* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बुलबुल / Nightingale

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/३/२५

बुलबुल / Nightingale

एकदा निगडीमध्ये कुणाच्या तरी घरी गॅलरीमधल्या जाईच्या वेलीवर बुलबुल पक्ष्यांच्या जोडीने घरटं विणलं आणि त्यात तीन अंडी घातली.थोड्याच दिवसांत त्यातून इवल्याशा पिल्लांनी जन्म घेतला. बुलबुल आई-बाबा आपल्या बछड्यांना मोठ्या प्रेमाने भरवू लागले.दिवसभर चोची उघडून ती पिल्लं जे मिळेल ते गट्टम करून चिवचिवाट करायची;पण पिल्लं मोठी होण्याआधीच एका साळुंकीने त्यांच्या घरट्यावर हल्ला केला आणि घरटं वेलीवरून गॅलरीमध्ये पडलं.

घरातल्या लहानग्यांनी साळुंकीला हुसकावून लावलं. पिल्लांना घरट्यासकट पुठ्ठ्याच्या एका छोट्या बॉक्समध्ये ठेवून पार्कवर आणलं.


आम्ही त्या पिल्लांना ताब्यात घेतलं.चमचाभर मध-पाणी मिसळून ड्रॉपरने थोडे थेंब पिल्लांच्या चोचीमध्ये सोडले.

हरवलेल्या आई-बाबांच्या शोधात ती इवलीशी पिल्लं चोची पसरवून चिवचिवाट करत होती.मध-पाणी मिळाल्यावर ती थोडी शांत झाली. थोड्याच वेळात केळ्याचे तुकडे भरवल्यावर त्यांचा पोटोबा थंड झाला.त्या पिल्लांना आमच्या ताब्यात द्यायला आलेले सगळे बाळगोपाळ आनंदी चेहऱ्याने त्यांच्या आई-बाबांबरोबर निघून गेले. पार्कचं रोजचं काम उरकून मी पिल्लांसाठी बाजारातून पपई,केळी आणि चिक्कू आणले.


आमच्याकडचा एक जुना छोटा पिंजरा जिन्याखालून बाहेर काढला,बागेतल्या नळाखाली चांगला खंगाळून घेतला.

बागेतल्या बांबूच्या कोवळ्या फांद्या सिकेटरने छाटून कोवळ्या पानांसहच त्या पिंजऱ्यामध्ये आडव्या तिडव्या कोंबून लावल्या.त्यामुळे पिल्लांसाठी आपोआप उबदार जागेची सोय झाली.पाणी पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी एक मजबूत दगडी वाटी स्वच्छ पाण्याने भरून ठेवली.


आता आमच्या घरी या तीन चिमुकल्या नव्या पाहुण्यांची चहल-पहल वाढली.दररोज सकाळी त्या पिल्लांना भरवण्याचं काम माझ्याकडे होतं.केळी, चिक्कू आणि पपईचे अगदी बारीक बारीक तुकडे चिरून मी छोट्या व्टिझरने त्यांच्या चोचींमध्ये आळीपाळीने भरवत असे.शिवाय थोडंसं मध-पाणीही हलकेच त्यांच्या चोचीमध्ये सोडून त्या तिघांना सकाळच्या कोवळ्या उन्हासाठी बंगल्याच्या बागेमध्ये ठेवत असे.त्यानंतर पुन्हा गरज लागली तर मी,प्रतिभा किंवा तेजस यांच्यापैकी कुणी तरी पिल्लांना भरवत असू.असा दिनक्रम पुढे दोन-तीन आठवडे चालू राहिला.दरम्यानच्या काळात ती पिल्लं पिंजऱ्यामधेच सफाईने उडायला लागली होती.एकदा असंच पिल्लांना उन्हात ठेवून मी तिथल्याच आरामखुर्चीत बसून शांतपणे पेपर वाचत होतो.अचानक मला पिंजऱ्याभोवती आणखी पाच-सहा मोठे बुलबुल पक्षी घोटाळताना दिसले.चिवचिवाट करत ते पिल्लांभोवती फिरले आणि थोड्या वेळात गायब झाले. 


त्यांच्या या वागण्याचा अर्थ मला मात्र त्या वेळी समजला नाही.मी उत्सुकतेने निरीक्षण सुरू केलं.अवघ्या पाच-सहा मिनिटांतच ते बुलबुल परत आले आणि पिंजऱ्याजवळ घुटमळायला लागले. 


पिंजऱ्यामधली पिल्लंही ताबडतोब आतल्या आत पंखांचा फडफडाट करत उडून जाळीजवळ आली. मोठ्या बुलबुलांनी पिल्लांसाठी किडे धरून आणले होते.अधाश्यासारख्या चोची उघडून पिल्लांनी हा नवा खाऊ आनंदाने गट्टम करून टाकला.हे बघून मी आश्चर्यचकित झालो.


बुलबुल पक्ष्यांनी मला वाइल्डलाइफ मॅनेजमेंटचा यापूर्वी फक्त वाचनातच आलेला एक नवा धडा अचानक शिकवला होता.


गेले काही दिवस मी त्या पिल्लांना केळी,पपई, चिक्कू आणि इतर फळांचे तुकडे खायला घालून ग्लुकोज आणि फ्रक्टोज पुरवण्याचा प्रयत्न करत होतो.पण,त्यांच्या शारीरिक वाढीला प्रोटीन्सचीही गरज असते,प्रोटीन्समुळे पिल्लांच्या पंखांमधल्या स्नायूंमध्ये उडण्याची ताकद येते,हे रहस्य मला त्या वेळी त्या मोठ्या बुलबुलांनी दाखवून दिलं.त्यानंतर मात्र मी या पिल्लांना छोटे-मोठे किडे आणि गांडुळं गोळा करून खायला घालू लागलो. 


(सोयरे वनचरे,अनिल खैरे,समकालीन प्रकाशन,पुणे)


पुढच्या १०-१२ दिवसांतच सगळी पिल्लं पुन्हा त्यांच्या त्यांच्या अधिवासात उडण्यासाठी तयार असल्याचं मला जाणवलं.

त्यामुळे सकाळच्या न्याहारीनंतर त्यांना बागेमध्ये ठेवल्यावर मी मुद्दामच त्यांच्या पिंजऱ्याचं दार उघडून ठेवायला लागलो. कारण मला त्या पिल्लांना 'सॉफ्ट रिलीज' पद्धतीने निसर्गात मुक्त करायचं होतं.माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यानंतरच्या तीन-चार दिवसांतच तीनही पिल्लं त्यांचा ट्रांझिट कॅम्प सोडून एकेक करून पिंजऱ्याबाहेर भुर्रकन उडून गेली.


पिल्लं उडून गेल्यावर दुसऱ्या दिवशीच्या सकाळी मी माझी गाडी पुसत होतो. शअचानक डावीकडच्या जास्वंदीकडून परिचित असा चिक चिक आवाज ऐकू आला.आमच्याकडे राहून गेलेल्या पाहुण्यांपैकी एक बुलबुल मला साद घालत होता.मी पण नेहमीची शीळ घातली.त्यानेही प्रतिसाद दिला. दोघांची भाषा एकमेकांना समजली.त्यानंतर तो छोटू माझ्या शेजारच्या कुंपणावर येऊन बसला. गाडी पुसत पुसत मी टेललॅम्पजवळ गेलो.तोही उड्या मारत,चिकचिक आवाज काढत तिथे आला. 


त्यानंतर मी पळत पन्नास-साठ फूट अंतरावर असलेल्या स्कूटरपर्यंत गेलो.तोही तस्साच माझ्यापेक्षाही वेगाने उडत स्कूटरपर्यंत पोहोचला.मला गंमत वाटली.तो माझ्याशी खेळू बघत होता.


पुढचे बरेच दिवस हा खेळ चालला होता.दरम्यान, इतर दोन बुलबुलसुद्धा अधूनमधून हक्काने घरी येऊन फळं खाऊन पाहुणचार घेत राहिले.पिल्लांनी मात्र इतरत्र न जाता आमच्या पार्कवरच कायमचा मुक्काम ठोकला.पुढच्या तीन-चार वर्षांतच आमच्या पार्कमध्ये दीड-दोनशे बुलबुल पक्षी गुण्यागोविंदाने नांदू लागले.