* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: चैतन्याच्या शोधात असलेली / In search of consciousness

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१/९/२५

चैतन्याच्या शोधात असलेली / In search of consciousness

'बॉर्न फ्री' या सिंहाच्या जीवनावरील पुस्तकानं जगप्रसिद्ध झालेल्या जॉय अ‍ॅडॅमसन केनियामधील अरण्यात मारल्या गेल्या.त्यांना सिहानंच मारलं असावं असं वाटतं.व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शिष्यगणाला सांगताना थोर व्याकरणकार पाणिनीला वाघानं मारलं. हत्तीच्या कळपाबरोबर जगणाऱ्या पालकाप्यमुनींसारख्या,रानबकऱ्यांच्या झुंडीबरोबर अहोरात्र राहणाऱ्या अजमुनींसारख्या जॉय अ‍ॅडॅमसनदेखील जंगलातल्या एक तपस्विनीच होत्या.त्यांना साजेल असंच ते मरण होतं.(जॉय अ‍ॅडॅमसन,शब्दाचं धन,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर )

लहानपणापासून जॉयला रानावनात फिरणं आवडायचं.कित्येकदा सोबतीला कुत्रा असायचा.पण तिला एकटंच भटकणं आवडे.कारण कुत्रं रानातल्या दिसेल त्या जनावराचा पाठलाग करी.त्यामुळं तिच्या आवडत्या निरीक्षणात अडथळा येई.रानकाढ्याला बरोबर घेऊन ती रानात भटके.तिच्या घरातल्या वडील मंडळींना शिकार करणं आवडे,परंतु जॉयला ते कधी रुचलं नाही.वाढत्या वयाबरोबर आजूबाजूच्या सुंदर निसर्गाविषयीचं तिचं अतृप्त कुतूहल जागं होत होतं.
सृष्टीचं ते गूढ व अव्यक्त स्वरूप कसं साकार करता येईल,याचा तिला ध्यास लागला.ती अहोरात्र निसर्गाच्या चिंतनात मग्न राही. निसर्ग तसा सारेच पाहतात,पण फारच थोडे तो अनुभवू शकतात.आणि तो भावतोही फारच थोड्यांना.ते सारं व्यक्त करण्यासाठी कुठल्या एका माध्यमाच्या शोधात ती होती.ट्रापाऊ ऑस्ट्रियाची राजधानी.जॉयचा जन्म ट्रापाऊत झाला.ती लहानाची मोठी झाली व्हिएन्ना शहरात.ट्रापाऊजवळ सिफेन मुहल भागात तिच्या आजोळची इस्टेट होती.तिथं ती सुटीत जायची.तो परिसर मोठा निसर्गरम्य होता.इथंच तिच्या भावी आयुष्याचं बीज रुजलं.

ऑस्ट्रिया संगीतप्रेमी देश आहे.तिच्या कुटुंबातले सारेजण एक तर गात किंवा वाद्य वाजवीत. लिहायला-वाचायला येण्यापूर्वी ती पियानो वाजवायला शिकली.आपल्या घराण्याची परंपरा चालवावी,असं तिला ती मोठी झाली.नुसतं वाद्य वाजविण्यानं आत्ता तिचं समाधान होईना.संगीताचा इतिहास व रचना यांचा ती अभ्यास करू लागली.तेव्हा तिचं वय अवध सोळा वर्षांचं होतं.सतराव्या वर्षी ती संगीतशास्त्रातील पदवीधर झाली.पियानो वाजविण्याकरिता तिचे हात अगदीच लहान होते.ती फार चुटपुटली.संगीताची शिक्षिका होणं तिला सहज शक्य होतं,परंतु तिला तो पेशा आवडला नाही.
मनातल्या आनंदलहरींचे तरंग अव्यक्तच राहिले.

चैतन्याचा पुन्हा वेध घेणं चालू राहिलं.सुंदर,सुबक नक्षी असलेली धातूची भांडी ती घडवू लागली.पुस्तकांचं मुखपृष्ठ व पोस्टर्स रंगवू लागली.शिवणकलेत ती पदवीधर झाली.गायनी कलेतील धडे घेऊ लागली.
अति दूर जंगलात मानववंशशास्त्राचा अभ्यास करताना संगीतानं तिला विरंगुळा दिला.सायंकाळी कलेच्या इतिहासाच्या तासाला ती हजर राहू लागली.
सचेतन जीवांचं चित्रण पाहता पाहता ती मग्न होऊन जाई. मोठमोठ्या चित्रकारांच्या स्टुडिओत जाऊन ते काम करताना पाहण्याचा तिला छंदच लागला.रंगांचं मिश्रण कसं करतात ते उभं राहून तासन् तास ती निरखू लागली.तिनं शॉर्टहँड व टायपिंगचा अभ्यासक्रम पुरा केला.अंतिम ध्येय गाठण्यासाठी तिला ह्या साऱ्यांचा खूप उपयोग झाला.सिफेन मुहल येथे टेनिस खेळण्यात व तलावात पोहण्यात घालविलेले दिवस वाया गेले असं तिला आता वाटू लागलं.

जवळच जंगलात एक शिल्पकार राहत होता.त्यानं तिच्या कुटुंबातील वयोवृद्धांसाठी संगमरवरी शवपेट्या तयार केल्या होत्या.तिला त्यांचा आकार व डिझाईन आवडलं.केवळ निर्जीवापेक्षा सचेतन कलाकृतीकडे तिचा कल होता.तिनं एक सुंदर काष्ठशिल्प घडविलं. एका स्त्रीनं आपल्या कुशीत ससा धरला आहे.चंचल अशा गोजिरवाण्या सशाला ती कुरवाळीत आहे,असं दृश्य त्यात होतं.मातीतून आकार निर्माण करण्यापेक्षा दगड व लाकडात हळुवार कोरणं तिला आवडे.परंतु काष्ठातून शिल्प घडविण्यात तिला आगळा आनंद वाटे. तिला दगडापेक्षा लाकूड सजीव वाटे.अधिक अनुकूल वाटे.लाकडातील रेषा-धाग्यांतून शिल्पाला एक सुंदर लय प्राप्त होई.तिची ज्ञानसाधना चालूच होती.व्हिएन्ना येथील प्रख्यात शिल्पकार प्रा.फ्रास यांचं तिनं शिष्यत्व पत्करलं.प्रा.फ्रास शिल्पाचं डिझाईन तयार करीत. त्याला आकार देण्यासाठी बारीकसारीक कामं स्वतः करीत.दुसऱ्यावर अवलंबून राहत नसत.शिल्पाच्या माध्यमाचं मूलभूत तत्त्व तिला इथंच उमजलं.केवळ मानवी शरीराचा बाह्याकार निर्माण करण्यात तिला रस वाटेना.त्या आकार व हावभावामागील मानसशास्त्रीय व शरीरशास्त्रीय कारणमीमांसा तिला जाणून घ्यायची होती.तिनं मानसशास्त्राचा अभ्यास सुरू केला. प्रयोगशाळेत प्राण्यांची चिरफाड ती करू लागली.

"अगऽऽ,प्रेत पाहताच तू घेरी येऊन पडशील.कशाला हे सारं करत्येस?"असं तिच्या मैत्रिणी तिला म्हणत.परंतु तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं.शरीरातले स्नायू व हाडांच्या प्रतिक्रिया व त्यामागील गूढ तत्त्वाचा ती विचार करी. शेवटी तिनं वैद्यकीय शास्त्र शिकण्याचं मनावर घेतलं.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं काही सोपं नव्हतं.त्यासाठी तिला अगोदर मॅट्रिक पास व्हायला हवं होतं.लॅटिन व शास्त्रीय विषयांची उजळणी करायला हवी होती.पुन्हा शाळेत जायचं!रसायन,
विज्ञान,गणित या अप्रिय विषयांचा अभ्यास करायचा.
परंतु तिनं मनाचा निश्चय केला.ती शाळेत जाऊ लागली.इथं मात्र ती हृदय हरवून बसली.व्हिक्टर क्लार व्हीलवर तिचं मन जडलं. शाळेत असतानाच तिनं त्याच्याशी लग्न केलं.शेवटी ती परीक्षेला बसलीच नाही.नंतरच्या दोन वर्षांत काहीच घडलं नाही.अशा संथ,सुलभ व सुखासीन जीवनात ती आपलं ध्येय गाठू शकणार नव्हती.ती अस्वस्थ झाली.शिल्पकामात पुन्हा रमू लागली. जेव्हा तिच्या पतीनं केनियाच्या प्रवासाला जाण्याचा मनोदय सांगितला तेव्हा ती आनंदली.
व्हिएन्ना कायमचं सोडण्यापूर्वी आजूबाजूचा प्रांत पाहून घ्यावा असं ठरलं.

ते प्रवासाला निघाले.जसा प्रवास अर्ध्यावर सोडावा लागला,तशी त्याची जीवनसाथही तिला सोडावी लागली.प्रवासात पिटर बेलेशी तिची ओळख झाली. तो केनियाच्या वाटेवर होता.एका सहायक वनस्पतिशास्त्रज्ञाच्या शोधात तो होता.त्याला सहायक व सखी भेटल्याचा आनंद झाला.ते दोघं विवाहबद्ध झाले. आता ती नवीन जगाला सामोरी गेली.किती अद्भुत,गूढ व सुंदर होतं ते जग!यापूर्वी न पाहिलेलं अननुभूत. आपण किती क्षुद्र! तिच्या ध्यानी,मनी,स्वप्नी असलेल्या जगापेक्षा वेगळं.खेड्यापाड्यात व सिफेन मुहलमध्ये ती फार सुखी होती.युरोपात तिला साऱ्या ठिकाणी मानवी अस्तित्व जाणवे.परंतु आफ्रिकेत निसर्गानं माणसाला योग्य त्या ठायी ठेवलं होतं.माणसांनी शोधून काढलेल्या आश्चर्यापेक्षा इथल्या अवतीभोवतीच्या निसर्गातल्या चमत्कृती तिला लोभावून टाकीत.निसर्ग व मानवाचं नातं तिला समजू लागलं.१९३८ पासून पाच वर्ष ती वनस्पतिशास्त्राच्या गाढ अभ्यासात रमून गेली.अधून मधून ती पक्ष्यांची चित्रं काढी.सुरवातीला छंदाखातर तिथली आदिम वनस्पती गोळा करून ती रंगवायची.परंतु ह्या व्यापानं तिला पुरत अपाटलं.यापूर्वी तिनं कधी अशी गंभीरपणे चित्रं काढली नव्हती.चित्रकला हा तिच्या आजोळकडून तिला मिळालेला वारसा होता.वृक्ष,
लतावेलींची विविध आकारांची पानं-फुलं ती चितारी.
हुबेहूब रंगवी.त्यात तहान-भूक हरपून बसे.पुढं तिच्या 'ईस्ट आफ्रिकन फ्लोरा' ह्या ग्रंथात ही सारी चित्रं वापरण्यात आली.

१९४४ साली हिंदी महासागरातल्या आश्चर्यकारक अशा पोवळ्याच्या बेटाचा आपल्या पतीबरोबर ती शोध घेत होती.इथं तिला अद्भुत,गूढ अशी जणू गंधर्वनगरीच सापडली.पोवळ्याच्या दऱ्या-खोऱ्या,
खिंडी व शिखरं. चित्रविचित्र खंड.कुठं गुलाबी तर कुठं देदीप्यमान रंगीबेरंगी चकचकीत;आणि हे सारं हिरव्या समुद्रचीलांनी वेढलेलं,प्रत्येक लाटेगणिक हेलावणारं. त्यांच्या चिरा-भेगांतून डोकावणाऱ्या लहरी मासोळ्या, काही सुवर्णापरी तर काही फुलपाखरागत इवल्या इवल्याशा.लपंडाव खेळणाऱ्या.पाण्याबाहेर काढलं की रंग हरपायचे.त्या रंगाची किमया ते अदृश्य होण्यापूर्वी ती कुंचल्यात पकडण्याचा प्रयत्न करीत होती.ही अप्रतिम चित्रं मोम्बासा इथल्या महानगरपालिकेतील सभागृहाचं भूषण झाली आहेत.

पुढील दहा वर्षांत तिनं अनेक विषयांत रस घेऊन चित्रं काढली.कीटक,शंख,शिंपले व सरपटणारे प्राणी चितारले.ती रंगवेडी होती.प्राण्यांच्या नुसत्याच रंगीत प्रतिकृती तिला नको होत्या.त्यात कलाकाराची शैली प्रतिबिंबित व्हायला हवी,असं तिला वाटे.

१९४५ मध्ये ती पुन्हा मानववंशशास्त्राकडे वळली. केनियातील जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या आदिम चालीरीती व दागदागिने यांत ती रमली.ती त्यांची व्यक्तिचित्रं रंगवू लागली.सहा वर्षं तिची भटकंती चालू होती.ही चित्रं तिच्या 'पीपल्स ऑफ केनिया' ह्या पुस्तकात वापरली आहेत.काही नैरोबी इथल्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात विराजमान आहेत.

१९४४ साली तिनं जॉर्ज अ‍ॅडॅमसनशी लग्न केलं.जॉर्ज हा वन्यप्राणिसंरक्षण विभागात अधिकारी होता.त्यामुळं तिला वन्यप्राण्यांचं अगदी जवळून निरीक्षण करता आलं.आईपासून वेगळी झालेली रानटी जनावरांची पिलं त्यांना सापडत.चंचल वृत्तीच्या पिलांची रेखाटन करणं मोठं अवघड असे.कित्येक,
आईच्या पाखरीविना जगू शकत नसत.बहुधा ती एकतर जखमी अवस्थेत असत किंवा मरणाच्या पंथाला लागलेली असत. त्यामुळे ती फार काळ जिवंत राहत नसत.

त्यानंतर दहा वर्षांनी 'एल्सा'नं तिच्या जीवनात प्रवेश केला.ती तिची जिवंत रेखाटन करू लागली.तिच्या स्वभावावर,तिच्या आचरणावर एक नवीन प्रकाश पडत होता.एल्साविषयी एका ठिकाणी ती लिहिते-

'मी तिचा एखादा पंजा हातात घेई.मोठ्या विश्वासानं मला वाटायचं,हीच का ती मृदु,मुलायम मखमली पावलं! जी क्षणात मरणाचं हत्यार होऊ शकतात !'

पिपा चित्तीण व तिच्या पिलांची तिनं खूप रेखाटनं केली.चित्तीण व तिच्या पिलांची हृदयंगम कहाणी मोठ्या प्रासादिक भाषेत जॉयनं कथन केली आहे.एका मोटारीच्या अपघातात तिचा उजवा हात निकामी झाला. एल्सामिअर ह्या तिच्या निवासस्थाना
नजीकच्या जंगलातल्या कोलंबस माकडाचं तिनं काढलेलं चित्र हे शेवटचं ठरलं.ती त्या माकडाचं दोन वर्षे निरीक्षण करीत होती.त्याविषयी तिनं अंतरीच्या मोठ्या जिव्हाळ्यानं लिहिलंय!'साऱ्या माकडांत कोलंबस माकडं मोठी देखणी.लांब काळी शेपटी.
शेपटीला पांढरा गोंडा.ती एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या घ्यायची. फांद्यांतून शेपटी लोंबत असायची.वृक्षराजीतून येणाऱ्या सूर्याची किरणं त्यावर पडली की चमत्कार व्हायचा.

ती या भूतलावरची दिसायची नाहीत.जणू ती पऱ्यांच्या राज्यातील प्राणी वाटायची.'अशा या सुंदर माकडांच्या नराला चोरट्या शिकाऱ्यांनी मारलं.ती विद्ध मनानं लिहितेय-

'मी मेरू उद्यानातून परतले,तेव्हा तिथल्या लोकांनी मला सांगितलं की,गेले दोन आठवडे फक्त माय-लेकरं दिसतात.मी दिवसभर त्याला शोधीत होते.मी खालून पाहिलं.तो एका झाडावर बसलेला आढळला.त्यानं एका फांदीचा आधार घेतला होता.पण मला पाहताच तो हालेना.तो त्या पिलाचाच बाप होता आणि त्याचा निष्प्राण देह काष्ठवत वाटत होता.'

'तो माग वळून पाहत असावा.दोन्ही बाहू पुढ केलेले. त्यानं कुणाला तरी बाहूत घेतलं होतं. कुणाला? जिवंत नजरेनं अवकाशाकडे तो बघत होता.असहायपणे मान वळवी.पिलू तिच्या कुशीत लपे.ती पुन्हा कधी मोकळेपणी 'जेव्हा जेव्हा मी त्या अश्राप मायलेकरांकडं पाहायची तेव्हा तेव्हा ती खेळली बागडली नाहीत. जरूर तेवढं चरली की,ती पुन्हा एकमेकांना बिलगून उदासपणे बसत.भकास नजरेनं ती आकाशी टक लावून पाहायची.त्यांचं ते मुकेपण व उदात्त दुःख मला सहन व्हायचं नाही.'

अशा अवस्थेत जॉयनं काढलेलं त्यांचं चित्र शोकाचं मूर्तिमंत प्रतीक मानलं जातं.अशा तिच्या हातातून देवदत्त कला निघून जावी,हा केवढा दैवदुर्विलास. परंतु यामुळं तिला एल्सा सिंहिणीच्या जीवनात किंवा पिपा चित्तिणीच्या आयुष्यात खोलवर डोकावता आलं. नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या स्वभावधर्माचा तिला अभ्यास करता आला.

तिला तिचं ध्येय सापडलं.ती वन्य प्राण्यांच्या संरक्षणाविषयी काळजी वाहू लागली.मानव व निसर्ग यांच्या नात्याविषयी ती चिंतनशील बनली. याची परिणती म्हणून 'बॉर्न फ्री' हे सिंहिणीच्या जीवनावर सचित्र पुस्तक तिनं लिहिलं.त्या लागोपाठ 'लिव्हिंग फ्री','फॉर एव्हर फ्री' ही एल्साच्या जीवनावरील आणखी पुस्तकं प्रसिद्ध झाली.तिच्या जीवन-आलेखाकडे पाहिलं की वाटतं, आयुष्यभर तिचा आत्मा चैतन्याच्या शोधात होता. जंगलाचा अनुभव आलेली ती एक थोर तपस्विनी होती. मृत्यूतही सौंदर्य पाहणारी ती एक अलौकिका होती. इम्पाला ह्या सुंदर मृगाविषयी तिनं लिहून ठेवलंय-

'ती इथं पहुडली आहे.तिचं हळुवार प्राणोत्क्रमण झालं. तिच्या देहातून प्राण गेल्याचं मला कळलंदेखील नाही. हात तिच्या हृदयावरच थांबला.जिवंत असताना जे सतेज सौंदर्य होतं,ते मरणांतीही तिच्यात दिसून येत होतं.इतकी नाजूक.इतकी असहाय.तिनं सर्वस्वी आमच्यावर विश्वास टाकला होता.इतरांवर कदाचित ती एवढी विश्वासलीही नसती.आमच्याकडून तिनं कल्याणच अपेक्षिलं होतं.मात्र ती जाताना जीवनातल्या शिवसंकल्पांचा आविष्कार देऊन गेली.