दिसभर ढेकळं तुडवत बैलांच्या मागनं चालून चालून दमलेल्या पांडूतात्यानं दिस मावळायला आल्यावर औत सोडलं.बैलं दावणीला बांधली. उन्हातान्हात नांगर वढून वढून बैलंबी दमली हुती. ढेकळात ठेचकाळून तात्याचं पाय भरून आलं हुतं. त्याकडं दुर्लक्ष करत तात्यानं कावड घिऊन हिर गाठली.कावडीनं दोन हेलपाट्यात चार बारड्या पाणी आणलं.दोन्ही बैलास्नी आणि म्हशीला पाणी पाजलं.त्येंच्या म्होरं वैरण टाकली आणि मग तंबाखू मळीत मेडीला टेकून निवांत बसला.तेवढाच काय तो त्येच्यासाठी आराम.नायतर हातरुणावर पाठ टेकूपतूर त्येचं काम काही संपत नव्हतं.
घरला जायचं,भाकरतुकडा खायचा,कुत्र्यासाठी भाकरी बांधून घ्यायची आणि परत वस्तीवर झोपायला यायचं,हा त्येचा रोजचा नेम.वैरण ठेवलेल्या बाजूला दोन मेडीच्या मधे माच्या बांधल्याला.त्यावर पिंजार टाकून गुबगुबीत गादी केल्याली.पिंजारावर घोंगडं टाकलं की ऊब यायची.उशाला पिंजाराची पेंडी ठेवल्याली.त्येच्याखाली चुना-तंबाखूचा बटवा असायचा.तात्याची जगायेगळी गादी हुती ती. तंबाखू मळून झाल्यावर बटवा परत जाग्यावर ठेवणार तवर वरच्या बांधावरनं हाक आली,
"पांडूतात्या... ओ... तात्या..."
"का रं... कोण हाय?" तात्यानं इचारलं.
"मी हाय नामू... तुमच्या घरात भांडणं लागल्याती.या लवकर." शेजारच्या नामूआण्णांनं सांगितलं, तसा पांडूतात्या हालला.
टाविल खांद्यावर टाकला आणि वाटंत कुठंबी न थांबता थेट घर गाठलं.
घरात त्येची कारभारीन आणि थोरल्या भावाची मालकीण जोरानं भांडत हुत्या.निमित्त काय तर तात्याच्या सात वर्षाच्या लेकान फेकल्याला खडा थोरल्या भावाच्या कोंबडीला लागला हुता.कोबंडी काय मेली नव्हती;पण भावाची बायको रामानं लालेलाल झाली हती.तिनं पोराला थोबाडात हाणली तसं भांडाण पेटलं,ते वाढत वाढत रानाच्या वाटणीवर गेल.
दादा आणि वहिनी आपल्या बायकोसोबत हातवारे करून भांडताना बघून तात्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.म्या घरात नसताना तुमी माझ्या लेकराला मारलसा का,असं म्हणत तात्याचा पारा चढला तसं दादानं दारामाग ठेवल्याली कुराड तात्याच्या अंगावर उगारली.बरं झालं नामूआण्णा मागच्या अंगाला हत म्हणून.त्येंनी तशीच कुराड
हिसकावून घेतली.बाकीच्यांनी दोघास्नी आपापल्या घरात ढकललं.दाराला बाहेरन कडी लावली.थोडा वाडूळ तोंडाची बडबड चालूच हुती.मग नामून थोरल्या गड्याच्या नादी लागू नकोस म्हणून पाडूंतात्याची समजूत काढली.एकमेकीला शिव्या हासडत दोघी जावा जावांनी भाकरी थापल्या. कालवण शिजलं नव्हतं.भांडणामुळं येळ निघून गेली हुती.
वातावरण निवाळल्यावर नामूआण्णा निघून गेलं.तात्यांनं न्हानीत चूळ भरली.दुधात दोन भाकरी कुस्करून त्या वरापल्या.कुत्र्यासाठी भाकरी बांधून घेतली.कंदिलाची वात मोठी केली अन् तो वस्तीवर झोपायला निघाला.
रानाच्या वाटणीत टिचभर बांध इकडे-तिकडं झाला आसल म्हणून थोरल्या भावानं कुराड घिऊन अंगावर यावं आणि कोंबडीला खडा लागला म्हणून वहिनीनं पोराला थोबाडीत मारावी,हे काय तात्याला पटलं नव्हतं.त्येचं डोस्कं रागानं भणभणत हुतं. वस्ती जवळ येईल तसं कुत्र्याचा भुकण्याचा आवाज कानावर येताच तात्या भानावर आला. आज लईच येळ झाल्यामुळं कुत्रं भुकत आसल असं तात्याला वाटलं.तरी एवढ्या जोरात भुकणार नाय याची त्याला खात्री हुती.
कायतरी इपरीत घडलं असणार,या इचारानं तात्या झाप झाप पावलं टाकत वस्तीवर आला.समोर बघतो तर रोजच्यासारखं बैलांनी वैरण खाल्ली नव्हती,त्यामुळं ती तशीच राहिली हुती.दोन्ही बैलांनी नाचून नाचून गोठ्यात धुडगूस घातला हुता.मानंला हासडं मारून मारून खुट्टा ढिला केल्याला.
येसनीनं नाकातलं रगात गळत हुतं.दोन्ही बाजूचा खुट्टा ढिला केला हुता.छपराच्या मेडीला बांधलेल्या कुत्र्यानंपण पायानं उकरून उकरून जमिनीत खड्डा पाडला हुता.तात्या बस्तीत आल्यावरबी त्ये भुकतच हुतं.
अगोदरच घरातल्या भांडणानं संतापलेल्या तात्यानं आड्याला आडकिवलेला चाबूक काढला आणि मागचा पुढचा इचार न करता त्येच्या दांड्यानं बैलांची पाठवानं चोपली.पुढ्यात टाकल्याली वैरण खाल्ली नाय.हांबरून आणि नाचून सगळा गोठा उदसलाय.मारल्यापुरतं बैलं शांत झाली.कुत्र्याला भांड्यात भाकरी कालवून ठेवली.बैलाच्या पाठीवर हात फिरीवला,तरी बैलांनी वैरनीला त्वांड लावलं नाय.पाणी पाजून बघुया म्हणून भरल्याली बारडी दोन्ही बैलांच्या पुढ्यात ठेवली.एकानंबी पाणी पिलं नाय.कुत्र्याच्या पुढ्यात भाकरी तशीच.त्येचं त्वांड काय केल्या बंद हुईत नव्हतं.सारखं पायांनी माती उडवीत ते बांधलेल्या मेडीला हासडा मारीत हुतं.आता तात्याला काही कळायला मार्ग नव्हता.
वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर
तात्याच्या वस्तीवरची ही धांदल आजूबाजूच्या वस्तीवर झोपायला येणाऱ्यांच्या ध्येनात आली. कुत्र्याचा आवाज बराच येळ झाला थांबत नव्हता, म्हणून दोघं-तिघं तात्याच्या छपरात शिरली.एकानं सांगितलं बैलाच्या पायात काटाबिटा हाय का बघ, कोण म्हटलं कानात गोम गेलीया का बघ,कोण म्हणतं शिंगाखाली गोचीड हाय का बघ,तर कोण म्हणतं कुणीतरी करणी करून लिंबू-मिरची बांधल्यात का बघ... प्रत्येकाच्या मनाला ईल त्यो उपाय सांगत हुता;पण बैलं काय थांबनात.कुत्र्याचा आवाज वाढतच हुता.घरात भांडणाचा धुडगूस झाला हुता.आता हितंबी तेच.बैलांनं खुट्टा चांगलाच ढिला केला हुता.परत दगडांनी ठेचून खुट्टा घट्ट केला.बैलाच्या अंगात ताप हाय का बघितलं,तर तेबी नाय.त्यात आज बैलास्नी पेंड आणायची इसारली हुती.तात्याला वाटलं वाळकी वैरन नको आसल म्हणून त्येनं कोपऱ्यातली वल्ली वैरन बैलांच्या म्होरं इस्काटली.पर बैलांनी वैरनीकडं ढुंकूनबी बघितलं नाय.त्येंची दावं तोडायची खटपट चालूच हुती.
तात्याला परत राग यायला लागला. परत चाबकाची वादी दांड्याला गुंडाळली आणि दांड्यानं बैलांची पाठवान झोडपायला सुरुवात केली.कुत्र्याचा भुकण्याचा आवाज बदलला.ते आता रडायला लागलं.कुत्रं रडणं म्हणजे आपशकुन.रात्रीच्या येळंला कुत्रं रडतंय म्हंजी कायतरी वाईट घडणार ! बैलाला मारील तितका त्येचा नाच वाढतच चालल्याला.एका हासड्यात बैलाची येसण तुटली.तोंडातनं फेसाची आन् नाकातनं रक्ताची धार गळत हुती.येसणीसंगं दावी गळ्यातनं बाजूला झाली.बैलानं शेपूट वर करून पुढं झेप घेतली.मागं पांडूतात्यानं मारायला उगारलेला हात हवेतच थांबविला.दावं तोडून बैल कुठं निघाला म्हणून त्यो बघत उभा राहिला.तवर बैलानं छपरातला माच्या गाठला.त्यावर टाकल्याल्या पिंजारात शिंग खुपसलं आणि तसंच सगळं पिंजार उदसून छपराबाहेर फेकलं.त्या पिंजरासंगं त्यात पेंडीच्या उबीला बसलेला नाग धापकन् पडला आणि सळसळ करत वढ्याच्या अंगाला पळाला.
शिंगात अडकल्यालं पिंजार हालवून पाडीत नाग गेला त्या दिशेला बैल बघू लागला.तात्या घराकडं गेल्यावर एक नाग माच्यावरच्या पिंजारात येऊन इटुळं घालून बसल्याला बैलानी आन कुत्र्यान बघितल हत. आपला धनी त्या माच्यावर झोपायला गेला तर उशाखाली बसल्याला नाग दगा देणार,हे त्या मुक्या जनावरांनी चांगलंच जाणलं हुतं. बैलानं शिंगांनी पिंजरासकट नाग उचलून बाहेर फेकल्यालं बघून पांडूतात्यानं तोंडावर हात मारून घेतला. त्येच्या हातातला चाबूक आपोआपच गळून खाली पडला. कुत्र्याचं भुकणं थांबलं.
सगळी जनावरं जागच्या जागी शांत झाली.बघायला जमलेल्या शेतकऱ्यांनी डोसक्याला हात लावला.इतका वाडूळ कुणालाच काय सुचलं नव्हतं.नाग सळसळत जाताना बघितल्यावर सगळ्यांच्या छातीत धस्स झालं. उडाल्याला नाग आपल्या अंगावर पडला असता तर काय झालं असतं,या इचारानं सगळी टरकली हुती; पण बैलांनी त्येचा विचार केला नाय.सगळीजण तात्याच्या बैलाचं कौतुक करायला लागली.
एकानं पळत तात्याच्या घरात जाऊन हळद आणली. त्येच्या मागोमाग तात्याची बायको आणि पोरगं पळत आलं.धन्याला वाचविण्यासाठी बैलानं येसन तोडून नाक फाडून घेतलं हुतं.
तात्यानं हळूवार हातानं तेच्या नाकपुडीला हळद लावली.
बैलाच्या पाठीवर चाबकाचं वळ बघून त्याच्या बायकोला गहिवरून आलं.रागाच्या भरात आपण काय केलं... मुक्या जनावराला किती बदडलं म्हणून तात्या डोस्कं बडवून घ्यायला लागला.बाजूच्या शेतकऱ्यांनी तात्याची समजूत काढून शांत केलं.
बैल परत दावणीला येऊन उभा राहिला. पांडुतात्यानं बैलांच्या गळ्यात हात घातला. वशिंडावरून हात फिरीवला आणि ढसाढसा रडायला लागला.बैलाच्या पाठीवर चाबकाच्या दांड्याचं वळ उठलं हुतं.बैल मान झाडून शांत उभा राहिला.कुत्र्यानं तात्याचं पाय चाटायला सुरुवात केली.तात्या बैलाचं मुकं घ्यायला लागला.बैलाच्या तोंडातनं फेसाची धार लागली हुती.त्यात नाकातलं रगात मिसळल्या -
मुळं फेस लालभडक दिसत हुता. टिचभर जमिनीसाठी सख्खा भाऊ जीव घेण्यासाठी कुराड घिऊन अंगावर धावून आला आणि या मुक्या जनावरानं माझा जीव वाचविण्यासाठी माझाच मार खाल्ला.त्यास्नी जे कळलं ते माझ्या ध्यानात आलं नाय.बैलाच्या साऱ्या अंगावरनं हात फिरवित पांडूतात्या रातभर दावनीत बसून राहिला.