गटेने वायमार हे पन्नास वर्षांपर्यंत जागतिक साहित्याचे केंद्र बनवले.त्याने तिथे बुद्धिमान स्त्री-पुरुष जमवून त्यांच्या नेतृत्वाखाली तत्त्वज्ञानाच्या चर्चा व वाड्मयसेवा करण्याचा उपक्रम केला.तिथे ते प्रेमाशी खेळत.तिथे बांधलेल्या एका छोट्या नाट्यगृहाचा गटे व्यवस्थापक होता.येथेच त्याने त्या शतकातील काही सर्वोत्कृष्ट नाटके लिहिली.तारुण्य होते,तोपर्यंत त्याचे लिखाण वासनोत्कट व क्षोभकारक होते.कधीकधी ते छचोर व छिनालही वाटे.'स्टेला' नामक नाटकात नायक आपली पत्नी व आपले प्रेमपात्र दोघांशीही नीट राहतो व तिघेही सुखी आहेत असे दाखवून त्याने बहुपत्नीतत्वाची तरफदारी केल्याबद्दल बहुजन समाजाने खूप कावकाव केली.तेव्हा घाबरून गटेने नाटकाचा शेवटचा भाग बदलून पुन्हा लिहिला.पत्नी व प्रेयसी दोघींशीही नीट कसे राहावे हे कळेनासे झाल्यामुळे नायक डोक्यात पिस्तूल मारून घेऊन आत्महत्या करून हा प्रश्न सोडवतो,अशी कलाटणी गटेने संविधानकाला दिली.
पण हळूहळू गटेच्या वाङ्मयातील यौवनसहज उन्माद, मादकता,निश्चित बेदरकारपणा व सुखविलास-लोलुपता कमीकमी होत जातात.त्याचा तारुण्यातील जोम ओसरतो.तो अतःपर जगाला नष्ट करू पाहणारा बंडखोर राहत नाही,तर जगाचे स्वरूप समजून घेणारा तत्त्वज्ञानी बनतो.अतःपर त्याचे ध्येय एकच. मरेपर्यंत एकच ध्यास,अधिक प्रकाश,अधिक सौंदर्य तो कुरूपतेतही सुंदरता व नम्रतेतही प्रतिष्ठा पाही.वॉल्ट व्हिटमनप्रमाणे मानव कितीही खालच्या वर्गातील असो, त्याला त्यांच्याविषयी उत्कट प्रेम वाटे. 
तो राजासमोर तर लवेच;पण अत्यंत दीनदरिद्री माणसे भेटली,तर त्यांनाही प्रणाम करी.खाटीक, भटारखानेवाले,मेणबत्त्या करणारे वगैरे लोकांशी मरेपर्यंत त्याची दोस्ती असे.तो म्हणतो, "या लोकांबद्दल मला किती प्रेम वाटते ! माझे प्रेम या खालच्या वर्गातील लोकांसाठी परत आले आहे." खाणीतील लोकांना भेटून आल्यावर तो म्हणाला, "ज्यांना आपण खालच्या वर्गाचे समजतो, तेच देवाच्या दृष्टीने परमोच्च वर्गाचे आहेत."
पददलितांसाठी त्याला वाटणारी सहानुभूती केवळ शाब्दिक अगर आलंकारिक नव्हती.त्याला दरसाल एक हजार डॉलर पगार मिळे.या पगारांतून तो दोन अनोळखी लोकांनाही पोशी.ते मदत मागत व तो नेहमी देई.त्याला स्वतःला कधीही हालअपेष्टा भोगाव्या लागल्या नाहीत.पण तो दुसऱ्यांच्या दुःखाशी सहानुभूती दाखवी.स्वतःच्या जीवनापलीकडे पाहण्याचे कवीचे क्रांतदर्शित्व त्याच्या ठायी होते.
एका लॅटिन कवीने म्हटले आहे,"मानवांची दुःखे पाहून देव रडतात."
त्याप्रमाणे गटे हे अश्रू मानीत होता.त्याचे दैवी मन गरिबांचे दुःख पाहून रडे.बुद्धी व्यापक असेल.
त्यालाच गरिबांची दुःखे जाणता येतात.
गटेची मनोबुद्धी अठराव्या शतकात अत्यंत सर्वगामी व सर्वसंचारी होती.तो कवी,चित्रकार व संगीतज्ज्ञ होता. एवढेच नव्हे,तर वरच्या दर्जाचा शास्त्रज्ञही होता. जगातल्या बाह्य विविधतेच्या मुळाशी एकताच आहे हे त्याने कवीच्या प्रतिभेच्या योगे ओळखले व विज्ञानवेत्ता या नात्याने ही एकता सिद्ध करण्याची खटपट केली, वनस्पतिशास्त्र,शरीरशास्त्र व रंगप्रक्रिया यांचा प्रेपूर अभ्यास करून त्याने वनस्पतींची स्थित्यंतरे' हा ग्रंथ लिहिला व दाखवले की,वैभवशाली पाने म्हणजेच फुले. फुले म्हणजेच पूर्व विकसित पाने.पानांची काव्यात परिणती म्हणजेच फले.फुले म्हणजे पानाचे काव्य ! मानवी कवटीचे बारकाईने निरीक्षण करून त्याने मनुष्य व खालचे प्राणी यांतील दुवा जोडणाऱ्या एका हाडाचा शोध लावला.
मानवजातीशी संबद्ध अशा प्रत्येक विषयाची टेरेन्सप्रमाणे त्यालाही आवड होती.त्याला फक्त युद्धाची आवड मात्र नव्हती.गटे हा शांतात्मा,शांततेचा उपासक होता.कार्ल ऑगस्ट फ्रेंचांशी झगडत होता,
तेव्हा त्याने गटेला सैन्यात बोलावून लष्करी हालचाली पाहण्यास सांगितले.सैन्याची छावणी होती तिथे गटे गेला,पण तेथील लढायांत त्याला रस नव्हता.त्याने छावणीच्या आसपासच्या फुलांचा व दगडांचा अभ्यास केला.त्याला आपल्या राष्ट्राविषयी अत्यंत प्रीती होती,नितांत भक्ती होती.पण तो संकुचित दृष्टीने देशभक्त नव्हता.तो देशभक्तीने भरलेली युद्धगीते रचेना.म्हणून त्याला कोणी बुळा,नेभळा म्हटले,तेव्हा त्याने उत्तर दिले, 
"मला ज्याचा अनुभव आला नाही,असे काहीही मी कधीच उच्चारले नाही... स्वतः प्रेम केल्यावरच मी प्रेमगीते लिहिली.कोणाचाही द्वेष न करता मी द्वेषगीते कशी लिहू?"
आयुष्याच्या मध्यभागी त्याला तीन सुंदर व रमणीय वस्तू मिळाल्या - प्रेमळ पत्नी,गोजिरवाणा पुत्र व निष्ठावंत मित्र.तीन दैवी देणग्या ! वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी,म्हणजे १७८८ साली ख्रिश्टियेन व्हल्पियसशी त्याची गाठ पडली.प्रथम ती त्याची रखेली होती.पण पुढे दोघांनी कायदेशीररीत्या लग्न केले. १७८९ साली त्याला मुलगा झाला.१७९४ साली प्रख्यात नाटककार शिलर याच्याशी त्याचा दाट परिचय झाला.त्या वेळी गटे पंचेचाळीस वर्षांचा होता व शिलर पस्तीस वर्षांचा होता.
गटे व शिलर यांच्या कोणत्याही उत्कृष्ट काव्यापेक्षा त्यांची मैत्री ही अधिक सुंदर कविता होती.त्यांची मैत्री म्हणजे एक देवसदृश मानव व एक मरणोन्मुख माणूस यांची मैत्री होती.शिलर आजारी होता.त्याचे एक फुफ्फुस गेले होते.गटे ग्रीक वृत्तीचा होता.
त्याला निसर्गाविषयी परमादर होता.शिलर ख्रिश्चन होता. त्याला न्यायाची तहान होती.दोघांनीही बंडखोरीपासून प्रारंभ केला. पण दोघेही शेवटी शांत वृत्तीचे झाले. 
गटेची बंडखोरी त्याच्या सुखासीनतेने मारली,शिलरची बंडखोर वृत्ती त्याच्या दारिद्र्यामुळे गारठली.पण दोघांचाही कलेच्या बंडखोरीवर अद्यापही विश्वास होता. सामान्य माणसांचे श्रेष्ठ मानव बनवण्याचे साधन म्हणजे काव्य असे त्यांना वाटे.काव्य हे मानवांना अती मानव करणारे पवित्र माध्यम आहे या विश्वासाने दोघेही सहकार्याने काम करू लागले.सौंदर्योपासना हा त्यांचा धर्म होता.सौंदर्योपासनेच्या साधनेने ते जगाचा व आपलाही उद्धार करू पाहत होते.दोघेही परस्परांच्या प्रतिभेचे पूरक होते.दोघांचे हे सुंदर व मंगल मैत्रीचे प्रेम अकरा वर्षे टिकले व शिलर मरण पावला.गटेने दार लावून घेतले व तो आपल्या खोलीत एखाद्या लहान मुलाप्रमाणे ओक्साबोक्सी रडला.एका मित्राला तो लिहितो, 'माझे अर्धे अस्तित्वच जणू संपले ! माझा अर्धा प्राणच जमू गेला! या काळातील माझी रोजनिशी कोरी आहे. माझे जीवन जणू शून्य, रिक्त झाले होते, असे ती कोरी पृष्ठे दाखवीत आहेत !'
गटे म्हातारा होईतो जगला,पण दीर्घ जीवनासाठी त्याला एकाकीपणा भोगावा लागला.ज्यांच्या ज्यांच्यावर त्याचे प्रेम होते ती सारी मंडळी एकामागोमाग एक गेली.त्याचे प्रियतम मित्र,त्याची पत्नी,त्याची बहीण व अखेर त्याचा एकुलता एक मुलगा सारी सोडून गेली,तरी तो शूरासारखा सतत पुढे-पुढेच जात होता.आपले आनंद व आपल्या वेदना यांना तो अमर गीतांचे स्वरूप देत होता. त्याने एकूण साठ पुस्तके लिहिली.भावगीते, शोकगीते, उपहासगीते,महाकाव्ये,निबंध,कादंबऱ्या,नाटके, भुताखेतांच्या व पऱ्यांच्या अद्भुत गोष्टी, देव, दानव व मानव यांच्या सात्त्विक कथा,दंतकथांवर उभारलेल्या तात्त्विक कथा,सारे प्रकार त्याने अमर कलांवतांच्या हाताने हाताळले व शेवटी आपली सारी प्रतिमा केंद्रीभूत करून त्याने आपले अमर महाकाव्य लिहिले व जगाला दिले,तेच फॉस्ट होय. याचा पूर्वार्ध तो तीस वर्षे लिहित होता.उत्तरार्धाला आणखी पंचवीस वर्षे लागली. फॉस्ट या महाकाव्याचा अर्थ काय,हे आता पाहू या.फॉस्ट लिहिताना मानवजात समजून घेणे हा गटेचा उद्देश होता.मानवजातीच्या शक्तीचे मोजमाप करून मानवांची कर्तव्ये काय,हे त्याला सांगायचे होते. नाटकाची प्राणभूत कल्पना आरंभीच्या काव्यमय प्रस्तावात आहे.मानवी आत्म्याविषयी देव सैतान यांच्या पैज लागते.सैतानाला मर्त्य मानवांविषयी मुळीच आदर नसतो.सैतान म्हणजे शाश्वत संशयात्मा,'काही नाही, सारे निःसार आहे.'असे म्हणणारा.'असण्यापेक्षा नसणे व जीवनापेक्षा मरण अधिक श्रेयस्कर'अशी सैतानाची श्रद्धा होती. नियतीचा जो अनंत खेळ चाललेला आहे. त्यात सैतानाला सार वाटत नसे.ती माणसांना मातीत मिळवण्यासाठी त्यांना निर्मिते.ज्या शाश्वत शून्यातून हा दिकालात चालणारा निरुपयोगी खेळ सुरू झाला. ज्यातून हे विश्वयात्रेला निघाले.त्या पोकळ शून्यात असणेच बरे असे सैतानाला वाटे.सैतानाचे ध्येय एकच, सर्जनाला विरोध,सृष्टीचा खेळ अगर विचार चालू न देणे, मानवांचा व देवाचा सद्भाव नाकारणे.सैतान म्हणतो, "म्हातारा डॉ.फौस्ट- महापंडित व मानवातला अत्यंत सरळ व न्यायी पुरुषसुद्धा.जर मी त्याला मोहात पाडीन तर,अधःपाताच्या अंतिम टोकाला पोहोचेल."पण ईश्वर अधिक जाणतो व म्हणतो,"मनुष्य अपूर्ण आहे व अंधारातून धडपडत जात असतो,
जीवनात सतत पापे करीत असतो,हे खरे.पण आपल्या पापांतूनच तो अंतःप्रेरणेने जणू प्रकाशाकडे जात असतो.देवाचा व सैतानाचा करार होतो व सैतानाने फौस्टला मोह पाडून त्याच्या अमर आत्म्याचा नाश करता येतो का पाहावे, असे ठरते.जर एखाद्या जाणाऱ्या क्षणाला 'हे क्षणा,तू थांब.किती सुंदर आहेस तू!' असे म्हणावे लागून फौस्ट पुढे जायचे नाकारील,तर सैतान विजयी असे ठरायचे होते.फौस्टचा पूर्वार्ध सर्वांना माहीतच आहे.
सैतान फौस्टला नवतारुण्य व जगातील नाना स्वार्थी सुखे देऊन मोहात पाडतो.सौंदर्य,संपत्ती,विषयसुखे, बेछूटपणा,प्रेमाच्या जबाबदाऱ्या न पत्करता त्याची सुखे तेवढी भोगणे,सारे सैतान फौस्टला देत असतो.
सैतानाने सांगितल्याप्रमाणे फौस्ट मागरिटला प्रेमपाशात अडकवतो व स्वतःची पापे व दुःखे भोगायला तिला सोडून जातो.कथेच्या या पहिल्या भागात त्याची सर्वत्र चुका करण्याकडे प्रवृत्ती आहे.तो वासनाविकारांकडे एकदम वळतो,पण या सर्व कुमार्गात असा प्रसंग केव्हाच येत नाही की,जेव्हा एखाघा क्षणाला 'तू किती सुंदर आहेस ! थांब' असे म्हणण्याचा मोह त्याला पडावा.मागरिटच्या मरणानंतर सैतान त्याला निराळ्याच प्रकारच्या मोहात पाडू पाहतो.फौस्ट मानवजातीचे प्रतीक आहे.आपणाला जीवनातील प्रत्येक अनुभव यावा,असे त्याला वाटते.मानवांबरोबर राहावे,श्रमावे,त्यांच्याबरोबरच मानवजातीचे गलबत फुटेल तेव्हाची संकटे भोगावीत,त्या विपत्तीत त्यांचे भागीदार व्हावे असे त्याला उत्कटपणे वाटते.'प्रत्येक वेदनेसाठी हृदय उघडे करून मानवांचे सारे आनंद व त्यांची सारी दुःखे अनुभवण्याची' त्याला तळमळ लागलेली असते.
सैतान फौस्टला एक राजाच्या दरबारचा सल्लागार करतो.तो तिथे गटेप्रमाणे आपल्या कर्तबगारीने व योग्य सेवेने मानसन्मान मिळवतो.राजा कृतज्ञता दाखवतो.पण त्याला सुख मिळत नाही व वर्तमानकाळातील जीवनामुळे तो निराश होतो. भूतकाळातील सारे जीवन-सारे मानवी जीवन तो डोळ्यांसमोर आणू पाहतो.प्राचीन काळातील हेलेनला तोजणू पुन्हा सजीव करतो व तिच्याशी लग्न लावू पाहतो. (जसे गटेने ग्रीक कवींच्या विचारांशी लग्न लावले होते) पण हेलेनला आलिंगन देताच ती अदृश्य होते व तिचा फक्त झगा उरतो.प्राचीन ग्रीसचे जीवन समजून घेणे फौस्टला व गटेलाही जमत नाही.त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी प्राचीनांचा तो सुंदर आत्मा त्यांच्या हाती सापडत नाही.फक्त बाहेरचे कवचच त्यांच्या हाती येते.फौस्ट अशा प्रकारे एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवात जातो.पण त्याला कशातही सुख वाटत नाही.'त्याचे साधे चालणे म्हणजेही सतरांदा ठेचाळणे व पडणे होते.' तो जे जे हाती घेतो.त्यात त्याला अपयशच येते.कधी काळी विजय मिळालाच,
तरी तो पोकळ असतो व त्यामुळे त्याची अधिकच निराशा होते.युद्धातील विजय म्हणजे मरणच होय.दोन्ही बाजूंचा विनाश झालेला असतो. सैतान त्याला मोठमोठी शहरे व राज्ये,किल्ले,सुंदर स्त्रिया,
वैभवशाली कृत्ये,शाश्वत यशःश्री सारे काही देतो. पण फौस्ट शेवटी या सर्व गोष्टींना विटतो.त्याच्या जीवनाची कमान आता पूर्ण होऊन खाली उतरू लागते.
 तारुण्यातील सुखे,मध्यमावस्थेतील महत्कृत्ये यातून त्याला सारभूत असे काहीच मिळत नाही.त्याच्या डोळ्यांवरची झापड उडते.त्याची प्रांती नष्ट होते.चिंता त्याच्या घराचा कब्जा घेते.तारुण्यातील वासनांच्या निखाऱ्यांची जळून राख झालेली असते.तो अंध होतो व जीवनावधी चाललेला सुखाचा उद्योग आता पुरे,असे त्याला वाटू लागते.पण आश्चर्य हे की,ज्या क्षणी तो सुखाचा नाद सोडतो,त्याच क्षणी ते त्याला लाभते. समुद्राजवळची अफाट दलदल दूर करून ती जागा मानवी निवासाला योग्य अशी बनविण्याची एक विशाल कल्पना त्याला सुचते.तो म्हणतो, "येथे मी घरे बांधीन, त्यात लाखो लोक स्वातंत्र्यात नांदतील व रोज काम करून अधिकाधिक स्वतंत्र होतील." हा विचार मनात येऊन त्याचे हृदय आनंदाने भरून जाते.तो आयुष्यभर याच आत्मविस्मृतीच्या ध्येयाकडे नकळत जात होता.हाच तो शेवटचा मंगल क्षण,सोन्याचा क्षण ! याला तो म्हणू शकतो, "क्षणा, थांब. किती रे सुंदर तू!" अखेर त्याच्या जीवनातील परमोच्च क्षण येतो व त्याचे जीवन समाप्त होते.सैतानाचा जय झाला,असे बाह्यतः तरी दिसते.विजयाचे बक्षीस म्हणून सैतान फौस्टचा आत्मा नेऊ इच्छितो,पण गुलाबपुष्पवृष्टीत देवदत फौस्टचा आत्मा स्वर्गात नेतात.कारण,
फौस्टने खूप चुका केल्या,खूप पापे केली,तरी या साऱ्या धडपडीतून व चुकांतून तो नकळत प्रकाशाकडेच जात होता.
स्वर्गात सर्वांत आधी त्याला कोण बरे अभिवादन करते? मागरिटच.तिने पाप केलेले असते व फौस्टच्या पापामुळे तिला मरावे लागलेले असते.पण सारे विसरले जाते, साऱ्यांची क्षमा करण्यात येते.ती आता त्याला सन्मार्ग दाखवते.पुरुषाची शाश्वत उद्धारकर्ती स्त्रीच होय.
०७.०९.२५ या लेखातील शेवटचा भाग…