आपल्या शरीरातल्या किडनीज काम कसं करतात याचा अभ्यास करणाऱ्या ज्ञान शाखेला 'नेफ्रॉलॉजी' असं म्हणतात.
आपल्या शरीरात मूत्र कसं तयार होतं? किडनी (मूत्रपिंड) नेमकं काय काम करते याबद्दल माणूस गेली दोन हजार वर्षं तरी विचार करतोय. त्याची सुरुवात हिप्पोक्रॅट्सपासून होते आणि अजूनही या विषयात संशोधन चालू आहे.
गेलनच्या (इ.स.१३० ते २१०) आधीपर्यंत हिप्पोक्रॅट्स आणि ॲरिस्टॉटल यांनीही शरीरशास्त्रावर विचार केला होता,पण त्यांचा विचार आणि अभ्यास फक्त निरीक्षणांवर आणि तर्कावर अवलंबून होता.
पण गेलन हा प्रयोग करून त्यावरून निष्कर्ष काढणारा पहिला डॉक्टर होता.
त्या काळी माणसांचं शवविच्छेदन करायला परवानगी नव्हती,त्यामुळे त्यानं आपले अनेक निष्कर्ष प्राण्यांवरून काढले होते.त्यानं एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे, "मूत्र कसं तयार होतं हे आपल्याला जरी माहीत नसलं, तरी खाटिकानं प्राण्यांच्या ब्लॅडर (मूत्राशय) आणि किडनीज (मूत्रपिंड) या युरेटर्सनं (मूत्रवाहिनी) जोडलेल्या असतात हे पाहिलेलं असतं." याचाच अर्थ आपलं मूत्र हे किडनीजमध्ये तयार होत असलं पाहिजे अशी अटकळ त्यानं बांधली होती.
आपण अन्न खातो त्यातला न लागणारा भाग जसा विष्ठेच्या रूपात बाहेर पडतो,तसंच आपण प्यायलेल्या पाण्यातला जास्तीचा आणि न लागणारा भाग मूत्रातून बाहेर पडतो असं कुणालाही वाटू शकतं,
पण आपण प्यायलेलं पाणी हे पचनक्रियेच्या वेळीच आपल्या आतड्यातून रक्तात शोषलं जातं आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीनं अन्न वापरून त्यातून निर्माण झालेला कचरा आणि उत्सर्जित केलेला कार्बन डाय ऑक्साइड वायू रक्तात टाकला जातो आणि रक्त तो कचरा फुफ्फुस आणि किडनीजकडे वाहून नेऊन बाहेर टाकण्याचं काम करत असतं.
आपल्या शरीरातल्या पेशींमधून शिरांमार्फत अशुद्ध रक्त हृदयाकडे पाठवलं जातं आणि मग या रक्तातला कार्बन डाय ऑक्साइड वायू फुफ्फुसांमार्फत उच्छ्वासातून बाहेर टाकला जातो.पण रक्तात विरघळलेली इतर रसायनं अजूनही तशीच राहतात.ती काढून टाकून रक्त शुद्ध करण्याचं काम मात्र किडनीज करत असतात.
रक्तातला कार्बन डाय ऑक्साइड उच्छ्वासातून काढून टाकला तरी रक्तामध्ये अजूनही युरिया,युरिक ॲसिड,अमोनिया,जास्तीचं मीठ,
जास्तीची साखर,आपण घेत असलेल्या औषधांमधला काही भाग आणि शरीराला विषारी असणारी आणखीही अनेक हानिकारक रसायनं खरं तर शरीरातून बाहेर काढून टाकणं गरजेचं असतं. रक्त गाळून त्यातली नेमकी शरीराला नको असलेली रसायनं काढून टाकायचं काम आपल्या बरगड्यांच्या खाली पाठीच्या बाजूला असलेल्या किडनीज करतात. यालाच आपण मूत्र किंवा युरीन म्हणतो.हे मूत्र आपल्या पोटात असलेल्या युरीनरी ब्लॅडरमध्ये (मूत्राशयात) साठवलं जातं आणि नंतर ते मूत्रनलिकेमार्फत (युरेथ्रा) शरीराच्या बाहेर टाकलं जातं.
पण हीच गोष्ट समजायला आपल्याला तब्बल दोन हजार वर्षं लागली.नेफ्रॉलॉजीच्या या इतिहासामध्ये किडनीज मूत्र तयार करत असाव्यात हे जरी लवकर लक्षात आलं असलं,तरी मुळात ते कसं तयार होतं हे मात्र मायक्रोस्कोपचा शोध लागल्याशिवाय आपल्याला कळलं नाही.म्हणजेच थोडक्यात मायक्रोस्कोप्स शिवाय नेफ्रॉलॉजीचा अभ्यास करणं अशक्य झालं असतं.
आपलं मूत्र किडनीजद्वारे मूत्राशयात (ब्लडर) जमा होत असतं हे गेलननं पाहिलं होतं. शिवाय त्यानं ज्यांना डिसयुरिया म्हणजे मूत्रनिर्मितीमध्ये अडथळा येतो असा आजार आहे,त्यांना पाठीच्या खालच्या भागात केलं होतं.यावरूनच गेलननं त्याच्या आधी ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेल्या अस्क्लेपियाडेस (Asclepiades) यानं ब्लॅडरही स्पंजसारखी असते आणि ती संपूर्ण शरीरातली वाफ शोषून घेऊन त्याचं मूत्र तयार करते असा विचार मांडला होता. मग ब्लॅडरमधून पाण्याची वाफ किंवा पाणी काहीही जाऊ-येऊ का शकत नाही?असा प्रश्न विचारून गेलननं या विचारांना छेद दिला.हा प्रश्नही त्यानं प्रयोग करून पाहिल्यानंतरच विचारला होता.यासाठी गेलननं एका कुत्र्यावर प्रयोग केला होता.
त्यानं कुत्र्याचं ब्लॅडर बाहेर काढून त्यात पाणी भरलं आणि ती ब्लॅडर युरेथ्रापाशी बांधून टाकली आणि मग तिच्यावर दाब दिला तरी तिच्यातून पाणी बाहेर पडू शकत नाही हे त्यानं पाहिलं होतं.
त्यातून त्यानं या ब्लॅडरमधून पाणी पुन्हा उलट दिशेनं किडनीत जात नाही हेही पाहिलं होतं.पचनामध्ये मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागात विष्ठा तयार झाल्यानंतर ती तर लवकर शरीराबाहेर टाकली नाही,तर मोठ्या आतड्यातून पाणी आणि काही जीवनसत्त्वं पुन्हा शोषली जायला लागतात.याउलट मूत्र तयार होऊन एकदा ते ब्लॅडरमध्ये आलं आणि आपण ते शरीराबाहेर जाऊ दिलं नाही तर ते पुन्हा शोषलं जात नाही.या गोष्टी गेलननंच प्रयोगानं तपासल्या होत्या.
पण किडनीमध्ये तरी मूत्र कसं तयार होतं? आणि ते ब्लॅडरमध्ये कसं येतं? या प्रश्नांची उकल मात्र गेलन करू शकला नाही.या प्रश्नावर गेलननं असा तर्क लढवला होता,की शरीरामधलं मूत्र हे किडनी आपल्याकडे आकर्षित करते आणि ब्लॅडरकडे पाठवते.
यासाठी सगळ्या शरीरातला द्रव किडनीकडे यायला हवा होता. पण तसं तर काही दिसत नव्हतं,मग किडनी नेमकं काय करते? या प्रश्नावर गेलनकडे उत्तर नव्हतं.पण सगळ्या शरीरातून रक्त गाळून त्याचं मूत्र होत असलं पाहिजे आणि किडनीज या रक्तातलं जास्तीचं पाणी काढून टाकून ते पातळ होण्यापासून वाचवत असाव्यात अशा निष्कर्षापर्यंत गेलन आला होता हे मात्र नक्की.पण गेलनच्या वेळी रक्त शरीरात कुठून कसं फिरतं म्हणजेच रक्ताभिसरण कसं होतं माहीत नसल्यामुळे त्याला या विषयात पुढे जाता आलं नाही.किडनीज कशा काम करतात हा गेलनचा प्रश्न विल्यम हार्वे येईपर्यंत तसाच राहिला.विल्यम हार्वेनं (१५७८-१६५७) आपल्या शरीरात रक्त सतत फिरत असतं हे दाखवून रक्ताभिसरणाचं काम कसं चालतं हे १६२८मध्ये दाखवून दिलं.पण मध्ये १५०० वर्षं जावी लागली होती.
गंमत म्हणजे हार्वेच्या लिखाणात कुठेही 'किडनी' हा शब्द सापडत नाही.पण त्यानं आपल्या शरीरात रक्त कसं फिरतं यावर केलेल्या संशोधनामुळे वैद्यकाची कोणतीही शाखा त्याला डावलू शकत नाही.हृदयामधून धमन्यांमार्फत शुद्ध रक्त सगळ्या अवयवांपर्यंत नेलं जातं आणि सगळ्या अवयवांनी ते वापरल्यानंतर शिरांमधून अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे आणलं जातं. (यात किडन्याही आल्याच.) हे रक्ताभिसरणाचं तत्त्वं हार्वेनं सांगितलं.पण त्या काळी त्याच्यावरही गेलनचा इतका प्रभाव होता,की आपल्याला संशोधनातून सापडलेलं हे तत्त्व प्रसिद्ध करायलाही त्यानं दहा वर्षं घेतली आणि प्रसिद्ध केल्यानंतर त्याचं संशोधन स्वीकारलं जायला पुढची पंचवीस वर्षं लागली! म्हणजे वैद्यकावर गेलनचा किती प्रभाव होता हे दिसून येतं.
ज्या वर्षी हार्वेनं रक्ताभिसरणाचा शोध लावला त्याच वर्षी त्याचं संशोधन पुढे नेणाऱ्या माल्पिधीचा (१६२८-१६९४) जन्म झाला. त्यानं १६६६मध्ये किडनीजमध्ये लहान लहान खड्डे आणि कालवे यांच्यासारखी रचना असावी आणि त्यातून किडनीमध्ये जाणारं सगळं रक्त गाळून बाहेर पडत असावं.त्यातून मूत्र तयार होत असावं असं मला वाटतं.असं आपल्या पुस्तकात लिहिलं होतं.तो पुढे लिहितो,जर आपण सूक्ष्मदर्शक भिगातून किडनीकडे पाहिलं तर किडनीच्या अनेक लहान लहान नळ्यांमधून मूत्र बाहेर पडताना आपल्याला दिसेल.त्यावरून किडनी हे दूसरं तिसरं काहीही नसून भरपूर बारीक बारीक केशवाहिन्या असलेला आणि त्यातून मूत्र वाहणारा एक गाळण्यांचा पुंजकाच आहे."
माल्पिघीनं आपल्या 'दे व्हिसेरम ॲनॅटॉमिका' या पुस्तकात किडनीवर चक्क 'डे रेनेबस (किडनीजविषयी)' या शीर्षकाचं एक अख्खं प्रकरणच घातलं होतं!
त्याचं लिखाण इतकं सुयोग्य होतं की त्याला पुढची चक्क दोनशे वर्षं कुणी हात लावू शकलं नाही !
सजीव - अच्युत गोडबोले ,अमृता देशपांडे , मधुश्री पब्लिकेशन
केशवाहिन्या म्हणजेच कॅपिलरीजचा शोध हा माल्पिधीनं वैद्यकाला आणि शरीरशास्त्राच्या अभ्यासाला दिलेलं खूप मोठं योगदान आहे.
माल्पिघीनं या पुस्तकात किडनीजची रचना बाहेरून कशी असते,
आतून कशी असते आणि त्या काम कसं करतात हे लिहून ठेवलं होतं.त्याचं वर्णन इतकं सुंदर होतं,की त्याला त्याच्या जोडीला आकृत्या दाखवायची गरजच पडत नव्हती! तो लिहितो,किडनीज बाहेरून थोड्या कडक दिसत असल्या तरी आतून त्यांचे व्यवस्थित भाग पडतात.किडनीमध्ये पिरॅमिडच्या आकाराचे अनेक भाग असतात.या पिरॅमिड्सना व्यवस्थित रक्तपुरवठा झालेला असतो.या पिरॅमिड्समध्ये अनेक गांडुळांसारखे वर्म्स गुंडाळी (कॉइल) करून बसल्यासारखी रचना असते.यांची सुरुवात रक्तवाहिन्यांपासून होते आणि त्या किडनीच्या पेल्व्हिस भागात येऊन थांबतात.तिथं मूत्र जमा झालेलं असतं."
माल्पिघीच्या या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वर्णन आजही योग्य मानलं जातं.त्याही पुढे जाऊन त्या काळी हार्मोन्स माहीत नसले, तरी माल्पिधीनं किडन्यांना 'ग्लँड्स' म्हटलं होतं. पुढे १९०० साली पहिलं हार्मोन सापडलं ! आणि गंमत म्हणजे किडनीही काही हार्मोन्स स्रवते याचा नंतर शोध लागला. यामुळे माल्पिघीचा हा तर्क चुकून बरोबर आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माल्पिघीनं किडनीमध्ये येणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रंग सोडला.
आता त्याला किडनीतलं रक्त कोणत्या दिशेनं कसं कसं प्रवास करतं हे समजणार होतं.आश्चर्य म्हणजे या प्रयोगामुळे त्याला किडनीच्या मधल्या भागात व्यवस्थित रक्तपुरवठा केलेला असतो आणि तिथून रक्त बाहेरही येऊ शकतं,हे समजलं.याचाच अर्थ 'धमन्या आणि…
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….