उत्क्रांतिवादाची कोणतीही थिअरी सिद्ध करताना एक मोठी अडचण होते.ती म्हणजे कोणत्याही स्पिशीजमध्ये बदल होतात हे दाखवणं.कारण कोणत्याही स्पिशीजमध्ये बदल हा खूप हळू होतो.थोडासा बदल व्हायला एका स्पिशीजला अनेक शतकं,
सहस्रकं किंवा कधीकधी लाखो-कोट्यवधी वर्षांचा काळ जातो आणि माणसाचं आयुर्मान जास्तीत जास्त ७०-८० वर्षं असेल तर एकच माणूस किंवा एखाद्या माणसाच्या किती पिढ्या हे बदल दाखवू शकणार? माणसाच्या ज्ञात इतिहासात तरी अशी एका स्पिशीजमधून दुसरी स्पिशीज निर्माण होताना माणसानं पाहिली नव्हती आणि अशी प्रक्रिया जर खरंच घडत असेल तर ती फारच हळू घडत असली पाहिजे.त्यातून बायबलनुसार खुद्द पृथ्वीचा जन्मच मुळी सहा हजार वर्षांपूर्वी होत होता.त्यामुळे इथे उत्क्रांतीला काहीही वाव नव्हता!
१७८५ साली यात बदल झाला.जेम्स हटन (James Hutton) (१७२६ ते १७९७) या स्कॉटिश डॉक्टरला भूरचनाशास्त्राचा अभ्यास करायचा छंद निर्माण झाला. भूरचनाशास्त्रात पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करतात. असा अभ्यास करताना त्यानं १७८५ साली 'थिअरी ऑफ अर्थ' नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं.
त्यात त्यानं वारा,पाण्याचा प्रवाह आणि हवामानामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर कसा परिणाम होतो ते सांगितलं होतं.या प्रक्रिया कायम एकाच वेगानं होतात हेही त्यानं त्यात सांगितलं होतं.त्यामुळेच प्रचंड उंच पर्वतांची निर्मिती किंवा मोठमोठ्या नद्यांच्या प्रवाहाची निर्मिती व्हायला हजारो वर्षांचा कालावधी लागला असणार आहे.त्यामुळेच पृथ्वीचं वय हे सहा हजार वर्ष असणं कधीही शक्य नाही, तर ते कित्येक लाख वर्ष असणं गरजेचं आहे.
पृथ्वीच्या वयाची ही संकल्पना स्वीकारली जायला तसा वेळच लागला.पण जमिनीच्या आतमध्ये गाडले गेलेले जीवाश्मांचे हजारो वर्षं जुने अवशेष पाहता बायॉलॉजिस्ट्सनी ही संकल्पना लगेचच उचलून धरली. जीवाश्म या शब्दासाठी वापरला जाणारा इंग्रजी 'फॉसिल' हा शब्द खोदणे या अर्थाच्या मूळ लॅटिन शब्दावरून आलेला आहे. पूर्वी हा शब्द कोणत्याही जमिनीतून खणून काढलेल्या वस्तूसाठी वापरला जात होता.पण नंतर मात्र हा शब्द फक्त जीवाश्मांसाठी वापरला जातो.जीवाश्म ही खरं तर प्राण्यांसारखी दिसणारी दगडंच असतात.पण कोणत्याही दगडांमध्ये असे प्राण्यांचे आकार आपोआप कसे काय कोरले जातील? या प्रश्नानं मग बायॉलॉजिस्ट्सना काही काळ सतावलं.
आणि मग यातून असा निष्कर्ष आला,की प्राण्यांच्या आकाराची ही दगडं म्हणजे पूर्वी खरंच जिवंत असणारे प्राणीच असावेत आणि काही कारणांनी ते जमिनीत गाडले जाऊन दगडांत रूपांतरित झाले असावेत.काहींनी त्यातूनही असं सुचवलं की हे नोहाच्या पुरात (Noah's Flood) मारल्या गेलेल्या प्राण्यांचे अवशेष असतील.पण जर हटननं सांगितल्याप्रमाणे पृथ्वी जर खूपच जुनी असेल तर हे प्राणीही फार फार पुरातन काळी जमिनीत गाडले गेले असतील आणि त्यांच्या मूळ हाडा-मांसाचं रूपांतर हळूहळू माती-दगड झाले असतील.या जीवाश्मांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन विल्यम स्मिथ (William Smith) (१७६९ ते १८३९) यानं दिला.स्मिथ हा ब्रिटिश सर्व्हेअर होता. नंतर तो भूरचना अभ्यासक झाला. त्या काळी अनेक ठिकाणी कालवे बांधण्याचं काम चालू होतं.खोदून ठेवलेल्या कालव्यांच्या मार्गाचं सर्वेक्षण करणं हे त्याचं काम होतं.या कामातून त्याला अनेक ठिकाणी खोदलेल्या भूभागाचं निरीक्षण करण्याची संधी आपोआपच मिळत गेली.तेव्हा जमिनीखालच्या वेगवेगळ्या प्रकारचे खडकांचे थर हे एकमेकांना समांतर असतात हे त्यानं शोधून काढलं.(म्हणजे एखाद्या ठिकाणी सगळ्यात वरचा थर हा ३ मीटर उंचीचा असेल आणि त्याच्या खालचा थर हा त्याखाली ४ मीटर उंचीचा असेल तर दुसऱ्या ठिकाणीही तो तसाच पहिला थर ३ मीटर आणि त्याखाली ४ मीटर उंचीचा असतो.) याशिवाय,प्रत्येक थराची (स्ट्राटा) स्वतंत्र वैशिष्ट्यंही असतात याचंही त्यानं निरीक्षण केलं.प्रत्येक स्ट्रॅटामध्ये आढळणाऱ्या फॉसिल्सची वैशिष्ट्येही सारखीच असतात.प्रत्येक स्ट्रॅटा कसाही वाकलेला,दुमडलेला किंवा विस्कळीत झालेला असेल तरीही त्या त्या स्ट्रॅटाची वैशिष्ट्ये कायम राहतात.इतकंच नाही तर एखादा स्ट्राटम (स्ट्रॅटाचं एकवचन) एखाद्या ठिकाणाहून तुटून काही मैल दूर अंतरावर सापडला तरी त्या स्ट्रॅटाची वैशिष्ट्ये बदलत नाहीत,तीच राहतात हे स्मिथनं दाखवून दिलं.गंमत म्हणजे प्रत्येक स्ट्रॅटामध्ये आढळून येणारं फॉसिलही त्या त्या स्ट्रॅटामध्येच सापडत होतं.नंतर नंतर तर स्मिथ हे स्ट्रॅटा ओळखण्यात इतका पटाईत झाला,की फक्त फॉसिल बघूनच तो ते कोणत्या स्ट्रॅटामध्ये असेल ते ओळखायला लागला ! जमिनीचे थर हे हळूहळू पण एकाच वेगानं आणि सगळीकडे सारख्याच प्रकारे निर्माण झालेले असतील हा हटनचा दृष्टिकोन बरोबर असेल तर एखादा स्ट्रॅटा जमिनीत जितका खोल असेल तितका तो जुना असेल असं म्हणायला पुरेसा वाव होता.आणि जर फॉसिल्स हे खरोखरच कधीकाळी जिवंत असलेल्या प्राण्यांचे अवशेष असतील तर फॉसिल जितका खोल तितका तो प्राणी पूर्वीच्या काळात होऊन गेला असं म्हणता येत होतं.
फ्रेंच बायॉलॉजिस्ट जॉर्जेस लिओपोल्ड कुव्हिए (Georges Leopold Cuvier) (१७६९ ते १८३२) या फ्रेंच बायॉलॉजिस्टचं या फॉसिल्सकडे लक्ष गेलं,फ्रेंच सैन्यातल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात १७६९ साली स्वित्झर्लंडमध्ये कव्हिंएचा जन्म झाला.वयाच्या चौथ्या वर्षातच तो वाचायला लागला.
त्याचं वाचन आणि त्याची स्मरणशक्ती एवढी दांडगी होती,की त्याच्या १९००० पुस्तकं असलेल्या वाचनालयातल्या कुठल्याही पुस्तकातला कुठलाही परिच्छेद तो तोंडपाठ म्हणू शके अशी त्याच्याविषयीची (दंत) कथा त्यावेळी प्रसिद्ध होती.!
कुव्हिए हा उत्क्रांतिवादी नक्कीच नव्हता.त्याचा तो विरोधकच होता.पण नकळतच त्यानं उत्क्रांतिवादाला खरं तर मदतच केली होती.त्यानं जीवाश्मांचा (फॉसिल्स) खूप अभ्यास केला.जेव्हा एखाद्या खडकात कुठलेही फॉसिल्स सापडतात,तेव्हा ते त्या काळाविषयी खूपच माहिती सांगत असतात.त्यामुळे या फॉसिल्सकडे नुसतीच एक 'कलेक्टर्स आयटेम' असं न बघता एक ऐतिहासिक गोष्ट,एक ऐतिहासिक पुरावा असंच बघितलं जावं हा त्याचा आग्रह असे.याचा उपयोग कव्हिएनं पृथ्वीचा इतिहास स्पष्ट करण्यासाठी केला.त्यानं लिनियसच्या वर्गीकरणाच्या पद्धतीतही बऱ्याच सुधारणा सुचवल्या.कुव्हिएच्या कामामुळे शास्त्रीय संशोधनाला खूपच आदरणीय वागणूक मिळायला लागली.
कुव्हिएनं या फॉसिल्सचा,ते कोणत्या स्ट्रॅटामध्ये आढळतात याचा आणि त्यांच्यातल्या साम्य आणि फरकाचा अॅनॅटॉमीच्या दृष्टीनं काळजीपूर्वक अभ्यास केला.त्यांच्यातले साम्य आणि भेद यांची त्यानं व्यवस्थित टिपणं काढून ठेवली.या अभ्यासातून त्यानं 'कम्परेटिव्ह अॅनॅटॉमी'चा पाया घातला.त्यानं हा अभ्यास इतका तपशीलवार केला होता,की एखाद्या प्राण्याची काहीच हाडं सापडली तर तो इतर हाडं कशी असू शकतील? त्याला जोडले गेलेले स्नायू कसे असतील आणि त्या संपूर्ण प्राण्याचाच आकार कसा असेल हे तो केवळ अंदाजानंच जवळपास अचूक सांगू शकत असे! या सगळ्यावरून प्राचीन काळी नेमके कसे प्राणी अस्तित्वात असतील याचा एकंदर अंदाज येणं शक्य झालं.यापुढे कुव्हिएनं स्पिशीजच्या वर्गीकरणाबद्दल अभ्यास केला.त्यानं लिनियसनं केलेल्या वर्गीकरणाचाही अभ्यास केला होता.
लिनियसनं सांगितलेल्या क्लासेसमध्ये त्यानं आणखी भर घातली. पाठीचा कणा नसलेल्या इनव्हर्टिब्रेट्समध्ये कव्हिएनं आर्टिक्यूलाटा,मोलुस्का आणि रॅडिएटा हे आणखी तीन भाग पाडले.मोठ्या गृप्सना त्यानं फायला (एकवचन : फायलम) मध्ये विभाजित केलं.आता ही संकल्पना वाढून आता जवळपास पंधरा फायला आहेत.लिनियसनं आपला अभ्यास वनस्पतींवर आणि त्यातून बाहेरून दिसणाऱ्या वैशिष्ट्यांवर आधारित केला होता. त्यापुढे जाऊन कुव्हिएनं सजीवांमधल्या स्ट्रक्चर आणि फंक्शनवरून सजीवांच्या दोन स्पिशीजमध्ये काही साम्य आढळतंय का याचा अभ्यास केला. याच प्रकारचा अभ्यास स्वीस बॉटनिस्ट ऑगस्टिन पॅरामस दे कँडोल (Augustin Pyramus de Candolle) (१७७८ ते १८४१) यानं केला.
प्राण्यांच्या काही अवशेषांवरून कव्हिए संपूर्ण प्राणी कल्पना करून तयार करू शकत होता.पण वनस्पतींच्या बाबतीत तर थोड्याशा भागापासून त्या प्रकारच्या सगळ्याच वनस्पतींची कल्पना येत होती आणि यातून वनस्पतींचं फायलम,सबफायलम आणि आणखी डिटेल्ड वर्गीकरण करणं शक्य झालं.यातून 'पॅलिओअँटॉलॉजी' या पुरातन जीवाश्मांच्या अभ्यासाची शाखा निर्माण झाली.
कुव्हिएनं पाहिलेले फॉसिल्स हे चक्क उत्क्रांती कशी झाली असावी याची कल्पना देत होते! जमिनीलगतचे फॉसिल्स हे जास्तीत जास्त आताच्या जिवंत प्राणी किंवा वनस्पतींसारखे होते.जमिनीच्या जितकं खोलवर एखादं फॉसिल सापडेल तितकं ते आताच्या सजीवांपेक्षा वेगळं आणि प्राथमिक दिसत होतं. हे सगळे फॉसिल्स जमिनीलगतच्या थरापासून ते खोलवरच्या स्ट्रॅटापर्यंत अशी लावली तर ती चक्क हळूहळू बदलत असलेली दिसत होती.
सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन
पण गंमत म्हणजे कव्हिए लिनियससारखाच देवभोळा माणूस होता.हे विश्व आणि त्यातले सजीव देवानं एकाच वेळी निर्माण केलं अशी त्याचीही धारणा होती.
समोर धडधडीत पुरावा दिसत असूनही त्यानं उत्क्रांतीची कल्पना मांडणं तर सोडाच,पण एक स्पिशीज हळूहळू बदलून त्यापासून कालांतरानं वेगळी स्पिशीज निर्माण होत असावी यावरही त्याचा विश्वास बसत नव्हता! मग स्पिशीजमध्ये बदल का होत असावेत याचं स्पष्टीकरण देणारी दुसरीच संकल्पना त्यानं स्वीकारली.पृथ्वी खूपच जुनी होती हे तर आता सगळ्यांनीच मान्य केलं होतं. पण पृथ्वीवर वेळोवेळी भीषण आपत्ती येत गेल्या आणि त्यात त्या वेळी अस्तित्वात असणाऱ्या सगळ्याच प्राण्यांचा नाश झाला आणि काही वेळानंतर पुन्हा नव्यानं वेगळ्याच प्राण्यांनी जन्म घेतला असं तो आता मानायला लागला होता!त्यामुळे त्याला फॉसिल्सच्या स्पष्टीकरणासाठी उत्क्रांतीची गरज नव्हती आणि त्यामुळे बायबलमध्ये सांगितलेली सजीवांची निर्मिती ही शेवटच्या प्रलयानंतर झालेली गोष्ट खरी ठरत होती !
फॉसिल्स जमिनीत खोलवर कसे पसरत गेलेत हे सांगण्यासाठी कव्हिएच्या मते ४ प्रलय होणं गरजेचं होतं.पण नंतर जसजसे आणखी अनेक फॉसिल्स सापडत गेले तसतसं याचं स्पष्टीकरण देणं अवघड होऊन बसलं.पण गंमत म्हणजे कव्हिएचे समर्थक तर इतिहासात चक्क २७ प्रलय होऊन गेल्याची शक्यता वर्तवत होते !
हे प्रलय मात्र हटननं सांगितलेल्या सगळ्या स्ट्रॅटासारखेच असतात या नियमाशी फारकत घेत होती. त्यानंतर मग १८३० साली स्कॉटिश भूरचना अभ्यासक चार्ल्स ल्येल (Charles Lyell) यानं आपलं प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी हे ३ खंडातलं पुस्तक प्रकाशित केलं.त्यात त्यानं हटनच्या नियमांना दुजोराच दिला होता.शिवाय,त्यात त्यानं पृथ्वीवर असे काही प्रलय वगैरे आले नव्हते तर जमिनीच्या स्ट्रॅटामध्ये झालेले सगळे बदल हे प्रलय आल्यामुळे अचानक झालेले नसून हळूहळू झालेले बदल आहेत.ल्येलच्या लिखाणातून कोणत्याही विशिष्ट काळी पृथ्वीवरचे सगळे जीव एकाच वेळी नष्ट झाले असं दाखवणारा कोणताच पुराचा नसल्याचंही स्पष्ट होत होतं.कुव्हिएनं ज्यावेळी प्रलय आला होता असं सांगितलं होतं तेव्हादेखील पृथ्वीवर काही सजीव अस्तित्वात होतेच असंही ल्येलच्या प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजीमधून स्पष्ट होत होतं.खरं तर पृथ्वीवर आजही असेही काही सजीव आहेत,की जे मागच्या काही लाख वर्षांपासून बदल न होता आजतागायत तसेच आहेत.खरं तर प्रलयाची संकल्पना ही उत्क्रांतिवादाच्या संकल्पनेच्या आड येणारी शेवटची संकल्पना होती.आणि ल्येलच्या लिखाणातून तीही खोटी ठरली आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात उत्क्रांतीची संकल्पना विकसित होण्यासाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली.
आता बायॉलॉजीच्या क्षेत्रात क्रांतिकारक संकल्पना घेऊन येणाऱ्या ताऱ्याचाही उगम झाला होता.त्याचं नाव चार्ल्स रॉबर्ट डार्विन !