* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

९/६/२५

भूतकाळातला आवाज \ A voice from the past

सरतेशेवटी माणसाची ओळख तो इतरांवर काय परिणाम करुन गेला यातच राहते.


जेसन स्टीव्हन्स आणि मी बसून होतो.मिस् हेस्टिंग्ज एक मोठा पुठ्ठ्याचा खोका घेऊन आली.तिनं माझ्यासमोर तो खोका ठेवला.मी बसलो होतो टेबलाच्या एका टोकाला.

नेहमीप्रमाणे ती माझ्या उजवीकडे बसली.


जेसनकडे वळून मी म्हणालो,"तुझ्या चुलत आजोबाने,

म्हणजे रेड स्टीव्हन्सने मला हा खोका दिला आहे.आपलं मृत्युपत्रं आणि संबंधित कागदपत्रे तयार केली त्याच दिवशी त्याने मला तो दिला.खोक्याला सील लावलं होतं.आणि ते तसंच आत्तापर्यन्त आहे.स्टीव्हन्सने सांगितल्याप्रमाणे खोका आमच्या तिजोरीत ठेवला होता.ही देणगी तुझ्याकडे कशी सुपुर्द करावयाची याबाबत सविस्तर सूचना आहेत."


मग मी सील तोडले आणि आतली व्हीडीओ टेप काढून मिस् हेस्टिंग्जकडे दिली.कॉन्फरन्स रूमच्या एका टोकाला असलेल्या व्हिडीओ प्लेअरमध्ये तिनं ती ठेवली आणि रिमोट कन्ट्रोल घेऊन ती पुन्हा माझ्या शेजारी बसली.


जेसन स्टीव्हन्स पुटपुटला,"काय चाललंय काय ? बाकीचे सगळे हजारो,लाखो डॉलर्स घेऊन गेले. आणि मला नुसती ही चित्रफीतच की काय ?"


त्याच्या चिडचिडीकडे जरा दुर्लक्ष करून मी म्हणालो,"लवकरच तुला नीट समजेल सगळं."


मी मिस् हेस्टिंग्जला खूण केल्यावर तिनं दिवा घालवून टेप सुरू केली.


क्षणातच 75 वर्षांच्या रेड स्टीव्हन्सची छबी पडद्यावर दिसू लागली.सर्वार्थाने रेड स्टीव्हन्स मोठा माणूस होता.तो लुइझियानाच्या दलदलीच्या प्रदेशातून टेक्ससला आला होता,फक्त अंगावरचे कपडे घेऊन,हा काळ होता युद्ध आणि मंदीचा. जगातल्या उच्च दर्जाच्या तेल आणि गुरंढोरं या संबंधीच्या कंपन्या त्याने निर्माण केल्या.व्यक्तिमत्व असं की, परिस्थितीच्या नाड्या त्याच्या हातीच नेहमीच असायच्या.

आतासुद्धा त्या मोठ्या पडद्यावर त्याची प्रतिमा आली आणि क्षणार्धात खोलीतलं वातावरणच बदलून गेलं.


जरासं खाकरून रेड स्टीव्हन्सने बोलायला सुरूवात केली.

"जेसन,ही टेप तू बघतो आहेस.आपण समजूया की माप ओलांडून मी प्रवेश केलाय मैदानात आणि आता सर्व बक्षिसे नीट दिली जातील.माझ्या सूचना तंतोतंत पाळल्या गेल्या आहेत आणि तू आता ही व्हीडीओ टेप माझा प्रिय मित्र थिओडोर हॅमिल्टन आणि त्याची विश्वासू सेक्रेटरी मागरिट हेस्टींग्ज यांच्या सोबत बघतो आहेस.तुला कल्पना नाही पण ही दोन या भूतलावरची उत्कृष्ट माणसं आहेत.


क्षणभर थांबून पडद्यावरचा रेड माझ्याकडे आणि मिस् मागरिटकडे वळून माझ्या नावाचा उल्लेख घरगुती नावाने (ही मुभा फक्त रेड स्टीव्हन्सलाच होती) करत बोलला, "टेड, तुझे आणि मागरिटचे मी आभार मानतो. आज सुरवातीला माझे जवळचे, लांबचे - नातेवाईक, सगेसोयरे यांच्याशी तुम्ही चांगला व्यवहार केलात. मला खात्री आहे की त्यांच्यापैकी कुणालाच काही मिळणार नाही आहे. जेसन बहुधा चमत्कारिक वागला असेल तुम्हा दोघांशी. मी दिलगिरी व्यक्त करतो."


मिनिटभर थांबून घसा साफ करत रेड पुन्हा बोलू लागला.

"जेसन,मी एक उत्तुंग जीवन जगलो.खूप चुका केल्या आणि खूप काही चांगलं कमावलंही. मोठी घोडचूक म्हणजे आपल्या कुटुंबातील सर्वाना जे जे हवं ते ते देत गेलो.मी तुम्हा मंडळींपासून खूपदा दूरच रहायचो.आणि त्याची भरपाई म्हणून की काय सर्वांनी मागितलेले देत राहिलो.असे करण्यात मी जे भन्नाट आयुष्य जगलो तसे जगण्यापासून त्यांना वंचित ठेवलं.


"असं करून मी त्यांचे मोठेच नुकसान केले.मी अगदी दिलगीर आहे.जणू काही घोडा निकामी झाल्यावर त्याला मारण्यावाचून पर्याय रहात नाही. माझ्या कायदासल्लागाराने मला रोखले.अन् म्हणाला,असं केलं तर दुर्दैवाने लोकांच्या मनात मी घृणेचाच विषय बनून जाईन.मग मी एकेक गोष्ट क्रमा-क्रमाने अशी केली की या सर्व नातेवाईकांची खाण्यापिण्याची जगण्याची सोय होईल,पण ते जीवनाच्या अनुभवांना दुरावतील." 


"जेसन,तू मात्र त्या सगळ्यांपासून निराळा आहेस. म्हणून मी आशा धरून आहे.की आजपर्यन्त तू तुझ्यातल्या गुणांची चमक दाखवली नाहीस.पण तुझ्यामध्ये मला असे काही दिसते आहे की ते आत्ताच पकडून जोपासावे.त्यातून एक ज्वाला निर्माण होईल.म्हणून तर मी तुला झटपट कोट्याधीश करणार नाहीये."


जेसनने कॉन्फरन्स टेबलवर हाताची मूठ आपटली. तो काही बोलणार एवढ्यात पडद्यावरचा रेड स्टीव्हन्स म्हणाला,"या छान माणसांसमोर काहीतरी बरळून तू त्यांना अवघडल्या

सारखं करू नकोस. मला आत्ताच सर्व नियम तुला बजावून सांगायचे आहेत.""येतं वर्षभर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तू मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् मागरिट यांना भेटत जाशील.मी ज्याला सगळ्यात महत्त्वाची देणगी म्हणतो त्याचा अंश तुला प्रत्येक वेळी मिळत राहील." "लक्षात ठेव की येतं वर्षभर तू असा कण अन् कण वेचत गेलास तर शेवटी माझ्या मृत्युपत्रातल्या सर्वोत्तम देणगीचा तू धनी होशील. पण पक्कं लक्षात ठेव की माझ्या सूचनांप्रमाणे तुझी वागणूक झाली नाही किंवा मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज यांना मोठ्या अडचणीत आणलंस तर हा कार्यक्रम थांबवण्यात येईल आणि तुला अर्थातच काही एक मिळणार नाही. मी तसे मिस्टर हॅमिल्टनना दिलेल्या सूचनेप्रमाणे मृत्युपत्रात नमूद करून ठेवलं आहे.


जेसन स्टीव्हन्स बसला होता तिकडून मला एक दीर्घ सुस्कारा ऐकू आला.


रेडचे बोलणे पुढे सुरू झाले. "आणि हे बघ,तुझ्यात काही गुण तर वाटताहेत मला,म्हणून मी हे सर्व करतो आहे.पण तू जर नुसता त्रासच देत सुटलास तर मिस्टर हॅमिल्टन काहीएक न बोलता हे सर्व बंद करील."


"आणि आता मिस्टर हॅमिल्टन,तुझ्याकडे वळतो मी जरा." रेड थोड्या मिस्किलपणाने म्हणाला,"तुझं खरं नाव टेड हे मला आठवतंय असं पाहून आश्चर्य वाटतंय तुला नक्कीच.मोठ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी तुम्ही ही जबाबदारी स्वीकारलीत म्हणून मी आणि जेसन तुमचे आभारी आहोत. 


तुम्ही माझे सर्वात मस्त दोस्त होता याबद्दल मी धन्यता मानतो.मी आयुष्यात कैक गोष्टी कमावल्या. पण आता मी असा तुमच्यासमोर केवळ पडद्यावरअसतानाही सांगतो की थिओडोर जे.हॅमिल्टन माझा मित्र आहे,ज्याच्याखातर मी माझ्या संपत्तीवर क्षणार्धात लाथ मारीन."


टेप संपली - आम्ही गप्प होतो.जेसन माझ्याकडे वळून आक्रमक स्वरात म्हणाला,"चक्रम होता तो म्हातारा."


'सर्वोत्तम देणगी' जिम स्टोव्हॅल,०२.०५.२५ या लेखातील दुसरा भाग…


मी श्वास सोडून उत्तर दिलं,"कोणीतरी चक्रम आहे हे नक्की.पण ते नक्की कोण आहे,ते कार्यक्रम संपल्यावर आपल्याला कळणार आहे."


मी उभा राहिलो आणि शेकहँडसाठी जेसनपुढे हात केला.

त्याकडे दुर्लक्ष करून तो म्हणाला,"काय चाललंय काय हे सारं ?तुम्ही मला का सांगत नाही ? या सगळ्यातून मला काय मिळणार आहे ?"


"सगळं काही वेळच्या वेळी होईल रे बाबा," मी बोललो आणि खोली बाहेर पडलो.


मी पावलं टाकत असताना मागून जेसनचा रागीट आवाज आलाच."इतर सगळ्यांप्रमाणे माझ्या वाट्याचे पैसे का देऊन टाकत नाहीये ?"


शांतपणे मिस् हेस्टिंग्जने उत्तर दिले," तू जास्त 

लाडका होतास ना त्याचा ?





७/६/२५

स्पिशीजचं वर्गीकरण आणि टॅक्सॉनॉमी/Species classification and taxonomy

त्याला निसर्गाविषयी खूपच आकर्षण वाटे.१७३२ साली आर्क्टिक सर्कलच्या वर लाप्लांड इथं लिनियसनं एक मोहीम काढली.तब्बल पाच महिने तिथं तळ ठोकून त्यानं अनेक त-हेच्या वनस्पतींचे नमुने गोळा केले. तिथले कीटक,पक्षी आणि इतरही प्राणी त्यानं अभ्यासले.या भागात खरं तर कोणत्याही प्रकारचं जीवन अस्तित्वात असणं तसं अवघडच आहे.तरी त्यातूनही लिनियसनं शेकडो प्रकारच्या सजीवांच्या स्पिशीज शोधून काढल्या.


सजीवांचं वर्गीकरण


किंगडम


फायलम


क्लास


ऑर्डर


फॅमिली


जीनस


स्पिशीज


कार्ल लिनियसनं केलेलं सजीवांचे वर्गीकरण ..


त्याच्या या मोहिमा अगदी सैन्यातल्या शिस्तीनं चालत. त्याच्याबरोबरच्या विद्यार्थ्यांनी कसा पोशाख घालावा,७ वाजता कसं बाहेर पडावं,२ वाजता जेवून ४ पर्यंत विश्रांती घेऊन पुन्हा कसं कामाला लागावं हे सगळं अगदी काटेकोरपणे चालायचं.पण या सगळ्या मोहिमेसाठी त्याच्याजवळ फक्त १०० डॉलर्स एवढेच पैसे होते.यामुळे त्या सगळ्यांचे प्रचंड हालही झाले.वाईट हवामान,खराब प्रदेश आणि भूक,तहान या सगळ्या हालअपेष्टा सहन करूनही लिनियसनं वनस्पतींविषयी खूपच माहिती गोळा केली.तो सतत अनेक महिने,वर्षं पायीच चालत असे.प्राण्यांच्या कातडीवरच तो झोपायचा.असं करत कडाक्याच्या थंडीत त्यानं चक्क पायी ४६०० चौ.मैल एवढा प्रचंड प्रांत पिंजून काढला !


त्यावरून त्यानं १७३५ मध्ये 'सिस्टिमा नॅच्युरा' नावाचं सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत सांगणारं पुस्तक लिहिलं होतं.त्यात सारख्या स्पिशीजना लिनियसनं एकाच जनेरामध्ये टाकलं.जनेरा या ग्रीक शब्दाचं एकवचन जीनस.म्हणजे रेस.सारख्या जनेरांना एका ऑर्डरमध्ये घातलं.आणि सारख्या ऑर्डर्सना एका क्लासमध्ये घातलं.हीच पद्धत आपण आजच्या वर्गीकरणाचा पाया मानतो.

त्यामुळेच लिनियस हा सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करणाऱ्या टॅक्सॉनॉमी या बायॉलॉजीच्या शाखेचा पितामह मानला जातो.


त्या काळी माहीत असलेल्या सगळ्या प्राण्यांचे त्यानं सहा क्लासेस मानले होते.मॅमल्स,बर्डस,रेप्टाइल्स,फिशेस,

इनसेक्ट्स आणि वर्क्स.त्या काळी तो या बाबतीत इतरांच्या पुढे होता.अर्थात,याही पद्धतीमधले तोटे किंवा दोष नंतर लक्षात आलेच.


तो परतला तेव्हा त्याची कीर्ती खूपच वाढली असली तरी त्याचे खिसे मात्र पूर्णच रिकामे झाले होते.परतल्यावर त्याचं लिसा मोराए नावाच्या एका श्रीमंत डॉक्टरच्या मुलीवर प्रेम बसलं. मुख्य म्हणजे त्या डॉक्टरलाही असा उचापत्या माणूस जावई म्हणून आवडला,पण मेडिकलची पदवी मिळवल्या

शिवाय लग्न करणार नाही,असं लिसानं त्याला सांगितलं.मग भावी सासऱ्याच्या पैशावर लिनियसनं हॉलंडला जाऊन चक्क एम.डी.ही पदवी १७३५ साली मिळवली.


१७३५ साली त्यानं 'स्पिशीज प्लांटारम' हे वनस्पतींच्या वर्गवारीवर पुस्तक लिहिलं.त्यात त्यानं त्यासाठी बायनॉमियल पद्धत वापरली होती.१७३८ साली त्यानं हीच पद्धती प्राण्यांना वापरून त्याच्या सिस्टिमा नेचरा याची १३ पानांची अतिसंक्षिप्त आवृत्ती प्रकाशित केली. लिनियसच्या अगोदर सजीवांचं हे वर्गीकरण कसं करायचं याविषयी बरेच वाद होते.व्हेल मासा आणि कुत्रा यात फरक ओळखता येतो, पण कुत्रा आणि लांडगा,किंवा कुत्रा आणि कोल्हा यात फरक किती आहे ? तसंच गाढव आणि घोडा एकाच प्रकारचे की वेगळ्या ? मग हे वर्गीकरण बाहेर दिसणाऱ्या गुणधर्मावरून करायचं की आतल्या अवयवांवरून असे अनेक प्रश्न त्या काळी लोकांना पडत.

लिनियसनं सर्व जीवसृष्टीचे गट पाडले.त्यांना तो जेनेरा म्हणे.एक गट म्हणजे जीनस.जेनेरा हे त्याचंच बहुवचन.प्राण्याची रचना,आकार किंवा पुनरुत्पादनाची पद्धत अशा कुठल्याशा गोष्टीवरून ही गटवारी केलेली असे.उदाहरणार्थ,झेब्रा आणि घोडा यांत साम्य आहे, पण घोडा आणि कुत्रा यांत खूपच कमी साम्य आहे वगैरे.म्हणून घोडा आणि झेब्रा यांना इक्कस या गटात त्यानं टाकलं.कुत्र्यांचा त्यानं गट केला होता कॅनिस. कोल्ह्यांचाही तोच गट होता. यानंतर त्यानं त्या गटाचे उपगट केले.त्यांना तो स्पिशीज म्हणे. म्हणजे इक्कस गटातली झेब्रा ही एक स्पिशीज आहे.आणि घोडा ही दुसरी स्पिशीज.म्हणजेच प्रत्येक प्राण्याचं नाव हे जीनस स्पिशीज हे जोडून होतं.उदाहरणार्थ,इक्कस झेब्रा (म्हणजे झेब्रा) किंवा इक्कस कॅबॅलस (म्हणजे घोडा) वगैरे.या नामकरण पद्धतीत प्रत्येक स्पिशीजला लिनियसनं दुहेरी नाव दिलं.त्यातलं पहिलं नाव जीनसचं आणि दुसरं स्पिशीजचं.हे म्हणजे आपल्या नाव आणि आडनावासारखंच होतं.यालाच बायनॉमियल नॉमेंक्लेचर किंवा बायनरी नॉमेनक्लेचर असं म्हणतात.ही पद्धत मात्र आजतागायत चालू आहे. त्यामुळे जगातली कोणतीही सजीव स्पिशीज एका आणि एकाच विशिष्ट नावानं जगात सगळीकडे ओळखली जाते.माणसाचं नाव होमो सेपियन्स आहे,तसंच जास्वंदाच्या फुलाचं 'हिबिस्कस रोझासायनेन्सिस' तर वडाच्या झाडाचं नाव फायकस बेंगालेन्सिस आहे. गंमत म्हणजे २५० वर्षांनंतरही हीच नावं अजून वापरली जातात !


व्हेलंट या फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञानं १७१७ साली वनस्पतींनाही पुनरुत्पादनाचे अवयव असतात ही भन्नाट कल्पना मांडली होती. हे पाहून लिनियस भारावूनच गेला होता.कदाचित त्यामुळे लिनियसच्या लिखाणात आणि नामकरणात सतत सेक्सचा भाग खूप असे.वल्वा,लाबिया,

प्यूब्ज,ओनस,हिमेन आणि क्लायटोरिया अशी थेट लैंगिक नावं तो द्यायचा.त्याच्या लिखाणात तो वनस्पतींच्या लग्रांची आणि संभोगांची रसाळ वर्णनंही करे.कित्येक लोकांनी त्यावर आक्षेपही घ्यायला सुरुवात केली.गटेसारखी मंडळीही लिनियसचं लिखाण बायकांनी आणि विद्यार्थ्यांनी वाचू नये असं म्हणायला लागली.मग काय मंडळी ते आणखीनच चोरून वाचायला लागली! एवढंच कशाला,अजूनही त्याविषयी वर्गात शिकवताना शिक्षक आणि विशेषतः शिक्षिका ते शब्द किंवा ती वर्णनं निदान सगळ्यांसमोर वाचायचं तरी टाळतात किंवा लाजत लाजत तरी वाचतात!


लिनियस १७७८ साली वारण्यापूर्वी त्याच्या सिस्टिमा नॅच्युरा'ची बारावी आवृत्ती निघाली होती,आता फक्त त्यात १३ ऐवजी २३०० पानं होती! आणि त्याचे तीन खंडही निघाले होते! या सगळ्या प्रकल्पात त्यानं साधारणपणे प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या १३००० जातींविषयी लिहून ठेवलं होतं ! लिनियसनं त्याच्या वर्गीकरणासाठी जीनस आणि स्पिशीज सोडून क्लास,

ऑर्डर आणि व्हरायटी असेही शब्द वापरले होते. आज त्यात किंगडम,फायलम आणि सबफायलम हेही शब्द वाढले आहेत.

होमो सेपियन्स हा शब्दही त्यानंच प्रथम वापरला.


अर्थात,काही वेळा लिनियस आपल्या लिखाणात उगाचच काही गोष्टी घुसडून द्यायचा.समुद्रावरच्या सफरीवरून खलाशी आले आणि त्यांनी कुठल्याही काल्पनिक राक्षसी प्राण्यांची किंवा चार पायांवर चालणाऱ्या रानटी,मुक्या किंवा शेपटी असणाऱ्या माणसांची वर्णनं केली की हा तेही आपल्या पुस्तकात दडपायचा !


लिनियसच्या पद्धतीमध्ये त्रुटी होत्याच.मग ब्रिटिशांनी त्यात सुधारणा करून १८४२ साली नवीन स्टँडर्ड निर्माण केलं.

अर्थातच फ्रेंचांना ते न आवडल्यामुळे त्यांनी त्यांचं वेगळंच स्टँडर्ड काढलं.आणखी गोंधळ म्हणजे अमेरिकनांनी लिनियसनं १७५८ साली मांडलेली पद्धतीच वापरायचं ठरवलं.म्हणजे गोंधळच होता हा!


जॉर्जेस कुव्हिए (Georges Cuvier) मात्र लिनियसवर टीका करायचा.त्यानं अनेक जिवांचं नामकरण केलं त्यात विशेष काय? नावं देण्यापेक्षा त्या वनस्पतींचा अभ्यास करून त्यांचे गुणधर्म तपासणं जास्त महत्त्वाचं असं म्हणून कुव्हिए त्याची टिंगलच करायचा.पण तरीही लिनियसचा दबदबा युरोपभर पसरला होता.१७३५ साली पॅरिसच्या भेटीत बर्नार्ड दी ज्यसियू या वनस्पतिशास्त्रज्ञाचं भाषण ऐकायला लिनियस गेला.भाषणात एका दुर्मिळ वनस्पतीचं नाव जेव्हा वक्ता विसरला,तेव्हा ते नाव मागे बसलेल्या लिनियसनं ओरडून सांगितलं.तेव्हा बर्नार्डनं चमकून बघितलं आणि हे कोण बोललं? असं विचारताच लिनियस उभा राहिला.त्या वेळी त्या वनस्पतिशास्त्रज्ञानं विचारलं,तू लिनियस तर नाहीस ?लिनियसशिवाय हे उत्तर कोणीच देऊ शकणार नाही हे त्याला माहीत होतं. लिनियस जेव्हा हो म्हणाला तेव्हा स्वतःचं स्टेटस वगैरे विसरून तो खाली त्याच्याकडे धावत गेला आणि लिनियसला त्यानं कडकडून मिठी मारली!


लिनियस स्वतःला ग्रेट मानायचा आणि गंमत म्हणजे तसं तो गर्वानं सगळ्यांना सांगायचा.स्वतःचीच स्तुती करणारे मोठमोठे लेखही तो लिहायचा.त्यानं स्वस्तुतीची चार (!) आत्मचरित्रंही लिहिली!पण गंमत म्हणजे त्या चौघांत फारसं काहीच साम्य नव्हतं !


आपल्यापेक्षा मोठा वनस्पतिशास्त्रज्ञ आणि प्राणिशास्त्रज्ञ अख्ख्या मानवी इतिहासात झाला नाही असंही तो सगळीकडे सांगे आणि लिही.आपल्या मृत्युशिलेवर 'वनस्पतिशास्त्रज्ञाचा राजपुत्र' असं कोरलं जावं अशीही त्याची इच्छा होती. त्याला विरोध करायलाही कुणी धजावत नसे. कारण कुणी तसंच केलंच तर त्याचं नाव कुठल्याही तणाला किंवा अत्यंत फालतू वनस्पतीला तो देऊन टाके.


लिनियसला अमाप प्रसिद्धी मिळाली.एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या लिनियसला १७६१ साली 'स्वीडिश हाऊस ऑफ नोबल्स'चं सदस्य बनवण्यात आलं.पण त्याचे विरोधकही खूप होते.लिनियस हा पूर्णपणे धार्मिक होता.त्याचा उत्क्रांतीवर विश्वास नव्हता.तोही देवानं सगळ्या जगात एक शिडी तयार केलेली आहे असंच माने.त्याला 'ग्रेट चेन' म्हणत.सगळ्यात खाली खडक, त्यांच्यावर वनस्पती,त्यांच्यावर खालचे प्राणी,त्यांच्यावर वरचे प्राणी,सगळ्यात शेवटी माणूस आणि माणसाच्याही वर देवदूत आणि शेवटी देव अशी ही विश्वातली ग्रेट चेन किंवा शिडी होती.कुठलाही कीटक, मासा,माकड किंवा कुठलीही वनस्पती ही या शिडीतली कुठलीतरी पायरी आहे.हे सगळं देवानं पहिल्या

पासूनच तयार केलं आणि पहिल्यापासून हे विश्व आणि ही जीवसृष्टी अशीच आहे अशीच ही समजूत होती. 


लिनियसचा यावर ठाम विश्वास होता.पण गंमत ही की त्याच्या स्वतःच्याच कामातून तो या कल्पनेला थोडासा का होईना,पण हादरा देत होता.


वैयक्तिक आयुष्यात मात्र लिनियसला फारसं सुख मिळालं नाही.अपंग अवस्थेत १७७८ साली तो मरण पावला.पण बायॉलॉजीच्या क्षेत्रात त्यानं केलेलं काम आजपासून पुढची अनेक सहस्रकं मैलाचा दगड ठरलेली आहेत हे मात्र नक्की !


०५.०६.२५ या लेखातील शेवटचा भाग…

५/६/२५

स्पिशीजचं वर्गीकरण आणि टॅक्सॉनॉमी/Species classification and taxonomy

कोणत्याही सारख्या किंवा वेगवेगळ्या सजीव किंवा निर्जीव गोष्टी माणसाला दिसल्या तर माणूस त्यांचं वर्गीकरण करतो.माणसाचा आणि मानवी मेंदूचा तो स्वभावच आहे.माणूस जेव्हा हंटर-गॅदरर स्थितीत होता तेव्हाच त्याला आपल्या आजूबाजूला असंख्य प्राणी, पक्षी,वनस्पती आणि कीटक दिसत होते.इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती कुणाला सापडल्या तर त्या लक्षात कशा ठेवणार?त्याच्यातल्या सारखेपणा आणि फरकांवरून ! अर्थात,त्या वेळी काही माणूस कागद-पेन घेऊन सजीवांचा अभ्यास करायला बसत नव्हता,तर त्या काळी त्याला फक्त आपल्याला खाण्यायोग्य वनस्पती आणि प्राणी कोणते आहेत, कोणत्या वनस्पती विषारी आहेत,कोणत्या प्राण्यांपासून आपल्याला धोका आहे,कोणत्या वनस्पती औषधी आहेत,कोणत्या वनस्पतींपासून आपण घरं बांधू शकतो आणि विशिष्ट सामूहिक विधींच्या प्रसंगी कोणत्या वनस्पती आणि प्राणी गरजेच्या आहेत इतकंच ओळखायची गरज होती.त्या वेळच्या माणसानं निरीक्षणानं हे ज्ञान गोळा केलं आणि आपल्या पुढच्या पिढीला दिलं.असं होत होत पुढच्या शेकडो-हजारो वर्षांत माणसाला बऱ्याच सजीवांची ओळख झाली


माणसानं वनस्पतींच्या जीवनचक्राचं निरीक्षण केलं आणि त्यातून शेतीचा उगम झाला.शेतीमुळे भटका माणूस जरा स्थिर झाला.या काळाला 'निओलिथिक रिव्होल्यूशन' म्हणतात. हा काळ ख्रिस्तपूर्व १०,००० वर्षांपासून ते ख्रिस्तपूर्व २५०० वर्षांपर्यंत तब्बल ७५०० वर्षं चालला. त्या दरम्यान जगात सगळीकडेच शेती,पशुपालन आणि वेगवेगळ्या प्रकारे जलसंधारण सुरू झालं.शेती आणि पशुपालनामुळे अनेक वनस्पती आणि प्राणी यांच्याशी माणसाचा संपर्क आला.तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पती आणि प्राणी यांना अर्थातच वेगवेगळी नावं मिळाली.त्या वेळी माणसाच्या उपयुक्ततेनुसार सजीवांचं वर्गीकरण झालेलं होतं.नंतर लेखनकला निर्माण झाल्यानंतर हे ज्ञान अनेक वर्षं/शतकं टिकलं.


जगात सगळीकडेच अशा अनेक पद्धती होत्या.गंमत म्हणजे शेती करणारा शेतकरी लिहायला-वाचायला शिकलेला नव्हता.त्यामुळे अन्नधान्याचं वर्गीकरण लिहिलं गेलं नाही.पण औषधी वनस्पतींचं ज्ञान असणारे वैद्यमात्र शिकलेले होते. 


त्यांनीच सगळ्यात आधी वनस्पतींची गटवार विभागणी करून वर्णनं लिहन ठेवली.जुन्या काळातली अशी वर्णनं आपल्याला भारत,चीन, इजिप्त आणि मेसोपोटेमिया या भागांतल्या दस्तऐवजांत पाहायला मिळतात.


भारत


भारतात ३७०० ते ३१०० वर्षांपूर्वी केलेलं सगळ्यात जुनं वनस्पतींच्या वर्गीकरणाचं वर्णन ऋग्वेदात सापडतं.त्यात वनस्पतींचं वर्गीकरण वृक्षं,औषधी वनस्पती आणि वेली अशा गटांमध्ये केल्याचं दिसून येतं.तर अथर्ववेदात वनस्पतींचं,मोठ्या फांद्या असणारे वृक्ष - वड,मंजिरी म्हणजे फुलोरा (क्लस्टर्स) असणारी झाडं- तुळस,स्तंधिनी म्हणजे झुडपं - मोगरा, प्रस्तानवटी म्हणजे खूप वाढणारी झाडं,प्रतानवटी म्हणजे पसरत जाणारी झाडं- रताळी,एकश्रंगा म्हणजे एकाच मुख्य खोडावर अनेक शाखा असलेली झाडं- अशोका,अंसुमती म्हणजे अनेक फांद्या असणारी झाडं- बदाम आणि कंदिनी म्हणजे जमिनीत कंद येणारी झाडं- कांदा,अशा आठ गटांत वर्गीकरण केल्याचं दिसतं.


याशिवाय मनुस्मृती,तैत्तरीयसंहिता,चरकसंहिता आणि सुश्रुतसंहिता याही ग्रंथांमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं होतं.चौथ्या शतकात पराशरानं 'वृक्षायुर्वेद' नावाचा ग्रंथ लिहिला.आश्चर्य म्हणजे त्यात त्यानं गहू-तांदळासारख्या एकदल (मोनोकॉटीलिडॉन) आणि डाळी आणि दाण्यांसारख्या द्विदल (डायकॉटीलिडॉन) वनस्पतींचंही वर्णन करून ठेवलं आहे.


चीन : चीनमध्येही ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत लिहिलेल्या ग्रंथांमध्ये वनस्पतींचं औषधी वनस्पती आणि इतर उपयोगाच्या वनस्पतींचं वर्गीकरण आणि वर्णन केलेलं आढळतं.ख्रिस्तपूर्व ३०० मध्ये 'अर्ह या' या चिनी ज्ञानकोशात जवळपास ३४० वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं सापडतं !


यानंतरच्या काळात अ‍ॅरिस्टॉटलनं अनेक प्राण्यांचा अभ्यास करून त्यांचं वर्गीकरण केलं होतं.त्याचाच शिष्य असलेल्या थिओफ्रॉस्टसनं 'एन्क्वायरी इनटू प्लांट्स' आणि 'कॉजेस ऑफ प्लांट्स' हे दोन वनस्पतींवरचे ग्रंथ लिहून त्यात त्यानं जवळपास ५०० वनस्पतींचं विस्तृत वर्णन केल होतं.त्याचा 'एन्क्वायरी इनटू प्लांट्स' हा ग्रंथ तर नऊ खंडांत विभागलेला होता.त्यात सुरुवातीलाच त्यानं "आपण वनस्पतींचे बाहेरून दिसणारे गुणधर्म,त्यांची जीवनचक्रं,वेगवेगळ्या ऋतूंमध्ये त्यांची होणारी वाढ अशा सगळ्या गुणधर्मांचा अभ्यास केला पाहिजे." असं लिहिलं होतं.या ग्रंथात त्यानं ट्रीज, हर्ज आणि श्रब्ज अशा अनेक निकषांच्या आधारावर वनस्पतींचं वर्गीकरण केलं होतं.

थिओफ्रॉस्टसनं वनस्पतींना दिलेली अनेक नावं आजही आपण तशीच वापरतो हे विशेष ! पूर्वीच्या ग्रीक ज्ञानात रोमनांनी थोडीशी भर घातली होती.ख्रिस्तपूर्व दुसऱ्या ते इ.स. पहिल्या शतकापर्यंत कॅटो,वारो आणि प्लिनी यांनी या क्षेत्रात काम केलं होतं.हेच ज्ञान संपूर्ण युरोपात अनेक शतकं तसंच वापरलं जात होतं.

रेनायसान्सच्या काळापर्यंत यात फारसे बदल झालेच नाहीत.


मध्ययुग


चीन,भारत आणि काही पौर्वात्य देशांमध्ये मध्ययुगापूर्वीच अनेक विषयांवरचं ज्ञान उपलब्ध होतं. तर नववं शतक ते १३ वं शतक हा इस्लामिक (अरब देशांतला) रेनायसान्स मानला जातो.नवव्या शतकात होऊन गेलेला अब 'दिनावरी' हा अरेबिक बॉटनीचा प्रणेता मानला जातो.त्यानं आपल्या 'किताब अल नाबत' (बुक ऑफ प्लांटस) या पुस्तकात जवळपास ६३७ वनस्पतींचं वर्णन करून ठेवलं आहे.दहाव्या शतकात होऊन गेलेल्या अविसेनानंही आपल्या 'कॅनॉन ऑफ मेडिसीन'मध्ये अनेक औषधी वनस्पतींचं वर्णन करून ठेवलं आहे.यानंतरच्या काळात सजीवांच्या वर्गीकरणाचं महत्त्वाचं कार्य पुन्हा युरोपात होणार होतं.पण मधल्या काळात इतर प्रांतांतून युरोपात अनेक वनस्पतींची आयात झाली होती.मागच्या दोन हजार वर्षांत जितक्या वनस्पती युरोपात आल्या नव्हत्या,त्यापेक्षा किमान वीसपट वनस्पती मध्ययुगातून गेल्या काही शतकांत युरोपात दाखल झाल्या होत्या!


इटालियन डॉक्टर अँड्रिया कॅसाल्पिनो (Andrea Caesalpino) (१५१९ ते १६०३) यानं पिसा विद्यापीठात ४० वर्ष वनस्पतिशास्त्र शिकवलं. त्या दरम्यान त्यानं १५०० वनस्पतींचं वर्णन करणारं ६ भागांतलं पुस्तक' दे प्लांटिस' (द प्लांट्स) लिहिलं. याशिवाय त्यानं 'हर्बारियम' हे २६० पानांचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यानं चक्क स्वतः तयार केलेले वनस्पतींचे ७६८ स्पेसिमेन्स अजूनही आपल्याला पाहता येतात,ही फारच कौतुकाची गोष्ट आहे. कॅसाल्पिनोनं फुलं आणि फळं यांच्या वर्णनांवरून वनस्पतींचं वर्गीकरण केलं होतं.त्यानं जीनसची संकल्पनाही मांडली होती.तो त्याच्या काळाच्या फारच पुढे होता.


यानंतरच्या काळात गास्पर्ड बऊहीन (Gaspard Bauhin) (१५६० ते १६२४) यानं दोन वनस्पतींच्या वर्गीकरणाबद्दल 'प्रोडोमस थिअट्रीची बॉटनीची' हे १६२० मध्ये आणि १६२३ मध्ये 'पिनाक्स' हे अशी दोन महत्त्वाची पुस्तकं लिहिली.यानं थोड्या प्रमाणात वनस्पतींना नावं देण्याची बायनॉमियल पद्धत वापरली होती.याचाच प्रभाव पुढे लिनियसवर पडणार होता.


जोहाचिम जंगनंही (१५८७ ते १६५७) वर्गीकरणाची एक पद्धत विकसित केली होती. त्यावरच आधारित आणखी चांगली पद्धत जॉन रे (१६२३ ते १७०५) यानं सुचवली होती. त्यानं वनस्पतींच्या वर्णनांची अनेक कॅटलॉग्ज प्रकाशित केली होती.त्यानं तो स्वतः राहात होता त्या केंब्रिजपासून सुरुवात करून अनेक ठिकाणी फिरून वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती गोळा केली होती.

वनस्पतींमध्ये फरक हे त्यांच्या बाह्य आणि अंतर्गत गोष्टींमुळे होऊ शकतात हे त्यानं मांडलं. 


यावरूनच पुढे फिनोटाइप आणि जिनोटाइप या संकल्पना आल्या.याबद्दल त्यानं 'हिस्टोरिया प्लांटारम' हे पुस्तक लिहिलं.हे पुस्तक आधुनिक बॉटनीचा पाया मानला जातं,

इतकं महत्त्वाचं आहे.


पाश्चिमात्य वर्गीकरण


पूर्वीही अ‍ॅरिस्टॉटलनं जवळपास पाचशे प्राण्यांच्या जातींचं आणि थिओफ्रॉस्टसनं तितक्याच वनस्पतींच्या जातींचं वर्गीकरण केलं होतं.त्यानंतर आता दोन हजार वर्षांच्या काळात इतक्या नव्या जातींचे प्राणी आणि वनस्पती सापडल्या होत्या,की त्या पूर्वीच्या कोणत्याही दस्तऐवजात आल्या नव्हत्या.अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच जवळपास दहा हजार नव्या स्पिशीज शोधून,

त्यांची वर्णनं करून ठेवली होती.अनेकांनी अनेक प्रकारे हे वर्गीकरण केलं होतं.पण पूर्वीची गोष्ट वेगळी होती.आता सजीवांच्या अक्षरशः हजारो जाती माहीत झाल्या होत्या.आणि त्यांच्यात अनेक फरक आणि सारखेपणा होता.त्यांचं वर्गीकरण करणं ही खरंच फार अवघड गोष्ट होती.अशा प्रकारे इतक्या प्रजाती लक्षात घेऊन वर्गीकरणाचा प्रयत्न करणारा इंग्लंडचा जॉन रे (John Ray) (१६२८ ते १७०५) हा पहिलाच वनस्पतिशास्त्रज्ञ होता.


१६८६ ते १७०४ या दरम्यान त्यानं वनस्पतींच्या जीवनचक्राचं वर्णन करणारे तीन ज्ञानकोश प्रसिद्ध केले.त्यात त्यानं चक्क १८,६०० वनस्पतींच्या जातींचं वर्णन करून ठेवलं होतं.१६९३ मध्ये त्यानं प्राण्यांचंही असंच वर्गीकरण केलं होतं.पण वनस्पतींच्या मानानं त्यानं कमी प्राणी विचारात घेतले होते.पण त्यानं त्यात प्राण्यांचे दात आणि पायांची बोटं यांच्या रचना लक्षात घेऊन व्यवस्थित वर्गीकरण करायची पद्धत विकसित केली होती हे मात्र खरं.उदाहरणार्थ,सस्तन प्राण्यांमध्ये त्यानं पायांना बोटं (टोज) असलेली आणि पायांना खुरं (हूफ्ज) असलेली असे दोन गट केले होते.खुरं असलेले प्राण्यांचे त्यानं पुन्हा एक खूर असलेले घोड्यांसारखे प्राणी,दोन खुरं असलेले गाय-बैल असे कॅटल्स आणि तीन खुरं असलेले ऱ्हायनोसोर्स असे तीन गट पाडले होते.


दोन खुरं असलेल्या सस्तन प्राण्यांचे त्यानं पुन्हा शेळीसारखे घास खाणारे आणि कायमस्वरूपी शिंग असलेले,हरणासारखे घास खाणारे आणि शिंग कायमस्वरूपी नसलेले (हरणाचे शिंग दर वर्षी गळून पडतात आणि पुन्हा येतात.) आणि डुकरासारखे घास न खाणारे असे पुन्हा तीन गट पाडले होते.


ही पद्धत काही सगळ्याच प्राण्यांना लागू पडत नव्हती. पण रेनं गट आणि उपगट पाडून वर्गीकरणाची चांगली पद्धत निर्माण केली होती,हे मात्र खरं.


पुढे पिअरे मॅग्नॉल (Pierre Magnol) (१६३८-१७१५) आणि जोसेफ दे टर्नफोर्ट (Joseph de Tournefort (१६५६-१७०८) या गुरुशिष्यांनी जीनस हाच वर्गीकरणाचा पाया असला पाहिजे हा विचार आणखी पुढे आणला.पण या सगळ्यांनी केलेल्या वनस्पतींच्या अभ्यासाच्या पायावर खऱ्या अर्थानं कळस चढवला तो स्वीडिश बॉटनिस्ट कार्ल फॉन लिने (Carl von Linne) (१७०७ ते १७७८) यानं.आपण त्याला कार्ल लिनियस या लॅटिन नावानं ओळखतो.


त्याच्या वेळेपर्यंत तर माणसाला माहीत असलेल्या स्पिशीजची संख्या ७० हजारांवर गेली होती.कुठलाही जीव सापडला की त्याची नोंद पूर्वी झाली आहे की नाही हे तपासणं म्हणजे एक दिव्यपरीक्षाच असायची.हे करणाऱ्यांना 'टॅक्सॉनॉमिस्ट्स' म्हणतात.ते कसब शिकायला चक्क ८-१० वर्ष लागतात ! त्यातून प्रत्येक देशाची त्या जिवांना नावं देण्याची,त्यांची वर्गवारी करण्याची पद्धतही वेगळी असायची.ते दिसायला कसे आहेत? देखणे की कुरूप,लहान की मोठे,वगैरेंवरूनही त्यांचं वर्गीकरण व्हायचं.(सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री

पब्लिकेशन )


ब्यूफाँ यानं तर कुठलाही जीव माणसाला किती उपयोगी आहे यावरून त्यांचं वर्गीकरण केलं होतं.


बरं,प्रत्येक नावही प्रचंड मोठं असायचं.जमिनीलगत उगवणाऱ्या चेरीला 'फिजॅलिस अम्नो रॅमोसिम रॅमिस अ‍ॅग्न्यूलॉसिस ग्लॅब्रिस फॉलिस डेंटोसेरॅटिस' असं नाव दिलं होतं.ते एका श्वासात म्हणणंही शक्य नसायचं ! त्यातून कित्येक वनस्पतींची किंवा प्राण्यांची वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या नावानं नोंद होई.म्हणजे या सगळ्या जीवसृष्टीची जागतिक डायरेक्टरी अशी नव्हतीच.म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीच्या ०.०१% च सजीव आपल्याला आतापर्यंत सापडलेले होते,पण त्यांचाही आकडा काही कमी नव्हता आणि त्यांच्याही नोंदीमध्ये पूर्ण अंदाधुंदी होती ! म्हणजे गोंधळच गोंधळ !


या सगळ्यातून कार्ल लिनियस यानं मार्ग काढला.तो अतिगर्विष्ठ आणि अतिविक्षिप्त माणूस होता.१७०७ साली तो स्वीडनमध्ये एका गरीब पाद्र्याच्या घरी जन्मला.लहानपणी तो शाळेला सर्रास दांड्या मारत असे आणि तासन्तास आजूबाजूची झाडं आणि वनस्पती यांचंच निरीक्षण करत बसे.तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता.तू फार फार तर चांभार होऊ शकशील असं त्याचे शिक्षक म्हणायचे.इतर काहीच येत नाही म्हणून वडिलांनीही मग त्याला चांभारच करायचं ठरवलं होतं.पण लिनियसला आपली चूक लक्षात आली आणि आपल्याला आणखी एक संधी मिळावी यासाठी त्यानं गयावया केली तेव्हा दया येऊन वडिलांनी त्याला एक संधी दिली.मग मात्र मिळालेली संधी वाया जाऊ न देता लिनियस जोरात अभ्यास करायला लागला.


कॉलेजमध्ये असतानाच लिनियसनं वनस्पतींच्या लैंगिक प्रजननाविषयी अभ्यास केला होता.त्यातूनही त्यानं प्रत्येक प्रजातीच्या लैंगिक अवयवांमध्ये काय सारखेपणा आणि काय फरक आहे,त्याचाही अभ्यास करून ठेवला होता.आता त्यानं याच निकषांवर वनस्पतींचं वर्गीकरण करायचं ठरवलं होतं.


शिल्लक भाग पूढील लेखामध्ये…

३/६/२५

मैत्रीचं बिल / friendship bill

सकाळी लवकर ऑफिसला पोहोचायच्या गडबडीत नाष्टा करायचं राहून गेलं म्हणून म्हटलं,'चला आज जरा झणझणीत कोल्हापुरी मिसळीवर ताव मारू.' कंपनीच्या गेटपासून हाकेच्या अंतरावर असलेलं सुप्रसिद्ध मिसळ सेंटर गाठलं.

फोनवर बोलता बोलता समोर नजर गेली.चेहरा ओळखीचा वाटला म्हणून जरा नजर रोखून धरली,मेंदूवर ताण दिला तसा एवढ्या लांबून टक लावून आपल्याला कोणीतरी न्याहाळतोय,हे समोरच्या व्यक्तीच्या ध्यानात आलं.जवळ जाताच लक्षात आलं,'आरं ह्यो तर आपला सदा...' आमच्या गावाकडचा ऐन उमेदीच्या काळातला खास मित्र.लांब तिकडं कांडगावच्या रस्त्याला एका खेड्यातनं रोज सदाशिव गारगोटीला महाविद्यालयात शिकायला यायचा.घरची परिस्थिती बेताची.रोज सकाळी शेतात जाऊन वैरण आणायची.जनावरांना पाणी पाजून घाईगडबडीत सायकलवरनं धापा टाकत यायचा.


दुपारच्या जेवणात आईनं जुन्या धोतराच्या फडक्यात बांधून दिलेली चटणी-भाकरी खायचा. एकच शर्ट-पँट आठवडाभर तुबलायचा;पण मिळंल ते पुस्तक अधाशागत वाचून काढायचा.अभ्यासात हुशार असल्यामुळं सगळे शिक्षक त्याला मदत करायचे.पुढं कसल्यातरी कोर्ससाठी प्राचार्य गोविंद सरांनी सदाला पुण्याला पाठवलं तेव्हापासून त्याची-माझी गाठभेट नाही.


आठवणींच्या अडगळीतनं कॉलेजच्या दिवसांचा कप्पा उघडला.काळाचा धुरळा झटकला आणि दोघांच्या गालावर हसू उमटलं.कॉलेजला असताना नुकत्याच आलेल्या कोवळ्या मिशांवर ताव मारत मर्द असल्याचा दिखावा करत फिरणारा,एक शर्ट आठवडाभर वापरणारा घामसू,लुकडा सदाशिव एकदम डबलडेकर ढेरी,डोक्यावरचं केस विरळ झालेल्या आणि मिशा गायब,टकाटक अ‍ॅरोचा शर्ट, ब्लॅक बेरीची पँट आणि परफ्युमचा घमघमाट.हे बघून मी तर चक्रावलो. "आरं, सदा तू ? कुठ आहेस,काय करतोस? किती बदललास? काय कापड चक्क धुतल्याली आणि परफ्यूम ? मी तर ओळखलंच नाही पहिल्यांदा,काय करतोस तरी काय?"


"आरं हो हो जरा थांब,श्वास घे,दम लागला आसल, जरा एक एक प्रश्न विचार..." असं म्हणत सदानं मला मिठी मारली आणि ओढून हॉटेलमध्ये घेऊन गेला.


त्याच्या चेहऱ्यावरची हास्याची लकेर तशीच होती. मी अजूनही कॉलेजमध्ये तरंगत होतो.ते दिवस. खिशात कडकी.

सायकलवरनं आठ-दहा किलोमीटर रपेट करून आलं की,वाहणाऱ्या घामाच्या धारा,एक किंवा दोन ड्रेस,तेच रात्री धुऊन दुसऱ्या दिवशी सकाळी परत घालून कॉलेजला जायचं.एक रुपयाचा कटिंग चहा प्यायचा तोही टपरीवर गप्पा हाणत.गरमागरम कांदा-भजीचा खमंग वास आला की एकमेकांच्या तोंडाकडं बघत खिसं चापचायचं.पाच रुपये गोळा करून तिघात एक प्लेट घ्यायची.चार भजी आणि खाणारे तिघे मी,सदाशिव आणि आमचा लंगोटी यार तानाजी. प्रत्येकानं एक एक भजं उचललं.आता राहिलेल्या चौथ्या भज्यावर तिघांचा डोळा.जो आधी संपविणार तो हात मारणार.ह्यो सदा कायम खाताना राजकारणातला काहीतरी विषय काढला की,बाता मारणार तोवर बरोबरचा तानाजी चौथं भजं उचलणार.मग त्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असायचा.अशी सारी गंमत असायची.


सकाळी सकाळी एवढ्या लांबून सायकल घेऊन येणार,भूक ज्याम लागलेली,बिल ह्योच देणार आणि त्याला बोलण्यात गुंतवून ज्यादाचं भजं तानाजी उचलणार.तान्यापण जरा जास्तच इरसाल. ह्याच्या तोंडाकडं बघत भजं मोडणार.एक घास मला देणार.मग सदाच्या तोंडाचा हावभाव बघण्यासारखा असायचा.बरोबरीचा घास मिळाला की पोटभर पाणी पिणार.

चहा ढोसला की बाहेर पडायला घाई.जो मागं राहणार त्याला बिल द्यायला लागणार.तान्या चॅप्टर.सदाला आतल्या खुर्चीवर बसायला जागा.मी समोरच्या बाजूला एकटा.मग मी आधी बाहेर,तान्या उठल्याशिवाय सदाला जागा नाही.कितीतरी वेळा असं सदाला लुटलं आणि चुकून कधी मी किंवा तान्या आतल्या खुर्चीवर बसलो,तर त्या दिवशी भजी मागवायचीच नाहीत. नुसताच चहा घ्यायचा.असं हे टपरीवरचं राजकारण.


आज मात्र सदा मला दंडाला धरून ओढत हॉटेलमध्ये घेऊन आला.दोन स्पेशल मिसळ बिगर कट ऑर्डर केली.जबरदस्तीनं एक्स्ट्रा पाव खायला लावला.मिसळ खाताना पुढं आलेल्या ढेरीवर आणि ब्रँडेड कपड्यावर डाग पडेल याची काळजी मात्र तो घेत होता.स्पेशल चहा कमी साखर.च्यायला,ह्या आयुष्याच्या धांदलीत जगण्यातली गोडीच कमी झालीय.कॉलेजबाहेरच्या टपरीवरच्या चहाची चव अजून जिभंवर रेंगाळतीय.करिअरच्या शिड्या चढत एवढ्या वर आलोय की,आजूबाजूला ओळखीची माणसं शोधताना नजर अंधुक झालीय.आपण एकमेकांपासून किती लांब आलोय याची जाणीवच नाही.


वाघीण,प्रतिक पाटील, स्वच्छंद प्रकाशन,कोल्हापूर 


शेवटी बिल द्यायला दोघांनी पैशाचं पाकीट बाहेर काढलं आणि एकमेकांकडं बघत हसायला लागलो. "साल्यांनो,तू आणि त्यो तान्या,कॉलेजमध्ये बिल देताना तुम्ही दोघांनी मिळून मला लुटलं आणि आता बिल द्यायला निघालास व्हय.गप पाकीट आत ठेव..." सदाशिवनं मला दम भरला.


" लेका त्यावेळी तू दिलंस ना म्हणून मी आता देतो," मी म्हटलं.


"लय शहाणा हाईस.गप पैसे आत ठेव.पुन्हा कधीतरी तू दे.नाही तर बोलीव त्या तान्याला परत कॉलेजच्या टपरीवर आणि मग तू दे बिल..." असं म्हणत सदानं बिलासोबत टीपही दिली.


"ते आता शक्य नाही..." मी म्हटलं.


"का? मित्रांच्यासाठी एवढीपण फुर्सत नसते का? लय पैसा पैसा करू नगं.जरा मित्रांसाठी वेळपण काढ."


"मी ईन रे; पण तान्या नाही येऊ शकणार.माझ्या पैशाची भजी खायला.." मी बोलत बोलत हॉटेलच्या दारात आलो.


"का लय मोठा राजकारणी झाला की काय त्यो.का भांडणं-बिंडणं झाली की काय तुमची..?"


" भांडतोय कसला साला.रुसून बसलाय.चार वर्षांपूर्वी माझ्यासोबतच लंच करून गावाकडं निघाला.कात्रज घाटात गाडीचा अपघात झाला आणि परत आलाच नाही.." असं मी सांगताच सदानं गचकन मिठीच मारली मला.


खिशातून रुमाल काढला आणि डोळ्यांवर धरला.

मनात म्हटलं,'साला करिअरच्या नादात स्टेटस सांभाळताना मनसोक्त रडतापण येत नाही.'


इकडच्या तिकडच्या गप्पा मारून निघणार तोवर एक मुलगा भीक मागायला आला म्हणून खिशात हात घालून दोन रुपयांचं नाणं देणार,तोवर सदानं पैसे देऊ नकोस म्हणून खुणवलं आणि त्या पोराला विचारलं, " मिसळ खाणार..?" त्या पोरानं क्षणभर विचार केला आणि होकाराची मान हलवली.सदानं काऊंटरवर जाऊन एका मिसळचे पैसे दिलं आणि त्या पोराला मिसळ द्यायला सांगितली.


बाहेर येत सदा म्हणाला,"अरे,पैसे देऊन त्येचा याला काय उपयोग? कोणतरी मालक असंल याचा. लहान मूल समजून आपण भीक देतो.म्हणून त्यांना भीक मागायला भाग पाडलं जातं.पैसे नसताना आपणपण लहानाचं मोठं झालोच की!आपण कुठं भीक मागितली.मेसचा एक डबा तिघांनी खाल्ला, प्रसंगी उपाशी राहिलो;पण शिक्षण घेतलं म्हणून आज इथंपर्यंत पोहोचलो.त्यांना शाळेत पाठवायचं सोडून भीक मागायला लावतात आणि त्यावर कोणीतरी दुसराच डल्ला मारतो.भीक त्यांना द्यायची ज्यांना काहीच कामधंदा करता येत नाही आणि तेही पैसे नाही,तर खाऊ द्या.त्यांची गरज पैशाची नाही तर पोट भरण्याची आहे."


आजही सदा दुसऱ्याची भूक जाणतो.पोट भरण्यासाठी पैसे नाही नियत लागते.