्या न्याहारीनंतर त्यांना बागेमध्ये ठेवल्यावर मी मुद्दामच त्यांच्या पिंजऱ्याचं दार उघडून ठेवायला लागलो. कारण मला त्या पिल्लांना 'सॉफ्ट रिलीज' पद्धतीने निसर्गात मुक्त करायचं होतं.माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यानंतरच्या तीन-चार दिवसांतच तीनही पिल्लं त्यांचा ट्रांझिट कॅम्प सोडून एकेक करून पिंजऱ्याबाहेर भुर्रकन उडून गेली.


पिल्लं उडून गेल्यावर दुसऱ्या दिवशीच्या सकाळी मी माझी गाडी पुसत होतो. शअचानक डावीकडच्या जास्वंदीकडून परिचित असा चिक चिक आवाज ऐकू आला.आमच्याकडे राहून गेलेल्या पाहुण्यांपैकी एक बुलबुल मला साद घालत होता.मी पण नेहमीची शीळ घातली.त्यानेही प्रतिसाद दिला. दोघांची भाषा एकमेकांना समजली.त्यानंतर तो छोटू माझ्या शेजारच्या कुंपणावर येऊन बसला. गाडी पुसत पुसत मी टेललॅम्पजवळ गेलो.तोही उड्या मारत,चिकचिक आवाज काढत तिथे आला. 


त्यानंतर मी पळत पन्नास-साठ फूट अंतरावर असलेल्या स्कूटरपर्यंत गेलो.तोही तस्साच माझ्यापेक्षाही वेगाने उडत स्कूटरपर्यंत पोहोचला.मला गंमत वाटली.तो माझ्याशी खेळू बघत होता.


पुढचे बरेच दिवस हा खेळ चालला होता.दरम्यान, इतर दोन बुलबुलसुद्धा अधूनमधून हक्काने घरी येऊन फळं खाऊन पाहुणचार घेत राहिले.पिल्लांनी मात्र इतरत्र न जाता आमच्या पार्कवरच कायमचा मुक्काम ठोकला.पुढच्या तीन-चार वर्षांतच आमच्या पार्कमध्ये दीड-दोनशे बुलबुल पक्षी गुण्यागोविंदाने नांदू लागले. 

२७/३/२५

उत्सर्जन संस्था / Emissions agency

'धमन्या आणि शिरा' या किडनीला व्यवस्थित जोडलेल्या असतात असा त्यानं निष्कर्ष काढला आणि पुढचा प्रश्न विचारला,की "अशाच प्रकारे मूत्र तयार करणाऱ्या ट्यूबूल्सही त्यांना जोडलेल्या असतात का?" या प्रश्नाची उकल झाली तर तो खूप मोठा शोध असणार होता.त्यानं याही प्रश्नाची उकल करायचा खूप प्रयत्न केला.यासाठी त्यानं जिवंत कुत्र्याच्या युरेटर (ब्लॅडर आणि किडनी यांना जोडणारा मूत्रमार्ग) आणि रक्त वाहून नेणाऱ्या शिरा यांना बांधून टाकलं.तरीही त्याला रक्तापासून मूत्र तयार होत असावं का? आणि ते तसं तयार होत असलं तर ते कसं तयार होत असेल हे मात्र त्याला समजलं नाही.फक्त या भानगडीत त्या बिचाऱ्या कुत्र्याची किडनी मात्र सुजली !


याबद्दल माल्पिघी 'किडनी या ग्रंथी रक्तापासून मूत्र वेगळं करत असाव्यात असं वाटतंय',असं लिहितो.पण 'या रक्तवाहिन्यांना लहान छिद्रं असावीत आणि त्यातून मिठासारखे लहान कण बाहेर टाकले जातात,पण रक्तातले गरजेचे मोठे कण मात्र पुन्हा शरीरात शोषले जात असावेत' असा त्यानं तर्क केला होता. 


पण याबद्दल त्याला प्रत्यक्ष काहीही दिसलं नव्हतं हेही त्यानं अगदी प्रामाणिकपणे लिहिलं आहे.त्यापुढे त्यानं असाही तर्क केला होता की जेव्हा रक्त पातळ होतं तेव्हा शरीरातलं जास्तीचं पाणी मूत्रातून बाहेर पडत असतं आणि जेव्हा रक्त पुन्हा घट्ट होतं तेव्हा पाणी मूत्रातून बाहेर जात नाही !


या सगळ्या पार्श्वभूमीवर विल्यम बोमन(१८१६-१८९२)

अवतरला.बोमननं खरं तर संपूर्ण शरीरामधल्याच अनेक अवयवांचा सूक्ष्म पातळीवर अभ्यास केला.आपल्या शरीरातल्या अनेक लहान लहान भागांना त्याचं नाव मिळालेलं आहे. उदाहरणार्थ: बोअमन्स ग्लँड,बोअमन्स मेंब्रेन.विशेष म्हणजे किडनीजमधल्या माल्पिघीयन बॉडीज त्यानं वयाच्या फक्त २५ व्या वर्षी शोधून काढल्या होत्या. आता आपण त्यांना 'बोमन्स कॅप्सूल्स' म्हणतो. यासाठी त्याला रॉयल सोसायटीचं सभासदत्वही मिळालं होतं.किडनीजच्या बाबतीत बोमननं माल्पिघीचा अभ्यास पुढे नेला.किडनीमध्ये रक्त गाळून मूत्र तयार करणाऱ्या अनेक गाळण्या असतात.आता आपण त्यांना 'नेफ्रॉन' असं म्हणतो.त्याला त्यानं 'माल्पिधियन बॉडीज' असं म्हटलेलं आहे.बोमननं आपल्या 'ऑन द स्ट्रक्चर्स अँड द यूज ऑफ माल्पिघीयन बॉडीज विथ ऑब्झर्वेशन ऑन सर्क्युलेशन थ्रू देंट ग्लँड' अशा लांबलचक शीर्षक असलेल्या शोधनिबंधात १८४२ साली किडनीचं सूक्ष्मदर्शकातून दिसणाऱ्या रचनेचं इतकं सुंदर आणि तंतोतंत वर्णन केलं आहे, की आजपर्यंत त्या वर्णनाला कुणीही धक्का लावलेला नाही !


पण माल्पिघीनं ही मायक्रोस्कोपमधूनच किडनीचा अभ्यास केला होता.मग बोमनला माल्पिघीपेक्षा जास्त का सापडलं होतं? याचं कारण बोमनच्या वेळी मायक्रोस्कोप्स जास्त सुधारले होते.

शिवाय,आतापर्यंत शिरेतून इंजेक्शनद्वारे रंग किंवा औषधं देण्याच्या प्रगत पद्धती निघाल्या होत्या.त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्त कसा प्रवास करतं हे जास्त चांगलं कळत होतं.आणि तिसरी गोष्ट म्हणजे मायक्रोस्कोपमधून बघण्यासाठी तयार करायच्या स्पेसिमेन आणि स्लाइड्स तयार करायचं तंत्रही आणखी सुधारलं होतं.या तिन्ही कारणांमुळे बोमनला किडनीची सूक्ष्मरचना कशी असते ते लक्षात यायला मदत झाली होती.


त्यानं केलेल्या निरीक्षणांमध्ये बोमन म्हणतो, 


" किडनीमध्ये अनेक सूक्ष्म नळ्या असतात.आणि तिथंच काही कॅप्सूलसारख्या रचनाही असतात.या कॅप्सूल किडनीमध्ये सगळीकडे खूप जवळजवळ अंतरावर पसरलेल्या असतात.आणि त्यांच्यातही खूप सूक्ष्म नळ्या आत जाताना आणि बाहेर येताना दिसतात.यामुळे मला असं वाटतंय,की या कॅप्सूल्सच किडनीचं मुख्य काम करणारं एकक (फंक्शनल युनिट) असावं.अर्थातच,या कॅप्सूलला नंतर 'बोमन्स कॅप्सूल' असं नाव मिळालं!


बोमननंच पुढे किडनीमध्ये रक्त हे गाळून त्याचं मूत्र होण्यात रासायनिक क्रिया नसतात तर ते बोमन्स कॅप्सूलच्या सुरुवातीला असणाऱ्या ग्लोमेरुलसमधून जाताना ते गाळलं जाऊन त्यातले नको असलेले घटक काढून टाकले जातात आणि पुढे गेल्यावर हवे असलेले घटक पुन्हा शोषून घेतले जातात असं योग्य वर्णन केलं आहे.पुढे एकोणिसाव्या शतकात चार्ल्स ल्युडविग(१८१६-१८९५) यानं ग्लोमोरुलसमधूनच रक्त गाळलं जातं आणि ही 'बायोफिजिकल' प्रक्रिया आहे हे सांगितलं.ही क्रिया रक्त ग्लोमेरुलसमधून जाताना रक्ताचं वजन,प्रेशर आणि दिशा यांवर अवलंबून असतं हेही त्यानं दाखवून दिलं.आपल्या ग्लोमेरुलस

मधल्या बारीक नळ्यांना अनेक लहान लहान छिद्रं असतात त्यातून काही घटक शरीरात शोषून घेतले जातात आणि काही घटक पुन्हा स्रवले जातात.(ॲबसॉर्शन आणि सिक्रिशन) हे त्यानं दाखवून दिलं.ल्युडविगनं हे सगळं फिजिक्समधल्या हायड्रोडायनॅमिक्सच्या नियमांनुसार तपासून पाहिलं होतं.


थोडक्यात,आता आपल्या शरीरात मूत्र कसं तयार होतं आणि ते तयार होताना किडनी,ग्लोमेरुलस,बोअमन्स कॅप्सूल आणि किडनीमधल्या इतर बारीक नळ्या कशा काम करतात हे लक्षात आलं होतं.आता आपण पाहिलेल्या गोष्टी या किडनी आणि मूत्रविसर्जन संस्थेच्या शोधांतले महत्त्वाचे टप्पे आहेत.पण आज आपल्याला यापेक्षा बरीच जास्त माहिती आहे.


खरं तर माणसाची उत्सर्जन संस्था ही फारच प्रगत आणि गुंतागुंतीची आहे.पण प्राथमिक स्वरूपाच्या प्राण्यांपासून ते विकसित झालेल्या अनेक प्राण्यांमध्ये उत्सर्जन हे खूप वेगवेगळ्या प्रकारे होत असतं. 


माणसामध्ये नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ लघवीवाटे बाहेर टाकले जातात आणि अन्नपचनामध्ये तयार झालेली विष्ठा वेगळ्या मार्गानं बाहेर टाकली जाते,पण बहुसंख्य प्राण्यांमध्ये या दोन सिस्टिम्स वेगळ्या नाहीत. प्राणी जसा उत्क्रांत होत जातो तसं वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये उत्सर्जनाची पद्धत आणि उत्सर्जित केलेले टाकाऊ पदार्थ यांच्यात थोडा थोडा बदल झालेला दिसतो.पाण्यात राहणारे माशांसारखे जलचर भरपूर प्रमाणात पाणी आणि पाण्यात विरघळणारे टाकाऊ पदार्थ उत्सर्जित करत असतात.तर वाळवंटात राहणारे उंटासारख्या प्राण्यांची लघवी ही जवळपास पेस्टसारखी घट्ट असते.तर वनस्पतींची पानं गळतात,जुनी साल गळून पडते किंवा वनस्पतींच्या खोडातून चीक किंवा डिंक असे पदार्थ बाहेर पडतात हे वनस्पतींचं उत्सर्जनच आहे.सजीवांच्या प्रोटिस्टा गटापासून ते सस्तन प्राणी या गटापर्यंत उत्सर्जनाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.उत्सर्जनाचा विचार केला तर सजीवांमध्ये कार्बन डाय ऑक्साइड,पाणी,पचनातून तयार होणारी विष्ठा आणि नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ हे सगळेच शरीराला अनावश्यक असणारे पदार्थ आहेत. 


माणसासारख्या उच्चवर्गीय सस्तन प्राण्यामध्ये हे तीनही प्रकारचे टाकावू पदार्थ बाहेर टाकण्यासाठी श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि उत्सर्जनसंस्था अशा तीन वेगवेगळ्या सिस्टिम्स असतात,पण एकपेशीय सजीवांमध्ये, जमिनीवर सरपटणाऱ्या अळी,गांडूळ यांसारख्या प्राण्यांमध्ये,कीटकांमध्ये आणि इतर प्रगत प्राण्यांमध्ये या सिस्टिम्स एकत्र असू शकतात.


प्रोटिस्टा या गटातल्या अल्गी,फंगस (बुरशी) आणि अमिबासारख्या प्रोटोझुआ या सजीवांमध्ये वेगळी अशी उत्सर्जन संस्था नसते.हे सजीव पेशींमधूनच कार्बन डाय ऑक्साइड,पाणी आणि नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ पेशीच्या छिद्रातून बाहेर टाकतात.या छिद्रांना सेल पोअर किंवा ॲनल पोअर असं म्हणतात.अमिबाच्या पेशी छिद्राला प्लझ्मालेम्मा असं म्हणतात.


प्राण्यांच्या किंग्डममध्ये पाण्यात राहणारे स्पाँजेस हे प्राणी सगळ्यात प्राथमिक स्वरूपाचे मानले जातात. स्पाँजेस जरी बहुपेशीय प्राणी असले तरी त्यांच्यामध्ये शरीराच्या कडेलगत पेशींचा एक थर टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी असतो.त्या पेशींमधून ते उत्सर्जित करायचे वायू आणि पचनातून तयार झालेली विष्ठा बाहेर पाण्यात टाकतात.तर सपाटकृमी (फ्लॅटवर्क्स) असलेल्या प्लॅटीहेल्मेंथिस या गटातल्या प्राण्यांमध्ये फ्लेमसेल नावाच्या विशिष्ट पेशींद्वारे उत्सर्जन होतं. झुरळासारख्या कीटकवर्गीय (आर्थो पॉड्स) प्राण्यांमध्ये माल्पिघियन ट्यूब्यूल्स नावाच्या नळ्या उत्सर्जनाचं काम करतात.तर कोळ्यांसारख्या आठ पाय असलेल्या प्राण्यांमध्ये कॉक्सल ग्लॅड्ज उत्सर्जनासाठी असतात. गंमत म्हणजे खेकड्यासारख्या क्रस्टेशियन प्राण्यांमध्ये असलेल्या उत्सर्जनाच्या अवयवाला अँटिने किंवा ग्रीनग्लँड म्हणतात !



गंमत म्हणजे जेलीफिशसारख्या नायडेरिया (Cnidaria) सारख्या प्राण्यांमध्ये अन्न खाण्यासाठी आणि टाकाऊ पदार्थ उत्सर्जित करण्यासाठी एकच मुख असतं.तर गांडूळ किंवा अळी (वर्म्स) प्रकारात मोडणाऱ्या प्राण्यांमध्ये नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचा मार्ग पचनमार्गाच्या शेवटी जोडलेला असल्यानं ते एकाच मार्गानं लघवी आणि विष्ठा बाहेर टाकतात.पण या प्राण्यांची लघवी आणि विष्ठा वेगळी दिसत नाही.पण आपल्या घरात असलेल्या पालीच्या विष्ठेमध्ये एक पांढरा ठिपका असतो,ती खरं तर पालीची लघवी असते.तसंच पक्ष्यांच्याही विष्ठेत काही भाग हिरवट काळा आणि काही भाग पांढरा असतो.त्यातला हिरवट काळा भाग ही त्यांची विष्ठा असते तर पांढरा भाग ही त्यांची लघवी असते.पक्ष्यांना शरीरात जास्त पाणी साठवता येत नाही,कारण त्यांना उडण्यासाठी कमी वजन असणं आवश्यक असतं.त्यामुळे त्यांची लघवीसुद्धा पेस्टसारखी घट्ट आणि पांढरी असते.तर उच्चवर्गीय सस्तन प्राण्यांमध्ये किडनीज व्यवस्थित विकसित झालेल्या असतात.त्यामुळे ते पाण्यासारखी लघवी शरीराबाहेर टाकतात आणि विष्ठा वेगळी बाहेर टाकतात.


२५.०३.२५ या लेखातील शेवटचा भाग…

२५/३/२५

३.१० उत्सर्जन संस्था / 3.10 Emissions agency

आपल्या शरीरातल्या किडनीज काम कसं करतात याचा अभ्यास करणाऱ्या ज्ञान शाखेला 'नेफ्रॉलॉजी' असं म्हणतात.

आपल्या शरीरात मूत्र कसं तयार होतं? किडनी (मूत्रपिंड) नेमकं काय काम करते याबद्दल माणूस गेली दोन हजार वर्षं तरी विचार करतोय. त्याची सुरुवात हिप्पोक्रॅट्सपासून होते आणि अजूनही या विषयात संशोधन चालू आहे.


गेलनच्या (इ.स.१३० ते २१०) आधीपर्यंत हिप्पोक्रॅट्स आणि ॲरिस्टॉटल यांनीही शरीरशास्त्रावर विचार केला होता,पण त्यांचा विचार आणि अभ्यास फक्त निरीक्षणांवर आणि तर्कावर अवलंबून होता.


पण गेलन हा प्रयोग करून त्यावरून निष्कर्ष काढणारा पहिला डॉक्टर होता.


त्या काळी माणसांचं शवविच्छेदन करायला परवानगी नव्हती,त्यामुळे त्यानं आपले अनेक निष्कर्ष प्राण्यांवरून काढले होते.त्यानं एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे, "मूत्र कसं तयार होतं हे आपल्याला जरी माहीत नसलं, तरी खाटिकानं प्राण्यांच्या ब्लॅडर (मूत्राशय) आणि किडनीज (मूत्रपिंड) या युरेटर्सनं (मूत्रवाहिनी) जोडलेल्या असतात हे पाहिलेलं असतं." याचाच अर्थ आपलं मूत्र हे किडनीजमध्ये तयार होत असलं पाहिजे अशी अटकळ त्यानं बांधली होती.


आपण अन्न खातो त्यातला न लागणारा भाग जसा विष्ठेच्या रूपात बाहेर पडतो,तसंच आपण प्यायलेल्या पाण्यातला जास्तीचा आणि न लागणारा भाग मूत्रातून बाहेर पडतो असं कुणालाही वाटू शकतं,

पण आपण प्यायलेलं पाणी हे पचनक्रियेच्या वेळीच आपल्या आतड्यातून रक्तात शोषलं जातं आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीनं अन्न वापरून त्यातून निर्माण झालेला कचरा आणि उत्सर्जित केलेला कार्बन डाय ऑक्साइड वायू रक्तात टाकला जातो आणि रक्त तो कचरा फुफ्फुस आणि किडनीजकडे वाहून नेऊन बाहेर टाकण्याचं काम करत असतं.


आपल्या शरीरातल्या पेशींमधून शिरांमार्फत अशुद्ध रक्त हृदयाकडे पाठवलं जातं आणि मग या रक्तातला कार्बन डाय ऑक्साइड वायू फुफ्फुसांमार्फत उच्छ्वासातून बाहेर टाकला जातो.पण रक्तात विरघळलेली इतर रसायनं अजूनही तशीच राहतात.ती काढून टाकून रक्त शुद्ध करण्याचं काम मात्र किडनीज करत असतात.


रक्तातला कार्बन डाय ऑक्साइड उच्छ्वासातून काढून टाकला तरी रक्तामध्ये अजूनही युरिया,युरिक ॲसिड,अमोनिया,जास्तीचं मीठ,

जास्तीची साखर,आपण घेत असलेल्या औषधांमधला काही भाग आणि शरीराला विषारी असणारी आणखीही अनेक हानिकारक रसायनं खरं तर शरीरातून बाहेर काढून टाकणं गरजेचं असतं. रक्त गाळून त्यातली नेमकी शरीराला नको असलेली रसायनं काढून टाकायचं काम आपल्या बरगड्यांच्या खाली पाठीच्या बाजूला असलेल्या किडनीज करतात. यालाच आपण मूत्र किंवा युरीन म्हणतो.हे मूत्र आपल्या पोटात असलेल्या युरीनरी ब्लॅडरमध्ये (मूत्राशयात) साठवलं जातं आणि नंतर ते मूत्रनलिकेमार्फत (युरेथ्रा) शरीराच्या बाहेर टाकलं जातं.


पण हीच गोष्ट समजायला आपल्याला तब्बल दोन हजार वर्षं लागली.नेफ्रॉलॉजीच्या या इतिहासामध्ये किडनीज मूत्र तयार करत असाव्यात हे जरी लवकर लक्षात आलं असलं,तरी मुळात ते कसं तयार होतं हे मात्र मायक्रोस्कोपचा शोध लागल्याशिवाय आपल्याला कळलं नाही.म्हणजेच थोडक्यात मायक्रोस्कोप्स शिवाय नेफ्रॉलॉजीचा अभ्यास करणं अशक्य झालं असतं.


आपलं मूत्र किडनीजद्वारे मूत्राशयात (ब्लडर) जमा होत असतं हे गेलननं पाहिलं होतं. शिवाय त्यानं ज्यांना डिसयुरिया म्हणजे मूत्रनिर्मितीमध्ये अडथळा येतो असा आजार आहे,त्यांना पाठीच्या खालच्या भागात केलं होतं.यावरूनच गेलननं त्याच्या आधी ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेल्या अस्क्लेपियाडेस (Asclepiades) यानं ब्लॅडरही स्पंजसारखी असते आणि ती संपूर्ण शरीरातली वाफ शोषून घेऊन त्याचं मूत्र तयार करते असा विचार मांडला होता. मग ब्लॅडरमधून पाण्याची वाफ किंवा पाणी काहीही जाऊ-येऊ का शकत नाही?असा प्रश्न विचारून गेलननं या विचारांना छेद दिला.हा प्रश्नही त्यानं प्रयोग करून पाहिल्यानंतरच विचारला होता.यासाठी गेलननं एका कुत्र्यावर प्रयोग केला होता.

त्यानं कुत्र्याचं ब्लॅडर बाहेर काढून त्यात पाणी भरलं आणि ती ब्लॅडर युरेथ्रापाशी बांधून टाकली आणि मग तिच्यावर दाब दिला तरी तिच्यातून पाणी बाहेर पडू शकत नाही हे त्यानं पाहिलं होतं. 


त्यातून त्यानं या ब्लॅडरमधून पाणी पुन्हा उलट दिशेनं किडनीत जात नाही हेही पाहिलं होतं.पचनामध्ये मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागात विष्ठा तयार झाल्यानंतर ती तर लवकर शरीराबाहेर टाकली नाही,तर मोठ्या आतड्यातून पाणी आणि काही जीवनसत्त्वं पुन्हा शोषली जायला लागतात.याउलट मूत्र तयार होऊन एकदा ते ब्लॅडरमध्ये आलं आणि आपण ते शरीराबाहेर जाऊ दिलं नाही तर ते पुन्हा शोषलं जात नाही.या गोष्टी गेलननंच प्रयोगानं तपासल्या होत्या.


पण किडनीमध्ये तरी मूत्र कसं तयार होतं? आणि ते ब्लॅडरमध्ये कसं येतं? या प्रश्नांची उकल मात्र गेलन करू शकला नाही.या प्रश्नावर गेलननं असा तर्क लढवला होता,की शरीरामधलं मूत्र हे किडनी आपल्याकडे आकर्षित करते आणि ब्लॅडरकडे पाठवते.

यासाठी सगळ्या शरीरातला द्रव किडनीकडे यायला हवा होता. पण तसं तर काही दिसत नव्हतं,मग किडनी नेमकं काय करते? या प्रश्नावर गेलनकडे उत्तर नव्हतं.पण सगळ्या शरीरातून रक्त गाळून त्याचं मूत्र होत असलं पाहिजे आणि किडनीज या रक्तातलं जास्तीचं पाणी काढून टाकून ते पातळ होण्यापासून वाचवत असाव्यात अशा निष्कर्षापर्यंत गेलन आला होता हे मात्र नक्की.पण गेलनच्या वेळी रक्त शरीरात कुठून कसं फिरतं म्हणजेच रक्ताभिसरण कसं होतं माहीत नसल्यामुळे त्याला या विषयात पुढे जाता आलं नाही.किडनीज कशा काम करतात हा गेलनचा प्रश्न विल्यम हार्वे येईपर्यंत तसाच राहिला.विल्यम हार्वेनं (१५७८-१६५७) आपल्या शरीरात रक्त सतत फिरत असतं हे दाखवून रक्ताभिसरणाचं काम कसं चालतं हे १६२८मध्ये दाखवून दिलं.पण मध्ये १५०० वर्षं जावी लागली होती.


गंमत म्हणजे हार्वेच्या लिखाणात कुठेही 'किडनी' हा शब्द सापडत नाही.पण त्यानं आपल्या शरीरात रक्त कसं फिरतं यावर केलेल्या संशोधनामुळे वैद्यकाची कोणतीही शाखा त्याला डावलू शकत नाही.हृदयामधून धमन्यांमार्फत शुद्ध रक्त सगळ्या अवयवांपर्यंत नेलं जातं आणि सगळ्या अवयवांनी ते वापरल्यानंतर शिरांमधून अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे आणलं जातं. (यात किडन्याही आल्याच.) हे रक्ताभिसरणाचं तत्त्वं हार्वेनं सांगितलं.पण त्या काळी त्याच्यावरही गेलनचा इतका प्रभाव होता,की आपल्याला संशोधनातून सापडलेलं हे तत्त्व प्रसिद्ध करायलाही त्यानं दहा वर्षं घेतली आणि प्रसिद्ध केल्यानंतर त्याचं संशोधन स्वीकारलं जायला पुढची पंचवीस वर्षं लागली! म्हणजे वैद्यकावर गेलनचा किती प्रभाव होता हे दिसून येतं.


ज्या वर्षी हार्वेनं रक्ताभिसरणाचा शोध लावला त्याच वर्षी त्याचं संशोधन पुढे नेणाऱ्या माल्पिधीचा (१६२८-१६९४) जन्म झाला. त्यानं १६६६मध्ये किडनीजमध्ये लहान लहान खड्डे आणि कालवे यांच्यासारखी रचना असावी आणि त्यातून किडनीमध्ये जाणारं सगळं रक्त गाळून बाहेर पडत असावं.त्यातून मूत्र तयार होत असावं असं मला वाटतं.असं आपल्या पुस्तकात लिहिलं होतं.तो पुढे लिहितो,जर आपण सूक्ष्मदर्शक भिगातून किडनीकडे पाहिलं तर किडनीच्या अनेक लहान लहान नळ्यांमधून मूत्र बाहेर पडताना आपल्याला दिसेल.त्यावरून किडनी हे दूसरं तिसरं काहीही नसून भरपूर बारीक बारीक केशवाहिन्या असलेला आणि त्यातून मूत्र वाहणारा एक गाळण्यांचा पुंजकाच आहे."


माल्पिघीनं आपल्या 'दे व्हिसेरम ॲनॅटॉमिका' या पुस्तकात किडनीवर चक्क 'डे रेनेबस (किडनीजविषयी)' या शीर्षकाचं एक अख्खं प्रकरणच घातलं होतं! 


त्याचं लिखाण इतकं सुयोग्य होतं की त्याला पुढची चक्क दोनशे वर्षं कुणी हात लावू शकलं नाही


सजीव - अच्युत गोडबोले ,अमृता देशपांडे , मधुश्री पब्लिकेशन


केशवाहिन्या म्हणजेच कॅपिलरीजचा शोध हा माल्पिधीनं वैद्यकाला आणि शरीरशास्त्राच्या अभ्यासाला दिलेलं खूप मोठं योगदान आहे.


माल्पिघीनं या पुस्तकात किडनीजची रचना बाहेरून कशी असते,

आतून कशी असते आणि त्या काम कसं करतात हे लिहून ठेवलं होतं.त्याचं वर्णन इतकं सुंदर होतं,की त्याला त्याच्या जोडीला आकृत्या दाखवायची गरजच पडत नव्हती! तो लिहितो,किडनीज बाहेरून थोड्या कडक दिसत असल्या तरी आतून त्यांचे व्यवस्थित भाग पडतात.किडनीमध्ये पिरॅमिडच्या आकाराचे अनेक भाग असतात.या पिरॅमिड्सना व्यवस्थित रक्तपुरवठा झालेला असतो.या पिरॅमिड्समध्ये अनेक गांडुळांसारखे वर्म्स गुंडाळी (कॉइल) करून बसल्यासारखी रचना असते.यांची सुरुवात रक्तवाहिन्यांपासून होते आणि त्या किडनीच्या पेल्व्हिस भागात येऊन थांबतात.तिथं मूत्र जमा झालेलं असतं." 


माल्पिघीच्या या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वर्णन आजही योग्य मानलं जातं.त्याही पुढे जाऊन त्या काळी हार्मोन्स माहीत नसले, तरी माल्पिधीनं किडन्यांना 'ग्लँड्स' म्हटलं होतं. पुढे १९०० साली पहिलं हार्मोन सापडलं ! आणि गंमत म्हणजे किडनीही काही हार्मोन्स स्रवते याचा नंतर शोध लागला. यामुळे माल्पिघीचा हा तर्क चुकून बरोबर आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


माल्पिघीनं किडनीमध्ये येणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रंग सोडला.

आता त्याला किडनीतलं रक्त कोणत्या दिशेनं कसं कसं प्रवास करतं हे समजणार होतं.आश्चर्य म्हणजे या प्रयोगामुळे त्याला किडनीच्या मधल्या भागात व्यवस्थित रक्तपुरवठा केलेला असतो आणि तिथून रक्त बाहेरही येऊ शकतं,हे समजलं.याचाच अर्थ 'धमन्या आणि…


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….

२३/३/२५

जोन ऑफ आर्क / Joan of Arc

१९.०३.२५ या लेखातील उर्वरित लेख पुढे सुरू


ऑर्लीन्सचा वेढा उठला.जोन ऑफ आर्क आता बारा हजार फौज उभारू शकली.सारेजण तिच्याकडे संत म्हणून पाहू लागले.कोणी तिला 'चेटकीण' म्हणू लागले.फ्रेंचांची बाजू घेणारे तिला 'संत' म्हणत; इंग्रजांची बाजू घेणारे तिला 'डाकीण' म्हणत.जोन चार्लसला टूर्स येथे भेटली व मग उभयता लॉयर नदीच्या तीराने हीम्स शहरी आली.तिथे असलेले इंग्रज सैन्य घाबरून गेले,व भयभीत होऊन पळून गेले. काही काही ठिकाणी इंग्रजांनी थोडा विरोध केला. 


जार्गों,पॅटे,ट्रॉईझ वगैरे ठिकाणी झटापटी झाल्या;पण जोनच्या संस्फूर्त सैनिकांनी त्यांना 'दे माय धरणी ठाय' करून सोडले.लढाई शक्य तो टाळावी,असे जोनचे धोरण असे. इंग्रजांनी फ्रान्स सोडून जावे एवढेच तिला हवे होते. ती त्यांचा द्वेष करीत नव्हती. रक्त पाहून ती खिन्न होई. रक्तपाताने तिचे मन विटे. स्वतःच्या लोकांच्या वेदना पाहून तिला जितके दुःख होई, तितकेच शत्रूच्या सैनिकांच्या वेदना पाहूनही होई. 


जखमी शिपाई – मग तो इंग्रज असो वा फ्रेंच असो- तिला संकटात सापडलेला ख्रिश्चन बंधू वाटे.पॅटे येथील लढाईत रणांगणात शत्रूचे पुष्कळसे सैनिक मेलेले पाहून ती रडली.

तिच्या एका सैनिकाने एका इंग्रज कैद्यावर मरणांतिक प्रहार केला तेव्हा आपल्या घोड्यावरून उतरून तिने त्या मरणोन्मुख इंग्रज शिपायाच्याजवळ गुडघे टेकले व त्याचे डोके आपल्या हातात घेतले.ती त्याला काही सौम्य व मृदू शब्द बोलली व त्याचे प्राण गेले.


तिच्या निष्ठावान सैनिकांना तिची ही उदार दया समजत नसे.ते तिच्यासाठी लढायला व मरायला तयार होते.पण ही करुणा,या करुणेतील भावना ते समजू शकत नसत. ती विरोध करी,तरीही तिच्या विरोधास न जुमानता तिचे सैनिक युद्धातील बहुतेक कैद्यांस ठार मारून टाकीत..


इ.स.१४२९च्या जुलैच्या पंधराव्या तारखेस विजयी फ्रेंच सेना हीम्स येथे आली.नंतर दोन दिवसांनी तेथील भव्य चर्चमध्ये राजाला राज्याभिषेक झाला.आर्चबिशपने चार्लसच्या डोक्यावर मुकुट ठेवला.समारंभाच्या वेळी दरबारची काही स्त्री-पुरुष मंडळी हजर होती.काही सरदार होते,काही वारांगना होत्या;पण राणी मेरी द अंजो ही चिनॉन येथे मागे राहिली होती.


प्रवासाच्या खर्चात बचत व्हावी म्हणून राजाने तिला मागे ठेवले होते.चार्लस दरिद्री व निर्धन होता,तसाच अती अनुदारही होता.


जोन ऑफ आर्कचे आरंभीचे काम आता संपले होते.ऑलन्सचा वेढा तिने उठविला होता.राजाला राज्याभिषेक झाला होता.आता इंग्रजांना फ्रान्समधून हाकलणे एवढेच काम राहिले होते.पण तिची लोकप्रियता कमी होऊ लागली.जोन दररोज देवदूतांशी बोले.पण तिच्या शिपायांना आता तिच्या या दैवी मुलाखतीचे व भेटीचे कौतुक वाटेनासे झाले.तिला जी दिव्य दर्शने घडत,त्यांची प्रभा आता फिकी,निस्तेज झाली. (एक रोजची सामान्य गोष्ट अशा दृष्टीने लोक त्याकडे पाहू लागले) तिचे लोक आता तिला कंटाळले. तिचे त्याच्याबरोबर असणे जसजसे लांबू लागले तसतसे ते अधीर होऊ लागले.कारण ती त्यांना लुटालूट करू देत नसे.ती त्यांच्यावर पावित्र्याचे जीवन लादीत होती; पण त्यांना अशा जीवनाची सवय नव्हती. "ही जोन आम्हाला बायका बनवीत आहे," असे ते म्हणत. तिचे काही शिपाई तिला सोडून गेले,काहींनी बंड केले !


आणि इकडे तिचे शत्रू तिच्या नाशाची योजना करीत होते,नाशाची जाळी विणीत होते.आपल्या मार्गातून जोन जावी असे निरनिराळ्या चार पक्षांना वाटत होते.


१. इंग्रज,२. इंग्रजांना अनुकूल असलेले फ्रेंच, ३. तिच्या राजप्रियतेचा मत्सर वाटणारे काही दरबारी व ४. देवदूतांशी तिच्या होणाऱ्या भेटीगाठींबद्दल मत्सर वाटणारे बिशप.


१४१५ मध्ये जी अजिनकोर्टची लढाई झाली,तीत इंग्रजांना लॉइरे नदीच्या उत्तरेचे बहुतेक प्रांत मिळालेच होते.संपूर्ण फ्रेंच राज्यावर कब्जा मिळविण्यासाठी इंग्रज उत्सुक होते.पण डॉमरेमी गावची ही चेटकीण... जोन त्यांच्या प्रगतीच्या आड येत होती.एवढेच नव्हे,तर जो काही फ्रेंच प्रदेश त्यांच्या हातात होता.तोही ती काढून घेऊ इच्छित होती.इतक्या श्रमांनी व इतके रक्त सांडून मिळविलेला प्रदेश गमावावा लागणार म्हणून ते जळफळत होते.काहीही करून जोनला प्रतिबंध झालाच पाहिजे,असे त्यांना वाटत होते.


काही फ्रेंच सरदार या इंग्रजांशी मसलती करीत होते. चार्लस राजावर इंग्रजांना जय मिळवून देऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचा त्यांचा विचार होता.अशा या स्वार्थाधि व देशद्रोही सरदारांत ड्यूक ऑफ बगैंडी व फिलिप दि गुड हे दोघे प्रमुख होते. हा 'चांगला' फिलिप वास्तविक 'वाईट' होता; तो अठरा अनौरस मुलांचा बाप होता! चार्लसला झालेला राज्याभिषेक म्हणजे फिलिपच्या स्वार्थावर मोठा आघात होता. या डॉफिनपेक्षा या चार्लसपेक्षा फिलिप अधिक श्रीमंत व अधिक कार्यक्षम होता.निदान आपण अधिक लायक आहोत,असे त्याला वाटे.इंग्रजांच्या संरक्षणाखाली फ्रान्सचा स्वामी होण्याचा त्याचा बेत होता. 


पण जोनच्या आगमनाने त्याचे बेत मुळातच खुडले गेले !

तिच्या या नसत्या ढवळाढवळीबद्दल तिला शासन झालेच पाहिजे,असे इंग्रजांप्रमाणेच त्याचेही मत होते.पण तिच्या उघडउघड शत्रूपेक्षा तिचे मित्र म्हणून मिरविणारेच अधिक धोकेबाज होते.


सातव्या चार्लसचे लबाड दरबारी तिला पाण्यात पाहत होते.विशेषतः राजाचा सल्लागार जॉर्जीस ला ट्रेमाइली हा जोनला फार भीत असे.जोनचा मोकळेपणा व अत्यंत सरळ प्रामाणिकपणा यांची त्याला धास्ती वाटे.ला ट्रेमाइली हा कपटी व जोरदार मनुष्य होता.तो इतरांवर आपली छाप बसवी;आपले प्रभुत्व स्थापी. त्याने आपल्या पहिल्या पत्नीचा त्याग केला होता. दुसऱ्या एका स्त्रीशी त्याने पुन्हा लग्न लावले व तिच्या पहिल्या नवऱ्याला ठार मारले.खोटे बोलून व खुशामती करून त्याने राजाची कृपा संपादिली होती.तो अत्यंत दुष्ट वृत्तीचा व दांभिक मनुष्य होता.तो राजालाही फसवायला तयार होता.त्याचे इंग्रजांशी आतून सूत होते. त्याच्या मनात काय चालले आहे,हे जोनला समजत होते.ही आपली कपटकारस्थान राजाला सांगेल अशी त्याला भीती वाटत होती;म्हणून या किसान कन्येला आपल्या मार्गातून कसे दूर करता येईल,याचा विचार तो करीत होता." आपल्या कपटी स्वभावानुसार तो वरपांगी जोनविषयी अत्यंत आदर दाखवीत होता;पण आतून तिच्या नाशाची कारस्थाने रचत होता.


पण तिच्याविरुद्ध उभ्या राहिलेल्या शत्रूपैकी सर्वांत भयंकर जर कोणी असतील तर ते भटभिक्षुक व धर्मोपदेशक हीम्स येथील आर्चबिशप,बोव्हिस येथील बिशप व पॅरिसच्या विद्यापीठातील एकजात सारे धर्माधिकारी तिला मारू पाहत होते.चर्चची परवानगी घेतल्यावाचून तिने लोकांस ईश्वराचे आदेश सांगितले होते. 'मी देवदूतांशी बोलते' 


असे म्हणण्याचे धाडस करून तिने सर्व धर्ममार्तंडांचा आणि उपाध्यायांचा अपमान केला होता.दैवी शक्तीशी बोलण्याचा अधिकार फक्त या उपाध्यायांचा धर्मगुरूंचा. ईश्वर व मानव यांच्यातील दुभाष्याचे काम फक्त चर्चच करू शकते, अशी त्यांची प्रामाणिक समजूत असल्यामुळे त्यांना खरोखरच वाटे की, जोनला जे आदेश मिळत, ते ईश्वराचे नसून सैतानाचे असले पाहिजेत; देवदूतांचे आदेश चर्चमार्फत आले असते. सैतानाकडून जिला आदेश येतात ती नास्तिक व पाखंडीच असली पाहिजे. ती प्रभुद्रोह करणारी आहे. अर्थात, धर्माला व धर्मगुरूंना तिच्यापासून धोका असल्यामुळे ती ठार मारली गेलीच पाहिजे.


काल्पनिक देवदूतांच्या रक्षणापेक्षा जोनच्या शत्रूचे कापट्य अधिक प्रभावी ठरले.कॉपेन येथील लढाईत तिच्याच काही देशबांधवांनी तिला पकडून इंग्रजांच्या हवाली केले.सोन्याच्या दहा हजार पौंडांस त्यांनी तिला इंग्रजांना विकून टाकले ! तिच्या मरणाबाबत निश्चित होण्यासाठी इंग्रजांनी तिला इन्क्विझिशन संस्थेच्या स्वाधीन केले आणि अशा रीतीने जोन युद्धकैदी होती तरी ती धर्मगुरूंच्या ताब्यात दिली गेली व त्यांच्या न्यायासनासमोर तिचा चालून तिला 'नास्तिक' म्हणून जिवंत जाळण्याची सजा देण्यात आली!


तिच्या खटल्याच्या वेळेस मुख्य न्यायाधीश बोव्हिसचा बिशप पेरी कौचॉन हा होता.तो अत्यंत श्रद्धाळू व निष्ठावंत ख्रिश्चन होता.

पॅरिसच्या विद्यापीठाने त्याच्या धार्मिकतेची जाहीर स्तुती केली होती. " बिशप देवासाठी किती तळमळतात ! किती त्यांचे धैर्य,केवढी त्यांची धडपड ! ते कसे वाट पाहत बसतात ! किती मानसिक व्यथा व वेदना ! चर्चसाठी त्यांना किती यातना!" अशा प्रकारे पॅरिसच्या विद्यापीठाने बिशपांची पाठ थोपटली होती.पण विद्यापीठाच्या वरील प्रशस्तीत शेवटी "चर्चसाठी त्यांनी किती लोकांस छळले व किती लोकांचे प्राण घेतले!" असे शब्द घातले असते,तर बरे झाले असते.कारण जळणाऱ्या नास्तिकांच्या चरबीचा वास त्यांच्या नाकांना फार आवडे.कॉन्स्टन्स येथे जी धर्मपरिषद भरली होती व जेथे हस याला वचन मोडून अटक करून ठार मारण्यात आले होते,त्या परिषदेत हे बिशपही होते. हसच्या खटल्याच्या वेळी हेच बिशप म्हणत होते की, कधीकधी न्यायाचा औपचारिक देखावा न करताही अपराध्याला मारणे रास्त असते, क्षम्य असते.


इंग्रजांनी जेव्हा जोनला पेरी कौचॉन याच्या हाती दिले, तेव्हाच त्यांनी तिच्या मरणपत्रावर सही केली.ती जिवंत सुटावी अशी त्यांना इच्छाच नव्हती.चर्चने जर नास्तिक म्हणून तिला ठार केले नाही,तर तिला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यायचे असे ठरले होते.

"It was a case of Heads you lose, tails I win." खटल्याच्या आरंभी न्यायाधीश मंडळात असलेल्या दोघा न्यायाधीशांनी एकंदर सारे काम बेकायदेशीर आहे असे म्हटले,तेव्हा त्यांपैकी एकाला ताबडतोब कमी करून अध्यक्षांच्या परवानगीने कैदेत टाकण्यात आले,व दुसरा त्याला शिस्त लावण्याची फुरसत वरिष्ठांना मिळण्यापूर्वीच पळून गेला! खटला जवळजवळ चार महिने चालला होता.आरंभी न्यायाधीश बेचाळीस होते,ते शेवटी त्रेसष्ट झाले. शिकारी कुत्र्यांप्रमाणे ते तिच्या पाठीस लागले होते. त्यांनी तिच्यावर लादलेले आरोप बाष्कळ होते.चर्चच्या मदतीवाचून ती स्वर्गातील शक्तीशी बोलली हा तिच्यावरील मुख्य आरोप होता.


दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे झाल्यास भटाभिक्षुकांच्या इच्छेला मान देण्याऐवजी तिने देवाची इच्छा मानली,हा तिचा गुन्हा होता.ते पुन्हा म्हणाले,तिला ज्या शक्ती दिसल्या,त्या दैवी नसून सैतानी होत्या.आणि न्यायाधीश त्रेसष्ट ती एकटीच असल्यामुळे त्यांची इच्छा बलशाली ठरली !


तिला आपले भवितव्य माहीत होते.तरीही त्या खटल्याच्या वेळेस वातावरणात तिनेच जरा विनोदी रंग भरला.एके दिवशी खटल्याच्या वेळी ते सर्व धार्मिक कावळे एकदम काव काव करू लागले,तेव्हा ती त्यांना गोड आवाजात म्हणाली, भल्या बापांनो,सारे असे एकदम नका बोलू.तुम्ही एकमेकांचा गोंधळ उडविण्याचे पाप कराल.


इ.स. १४३१ च्या मेच्या तिसाव्या तारखेस न्यायाचा हा फार्स संपला.जोनला जिवंत मारण्याची शिक्षा झाली. पॅरिसच्या विद्यापीठाने पेरी कौचॉनची पाठ पुन्हा थोपटली. बिशपने हा खटला अत्यंत गंभीरपणे व पवित्र आणि न्यायी वृत्तीने चालविला असे उद्गार विद्यापीठाने काढले.तिला मरणाची शिक्षा देऊन चर्चच्या प्रतिनिधींनी तिला स्टेटच्या मारेकऱ्यांच्या हवाली केले.रक्तपाताकडे आपणास पाहवत नाही असे चर्चचे म्हणणे असे.चर्च मरणाची शिक्षा देई;पण स्वतःतिची अंमलबजावणी करीत नसे.ते काम स्टेटकडे असे.चर्च शिक्षा देऊन पुन्हा त्या मरणोन्मुखांना मारले जात असता त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करी !


जोनला जाळण्यापूर्वी पॅरिसच्या विद्यापीठातील प्रोफेसर निकोलस मिडी याने तिला प्रवचन दिले.तो म्हणाला, चर्चचा एखादा अवयव बिघडला तरी सारे चर्च रोगी होते.नंतर तू मरायलाच लायक आहेस असे तिला सांगून तो म्हणाला,चर्चच्या बऱ्यासाठी तू मर.जा,जा, शांतीने मर.चर्च तुला वाचवू शकणार नाही.आपल्या गुन्हेगारांच्या कत्तलीचा दोष आपणाकडे येऊ नये म्हणून चर्चवाले शेवटी नेहमी म्हणत,चर्च काय करणार? चर्चच्या हातात काय आहे? पण जोन ऑफ आर्कला अधिक समजत होते.पेरी कौचॉनकडे बोट करून ती म्हणाली,बिशप,तुमच्यामुळेच मला मरावे लागत आहे."


हे जे शोकपर्यवसायी नाटक झाले,त्याचा शेवटचा भाग साडेपाचशे वर्षांनी केला गेला.तेव्हा पोपने शेवटी असे जाहीर केले की,जे संदेशदाते जोनला भेटत,ते सैतानाचे दूत नसून देवदूतच होते.मी तिची शिक्षा रद्द करतो व ती संत होती,असे जाहीर करतो.