१९.०३.२५ या लेखातील उर्वरित लेख पुढे सुरू
ऑर्लीन्सचा वेढा उठला.जोन ऑफ आर्क आता बारा हजार फौज उभारू शकली.सारेजण तिच्याकडे संत म्हणून पाहू लागले.कोणी तिला 'चेटकीण' म्हणू लागले.फ्रेंचांची बाजू घेणारे तिला 'संत' म्हणत; इंग्रजांची बाजू घेणारे तिला 'डाकीण' म्हणत.जोन चार्लसला टूर्स येथे भेटली व मग उभयता लॉयर नदीच्या तीराने हीम्स शहरी आली.तिथे असलेले इंग्रज सैन्य घाबरून गेले,व भयभीत होऊन पळून गेले. काही काही ठिकाणी इंग्रजांनी थोडा विरोध केला.
जार्गों,पॅटे,ट्रॉईझ वगैरे ठिकाणी झटापटी झाल्या;पण जोनच्या संस्फूर्त सैनिकांनी त्यांना 'दे माय धरणी ठाय' करून सोडले.लढाई शक्य तो टाळावी,असे जोनचे धोरण असे. इंग्रजांनी फ्रान्स सोडून जावे एवढेच तिला हवे होते. ती त्यांचा द्वेष करीत नव्हती. रक्त पाहून ती खिन्न होई. रक्तपाताने तिचे मन विटे. स्वतःच्या लोकांच्या वेदना पाहून तिला जितके दुःख होई, तितकेच शत्रूच्या सैनिकांच्या वेदना पाहूनही होई.
जखमी शिपाई – मग तो इंग्रज असो वा फ्रेंच असो- तिला संकटात सापडलेला ख्रिश्चन बंधू वाटे.पॅटे येथील लढाईत रणांगणात शत्रूचे पुष्कळसे सैनिक मेलेले पाहून ती रडली.
तिच्या एका सैनिकाने एका इंग्रज कैद्यावर मरणांतिक प्रहार केला तेव्हा आपल्या घोड्यावरून उतरून तिने त्या मरणोन्मुख इंग्रज शिपायाच्याजवळ गुडघे टेकले व त्याचे डोके आपल्या हातात घेतले.ती त्याला काही सौम्य व मृदू शब्द बोलली व त्याचे प्राण गेले.
तिच्या निष्ठावान सैनिकांना तिची ही उदार दया समजत नसे.ते तिच्यासाठी लढायला व मरायला तयार होते.पण ही करुणा,या करुणेतील भावना ते समजू शकत नसत. ती विरोध करी,तरीही तिच्या विरोधास न जुमानता तिचे सैनिक युद्धातील बहुतेक कैद्यांस ठार मारून टाकीत..
इ.स.१४२९च्या जुलैच्या पंधराव्या तारखेस विजयी फ्रेंच सेना हीम्स येथे आली.नंतर दोन दिवसांनी तेथील भव्य चर्चमध्ये राजाला राज्याभिषेक झाला.आर्चबिशपने चार्लसच्या डोक्यावर मुकुट ठेवला.समारंभाच्या वेळी दरबारची काही स्त्री-पुरुष मंडळी हजर होती.काही सरदार होते,काही वारांगना होत्या;पण राणी मेरी द अंजो ही चिनॉन येथे मागे राहिली होती.
प्रवासाच्या खर्चात बचत व्हावी म्हणून राजाने तिला मागे ठेवले होते.चार्लस दरिद्री व निर्धन होता,तसाच अती अनुदारही होता.
जोन ऑफ आर्कचे आरंभीचे काम आता संपले होते.ऑलन्सचा वेढा तिने उठविला होता.राजाला राज्याभिषेक झाला होता.आता इंग्रजांना फ्रान्समधून हाकलणे एवढेच काम राहिले होते.पण तिची लोकप्रियता कमी होऊ लागली.जोन दररोज देवदूतांशी बोले.पण तिच्या शिपायांना आता तिच्या या दैवी मुलाखतीचे व भेटीचे कौतुक वाटेनासे झाले.तिला जी दिव्य दर्शने घडत,त्यांची प्रभा आता फिकी,निस्तेज झाली. (एक रोजची सामान्य गोष्ट अशा दृष्टीने लोक त्याकडे पाहू लागले) तिचे लोक आता तिला कंटाळले. तिचे त्याच्याबरोबर असणे जसजसे लांबू लागले तसतसे ते अधीर होऊ लागले.कारण ती त्यांना लुटालूट करू देत नसे.ती त्यांच्यावर पावित्र्याचे जीवन लादीत होती; पण त्यांना अशा जीवनाची सवय नव्हती. "ही जोन आम्हाला बायका बनवीत आहे," असे ते म्हणत. तिचे काही शिपाई तिला सोडून गेले,काहींनी बंड केले !
आणि इकडे तिचे शत्रू तिच्या नाशाची योजना करीत होते,नाशाची जाळी विणीत होते.आपल्या मार्गातून जोन जावी असे निरनिराळ्या चार पक्षांना वाटत होते.
१. इंग्रज,२. इंग्रजांना अनुकूल असलेले फ्रेंच, ३. तिच्या राजप्रियतेचा मत्सर वाटणारे काही दरबारी व ४. देवदूतांशी तिच्या होणाऱ्या भेटीगाठींबद्दल मत्सर वाटणारे बिशप.
१४१५ मध्ये जी अजिनकोर्टची लढाई झाली,तीत इंग्रजांना लॉइरे नदीच्या उत्तरेचे बहुतेक प्रांत मिळालेच होते.संपूर्ण फ्रेंच राज्यावर कब्जा मिळविण्यासाठी इंग्रज उत्सुक होते.पण डॉमरेमी गावची ही चेटकीण... जोन त्यांच्या प्रगतीच्या आड येत होती.एवढेच नव्हे,तर जो काही फ्रेंच प्रदेश त्यांच्या हातात होता.तोही ती काढून घेऊ इच्छित होती.इतक्या श्रमांनी व इतके रक्त सांडून मिळविलेला प्रदेश गमावावा लागणार म्हणून ते जळफळत होते.काहीही करून जोनला प्रतिबंध झालाच पाहिजे,असे त्यांना वाटत होते.
काही फ्रेंच सरदार या इंग्रजांशी मसलती करीत होते. चार्लस राजावर इंग्रजांना जय मिळवून देऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचा त्यांचा विचार होता.अशा या स्वार्थाधि व देशद्रोही सरदारांत ड्यूक ऑफ बगैंडी व फिलिप दि गुड हे दोघे प्रमुख होते. हा 'चांगला' फिलिप वास्तविक 'वाईट' होता; तो अठरा अनौरस मुलांचा बाप होता! चार्लसला झालेला राज्याभिषेक म्हणजे फिलिपच्या स्वार्थावर मोठा आघात होता. या डॉफिनपेक्षा या चार्लसपेक्षा फिलिप अधिक श्रीमंत व अधिक कार्यक्षम होता.निदान आपण अधिक लायक आहोत,असे त्याला वाटे.इंग्रजांच्या संरक्षणाखाली फ्रान्सचा स्वामी होण्याचा त्याचा बेत होता.
पण जोनच्या आगमनाने त्याचे बेत मुळातच खुडले गेले !
तिच्या या नसत्या ढवळाढवळीबद्दल तिला शासन झालेच पाहिजे,असे इंग्रजांप्रमाणेच त्याचेही मत होते.पण तिच्या उघडउघड शत्रूपेक्षा तिचे मित्र म्हणून मिरविणारेच अधिक धोकेबाज होते.
सातव्या चार्लसचे लबाड दरबारी तिला पाण्यात पाहत होते.विशेषतः राजाचा सल्लागार जॉर्जीस ला ट्रेमाइली हा जोनला फार भीत असे.जोनचा मोकळेपणा व अत्यंत सरळ प्रामाणिकपणा यांची त्याला धास्ती वाटे.ला ट्रेमाइली हा कपटी व जोरदार मनुष्य होता.तो इतरांवर आपली छाप बसवी;आपले प्रभुत्व स्थापी. त्याने आपल्या पहिल्या पत्नीचा त्याग केला होता. दुसऱ्या एका स्त्रीशी त्याने पुन्हा लग्न लावले व तिच्या पहिल्या नवऱ्याला ठार मारले.खोटे बोलून व खुशामती करून त्याने राजाची कृपा संपादिली होती.तो अत्यंत दुष्ट वृत्तीचा व दांभिक मनुष्य होता.तो राजालाही फसवायला तयार होता.त्याचे इंग्रजांशी आतून सूत होते. त्याच्या मनात काय चालले आहे,हे जोनला समजत होते.ही आपली कपटकारस्थान राजाला सांगेल अशी त्याला भीती वाटत होती;म्हणून या किसान कन्येला आपल्या मार्गातून कसे दूर करता येईल,याचा विचार तो करीत होता." आपल्या कपटी स्वभावानुसार तो वरपांगी जोनविषयी अत्यंत आदर दाखवीत होता;पण आतून तिच्या नाशाची कारस्थाने रचत होता.
पण तिच्याविरुद्ध उभ्या राहिलेल्या शत्रूपैकी सर्वांत भयंकर जर कोणी असतील तर ते भटभिक्षुक व धर्मोपदेशक हीम्स येथील आर्चबिशप,बोव्हिस येथील बिशप व पॅरिसच्या विद्यापीठातील एकजात सारे धर्माधिकारी तिला मारू पाहत होते.चर्चची परवानगी घेतल्यावाचून तिने लोकांस ईश्वराचे आदेश सांगितले होते. 'मी देवदूतांशी बोलते'
असे म्हणण्याचे धाडस करून तिने सर्व धर्ममार्तंडांचा आणि उपाध्यायांचा अपमान केला होता.दैवी शक्तीशी बोलण्याचा अधिकार फक्त या उपाध्यायांचा धर्मगुरूंचा. ईश्वर व मानव यांच्यातील दुभाष्याचे काम फक्त चर्चच करू शकते, अशी त्यांची प्रामाणिक समजूत असल्यामुळे त्यांना खरोखरच वाटे की, जोनला जे आदेश मिळत, ते ईश्वराचे नसून सैतानाचे असले पाहिजेत; देवदूतांचे आदेश चर्चमार्फत आले असते. सैतानाकडून जिला आदेश येतात ती नास्तिक व पाखंडीच असली पाहिजे. ती प्रभुद्रोह करणारी आहे. अर्थात, धर्माला व धर्मगुरूंना तिच्यापासून धोका असल्यामुळे ती ठार मारली गेलीच पाहिजे.
काल्पनिक देवदूतांच्या रक्षणापेक्षा जोनच्या शत्रूचे कापट्य अधिक प्रभावी ठरले.कॉपेन येथील लढाईत तिच्याच काही देशबांधवांनी तिला पकडून इंग्रजांच्या हवाली केले.सोन्याच्या दहा हजार पौंडांस त्यांनी तिला इंग्रजांना विकून टाकले ! तिच्या मरणाबाबत निश्चित होण्यासाठी इंग्रजांनी तिला इन्क्विझिशन संस्थेच्या स्वाधीन केले आणि अशा रीतीने जोन युद्धकैदी होती तरी ती धर्मगुरूंच्या ताब्यात दिली गेली व त्यांच्या न्यायासनासमोर तिचा चालून तिला 'नास्तिक' म्हणून जिवंत जाळण्याची सजा देण्यात आली!
तिच्या खटल्याच्या वेळेस मुख्य न्यायाधीश बोव्हिसचा बिशप पेरी कौचॉन हा होता.तो अत्यंत श्रद्धाळू व निष्ठावंत ख्रिश्चन होता.
पॅरिसच्या विद्यापीठाने त्याच्या धार्मिकतेची जाहीर स्तुती केली होती. " बिशप देवासाठी किती तळमळतात ! किती त्यांचे धैर्य,केवढी त्यांची धडपड ! ते कसे वाट पाहत बसतात ! किती मानसिक व्यथा व वेदना ! चर्चसाठी त्यांना किती यातना!" अशा प्रकारे पॅरिसच्या विद्यापीठाने बिशपांची पाठ थोपटली होती.पण विद्यापीठाच्या वरील प्रशस्तीत शेवटी "चर्चसाठी त्यांनी किती लोकांस छळले व किती लोकांचे प्राण घेतले!" असे शब्द घातले असते,तर बरे झाले असते.कारण जळणाऱ्या नास्तिकांच्या चरबीचा वास त्यांच्या नाकांना फार आवडे.कॉन्स्टन्स येथे जी धर्मपरिषद भरली होती व जेथे हस याला वचन मोडून अटक करून ठार मारण्यात आले होते,त्या परिषदेत हे बिशपही होते. हसच्या खटल्याच्या वेळी हेच बिशप म्हणत होते की, कधीकधी न्यायाचा औपचारिक देखावा न करताही अपराध्याला मारणे रास्त असते, क्षम्य असते.
इंग्रजांनी जेव्हा जोनला पेरी कौचॉन याच्या हाती दिले, तेव्हाच त्यांनी तिच्या मरणपत्रावर सही केली.ती जिवंत सुटावी अशी त्यांना इच्छाच नव्हती.चर्चने जर नास्तिक म्हणून तिला ठार केले नाही,तर तिला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यायचे असे ठरले होते.
"It was a case of Heads you lose, tails I win." खटल्याच्या आरंभी न्यायाधीश मंडळात असलेल्या दोघा न्यायाधीशांनी एकंदर सारे काम बेकायदेशीर आहे असे म्हटले,तेव्हा त्यांपैकी एकाला ताबडतोब कमी करून अध्यक्षांच्या परवानगीने कैदेत टाकण्यात आले,व दुसरा त्याला शिस्त लावण्याची फुरसत वरिष्ठांना मिळण्यापूर्वीच पळून गेला! खटला जवळजवळ चार महिने चालला होता.आरंभी न्यायाधीश बेचाळीस होते,ते शेवटी त्रेसष्ट झाले. शिकारी कुत्र्यांप्रमाणे ते तिच्या पाठीस लागले होते. त्यांनी तिच्यावर लादलेले आरोप बाष्कळ होते.चर्चच्या मदतीवाचून ती स्वर्गातील शक्तीशी बोलली हा तिच्यावरील मुख्य आरोप होता.
दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे झाल्यास भटाभिक्षुकांच्या इच्छेला मान देण्याऐवजी तिने देवाची इच्छा मानली,हा तिचा गुन्हा होता.ते पुन्हा म्हणाले,तिला ज्या शक्ती दिसल्या,त्या दैवी नसून सैतानी होत्या.आणि न्यायाधीश त्रेसष्ट ती एकटीच असल्यामुळे त्यांची इच्छा बलशाली ठरली !
तिला आपले भवितव्य माहीत होते.तरीही त्या खटल्याच्या वेळेस वातावरणात तिनेच जरा विनोदी रंग भरला.एके दिवशी खटल्याच्या वेळी ते सर्व धार्मिक कावळे एकदम काव काव करू लागले,तेव्हा ती त्यांना गोड आवाजात म्हणाली, भल्या बापांनो,सारे असे एकदम नका बोलू.तुम्ही एकमेकांचा गोंधळ उडविण्याचे पाप कराल.
इ.स. १४३१ च्या मेच्या तिसाव्या तारखेस न्यायाचा हा फार्स संपला.जोनला जिवंत मारण्याची शिक्षा झाली. पॅरिसच्या विद्यापीठाने पेरी कौचॉनची पाठ पुन्हा थोपटली. बिशपने हा खटला अत्यंत गंभीरपणे व पवित्र आणि न्यायी वृत्तीने चालविला असे उद्गार विद्यापीठाने काढले.तिला मरणाची शिक्षा देऊन चर्चच्या प्रतिनिधींनी तिला स्टेटच्या मारेकऱ्यांच्या हवाली केले.रक्तपाताकडे आपणास पाहवत नाही असे चर्चचे म्हणणे असे.चर्च मरणाची शिक्षा देई;पण स्वतःतिची अंमलबजावणी करीत नसे.ते काम स्टेटकडे असे.चर्च शिक्षा देऊन पुन्हा त्या मरणोन्मुखांना मारले जात असता त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करी !
जोनला जाळण्यापूर्वी पॅरिसच्या विद्यापीठातील प्रोफेसर निकोलस मिडी याने तिला प्रवचन दिले.तो म्हणाला, चर्चचा एखादा अवयव बिघडला तरी सारे चर्च रोगी होते.नंतर तू मरायलाच लायक आहेस असे तिला सांगून तो म्हणाला,चर्चच्या बऱ्यासाठी तू मर.जा,जा, शांतीने मर.चर्च तुला वाचवू शकणार नाही.आपल्या गुन्हेगारांच्या कत्तलीचा दोष आपणाकडे येऊ नये म्हणून चर्चवाले शेवटी नेहमी म्हणत,चर्च काय करणार? चर्चच्या हातात काय आहे? पण जोन ऑफ आर्कला अधिक समजत होते.पेरी कौचॉनकडे बोट करून ती म्हणाली,बिशप,तुमच्यामुळेच मला मरावे लागत आहे."
हे जे शोकपर्यवसायी नाटक झाले,त्याचा शेवटचा भाग साडेपाचशे वर्षांनी केला गेला.तेव्हा पोपने शेवटी असे जाहीर केले की,जे संदेशदाते जोनला भेटत,ते सैतानाचे दूत नसून देवदूतच होते.मी तिची शिक्षा रद्द करतो व ती संत होती,असे जाहीर करतो.