* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१८/८/२५

स्वागत असे स्विकारा /Accept as welcome

पुस्तके वाचून मित्र जोडता येत नसतात.ही कौशल्ये तुम्हाला सहज शिकवणारा एक जगन्मित्र तुमच्या आजूबाजूलाच वावरत असतो,

अगदी रस्त्यावरही तो तुम्हाला भेटू शकतो.तुमच्याकडे शेपटी हलवत येऊन, आनंदाने उड्या मारून तो तुम्ही त्याला किती आवडता हे दाखवून देईल.हे सारे तो मनात कोणताही वाईट हेतू ठेवून करत नसतो.त्याला तुमच्याशी लग्नही करायचे नसते किंवा त्याची जागा तुम्ही विकत घ्यावी असेही त्याला वाटत नसते.ज्याला स्वतःसाठी काम करावे लागत नाही, असा कुत्रा हा एकमेव पाळीव प्राणी आहे.कोंबडी,गाय, कॅनरी पक्षी या तिघांनाही अनुक्रमे अंडी द्यावी लागतात, दूध द्यावे लागते,गावे लागते;पण कुत्रा माणसाळतो आणि माणसांना प्रेम देऊन जगतो.प्रेमाशिवाय त्याला दुसरे काही करावे लागत नाही..(स्वागत स्वीकारण्यासाठी हे करा.!मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन) 


माझ्या वडिलांनी एकदा पिवळ्या रंगाच्या केसांचे कुत्र्याचे छोटे पिल्लू पन्नास सेंट्सना आणले.त्याचे नाव आम्ही 'टीपी' ठेवले.मी तेव्हा पाच वर्षांचा होतो.माझे लहानपण त्याच्यामुळे अत्यंत आनंदात गेले.रोज दुपारी साडेचार वाजता तो दारात रस्त्याकडे बघत माझी वाट पाहायचा आणि माझा आवाज ऐकताच उत्साहाने उड्या मारायचा.तो पाय हवेत उचलून गिरकी घ्यायचा, माझ्या अंगावर चढायचा आणि अत्यानंदाने ओरडायचा!


टीपी माझा जिवाभावाचा सखा होता;पण एके रात्री घडलेली ती दुर्घटना मी कधीच विसरणार नाही. माझ्यापासून अवघ्या दहा फुटांवर असताना अंगावर वीज पडून तो मेला.टीपीच्या अकस्मात मृत्यूमुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो ! टीपीने कधीच सायकॉलॉजीचे गाइड वाचले नसेल;पण केवळ दोन महिन्यांत इतर लोकांमध्ये रस दाखवून तो अनेक मित्र जोडू शकत होता;त्याला तशी दैवी देणगी मिळाली होती बहुधा !


माणसांना यासाठी दोन महिने नाही,दोन वर्षेही अपुरी पडतात.

लोकांना आपल्याबद्दल कुतूहल वाटावे,त्यांनी आपल्यामध्ये रस घ्यावा,असे वाटणारे अनेक लोक आपल्या आवतीभोवती असतात.जे संपूर्ण आयुष्यभर अविचाराने वागतात आणि तरीही अशी इच्छा बाळगून घोडचूक करतात.माणूस हा सदैव,तिन्ही त्रिकाळ स्वतःमध्ये रस घेणारा प्राणी आहे.


न्यू यॉर्क टेलिफोन कंपनीने टेलिफोनवरील संभाषणांचा सर्व्हे केला आणि सखोल संशोधन केले.जेव्हा त्याचा निष्कर्ष हातात आला,तेव्हा तो काहीसा असा होता, संभाषणात सतत वापरला जाणारा शब्द हा प्रथम पुरुषी एकवचन म्हणजे 'मी' हा होता.'मी' हा शब्द टेलिफोनवरील रेकॉर्ड संभाषणांमध्ये ३९०० वेळा वापरण्यात आलेला आढळून आला.ग्रुप फोटोमध्ये दुसऱ्यांचे फोटो आधी शोधणारी माणसे क्वचितच आढळतात.तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा त्यामध्ये आधी काय शोधता ? स्वतःचाच चेहरा ना?तुम्हाला इमानदार मित्र मिळवायचे असतील,तर लोकांनी तुमच्यात इंटरेस्ट घ्यावा या हेतूने त्यांच्यावर छाप टाकायचा प्रयत्न बंद करा.नेपोलियन हा याचे उत्तम उदाहरण.शेवटच्या भेटीत तो जोसेफाईला म्हणाला, 


"जोसेफाई, मी या पृथ्वीवरचा सर्वाधिक भाग्यशाली माणूस आहे.कारण या क्षणाला तुझ्याशिवाय असे कोणीच नाही,

ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकतो," तरीही इतिहासकारांना अजूनही असा संशय आहे की, नेपोलियनने जोसेफाईवर खरेच विश्वास ठेवला होता की नाही!


व्हिएन्नामधला एक थोर मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड अ‍ॅडलर याचे 'व्हॉट लाइफ गुड मिन टू यू' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यात तो म्हणतो,'ज्या व्यक्तीला आपल्याशी सहकार्य करण्यामध्ये रस नाही,तिला या जगात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि अशा माणसांमुळेच अपयश पदरी पडते.'


मानसशास्त्रावरची कितीही विद्वत्ता प्रचुर पुस्तके तुम्ही वाचलीत,

तरीही अ‍ॅडलरच्या पंक्तीमध्ये असलेले महत्त्व समजून घेतल्या

शिवाय आपले ज्ञान पूर्ण होणार नाही म्हणून मी पुन्हा त्या ओळी पुढे देत आहे.'ज्या व्यक्तीला आपल्या साथीदारांमध्ये रस नाही,

तिला या जगात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि एवढेच नाही,तर ती इतरांनासुद्धा दुखापत करते आणि अशा माणसांमुळेच मानवी अपयश उदयाला येते.'


न्यू यॉर्क विद्यापीठात कथा-लेखनाच्या प्रशिक्षणाला मी प्रवेश घेतलेला असताना एका प्रसिद्ध मासिकाचे संपादक आमच्या वर्गात बोलत होते.ते म्हणाले,"माणसे न आवडणाऱ्या लेखकांनी लिहिलेल्या डझनभर तरी अशा कथा माझ्या टेबलावर रोज येऊन पडतात.मला असा प्रश्न पडतो की,जर लेखकाला माणसे आवडली नाहीत,तर वाचकालासुद्धा त्या लेखकाच्या कथा आवडत नाहीत."कथा-लेखनाच्या बाबतीत सत्य असणारी ही गोष्ट आपल्या भोवताली वावरणाऱ्या माणसांच्या बाबतीतसुद्धा असत्य कशी असेल ?


प्रसिद्ध जादूगारांचा जादूगार हॉबर्ट थर्सटन गेल्या चाळीस वर्षांपासून जगभर आपले प्रयोग करत फिरतो आहे.त्याचे प्रयोग हे आश्चर्यकारक,भ्रम निर्माण करणारे, गूढ होते.ते पाहताना मती गुंग होऊन जाई.इतके की, त्याचा प्रेक्षकवर्ग आश्चर्याने तोंडाचा आ वासून बसलेला असे.साठ लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्याचे प्रयोग पाहिले आणि या प्रयोगांमधून त्याने दोन लाख डॉलर्स

पेक्षाही अधिक फायदा कमावला.


थर्सटनला त्याच्या एवढ्या मोठ्या यशाचे रहस्य विचारले.मला हे माहीत होते की,त्याच्या शालेय दिवसांचा याच्याशी नक्कीच काही संबंध नसावा,कारण तो अगदी लहान मुलगा होता,तेव्हाच घरातून पळून गेला होता.इकडून तिकडे भटकत मिळेल ते काम करत होता.कोणत्याही वाहनांमधून प्रवास करत होता. झोपडीत झोपत होता.दारोदार भीक मागत होता आणि स्टेशनवरील पाट्या वाचत वाचत शिकत होता.मग त्याला जादूविषयी काही विशेषज्ञान होते का,असे मी त्याला विचारले,तेव्हा तो मला म्हणाला की नाही. हातचलाखीवर आजपर्यंत शंभर एक पुस्तके तरी लिहिली गेली आहेत आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे;पण इतरांकडे नसलेल्या दोन विशेष गोष्टी त्याच्याकडे होत्या.एक म्हणजे फूट लाइट्सच्या उजेडात सावलीद्वारे त्याचे व्यक्तिमत्त्व बदलू शकणारा तो एक कलाकार होता.त्याला मानवी स्वभावाचे बारकावेही माहिती होते.चेहऱ्यावरील हावभाव,आवाजातील बदल, भुवईचे उंचावणे या सगळ्याची रंगीत तालीम आधीच झालेली असायची आणि तंतोतंत अचूक वेळेचे गणित तो जमवून ते सादर करायचा.

डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कार्यभाग साधता येईल,इतक्या वेगवान हालचाली करून तो लोकांना मंत्रमुग्ध करीत असे. याशिवाय त्याचा आणखी एक गुण असा होता की, त्याला लोकांमध्ये प्रचंड इंटरेस्ट होता.त्याने मला सांगितले की,अनेक जादुगारांचीही सवय असते की. प्रेक्षकांना बुद्धू समजणाऱ्या,मूर्ख बनवणाऱ्या जादूगारांसारखा तो नव्हता.थर्सटनच्या पद्धतीचा वेगळेपणा हा होता की,प्रत्येक वेळी स्टेजवर पाऊल ठेवताना तो स्वतःशी म्हणत असे.'माझा प्रयोग पाहायला येथे जमणाऱ्या लोकांविषयी मी कृतज्ञ आहे. त्यांच्यामुळेच माझे आयुष्य मी चांगल्या प्रकारे घालवू शकतो म्हणूनच मला त्यांना जेवढे जास्त देणे शक्य होईल तेवढे मी देण्याचा प्रयत्न करेन.'


त्याने हेसुद्धा जाहीररीत्या सांगितले की,तो कधीही फुटलाइट्स

समोर 'माझे माझ्या प्रेक्षकांवर प्रेम आहे' असे म्हटल्याशिवाय जात नसे.हे मूर्खपणाचे आहे असे जर तुम्हाला वाटत असेल,तर तो तुमचा प्रश्न आहे. एखाद्या गृहिणीच्या एखाद्या पाककृतीप्रमाणे एका मोठ्या प्रसिद्ध जादूगाराची ही पाककृती मी माझे कोणतेही मत न नोंदवता तुमच्याकडे सोपवत आहे.


पेनिसिल्व्हानिया येथील जॉर्ज डाइकचे सर्व्हिस स्टेशनवरील काम बळजबरीने त्याच्याकडून हिरावून घेण्यात आले.नवीन हायवेच्या रस्ता रुंदीच्या पट्ट्यामध्ये ती जागा गेली.तीस वर्षे कामाची सवय असलेल्या त्याला अशा या सक्तीच्या निवृत्तीमुळे खूप कंटाळवाणे वाटू लागले.मग या रिकाम्या वेळेत तो त्याच्या जुन्या फिडलवर गाणे वाजवायला लागला. हळूहळू तो संगीत ऐकण्यासाठी सगळीकडे प्रवास करू लागला.त्या प्रवासात अनेक यशस्वी फिडल वाजवणाऱ्यांशी त्याची भेट झाली.आपल्या नम्र आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तो इतरांच्या संगीत शिकण्याच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेऊ लागला.स्वतः फार मोठा फिडलवादक नसूनही,त्या क्षेत्रातील अनेक मित्र जोडल्यामुळे,अनेक संगीत जलशांना उपस्थित राहिल्यामुळे थोड्याच दिवसांत त्याला म्युझिक फॅनक्लबचा 'अंकल जॉर्ज' म्हणून ओळखले जाऊ लागले.बहात्तर वर्षांच्या वयात अशा प्रकारे इतर लोकांमध्ये रुची दाखवून त्याने आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगला.वयात लोकांना आपण आता निरुपयोगी झालो आहोत,वाटते त्या वयात त्याने स्वतःचे आयुष्य नव्याने उभे केले.


थिओडर रूझवेल्टवर त्याचे नोकरसुद्धा प्रेम करायचे. इतकी आश्चर्यजनक लोकप्रियता त्याला कशी मिळाली यामागचे गुपित काहीसे असेच आहे.त्याचा विश्वासू नोकर जेम्स अमोस याने रूझवेल्टबद्दल लिहिलेल्या - थिओडर रूझवेल्ट - हिरो टू व्हॅलेट या पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी घटना आहे. म्हणतो की,


एके दिवशी माझ्या पत्नीने प्रेसिडेंट यांना 'बॉबव्हाइट प्राण्याबद्दल विचारले.तिने आत्तापर्यंत तो प्राणी कधीच पाहिला नव्हता म्हणून प्रेसिडेंटने तिला त्याचे वर्णन करुन सांगितले.त्यानंतर काही दिवसांनी ऑयस्टरबे येथील रूझवेल्ट इस्टेटमधील एका झोपडीत राहणाऱ्या अमोस घरातील टेलिफोन वाजला.मिसेस अमोसने फोन उचलला आश्चर्य म्हणजे रूझवेल्ट यांनी मुद्दाम तो फोन केला होता.'तिच्या खिडकीबाहेर बॉबव्हाइट आला होता.हे सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता.खरेतर तिला तो तसाही दिसला असता;पण लहान माणसांच्या लहानसहान गोष्टी लक्षात ठेवणे रूझवेल्ट यांचे वैशिष्ट्ये होते.कधी ते आमच्या झोपडीवरून जात तेव्हा,त्यांनी आम्हाला मारलेली हाक ऐकू येई, 'अ अ‍ॅनी...' किंवा ' जेम्स.' इतके जिव्हाळ्याचे संबंध जपणारे रूझवेल्टसारखे मालक नोकरांना आवडणार नाहीत,असे होणे शक्यच नाही ना? अशा माणसावर प्रेम करणे ही एक स्वाभाविक अपरिहार्य गोष्ट असते.


एकदा व्हाइट हाउसमध्ये प्रेसिडेंट व मि.टॅफ्ट यांना भेटायचे आमंत्रण रूझवेल्ट यांना मिळाले.त्याप्रमाणे ते तिथे गेले असताना प्रेसिडेंट बाहेर गेले होते.रूझवेल्टला नम्र माणसे खूप आवडत.

जेव्हा तो व्हाइट हाउसमधल्या जुन्या नोकर माणसांना भेटत असे,तेव्हा तो त्यांना नावाने हाक मारत असे.एकदा ते अ‍ॅलिस या स्वयंपाकिणीला म्हणाले की,तू अजून कॉर्नब्रेड बनवतेस का? त्यावर ती म्हणाली की,नोकर माणसांसाठी काही वेळा बनवते;पण वरिष्ठ मंडळी मात्र ते खात नाहीत.


त्यावर रूझवेल्ट मिश्कीलपणे म्हणाला की,त्यांना चवीने कसे खावे तेच समजत नाही.थांब,आता प्रेसिडेंट मला भेटले की,त्यांना मी कॉर्नब्रेडबद्दल सांगतो.अ‍ॅलिसने रूझवेल्टसाठी तो ब्रेड बनवून दिला आणि गंमत म्हणजे तो खात खात रूझवेल्ट ऑफिसपर्यंत पोहोचला.वाटेत भेटणाऱ्या माळ्यांशी,कामगारांशी बोलत बोलत,

प्रत्येक माणसाला नावानिशी हाक मारत आणि पूर्वीसारखाच त्याच्याशी बोलत तो पुढे जात होता.गेली चाळीस वर्षे प्रत्येकाला आपली जागा दाखवण्यासाठी हुव्हर नावाचा एक नोकर व्हाइट हाउसमध्ये नेमला होता.तो गहिवरून म्हणाला की,दोन वर्षांनी आज रूझवेल्टसाहेब आलेत.आजचा दिवस सोनियाचा दिवस आहे.या दिवसाच्या बदल्यात आम्हाला कोणी दोनशे डॉलर्स जरी दिले,तरी आम्ही ते घेणार नाही.


आणखी असाच एक अनुभव तुम्हाला सांगतो.अगदी नगण्य लोकांनाही जमेत धरणे विक्री कौशल्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते! 'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीचा विक्रेता म्हणून काम करणाऱ्या न्यू जर्सीमधील एडवर्ड स्काइंगकडे मॅसच्युसेट्स व आसपासचा भाग सोपवला होता.अनेक वर्षांपूर्वी एकदा तो हिंगाम येथील औषधाच्या दुकानात गेला.ते कंपनीचे नेहमीचे ग्राहक होते.जेव्हा जेव्हा एडवर्ड त्या दुकानात जात असे,तेव्हा तेव्हा त्या दुकानातील सोडा क्लार्क व सेल्स क्लार्क यांची आपुलकीने चौकशी करत असे आणि नंतरच त्या दुकानाच्या मालकाकडे जात असे.एके दिवशी त्या मालकाने स्पष्ट सांगितले की,आम्हाला इथून पुढे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची उत्पादने नको आहेत, कारण कंपनीचे सगळे लक्ष आता खाद्यपदार्थांवर व सवलतीच्या केंद्रांवर केंद्रित झाले आहे,त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या दुकानदारांचे नुकसान होते. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे एडवर्ड अवाक् झाला होता.तो सांगतो की,तिथून मी निमूटपणे काढता पाय घेतल्यानंतर कित्येक तास शहरात भटकल्यानंतर शेवटी मी परत त्या दुकानाच्या मालकाकडे जायचे ठरवले व आमची बाजू त्याला समजावून सांगण्याचे ठरवले.मी त्या दुकानात परत गेलो व सोडा क्लार्क आणि सेल्स क्लार्कला नेहमीप्रमाणे 'हॅलो' म्हणालो.मग मी मालकाकडे गेलो.तो माझ्याकडे बघून हसला व त्याने माझे चांगले स्वागत केले.नंतर त्याने मला नेहमीच्यापेक्षा दुप्पट उत्पादनांची ऑर्डर दिली.मला आश्चर्याचा धक्का बसला व मी त्याला विचारले की,केवळ काही तासांमध्ये असे काय घडले? सोडा फाउंटन जवळ उभ्या असलेल्या तरुणाकडे बोट दाखवून तो म्हणाला की, तुम्ही गेल्यानंतर हा मुलगा आत आला व म्हणाला की, कोणतेच औषध-विक्रेते आमची दखल घेत नाहीत व आम्हाला 'हॅलो' सुद्धा म्हणत नाहीत.जे काही थोडे विक्रेते आम्हालाही प्रेम लावतात,

त्यापैकी तुम्ही एक आहात आणि जर धंदा वाढवण्याची पात्रता कोणात असेल,तर ती तुमच्यामध्येच आहे.


मला ते सगळे पटले. त्यानंतर तो आमचा कायमस्वरूपी असा निष्ठावान ग्राहक बनून राहिला.ही एक अविस्मरणीय गोष्ट आहे. या प्रसंगामुळे मी शिकलो की,जर विक्रेत्यामध्ये गरजेचा असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत लहानातल्या लहान माणसाच्या उपस्थितीची त्याने नोंद घ्यायला हवी.जो कोणी सभोवतालच्या माणसाबद्दल आस्था दाखवेल,त्याची आपुलकीने चौकशी करेल तो त्याचे लक्ष,वेळ व सहकार्य मिळवू शकतो,अशा निष्कर्षापर्यंत मी माझ्या वैयक्तिक अनुभवांवरून आलो आहे.


काही वर्षांपूर्वी ब्रुकलिन इन्स्टिट्यूट आर्ट्स अँड सायन्सेज येथे कथालेखनाबद्दलच्या प्रशिक्षणाचा कोर्स करत असताना आम्ही कॅथलिक नॉरीस,फॅनी हर्स्ट,इडा तारबेल,अलबर्ट पेसन,रूचर्ट ह्युजेस यांच्यासारख्या ख्यातनाम मातब्बर मंडळींना पत्र लिहिले की,त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव आमच्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करावेत.आम्हाला त्यांचे लेखन खूप आवडते आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवांचा व विचारांचा आम्हाला आमच्या भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोग होईल.


अपुर्ण…. पुढील…लेखामध्ये…!


१६/८/२५

सूर्यपक्षी,तांबड्या मुंग्या व अर्जुन / Sunbirds,red ants and Arjuna

कौरव व पांडव हे द्रोणाचार्यांचे विद्यार्थी.आपले सर्व विद्यार्थी अस्त्रविद्येत पटाईत झाले आहेत व सर्व प्रकारच्या शस्त्रविद्येत पारंगत झाले आहेत,असं पाहून लक्ष्यवेधासाठी अत्यंत आवश्यक अशी चित्ताची एकाग्रता त्यांच्या ठिकाणी किती बाणली आहे,याची परीक्षा घ्यायचं द्रोणाचार्यांनी ठरवलं. त्यांनी कारागिराकडून एक भासपक्षी तयार करून, त्याला एका झाडाच्या शेंड्यावर ठेवून दिला व आपल्या शिष्यांना त्याचा लक्ष्यवेध करावयास सांगितलं.परंतु लक्ष्यवेध करणं चौघा पांडवांना व कौरवांना जमलं नाही.त्यापूर्वी द्रोणाचार्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं समर्पक उत्तर देणंही त्यांना जमलं नाही.शेवटी त्यांनी अर्जुनास बोलावलं व त्याला सांगितलं की,"अर्जुना,तुला या लक्ष्यावर आता नेम धरावयाचा आहे. लक्ष्य नीट पाहून घे.मी आज्ञा देताक्षणी तुला बाण सोडावा लागेल." गुरूच्या आज्ञेप्रमाणे अर्जुनानं धनुष्य सज्ज करून व त्यावर बाण चढवून ते ताणलं.लक्ष्यावर आपली नजर स्थिर करून तो उभा राहिला.काही क्षणांत आचार्यांनी अर्जुनाला विचारलं की,"तुला भासपक्षी,झाड आणि मी हे सर्वच दिसतं काय?" त्यावर अर्जुन म्हणाला,"आचार्य! मला आपण,वृक्ष अथवा इतर कोणीही दिसत नाही.


मला फक्त भासपक्षी दिसतो." ह्याबरोबर आचार्यांना अतिशय आनंद झाला.नंतर त्यांनी पुन्हा विचारलं,"आताही तुला भासपक्षीच दिसतो काय?" एकाग्रचित्त अर्जुनानं सांगितलं,"मला फक्त भासपक्ष्याचं मस्तक दिसतं.बाकी त्याचा कोणताही अवयव दिसत नाही."द्रोणाचार्य अर्जुनाला एकदम म्हणाले,"सोड बाण." त्याबरोबर अर्जुनानं आपल्या तीक्ष्ण बाणानं त्या पक्ष्याचं डोकं तोडून खाली पाडलं.अर्जुन हा निष्णात धनुर्धारी होता.या परीक्षेनंतर अर्जुन जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेला. 


या विजयानंतर लोकांपासून दूर असलेल्या जंगलातील शांतता त्याला अनुभवायची होती. त्याला सारं जंगल लहानमोठ्या वनचरांनी भरलेलं दिसलं.परीक्षेचा त्याच्यावर खूप ताण पडला होता. कडक उन्हामुळे उकडत होतं.वारा घेण्यासाठी फांदी तोडावी म्हणून एका झाडाला हात लावताच त्यातून एक चिमुकला सूर्यपक्षी उडून त्याच्या हातावर बसला.त्याचा रंग निळा-जांभळा होता.चोच अणकुचीदार होती.डोळे बारीक मण्यांसारखे होते. तो धीटपणे अर्जुनाकडे पाहू लागला आणि मोठ्या नम्रपणाने अर्जुनाला म्हणाला,"हे बंधू,ही फांदी तोडू नकोस.कारण त्यात माझं घरटं आहे.

घरट्यात पिल्लं निजली आहेत." "घरटं?" असं म्हणत अर्जुनानं त्या फांदीत पाहिलं. मऊ गवत व जाळीनं तयार केलेलं घरटं पिशवीसारखं लोंबताना दिसलं.पुढे तो धिटुकला पक्षी म्हणाला, "हे घरटं मोठ्या प्रेमानं अन् कष्टानं बांधलं आहे.त्यात माझी तीन पिल्लं आहेत.त्यांना चारा भरवायचा आहे." इवलीशी चोच असलेली गोजिरवाणी पिल्लं घरट्यातून डोकावत होती.चारा घेण्यासाठी त्यांनी चोच वासली होती.


हे चिमुकल्या जिवा,तुला किंवा तुझ्या घरट्याला मी इजा करणार नाही." तो पक्षी अजूनही अर्जुनाच्या हातावर बसला होता. "जा.आता तुझ्या पिल्लांना भरव."


तो सूर्यपक्षी म्हणाला, "हे धनुर्धरा,कधीतरी आम्ही तुझ्या उपयोगी पडू."


आता अर्जुनानं किंचित उंच असलेल्या फांदीला धरलं.तोच काही चावऱ्या तांबड्या मुंग्या त्याच्या अंगाखांद्यावर पडल्या.

त्यानं वर पाहिलं तर त्याला हिरव्या पानांनी बांधलेली अनेक घरटी दिसली.ती त्या तांबड्या मुंग्यांची होती. पांढऱ्या जाळीनं पानं एकमेकांना जोडली होती. त्या मुंग्या म्हणाल्या,"हे बंधू, झाडाची फांदी तोडू नकोस.कारण त्यामुळे अनेक दिवसांपासून मोठ्या परिश्रमानं बांधलेल्या घरट्यांचा नाश होईल.या घरट्यात राणी मुंगी, कामकरी व शिपाई मुंग्या आहेत.आमची पिल्लं आहेत.साऱ्या फांदीवर लहान चेंडूसारखी घरटी दिसतात ती म्हणजे आमच्या गाईंचे गोठे आहेत. त्यात मातकट रंगाचे मावा जातीचे कीटक आहेत.


ते त्या पानांतून रस शोषून घेतात आणि आम्ही त्यांना दुधासाठी दोहतो.म्हणून हे बंधू,या फांद्या तोडू नकोस,अशी तुला विनंती आहे. भविष्यकाळात तुझ्या उपयोगी पडून आम्ही तुझे हे उपकार फेडू."


अर्जुन स्वतःशीच म्हणाला,"या वनात कितीतरी लहान जीव आहेत.त्यांना मी कसलाच अपाय करणार नाही. अर्थात मी कुठल्याच झाडाची फांदी तोडणार नाही." वनातून वाटचाल करीत असता त्याला वाटलं,"मी एक श्रेष्ठ धनुर्धारी व शस्त्रयोद्धा आहे.हे लहान जीव मला कोणती मदत करणार!"


या प्रसंगानंतर अनेक वर्षे लोटली.पाच पांडवांना कौरवांच्या अनेक षड्यंत्रातून जावं लागलं.अति दुःख भोगावं लागलं.ती सारी जण एकाच राजवाड्यात राहत होती.एकाच गुरूकडून विद्या शिकली होती.परंतु,कौरवांना पांडवांविषयी असूया वाटे.त्यांचा ते द्वेष करीत.शौर्यात कमी पडतात म्हणून पांडवांविरुद्ध अनेक षड्यंत्रं रचीत.


पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला होता.आता तेरावं वर्ष अज्ञातवासाचं होतं.अर्जुन भटकत होता. आता त्याच्या अंगावर ना चिलखत होतं ना हातात शस्त्र.तो बैराग्याच्या वेशात होता.अशा निर्मनुष्य वनात अर्जुनाला वाटसरूंच्या बोलण्याचा आवाज येत होता.अर्जुन एक शूर,धाडसी योद्धा होता. दरोडेखोरांच्या टोळीला देखील त्यानं शौर्यानं तोंड दिलं असतं.परंतु आजची परिस्थिती वेगळी होती. आता तो अज्ञातवासात होता.कोणी त्याला ओळखलं असतं तर संकट उभं राहिलं असतं.इतक्यात त्याला 'चीविट-चीविट' असा सूर्यपक्ष्याचा परिचित आवाज ऐकू आला.जणू काही तो एका झाडाकडे येण्यास खुणावत होता.अर्जुन त्या झाडाजवळ आला.त्या झाडात पुरुषभर उंचीची ढोली होती.अर्जुनानं लगेच त्यात उडी मारताच लाल मुंग्यांच्या झुंडीनं त्याचं मस्तक झाकलं आता तो दिसेनासा झाला.


( निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,

नागपूर … ) परंतु दुरून येणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीनं या नवख्या प्रवाशाला पाहिलं होतं.त्यांना आश्चर्य वाटलं की,इथेच तो दिसला,मग कुठे गायब झाला असावा. बैराग्याचा वेष घातलेली व्यक्ती असाधारण उंच व सुदृढ शरीराची होती हेही त्यांनी पाहिलं होतं.आजूबाजूला धुंडाळत असताना त्या उंच झाडाच्या ढोलीत त्यांनी डोकावून पाहिलं.तो इथे तर लपला नसावा?तोच सूर्यपक्ष्यानं त्यांच्या तोंडावर पंखांचा झपाटा मारला.चोचीनं टोचलं.त्या ढोलीत त्यांनी काठीनं डिवचण्याचा प्रयत्न केला;तोच असंख्य तांबड्या,चावऱ्या मुंग्या त्यांच्या अंगाखांद्यावर, डोक्यावर तुटून पडल्या.त्या त्यांना कडकडून चावल्या.त्यांना वाटलं,तो बैरागी त्या ढोलीत लपला असेल,तर त्या मुंग्यांनी त्याला एव्हाना ठार मारलं असेल.


नंतर काही वेळानं वनात जिकडेतिकडे शांतता पसरली.

'चीविट-चीविट-चीविट'असा आवाज करून धोका गेल्याची सूचना त्या सूर्यपक्ष्यानं अर्जुनाला दिली.अर्जुनाच्या मस्तकावरील मुंग्यांच्या झुंडी क्षणात बाजूला झाल्या.अर्जुन लगेच ढोलीबाहेर आला.त्यानं मोठ्या कृतज्ञतेनं त्या चिमुकल्या पाखराचे व मुंग्यांचे आभार मानले.त्या वेळी अर्जुनाला आठवलं की,काही वर्षांपूर्वी या लहान जीवांनी मला 'संकटकाळात मदत करू' असं वचन दिलं होतं,ते त्यांनी अशा रीतीनं पार पाडलं तर! त्यांच्या विषयीच्या कौतुकानं अर्जुनाचा ऊर भरून आला. या प्राणिमात्रांचं आपल्यावर प्रेम असल्याचं पाहून त्याला धन्यता वाटली अन् कृतज्ञतेनं एकदा त्यांच्याकडे पाहून त्यानं आपली वाट धरली.




१४/८/२५

भूरचनाशास्त्रीय पार्श्वभूमी / Geological background

उत्क्रांतिवादाची कोणतीही थिअरी सिद्ध करताना एक मोठी अडचण होते.ती म्हणजे कोणत्याही स्पिशीजमध्ये बदल होतात हे दाखवणं.कारण कोणत्याही स्पिशीजमध्ये बदल हा खूप हळू होतो.थोडासा बदल व्हायला एका स्पिशीजला अनेक शतकं,

सहस्रकं किंवा कधीकधी लाखो-कोट्यवधी वर्षांचा काळ जातो आणि माणसाचं आयुर्मान जास्तीत जास्त ७०-८० वर्षं असेल तर एकच माणूस किंवा एखाद्या माणसाच्या किती पिढ्या हे बदल दाखवू शकणार? माणसाच्या ज्ञात इतिहासात तरी अशी एका स्पिशीजमधून दुसरी स्पिशीज निर्माण होताना माणसानं पाहिली नव्हती आणि अशी प्रक्रिया जर खरंच घडत असेल तर ती फारच हळू घडत असली पाहिजे.त्यातून बायबलनुसार खुद्द पृथ्वीचा जन्मच मुळी सहा हजार वर्षांपूर्वी होत होता.त्यामुळे इथे उत्क्रांतीला काहीही वाव नव्हता!


१७८५ साली यात बदल झाला.जेम्स हटन (James Hutton) (१७२६ ते १७९७) या स्कॉटिश डॉक्टरला भूरचनाशास्त्राचा अभ्यास करायचा छंद निर्माण झाला. भूरचनाशास्त्रात पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करतात. असा अभ्यास करताना त्यानं १७८५ साली 'थिअरी ऑफ अर्थ' नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं.

त्यात त्यानं वारा,पाण्याचा प्रवाह आणि हवामानामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर कसा परिणाम होतो ते सांगितलं होतं.या प्रक्रिया कायम एकाच वेगानं होतात हेही त्यानं त्यात सांगितलं होतं.त्यामुळेच प्रचंड उंच पर्वतांची निर्मिती किंवा मोठमोठ्या नद्यांच्या प्रवाहाची निर्मिती व्हायला हजारो वर्षांचा कालावधी लागला असणार आहे.त्यामुळेच पृथ्वीचं वय हे सहा हजार वर्ष असणं कधीही शक्य नाही, तर ते कित्येक लाख वर्ष असणं गरजेचं आहे.


पृथ्वीच्या वयाची ही संकल्पना स्वीकारली जायला तसा वेळच लागला.पण जमिनीच्या आतमध्ये गाडले गेलेले जीवाश्मांचे हजारो वर्षं जुने अवशेष पाहता बायॉलॉजिस्ट्सनी ही संकल्पना लगेचच उचलून धरली. जीवाश्म या शब्दासाठी वापरला जाणारा इंग्रजी 'फॉसिल' हा शब्द खोदणे या अर्थाच्या मूळ लॅटिन शब्दावरून आलेला आहे. पूर्वी हा शब्द कोणत्याही जमिनीतून खणून काढलेल्या वस्तूसाठी वापरला जात होता.पण नंतर मात्र हा शब्द फक्त जीवाश्मांसाठी वापरला जातो.जीवाश्म ही खरं तर प्राण्यांसारखी दिसणारी दगडंच असतात.पण कोणत्याही दगडांमध्ये असे प्राण्यांचे आकार आपोआप कसे काय कोरले जातील? या प्रश्नानं मग बायॉलॉजिस्ट्सना काही काळ सतावलं.

आणि मग यातून असा निष्कर्ष आला,की प्राण्यांच्या आकाराची ही दगडं म्हणजे पूर्वी खरंच जिवंत असणारे प्राणीच असावेत आणि काही कारणांनी ते जमिनीत गाडले जाऊन दगडांत रूपांतरित झाले असावेत.काहींनी त्यातूनही असं सुचवलं की हे नोहाच्या पुरात (Noah's Flood) मारल्या गेलेल्या प्राण्यांचे अवशेष असतील.पण जर हटननं सांगितल्याप्रमाणे पृथ्वी जर खूपच जुनी असेल तर हे प्राणीही फार फार पुरातन काळी जमिनीत गाडले गेले असतील आणि त्यांच्या मूळ हाडा-मांसाचं रूपांतर हळूहळू माती-दगड झाले असतील.या जीवाश्मांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन विल्यम स्मिथ (William Smith) (१७६९ ते १८३९) यानं दिला.स्मिथ हा ब्रिटिश सर्व्हेअर होता. नंतर तो भूरचना अभ्यासक झाला. त्या काळी अनेक ठिकाणी कालवे बांधण्याचं काम चालू होतं.खोदून ठेवलेल्या कालव्यांच्या मार्गाचं सर्वेक्षण करणं हे त्याचं काम होतं.या कामातून त्याला अनेक ठिकाणी खोदलेल्या भूभागाचं निरीक्षण करण्याची संधी आपोआपच मिळत गेली.तेव्हा जमिनीखालच्या वेगवेगळ्या प्रकारचे खडकांचे थर हे एकमेकांना समांतर असतात हे त्यानं शोधून काढलं.(म्हणजे एखाद्या ठिकाणी सगळ्यात वरचा थर हा ३ मीटर उंचीचा असेल आणि त्याच्या खालचा थर हा त्याखाली ४ मीटर उंचीचा असेल तर दुसऱ्या ठिकाणीही तो तसाच पहिला थर ३ मीटर आणि त्याखाली ४ मीटर उंचीचा असतो.) याशिवाय,प्रत्येक थराची (स्ट्राटा) स्वतंत्र वैशिष्ट्यंही असतात याचंही त्यानं निरीक्षण केलं.प्रत्येक स्ट्रॅटामध्ये आढळणाऱ्या फॉसिल्सची वैशिष्ट्येही सारखीच असतात.प्रत्येक स्ट्रॅटा कसाही वाकलेला,दुमडलेला किंवा विस्कळीत झालेला असेल तरीही त्या त्या स्ट्रॅटाची वैशिष्ट्ये कायम राहतात.इतकंच नाही तर एखादा स्ट्राटम (स्ट्रॅटाचं एकवचन) एखाद्या ठिकाणाहून तुटून काही मैल दूर अंतरावर सापडला तरी त्या स्ट्रॅटाची वैशिष्ट्ये बदलत नाहीत,तीच राहतात हे स्मिथनं दाखवून दिलं.गंमत म्हणजे प्रत्येक स्ट्रॅटामध्ये आढळून येणारं फॉसिलही त्या त्या स्ट्रॅटामध्येच सापडत होतं.नंतर नंतर तर स्मिथ हे स्ट्रॅटा ओळखण्यात इतका पटाईत झाला,की फक्त फॉसिल बघूनच तो ते कोणत्या स्ट्रॅटामध्ये असेल ते ओळखायला लागला ! जमिनीचे थर हे हळूहळू पण एकाच वेगानं आणि सगळीकडे सारख्याच प्रकारे निर्माण झालेले असतील हा हटनचा दृष्टिकोन बरोबर असेल तर एखादा स्ट्रॅटा जमिनीत जितका खोल असेल तितका तो जुना असेल असं म्हणायला पुरेसा वाव होता.आणि जर फॉसिल्स हे खरोखरच कधीकाळी जिवंत असलेल्या प्राण्यांचे अवशेष असतील तर फॉसिल जितका खोल तितका तो प्राणी पूर्वीच्या काळात होऊन गेला असं म्हणता येत होतं.


फ्रेंच बायॉलॉजिस्ट जॉर्जेस लिओपोल्ड कुव्हिए (Georges Leopold Cuvier) (१७६९ ते १८३२) या फ्रेंच बायॉलॉजिस्टचं या फॉसिल्सकडे लक्ष गेलं,फ्रेंच सैन्यातल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात १७६९ साली स्वित्झर्लंडमध्ये कव्हिंएचा जन्म झाला.वयाच्या चौथ्या वर्षातच तो वाचायला लागला.

त्याचं वाचन आणि त्याची स्मरणशक्ती एवढी दांडगी होती,की त्याच्या १९००० पुस्तकं असलेल्या वाचनालयातल्या कुठल्याही पुस्तकातला कुठलाही परिच्छेद तो तोंडपाठ म्हणू शके अशी त्याच्याविषयीची (दंत) कथा त्यावेळी प्रसिद्ध होती.!


कुव्हिए हा उत्क्रांतिवादी नक्कीच नव्हता.त्याचा तो विरोधकच होता.पण नकळतच त्यानं उत्क्रांतिवादाला खरं तर मदतच केली होती.त्यानं जीवाश्मांचा (फॉसिल्स) खूप अभ्यास केला.जेव्हा एखाद्या खडकात कुठलेही फॉसिल्स सापडतात,तेव्हा ते त्या काळाविषयी खूपच माहिती सांगत असतात.त्यामुळे या फॉसिल्सकडे नुसतीच एक 'कलेक्टर्स आयटेम' असं न बघता एक ऐतिहासिक गोष्ट,एक ऐतिहासिक पुरावा असंच बघितलं जावं हा त्याचा आग्रह असे.याचा उपयोग कव्हिएनं पृथ्वीचा इतिहास स्पष्ट करण्यासाठी केला.त्यानं लिनियसच्या वर्गीकरणाच्या पद्धतीतही बऱ्याच सुधारणा सुचवल्या.कुव्हिएच्या कामामुळे शास्त्रीय संशोधनाला खूपच आदरणीय वागणूक मिळायला लागली.


कुव्हिएनं या फॉसिल्सचा,ते कोणत्या स्ट्रॅटामध्ये आढळतात याचा आणि त्यांच्यातल्या साम्य आणि फरकाचा अ‍ॅनॅटॉमीच्या दृष्टीनं काळजीपूर्वक अभ्यास केला.त्यांच्यातले साम्य आणि भेद यांची त्यानं व्यवस्थित टिपणं काढून ठेवली.या अभ्यासातून त्यानं 'कम्परेटिव्ह अ‍ॅनॅटॉमी'चा पाया घातला.त्यानं हा अभ्यास इतका तपशीलवार केला होता,की एखाद्या प्राण्याची काहीच हाडं सापडली तर तो इतर हाडं कशी असू शकतील? त्याला जोडले गेलेले स्नायू कसे असतील आणि त्या संपूर्ण प्राण्याचाच आकार कसा असेल हे तो केवळ अंदाजानंच जवळपास अचूक सांगू शकत असे! या सगळ्यावरून प्राचीन काळी नेमके कसे प्राणी अस्तित्वात असतील याचा एकंदर अंदाज येणं शक्य झालं.यापुढे कुव्हिएनं स्पिशीजच्या वर्गीकरणाबद्दल अभ्यास केला.त्यानं लिनियसनं केलेल्या वर्गीकरणाचाही अभ्यास केला होता.

लिनियसनं सांगितलेल्या क्लासेसमध्ये त्यानं आणखी भर घातली. पाठीचा कणा नसलेल्या इनव्हर्टिब्रेट्समध्ये कव्हिएनं आर्टिक्यूलाटा,मोलुस्का आणि रॅडिएटा हे आणखी तीन भाग पाडले.मोठ्या गृप्सना त्यानं फायला (एकवचन : फायलम) मध्ये विभाजित केलं.आता ही संकल्पना वाढून आता जवळपास पंधरा फायला आहेत.लिनियसनं आपला अभ्यास वनस्पतींवर आणि त्यातून बाहेरून दिसणाऱ्या वैशिष्ट्यांवर आधारित केला होता. त्यापुढे जाऊन कुव्हिएनं सजीवांमधल्या स्ट्रक्चर आणि फंक्शनवरून सजीवांच्या दोन स्पिशीजमध्ये काही साम्य आढळतंय का याचा अभ्यास केला. याच प्रकारचा अभ्यास स्वीस बॉटनिस्ट ऑगस्टिन पॅरामस दे कँडोल (Augustin Pyramus de Candolle) (१७७८ ते १८४१) यानं केला.


प्राण्यांच्या काही अवशेषांवरून कव्हिए संपूर्ण प्राणी कल्पना करून तयार करू शकत होता.पण वनस्पतींच्या बाबतीत तर थोड्याशा भागापासून त्या प्रकारच्या सगळ्याच वनस्पतींची कल्पना येत होती आणि यातून वनस्पतींचं फायलम,सबफायलम आणि आणखी डिटेल्ड वर्गीकरण करणं शक्य झालं.यातून 'पॅलिओअँटॉलॉजी' या पुरातन जीवाश्मांच्या अभ्यासाची शाखा निर्माण झाली.


कुव्हिएनं पाहिलेले फॉसिल्स हे चक्क उत्क्रांती कशी झाली असावी याची कल्पना देत होते! जमिनीलगतचे फॉसिल्स हे जास्तीत जास्त आताच्या जिवंत प्राणी किंवा वनस्पतींसारखे होते.जमिनीच्या जितकं खोलवर एखादं फॉसिल सापडेल तितकं ते आताच्या सजीवांपेक्षा वेगळं आणि प्राथमिक दिसत होतं. हे सगळे फॉसिल्स जमिनीलगतच्या थरापासून ते खोलवरच्या स्ट्रॅटापर्यंत अशी लावली तर ती चक्क हळूहळू बदलत असलेली दिसत होती.


सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन 


पण गंमत म्हणजे कव्हिए लिनियससारखाच देवभोळा माणूस होता.हे विश्व आणि त्यातले सजीव देवानं एकाच वेळी निर्माण केलं अशी त्याचीही धारणा होती.


समोर धडधडीत पुरावा दिसत असूनही त्यानं उत्क्रांतीची कल्पना मांडणं तर सोडाच,पण एक स्पिशीज हळूहळू बदलून त्यापासून कालांतरानं वेगळी स्पिशीज निर्माण होत असावी यावरही त्याचा विश्वास बसत नव्हता! मग स्पिशीजमध्ये बदल का होत असावेत याचं स्पष्टीकरण देणारी दुसरीच संकल्पना त्यानं स्वीकारली.पृथ्वी खूपच जुनी होती हे तर आता सगळ्यांनीच मान्य केलं होतं. पण पृथ्वीवर वेळोवेळी भीषण आपत्ती येत गेल्या आणि त्यात त्या वेळी अस्तित्वात असणाऱ्या सगळ्याच प्राण्यांचा नाश झाला आणि काही वेळानंतर पुन्हा नव्यानं वेगळ्याच प्राण्यांनी जन्म घेतला असं तो आता मानायला लागला होता!त्यामुळे त्याला फॉसिल्सच्या स्पष्टीकरणासाठी उत्क्रांतीची गरज नव्हती आणि त्यामुळे बायबलमध्ये सांगितलेली सजीवांची निर्मिती ही शेवटच्या प्रलयानंतर झालेली गोष्ट खरी ठरत होती !


फॉसिल्स जमिनीत खोलवर कसे पसरत गेलेत हे सांगण्यासाठी कव्हिएच्या मते ४ प्रलय होणं गरजेचं होतं.पण नंतर जसजसे आणखी अनेक फॉसिल्स सापडत गेले तसतसं याचं स्पष्टीकरण देणं अवघड होऊन बसलं.पण गंमत म्हणजे कव्हिएचे समर्थक तर इतिहासात चक्क २७ प्रलय होऊन गेल्याची शक्यता वर्तवत होते !


हे प्रलय मात्र हटननं सांगितलेल्या सगळ्या स्ट्रॅटासारखेच असतात या नियमाशी फारकत घेत होती. त्यानंतर मग १८३० साली स्कॉटिश भूरचना अभ्यासक चार्ल्स ल्येल (Charles Lyell) यानं आपलं प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी हे ३ खंडातलं पुस्तक प्रकाशित केलं.त्यात त्यानं हटनच्या नियमांना दुजोराच दिला होता.शिवाय,त्यात त्यानं पृथ्वीवर असे काही प्रलय वगैरे आले नव्हते तर जमिनीच्या स्ट्रॅटामध्ये झालेले सगळे बदल हे प्रलय आल्यामुळे अचानक झालेले नसून हळूहळू झालेले बदल आहेत.ल्येलच्या लिखाणातून कोणत्याही विशिष्ट काळी पृथ्वीवरचे सगळे जीव एकाच वेळी नष्ट झाले असं दाखवणारा कोणताच पुराचा नसल्याचंही स्पष्ट होत होतं.कुव्हिएनं ज्यावेळी प्रलय आला होता असं सांगितलं होतं तेव्हादेखील पृथ्वीवर काही सजीव अस्तित्वात होतेच असंही ल्येलच्या प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजीमधून स्पष्ट होत होतं.खरं तर पृथ्वीवर आजही असेही काही सजीव आहेत,की जे मागच्या काही लाख वर्षांपासून बदल न होता आजतागायत तसेच आहेत.खरं तर प्रलयाची संकल्पना ही उत्क्रांतिवादाच्या संकल्पनेच्या आड येणारी शेवटची संकल्पना होती.आणि ल्येलच्या लिखाणातून तीही खोटी ठरली आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात उत्क्रांतीची संकल्पना विकसित होण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली.

आता बायॉलॉजीच्या क्षेत्रात क्रांतिकारक संकल्पना घेऊन येणाऱ्या ताऱ्याचाही उगम झाला होता.त्याचं नाव चार्ल्स रॉबर्ट डार्विन !



१२/८/२५

१२७ तासांची झुंज / 127 hours of fighting

अ‍ॅरन रॅल्स्टनने लिहिलेलं 'वन ट्रॅटीसेवन अवर्स -बिट्विन अ रॉक अँड अ हार्ड प्लेस' हे पुस्तक अंगावर काटा आणतं.मुख्य म्हणजे या संकटातून बाहेर पडून सुरळीत आयुष्याला सुरुवात करेपर्यंतचा त्याचा लढा या पुस्तकात आलेला आहे. इच्छाशक्तीचं बळ म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.


°….तरी तू रक्तप्रवाह कसा थांबवणार? नाही तर सुटका होऊनही रक्तस्रावाने मरण येईल.'अ‍ॅरनला कल्पना सुचते,की पाण्याच्या बाटलीची रबरी नळी वापरून त्याची आवळपट्टी तयार करायची.

त्यामुळे रक्तप्रवाह रोखायला मदत होईल.शिवाय त्याने घातलेल्या दोन शॉट्सपैकी लायक्रा कापडाची शॉट्स जखमेवर गुंडाळता येईलअसाही तो विचार करून ठेवतो.पण चाकूने हाड कापलं जाणं शक्य नाही हे माहिती असल्यामुळे हे सगळे बरेच लांबचे उपाय आहेतअसं दुसरं मन त्याच वेळी त्याला सांगत असतं.


पण तरीही अ‍ॅरन एकदा प्रयत्न करून बघायचं ठरवतोच.रबरी नळीची आवळपट्टी बांधून तो चाकू मनगटाजवळ नेतो.पण कापायला सुरुवात करण्याआधी त्याचं मन ओरडतं,'अ‍ॅरन,हे काय करतोयस?ही आत्महत्या आहे.तुझ्याकडे कितीही चांगली आवळपट्टी आणि कसलंही कापड असलं तरी तू रक्तस्राव थांबवू शकणार नाहीस.असा वेडेपणा करू नकोस.'अ‍ॅरनचं मन त्याला पुढे जाऊच देत नाही.पूर्ण हरलेल्या अवस्थेत अ‍ॅरनला आपल्या आई-वडिलांची,बहिणीची,मित्र-मैत्रिणींची आठवण होते.


त्यांच्याबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण,त्यांच्यासोबत केलेली भटकंती,त्यात झालेले अपघात,गेट-टुगेदर्स,आवडीच्या कॉन्सर्ट्स अशा किती तरी आठवणी त्याला आठवत राहतात.या आपल्या माणसांशी बोलण्याच्या तीव्र इच्छेतून तो आपला व्हिडिओ कॅमेरा बाहेर काढतो.तो दगडावर ठेवून या साऱ्यांना उद्देशून तो बोलू लागतो.कॅमेरा फिरवून काय काय घडलं ते सगळं सांगतो.


दगडामागे अडकलेला हात दाखवतो.जगाच्या दृष्टीने अस्तित्वात नसलेल्या या घळीत अडकल्यावर तुम्हा साऱ्यांच्या प्रेमाची किंमत मला अधिकच कळते आहे,असं म्हणताना त्याला रडू फुटतं.आपल्या वेडेपणामुळे आपल्या जिवलग मंडळींना किती त्रास होणार आहे याचा विचार करून त्याला प्रचंड अपराधी वाटतं;पण या भावना आवरत तो तटस्थपणे स्वतःची परिस्थिती नोंदवतो.आत्तापर्यंत सुटकेसाठी काय काय प्रयत्न केले, यापुढचा प्लॅन काय वगैरे बोलून तो कॅमेरा बंद करतो. उद्या आपण इथेच मरून गेलो तर किमान आपल्या जवळच्या लोकांना आपलं काय झालं हे तरी कळेल,या विचाराने त्याला थोडं बरं वाटतं.


रात्र होऊ लागलेली असते.थोडीही ऊब नसणारी काळोखी थंड रात्र.डासांची झुंड अ‍ॅरनवर हल्ला करते. डास मारताना त्याच्या मनात येतं,डास खाल्ले तर? या विचाराने अ‍ॅरनचमकतो. खरं तर अजून त्याच्याकडे बर्गरचा एक छोटा तुकडा असतो.पण बहुतेक सलग दोन दिवस झोप न झाल्यामुळे त्याचे विचार भरकटायला सुरुवात झालेली असते.


तिसरा दिवस उजाडतो.संपत चाललेलं अन्न-पाणी आणि झोप न मिळाल्यामुळे खालावलेली तब्येत सोडली तर परिस्थिती 'जैसे थे' असते.पहिल्यांदा अ‍ॅरनला देवाची प्रार्थना करावीशी वाटते.तो म्हणतो, 'देवा,मला तुझी मदत हवी आहे.मला सुचणारे सगळे उपाय करून झाले.आता पुढे काय ? तूच काही तरी दिशा दाखव.काही तरी इशारा कर की ज्यातून मला पुढे काय करायचं ते कळेल.' अर्थातच काही घडत नाही.थोड्यावेळाने अ‍ॅरन पुन्हा प्रार्थना करू लागतो.या वेळी सैतानाची.'देव व्यस्त असल्यामुळे तुला साकडं घालतोय.मला मदत कर. त्या बदल्यात मी तुला माझा हात द्यायला तयार आहे.तू म्हणत असशील तर मी पुन्हा कधीही ट्रेकिंग करणार नाही,पण मला यातून वाचव.' उपहासाने भरलेले स्वतःचे शब्द ऐकून तो स्वतःच हसत सुटतो.

त्याही परिस्थितीत तो स्वतःची खिल्ली उडवू शकतो !


तिसरा दिवस चढत जातो तसं सुटकेची वाट बघत राहण्याचा अ‍ॅरनला कंटाळा येऊ लागतो.घशाला-तोंडाला ओठांना पडणारा शोष आता असह्य होऊ लागलेला असतो. त्यामुळे सुटकेसाठी प्रयत्न तरी करत राहायला हवेत असं त्याला वाटतं.अ‍ॅरन ठरवतो,हात कापून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करायचाच.

रबरी नळी हाताला आवळपट्टी म्हणून बांधून तो पुन्हा एकदा चाकू हातात घेतो.कोपराच्या थोडं खाली तो चाकूने कापायला सुरुवात करतो,पण काही केल्या चाकू त्याच्या त्वचेत घुसतच नाही.थांबून तो पुन्हा एकदा प्रयत्न करतो,पण पुन्हा तेच.अखेर कंटाळून तो आवळपट्टी काढून टाकतो.तेव्हा त्यानेच चाकू लावलेल्या ठिकाणी दोन लाल रेषा उमटतात.तेवढाच त्याने प्रयत्न केल्याचा पुरावा.चला,म्हणजे आता सुटकेची किंवा मृत्यूची वाट पाहत राहण्याशिवाय पर्याय नाही.बहुतेक मृत्यूची गाठच आधी पडण्याची शक्यता अ‍ॅरनला जास्त वाटत असते.कारण आता पाण्याचा साठा संपत चाललेला असतो.आदल्या रात्री ठरलेल्या तीन वेळांमध्ये तीन घोट प्यायल्यावर अ‍ॅरनकडचं जवळपास सगळं पाणी संपलेलं असतं.एक घोट काय तो शिल्लक असतो.बर्गरचाही एकच तुकडा राहिलेला असतो.पण भुकेची त्याला फारशी चिंता नसते.तहानेने तो व्याकूळ झालेला असतो.सगळं शरीर पाण्याची याचना करत असतं.बाकी काहीही सहन करणं शक्य आहे,पण ही तहान आणि रात्री हाडं गोठवणारा वारा सहन करणं अशक्य.या परिस्थितीत स्वतःला आणून टाकल्याबद्दल तो पुन्हा एकदा स्वतःला शिव्याशाप देत राहतो.अगदी शेवटच्या क्षणी भेटलेल्या मुलींमुळेही आपल्याला मागे फिरण्याची संधी होती.पण जणू याच संकटाला भेटण्यासाठी आपण अधीर होतो... एकट्याने बाहेर पडताना आपला ठावठिकाणा सांगण्याचे कष्ट घ्यायचे नसतील तर तुला हे भोगावंच लागणार.तिसऱ्या दिवशी अ‍ॅरनला पहिल्यांदाच लघवी लागल्याची जाणीव होते.आपण ही घळ खराब करतोय या अपराधी भावनेने त्याला वाईट वाटतं,पण इलाज नसतो.आपलं सामान खराब होणार नाही याची काळजी घेत तो लघवी करतो.आश्चर्य म्हणजे एवढ्या डीहायड्रेशननंतरही त्याची लघवी बऱ्यापैकी स्वच्छ आणि वासरहित असते.त्याच दिवशी दुपारी त्याला पुन्हा एकदा लघवीची जाणीव होते.त्याच क्षणी त्याचं मन त्याला सांगतं,'अ‍ॅरन ही लघवी भरून ठेव.तुला त्याची गरज पडणार आहे. वाळवंटामध्ये पाण्याअभावी माणसांनी स्वतःची लघवी पिऊन जीव तगवल्याची उदाहरणं त्याला माहिती असतात.त्यामुळे फार विचार न करता एका रिकाम्या बाटलीत तो लघवी करतो.या वेळेची लघवी मात्र पिवळी आणि वास येणारी असते.ती प्यावी की नाही हे त्याला ठरवता येत नाही.वास आणि चवीपेक्षाही आपल्या डीहायड्रेट झालेल्या शरीराने बाहेर टाकून दिलेलं पाणी पुन्हा शरीरात घालण्याने काही होणार नाही ना,याची त्याला काळजी असते.पण सध्या तरी तो निर्णय पुढे ढकलून टाकतो.पण त्याच्या मनात हे द्वंद्व किती तरी तास सुरूच राहतं.स्वतःच्या शरीरातला उत्सर्जित द्रव प्यावा की नाही ? थोड्या वेळाने पाहतो तो बाटलीत त्या द्रवाचे दोन भाग होऊन त्यातल्या त्यात स्वच्छ भाग वरच्या बाजूला जमा झालेला असतो.अ‍ॅरन विचार करतो,आपल्याकडे पाणी आहे तोपर्यंतच हा प्रयोग करून पाहावा.बाटली उचलून एक छोटा घोट तो तोंडात घेतो आणि गपकन पिऊन टाकतो.


मंगळवार सकाळ.अ‍ॅरनला या घळीत अडकून अडीच दिवस होऊन गेलेले असतात.आता त्याचं मन पूर्ण वेळ फक्त पाण्याचा विचार करत असतं.त्याच्याकडे उरलेला पाण्याचा शेवटचा घोट म्हणजे त्याच्याकडे उरलेला वेळ आहे,त्याचं आयुष्य आहे,असं त्याला वाटत असतं. पाणी संपलं की वेळ संपला आणि आयुष्यही.त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने जीभ ओली करण्यापुरते एक-दोन थेंब तो तोंडात टाकत असतो.त्या दिवशी अ‍ॅरन पुन्हा एकदा हात कापण्याचा प्रयत्न करून बघायचं ठरवतो.आज त्याला आदल्या दिवशीच्या तुलनेत थोडं यश मिळतं.चाकू एकदाचा त्याच्या हातात घुसतो.वेदना सहन करत करत तो पोहोचतो.त्याच्या चाकूला हाताचं हाड लागत.त्याचा शस्त्रक्रिया प्रयोग पन्हा चाकू चालवत राहतो आणि अखेरीस थोड्या वेळाने डेड एंडपाशी येऊन एकदा थांबतो.पण जखमेतून फारसा रक्तस्त्राव होत नाही.एवढी एक जमेची व्हिडिओत नोंदवतो आणि स्वतःला शाबासकी देण्यासाठी उरलेला पाण्याचा बाजू. लगेचच व्हिडिओ रेकॉर्डर काढून तो आपलं शस्त्रक्रिया कौशल्य कॉर्मेट्रीसह घोट पिऊन टाकतो.पाणी किती वेळ पुरेल याचा विचार करत बसण्यापेक्षा आता पाणी नाही ही वस्तुस्थिती मान्य करणं जास्त सोपं जाईल असं अ‍ॅरनला वाटतं.बर्गरचा एक छोटा तुकडा आणि स्वतःची लघवी याशिवाय दुसरं काहीही नाही.


आता काऊंटडाऊन सुरू..


मंगळवारचा उरलेला दिवस अ‍ॅरन आपल्या आई-वडिलांशी,

बहिणीशी आणि मित्रमैत्रिणींशी व्हिडिओवर बोलण्यात घालवतो.

आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुठल्या वस्तू कुणाला द्याव्यात याची तो निरवानिरव करतो.त्याच्या धाकट्या बहिणीचं लवकरच लग्न होणार असतं.तिच्यासाठी आणि तिच्या भावी नवऱ्यासाठी तो खास शुभेच्छा देतो.देवाची प्रार्थना करतो.पण आता सुटकेसाठी मदत कर,असं म्हणण्याचं काहीही कारण उरलेलं नसतं.तो देवाकडे फक्त संयम मागतो.स्वतःचा आब राखून मी मृत्यूला सामोरा जाऊ शकेन अशी शक्ती दे,एवढंच त्याचं मागणं असतं.असं अ‍ॅरनला वाटत असतं; पण तसं घडत नाही. बुधवार सकाळ उजाडते,घळीत कदाचित मंगळवारी रात्रीच आपण संपून जाऊ अडकल्यानंतरची चौथी सकाळ. डीहायड्रेशन आणि तब्बल चार दिवस एक क्षणही झोप न झाल्यामुळे आता अ‍ॅरन बराच काळ ग्लानीतच असतो.अर्धवट शुद्धीत त्याला अनेक भास होत असतात.कधी आई-वडील,तर कधी कुठले कुठले मित्र समोर दिसत असतात.न झोपताही तो स्वप्न पाहत असतो.जणू एका वेगळ्याच ग्रहावर तो वावरतो आहे.


असं त्याला वाटत असतं.डीहायड्रेशनमुळे आपण मरून जाऊ शकतो याचा अंदाज त्याला पहिल्याच दिवशी आलेला असतो.पण ते मरण इतकं अंत पाहणारं आणि तिळतिळ शक्ती शोषून घेणारं असेल याची त्याला कल्पना नसते.त्यापेक्षा धो धो पाऊस कोसळून त्या पाण्यात बुडून मेलेलं चांगलं,असं त्याला वाटतं.पण जेव्हा जेव्हा तो शुद्धीत असतो तेव्हा एकीकडे शरीराच्या शक्तीविरुद्ध सुटकेचा नवा प्रयत्न करण्याचे विचारही त्याच्या मनात येत राहतात.खाली पडलेल्या छोट्या दगडांचा हातोडीसारखा वापर करून आपल्याला जखडून ठेवणारा दगड फोडता येतो का असाही प्रयत्न तो करून पाहतो.मृत्यूच्या दारात उभा असतानाही जगण्यासाठी शेवटपर्यंत हात-पाय मारत राहण्याची जिद्द संपत नाही.अंगातली शक्ती संपत आलेली असताना दगड उचलून ते हातोड्यासारखे मारण्याची शक्ती त्याच्यात कुठून येते हेही अजबच ! तब्बल चार दिवस आपण या टोकाच्या परिस्थितीत टिकाव धरून राहिलो ही मोठी कामगिरी आहे याची जाणीव त्याही अवस्थेत अ‍ॅरनला असते.पण आजची रात्र मात्र शेवटची, याची त्याला खात्री असते.त्यामुळे घळीच्या भिंतीवर तो चाकूने कोरून स्वतःचं नाव,जन्मतारीख लिहितो आणि त्यापुढे मृत्यूची तारीख लिहितो ३० एप्रिल २००३.


पण त्याचं शरीर अन् मन त्याचा हा विश्वास खोटा पाडतं.गुरुवारची सकाळ उजाडते.शुद्धी-बेशुद्धीच्या सीमारेषेवर तरंगत असतानाच त्याला एक स्वप्न पडतं. त्याच्यासोबत एक छोटा मुलगा खेळत असतो.त्या ट्रान्समध्येही त्याला जाणवतं,की हा आपलाच मुलगा आहे.पंजा नसलेल्या उजव्या हाताचा आधार देऊन अ‍ॅरन त्या मुलाला डाव्या कडेवर उचलून घेतो.दोघंही आनंदात हसत-खिदळत असतात.या ट्रान्समधून तो बाहेर येतो तेव्हा त्याचं मन त्याला ओरडून सांगतं,तू जगणार आहेस ! गुरुवारी सकाळी त्याला एक नवा शोध लागतो विचित्र घाणेरडा वास येत असतो.

त्याच्या लक्षात येतं की आपला दगडामागे अडकलेला हात सडायला सुरुवात झाली आहे.त्या हाताची चाचपणी करताना त्याला अक्षरशः उन्मळून येतं.हात अडकल्या अडकल्या तो सोडवून घेण्यासाठी अ‍ॅरनने जसा थयथयाट केला तशीच अवस्था आत्ताही होते.त्या धडपडीत त्याचा हात दगडावर सारखा आपटतो आणि एक कल्पना त्याच्या मनात चमकून जाते.हाताला जोराचा हिसका देऊन तो दगडावर आपटला तर हाड तुटू शकत.चाकूने हाड तोडता न येणं हाच तर त्याच्या सूटकेतला अडथळा असतो.

अ‍ॅरन लगेचच प्रयत्न सुरू करतो.त्याच्या अंदाजाप्रमाणे खरोखर थोड्या धडकांनंतरच त्याच्या हाताचं हाड तुटतं.दगडामागे अडकलेला पंजा आणि त्याच्या खांद्याशी जोडला गेलेला हात आतून वेगळे होतात.आता फक्त वरचं मांस आणि त्वचा कापून काढली की झाली सुटका.अ‍ॅरन तातडीने चाकू काढून कामाला लागतो.एखाद्या चॉपिंग बोर्डवर चिकन ठेवून कापताना कसं वाटेल तसंच त्याला वाटत असतं.पण आता त्याचं ध्येय निश्चित असतं. बाकी कशाचाही विचार न करता तो यांत्रिकपणे चाकू चालवत राहतो.आता सुटका होणार,एवढ्या एका वाक्याचा नाद त्याला हाताच्या वेदनाही विसरायला लावत असतो... तो चाकू हातात घेतो तेव्हा सकाळचे १०.३० वाजलेले असतात.बरोबर साडेअकरा वाजता त्याचा हात पूर्ण कापला जातो .. आणि खरोखरच त्या प्रचंड शिळेपासून अ‍ॅरनची सुटका होते.हात अडकतो तेव्हा तो जेवढ्या अविश्वासाने त्याकडे पाहत राहिलेला असतो,त्याहीपेक्षा जास्त अविश्वासाने तो स्वतःच्या पुनर्जन्माकडे पाहत राहतो.अर्थात तुटलेला जखमी हात घेऊन त्या घळीतून चढून बाहेर येणं हेही मोठंच आव्हान असतं.त्याचा तोवर त्याने नीटसा विचारच केलेला नसतो.पण सुटका झाल्याच्या युफोरियामध्ये दोराच्या साह्याने हात तुटलेल्या अवस्थेतही अ‍ॅरन एका झपाट्यात ती तांत्रिक चढाई करतो.नशिबाने बाहेर पडल्यानंतर थोड्या वेळात त्याला एका डबक्यात साठलेलं पाणी मिळतं.पुढे आणखी थोड्या वेळ चालत गेल्यानंतर त्याला हायकिंगला आलेले नवरा-बायको आणि त्यांचा मुलगा भेटतात.अ‍ॅरनची अवस्था पाहून त्यांचीच बोबडी वळते.पण लवकरच ते सावरतात. त्यातली तरुण बाई पळत जाऊन पार्कच्या अधिकाऱ्यांना अ‍ॅरन बद्दल माहिती देते आणि लवकरच हेलिकॉप्टरच्या साह्याने त्याची सुटका केली जाते.


पाच दिवस मृत्यूच्या सोबत राहिल्यानंतर,स्वतःच्या मृत्यूची तारीख कोरल्यानंतर अ‍ॅरन पुन्हा जीवनाकडे परततो.


घळीत दगडाच्या तावडीतून सुटण्याची गोष्ट हा अ‍ॅरन

रॅल्स्टनच्या संघर्षकहाणीचा अर्धाच भाग आहे.त्याचा पुढचा भाग सुरू होतो तो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर. घळीत असताना तो जितक्या सहजपणे स्वतःचा हात कापतो,जितक्या ताकदीने रक्तस्राव होणारा तुटका हात घेऊन तिथून बाहेर पडतो,तितकीच किंवा त्याहूनही जास्त शक्ती त्याला उपचार सुरू असताना लावावी लागते.अपघाताचा धक्का आणि तिथून सुटण्याची टोकाची इच्छा यामुळे अ‍ॅरन च्या शरीर-मनाने आपली प्रतिकारशक्ती अन् सहनशक्ती कित्येकपटं वाढवलेली असते.सुटकेचा निःश्वास टाकल्यानंतर त्या सहनशक्तीची खरी परीक्षा सुरू होते.त्या काळात अ‍ॅरन कित्येकदा कोलमडतो.आता हे संपून जाऊ दे,असा विचार अ‍ॅरनच्या मनात घळीत अडकलेल्या अवस्थेपेक्षा जास्त वेळा हॉस्पिटलमध्ये असताना येत राहतो. अखेर आई-वडील आणि मित्रांच्या सोबतीने अखेर तेही दिवस पार होतात.आज अ‍ॅरन आपल्या कृत्रिम हातानिशी पुन्हा एकदा भटका गिरिप्रेमी म्हणून कार्यरत आहे.फरक एवढाच, की आता कुणालाही न सांगता तो एकटा कधीही, कुठेही जात नाही.■


मागील लेखाचा शेवटचा भाग….!