अॅरन रॅल्स्टनने लिहिलेलं 'वन ट्रॅटीसेवन अवर्स -बिट्विन अ रॉक अँड अ हार्ड प्लेस' हे पुस्तक अंगावर काटा आणतं.मुख्य म्हणजे या संकटातून बाहेर पडून सुरळीत आयुष्याला सुरुवात करेपर्यंतचा त्याचा लढा या पुस्तकात आलेला आहे. इच्छाशक्तीचं बळ म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
°….तरी तू रक्तप्रवाह कसा थांबवणार? नाही तर सुटका होऊनही रक्तस्रावाने मरण येईल.'अॅरनला कल्पना सुचते,की पाण्याच्या बाटलीची रबरी नळी वापरून त्याची आवळपट्टी तयार करायची.
त्यामुळे रक्तप्रवाह रोखायला मदत होईल.शिवाय त्याने घातलेल्या दोन शॉट्सपैकी लायक्रा कापडाची शॉट्स जखमेवर गुंडाळता येईलअसाही तो विचार करून ठेवतो.पण चाकूने हाड कापलं जाणं शक्य नाही हे माहिती असल्यामुळे हे सगळे बरेच लांबचे उपाय आहेतअसं दुसरं मन त्याच वेळी त्याला सांगत असतं.
पण तरीही अॅरन एकदा प्रयत्न करून बघायचं ठरवतोच.रबरी नळीची आवळपट्टी बांधून तो चाकू मनगटाजवळ नेतो.पण कापायला सुरुवात करण्याआधी त्याचं मन ओरडतं,'अॅरन,हे काय करतोयस?ही आत्महत्या आहे.तुझ्याकडे कितीही चांगली आवळपट्टी आणि कसलंही कापड असलं तरी तू रक्तस्राव थांबवू शकणार नाहीस.असा वेडेपणा करू नकोस.'अॅरनचं मन त्याला पुढे जाऊच देत नाही.पूर्ण हरलेल्या अवस्थेत अॅरनला आपल्या आई-वडिलांची,बहिणीची,मित्र-मैत्रिणींची आठवण होते.
त्यांच्याबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण,त्यांच्यासोबत केलेली भटकंती,त्यात झालेले अपघात,गेट-टुगेदर्स,आवडीच्या कॉन्सर्ट्स अशा किती तरी आठवणी त्याला आठवत राहतात.या आपल्या माणसांशी बोलण्याच्या तीव्र इच्छेतून तो आपला व्हिडिओ कॅमेरा बाहेर काढतो.तो दगडावर ठेवून या साऱ्यांना उद्देशून तो बोलू लागतो.कॅमेरा फिरवून काय काय घडलं ते सगळं सांगतो.
दगडामागे अडकलेला हात दाखवतो.जगाच्या दृष्टीने अस्तित्वात नसलेल्या या घळीत अडकल्यावर तुम्हा साऱ्यांच्या प्रेमाची किंमत मला अधिकच कळते आहे,असं म्हणताना त्याला रडू फुटतं.आपल्या वेडेपणामुळे आपल्या जिवलग मंडळींना किती त्रास होणार आहे याचा विचार करून त्याला प्रचंड अपराधी वाटतं;पण या भावना आवरत तो तटस्थपणे स्वतःची परिस्थिती नोंदवतो.आत्तापर्यंत सुटकेसाठी काय काय प्रयत्न केले, यापुढचा प्लॅन काय वगैरे बोलून तो कॅमेरा बंद करतो. उद्या आपण इथेच मरून गेलो तर किमान आपल्या जवळच्या लोकांना आपलं काय झालं हे तरी कळेल,या विचाराने त्याला थोडं बरं वाटतं.
रात्र होऊ लागलेली असते.थोडीही ऊब नसणारी काळोखी थंड रात्र.डासांची झुंड अॅरनवर हल्ला करते. डास मारताना त्याच्या मनात येतं,डास खाल्ले तर? या विचाराने अॅरनचमकतो. खरं तर अजून त्याच्याकडे बर्गरचा एक छोटा तुकडा असतो.पण बहुतेक सलग दोन दिवस झोप न झाल्यामुळे त्याचे विचार भरकटायला सुरुवात झालेली असते.
तिसरा दिवस उजाडतो.संपत चाललेलं अन्न-पाणी आणि झोप न मिळाल्यामुळे खालावलेली तब्येत सोडली तर परिस्थिती 'जैसे थे' असते.पहिल्यांदा अॅरनला देवाची प्रार्थना करावीशी वाटते.तो म्हणतो, 'देवा,मला तुझी मदत हवी आहे.मला सुचणारे सगळे उपाय करून झाले.आता पुढे काय ? तूच काही तरी दिशा दाखव.काही तरी इशारा कर की ज्यातून मला पुढे काय करायचं ते कळेल.' अर्थातच काही घडत नाही.थोड्यावेळाने अॅरन पुन्हा प्रार्थना करू लागतो.या वेळी सैतानाची.'देव व्यस्त असल्यामुळे तुला साकडं घालतोय.मला मदत कर. त्या बदल्यात मी तुला माझा हात द्यायला तयार आहे.तू म्हणत असशील तर मी पुन्हा कधीही ट्रेकिंग करणार नाही,पण मला यातून वाचव.' उपहासाने भरलेले स्वतःचे शब्द ऐकून तो स्वतःच हसत सुटतो.
त्याही परिस्थितीत तो स्वतःची खिल्ली उडवू शकतो !
तिसरा दिवस चढत जातो तसं सुटकेची वाट बघत राहण्याचा अॅरनला कंटाळा येऊ लागतो.घशाला-तोंडाला ओठांना पडणारा शोष आता असह्य होऊ लागलेला असतो. त्यामुळे सुटकेसाठी प्रयत्न तरी करत राहायला हवेत असं त्याला वाटतं.अॅरन ठरवतो,हात कापून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करायचाच.
रबरी नळी हाताला आवळपट्टी म्हणून बांधून तो पुन्हा एकदा चाकू हातात घेतो.कोपराच्या थोडं खाली तो चाकूने कापायला सुरुवात करतो,पण काही केल्या चाकू त्याच्या त्वचेत घुसतच नाही.थांबून तो पुन्हा एकदा प्रयत्न करतो,पण पुन्हा तेच.अखेर कंटाळून तो आवळपट्टी काढून टाकतो.तेव्हा त्यानेच चाकू लावलेल्या ठिकाणी दोन लाल रेषा उमटतात.तेवढाच त्याने प्रयत्न केल्याचा पुरावा.चला,म्हणजे आता सुटकेची किंवा मृत्यूची वाट पाहत राहण्याशिवाय पर्याय नाही.बहुतेक मृत्यूची गाठच आधी पडण्याची शक्यता अॅरनला जास्त वाटत असते.कारण आता पाण्याचा साठा संपत चाललेला असतो.आदल्या रात्री ठरलेल्या तीन वेळांमध्ये तीन घोट प्यायल्यावर अॅरनकडचं जवळपास सगळं पाणी संपलेलं असतं.एक घोट काय तो शिल्लक असतो.बर्गरचाही एकच तुकडा राहिलेला असतो.पण भुकेची त्याला फारशी चिंता नसते.तहानेने तो व्याकूळ झालेला असतो.सगळं शरीर पाण्याची याचना करत असतं.बाकी काहीही सहन करणं शक्य आहे,पण ही तहान आणि रात्री हाडं गोठवणारा वारा सहन करणं अशक्य.या परिस्थितीत स्वतःला आणून टाकल्याबद्दल तो पुन्हा एकदा स्वतःला शिव्याशाप देत राहतो.अगदी शेवटच्या क्षणी भेटलेल्या मुलींमुळेही आपल्याला मागे फिरण्याची संधी होती.पण जणू याच संकटाला भेटण्यासाठी आपण अधीर होतो... एकट्याने बाहेर पडताना आपला ठावठिकाणा सांगण्याचे कष्ट घ्यायचे नसतील तर तुला हे भोगावंच लागणार.तिसऱ्या दिवशी अॅरनला पहिल्यांदाच लघवी लागल्याची जाणीव होते.आपण ही घळ खराब करतोय या अपराधी भावनेने त्याला वाईट वाटतं,पण इलाज नसतो.आपलं सामान खराब होणार नाही याची काळजी घेत तो लघवी करतो.आश्चर्य म्हणजे एवढ्या डीहायड्रेशननंतरही त्याची लघवी बऱ्यापैकी स्वच्छ आणि वासरहित असते.त्याच दिवशी दुपारी त्याला पुन्हा एकदा लघवीची जाणीव होते.त्याच क्षणी त्याचं मन त्याला सांगतं,'अॅरन ही लघवी भरून ठेव.तुला त्याची गरज पडणार आहे. वाळवंटामध्ये पाण्याअभावी माणसांनी स्वतःची लघवी पिऊन जीव तगवल्याची उदाहरणं त्याला माहिती असतात.त्यामुळे फार विचार न करता एका रिकाम्या बाटलीत तो लघवी करतो.या वेळेची लघवी मात्र पिवळी आणि वास येणारी असते.ती प्यावी की नाही हे त्याला ठरवता येत नाही.वास आणि चवीपेक्षाही आपल्या डीहायड्रेट झालेल्या शरीराने बाहेर टाकून दिलेलं पाणी पुन्हा शरीरात घालण्याने काही होणार नाही ना,याची त्याला काळजी असते.पण सध्या तरी तो निर्णय पुढे ढकलून टाकतो.पण त्याच्या मनात हे द्वंद्व किती तरी तास सुरूच राहतं.स्वतःच्या शरीरातला उत्सर्जित द्रव प्यावा की नाही ? थोड्या वेळाने पाहतो तो बाटलीत त्या द्रवाचे दोन भाग होऊन त्यातल्या त्यात स्वच्छ भाग वरच्या बाजूला जमा झालेला असतो.अॅरन विचार करतो,आपल्याकडे पाणी आहे तोपर्यंतच हा प्रयोग करून पाहावा.बाटली उचलून एक छोटा घोट तो तोंडात घेतो आणि गपकन पिऊन टाकतो.
मंगळवार सकाळ.अॅरनला या घळीत अडकून अडीच दिवस होऊन गेलेले असतात.आता त्याचं मन पूर्ण वेळ फक्त पाण्याचा विचार करत असतं.त्याच्याकडे उरलेला पाण्याचा शेवटचा घोट म्हणजे त्याच्याकडे उरलेला वेळ आहे,त्याचं आयुष्य आहे,असं त्याला वाटत असतं. पाणी संपलं की वेळ संपला आणि आयुष्यही.त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने जीभ ओली करण्यापुरते एक-दोन थेंब तो तोंडात टाकत असतो.त्या दिवशी अॅरन पुन्हा एकदा हात कापण्याचा प्रयत्न करून बघायचं ठरवतो.आज त्याला आदल्या दिवशीच्या तुलनेत थोडं यश मिळतं.चाकू एकदाचा त्याच्या हातात घुसतो.वेदना सहन करत करत तो पोहोचतो.त्याच्या चाकूला हाताचं हाड लागत.त्याचा शस्त्रक्रिया प्रयोग पन्हा चाकू चालवत राहतो आणि अखेरीस थोड्या वेळाने डेड एंडपाशी येऊन एकदा थांबतो.पण जखमेतून फारसा रक्तस्त्राव होत नाही.एवढी एक जमेची व्हिडिओत नोंदवतो आणि स्वतःला शाबासकी देण्यासाठी उरलेला पाण्याचा बाजू. लगेचच व्हिडिओ रेकॉर्डर काढून तो आपलं शस्त्रक्रिया कौशल्य कॉर्मेट्रीसह घोट पिऊन टाकतो.पाणी किती वेळ पुरेल याचा विचार करत बसण्यापेक्षा आता पाणी नाही ही वस्तुस्थिती मान्य करणं जास्त सोपं जाईल असं अॅरनला वाटतं.बर्गरचा एक छोटा तुकडा आणि स्वतःची लघवी याशिवाय दुसरं काहीही नाही.
आता काऊंटडाऊन सुरू..
मंगळवारचा उरलेला दिवस अॅरन आपल्या आई-वडिलांशी,
बहिणीशी आणि मित्रमैत्रिणींशी व्हिडिओवर बोलण्यात घालवतो.
आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुठल्या वस्तू कुणाला द्याव्यात याची तो निरवानिरव करतो.त्याच्या धाकट्या बहिणीचं लवकरच लग्न होणार असतं.तिच्यासाठी आणि तिच्या भावी नवऱ्यासाठी तो खास शुभेच्छा देतो.देवाची प्रार्थना करतो.पण आता सुटकेसाठी मदत कर,असं म्हणण्याचं काहीही कारण उरलेलं नसतं.तो देवाकडे फक्त संयम मागतो.स्वतःचा आब राखून मी मृत्यूला सामोरा जाऊ शकेन अशी शक्ती दे,एवढंच त्याचं मागणं असतं.असं अॅरनला वाटत असतं; पण तसं घडत नाही. बुधवार सकाळ उजाडते,घळीत कदाचित मंगळवारी रात्रीच आपण संपून जाऊ अडकल्यानंतरची चौथी सकाळ. डीहायड्रेशन आणि तब्बल चार दिवस एक क्षणही झोप न झाल्यामुळे आता अॅरन बराच काळ ग्लानीतच असतो.अर्धवट शुद्धीत त्याला अनेक भास होत असतात.कधी आई-वडील,तर कधी कुठले कुठले मित्र समोर दिसत असतात.न झोपताही तो स्वप्न पाहत असतो.जणू एका वेगळ्याच ग्रहावर तो वावरतो आहे.
असं त्याला वाटत असतं.डीहायड्रेशनमुळे आपण मरून जाऊ शकतो याचा अंदाज त्याला पहिल्याच दिवशी आलेला असतो.पण ते मरण इतकं अंत पाहणारं आणि तिळतिळ शक्ती शोषून घेणारं असेल याची त्याला कल्पना नसते.त्यापेक्षा धो धो पाऊस कोसळून त्या पाण्यात बुडून मेलेलं चांगलं,असं त्याला वाटतं.पण जेव्हा जेव्हा तो शुद्धीत असतो तेव्हा एकीकडे शरीराच्या शक्तीविरुद्ध सुटकेचा नवा प्रयत्न करण्याचे विचारही त्याच्या मनात येत राहतात.खाली पडलेल्या छोट्या दगडांचा हातोडीसारखा वापर करून आपल्याला जखडून ठेवणारा दगड फोडता येतो का असाही प्रयत्न तो करून पाहतो.मृत्यूच्या दारात उभा असतानाही जगण्यासाठी शेवटपर्यंत हात-पाय मारत राहण्याची जिद्द संपत नाही.अंगातली शक्ती संपत आलेली असताना दगड उचलून ते हातोड्यासारखे मारण्याची शक्ती त्याच्यात कुठून येते हेही अजबच ! तब्बल चार दिवस आपण या टोकाच्या परिस्थितीत टिकाव धरून राहिलो ही मोठी कामगिरी आहे याची जाणीव त्याही अवस्थेत अॅरनला असते.पण आजची रात्र मात्र शेवटची, याची त्याला खात्री असते.त्यामुळे घळीच्या भिंतीवर तो चाकूने कोरून स्वतःचं नाव,जन्मतारीख लिहितो आणि त्यापुढे मृत्यूची तारीख लिहितो ३० एप्रिल २००३.
पण त्याचं शरीर अन् मन त्याचा हा विश्वास खोटा पाडतं.गुरुवारची सकाळ उजाडते.शुद्धी-बेशुद्धीच्या सीमारेषेवर तरंगत असतानाच त्याला एक स्वप्न पडतं. त्याच्यासोबत एक छोटा मुलगा खेळत असतो.त्या ट्रान्समध्येही त्याला जाणवतं,की हा आपलाच मुलगा आहे.पंजा नसलेल्या उजव्या हाताचा आधार देऊन अॅरन त्या मुलाला डाव्या कडेवर उचलून घेतो.दोघंही आनंदात हसत-खिदळत असतात.या ट्रान्समधून तो बाहेर येतो तेव्हा त्याचं मन त्याला ओरडून सांगतं,तू जगणार आहेस ! गुरुवारी सकाळी त्याला एक नवा शोध लागतो विचित्र घाणेरडा वास येत असतो.
त्याच्या लक्षात येतं की आपला दगडामागे अडकलेला हात सडायला सुरुवात झाली आहे.त्या हाताची चाचपणी करताना त्याला अक्षरशः उन्मळून येतं.हात अडकल्या अडकल्या तो सोडवून घेण्यासाठी अॅरनने जसा थयथयाट केला तशीच अवस्था आत्ताही होते.त्या धडपडीत त्याचा हात दगडावर सारखा आपटतो आणि एक कल्पना त्याच्या मनात चमकून जाते.हाताला जोराचा हिसका देऊन तो दगडावर आपटला तर हाड तुटू शकत.चाकूने हाड तोडता न येणं हाच तर त्याच्या सूटकेतला अडथळा असतो.
अॅरन लगेचच प्रयत्न सुरू करतो.त्याच्या अंदाजाप्रमाणे खरोखर थोड्या धडकांनंतरच त्याच्या हाताचं हाड तुटतं.दगडामागे अडकलेला पंजा आणि त्याच्या खांद्याशी जोडला गेलेला हात आतून वेगळे होतात.आता फक्त वरचं मांस आणि त्वचा कापून काढली की झाली सुटका.अॅरन तातडीने चाकू काढून कामाला लागतो.एखाद्या चॉपिंग बोर्डवर चिकन ठेवून कापताना कसं वाटेल तसंच त्याला वाटत असतं.पण आता त्याचं ध्येय निश्चित असतं. बाकी कशाचाही विचार न करता तो यांत्रिकपणे चाकू चालवत राहतो.आता सुटका होणार,एवढ्या एका वाक्याचा नाद त्याला हाताच्या वेदनाही विसरायला लावत असतो... तो चाकू हातात घेतो तेव्हा सकाळचे १०.३० वाजलेले असतात.बरोबर साडेअकरा वाजता त्याचा हात पूर्ण कापला जातो .. आणि खरोखरच त्या प्रचंड शिळेपासून अॅरनची सुटका होते.हात अडकतो तेव्हा तो जेवढ्या अविश्वासाने त्याकडे पाहत राहिलेला असतो,त्याहीपेक्षा जास्त अविश्वासाने तो स्वतःच्या पुनर्जन्माकडे पाहत राहतो.अर्थात तुटलेला जखमी हात घेऊन त्या घळीतून चढून बाहेर येणं हेही मोठंच आव्हान असतं.त्याचा तोवर त्याने नीटसा विचारच केलेला नसतो.पण सुटका झाल्याच्या युफोरियामध्ये दोराच्या साह्याने हात तुटलेल्या अवस्थेतही अॅरन एका झपाट्यात ती तांत्रिक चढाई करतो.नशिबाने बाहेर पडल्यानंतर थोड्या वेळात त्याला एका डबक्यात साठलेलं पाणी मिळतं.पुढे आणखी थोड्या वेळ चालत गेल्यानंतर त्याला हायकिंगला आलेले नवरा-बायको आणि त्यांचा मुलगा भेटतात.अॅरनची अवस्था पाहून त्यांचीच बोबडी वळते.पण लवकरच ते सावरतात. त्यातली तरुण बाई पळत जाऊन पार्कच्या अधिकाऱ्यांना अॅरन बद्दल माहिती देते आणि लवकरच हेलिकॉप्टरच्या साह्याने त्याची सुटका केली जाते.
पाच दिवस मृत्यूच्या सोबत राहिल्यानंतर,स्वतःच्या मृत्यूची तारीख कोरल्यानंतर अॅरन पुन्हा जीवनाकडे परततो.
घळीत दगडाच्या तावडीतून सुटण्याची गोष्ट हा अॅरन
रॅल्स्टनच्या संघर्षकहाणीचा अर्धाच भाग आहे.त्याचा पुढचा भाग सुरू होतो तो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर. घळीत असताना तो जितक्या सहजपणे स्वतःचा हात कापतो,जितक्या ताकदीने रक्तस्राव होणारा तुटका हात घेऊन तिथून बाहेर पडतो,तितकीच किंवा त्याहूनही जास्त शक्ती त्याला उपचार सुरू असताना लावावी लागते.अपघाताचा धक्का आणि तिथून सुटण्याची टोकाची इच्छा यामुळे अॅरन च्या शरीर-मनाने आपली प्रतिकारशक्ती अन् सहनशक्ती कित्येकपटं वाढवलेली असते.सुटकेचा निःश्वास टाकल्यानंतर त्या सहनशक्तीची खरी परीक्षा सुरू होते.त्या काळात अॅरन कित्येकदा कोलमडतो.आता हे संपून जाऊ दे,असा विचार अॅरनच्या मनात घळीत अडकलेल्या अवस्थेपेक्षा जास्त वेळा हॉस्पिटलमध्ये असताना येत राहतो. अखेर आई-वडील आणि मित्रांच्या सोबतीने अखेर तेही दिवस पार होतात.आज अॅरन आपल्या कृत्रिम हातानिशी पुन्हा एकदा भटका गिरिप्रेमी म्हणून कार्यरत आहे.फरक एवढाच, की आता कुणालाही न सांगता तो एकटा कधीही, कुठेही जात नाही.■
मागील लेखाचा शेवटचा भाग….!