* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सूर्यपक्षी,तांबड्या मुंग्या व अर्जुन / Sunbirds,red ants and Arjuna

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१६/८/२५

सूर्यपक्षी,तांबड्या मुंग्या व अर्जुन / Sunbirds,red ants and Arjuna

कौरव व पांडव हे द्रोणाचार्यांचे विद्यार्थी.आपले सर्व विद्यार्थी अस्त्रविद्येत पटाईत झाले आहेत व सर्व प्रकारच्या शस्त्रविद्येत पारंगत झाले आहेत,असं पाहून लक्ष्यवेधासाठी अत्यंत आवश्यक अशी चित्ताची एकाग्रता त्यांच्या ठिकाणी किती बाणली आहे,याची परीक्षा घ्यायचं द्रोणाचार्यांनी ठरवलं. त्यांनी कारागिराकडून एक भासपक्षी तयार करून, त्याला एका झाडाच्या शेंड्यावर ठेवून दिला व आपल्या शिष्यांना त्याचा लक्ष्यवेध करावयास सांगितलं.परंतु लक्ष्यवेध करणं चौघा पांडवांना व कौरवांना जमलं नाही.त्यापूर्वी द्रोणाचार्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं समर्पक उत्तर देणंही त्यांना जमलं नाही.शेवटी त्यांनी अर्जुनास बोलावलं व त्याला सांगितलं की,"अर्जुना,तुला या लक्ष्यावर आता नेम धरावयाचा आहे. लक्ष्य नीट पाहून घे.मी आज्ञा देताक्षणी तुला बाण सोडावा लागेल." गुरूच्या आज्ञेप्रमाणे अर्जुनानं धनुष्य सज्ज करून व त्यावर बाण चढवून ते ताणलं.लक्ष्यावर आपली नजर स्थिर करून तो उभा राहिला.काही क्षणांत आचार्यांनी अर्जुनाला विचारलं की,"तुला भासपक्षी,झाड आणि मी हे सर्वच दिसतं काय?" त्यावर अर्जुन म्हणाला,"आचार्य! मला आपण,वृक्ष अथवा इतर कोणीही दिसत नाही.


मला फक्त भासपक्षी दिसतो." ह्याबरोबर आचार्यांना अतिशय आनंद झाला.नंतर त्यांनी पुन्हा विचारलं,"आताही तुला भासपक्षीच दिसतो काय?" एकाग्रचित्त अर्जुनानं सांगितलं,"मला फक्त भासपक्ष्याचं मस्तक दिसतं.बाकी त्याचा कोणताही अवयव दिसत नाही."द्रोणाचार्य अर्जुनाला एकदम म्हणाले,"सोड बाण." त्याबरोबर अर्जुनानं आपल्या तीक्ष्ण बाणानं त्या पक्ष्याचं डोकं तोडून खाली पाडलं.अर्जुन हा निष्णात धनुर्धारी होता.या परीक्षेनंतर अर्जुन जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेला. 


या विजयानंतर लोकांपासून दूर असलेल्या जंगलातील शांतता त्याला अनुभवायची होती. त्याला सारं जंगल लहानमोठ्या वनचरांनी भरलेलं दिसलं.परीक्षेचा त्याच्यावर खूप ताण पडला होता. कडक उन्हामुळे उकडत होतं.वारा घेण्यासाठी फांदी तोडावी म्हणून एका झाडाला हात लावताच त्यातून एक चिमुकला सूर्यपक्षी उडून त्याच्या हातावर बसला.त्याचा रंग निळा-जांभळा होता.चोच अणकुचीदार होती.डोळे बारीक मण्यांसारखे होते. तो धीटपणे अर्जुनाकडे पाहू लागला आणि मोठ्या नम्रपणाने अर्जुनाला म्हणाला,"हे बंधू,ही फांदी तोडू नकोस.कारण त्यात माझं घरटं आहे.

घरट्यात पिल्लं निजली आहेत." "घरटं?" असं म्हणत अर्जुनानं त्या फांदीत पाहिलं. मऊ गवत व जाळीनं तयार केलेलं घरटं पिशवीसारखं लोंबताना दिसलं.पुढे तो धिटुकला पक्षी म्हणाला, "हे घरटं मोठ्या प्रेमानं अन् कष्टानं बांधलं आहे.त्यात माझी तीन पिल्लं आहेत.त्यांना चारा भरवायचा आहे." इवलीशी चोच असलेली गोजिरवाणी पिल्लं घरट्यातून डोकावत होती.चारा घेण्यासाठी त्यांनी चोच वासली होती.


हे चिमुकल्या जिवा,तुला किंवा तुझ्या घरट्याला मी इजा करणार नाही." तो पक्षी अजूनही अर्जुनाच्या हातावर बसला होता. "जा.आता तुझ्या पिल्लांना भरव."


तो सूर्यपक्षी म्हणाला, "हे धनुर्धरा,कधीतरी आम्ही तुझ्या उपयोगी पडू."


आता अर्जुनानं किंचित उंच असलेल्या फांदीला धरलं.तोच काही चावऱ्या तांबड्या मुंग्या त्याच्या अंगाखांद्यावर पडल्या.

त्यानं वर पाहिलं तर त्याला हिरव्या पानांनी बांधलेली अनेक घरटी दिसली.ती त्या तांबड्या मुंग्यांची होती. पांढऱ्या जाळीनं पानं एकमेकांना जोडली होती. त्या मुंग्या म्हणाल्या,"हे बंधू, झाडाची फांदी तोडू नकोस.कारण त्यामुळे अनेक दिवसांपासून मोठ्या परिश्रमानं बांधलेल्या घरट्यांचा नाश होईल.या घरट्यात राणी मुंगी, कामकरी व शिपाई मुंग्या आहेत.आमची पिल्लं आहेत.साऱ्या फांदीवर लहान चेंडूसारखी घरटी दिसतात ती म्हणजे आमच्या गाईंचे गोठे आहेत. त्यात मातकट रंगाचे मावा जातीचे कीटक आहेत.


ते त्या पानांतून रस शोषून घेतात आणि आम्ही त्यांना दुधासाठी दोहतो.म्हणून हे बंधू,या फांद्या तोडू नकोस,अशी तुला विनंती आहे. भविष्यकाळात तुझ्या उपयोगी पडून आम्ही तुझे हे उपकार फेडू."


अर्जुन स्वतःशीच म्हणाला,"या वनात कितीतरी लहान जीव आहेत.त्यांना मी कसलाच अपाय करणार नाही. अर्थात मी कुठल्याच झाडाची फांदी तोडणार नाही." वनातून वाटचाल करीत असता त्याला वाटलं,"मी एक श्रेष्ठ धनुर्धारी व शस्त्रयोद्धा आहे.हे लहान जीव मला कोणती मदत करणार!"


या प्रसंगानंतर अनेक वर्षे लोटली.पाच पांडवांना कौरवांच्या अनेक षड्यंत्रातून जावं लागलं.अति दुःख भोगावं लागलं.ती सारी जण एकाच राजवाड्यात राहत होती.एकाच गुरूकडून विद्या शिकली होती.परंतु,कौरवांना पांडवांविषयी असूया वाटे.त्यांचा ते द्वेष करीत.शौर्यात कमी पडतात म्हणून पांडवांविरुद्ध अनेक षड्यंत्रं रचीत.


पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला होता.आता तेरावं वर्ष अज्ञातवासाचं होतं.अर्जुन भटकत होता. आता त्याच्या अंगावर ना चिलखत होतं ना हातात शस्त्र.तो बैराग्याच्या वेशात होता.अशा निर्मनुष्य वनात अर्जुनाला वाटसरूंच्या बोलण्याचा आवाज येत होता.अर्जुन एक शूर,धाडसी योद्धा होता. दरोडेखोरांच्या टोळीला देखील त्यानं शौर्यानं तोंड दिलं असतं.परंतु आजची परिस्थिती वेगळी होती. आता तो अज्ञातवासात होता.कोणी त्याला ओळखलं असतं तर संकट उभं राहिलं असतं.इतक्यात त्याला 'चीविट-चीविट' असा सूर्यपक्ष्याचा परिचित आवाज ऐकू आला.जणू काही तो एका झाडाकडे येण्यास खुणावत होता.अर्जुन त्या झाडाजवळ आला.त्या झाडात पुरुषभर उंचीची ढोली होती.अर्जुनानं लगेच त्यात उडी मारताच लाल मुंग्यांच्या झुंडीनं त्याचं मस्तक झाकलं आता तो दिसेनासा झाला.


( निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,

नागपूर … ) परंतु दुरून येणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीनं या नवख्या प्रवाशाला पाहिलं होतं.त्यांना आश्चर्य वाटलं की,इथेच तो दिसला,मग कुठे गायब झाला असावा. बैराग्याचा वेष घातलेली व्यक्ती असाधारण उंच व सुदृढ शरीराची होती हेही त्यांनी पाहिलं होतं.आजूबाजूला धुंडाळत असताना त्या उंच झाडाच्या ढोलीत त्यांनी डोकावून पाहिलं.तो इथे तर लपला नसावा?तोच सूर्यपक्ष्यानं त्यांच्या तोंडावर पंखांचा झपाटा मारला.चोचीनं टोचलं.त्या ढोलीत त्यांनी काठीनं डिवचण्याचा प्रयत्न केला;तोच असंख्य तांबड्या,चावऱ्या मुंग्या त्यांच्या अंगाखांद्यावर, डोक्यावर तुटून पडल्या.त्या त्यांना कडकडून चावल्या.त्यांना वाटलं,तो बैरागी त्या ढोलीत लपला असेल,तर त्या मुंग्यांनी त्याला एव्हाना ठार मारलं असेल.


नंतर काही वेळानं वनात जिकडेतिकडे शांतता पसरली.

'चीविट-चीविट-चीविट'असा आवाज करून धोका गेल्याची सूचना त्या सूर्यपक्ष्यानं अर्जुनाला दिली.अर्जुनाच्या मस्तकावरील मुंग्यांच्या झुंडी क्षणात बाजूला झाल्या.अर्जुन लगेच ढोलीबाहेर आला.त्यानं मोठ्या कृतज्ञतेनं त्या चिमुकल्या पाखराचे व मुंग्यांचे आभार मानले.त्या वेळी अर्जुनाला आठवलं की,काही वर्षांपूर्वी या लहान जीवांनी मला 'संकटकाळात मदत करू' असं वचन दिलं होतं,ते त्यांनी अशा रीतीनं पार पाडलं तर! त्यांच्या विषयीच्या कौतुकानं अर्जुनाचा ऊर भरून आला. या प्राणिमात्रांचं आपल्यावर प्रेम असल्याचं पाहून त्याला धन्यता वाटली अन् कृतज्ञतेनं एकदा त्यांच्याकडे पाहून त्यानं आपली वाट धरली.