* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

९/९/२५

गटे : हा पाहा खरा मनुष्य Gate:Yeah,look,real man


गटेने वायमार हे पन्नास वर्षांपर्यंत जागतिक साहित्याचे केंद्र बनवले.त्याने तिथे बुद्धिमान स्त्री-पुरुष जमवून त्यांच्या नेतृत्वाखाली तत्त्वज्ञानाच्या चर्चा व वाड्मयसेवा करण्याचा उपक्रम केला.तिथे ते प्रेमाशी खेळत.तिथे बांधलेल्या एका छोट्या नाट्यगृहाचा गटे व्यवस्थापक होता.येथेच त्याने त्या शतकातील काही सर्वोत्कृष्ट नाटके लिहिली.तारुण्य होते,तोपर्यंत त्याचे लिखाण वासनोत्कट व क्षोभकारक होते.कधीकधी ते छचोर व छिनालही वाटे.'स्टेला' नामक नाटकात नायक आपली पत्नी व आपले प्रेमपात्र दोघांशीही नीट राहतो व तिघेही सुखी आहेत असे दाखवून त्याने बहुपत्नीतत्वाची तरफदारी केल्याबद्दल बहुजन समाजाने खूप कावकाव केली.तेव्हा घाबरून गटेने नाटकाचा शेवटचा भाग बदलून पुन्हा लिहिला.पत्नी व प्रेयसी दोघींशीही नीट कसे राहावे हे कळेनासे झाल्यामुळे नायक डोक्यात पिस्तूल मारून घेऊन आत्महत्या करून हा प्रश्न सोडवतो,अशी कलाटणी गटेने संविधानकाला दिली.

पण हळूहळू गटेच्या वाङ्मयातील यौवनसहज उन्माद, मादकता,निश्चित बेदरकारपणा व सुखविलास-लोलुपता कमीकमी होत जातात.त्याचा तारुण्यातील जोम ओसरतो.तो अतःपर जगाला नष्ट करू पाहणारा बंडखोर राहत नाही,तर जगाचे स्वरूप समजून घेणारा तत्त्वज्ञानी बनतो.अतःपर त्याचे ध्येय एकच. मरेपर्यंत एकच ध्यास,अधिक प्रकाश,अधिक सौंदर्य तो कुरूपतेतही सुंदरता व नम्रतेतही प्रतिष्ठा पाही.वॉल्ट व्हिटमनप्रमाणे मानव कितीही खालच्या वर्गातील असो, त्याला त्यांच्याविषयी उत्कट प्रेम वाटे. 

तो राजासमोर तर लवेच;पण अत्यंत दीनदरिद्री माणसे भेटली,तर त्यांनाही प्रणाम करी.खाटीक, भटारखानेवाले,मेणबत्त्या करणारे वगैरे लोकांशी मरेपर्यंत त्याची दोस्ती असे.तो म्हणतो, "या लोकांबद्दल मला किती प्रेम वाटते ! माझे प्रेम या खालच्या वर्गातील लोकांसाठी परत आले आहे." खाणीतील लोकांना भेटून आल्यावर तो म्हणाला, "ज्यांना आपण खालच्या वर्गाचे समजतो, तेच देवाच्या दृष्टीने परमोच्च वर्गाचे आहेत."

पददलितांसाठी त्याला वाटणारी सहानुभूती केवळ शाब्दिक अगर आलंकारिक नव्हती.त्याला दरसाल एक हजार डॉलर पगार मिळे.या पगारांतून तो दोन अनोळखी लोकांनाही पोशी.ते मदत मागत व तो नेहमी देई.त्याला स्वतःला कधीही हालअपेष्टा भोगाव्या लागल्या नाहीत.पण तो दुसऱ्यांच्या दुःखाशी सहानुभूती दाखवी.स्वतःच्या जीवनापलीकडे पाहण्याचे कवीचे क्रांतदर्शित्व त्याच्या ठायी होते.

एका लॅटिन कवीने म्हटले आहे,"मानवांची दुःखे पाहून देव रडतात."

त्याप्रमाणे गटे हे अश्रू मानीत होता.त्याचे दैवी मन गरिबांचे दुःख पाहून रडे.बुद्धी व्यापक असेल.
त्यालाच गरिबांची दुःखे जाणता येतात.

गटेची मनोबुद्धी अठराव्या शतकात अत्यंत सर्वगामी व सर्वसंचारी होती.तो कवी,चित्रकार व संगीतज्ज्ञ होता. एवढेच नव्हे,तर वरच्या दर्जाचा शास्त्रज्ञही होता. जगातल्या बाह्य विविधतेच्या मुळाशी एकताच आहे हे त्याने कवीच्या प्रतिभेच्या योगे ओळखले व विज्ञानवेत्ता या नात्याने ही एकता सिद्ध करण्याची खटपट केली, वनस्पतिशास्त्र,शरीरशास्त्र व रंगप्रक्रिया यांचा प्रेपूर अभ्यास करून त्याने वनस्पतींची स्थित्यंतरे' हा ग्रंथ लिहिला व दाखवले की,वैभवशाली पाने म्हणजेच फुले. फुले म्हणजेच पूर्व विकसित पाने.पानांची काव्यात परिणती म्हणजेच फले.फुले म्हणजे पानाचे काव्य ! मानवी कवटीचे बारकाईने निरीक्षण करून त्याने मनुष्य व खालचे प्राणी यांतील दुवा जोडणाऱ्या एका हाडाचा शोध लावला.

मानवजातीशी संबद्ध अशा प्रत्येक विषयाची टेरेन्सप्रमाणे त्यालाही आवड होती.त्याला फक्त युद्धाची आवड मात्र नव्हती.गटे हा शांतात्मा,शांततेचा उपासक होता.कार्ल ऑगस्ट फ्रेंचांशी झगडत होता,
तेव्हा त्याने गटेला सैन्यात बोलावून लष्करी हालचाली पाहण्यास सांगितले.सैन्याची छावणी होती तिथे गटे गेला,पण तेथील लढायांत त्याला रस नव्हता.त्याने छावणीच्या आसपासच्या फुलांचा व दगडांचा अभ्यास केला.त्याला आपल्या राष्ट्राविषयी अत्यंत प्रीती होती,नितांत भक्ती होती.पण तो संकुचित दृष्टीने देशभक्त नव्हता.तो देशभक्तीने भरलेली युद्धगीते रचेना.म्हणून त्याला कोणी बुळा,नेभळा म्हटले,तेव्हा त्याने उत्तर दिले, 

"मला ज्याचा अनुभव आला नाही,असे काहीही मी कधीच उच्चारले नाही... स्वतः प्रेम केल्यावरच मी प्रेमगीते लिहिली.कोणाचाही द्वेष न करता मी द्वेषगीते कशी लिहू?"

आयुष्याच्या मध्यभागी त्याला तीन सुंदर व रमणीय वस्तू मिळाल्या - प्रेमळ पत्नी,गोजिरवाणा पुत्र व निष्ठावंत मित्र.तीन दैवी देणग्या ! वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी,म्हणजे १७८८ साली ख्रिश्टियेन व्हल्पियसशी त्याची गाठ पडली.प्रथम ती त्याची रखेली होती.पण पुढे दोघांनी कायदेशीररीत्या लग्न केले. १७८९ साली त्याला मुलगा झाला.१७९४ साली प्रख्यात नाटककार शिलर याच्याशी त्याचा दाट परिचय झाला.त्या वेळी गटे पंचेचाळीस वर्षांचा होता व शिलर पस्तीस वर्षांचा होता.

गटे व शिलर यांच्या कोणत्याही उत्कृष्ट काव्यापेक्षा त्यांची मैत्री ही अधिक सुंदर कविता होती.त्यांची मैत्री म्हणजे एक देवसदृश मानव व एक मरणोन्मुख माणूस यांची मैत्री होती.शिलर आजारी होता.त्याचे एक फुफ्फुस गेले होते.गटे ग्रीक वृत्तीचा होता.
त्याला निसर्गाविषयी परमादर होता.शिलर ख्रिश्चन होता. त्याला न्यायाची तहान होती.दोघांनीही बंडखोरीपासून प्रारंभ केला. पण दोघेही शेवटी शांत वृत्तीचे झाले. 

गटेची बंडखोरी त्याच्या सुखासीनतेने मारली,शिलरची बंडखोर वृत्ती त्याच्या दारिद्र्यामुळे गारठली.पण दोघांचाही कलेच्या बंडखोरीवर अद्यापही विश्वास होता. सामान्य माणसांचे श्रेष्ठ मानव बनवण्याचे साधन म्हणजे काव्य असे त्यांना वाटे.काव्य हे मानवांना अती मानव करणारे पवित्र माध्यम आहे या विश्वासाने दोघेही सहकार्याने काम करू लागले.सौंदर्योपासना हा त्यांचा धर्म होता.सौंदर्योपासनेच्या साधनेने ते जगाचा व आपलाही उद्धार करू पाहत होते.दोघेही परस्परांच्या प्रतिभेचे पूरक होते.दोघांचे हे सुंदर व मंगल मैत्रीचे प्रेम अकरा वर्षे टिकले व शिलर मरण पावला.गटेने दार लावून घेतले व तो आपल्या खोलीत एखाद्या लहान मुलाप्रमाणे ओक्साबोक्सी रडला.एका मित्राला तो लिहितो, 'माझे अर्धे अस्तित्वच जणू संपले ! माझा अर्धा प्राणच जमू गेला! या काळातील माझी रोजनिशी कोरी आहे. माझे जीवन जणू शून्य, रिक्त झाले होते, असे ती कोरी पृष्ठे दाखवीत आहेत !'

गटे म्हातारा होईतो जगला,पण दीर्घ जीवनासाठी त्याला एकाकीपणा भोगावा लागला.ज्यांच्या ज्यांच्यावर त्याचे प्रेम होते ती सारी मंडळी एकामागोमाग एक गेली.त्याचे प्रियतम मित्र,त्याची पत्नी,त्याची बहीण व अखेर त्याचा एकुलता एक मुलगा सारी सोडून गेली,तरी तो शूरासारखा सतत पुढे-पुढेच जात होता.आपले आनंद व आपल्या वेदना यांना तो अमर गीतांचे स्वरूप देत होता. त्याने एकूण साठ पुस्तके लिहिली.भावगीते, शोकगीते, उपहासगीते,महाकाव्ये,निबंध,कादंबऱ्या,नाटके, भुताखेतांच्या व पऱ्यांच्या अद्भुत गोष्टी, देव, दानव व मानव यांच्या सात्त्विक कथा,दंतकथांवर उभारलेल्या तात्त्विक कथा,सारे प्रकार त्याने अमर कलांवतांच्या हाताने हाताळले व शेवटी आपली सारी प्रतिमा केंद्रीभूत करून त्याने आपले अमर महाकाव्य लिहिले व जगाला दिले,तेच फॉस्ट होय. याचा पूर्वार्ध तो तीस वर्षे लिहित होता.उत्तरार्धाला आणखी पंचवीस वर्षे लागली. फॉस्ट या महाकाव्याचा अर्थ काय,हे आता पाहू या.फॉस्ट लिहिताना मानवजात समजून घेणे हा गटेचा उद्देश होता.मानवजातीच्या शक्तीचे मोजमाप करून मानवांची कर्तव्ये काय,हे त्याला सांगायचे होते. नाटकाची प्राणभूत कल्पना आरंभीच्या काव्यमय प्रस्तावात आहे.मानवी आत्म्याविषयी देव सैतान यांच्या पैज लागते.सैतानाला मर्त्य मानवांविषयी मुळीच आदर नसतो.सैतान म्हणजे शाश्वत संशयात्मा,'काही नाही, सारे निःसार आहे.'असे म्हणणारा.'असण्यापेक्षा नसणे व जीवनापेक्षा मरण अधिक श्रेयस्कर'‌अशी सैतानाची श्रद्धा होती. नियतीचा जो अनंत खेळ चाललेला आहे. त्यात सैतानाला सार वाटत नसे.ती माणसांना मातीत मिळवण्यासाठी त्यांना निर्मिते.ज्या शाश्वत शून्यातून हा दिकालात चालणारा निरुपयोगी खेळ सुरू झाला. ज्यातून हे विश्वयात्रेला निघाले.त्या पोकळ शून्यात असणेच बरे असे सैतानाला वाटे.सैतानाचे ध्येय एकच, सर्जनाला विरोध,सृष्टीचा खेळ अगर विचार चालू न देणे, मानवांचा व देवाचा सद्भाव नाकारणे.सैतान म्हणतो, "म्हातारा डॉ.फौस्ट- महापंडित व मानवातला अत्यंत सरळ व न्यायी पुरुषसुद्धा.जर मी त्याला मोहात पाडीन तर,अधःपाताच्या अंतिम टोकाला पोहोचेल."पण ईश्वर अधिक जाणतो व म्हणतो,"मनुष्य अपूर्ण आहे व अंधारातून धडपडत जात असतो,
जीवनात सतत पापे करीत असतो,हे खरे.पण आपल्या पापांतूनच तो अंतःप्रेरणेने जणू प्रकाशाकडे जात असतो.देवाचा व सैतानाचा करार होतो व सैतानाने फौस्टला मोह पाडून त्याच्या अमर आत्म्याचा नाश करता येतो का पाहावे, असे ठरते.जर एखाद्या जाणाऱ्या क्षणाला 'हे क्षणा,तू थांब.किती सुंदर आहेस तू!' असे म्हणावे लागून फौस्ट पुढे जायचे नाकारील,तर सैतान विजयी असे ठरायचे होते.फौस्टचा पूर्वार्ध सर्वांना माहीतच आहे.

सैतान फौस्टला नवतारुण्य व जगातील नाना स्वार्थी सुखे देऊन मोहात पाडतो.सौंदर्य,संपत्ती,विषयसुखे, बेछूटपणा,प्रेमाच्या जबाबदाऱ्या न पत्करता त्याची सुखे तेवढी भोगणे,सारे सैतान फौस्टला देत असतो.
सैतानाने सांगितल्याप्रमाणे फौस्ट मागरिटला प्रेमपाशात अडकवतो व स्वतःची पापे व दुःखे भोगायला तिला सोडून जातो.कथेच्या या पहिल्या भागात त्याची सर्वत्र चुका करण्याकडे प्रवृत्ती आहे.तो वासनाविकारांकडे एकदम वळतो,पण या सर्व कुमार्गात असा प्रसंग केव्हाच येत नाही की,जेव्हा एखाघा क्षणाला 'तू किती सुंदर आहेस ! थांब' असे म्हणण्याचा मोह त्याला पडावा.मागरिटच्या मरणानंतर सैतान त्याला निराळ्याच प्रकारच्या मोहात पाडू पाहतो.फौस्ट मानवजातीचे प्रतीक आहे.आपणाला जीवनातील प्रत्येक अनुभव यावा,असे त्याला वाटते.मानवांबरोबर राहावे,श्रमावे,त्यांच्याबरोबरच मानवजातीचे गलबत फुटेल तेव्हाची संकटे भोगावीत,त्या विपत्तीत त्यांचे भागीदार व्हावे असे त्याला उत्कटपणे वाटते.'प्रत्येक वेदनेसाठी हृदय उघडे करून मानवांचे सारे आनंद व त्यांची सारी दुःखे अनुभवण्याची' त्याला तळमळ लागलेली असते.
सैतान फौस्टला एक राजाच्या दरबारचा सल्लागार करतो.तो तिथे गटेप्रमाणे आपल्या कर्तबगारीने व योग्य सेवेने मानसन्मान मिळवतो.राजा कृतज्ञता दाखवतो.पण त्याला सुख मिळत नाही व वर्तमानकाळातील जीवनामुळे तो निराश होतो. भूतकाळातील सारे जीवन-सारे मानवी जीवन तो डोळ्यांसमोर आणू पाहतो.प्राचीन काळातील हेलेनला तोजणू पुन्हा सजीव करतो व तिच्याशी लग्न लावू पाहतो. (जसे गटेने ग्रीक कवींच्या विचारांशी लग्न लावले होते) पण हेलेनला आलिंगन देताच ती अदृश्य होते व तिचा फक्त झगा उरतो.प्राचीन ग्रीसचे जीवन समजून घेणे फौस्टला व गटेलाही जमत नाही.त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी प्राचीनांचा तो सुंदर आत्मा त्यांच्या हाती सापडत नाही.फक्त बाहेरचे कवचच त्यांच्या हाती येते.फौस्ट अशा प्रकारे एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवात जातो.पण त्याला कशातही सुख वाटत नाही.'त्याचे साधे चालणे म्हणजेही सतरांदा ठेचाळणे व पडणे होते.' तो जे जे हाती घेतो.त्यात त्याला अपयशच येते.कधी काळी विजय मिळालाच,
तरी तो पोकळ असतो व त्यामुळे त्याची अधिकच निराशा होते.युद्धातील विजय म्हणजे मरणच होय.दोन्ही बाजूंचा विनाश झालेला असतो. सैतान त्याला मोठमोठी शहरे व राज्ये,किल्ले,सुंदर स्त्रिया,
वैभवशाली कृत्ये,शाश्वत यशःश्री सारे काही देतो. पण फौस्ट शेवटी या सर्व गोष्टींना विटतो.त्याच्या जीवनाची कमान आता पूर्ण होऊन खाली उतरू लागते.

 तारुण्यातील सुखे,मध्यमावस्थेतील महत्कृत्ये यातून त्याला सारभूत असे काहीच मिळत नाही.त्याच्या डोळ्यांवरची झापड उडते.त्याची प्रांती नष्ट होते.चिंता त्याच्या घराचा कब्जा घेते.तारुण्यातील वासनांच्या निखाऱ्यांची जळून राख झालेली असते.तो अंध होतो व जीवनावधी चाललेला सुखाचा उद्योग आता पुरे,असे त्याला वाटू लागते.पण आश्चर्य हे की,ज्या क्षणी तो सुखाचा नाद सोडतो,त्याच क्षणी ते त्याला लाभते. समुद्राजवळची अफाट दलदल दूर करून ती जागा मानवी निवासाला योग्य अशी बनविण्याची एक विशाल कल्पना त्याला सुचते.तो म्हणतो, "येथे मी घरे बांधीन, त्यात लाखो लोक स्वातंत्र्यात नांदतील व रोज काम करून अधिकाधिक स्वतंत्र होतील." हा विचार मनात येऊन त्याचे हृदय आनंदाने भरून जाते.तो आयुष्यभर याच आत्मविस्मृतीच्या ध्येयाकडे नकळत जात होता.हाच तो शेवटचा मंगल क्षण,सोन्याचा क्षण ! याला तो म्हणू शकतो, "क्षणा, थांब. किती रे सुंदर तू!" अखेर त्याच्या जीवनातील परमोच्च क्षण येतो व त्याचे जीवन समाप्त होते.सैतानाचा जय झाला,असे बाह्यतः तरी दिसते.विजयाचे बक्षीस म्हणून सैतान फौस्टचा आत्मा नेऊ इच्छितो,पण गुलाबपुष्पवृष्टीत देवदत फौस्टचा आत्मा स्वर्गात नेतात.कारण,

फौस्टने खूप चुका केल्या,खूप पापे केली,तरी या साऱ्या धडपडीतून व चुकांतून तो नकळत प्रकाशाकडेच जात होता.

स्वर्गात सर्वांत आधी त्याला कोण बरे अभिवादन करते? मागरिटच.तिने पाप केलेले असते व फौस्टच्या पापामुळे तिला मरावे लागलेले असते.पण सारे विसरले जाते, साऱ्यांची क्षमा करण्यात येते.ती आता त्याला सन्मार्ग दाखवते.पुरुषाची शाश्वत उद्धारकर्ती स्त्रीच होय.

०७.०९.२५ या लेखातील शेवटचा भाग…




७/९/२५

गटे : हा पाहा खरा मनुष्य Gate:Yeah,look,real man

आठव्या शतकातील तरुण स्त्री-पुरुष अर्वाचीन होते. आजच्या तरुण स्त्री-पुरुषांप्रमाणेच तेही जगाविषयी असंतुष्ट होते.ज्या जगात ते वावरत,ते त्यांना समाधानकारक वाटत नसे.स्वतःच्या आशा-आकांक्षांना साजेल,आपल्या हृदयाच्या भुकांना व वृत्तींना संतोषवील असे नवे जग निर्मिण्याची त्यांनी पराकाष्ठा केली.फ्रान्स व अमेरिका या देशातील बंडांनी राजकीय स्वरूप घेतले.दुसऱ्या देशात विशेषतःजर्मनीत परंपरेविरुद्ध सुरू झालेला झगडा विशेषतःबौद्धिक स्वरूपाचा होता.जर्मन क्रांतिवीरांनी आपल्या देशातील जुनाट कल्पना फेकून दिल्या.पण शासनपद्धती

मात्र जुनाटच ठेवली.त्यांनी फक्त रूढींवर हल्ला चढवला.ते राजसत्तेच्या वाटेला गेले नाहीत,जर्मन क्रांती लेखणीची होती,

तलवारीची नव्हती.त्यांनी आपल्या देशबांधवांची मने मुक्त केली.

त्यांच्या शरीरांकडे फारसे लक्ष दिलेच नाही.ती परतंत्रच राहिली.

स्वतंत्र विचाराला ते मान देत.पण स्वतंत्र कृतीवर त्यांचा विश्वास नव्हता. देवाला त्यांनी उडवून दिले.तरी राजासमोर मात्र ते वाकले,नमले.जोहान वुल्फगैंग गटे 


हा या बौद्धिक क्रांतिकारकांचा पुढारी होता.वयाच्या सहाव्या वर्षीच त्याने ईश्वराविरुद्ध बंड केले.सातव्या वर्षी माणसांनी चालवलेल्या अन्यायांविरुद्ध तक्रार केली.आठव्या वर्षी लॅटिन भाषेत एक निंबध लिहून त्याने प्राचीन ग्रीकांच्या व ख्रिश्चनांच्या ज्ञानांची तुलना केली.अकराव्या वर्षी एक कॉस्मॉपॉलिटन कादंबरी सात भाषांत लिहिली,बाराव्या वर्षी द्वंद्वयुद्ध केले,चौदाव्या वर्षी उत्कटपणे स्वतःला प्रेमपाशात अडकवून घेतले. चौऱ्याहत्तराव्या वर्षीही पुन्हा एकदा उत्कट प्रेमपाशात मान गुंतविली व वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी 'फौस्ट' महाकाव्याचे दोन भाग पूर्ण केले.


ट्यूटॉनिक वंशात जन्मलेला हा गटे एक अत्यंत आश्चर्यकारक विभूती होता.त्याचे जीवन व त्याचे कार्य आता आपण पाहू या.


गटेचा जन्म १७४९ साली झाला.त्याचे आजोबा शिंपी होते,

पणजोबा लोहार होते.शिंप्याने आपल्या मुलाला प्रतिष्ठित मनुष्य बनवले.गटेचा बाप जोहान्स कॅस्पर हा फ्रैंकफुर्ट येथील शाही सल्लागार झाला व आपण गरीब कुळात जन्मलो,हे लवकरच विसरून गेला.आपल्या पूर्वजांपैकी एक लोहार होता व एक शिंपी होता हे त्याने कधीही सांगितले नाही.व्हॉल्टेअरप्रमाणेच,तोही जन्मतः मरणोन्मुख होता व त्याची प्रकृती ठीक नव्हती.पण पुढे ती चांगली झाली.व्हॉल्टेअर नेहमी शरीर-प्रकृतीच्या बाबतीत रडत असे,तसे फारसे रडण्याची पाळी गटेवर आली नाही.त्र्याऐंशी वर्षांच्या दीर्घ जीवनात तो फक्त तीनदाच आजारी पडला.

निरोगी शरीर व निरोगी मन वाट्यास येणाऱ्या फारच थोड्या लोकांपैकी गटे एक होता.


तो घरीच शिकला.त्याचा बाप ग्रीक व लॅटिन या भाषांचा पंडित व शिस्तीचा मोठा भोक्ता होता.पित्याने एक अभ्यासक्रम आखला व तो मुलाकडून पुरा करून घेतला.पण या अभ्यासाने त्याची बुद्धी प्रगल्भ झाली, तरी कल्पनाशक्ती मात्र वाढली नाही.गटेची आई साधी, सरळ,सुंदर,आनंदी,बहुश्रुत व मनमोकळी होती.तिने बरेच वाचले होते.गटे जन्मला,तेव्हा ती फक्त अठरा वर्षांची होती.ती स्वतःच रचलेल्या गोष्टी मुलाला सांगे व त्यानी पात्रे निर्माण करण्यात तद्वतच त्यांची संविधानके तयार करण्यात त्याची मदत घेई.उत्तेजन देऊन तिने गटेच्या ठायी काव्यात्मक शक्ती जागृत केली.गटे म्हणतो,"जीवनाची गंभीर दृष्टी मी पित्याजवळून घेतली व गोष्टी सांगण्याचे प्रेम मातेजवळून घेतले." गटेने कायद्याचा अभ्यास करावा अगर प्राध्यापक व्हावे असे त्याच्या पित्यास वाटे.पण गटेला कायद्याची वा अध्यापनाची आवड नव्हती.वडील नाखूश होऊ नयेत म्हणून तो १७६५ लीपझिग विद्यापीठात दाखल झाला.

पण स्वतःला राजी राखण्यासाठी पुस्तकांचा विद्यार्थी होण्याऐवजी तो जीवनाचा विद्यार्थी झाला.त्याचा बाप सुखवस्तू होता.तो त्याला भरपूर पैसे पाठवून देई. त्यामुळे त्याला विवंचना माहीत नव्हती.गटे घरच्या रूढीमय जीवनाची बंधने तोडून उड्डाण करू इच्छित होता,जगातील जीवनाच्या बेछूट वाटांनी तो जाऊ लागला व प्रयोग करू लागला.त्याला गुरुजनांविषयी यत्किंचितसुद्धा आदर वाटत नसे.आपल्या प्राध्यापकांच्याइतकेच आपणालाही देवाविषयी व जगाविषयी ज्ञान आहे,असे गटेला वाटे.


वर्गाची खोली सोडून लोकांच्या घरी गेल्यास अधिक ज्ञान व अनुभव मिळवता येईल,अशी त्याची समजूत होती."लोकांच्या संगतीत, बैठकीत, नाचगाण्यात, नाटके पाहण्यात,मेजवान्यांत व रस्त्यातून ऐटीने हिंडण्यात वेळ कसा छान जातो! वेळ किती पटकन निघून जातो हे समजतही नाही!


 खरेच,किती सुंदर काळ जातो हा! पण खर्चही फार होतो.माझ्या पिशवीवर किती ताण पडतो हे सैतानालाच माहीत!"असे गटे म्हणे.या वेळच्या गटेच्या असंयमी व उच्छृंखल जीवनाविषयी त्याचा एक विघार्थी बंधू लिहितो,'झाडांवर अगर दगडधोंड्यांवरही एक वेळ परिणाम करता येईल.पण गटेला शुद्धीवर आणणे कठीण आहे.' पण तो आपणहोऊन शुद्धीवर आला.तो जन्मभर मदिरा व मदिराक्षी यांच्या बाबतीत प्रयोग करीत होता.जे अनुभव येत,त्यांचे तो काव्यात रूपांतर करी व ते अमर करी.लीपझिग येथील समाजाविषयी जे काही शिकण्याची जरुरी होती,ते सारे शिकून त्याने लीपझिग सोडले व तो एकांतासाठी खेड्यात गेला.तिथे तो दूरवर फिरायला जाई. शेक्सपिअर व होमर वाची आणि स्वतःची काव्यमय स्वप्ने मनात खेळवी.गटेचे जीवन-ध्येय एकच होते.काव्य हा त्याचा आत्मा होता.त्यासाठीच त्याचे जीवन होते.त्याने अगदी बालपणातच वाङ्‌मयीन कार्याला सुरुवात केली होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्याचे पहिले नाटक प्रसिद्ध झाले.या सतरा वर्षांच्या मुलाने कोणत्या विषयावर नाटक लिहिले असेल ? 'विवाहितांचे व्याभिचार व दुष्ट प्रकार' यावर ! नाटकाचे नाव 'पाप-बंधू.' या नाटकातील चर्चा, प्रश्नोत्तरे,वादविवाद वगैरे सतरा वर्षांच्या तरुणाने लिहिणे आश्चर्यकारक वाटते. तारुण्यात लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकात शिकवण असते तशी यातही आहे.जन्मभर पापे केलेल्या व तदर्थ फळे भोगणाऱ्या वृद्ध, दुःखी कष्टी,उदासीन लोकांचे शहाणपण हे या नाटकाचे थोडक्यात सार अगर तात्पर्य आहे.लीपझिगचा हा तरुण तत्त्वज्ञानी मोठ्या दुढ्ढाचार्याचा आव आणून म्हणतो…


"बहुधा आपण सारेच अपराधी आहोत.आपण सारेच चुकतो,पापे करतो. म्हणून सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे सर्वांनी एकमेकांना क्षमा करणे व सर्वांनी एकमेकांचे विसरणे."


लीपझिग येथे गटे अगदी स्वच्छंदपणे वागत होता. तिथे रात्रंदिवस चाललेल्या विषयोपभोगांमुळे गटे जवळजवळ मरणार,असे वाटले.१७६८ सालच्या उन्हाळ्यात तो रक्तस्त्रावाने बराच आजारी पडला.तो बरा झाला व अंथरुण सोडून हिंडू-फिरू लागला. आपल्या बाबतीत निराश झालेल्या पित्याला व आपणावर खूप प्रेम करणाऱ्या मातेला भेटण्यासाठी तो घरी गेला.पुत्र वकील व्हावा अशी पित्याची इच्छा होती. पण तो झाला कवी ! पित्याने पुत्राला योग्य मार्गावर आणण्याची पुन्हा एकदा खटपट केली. त्याला स्ट्रासबर्ग येथे पाठवताना बाप म्हणाला, "आता पुन्हा वेळ गमावू नको. पुरे झाल्या माकडचेष्टा ! मूर्खपणा सोड. डॉक्टर ही कायद्याची पदवी घे." पण येथेही लीपझिगप्रमाणेच त्याचे जीवन सुरू झाले.अभ्यास-पुस्तकी अभ्यास दूर ठेवून तो जीवनाचा अभ्यास करू लागला.कलेत लुडबूड करण्यास त्याने सुरुवात केली.तो स्टेलो खेळावयास व सतार वाजवण्यास शिकला.तो वैद्यकही शिकू लागला. त्याचा काळ कधी तत्त्वज्ञानात,कधी सुखविलासात;तर कधी खान-पान-गानात जाई.तो स्ट्रासबर्ग येथील बुद्धिमंतांचा नेता झाला.त्याची प्रकृती आता चांगली बरी झाली.

तेथील रस्त्यांतून तो एखाद्या ग्रीक देवाप्रमाणे हिंडे.एकदा तो एका उपहारगृहात गेला.तो आत जाताच त्या भव्य व दिव्य तेजस्वी पुरुषास पाहून सारे चकित झाले ! चिमटे व काटे बाजूला ठेवून ते त्याच्याकडे बघत राहिले. तो एके ठिकाणी म्हणतो, "मी यौवनाने जणू मत्त होऊन गेलो होतो!" त्याच्या नसानसांतून तारुण्य भरले होते. ज्यांचा-ज्यांचा त्याच्याशी परिचय होई,ते ते त्याची स्फूर्ती घेऊन जात.त्यांनाही जणू नवचैतन्याचा लाभ होई.तो उत्कृष्ट तलवारबहाद्दर होता.तो घोड्यावरही छान बसे,जर्मनीने कधीही ऐकली नव्हती अशी अत्यंत सुंदर गीते तो जर्मन भाषेत रचू लागला व गाऊही लागला.स्ट्रासबर्गमधील सर्व बुद्धिमंतांची डोकी त्याने फिरवून टाकली!त्याचे स्वतःचे डोके तर नेहमीच फिरत असे.ते स्वस्थ नसे.भावना व विकास यांची त्यात गर्दी असे.तो चटकन प्रेम करी व तितक्याच चटकन ते विसरेही.त्याला कोणी मोहात पाडो अथवा तो कोणाला मोहीत करो,त्यात मिळणाऱ्या अनुभवाचे तो सोने करी.अमर काव्य रची व तो अनुभव गीतात ओतून पुन्हा नव्या साहसाकडे वळे.त्याला जीवनाचा प्रत्येक दृष्टीने अभ्यास करण्याची उत्कंठा असल्यामुळे तो सर्व प्रकारच्या लोकांशी मिसळे,खानावळवाले,त्यांच्या मुली, धर्मोपदेशक,आस्तिक,

नास्तिक,गूढवादी,पंडित.विद्वान लोक,उडाणटप्पू,नाटकमंडळीतील लोक,ज्यू,नाच शिकवणारे वगैरे सर्व प्रकारचे लोक त्याने पाहिले. स्पायनोझाप्रमाणे त्याला प्रत्येकात काही ना काही दिव्य व रमणीय दिसेच. रंगभूमीची तर त्याला विशेषच आवड होती. तो शेक्सपिअरचा मोठा भक्त होता.जर्मन रंगभूमी निःसत्त्व होती.

नाटकात जणू जीवच नव्हता! एलिझाबेथकालीन इंग्रजी नाटकातील जोर,उत्साह, तीव्रता व उत्कटता गटेने जर्मन नाटकात आणण्याचा यत्न केला,तारुण्यातील अपरंपार उत्साह त्याच्या जीवनात उसळत होता.त्याने त्या उत्साहाच्या योगाने केवळ जर्मन कलाच नव्हेत.तर सारे राष्ट्रीय जीवनच संस्फूर्त करण्याचे ठरवले.जर्मनीचा सारा इतिहास त्याने नाट्यप्रसंग शोधून काढण्यासाठी धुंडाळला.आपल्या स्वच्छंद प्रतिभेला भरपूर वाव मिळावा म्हणून त्याने एवढा खटाटोप केला.जर्मन वीरपुरुष गॉटझ व्हॉन बर्लीचिन जेन याच्यामध्ये त्याला नाट्यविषय आढळला.


गॉटझू हा जणू जर्मन रॉबिनहूडच होता. गरिबांना मदत करण्यासाठी तो श्रीमंतांना लुटी.तो धर्मोपदेशक व सरदार यांच्याविरुद्ध होता. त्याने अनेक पराक्रम केले, अनेक साहसे केली.शेतकऱ्यांच्या बाजूने तो लढे,झगडे,धडपडे.गटेची प्रतिभा जागी झाली. परिणामतःएक अती भव्य व प्रक्षोभकारी नाटक निर्माण झाले.काही दिवस ते तरुणांचे जणू बायबलच होते. बेछूटपणाच्या जीवनाचा व स्वच्छंदीपणाच्या नवधर्माचा गटे जणू प्रेषितन बनला ! आणि या सर्व गोष्टी सांभाळून त्याने वडिलांच्या समाधानार्थ एकदाची कायद्यातील डॉक्टर पदवी घेतली. वडिलांनी त्याला पुढील अभ्यासासाठी वेट्झलर येथील सुप्रीम कोर्टाकडे पाठवले.पण तिथे गेल्यावर गटेला काय दिसले? तेथील शाही न्यायाधीशासमोर चालावयाचे वीस हजार खटले शिल्लक पडले होते. त्यांना तीनशे तेहतीस वर्षे लागतील,असा गटेचा अंदाज होता.त्यांचा निकाल लागेल,तेव्हा लागो, स्वतःच्या केसचा निकाल त्याने ताबडतोब लावला. त्याला कायद्याविषयी अतःपर मुळीच आदर राहिला नाही.त्याने 'वाङ्‌मय हेच आपले जीवनकार्य' असे निश्चित केले.


वेट्झलर येथे जरी तो थोडेच दिवस होता,तरी तो तेवढ्या अल्प मुदतीतही फारच वादळी व उत्कट प्रेमात सापडला.पण त्याची प्रेमदेवता लॉटचेन हिचे आधीच एकाशी लग्न ठरलेले होते.त्यामुळे प्रश्न जरा गुंतागुंतीचा होऊन आत्महत्या करावी,असे त्याच्या मनात येऊ लागले.पुष्कळ दिवस तो उशाशी खंजीर घेऊनच झोपे. तो रोज रात्री छातीत खुपसण्याचे धैर्य यावे,म्हणून खटपट करी.अखेर या दुर्दैवी प्रेमप्रकारावर एक कादंबरी लिहून स्वतःला ठार मारून घेण्याऐवजी आत्महत्या करण्याऐवजी कादंबरीतील नायकालाच आत्महत्या करावयास लावण्याचे त्याने ठरवले. 'तरुण वर्थरची दुःखे' ही ती भावनोत्कट कादंबरी.हिच्यात अद्भुत मूर्खपणा आहे, उदात्त सौंदर्यही आहे.जीवनात कोठेच नीट न बसणाऱ्या दुर्दैवी माणसाची ही आत्मकथा आहे.वर्थर हा आजूबाजूच्या जगात मुळीच गोडी न वाटणारा,हळुवार हृदयाचा व भावनोत्कट वृत्तीचा कलांवत आहे.वनात, निसर्गात व शेतात त्याला आनंद होतो.तेथील एकांतात त्याला जणू सोबती मिळतो.एकांत हाच त्याचा मित्र.ही कादंबरी म्हणजे जीवनातील दुःखाचे शोकगीत आहे. मरणातील सुखाचे व आनंदाचे हे उपनिषद अगर स्तोत्र आहे.जर्मन बहुजन समाजावर या पुस्तकाचा अपार परिणाम झाला.वर्थरचा निळा कोट व त्याचे पिवळे जाकीट यांचे अनुकरण सारे जर्मन तरुण करू लागले आणि लॉट्चेनचा पांढरा पोशाख व पिंक बो यांचे अनुकरण मुली करू लागल्या.हे पुस्तक जर्मनीत वर्तमानपत्राप्रमाणे रस्त्यारस्त्यांच्या कोपऱ्यावर विकले जात होते.तिकडे चीनमध्ये चिनी मातीच्या भांड्यांवर वर्थर व लॉट्चेन हे प्रेमी जोडपे चितारले गेले.काही काही अत्युत्सुक व भावनोत्कट तरुणांनी तर आत्महत्या क्लबच स्थापन केले.जीवन समाप्त करण्यासाठी वर्थर-सोसायट्या सुरू करण्यात आल्या.युरोपभर आत्महत्येची साथच पसरली. गटेच्या अलौकिक प्रतिभेचे हे केवढे पूजन ! हा त्याचा केवढा सत्कार ! पण गटेला मात्र आपले स्वतःचे जीवन समाप्त करण्याची इच्छा आता राहिली नाही.आपले प्रेम हे पुस्तक व आपली स्तुती करणारे या साऱ्यांना मागे सोडून तो पुढे चालला नवीन क्षेत्रात नवीन साहसकर्मात तो शिरला.तो जरी रूढींचा द्वेष्टा होता,तरी त्याला अधिकाऱ्यांविषयी आदर वाटे.त्याच्या जीवनात ही वृत्ती खोल मुळे धरून बसलेली होती.तो आपल्या एका मित्रास लिहितो,'ज्यांच्या हाती सत्ता आहे,ज्यांचे वर्चस्व आहे,ज्यांचे प्रभुत्व आहे अशांशी परिचय करून घेण्याबद्दल मी तुला दोष देणार नाही.या जगात राहणाऱ्याला असे करावेच लागते.त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा,हे नीट माहीत असणाऱ्याने मोठ्या लोकांशी,

बड्या अधिकाऱ्यांशी खुशाल संबंध ठेवावेत.' जेव्हा राजा कार्ल ऑगस्ट याने गटेला वायमार येथे आपल्या दरबारी बोलावले,तेव्हा तो ते राजशाही आमंत्रण आनंदाने स्वीकारून लगेच तिकडे गेला.


१७७५ साली तो वायमार येथे गेला,तेव्हा तो फक्त सव्वीस वर्षांचा होता. त्याने आपले उर्वरित आयुष्य तिथेच घालवले.

राजवाड्याजवळच्या उपवनातील एका भवनात तो राह लागला.काव्य व जागरण या दोहोत त्याचा वेळ जाई. तो 'अपॉलो' काव्यदेवतेचाच नव्हे,तर कार्ल ऑगस्ट याचाही एकनिष्ठ भक्त व सेवक बनला.राज्य कसे करावे हे जर्मन राजाला शिकवणारा तो कन्फ्यूशियस होता.पण असे केल्यामुळे त्याला आपले स्वातंत्र्य गमवावे लागले.स्वतःची बंडखोर वृत्ती त्याने आपल्या पुस्तकांपुरती ठेवली,पण खाजगी जीवनात तो अत्यंत आज्ञाधारक असा दरबारी बनला. राजाविरुद्ध तो 'ब्र'ही काढीत नसे.एकदा तो बीथोव्हेनबरोबर फिरत असता राजाचा लवाजमा त्याच्या बाजूने जवळून गेला.बीथोव्हेन स्वतःची कला पूजण्यापलीकडे कशाचीच पर्वा करीत नसे.तो आपली छाती तशीच रुंद ठेवून त्या लवाजम्यामधून बेदरकारपणे निघून गेला.पण गटे कलेपेक्षा राजाचा अधिक पूजक असल्यामुळे त्याने बाजूला होऊन व आपली टोपी काढून अत्यंत गंभीरपणे व नम्रपणे त्याला लवून प्रणाम केला.तो जर्मनीचा खरा सत्पुत्र होता.जगातील कवींचा सम्राट हीपदवी त्याला प्रिय नव्हती,असे नव्हे.त्याला या पदवीचा अभिमान तर होताच.पण कविकुलगुरुत्वाहूनही जर्मनीतल्या एका तुटपुंज्या राजाचा खाजगी चिटणीस म्हणून राहणे त्याला अधिक अभिमानास्पद वाटे.(मानवजातीची कथा हेन्री थॉमस अनुवाद-साने गुरुजी मधुश्री पब्लिकेशन )


कार्ल ऑगस्ट राज्य करी त्या प्रदेशाचे नाव सॅक्सेवायमार,त्याचे फक्त सहाशे शिपायांचे सैन्य होते.पण त्या काळात सैनिक प्रत्यक्ष कार्यापेक्षा शोभेसाठीच अधिक पाळले जात.कितीही लहान राजा असला तरी आपण प्रजेला भव्य-दिव्य दिसावे म्हणून तो सैन्य वगैरे लवाजमा ठेवी.प्रजेच्या राजाविषयी काही कल्पना असतात,त्या तृप्त करण्यासाठी सैन्य ठेवावे लागते.दुसरा एक राजा होता,त्याच्या तर सात ऑफिसर व दोन प्रायव्हेट होते.अठराव्या शतकातील जर्मनीचा हा असा पोकळ डामडौल तसाच भपका होता.गटे अपूर्व प्रतिभेचा पुरुष असला, तरी जर्मन राष्ट्राच उपरिनिर्दिष्ट दुबळेपणा त्याच्याही अंगी होताच. वायमारच्या दरबारात फार काम नसे त्याचे खांदे वाकण्याची पाळी कधीच येत नसे.दरबारचे वातावरण आनंदी असे शिकार व बर्फावरून घसरत जाणे या गोष्टी त्याने लोकप्रिय केल्या.प्रेमप्रकाराल अत्यंत फॅशनेबल करमणुकीचे स्वरूप देणारा गटे एका पत्रात लिहितो, 'आम्ही येथे जवळजवळ वेडे झालो आहोत व सैतानी लीला करीत आहोत.' कार्ल ऑगस्टच् सेवेत त्याने स्वातंत्र्य गमावले.पण मोठ्या लोकांना क्वचितच लाभणारे विश्रांती-प्रेमाचे,विश्वासाचे व फुरसतीचे जीवन त्याला लाभले.त्याचे घर होते,त्याची होती.त्याला कशाचीही कमतरता नव्हती.तो कलोपासक होता.पण सुखासीन होता.तो काही 'सत्यासाठी मरणाला मिठी मारणारा महात्मा अगर संत' नव्हता.सौंदर्यासाठी जगण्याची चिंता करणारा कवी होता..


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!

५/९/२५

संयुगं आणि पेशी / compounds and cells

५.१ बायोकेमिस्ट्रीची सुरुवात…


रक्ताभिसरण कसं होतं ते शोधणाऱ्या हार्वेचं मत न पटणारीही अनेक मंडळी असताना रेने देकार्त (१५९६-१६५०) त्या वेळच्या नावाजलेल्या विचारवंताला मात्र हार्वेचं म्हणणं पटलेलं होतं.


त्याच्या म्हणण्याप्रमाणे माणसाचं शरीर म्हणजे वेगवेगळी यंत्रं एकत्र येऊन तयार झालेलं संयुक्त यंत्रच आहे.देकार्तच्या काही थिअरीज चुकीच्याही होत्या,पण त्याचा प्रभाव मात्र भरपूरच होता.त्यातूनच जिओवानी बोरेली (१६०८-१६७९) यानं आपल्या शरीरातले स्नायू कसे काम करतात याचा शोध लावला होता.आपली हाडं आणि स्नायू ही तराफ्यासारखी (Lever) कशी काम करतात हे त्यानं दाखवून दिलं होतं.

तराफ्याचं हेच तत्त्व त्यानं फुफ्फुसं, पोट अशा शरीरातल्या इतरही अवयवांना लागू करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता.पण तो तितकासा यशस्वी झाला नव्हता.


कोणत्याही सजीवाच्या शरीरातल्या सगळ्याच नाही तरी काही अवयवांमधल्या क्रिया यंत्रासारख्या काम करतही असतील.पण काही कामं कदाचित रासायनिकही असतील का? रसायनशास्त्रातली अ‍ॅसिड्स आपल्या शरीरातही काही कामं करत असतील का? धातूच्या एका पत्र्याला होल पाडायचं काम जसं खिळा हातोडीनं करता येतं तसंच ते अ‍ॅसिडनंही करता येतंच की.असा विचार जाँ बाप्टिस्टा फॉन हेल्मोंट (Jan Baptista van Helmont) (१५७७-१६४४) या पॅरासेल्ससचा शिष्य असलेल्या फ्लेमिश अल्केमिस्टच्या डोक्यात चमकला आणि त्यानं प्रयोग करायला सुरुवात केली.


(सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन..)


हार्वेच्याच काळातला होता.अर्थात,या आधीही त्यानं कचरा,

दलदल,चिखल आणि घाण यांच्यापासून अळ्या, माश्या आणि उंदरासारखे जीव अचानक तयार होतात का याबद्दलच्या काही रेसिपीज लिहन ठेवल्या होत्या. आता झाडं कशी वाढतात,ते कोणती रसायनं तयार करतात हे शोधायच्या तो मागे लागला.


हे शोधताना त्यानं मातीत एक विलोचं झाड लावलं.गंमत म्हणजे त्याआधी त्यानं ती माती तराजून मोजून घेतली होती. आणि पुढची पाच वर्षं त्यानं त्या झाडाला फक्त पाणीच घातलं.झाड या पाच वर्षांत १६४ पौंड वजनाचं झालं. आणि मातीचं वजन फक्त दोन औसानंच कमी झालं होतं! मग झाडाचं वजन वाढलं ते कुठून आलं? याचा विचार करताना झाडानं आपलं वजन पूर्णपणे मातीतून घेतलं नाही असा त्यानं बरोबर निष्कर्ष काढला होता.पण त्याच बरोबर त्यानं झाड आपलं वजन पाण्यानं वाढवतं असा चुकीचा निष्कर्ष काढला! पण हेल्मोंटनं हवा आणि प्रकाश यांचा यात विचारच केला नव्हता! या प्रयोगातले निष्कर्ष जरी काही प्रमाणात चुकले असले तरी हेल्मोंट याच प्रयोगामुळे ओळखला जातो असंही म्हटलं जातं.


पण गंमत म्हणजे त्यानंच पुढे हवेसाठी 'एअर' हा शब्द तयार केला.हवेत पाण्याची वाफ असते हेही त्यानंच सांगितलं.गंमत म्हणजे 'कार्बन डाय ऑक्साइड'ला त्यानं 'स्पिरिट्स साल्व्हेस्ट्रिस' (स्पिरिट ऑफ द वूड) म्हटलं होतं.यातूनच त्यानं 'न्यूमॅटिक केमिस्ट्री' (Pneumatic) म्हणजेच वायूंच्या रसायनशास्त्राचा पाया घातला. वायूसाठी 'गॅस' हा शब्दही त्यानंच पहिल्यांदा वापरला आहे.हेल्मोंटचा जन्म कधी झाला याबद्दल खूपच गोंधळ आहे.काहींच्या मते त्याचा जन्म १५७७ मध्ये झाला तर काही कागदपत्रांमध्ये तो १५७९ असा लिहिलाय तर काही ठिकाणी तो १५८० लिहिलेला आढळतो.त्याच्या मृत्यूची नोंद मात्र सगळीकडे १६४४ मध्ये झाल्याची आहे.पण जन्माच्या तारखेच्या घोळाप्रमाणेच त्याचं नावही अनेक प्रकारे लिहिलं जातं.या गोंधळापेक्षा त्यानं बायोकेमिस्ट्री या विज्ञानशाखेत केलेलं संशोधन फारच महत्त्वाचं आहे.कदाचित,यामुळेच शेक्सपीअर म्हटला असावा नावात काय आहे ?


हेल्मोंट आपल्या पाच भावंडांत सगळ्यात लहान होता. त्याला लहानपणापासूनच विज्ञानात गती होती.पण आपल्याला नेमकं कोणतं विज्ञान आवडतं हे मात्र त्याला कळत नव्हतं शेवटी एकदाचा त्यानं मेडिकलला प्रवेश घेतला,पण तेही शिक्षण मध्येच सोडून तो चक्क देशाटनाला निघून गेला.पुढची काही वर्षं त्यानं स्वित्झर्लंड,इटली, फ्रान्स,जर्मनी आणि इंग्लंड या देशांत फिरण्यात घालवली.मायदेशी आल्यानंतर १५९९ मध्ये त्यानं आपलं मेडिकलचं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. त्याच दरम्यान तिथे प्लेगची मोठी साथ आली.


हेल्मोंटनं मग 'ऑन प्लेग' या नावाचं प्लेगबद्दलचं पुस्तक लिहिलं.ते पुस्तक इतकं चांगलं होतं,की ते चक्क न्यूटननंही वाचलं होतं म्हणजेच या पुस्तकाची न्यूटनपर्यंत ख्याती पोहोचली होती!


१६०९ मध्ये त्याला शेवटी आपली डॉक्टरकीची पदवी मिळाली.

त्याच वर्षी त्यानं मागरिट नावाच्या एका श्रीमंत घरातल्या मुलीशी लग्न केलं.सासुरवाडीही आलेल्या भरपूर संपत्तीमुळे त्याला पैसे कमवायची फारशी गरजच पडली नाही.त्यामुळे त्यानं थोडाच काळ डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केली आणि तो पुढे जन्मभर आपल्या संशोधनकार्यात मग्न झाला.


आपल्या सभोवतालची हवा ही अनेक वायूंचे मिश्रण असते हे हेल्मोंटच्याच पहिल्यांदा लक्षात आलं.त्यानंच वायूला गॅस हे नाव सुचवलं.याबाबत त्यानं पुढे बरंच संशोधन केलं.याशिवाय,त्यानं प्रयोग करण्यावर फार भर दिला होता.स्वतः पॅरासेल्ससचा विद्यार्थी असूनही त्यानं पॅरासेल्ससनं केलेल्या चुकाही शोधल्या.वनस्पतींवर प्रयोग करून त्यानं वस्तुमान अक्षय्यते (मास कंझर्वेशन) चा नियम शोधून काढला होता.


याशिवाय त्यानं प्राण्यांच्या शरीरात अन्नाचं पचन कसं होतं यावरही खूपच संशोधन केलं होतं.पूर्वी शरीराच्या उष्णतेमुळे अन्न शिजतं अशी समजूत होती.पण यावर हेल्मोंटनं थंड रक्ताचे प्राणी कसे अन्न पचवत असतील असं विचारून अन्न हे शरीरातल्या उष्णतेमुळे नाही तर शरीरातल्या रसायनांमुळे पचतं हे सांगायचा प्रयत्न केला.तो जवळपास एन्झाईम या संकल्पनेच्या जवळ येऊन पोहोचला होता.


हेल्मोंटनं सुरू केलेली ही बायोकेमिस्ट्रीची परंपरा इतर अनेकांनी पुढे नेली.त्यात फ्रांझ दे ला बो म्हणजेच फ्रान्सिस साल्व्हियस (Franz De la Boe / Fransciscus Sylvius) (१६१४ -१६७२). यानं तर प्राण्यांचं शरीर म्हणजे एक रासायनिक कारखानाच असतो असं म्हणणारी टोकाची भूमिका घेतली. अन्नपचन ही फर्मेंटेशनसारखीच रासायनिक क्रिया असते असं त्याचं म्हणणं होतं आणि ते काहीअंशी खरंही होतं.अन्नपचन ही सहा पायऱ्यांनी होणारी प्रक्रिया असते असं त्याचं म्हणणं होतं.

आपल्या शरीराची निरोगी अवस्था ही त्यातल्या वेगवेगळ्या रसायनांच्या संतुलनामुळे प्राप्त होते,असंही त्याचं म्हणणं होतं. थोडक्यात,आपल्या शरीरातलं अ‍ॅसिडचं प्रमाण कमी जास्त झालं तर आपण आजारी पडतो असं त्याचं म्हणणं होतं.फ्रान्सिस साल्व्हियसचा जन्म १५ मार्च १६१४ या दिवशी झाला.

जन्माच्या वेळी या डच वैज्ञानिकाचं नाव फ्रांझ दे ला बो होतं.तो डॉक्टर, वैज्ञानिक,केमिस्ट आणि ॲनॅटॉमिस्ट सगळं काही होता. लहानपणीच त्याला रेने देकार्त,हेल्मोंट आणि विल्यम हार्वे यांच्या थिअरीज पाठ झाल्या होत्या.हार्वेच्या रक्ताभिसरणाचा तो खंदा पुरस्कर्ता होता.


त्यानं प्रोटेस्टंट अ‍ॅकॅडमी ऑफ सेडानमधून वैद्यकाची पदवी घेतली होती.नंतर त्यानं डॉक्टरकी करायला सुरुवात केली.पण तरीही त्यानं आपलं संशोधन सोडलं नाही.पुढे त्यानं पल्मनरी सर्क्युलेशन चाही पुरस्कार केला.त्यानं प्राण्यांच्या हालचालींवरही संशोधन केलं होतं.१६६९ मध्ये त्यानं मुलांना शिकण्यासाठी पहिली रसायनशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली होती.त्याच्या नंतर लायडन विद्यापीठातल्या बायॉलॉजी इन्स्टिट्यूटमधल्या त्या पूर्ण इमारतीलाच साल्व्हियसचं नाव दिलं गेलं.तिथंच त्यानं आपले शिष्यं जाँ स्वॅमरडॅम, रेग्नियर डी ग्राफ (ग्राफायन फॉलिकल फेम), नील्स स्टेनसेन आणि बर्चर्ड दे व्होल्डर या वैज्ञानिकांना घडवलं !


जवळपास सगळ्याच सजीव क्रियांमध्ये आणि आजारांमध्ये कुठे न कुठे रसायनांचा संबंध असतोच असं त्यानं दाखवून दिलं.

रसायनशास्त्राचा अभ्यास केल्यानंतरच आपण आपल्या शरीरात मीठ आणि इतर पदार्थ कसे वापरले जातात हे समजू शकतं हे त्याच्या लक्षात आलं होतं.त्यानं पोटातल्या काही रसायनांचा आणि लाळेचा अभ्यास केला होता.त्यावरून तो पचन ही अ‍ॅसिड्स आणि बेसेस (अल्कली) यांनी घडवून आणलेली रासायनिक क्रिया आहे या मतापर्यंत तो आला होता.शिवाय,त्यानं मानवी मेंदूचाही अभ्यास केला होता.त्याच्या नावावरूनच मेंदूच्या एका भागाला 'साल्व्हियन फिशर' म्हणतात. साल्व्हियन अ‍ॅक्विडक्ट हाही भाग यामुळे ओळखला जातो.थोडक्यात, साल्व्हियसनं अनेक प्रांतात डोकावलं आणि सजीवांमधल्या रसायनशास्त्राचा पाया घातला! इतकं असूनही हा सगळा अभ्यास रसायनांच्या नावानंच चालला होता.'बायोकेमिस्ट्री' ही संज्ञा मात्र कार्ल न्यूबेर यानं १९०३ मध्ये पहिल्यांदा वापरली !


३/९/२५

शिकणं एक देणगी / Learning is a gift

रे ड स्टीव्हन्सच्या मृत्यू पत्राच्या अंतर्गत त्याच्या पुतणनातावाला मिळणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या आणि अनेक संभाव्यता असणाऱ्या,मी अशील किंवा मित्रासाठी आजपावेतो केलेल्यांमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी होत्या.जेसनबरोबरच्या वर्षभर चालणाऱ्या प्रवासातल्या चवथ्या महिन्यामध्ये आम्ही प्रवेश केला. आम्ही कितपत प्रगती केली याबद्दल मला खात्री वाटत नव्हती.त्याच्यात सुधारणांची लक्षणं दिसत होती.पण त्याचा भांडखोर,अहंमन्य आणि आप्पलपोट्या स्वभाव आयतोबाचं आयुष्य जगण्यामुळे आलेला अजूनही अधून मधून डोकं वर काढत होता.


( सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS )


कॉन्फरन्स रूममधल्या टेबलाजवळ आम्ही मासिक परिपाठाला सुरूवात करणार,तोच मिस हेस्टिंग्ज व्हिडिओ टेप सुरू करण्याआधीच त्यानं नाक खुपसलं.


"हे बघा आतापर्यंत तुम्ही जे जे सांगितलंत ते ते सर्व मी केलंय.

आणि सर्व व्यवस्थित आणि चांगलं पण झालंय. पण आपण कुठं चाललोय आणि शेवटी मला काय मिळणार आहे याची मला कल्पना यायला हवी. आयुष्यातलं एक वर्ष मला वाया घालवता नाही येणार."


थोडा वेळ मी जेसनकडे पाह्यलं आणि मी काय बोलावं असं रेडला वाटलं असतं याचा विचार करू लागलो. शेवटी मी उत्तर दिलं.

"जेसन,मला वाटतं आजपर्यंतचं तुझं सगळं आयुष्य म्हणजे वाया घालवलेल्या वर्षांची मालिकाच आहे.तुझ्या त्या चुलत आजोबांच्या इच्छापत्राचा हा एक वर्षाचा कायदेशीर अडसर तुझ्या आजवरच्या आयुष्यात सुधारणाच करणारा होईल.पण तरीही तुला केव्हाही हे वेळापत्रक थांबवण्याचा पर्याय आहेच." तो माझ्यावर खेकसला,"या सगळ्यातून मला काय मिळणार याची तुम्ही मला कल्पना देऊ शकत नाही का मग मला ठरवता येईल की हे सगळं त्या मोलाचं आहे किंवा नाही"


मी माझा कोर्टरूममध्ये वापरतो तो कटाक्ष टाकून म्हणालो,"या प्रक्रियेतलं प्रत्येक पाऊल रेड स्टिव्हन्सनं सांगितल्याप्रमाणेच घेण्याचं माझ्यावर बंधन आहे.तसं करण्यानं कर्तव्य,आदर आणि मैत्री यांच मी पालन करतो.या बाबतीत मला पर्याय नाहीये.तुझ्या समोर खरंतर एक पर्याय आहे.एक तर खेळ चालू ठेवायचा किंवा सोडून द्यायचा,पण जर तो खेळायचा तर त्याचे नियम पाळणं आलंच.तुला यातलं काही समजायचं राह्यलंय का ?"


जेसनने आणि मी डोळ्याला डोळे भिडवले.रोखून पहाण्याची आमची स्पर्धाच। सुरू झाली.ती स्पर्धा आमच्या इच्छाशक्तींची ध्योतक होती.त्याच्या दुर्दैवाने ही स्पर्धा विषम होती - माझ्या बाजूला अशा कसोटीच्या चाचण्यांचा ऐशी वर्षांचा अनुभव,तो अजून नवखा आणि तोही रेड स्टीव्हन्सच्या त्याच्यावरच्या लोभामुळे त्याच्यावर आलेल्या कसोटीमुळे.


शेवटी तो नजर चुकवून तोंडातल्या तोंडात पुटपुटला, "बरंय,आपण व्हिडिओ सुरू करू या."


पडद्यावर रेड स्टीव्हन्स दिसला.पहिल्यापेक्षा जरा जास्त करारीपणा दर्शविणारा वाटला.एकेक अडथळा पार करताना वाटायला लागलं की आमच्या समोरचा आता येऊ घातलेला अडथळा जास्त महत्वाचा आणि जास्त अर्थगर्भीत आहे.


रेडनं सुरूवात केली."जेसन,तुला मी जी देणगी द्यायच्या प्रयत्नात आहे तिच्या पुढच्या भागात विद्या आणि ती शिकून घेणे यांचा अंतर्भाव केलेला आहे.तुम्हा माहीत आहे की मला रीतसर शिक्षण काही घेता आलं नाही. आणि मला ठाऊक आहे की तुला एका बड्या कॉलेजची डिग्री आहे.वरून मोठ्ठ भासणारं ते कॉलेज म्हणजे जणू आळशी धनिक बाळांचं क्रीडांगणच होतें."


जेसन खुर्चीत मागे टेकून बसला,मूठ टेबलावर जोरात आपटली आणि त्यांन दीर्घ सुस्कारा सोडला.


रेडनं सुरू ठेवलं "तुला मला दुखवायचं नाहीये.मला तुला सांगायचंय की मला विद्यापीठ पदवी तसंच औपचारिक शिक्षणाबद्दल आदर वाटतो.पण ते माझ्या आयुष्याचा हिस्सा कधीच नव्हतं.परंतु माझ्याकडे भोवतालच्या जगाबद्दल,

लोकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणि इच्छा होती.मला वाचायला यायला लागल्यानंतर फार काळ काही मी शाळेत जाऊ शकलो नाही.पण वाचणं विचार करणं आणि निरीक्षण करणं यांच्या सामर्थ्यावर मी बऱ्यापैकी शिकलेला माणूस बनलो.


"पण शिकणं ही एक प्रक्रिया आहे.वर्गात नुसतं बसून आणि एक दिवस गाऊन घालून बाहेर पडलं,म्हणजे काही तुम्ही शिक्षित ठरत नाही.दिक्षांत समारंभाला आपण अमेरिकेत कमेन्समेंट (प्रारंभ) म्हणतो.मला वाटतं,त्याचं कारण शिक्षणाचा प्रारंभ तेथून पुढे होतो. त्याआधी झालेलं शालेय शिक्षण म्हणजे भावी काळात येणाऱ्या धड्यांकरता चौकट आणि काही उपकरणं यांचा फक्त पुरवठा असतो. 


"जेसन,अखेरीस सारांश काढायचा तर जीवन तुमच्या संकेतानुसार,

तुमच्या अटीप्रमाणे जगणं हा सर्वोत्तम शिक्षक असतो.माझ्या यशामुळे आणि संपत्तीमुळे तुम्हाला या गोष्टीला मुकावं लागलं.ती हानी भरून काढण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे."


रेड थोडा थांबला,जरा विचारमग्न झाला,आणि मग म्हणाला, "जेसन,तू एका लहानशा सहलीला जाशील. तुझ्याबरोबर मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज येतील.तू जाणार आहेस ते ठिकाण म्हणजे मला सापडलेलं मोठं शिक्षणाचं भांडार आहे.जर खुल्या मनाने गेलास,पाहिलंस तर त्या भांडाराची किल्ली तुला सापडून जाईल.तुला आयुष्यभर ही शिक्षणाची देणगी पुरवेल."एक महिना त्या जागी,ज्ञानसागराकाठी काढल्यानंतर तुला मिस्टर हॅमिल्टनशी विद्या,शिक्षण आणि ज्ञान याविषयी खुलासेवार बोलता येईल अर्थात त्यांचे समाधान झाले पाहिजे.ह्याउपर तुला जरूर लागेल तसतशा इतर बाबी मिस्टर हॅमिल्टन तुला सांगतीलचं. तुझं भलं होवो." मिस् हेस्टिंग्जने उठून व्हिडिओ टेप काढून घेतली आणि कंटाळलेल्या अन् शिणलेल्या आवाजात जेसन म्हणाला,

"आपल्याला कुठं जावं लागणार आहे,आणि काय करायचंय आपल्याला ?"


उठून खोलीबाहेर पडतांना मी बोललो,"जेसन, आपल्याला कुठेही जाऊन काहीही करायचं नाही.पण तुला हे सुरू ठेवायचं असेल तर सकाळी सात वाजता विमानतळावर गेट नं. 27 वर हजर रहा.बरोबर पासपोर्ट,थोडे उन्हाळी कपडे आणि चांगली मनोवृत्ती घेऊन ये."


दुसऱ्या दिवशी सकाळी विमानतळाबाहेर असलेली पार्कीगची जागा हातात सामान घेऊन ओलांडताना जेसनला पाहिलं.मी त्याला म्हटलं,"गुड मॉर्निंग जेसन, विमान सुटायच्या अर्ध्या तास अगोदर तुला आलेलं पाहून मला आश्चर्य वाटतंय."


हसत तो म्हणाला,"शंभरेक यार्डावरून पळत येऊन धडकायचं आणि ते लोक दरवाजा बंद करायच्या आत जेमतेम शिरकाव करायचा,यापेक्षा जरा सवड ठेऊन यावं म्हटलं."


टर्मिनलकडे गाडीचा रस्ता ओलांडून जाताना मिस् हेस्टिंग्जने माझा हात पकडला होता.ती हलकेच मला म्हणाली,"हळूहळू आणि लहानसहान गोष्टींमध्ये का होईना,पण खरीखुरी प्रगती वाटत्येय.


जेसन आम्हाला येऊन मिळाला आणि त्यानं विचारलं, "कुठं चाललोय आपण ?"


मी हसत सांगितलं,"दक्षिण अमेरिकेला."


चालता चालता एकदम थबकून जेसननं विचारलं, "दक्षिण अमेरिकेत कुठं,कुठली युनिव्हर्सिटी आहे आणि कुठलं पदव्युत्तर केंद्र आहे ?"


त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिस् हेस्टिंग्जनं आनंदानं दिलं. "त्याच्याबद्दल तू कधीच ऐकल नसणार,मला अगदी खात्री आहे त्याची." तीन वेगवेगळी उड्डाणे करून आम्ही एका खडखडणाऱ्या टॅक्सीत बसलो.दोन्ही बाजूला दाट झाडी असलेला कच्चा रस्ता होता तो. शेवटी आम्ही एका धूळभरले रस्ते असलेल्या धूळभरल्या खेड्यात पोचलो.जंगलाच्या कडेने थोड्या तोडक्या मोडक्या इमारती होत्या.


रस्त्यावरच्या सर्वात मोठ्या इमारतीसमोर टॅक्सी थांबली आणि आम्ही आमचं सामान खाली उतरवलं.धूळ उडवत टॅक्सी निघून गेली.मोठ्या अविश्वासाने जेसननं विचारलं,"आपण बरोबर ठिकाणी आल्याची खात्री आहे तुम्हाला?" हसतच मी उत्तर दिलं. "शिक्षण आणि विद्या तुम्ही हात घालाल तिथे सापडतात."


खूप आरामशीर पण अजिबात आलिशान नसलेल्या त्या हॉटेलच्या तीन खोल्यांमध्ये आम्ही जाऊन राहिलो. सकाळी नाश्त्यासाठी लॉबीमध्ये भेटायचं ठरलं.मी खूप दमलो होतो.सकाळी धडा चालू होईल,असं साधे सरळ उत्तर देऊन जेसनच्या सगळ्या चौकश्या मी परतवत होतो.दिवसभराच्या प्रवासामुळे मला छान झोप लागली. सकाळी लॉबीमध्ये मिस हेस्टिंग्ज भेटली.लॉबीच्या एका टोकाला जी जेवणाची जागा म्हणून वापरली जात होती. तिथं तिनं एक टेबल राखून ठेवलं होतं.थोड्या वेळातच जेसन आणि आम्ही पटकन एक साधासा नाश्ता उरकला.टेबलापासून उठता उठता मी म्हटलं,"जेसन, हा रस्ता संपेपर्यंत आपण चालत जाणार आहोत.तिथं एक इमारत आहे आणि तिथंच तुझं शिक्षण सुरू व्हायचंय."जेसन उभा राहिला आणि सुस्कारा सोडून म्हणाला, "इथपर्यंत आलोच आहे तर बघतो माझ्या चक्रम काकांच्या मनात काय होत ते."


आम्ही त्या धुळीनं भरलेल्या रस्त्यातून चालत होतो तेव्हा इतरांपेक्षा उठून दिसत असलो पाहिजे.कारण सगळे स्थानिक लोक बाहेर येऊन आम्हाला बघायला लागले आजूबाजूला लाकडाची,नाहीतर पत्र्याची साधीसुधी बांधकामं होती.आणि आम्ही रस्त्याच्या शेवटाला पोचलो तर डाव्या बाजूला इतरांपेक्षा एक जरा मोठी आणि जरा आधुनिक अशी इमारत होती.दारावर स्पॅनिश आणि इंग्रजीत लिहिलेली पाटी होती.


हॉवर्ड 'रेड' स्टीव्हन्स ग्रंथालय.


जेसननं नावाकडे पाहिलं आणि तो हसू लागला."काय चाललंय काय ?"


तीन पायऱ्या चढून जाऊन मी दार उघडलं आणि म्हणालो,"मला वाटतं आत काय आहे ते तुला कळणं जरूर आहे." आम्ही ग्रंथालयात प्रवेश केला.काऊंटरमागच्या एका हसतमुख तरूणीनं आम्हाला अभिवादन केलं.तिनं आमचं स्वागत उत्तम इंग्रजीत केलं.ती म्हणाली, "मला वाटतं तुम्ही मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज आहात."मी मान हलवताच तिचे डोळे चमकले.जेसनकडे बघत ती म्हणाली,"मग तू जेसन स्टीव्हन्स असला पाहिजेस. आमच्या खेड्यात तू आल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

आमच्या खेड्यातल्या सगळ्या लोकांना मदत करणारे सिन्यॉर रेड स्टीव्हन्स फार थोर व्यक्ति होते."


मी घसा साफ करून बोललो."जेसन पुढले चार आठवडे तू या ग्रंथपालाला तिच्या कामात मदत करायची आहे.तुझ्या चुलत आजोबांच्या मनात तुला जे शिकवायचं आहे ते शिकण्यासाठी तुला जे जे लागेल ते सर्व तुला इथे मिळेल." जरूरीपेक्षा जास्तच मोठा आवाज चढवून जेसन म्हणाला "शाळा किंवा कॉलेजच्या शिक्षणात मी विशेष चमकलो नसेन कदाचित.पण याआधी कधीच न आलेल्या या छोट्याशा जागी मला काही शिकण्यासारखं आहे असं अजिबात वाटत नाहीये मला." जेसननं स्वतःभोवती एक चक्कर मारून ते एका खोलीतलं ग्रंथालय पाह्यलं.


"इथंतर जवळजवळ सगळी रिकामी शेल्फ आहेत. तुरळक काही पुस्तकांखेरीज काहीच नाही इथं."


ग्रंथपाल हसून उद्‌गारली,"आजूबाजूच्या काही मैलांच्या परिघातले सगळे लोक इथून नेलेली पुस्तक वाचतात. तुझ्या चुलत आजोबांनी जेव्हा हे ग्रंथालय आम्हांला दिलं,तेव्हा सांगितलं की शेल्फवर नुसती रचलेली पुस्तकं काही कामाची नसतात."


मी आणि मिस् हेस्टिंग्ज तिथून जात असल्याचे मी जेसनला सांगितलं.पण रोज आमचं त्याच्यावर लक्ष असेल हे पण त्याला सांगितलं.पुढचे चार आठवडे मी त्या आल्हाददायक खेड्यात घालवले.मी आणि मिस् हेस्टिंग्जन आजुबाजुला लहानसहान सहली केल्या आणि तिथल्या कारागिरांनी बनवलेल्या काही वस्तु खरिदल्या.लोक खूप अगत्यशील आणि आनंददायी होते.त्यांच्या उपकारकर्त्या रेड स्टीव्हन्सचा मी प्रतिनिधी आहे हे समजल्यामुळे तर आमची विशेषच खातीर झाली.


आम्ही जेसनच्या कामाची दखल रोज घेत होतो.वाटलं त्यापेक्षा जास्त उत्साहानं आणि तत्परतेनं तो कामाला लागला होता.

आलेल्या आणि नेलेल्या पुस्तकांची नोंद करण्यात तो तरबेज झाला.पुष्कळदा ग्रंथालयात येणाऱ्या लोकांबरोबर तो त्यांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल बोलू लागला.ठरलेल्या ह्या सहलीचा हा शेवटचा दिवस येऊन ठेपला.या रमणीय खेड्यातून जाणं अगदी जिवावर आलं.प्रत्येकजण आम्हांला निरोप द्यायला बाहेर आला आणि आम्ही आलो होतो त्याच टॅक्सीनं परत निघालो.

दिवसभराच्या धकाधकीच्या प्रवासानंतर परत बोस्टनला पोचलो.आमचं सामान उचललं आणि आमच्या गाड्या उभ्या करून ठेवलेल्या जागेकडे गेलो.


जेसन आमच्या पुढं चार पावलं होता.वळून आमची वाट अडवून तो म्हणाला,"इथंच जरा थांबा.तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व केलं.मी ग्रंथालयात खूप काम केलं,त्या खबदाडीत असलेलं प्रत्येक पुस्तक मी पाहिलंय.नवीन काहीच तिथं शिकण्यासारखं नव्हतं. मला इतकच दिसलं की तिथली साधीसुधी आणि चांगली माणसं भल्या पहाटे उठून,एका जुन्या फाटक्या पुस्तकासाठी डोंगरदऱ्यातून मैलोनगणती चालत येतात. चार आठवड्यापूर्वी इथून गेलो तेव्हा जे माहीत नव्हतं आणि आता उमगतंय ते म्हणजे शिक्षणाची गुरूकिल्ली म्हणजे त्यासाठीची तळमळ आणि जबर इच्छा हेच होय." मी आणि मिस हेस्टिंग्ज जेसनच्या दोन्ही बाजूस गेलो आणि गाडीकडे चालू लागलो."तरूण माणसा, अभिनंदन.

सोमवारी ऑफिसात ये म्हणजे आता पुढे काय याची चर्चा करू."


गाडीच्या डिकीत मी आणि मिस हेस्टिंग्जनं सामान ठेवलं.आम्ही गाडीत बसून विमानतळाबाहेर पडत होतो. जेसन अजूनही त्या खेड्यातल्या आठवडणींमध्येच रमला असल्याचं दिसत होतं.तो खचितच आम्ही सर्वांनी शिकलेल्या धड्याचा विचार करत होता.

१/९/२५

चैतन्याच्या शोधात असलेली / In search of consciousness

'बॉर्न फ्री' या सिंहाच्या जीवनावरील पुस्तकानं जगप्रसिद्ध झालेल्या जॉय अ‍ॅडॅमसन केनियामधील अरण्यात मारल्या गेल्या.त्यांना सिहानंच मारलं असावं असं वाटतं.व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शिष्यगणाला सांगताना थोर व्याकरणकार पाणिनीला वाघानं मारलं. हत्तीच्या कळपाबरोबर जगणाऱ्या पालकाप्यमुनींसारख्या,रानबकऱ्यांच्या झुंडीबरोबर अहोरात्र राहणाऱ्या अजमुनींसारख्या जॉय अ‍ॅडॅमसनदेखील जंगलातल्या एक तपस्विनीच होत्या.त्यांना साजेल असंच ते मरण होतं.(जॉय अ‍ॅडॅमसन,शब्दाचं धन,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर )

लहानपणापासून जॉयला रानावनात फिरणं आवडायचं.कित्येकदा सोबतीला कुत्रा असायचा.पण तिला एकटंच भटकणं आवडे.कारण कुत्रं रानातल्या दिसेल त्या जनावराचा पाठलाग करी.त्यामुळं तिच्या आवडत्या निरीक्षणात अडथळा येई.रानकाढ्याला बरोबर घेऊन ती रानात भटके.तिच्या घरातल्या वडील मंडळींना शिकार करणं आवडे,परंतु जॉयला ते कधी रुचलं नाही.वाढत्या वयाबरोबर आजूबाजूच्या सुंदर निसर्गाविषयीचं तिचं अतृप्त कुतूहल जागं होत होतं.
सृष्टीचं ते गूढ व अव्यक्त स्वरूप कसं साकार करता येईल,याचा तिला ध्यास लागला.ती अहोरात्र निसर्गाच्या चिंतनात मग्न राही. निसर्ग तसा सारेच पाहतात,पण फारच थोडे तो अनुभवू शकतात.आणि तो भावतोही फारच थोड्यांना.ते सारं व्यक्त करण्यासाठी कुठल्या एका माध्यमाच्या शोधात ती होती.ट्रापाऊ ऑस्ट्रियाची राजधानी.जॉयचा जन्म ट्रापाऊत झाला.ती लहानाची मोठी झाली व्हिएन्ना शहरात.ट्रापाऊजवळ सिफेन मुहल भागात तिच्या आजोळची इस्टेट होती.तिथं ती सुटीत जायची.तो परिसर मोठा निसर्गरम्य होता.इथंच तिच्या भावी आयुष्याचं बीज रुजलं.

ऑस्ट्रिया संगीतप्रेमी देश आहे.तिच्या कुटुंबातले सारेजण एक तर गात किंवा वाद्य वाजवीत. लिहायला-वाचायला येण्यापूर्वी ती पियानो वाजवायला शिकली.आपल्या घराण्याची परंपरा चालवावी,असं तिला ती मोठी झाली.नुसतं वाद्य वाजविण्यानं आत्ता तिचं समाधान होईना.संगीताचा इतिहास व रचना यांचा ती अभ्यास करू लागली.तेव्हा तिचं वय अवध सोळा वर्षांचं होतं.सतराव्या वर्षी ती संगीतशास्त्रातील पदवीधर झाली.पियानो वाजविण्याकरिता तिचे हात अगदीच लहान होते.ती फार चुटपुटली.संगीताची शिक्षिका होणं तिला सहज शक्य होतं,परंतु तिला तो पेशा आवडला नाही.
मनातल्या आनंदलहरींचे तरंग अव्यक्तच राहिले.

चैतन्याचा पुन्हा वेध घेणं चालू राहिलं.सुंदर,सुबक नक्षी असलेली धातूची भांडी ती घडवू लागली.पुस्तकांचं मुखपृष्ठ व पोस्टर्स रंगवू लागली.शिवणकलेत ती पदवीधर झाली.गायनी कलेतील धडे घेऊ लागली.
अति दूर जंगलात मानववंशशास्त्राचा अभ्यास करताना संगीतानं तिला विरंगुळा दिला.सायंकाळी कलेच्या इतिहासाच्या तासाला ती हजर राहू लागली.
सचेतन जीवांचं चित्रण पाहता पाहता ती मग्न होऊन जाई. मोठमोठ्या चित्रकारांच्या स्टुडिओत जाऊन ते काम करताना पाहण्याचा तिला छंदच लागला.रंगांचं मिश्रण कसं करतात ते उभं राहून तासन् तास ती निरखू लागली.तिनं शॉर्टहँड व टायपिंगचा अभ्यासक्रम पुरा केला.अंतिम ध्येय गाठण्यासाठी तिला ह्या साऱ्यांचा खूप उपयोग झाला.सिफेन मुहल येथे टेनिस खेळण्यात व तलावात पोहण्यात घालविलेले दिवस वाया गेले असं तिला आता वाटू लागलं.

जवळच जंगलात एक शिल्पकार राहत होता.त्यानं तिच्या कुटुंबातील वयोवृद्धांसाठी संगमरवरी शवपेट्या तयार केल्या होत्या.तिला त्यांचा आकार व डिझाईन आवडलं.केवळ निर्जीवापेक्षा सचेतन कलाकृतीकडे तिचा कल होता.तिनं एक सुंदर काष्ठशिल्प घडविलं. एका स्त्रीनं आपल्या कुशीत ससा धरला आहे.चंचल अशा गोजिरवाण्या सशाला ती कुरवाळीत आहे,असं दृश्य त्यात होतं.मातीतून आकार निर्माण करण्यापेक्षा दगड व लाकडात हळुवार कोरणं तिला आवडे.परंतु काष्ठातून शिल्प घडविण्यात तिला आगळा आनंद वाटे. तिला दगडापेक्षा लाकूड सजीव वाटे.अधिक अनुकूल वाटे.लाकडातील रेषा-धाग्यांतून शिल्पाला एक सुंदर लय प्राप्त होई.तिची ज्ञानसाधना चालूच होती.व्हिएन्ना येथील प्रख्यात शिल्पकार प्रा.फ्रास यांचं तिनं शिष्यत्व पत्करलं.प्रा.फ्रास शिल्पाचं डिझाईन तयार करीत. त्याला आकार देण्यासाठी बारीकसारीक कामं स्वतः करीत.दुसऱ्यावर अवलंबून राहत नसत.शिल्पाच्या माध्यमाचं मूलभूत तत्त्व तिला इथंच उमजलं.केवळ मानवी शरीराचा बाह्याकार निर्माण करण्यात तिला रस वाटेना.त्या आकार व हावभावामागील मानसशास्त्रीय व शरीरशास्त्रीय कारणमीमांसा तिला जाणून घ्यायची होती.तिनं मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्रयोगशाळेत प्राण्यांची चिरफाड ती करू लागली.

"अगऽऽ,प्रेत पाहताच तू घेरी येऊन पडशील.कशाला हे सारं करत्येस?"असं तिच्या मैत्रिणी तिला म्हणत.परंतु तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं.शरीरातले स्नायू व हाडांच्या प्रतिक्रिया व त्यामागील गूढ तत्त्वाचा ती विचार करी. शेवटी तिनं वैद्यकीय शास्त्र शिकण्याचं मनावर घेतलं.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं काही सोपं नव्हतं.त्यासाठी तिला अगोदर मॅट्रिक पास व्हायला हवं होतं.लॅटिन व शास्त्रीय विषयांची उजळणी करायला हवी होती.पुन्हा शाळेत जायचं!रसायन,
विज्ञान,गणित या अप्रिय विषयांचा अभ्यास करायचा.
परंतु तिनं मनाचा निश्चय केला.ती शाळेत जाऊ लागली.इथं मात्र ती हृदय हरवून बसली.व्हिक्टर क्लार व्हीलवर तिचं मन जडलं. शाळेत असतानाच तिनं त्याच्याशी लग्न केलं.शेवटी ती परीक्षेला बसलीच नाही.नंतरच्या दोन वर्षांत काहीच घडलं नाही.अशा संथ,सुलभ व सुखासीन जीवनात ती आपलं ध्येय गाठू शकणार नव्हती.ती अस्वस्थ झाली.शिल्पकामात पुन्हा रमू लागली. जेव्हा तिच्या पतीनं केनियाच्या प्रवासाला जाण्याचा मनोदय सांगितला तेव्हा ती आनंदली.
व्हिएन्ना कायमचं सोडण्यापूर्वी आजूबाजूचा प्रांत पाहून घ्यावा असं ठरलं.

ते प्रवासाला निघाले.जसा प्रवास अर्ध्यावर सोडावा लागला,तशी त्याची जीवनसाथही तिला सोडावी लागली.प्रवासात पिटर बेलेशी तिची ओळख झाली. तो केनियाच्या वाटेवर होता.एका सहायक वनस्पतिशास्त्रज्ञाच्या शोधात तो होता.त्याला सहायक व सखी भेटल्याचा आनंद झाला.ते दोघं विवाहबद्ध झाले. आता ती नवीन जगाला सामोरी गेली.किती अद्भुत,गूढ व सुंदर होतं ते जग!यापूर्वी न पाहिलेलं अननुभूत. आपण किती क्षुद्र! तिच्या ध्यानी,मनी,स्वप्नी असलेल्या जगापेक्षा वेगळं.खेड्यापाड्यात व सिफेन मुहलमध्ये ती फार सुखी होती.युरोपात तिला साऱ्या ठिकाणी मानवी अस्तित्व जाणवे.परंतु आफ्रिकेत निसर्गानं माणसाला योग्य त्या ठायी ठेवलं होतं.माणसांनी शोधून काढलेल्या आश्चर्यापेक्षा इथल्या अवतीभोवतीच्या निसर्गातल्या चमत्कृती तिला लोभावून टाकीत.निसर्ग व मानवाचं नातं तिला समजू लागलं.१९३८ पासून पाच वर्ष ती वनस्पतिशास्त्राच्या गाढ अभ्यासात रमून गेली.अधून मधून ती पक्ष्यांची चित्रं काढी.सुरवातीला छंदाखातर तिथली आदिम वनस्पती गोळा करून ती रंगवायची.परंतु ह्या व्यापानं तिला पुरत अपाटलं.यापूर्वी तिनं कधी अशी गंभीरपणे चित्रं काढली नव्हती.चित्रकला हा तिच्या आजोळकडून तिला मिळालेला वारसा होता.वृक्ष,
लतावेलींची विविध आकारांची पानं-फुलं ती चितारी.
हुबेहूब रंगवी.त्यात तहान-भूक हरपून बसे.पुढं तिच्या 'ईस्ट आफ्रिकन फ्लोरा' ह्या ग्रंथात ही सारी चित्रं वापरण्यात आली.

१९४४ साली हिंदी महासागरातल्या आश्चर्यकारक अशा पोवळ्याच्या बेटाचा आपल्या पतीबरोबर ती शोध घेत होती.इथं तिला अद्भुत,गूढ अशी जणू गंधर्वनगरीच सापडली.पोवळ्याच्या दऱ्या-खोऱ्या,
खिंडी व शिखरं. चित्रविचित्र खंड.कुठं गुलाबी तर कुठं देदीप्यमान रंगीबेरंगी चकचकीत;आणि हे सारं हिरव्या समुद्रचीलांनी वेढलेलं,प्रत्येक लाटेगणिक हेलावणारं. त्यांच्या चिरा-भेगांतून डोकावणाऱ्या लहरी मासोळ्या, काही सुवर्णापरी तर काही फुलपाखरागत इवल्या इवल्याशा.लपंडाव खेळणाऱ्या.पाण्याबाहेर काढलं की रंग हरपायचे.त्या रंगाची किमया ते अदृश्य होण्यापूर्वी ती कुंचल्यात पकडण्याचा प्रयत्न करीत होती.ही अप्रतिम चित्रं मोम्बासा इथल्या महानगरपालिकेतील सभागृहाचं भूषण झाली आहेत.

पुढील दहा वर्षांत तिनं अनेक विषयांत रस घेऊन चित्रं काढली.कीटक,शंख,शिंपले व सरपटणारे प्राणी चितारले.ती रंगवेडी होती.प्राण्यांच्या नुसत्याच रंगीत प्रतिकृती तिला नको होत्या.त्यात कलाकाराची शैली प्रतिबिंबित व्हायला हवी,असं तिला वाटे.

१९४५ मध्ये ती पुन्हा मानववंशशास्त्राकडे वळली. केनियातील जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या आदिम चालीरीती व दागदागिने यांत ती रमली.ती त्यांची व्यक्तिचित्रं रंगवू लागली.सहा वर्षं तिची भटकंती चालू होती.ही चित्रं तिच्या 'पीपल्स ऑफ केनिया' ह्या पुस्तकात वापरली आहेत.काही नैरोबी इथल्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात विराजमान आहेत.

१९४४ साली तिनं जॉर्ज अ‍ॅडॅमसनशी लग्न केलं.जॉर्ज हा वन्यप्राणिसंरक्षण विभागात अधिकारी होता.त्यामुळं तिला वन्यप्राण्यांचं अगदी जवळून निरीक्षण करता आलं.आईपासून वेगळी झालेली रानटी जनावरांची पिलं त्यांना सापडत.चंचल वृत्तीच्या पिलांची रेखाटन करणं मोठं अवघड असे.कित्येक,
आईच्या पाखरीविना जगू शकत नसत.बहुधा ती एकतर जखमी अवस्थेत असत किंवा मरणाच्या पंथाला लागलेली असत. त्यामुळे ती फार काळ जिवंत राहत नसत.

त्यानंतर दहा वर्षांनी 'एल्सा'नं तिच्या जीवनात प्रवेश केला.ती तिची जिवंत रेखाटन करू लागली.तिच्या स्वभावावर,तिच्या आचरणावर एक नवीन प्रकाश पडत होता.एल्साविषयी एका ठिकाणी ती लिहिते-

'मी तिचा एखादा पंजा हातात घेई.मोठ्या विश्वासानं मला वाटायचं,हीच का ती मृदु,मुलायम मखमली पावलं! जी क्षणात मरणाचं हत्यार होऊ शकतात !'

पिपा चित्तीण व तिच्या पिलांची तिनं खूप रेखाटनं केली.चित्तीण व तिच्या पिलांची हृदयंगम कहाणी मोठ्या प्रासादिक भाषेत जॉयनं कथन केली आहे.एका मोटारीच्या अपघातात तिचा उजवा हात निकामी झाला. एल्सामिअर ह्या तिच्या निवासस्थाना
नजीकच्या जंगलातल्या कोलंबस माकडाचं तिनं काढलेलं चित्र हे शेवटचं ठरलं.ती त्या माकडाचं दोन वर्षे निरीक्षण करीत होती.त्याविषयी तिनं अंतरीच्या मोठ्या जिव्हाळ्यानं लिहिलंय!'साऱ्या माकडांत कोलंबस माकडं मोठी देखणी.लांब काळी शेपटी.
शेपटीला पांढरा गोंडा.ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या घ्यायची. फांद्यांतून शेपटी लोंबत असायची.वृक्षराजीतून येणाऱ्या सूर्याची किरणं त्यावर पडली की चमत्कार व्हायचा.

ती या भूतलावरची दिसायची नाहीत.जणू ती पऱ्यांच्या राज्यातील प्राणी वाटायची.'अशा या सुंदर माकडांच्या नराला चोरट्या शिकाऱ्यांनी मारलं.ती विद्ध मनानं लिहितेय-

'मी मेरू उद्यानातून परतले,तेव्हा तिथल्या लोकांनी मला सांगितलं की,गेले दोन आठवडे फक्त माय-लेकरं दिसतात.मी दिवसभर त्याला शोधीत होते.मी खालून पाहिलं.तो एका झाडावर बसलेला आढळला.त्यानं एका फांदीचा आधार घेतला होता.पण मला पाहताच तो हालेना.तो त्या पिलाचाच बाप होता आणि त्याचा निष्प्राण देह काष्ठवत वाटत होता.'

'तो माग वळून पाहत असावा.दोन्ही बाहू पुढ केलेले. त्यानं कुणाला तरी बाहूत घेतलं होतं. कुणाला? जिवंत नजरेनं अवकाशाकडे तो बघत होता.असहायपणे मान वळवी.पिलू तिच्या कुशीत लपे.ती पुन्हा कधी मोकळेपणी 'जेव्हा जेव्हा मी त्या अश्राप मायलेकरांकडं पाहायची तेव्हा तेव्हा ती खेळली बागडली नाहीत. जरूर तेवढं चरली की,ती पुन्हा एकमेकांना बिलगून उदासपणे बसत.भकास नजरेनं ती आकाशी टक लावून पाहायची.त्यांचं ते मुकेपण व उदात्त दुःख मला सहन व्हायचं नाही.'

अशा अवस्थेत जॉयनं काढलेलं त्यांचं चित्र शोकाचं मूर्तिमंत प्रतीक मानलं जातं.अशा तिच्या हातातून देवदत्त कला निघून जावी,हा केवढा दैवदुर्विलास. परंतु यामुळं तिला एल्सा सिंहिणीच्या जीवनात किंवा पिपा चित्तिणीच्या आयुष्यात खोलवर डोकावता आलं. नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या स्वभावधर्माचा तिला अभ्यास करता आला.

तिला तिचं ध्येय सापडलं.ती वन्य प्राण्यांच्या संरक्षणाविषयी काळजी वाहू लागली.मानव व निसर्ग यांच्या नात्याविषयी ती चिंतनशील बनली. याची परिणती म्हणून 'बॉर्न फ्री' हे सिंहिणीच्या जीवनावर सचित्र पुस्तक तिनं लिहिलं.त्या लागोपाठ 'लिव्हिंग फ्री','फॉर एव्हर फ्री' ही एल्साच्या जीवनावरील आणखी पुस्तकं प्रसिद्ध झाली.तिच्या जीवन-आलेखाकडे पाहिलं की वाटतं, आयुष्यभर तिचा आत्मा चैतन्याच्या शोधात होता. जंगलाचा अनुभव आलेली ती एक थोर तपस्विनी होती. मृत्यूतही सौंदर्य पाहणारी ती एक अलौकिका होती. इम्पाला ह्या सुंदर मृगाविषयी तिनं लिहून ठेवलंय-

'ती इथं पहुडली आहे.तिचं हळुवार प्राणोत्क्रमण झालं. तिच्या देहातून प्राण गेल्याचं मला कळलंदेखील नाही. हात तिच्या हृदयावरच थांबला.जिवंत असताना जे सतेज सौंदर्य होतं,ते मरणांतीही तिच्यात दिसून येत होतं.इतकी नाजूक.इतकी असहाय.तिनं सर्वस्वी आमच्यावर विश्वास टाकला होता.इतरांवर कदाचित ती एवढी विश्वासलीही नसती.आमच्याकडून तिनं कल्याणच अपेक्षिलं होतं.मात्र ती जाताना जीवनातल्या शिवसंकल्पांचा आविष्कार देऊन गेली.