आठव्या शतकातील तरुण स्त्री-पुरुष अर्वाचीन होते. आजच्या तरुण स्त्री-पुरुषांप्रमाणेच तेही जगाविषयी असंतुष्ट होते.ज्या जगात ते वावरत,ते त्यांना समाधानकारक वाटत नसे.स्वतःच्या आशा-आकांक्षांना साजेल,आपल्या हृदयाच्या भुकांना व वृत्तींना संतोषवील असे नवे जग निर्मिण्याची त्यांनी पराकाष्ठा केली.फ्रान्स व अमेरिका या देशातील बंडांनी राजकीय स्वरूप घेतले.दुसऱ्या देशात विशेषतःजर्मनीत परंपरेविरुद्ध सुरू झालेला झगडा विशेषतःबौद्धिक स्वरूपाचा होता.जर्मन क्रांतिवीरांनी आपल्या देशातील जुनाट कल्पना फेकून दिल्या.पण शासनपद्धती
मात्र जुनाटच ठेवली.त्यांनी फक्त रूढींवर हल्ला चढवला.ते राजसत्तेच्या वाटेला गेले नाहीत,जर्मन क्रांती लेखणीची होती,
तलवारीची नव्हती.त्यांनी आपल्या देशबांधवांची मने मुक्त केली.
त्यांच्या शरीरांकडे फारसे लक्ष दिलेच नाही.ती परतंत्रच राहिली.
स्वतंत्र विचाराला ते मान देत.पण स्वतंत्र कृतीवर त्यांचा विश्वास नव्हता. देवाला त्यांनी उडवून दिले.तरी राजासमोर मात्र ते वाकले,नमले.जोहान वुल्फगैंग गटे
हा या बौद्धिक क्रांतिकारकांचा पुढारी होता.वयाच्या सहाव्या वर्षीच त्याने ईश्वराविरुद्ध बंड केले.सातव्या वर्षी माणसांनी चालवलेल्या अन्यायांविरुद्ध तक्रार केली.आठव्या वर्षी लॅटिन भाषेत एक निंबध लिहून त्याने प्राचीन ग्रीकांच्या व ख्रिश्चनांच्या ज्ञानांची तुलना केली.अकराव्या वर्षी एक कॉस्मॉपॉलिटन कादंबरी सात भाषांत लिहिली,बाराव्या वर्षी द्वंद्वयुद्ध केले,चौदाव्या वर्षी उत्कटपणे स्वतःला प्रेमपाशात अडकवून घेतले. चौऱ्याहत्तराव्या वर्षीही पुन्हा एकदा उत्कट प्रेमपाशात मान गुंतविली व वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी 'फौस्ट' महाकाव्याचे दोन भाग पूर्ण केले.
ट्यूटॉनिक वंशात जन्मलेला हा गटे एक अत्यंत आश्चर्यकारक विभूती होता.त्याचे जीवन व त्याचे कार्य आता आपण पाहू या.
गटेचा जन्म १७४९ साली झाला.त्याचे आजोबा शिंपी होते,
पणजोबा लोहार होते.शिंप्याने आपल्या मुलाला प्रतिष्ठित मनुष्य बनवले.गटेचा बाप जोहान्स कॅस्पर हा फ्रैंकफुर्ट येथील शाही सल्लागार झाला व आपण गरीब कुळात जन्मलो,हे लवकरच विसरून गेला.आपल्या पूर्वजांपैकी एक लोहार होता व एक शिंपी होता हे त्याने कधीही सांगितले नाही.व्हॉल्टेअरप्रमाणेच,तोही जन्मतः मरणोन्मुख होता व त्याची प्रकृती ठीक नव्हती.पण पुढे ती चांगली झाली.व्हॉल्टेअर नेहमी शरीर-प्रकृतीच्या बाबतीत रडत असे,तसे फारसे रडण्याची पाळी गटेवर आली नाही.त्र्याऐंशी वर्षांच्या दीर्घ जीवनात तो फक्त तीनदाच आजारी पडला.
निरोगी शरीर व निरोगी मन वाट्यास येणाऱ्या फारच थोड्या लोकांपैकी गटे एक होता.
तो घरीच शिकला.त्याचा बाप ग्रीक व लॅटिन या भाषांचा पंडित व शिस्तीचा मोठा भोक्ता होता.पित्याने एक अभ्यासक्रम आखला व तो मुलाकडून पुरा करून घेतला.पण या अभ्यासाने त्याची बुद्धी प्रगल्भ झाली, तरी कल्पनाशक्ती मात्र वाढली नाही.गटेची आई साधी, सरळ,सुंदर,आनंदी,बहुश्रुत व मनमोकळी होती.तिने बरेच वाचले होते.गटे जन्मला,तेव्हा ती फक्त अठरा वर्षांची होती.ती स्वतःच रचलेल्या गोष्टी मुलाला सांगे व त्यानी पात्रे निर्माण करण्यात तद्वतच त्यांची संविधानके तयार करण्यात त्याची मदत घेई.उत्तेजन देऊन तिने गटेच्या ठायी काव्यात्मक शक्ती जागृत केली.गटे म्हणतो,"जीवनाची गंभीर दृष्टी मी पित्याजवळून घेतली व गोष्टी सांगण्याचे प्रेम मातेजवळून घेतले." गटेने कायद्याचा अभ्यास करावा अगर प्राध्यापक व्हावे असे त्याच्या पित्यास वाटे.पण गटेला कायद्याची वा अध्यापनाची आवड नव्हती.वडील नाखूश होऊ नयेत म्हणून तो १७६५ लीपझिग विद्यापीठात दाखल झाला.
पण स्वतःला राजी राखण्यासाठी पुस्तकांचा विद्यार्थी होण्याऐवजी तो जीवनाचा विद्यार्थी झाला.त्याचा बाप सुखवस्तू होता.तो त्याला भरपूर पैसे पाठवून देई. त्यामुळे त्याला विवंचना माहीत नव्हती.गटे घरच्या रूढीमय जीवनाची बंधने तोडून उड्डाण करू इच्छित होता,जगातील जीवनाच्या बेछूट वाटांनी तो जाऊ लागला व प्रयोग करू लागला.त्याला गुरुजनांविषयी यत्किंचितसुद्धा आदर वाटत नसे.आपल्या प्राध्यापकांच्याइतकेच आपणालाही देवाविषयी व जगाविषयी ज्ञान आहे,असे गटेला वाटे.
वर्गाची खोली सोडून लोकांच्या घरी गेल्यास अधिक ज्ञान व अनुभव मिळवता येईल,अशी त्याची समजूत होती."लोकांच्या संगतीत, बैठकीत, नाचगाण्यात, नाटके पाहण्यात,मेजवान्यांत व रस्त्यातून ऐटीने हिंडण्यात वेळ कसा छान जातो! वेळ किती पटकन निघून जातो हे समजतही नाही!
खरेच,किती सुंदर काळ जातो हा! पण खर्चही फार होतो.माझ्या पिशवीवर किती ताण पडतो हे सैतानालाच माहीत!"असे गटे म्हणे.या वेळच्या गटेच्या असंयमी व उच्छृंखल जीवनाविषयी त्याचा एक विघार्थी बंधू लिहितो,'झाडांवर अगर दगडधोंड्यांवरही एक वेळ परिणाम करता येईल.पण गटेला शुद्धीवर आणणे कठीण आहे.' पण तो आपणहोऊन शुद्धीवर आला.तो जन्मभर मदिरा व मदिराक्षी यांच्या बाबतीत प्रयोग करीत होता.जे अनुभव येत,त्यांचे तो काव्यात रूपांतर करी व ते अमर करी.लीपझिग येथील समाजाविषयी जे काही शिकण्याची जरुरी होती,ते सारे शिकून त्याने लीपझिग सोडले व तो एकांतासाठी खेड्यात गेला.तिथे तो दूरवर फिरायला जाई. शेक्सपिअर व होमर वाची आणि स्वतःची काव्यमय स्वप्ने मनात खेळवी.गटेचे जीवन-ध्येय एकच होते.काव्य हा त्याचा आत्मा होता.त्यासाठीच त्याचे जीवन होते.त्याने अगदी बालपणातच वाङ्मयीन कार्याला सुरुवात केली होती. वयाच्या सतराव्या वर्षी त्याचे पहिले नाटक प्रसिद्ध झाले.या सतरा वर्षांच्या मुलाने कोणत्या विषयावर नाटक लिहिले असेल ? 'विवाहितांचे व्याभिचार व दुष्ट प्रकार' यावर ! नाटकाचे नाव 'पाप-बंधू.' या नाटकातील चर्चा, प्रश्नोत्तरे,वादविवाद वगैरे सतरा वर्षांच्या तरुणाने लिहिणे आश्चर्यकारक वाटते. तारुण्यात लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकात शिकवण असते तशी यातही आहे.जन्मभर पापे केलेल्या व तदर्थ फळे भोगणाऱ्या वृद्ध, दुःखी कष्टी,उदासीन लोकांचे शहाणपण हे या नाटकाचे थोडक्यात सार अगर तात्पर्य आहे.लीपझिगचा हा तरुण तत्त्वज्ञानी मोठ्या दुढ्ढाचार्याचा आव आणून म्हणतो…
"बहुधा आपण सारेच अपराधी आहोत.आपण सारेच चुकतो,पापे करतो. म्हणून सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे सर्वांनी एकमेकांना क्षमा करणे व सर्वांनी एकमेकांचे विसरणे."
लीपझिग येथे गटे अगदी स्वच्छंदपणे वागत होता. तिथे रात्रंदिवस चाललेल्या विषयोपभोगांमुळे गटे जवळजवळ मरणार,असे वाटले.१७६८ सालच्या उन्हाळ्यात तो रक्तस्त्रावाने बराच आजारी पडला.तो बरा झाला व अंथरुण सोडून हिंडू-फिरू लागला. आपल्या बाबतीत निराश झालेल्या पित्याला व आपणावर खूप प्रेम करणाऱ्या मातेला भेटण्यासाठी तो घरी गेला.पुत्र वकील व्हावा अशी पित्याची इच्छा होती. पण तो झाला कवी ! पित्याने पुत्राला योग्य मार्गावर आणण्याची पुन्हा एकदा खटपट केली. त्याला स्ट्रासबर्ग येथे पाठवताना बाप म्हणाला, "आता पुन्हा वेळ गमावू नको. पुरे झाल्या माकडचेष्टा ! मूर्खपणा सोड. डॉक्टर ही कायद्याची पदवी घे." पण येथेही लीपझिगप्रमाणेच त्याचे जीवन सुरू झाले.अभ्यास-पुस्तकी अभ्यास दूर ठेवून तो जीवनाचा अभ्यास करू लागला.कलेत लुडबूड करण्यास त्याने सुरुवात केली.तो स्टेलो खेळावयास व सतार वाजवण्यास शिकला.तो वैद्यकही शिकू लागला. त्याचा काळ कधी तत्त्वज्ञानात,कधी सुखविलासात;तर कधी खान-पान-गानात जाई.तो स्ट्रासबर्ग येथील बुद्धिमंतांचा नेता झाला.त्याची प्रकृती आता चांगली बरी झाली.
तेथील रस्त्यांतून तो एखाद्या ग्रीक देवाप्रमाणे हिंडे.एकदा तो एका उपहारगृहात गेला.तो आत जाताच त्या भव्य व दिव्य तेजस्वी पुरुषास पाहून सारे चकित झाले ! चिमटे व काटे बाजूला ठेवून ते त्याच्याकडे बघत राहिले. तो एके ठिकाणी म्हणतो, "मी यौवनाने जणू मत्त होऊन गेलो होतो!" त्याच्या नसानसांतून तारुण्य भरले होते. ज्यांचा-ज्यांचा त्याच्याशी परिचय होई,ते ते त्याची स्फूर्ती घेऊन जात.त्यांनाही जणू नवचैतन्याचा लाभ होई.तो उत्कृष्ट तलवारबहाद्दर होता.तो घोड्यावरही छान बसे,जर्मनीने कधीही ऐकली नव्हती अशी अत्यंत सुंदर गीते तो जर्मन भाषेत रचू लागला व गाऊही लागला.स्ट्रासबर्गमधील सर्व बुद्धिमंतांची डोकी त्याने फिरवून टाकली!त्याचे स्वतःचे डोके तर नेहमीच फिरत असे.ते स्वस्थ नसे.भावना व विकास यांची त्यात गर्दी असे.तो चटकन प्रेम करी व तितक्याच चटकन ते विसरेही.त्याला कोणी मोहात पाडो अथवा तो कोणाला मोहीत करो,त्यात मिळणाऱ्या अनुभवाचे तो सोने करी.अमर काव्य रची व तो अनुभव गीतात ओतून पुन्हा नव्या साहसाकडे वळे.त्याला जीवनाचा प्रत्येक दृष्टीने अभ्यास करण्याची उत्कंठा असल्यामुळे तो सर्व प्रकारच्या लोकांशी मिसळे,खानावळवाले,त्यांच्या मुली, धर्मोपदेशक,आस्तिक,
नास्तिक,गूढवादी,पंडित.विद्वान लोक,उडाणटप्पू,नाटकमंडळीतील लोक,ज्यू,नाच शिकवणारे वगैरे सर्व प्रकारचे लोक त्याने पाहिले. स्पायनोझाप्रमाणे त्याला प्रत्येकात काही ना काही दिव्य व रमणीय दिसेच. रंगभूमीची तर त्याला विशेषच आवड होती. तो शेक्सपिअरचा मोठा भक्त होता.जर्मन रंगभूमी निःसत्त्व होती.
नाटकात जणू जीवच नव्हता! एलिझाबेथकालीन इंग्रजी नाटकातील जोर,उत्साह, तीव्रता व उत्कटता गटेने जर्मन नाटकात आणण्याचा यत्न केला,तारुण्यातील अपरंपार उत्साह त्याच्या जीवनात उसळत होता.त्याने त्या उत्साहाच्या योगाने केवळ जर्मन कलाच नव्हेत.तर सारे राष्ट्रीय जीवनच संस्फूर्त करण्याचे ठरवले.जर्मनीचा सारा इतिहास त्याने नाट्यप्रसंग शोधून काढण्यासाठी धुंडाळला.आपल्या स्वच्छंद प्रतिभेला भरपूर वाव मिळावा म्हणून त्याने एवढा खटाटोप केला.जर्मन वीरपुरुष गॉटझ व्हॉन बर्लीचिन जेन याच्यामध्ये त्याला नाट्यविषय आढळला.
गॉटझू हा जणू जर्मन रॉबिनहूडच होता. गरिबांना मदत करण्यासाठी तो श्रीमंतांना लुटी.तो धर्मोपदेशक व सरदार यांच्याविरुद्ध होता. त्याने अनेक पराक्रम केले, अनेक साहसे केली.शेतकऱ्यांच्या बाजूने तो लढे,झगडे,धडपडे.गटेची प्रतिभा जागी झाली. परिणामतःएक अती भव्य व प्रक्षोभकारी नाटक निर्माण झाले.काही दिवस ते तरुणांचे जणू बायबलच होते. बेछूटपणाच्या जीवनाचा व स्वच्छंदीपणाच्या नवधर्माचा गटे जणू प्रेषितन बनला ! आणि या सर्व गोष्टी सांभाळून त्याने वडिलांच्या समाधानार्थ एकदाची कायद्यातील डॉक्टर पदवी घेतली. वडिलांनी त्याला पुढील अभ्यासासाठी वेट्झलर येथील सुप्रीम कोर्टाकडे पाठवले.पण तिथे गेल्यावर गटेला काय दिसले? तेथील शाही न्यायाधीशासमोर चालावयाचे वीस हजार खटले शिल्लक पडले होते. त्यांना तीनशे तेहतीस वर्षे लागतील,असा गटेचा अंदाज होता.त्यांचा निकाल लागेल,तेव्हा लागो, स्वतःच्या केसचा निकाल त्याने ताबडतोब लावला. त्याला कायद्याविषयी अतःपर मुळीच आदर राहिला नाही.त्याने 'वाङ्मय हेच आपले जीवनकार्य' असे निश्चित केले.
वेट्झलर येथे जरी तो थोडेच दिवस होता,तरी तो तेवढ्या अल्प मुदतीतही फारच वादळी व उत्कट प्रेमात सापडला.पण त्याची प्रेमदेवता लॉटचेन हिचे आधीच एकाशी लग्न ठरलेले होते.त्यामुळे प्रश्न जरा गुंतागुंतीचा होऊन आत्महत्या करावी,असे त्याच्या मनात येऊ लागले.पुष्कळ दिवस तो उशाशी खंजीर घेऊनच झोपे. तो रोज रात्री छातीत खुपसण्याचे धैर्य यावे,म्हणून खटपट करी.अखेर या दुर्दैवी प्रेमप्रकारावर एक कादंबरी लिहून स्वतःला ठार मारून घेण्याऐवजी आत्महत्या करण्याऐवजी कादंबरीतील नायकालाच आत्महत्या करावयास लावण्याचे त्याने ठरवले. 'तरुण वर्थरची दुःखे' ही ती भावनोत्कट कादंबरी.हिच्यात अद्भुत मूर्खपणा आहे, उदात्त सौंदर्यही आहे.जीवनात कोठेच नीट न बसणाऱ्या दुर्दैवी माणसाची ही आत्मकथा आहे.वर्थर हा आजूबाजूच्या जगात मुळीच गोडी न वाटणारा,हळुवार हृदयाचा व भावनोत्कट वृत्तीचा कलांवत आहे.वनात, निसर्गात व शेतात त्याला आनंद होतो.तेथील एकांतात त्याला जणू सोबती मिळतो.एकांत हाच त्याचा मित्र.ही कादंबरी म्हणजे जीवनातील दुःखाचे शोकगीत आहे. मरणातील सुखाचे व आनंदाचे हे उपनिषद अगर स्तोत्र आहे.जर्मन बहुजन समाजावर या पुस्तकाचा अपार परिणाम झाला.वर्थरचा निळा कोट व त्याचे पिवळे जाकीट यांचे अनुकरण सारे जर्मन तरुण करू लागले आणि लॉट्चेनचा पांढरा पोशाख व पिंक बो यांचे अनुकरण मुली करू लागल्या.हे पुस्तक जर्मनीत वर्तमानपत्राप्रमाणे रस्त्यारस्त्यांच्या कोपऱ्यावर विकले जात होते.तिकडे चीनमध्ये चिनी मातीच्या भांड्यांवर वर्थर व लॉट्चेन हे प्रेमी जोडपे चितारले गेले.काही काही अत्युत्सुक व भावनोत्कट तरुणांनी तर आत्महत्या क्लबच स्थापन केले.जीवन समाप्त करण्यासाठी वर्थर-सोसायट्या सुरू करण्यात आल्या.युरोपभर आत्महत्येची साथच पसरली. गटेच्या अलौकिक प्रतिभेचे हे केवढे पूजन ! हा त्याचा केवढा सत्कार ! पण गटेला मात्र आपले स्वतःचे जीवन समाप्त करण्याची इच्छा आता राहिली नाही.आपले प्रेम हे पुस्तक व आपली स्तुती करणारे या साऱ्यांना मागे सोडून तो पुढे चालला नवीन क्षेत्रात नवीन साहसकर्मात तो शिरला.तो जरी रूढींचा द्वेष्टा होता,तरी त्याला अधिकाऱ्यांविषयी आदर वाटे.त्याच्या जीवनात ही वृत्ती खोल मुळे धरून बसलेली होती.तो आपल्या एका मित्रास लिहितो,'ज्यांच्या हाती सत्ता आहे,ज्यांचे वर्चस्व आहे,ज्यांचे प्रभुत्व आहे अशांशी परिचय करून घेण्याबद्दल मी तुला दोष देणार नाही.या जगात राहणाऱ्याला असे करावेच लागते.त्यांचा उपयोग कसा करून घ्यावा,हे नीट माहीत असणाऱ्याने मोठ्या लोकांशी,
बड्या अधिकाऱ्यांशी खुशाल संबंध ठेवावेत.' जेव्हा राजा कार्ल ऑगस्ट याने गटेला वायमार येथे आपल्या दरबारी बोलावले,तेव्हा तो ते राजशाही आमंत्रण आनंदाने स्वीकारून लगेच तिकडे गेला.
१७७५ साली तो वायमार येथे गेला,तेव्हा तो फक्त सव्वीस वर्षांचा होता. त्याने आपले उर्वरित आयुष्य तिथेच घालवले.
राजवाड्याजवळच्या उपवनातील एका भवनात तो राह लागला.काव्य व जागरण या दोहोत त्याचा वेळ जाई. तो 'अपॉलो' काव्यदेवतेचाच नव्हे,तर कार्ल ऑगस्ट याचाही एकनिष्ठ भक्त व सेवक बनला.राज्य कसे करावे हे जर्मन राजाला शिकवणारा तो कन्फ्यूशियस होता.पण असे केल्यामुळे त्याला आपले स्वातंत्र्य गमवावे लागले.स्वतःची बंडखोर वृत्ती त्याने आपल्या पुस्तकांपुरती ठेवली,पण खाजगी जीवनात तो अत्यंत आज्ञाधारक असा दरबारी बनला. राजाविरुद्ध तो 'ब्र'ही काढीत नसे.एकदा तो बीथोव्हेनबरोबर फिरत असता राजाचा लवाजमा त्याच्या बाजूने जवळून गेला.बीथोव्हेन स्वतःची कला पूजण्यापलीकडे कशाचीच पर्वा करीत नसे.तो आपली छाती तशीच रुंद ठेवून त्या लवाजम्यामधून बेदरकारपणे निघून गेला.पण गटे कलेपेक्षा राजाचा अधिक पूजक असल्यामुळे त्याने बाजूला होऊन व आपली टोपी काढून अत्यंत गंभीरपणे व नम्रपणे त्याला लवून प्रणाम केला.तो जर्मनीचा खरा सत्पुत्र होता.जगातील कवींचा सम्राट हीपदवी त्याला प्रिय नव्हती,असे नव्हे.त्याला या पदवीचा अभिमान तर होताच.पण कविकुलगुरुत्वाहूनही जर्मनीतल्या एका तुटपुंज्या राजाचा खाजगी चिटणीस म्हणून राहणे त्याला अधिक अभिमानास्पद वाटे.(मानवजातीची कथा हेन्री थॉमस अनुवाद-साने गुरुजी मधुश्री पब्लिकेशन )
कार्ल ऑगस्ट राज्य करी त्या प्रदेशाचे नाव सॅक्सेवायमार,त्याचे फक्त सहाशे शिपायांचे सैन्य होते.पण त्या काळात सैनिक प्रत्यक्ष कार्यापेक्षा शोभेसाठीच अधिक पाळले जात.कितीही लहान राजा असला तरी आपण प्रजेला भव्य-दिव्य दिसावे म्हणून तो सैन्य वगैरे लवाजमा ठेवी.प्रजेच्या राजाविषयी काही कल्पना असतात,त्या तृप्त करण्यासाठी सैन्य ठेवावे लागते.दुसरा एक राजा होता,त्याच्या तर सात ऑफिसर व दोन प्रायव्हेट होते.अठराव्या शतकातील जर्मनीचा हा असा पोकळ डामडौल तसाच भपका होता.गटे अपूर्व प्रतिभेचा पुरुष असला, तरी जर्मन राष्ट्राच उपरिनिर्दिष्ट दुबळेपणा त्याच्याही अंगी होताच. वायमारच्या दरबारात फार काम नसे त्याचे खांदे वाकण्याची पाळी कधीच येत नसे.दरबारचे वातावरण आनंदी असे शिकार व बर्फावरून घसरत जाणे या गोष्टी त्याने लोकप्रिय केल्या.प्रेमप्रकाराल अत्यंत फॅशनेबल करमणुकीचे स्वरूप देणारा गटे एका पत्रात लिहितो, 'आम्ही येथे जवळजवळ वेडे झालो आहोत व सैतानी लीला करीत आहोत.' कार्ल ऑगस्टच् सेवेत त्याने स्वातंत्र्य गमावले.पण मोठ्या लोकांना क्वचितच लाभणारे विश्रांती-प्रेमाचे,विश्वासाचे व फुरसतीचे जीवन त्याला लाभले.त्याचे घर होते,त्याची होती.त्याला कशाचीही कमतरता नव्हती.तो कलोपासक होता.पण सुखासीन होता.तो काही 'सत्यासाठी मरणाला मिठी मारणारा महात्मा अगर संत' नव्हता.सौंदर्यासाठी जगण्याची चिंता करणारा कवी होता..
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!