* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२०/११/२५

गांधीवादाची शोकांतिका / The Tragedy of Gandhism

वि. म. दांडेकर..!


महात्मा गांधींच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करताना अनेकांनी त्यांना अनेक नावांनी संबोधले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना राष्ट्रपिता म्हटले. मला वाटते सर्व संबोधनांत हे संबोधन अधिक सार्थ आहे.महात्मा गांधींनी खऱ्याखुऱ्या अर्थाने भारताची राष्ट्रीय घडण केली.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीकरता त्यांनी देशव्यापी चळवळ उभारली आणि शेवटपर्यंत तिचे नेतृत्व केले.त्याकरता आवश्यक ते राजकारणी व्यवहार कौशल्य त्यांच्यापाशी होते.परंतु तेवढ्याने राष्ट्रपिता या संबोधनास ते पात्र झाले नसते.कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती हा राष्ट्रीय घडणीचा केवळ एक भाग आहे.निव्वळ व्यवहारकुशल राजकारणाने कदाचित स्वातंत्र्यप्राप्ती झाली असती परंतु राष्ट्रनिर्मिती झाली नसती.राष्ट्राची घडण करावयाची तर राजकारणाला राजकीय तत्त्वज्ञानाची जोड द्यावी लागते हे त्यांनी आरंभीच ओळखले आणि प्रथमपासून आपल्या राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान दिले. असे तत्त्वज्ञान सामान्यजनांपर्यंत पोहचवावयाचे तर त्याला थोडाबहुत आचारधर्म चिकटवावा लागतो. महात्मा गांधी हे एक अत्यंत कुशल समाजधुरीण असल्याने त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाला जनमनाची पकड घेईल असा आचारधर्म चिकटवला आणि शिस्तबद्ध राजकीय संघटना उभी करण्यास आवश्यक म्हणून या आचारधर्माचा आग्रह धरला.दुर्दैवाने महात्मा गांधींच्या काही अनुयायांना एवढा आचारधर्मच काय तो समजला.असा आचारधर्म स्थलकालपरिस्थितिसापेक्ष असतो आणि असावयास हवा हेही ते विसरले. दैनंदिन सामाजिक व राजकीय व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी जशी महात्मा गांधींवर होती तशी या अनुयायांवर नव्हती.त्यामुळे खुद्द महात्मा गांधींनाही परवडणार नाही असा आचारधर्माचा आग्रह त्यांनी धरला.


'गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी' म्हणून त्यांना कोणी म्हटले तर 'आपले काही चुकत तर नाही ना?' असा विचार करण्याऐवजी त्यांना स्वतःचे कौतुकच वाटू लागले.या मंडळींनी गांधीवादाच्या नावाखाली एक नवीन कर्मकांडाचे स्तोम माजविले. कर्मकांडाच्या खोड्यात स्वतःला आणि गांधीवादाला अडकवून घेऊन सारा व्यवहारच अशक्यप्राय केला. स्वतःचे हसे करून घेतले आणि गांधीवाद अव्यवहार्य ठरविला.या एकांतिक गांधीवाद्यांच्या दुसऱ्या टोकाला स्वतःला 'बुद्धिवादी' म्हणवून घेणारी काही मंडळी होती.राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे ही गोष्टच मुळात या मंडळीच्या बुद्धीला गम्य झाली नाही. याचे कारण राजकीय स्वातंत्र्यप्राप्तीव्यतिरिक्त राष्ट्र उभारणीचे काही कार्य आहे हेच त्यांना उमगले नाही.स्वातंत्र्यप्राप्तीपुरते बोलावयाचे तर तेही त्यांच्यासारखे दहावीस बुद्धिमान आपल्या राजकीय कौशल्याने इंग्रजांपासून मिळवू शकतील अशी त्यांची मनोमन खात्री होती.ही मंडळी सर्व दृष्टींनी बुद्धिमान असली तरी जनमानसासंबंधीचे त्यांचे अज्ञान आश्चर्यकारक होते. राजकीय स्वातंत्र्यप्राप्ती आणि नवराष्ट्र उभारणीच्या या साऱ्या खटाटोपात जनताजनार्दन आणि जनमानस यांचा संबंध काय ह्याचेच आकलन त्यांना कधी झाले नाही.साहजिकच महात्मा गांधींच्या सर्वस्पर्शी,धुरंदर राजकीय नेतृत्वापुढे ही मंडळी हतप्रभ झाली.महात्मा गांधीच्या पश्चात् राष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडे आली.पंडित नेहरू बुद्धिवादी असले तरी त्यांना जनमानसाची पूर्ण ओळख होती.राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान हवे हा गांधीवादाचा आशय त्यांनी जाणला होता.त्यामुळे त्यांनीही आपल्या राजकारणास विरोध वा विसंगत नाही परंतु तरीही स्वतंत्र अशा राजकीय तत्त्वज्ञानाची जोड दिली आणि राष्ट्रउभारणीचे कार्य चालू राहिले.पंडित नेहरूंच्या पश्चात् आज पुनश्च याविषयी बुद्धिभ्रंश झालेला दिसतो.भारताच्या राष्ट्रउभारणीचे कार्य अजून अपुरे आहे,ते आणखी काही पिढ्या चालू ठेवल्याशिवाय भारताचे राष्ट्रीय जीवन निर्वेध होणार नाही,सामाजिक व राजकीय नेत्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे इत्यादी गोष्टींचा आज विसर पडला आहे. साहजिकच राजकारणाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठान राहिलेले नाही आणि त्याची गरजही वाटेनाशी झाली आहे.


किंबहुना सर्व तात्विक व नैतिक विचारांची 'पुस्तकी' म्हणून अवहेलना करावी आणि तत्त्वशून्य राजकारणाचा 'व्यवहारवाद' म्हणून उदोउदो करावा अशी प्रथा पडत आहे.एकांतिक गांधीवाद्यांनी एके काळी माजविलेल्या कर्मकांडाच्या स्तोमाची ही प्रतिक्रिया आहे.म्हणून राजकारण,समाजकारण किंबहुना सर्व मानवी व्यवहार त्यांना काहीतरी तात्त्विक वा नैतिक अधिष्ठान हवे हा जो गांधीवादाचा आशय आहे,त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. तात्त्विक अधिष्ठान म्हणजे तत्त्वज्ञानाची लोखंडी चौकट नव्हे.राजकारण,समाजकारण हे बोलून चालून मानवी व्यवहार आहेत.त्यांत वावरावयाचे तर व्यावहारिक तारतम्याचे स्वातंत्र्य हवे.परंतु म्हणून योग्य काय अयोग्य काय,न्याय्य काय अन्याय्य काय,नैतिक काय अनैतिक काय यासंबंधीचा निर्णय करणे सुटत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.हे निर्णय सुसंगतपणे करावयाचे तर कोण्यातरी तात्त्विक,नैतिक निकषाची गरज भासते. उपमाच द्यावयाची तर संगीतातील षड्जाची देता येईल. संगीतात षड्जाला जे महत्त्व आहे तेच राजकारणात समाजकारणात तात्त्विक वा नैतिक अधिष्ठानाला आहे. कलाकार त्याच्या आंतरिक स्वरात मिळेल तो षड्ज स्वीकारतो.त्यावर आपली बैठक स्थिर करतो. एवढे केले म्हणजे कोणताही राग कोणत्याही ढंगाने गाण्यास तो मोकळा असतो. मात्र स्वीकारलेला षड्ज त्याला सोडता येत नाही.षड्ज सुटला तर कलाकार काय गातो ते त्याचे त्यालाही कळणार नाही,तो भरकटत जाईल. सूर आणि बेसूर यांचा निर्णय करता येणार नाही.किंंबहूना संगीत संगीतच रहाणार नाही.तीच गोष्ट राजकारणाची आहे.राजकारणाला तात्त्विक,नैतिक अधिष्ठान नसेल तर योग्य काय अयोग्य काय,न्याय्य काय अन्याय्य काय,

नैतिक काय,अनैतिक काय,यांचा निर्णय करता येणार नाही.

राजकारणाच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न अप्रस्तुत आहेत असे काही व्यवहारवादी मानतात, सत्तास्पर्धा एवढेच राजकारणाचे स्वरूप त्यांना समजते, त्यांना एवढेच सांगावयाचे की केवळ सत्तास्पर्धेत टिकून रहाण्याकरतासुद्धा राजकारणाला तात्त्विक,नैतिक अधिष्ठान असावे लागते.तत्त्वशून्य,दिशाहीन,सत्तास्पर्धेत भरकटत जाणारे राजकारण सामान्य जनता फार काळ मान्य करीत नाही.निव्वळ छक्क्यापंजांचे राजकारण खेळून सत्तेवर अबाधित रहाता येते अशी कोणा सत्ताधीशांची समजूत झाली असेल तर तो निव्वळ भ्रम आहे. त्याचा निरास होण्यास फार काळ लागणार नाही.


विशाल मानवतावाद आणि त्यांच्याशी सुसंगत अशी स्वनिष्ठा हे गांधीवादाचे षड्जपंचम आहेत.विशाल मानवतावादाने महात्मा गांधींनी आपल्या राजकारणास आवश्यक ते नैतिक अधिष्ठान दिले.स्वाभिमान व स्वनिष्ठेची तार छेडून त्यांनी राष्ट्रजागृतीचा मंत्र दिला. महात्मा गांधी उभे राहिले आणि भारत उभा राहिला. त्याकरिता राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक विकास यांचीही वाट पहावी लागली नाही.राजकीय पारतंत्र्यात आणि आर्थिक दारिद्र्यातही देशाला मानवतावादाच्या नैतिक अधिष्ठानावर स्वाभिमानाने आणि स्वनिष्ठेने मान ताठ करून उभे राहणे शक्य आहे हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने सिद्ध करून दाखविले.


गरीब माणसाने स्वाभिमानाने जगावयाचे तर दारिद्र्याबरोबर येणारे सर्व न्यूनगंड सोडून दिले पाहिजेत आणि आपले अंथरुण पाहून पाय पसरण्यास शिकले पाहिजे.श्रीमंत माणसाचा सहवास घडला म्हणजे गरीब माणसाला आपल्या अन्नवस्त्राबद्दल साहजिकच कमीपणा वाटतो आणि तो श्रीमंत अन्नवस्त्राचे नसते नाटक करू पाहतो.असल्या न्यूनगंडाने श्रीमंती येत नाही.मात्र स्वाभिमान नष्ट होतो आणि अंती अपमान पदरी येतो. महात्मा गांधींनी देशाला क्षणार्धात या न्यूनगंडापासून मुक्त केले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपले अन्नवस्त्र, पुरे अपुरे असेल तसे,स्वाभिमानाने वापरण्यास शिकवले.गांधीवाद्यांनी त्याचा मथितार्थ बाजूस ठेवला आणि या साध्या व्यवहारी स्वाभिमानी शिकवणीचा अर्थ केला की माणसाने आपल्या भौतिक गरजाच शक्यतितक्या कमी केल्या पाहिजेत हीच गांधीवादाची शिकवण आहे.त्यातून काही प्रामाणिक कर्मकांड आणि पुष्कळशी भोंदूगिरी निर्माण झाली.


स्वाभिमानाबरोबरच महात्मा गांधींनी देशाला स्वनिष्ठेची शिकवण दिली.स्वनिष्ठा म्हणजे आम्ही आमच्यापाशी आहेत या साधनांनिशी स्वतःच्या पायावर उभे राहू आणि एक एक पाऊल पुढे टाकू,हा विश्वास. स्वावलंबनाने,स्वनिष्ठेने मनुष्य अंतर्मुख होतो.आपण आपल्यापाशी असलेल्या सर्व साहित्याचा,साधनांचा पूर्ण उपयोग करून घेत आहोत का हा प्रश्न सतत विचारीत राहतो.या उलट परावलंबनाचे आहे.परावलंबी मनुष्य बहिर्मुख असतो.कोणाच्या तरी साहाय्याखेरीज आपण आपल्या पायावर उभे राहूच शकत नाही अशीच मनाची धारणा असली म्हणजे मनुष्य स्वतःचे सामर्थ्य,साहित्य व साधने यांचा विचारच करीत नाही.आधुनिकता, अद्ययावतता यांनी दिपून गेल्यामुळे त्याला 'आपल्यापाशी असलेले साहित्य व साधने' निरुपयोगी वाटतात आणि तो अधिकाधिक परावलंबी बनतो.आपणापाशी असलेल्या साहित्यसाधनांचा पूर्ण उपयोग म्हणजे स्वनिष्ठा.तिचे प्रतीक म्हणून महात्मा गांधींनी सूतकताईचा कार्यक्रम सांगितला.परंतु गांधीवाद्यांनी त्याचाही मथितार्थ बाजूस ठेवून त्याचे कर्मकांड केले आणि त्यात सोवळे-ओवळे आणले. आहेत त्या साधनांवर निष्ठा म्हणजे नवीन साधने निषिद्ध असे ठरवले आणि आर्थिक प्राप्ती तत्त्वतःच अशक्य केली.


स्वाभिमान व स्वनिष्ठा या गांधीवादाच्या मूळतत्त्वांचा अशा रीतीने गांधीवाद्यांनी विपर्यास केल्यामुळे स्वतःस बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्या गांधीवादाच्या टीकाकारांना साहजिकच फावले.

गांधीवादाने गरीब माणसास स्वाभिमानाने जगण्यास शिकवले.

बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की गांधीवादास दारिद्रय मंजूर आहे. गांधीवाद हा तत्त्वतःच संपन्न जीवनाच्या विरोधी आहे. गांधीवादाने गरीब माणसास असेल त्या साहित्यानिशी कामास प्रवृत्त केले.बुद्धिवाद्यांनी त्याचा अर्थ केला की गांधीवादाचा नवीन साधनास आणि पर्यायाने विज्ञानासच विरोध आहे.तात्पर्य, गांधीवाद हा भौतिक व आर्थिक प्रगतीस विरोधी व मारक आहे असे बुद्धिवाद्यांनी ठरविले.


सध्या व्यवहारवादाचा अंमल जारी आहे. व्यवहारवादाला तात्त्विक व नैतिक अधिष्ठानाचे तर वावडे आहेच;परंतु साधा स्वाभिमानही आर्थिक विकासाच्या आड येतो.स्वाभिमान,वस्तुनिष्ठा या ऐवजी मतलब व स्वार्थ ह्याच आर्थिक विकासाच्या प्रेरणा आहेत असे व्यवहारवाद्यांनी ठरविलेले दिसते. 


त्यामुळे व्यवहारवादाचाच एक भाग म्हणून गांधीवादाचे केवळ ढोंग राहिले आहे.बाकी गांधीवादातील स्वाभिमान व स्वनिष्ठेचा विसर पडलेला आहे.आज देश स्वतंत्र असला तरी स्वातंत्रत्र्यरक्षणास अपरिहार्य अशा समजुतीने,देश आर्थिक दृष्ट्या पूर्वर्वीपेक्षा सुस्थितीत असतानाही अधिक आर्थिक विकासास अवश्य आहे अशा समजुतीने,व्यवहारवादी राजकीय व सामाजिक नेते आणि राज्यकर्ते जगभर लाचारपणे,दीनवाणे भीक मागत हिंडत आहेत.जेमतेम पंचवीस तीस वर्षापूर्वीच परतंत्र,पराधीन आणि पराभूत बनलेले स्वतंत्र भारताचे नेते,ही दोन चित्रे शेजारी शेजारी ठेवून बघण्याजोगी आहेत.राज्यकर्त्यांनी अंगीकारलेले हे परावलंबी धोरण देशात खोलवर रुजले आहे.कोठे काही फुकट मिळते का हे शोधत राज्यकर्ते जगभर भीक मागत हिंडत आहेत आणि सरकारकडून काही फुकट पदरात पाडून घेता येते का याचा शोध घेत देशातील नागरिक धावाधाव करीत आहेत.याला म्हणतात कल्याणकारी शासन! आपण बाहेर भीक मागावी आणि देशात लोकांना भीक मागण्यास शिकवावे असा हा सत्तेवर राहण्याचा सोपा मार्ग सापडला आहे.


मग स्वाभिमान व स्वनिष्ठेची आठवण कोणास होणार?


गांधी नावाचे महात्मा, संपादन-रॉय किणीकर,

साहाय्यक-अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन


ही अधोगती थांबवायची असेल तर राष्ट्रकारणास मानवतावादाचे अधिष्ठान दिले पाहिजे आणि राष्ट्रउभारणीकरता स्वाभिमान व स्वनिष्ठेचा मंत्र जागृत ठेवला पाहिजे.गांधीवादाची ही त्रिसूत्री आहे. तिचे प्रतिबिंब दैनंदिन व्यवहारात पडू शकेल असा एकसर्वव्यापी सर्वस्पर्शी कार्यक्रमही महात्मा गांधीनी सांगितला आहे.तो आजही उपयोगी पडण्यासारखा आहे.वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता आणि मलमूत्र-शेणकाडी इत्यादी त्याज्य वस्तूंचा संपूर्ण उपयोग हा तो कार्यक्रम होय.केवळ वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेने गरीब जीवनही किती तरी प्रसन्न करणे शक्य आहे.केवळ स्वच्छतेने नव्वद टक्के रोगराई नष्ट होईल त्याकरता कोणाच्याही मदतीची गरज नाही. स्वच्छता ही ज्याने त्याने आपल्या घरात आणि गावात करण्याची गोष्ट आहे. पण म्हणूनच ती आम्हास नको वाटते. औषधाने भागते मग रोजची उठण्याबसण्याची स्वच्छता कशाला? आज औषधपाण्याचा,दवाखान्याचा प्रसार झाला आहे.परंतु वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेत फारसा फरक पडलेला दिसत नाही. सार्वजनिक आरोग्य सुधारलेले दिसते ते औषधाने, स्वच्छेतेने नाही.प्रत्येकाला आपल्या गावात दवाखाना हवा.परंतु गावातील दुर्गंधी नाहीशी करण्यास कोणी तयार नाही.मलमूत्र,शेणकाडी इत्यादी वस्तू नीट गोळा करून त्यांचा सेंद्रिय खताकरता उपयोग केला तर गावातील दुर्गंधी जाईल,रोगराई नष्ट होईल आणि शिवाय शेतीच्या उत्पादनास हातभार लागेल.हेकरण्याकरता कोणाची मदत लागत नाही.हे आपले आपण करावयाचे आहे.भूमीतून आपण जो सत्त्वांश घेतो तो भूमीस परत करावयाचा आहे.तसे केले तर हीच भूमी आपणास अधिक आधार देईल.इतके हे साधे तत्त्व आहे.मग ते आपण का करीत नाही?कारण स्वावलंबन, स्वाभिमान, स्वनिष्ठा यासंबंधी लोकशिक्षण व लोकजागृती करण्यापेक्षा परकीयांकडून रासायनिक खते भीक मागून आणणे सरकारला सोपे वाटते आणि मलमूत्र-शेणकाडी यांचा रोजचा व्यवहार करण्यापेक्षा सल्फेटचे पोते उघडून टाकणे शेतकऱ्यास सोईचे वाटते.हे आज सुखकर वाटणारे परावलंबन परिणामी आत्मघाती ठरल्याखेरीज रहाणार नाही.हीच गांधीवादाची मुख्य शिकवण आहे.स्वाभिमान,स्वनिष्ठा आणि त्यांचे प्रतिबिंब दैनंदिन जीवनात पडू शकेल असा सर्वव्यापी,सर्वस्पर्शी कार्यक्रम हाच गांधीवादाचा आशय आहे.त्याचे आज पुनरुत्थान झाले पाहिजे.

१८/११/२५

शांत मनाचा स्पायनोझा / Spinoza of peace

तो आमच्या प्रार्थनांमुळे जय किंवा आमच्या शत्रूच्या प्रार्थनांमुळे अपराजय देत नसतो.आपणास जे सत् व असत् वाटते,त्याच्याशी त्या परमात्म्याला काही एक करावयाचे नाही,जे निर्माण केलेच पाहिजे असे परमेश्वराला वाटते ते तो आपल्या अनंत बुद्धीला योग्य वाटणाऱ्या नियमानुसार निर्माण करतो. या विश्वाला गतिमान ठेवणारे शाश्वत व सनातन यंत्र म्हणजे ईश्वर,पण या यंत्राला प्रेरणा देणाराही तोच व या यंत्राचे नियमन करणारी इच्छक्तीही तोच आणि शाश्वत गतिमान व शाश्वत प्राणमय अशा या शक्तियंत्रातले आपण सारे आवश्यक असे भाग आहोत आणि त्या अनंत शक्तिमान यंत्रालाच आपण अधिक सुटसुटीत नाव न सापडल्यामुळे ईश्वर म्हणून संबोधितो.


ईश्वरी इच्छा म्हणजेच निसर्गाचा कायदा.प्रकाश ताऱ्यांताऱ्यांपर्यंत सारखा फिरत आहे.मनुष्याची जाणीवशक्ती सारखी काम करीत आहे.कारण ती सर्व ईश्वरी इच्छेचा कायदा मानतात.प्रकाश प्रकाशाचा आवश्यक कायदा मानतो.मनुष्याची जाणीव जीवनाचा कायदा मानते.आपली मानवी इच्छाशक्तीही आवश्यक अशा नियमांचे पालन करते,जगात फ्री वुइल किंवा इच्छास्वातंत्र्य अशी चीज नाहीच.आपण परिस्थितीची बाळे आहोत.परिस्थिती आपणास बनवते.स्पायनोझा लिहितो,'आपल्या मनात केवळ 'सर्वतंत्रस्वतंत्र' असे काहीच नाही.आपणास इच्छास्वातंत्र्य नाही.आपण जी काही इच्छा मनात करतो,ती कोणत्यातरी कारणामुळे असते.त्या कारणाला दुसरे कारण असते.त्या दुसऱ्या कारणाला तिसरे कारण असते.अशा प्रकारे कार्यकारणपरंपरा अनंत असते.' दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे तर असे म्हणता येईल की, आपल्या तोंडावरचे भाव किंवा शरीराचे स्नायू यांच्याप्रमाणेच आपली सारी कर्मेही नैसर्गिक शक्तींवरच अवलंबून असतात. या नैसर्गिक शक्ती आपली कल्पनाशक्ती भूतकाळात मागे पाहू शकेल तेथपासून सारख्या चालूच आहेत. अनंत काळापासूनच म्हणा ना! निसर्गाच्या नियत नियमाप्रमाणे असे कायमचेच ठरलेले आहे की,दैवी संगीत लिहिण्याला बीथोव्हेन जन्मावा. लाखो लोकांना हिंसक मरणाकडे नेण्याला नेपोलियन निर्माण व्हावा.आकाशातून खाली पडणाऱ्या पावसाला स्वातंत्र्य नाही.अगर धनुष्यापासून सुटलेल्या बाणाची दिशा बदलता येत नाही.त्याचप्रमाणे आपली कर्मेही नियतच आहेत.आपली इच्छा असो नसो ती तशीच हातून घडावयाचीच.बाणाची गती व मानवाचे कर्म यात फरक इतकाच की,मानवाला आपल्या कर्माची जाणीव असते.स्वकर्माचे भान असते आणि या केवळ जाणिवेलाच तो चुकून आपली इच्छाशक्ती मानतो.आपण काय करतो ते आपणास माहीत असते.पण ते करणे भागच असते..तद्विपरीत वागण्याचे सामर्थ्य वा स्वातंत्र्य आपणास नसते.आपण आपल्या नियतीशी निबद्ध आहोत.


आपल्या जीवनाच्या या छोट्या नाटकात केवळ प्रेक्षक म्हणून राहण्यास आपणास परवानगी आहे.पण त्यात ढवळाढवळ करायला,तिथे लुडबुड करण्यास,आपली इच्छा सोडण्याला आपणास परवानगी नाही.आपल्या कर्माकडे पाहण्याची आपणास पूर्ण मुभा आहे.पण आपली कर्मे आपणच ठरवतो असे जे आपणास वाटते ते मात्र चूक आहे.आपण जे काही निर्णय घेतो ते केवळ आपल्याच भूतकाळाचे, गतजन्मीचे परिणाम नसून आपल्या सर्व पूर्वजांच्या मागील जन्मांचा तो परिणाम असतो.


म्हणून स्पायनोझा शेक्सपिअरच्या अपूर्व बुद्धिमत्तेबद्दल त्याची स्तुती करीत नाही किंवा खुनी माणसाने केलेल्या गुन्ह्यांसाठी त्याच्यावर रागावत नाही.तो लिहितो, 'आपणाकडून दुसऱ्यांचा उपहास होऊ नये,तसेच स्वतःला कधीही दुःख होऊ नये.

आपणाकडून कोणीही तिरस्कारिला जाऊ नये म्हणून मी फार जपतो.मानवी मनुष्यांच्या हातून होणारी नानाविध कर्मे समजून घेण्याचा प्रयत्न मी काळजीपूर्वक केला आहे.' तो गुन्हेगाराला शासन करील;पण सूडबुद्धीने मात्र नव्हे,तर त्याच्यापासून समाजाचे रक्षण व्हावे म्हणून.थंडगार वाऱ्यामुळे पडसे आले म्हणून काय आपण वाऱ्यावर रागावतो ? त्या वाऱ्याविषयी आपली जी उदासीन, अनासक्त भावना असते.तीच स्पायनोझा आपल्या निंदकांविषयी व अपायकर्त्यांविषयी ठेवी.त्याची एक प्रकारची शास्त्रीय अनासक्ती असे.कार्यकारणभावाच्या अनंत साखळीतील प्रत्येक वस्तू अपरिहार्य असा दुवा आहे,हे त्याने जाणले होते.तो प्रत्येक नैसर्गिक कर्म वा मानवी कर्म शाश्वततेच्या प्रकाशात पाहतो व अविचल राहतो.अशा प्रकारे शाश्वततेच्या आरशात पाहिल्यावर स्पायनोझा आपणास जसे पाहतो.त्याप्रमाणे आपण आपणास पाहण्याची खटपट करू या.प्रत्येक सजीव वस्तू ईश्वराचाच अंश आहे. काळाच्या पृष्ठावर साकार रूपाने,मूर्त रूपाने,प्रकट झालेला ईश्वराच्या अमर महाकाव्यातील विचार म्हणजे प्रत्येक जीव.पृष्ठ नष्ट झाले की काव्याचे मूर्त स्वरूप नष्ट होते,अदृश्य होते. पण तो विचार अदृश्य झाला तरी मरत नाही.होमरची कविता असलेले पुस्तक फाटले,म्हणजे होमरची कविता नष्ट झाली असे होत नाही.त्या कवितेचे केवळ ते मुद्रण नष्ट होते.होमरचे विचार अनेक पृष्ठांवर छापलेले आहे. ती पृष्ठे नष्ट करता आली,तरी ते विचार नष्ट करता येणार नाहीत.शरीर मरते,


पण आत्मा राहतोच.रूपक बदलून असे म्हणता येईल की,प्रत्येक जीव म्हणजे जीवनाच्या कॅलिडोस्कोपमधील रंगीत काचेचा एक तुकडा आहे. पुन्हा रूपक बदलून असेही म्हणता येईल की,

ईश्वराचा आत्मा,तो परमात्मा किंवा ईश्वरी योजना म्हणजे एक सूर्य आहे व मानवी शरीर म्हणजे पंकिल पल्वल आहे. ते तळे आटले - म्हणजेच हे शरीर मेले की सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते.पण सूर्य पहिल्याप्रमाणेच तेजाने तळपत असतो.दुसऱ्या शब्दांत बोलायचे तर असे म्हणता येईल की,प्रत्येक मानवी प्राणी म्हणजे दैवी ब्रह्माचा अंश आहे.व्यक्ती मरते म्हणजे बिंदू सिंधूत मिळून जावा त्याप्रमाणे आत्मा परमात्म्यात विलीन होतो.एखादी तान महासंगीतात विलीन व्हावी तसा आत्मा परमात्म्यात मिळून जातो.क्षणभर दिक्कालात आलेला स्थानबद्ध झालेला तो भव्यदिव्य विचार पुन्हा शाश्वततेच्या योजनेत जाऊन बसतो.


'शरीरनाशाबरोबर मानवी मनाचा संपूर्ण नाश होणे शक्य नाही.... सद्गुणी आत्मे ईश्वरी अंशाचे असल्यामुळे दैवी ज्ञानाचे अंशभाक असल्यामुळे चिरंजीवच आहेत.'


मानवी प्राणी म्हणजे इतस्ततःविखुरलेले पृथक् व अलग जीव नव्हेत.प्रत्येक केवळ स्वतःसाठी धडपडणारा व स्वतःपुरता जगणारा नाही.आपण सारे त्या दैवी ब्रह्माचे संबद्ध भाग आहोत.आपणास माहीत असो वा नसो, आपण सारे एकाच ध्येयासाठी धडपडत आहोत.आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहोत.एवढेच नव्हे,तर आपण एकाच विराट शरीराचे अणू आहोत.अगदी क्षुद्रतम माणसावर केलेला प्रहारही सान्या मानवजातीच्या शरीरावरील आघात होय. एखाद्या क्षुद्र व्यक्तीविरुद्ध केलेला अन्याय साऱ्या मानवजातीवरीलच अन्याय होय.जो आपल्या सर्व मानवबंधूंना सहानुभूती दाखवतो,जो सर्वांवर प्रेम करतो,तो जीवनाच्या स्वरूपाशी सुसंवादी आहे,असे म्हणावे.स्पायनोझाच्या मताचा 


वॉल्ट व्हिटमन् लिहितो,'सहानुभूतिशून्य हृदयाने तुम्ही एक फर्लांग चाललात,तर आपले कफन पांघरून तुम्ही आपलीच प्रेतयात्रा काढली,असे म्हणण्यास हरकत नाही.'


दुसऱ्याचे सुख वाढवून त्यायोगे स्वतः सुख मिळवणे हे मानवी जीवनाचे साध्य आहे.'शहाणा माणूस जी गोष्ट दुसऱ्यासाठी इच्छित नाही ती तो स्वतःसाठीही इच्छित नाही.'अल्पसंतुष्ट असणे,द्वेषाची परतफेड प्रेमाने करणे, दैवाने जे जे भोगावे लागेल ते ते आनंदाने व धैर्याने हसत हसत सहन करणे म्हणजेच भले जीवन,अर्थात स्पायनोझाच्या मते प्रज्ञावंतांचा संपूर्ण मार्ग अगर श्रेष्ठांचा निर्दोष मार्ग होय.मुख्य गोष्ट ही की,सर्व जगाशी एकरूप होऊन राहण्यात आनंद मानावयास शिका. तुमचे तसेच तुमच्या शेजाऱ्याचे जीवन कितीही क्षुद्र असले तरी,या विश्वाच्या विराट वस्त्रातील ते आवश्यक असे धागे आहेत, हे कधीही विसरू नका.आपल्या मनाचे सर्व निसर्गाशी ऐक्य आहे याची जाणीव वा याचे ज्ञान असणे ही परम मंगल व कल्याणप्रद गोष्ट. होय.' हे जग तुमच्यासाठी केलेले नसले, तरी निदान तुम्ही तरी या जगासाठी केले गेले आहात. तुम्ही या जीवनाच्या ग्रंथांतील एक महत्त्वाचे पृष्ठ आहात. तुम्ही नसाल तर तो अपूर्ण व अपुरा राहील हे विसरू नका.


स्पायनोझाचे जीवन अतिसुंदर व रमणीय,पण फारच अल्प होते.एका जागेहून दुसऱ्या जागी असा तो सारखा फिरत होता.शेवटी हेग येथे एका मित्राच्या घरी तो राहिला.त्याच्या हयातीतच हे घर यात्रेचे ठिकाण झाले. स्पायनोझाच्या दर्शनाला त्याच्या काळातील सारे महाबुद्धिमान,प्रज्ञावंत व प्रतिभाशाली लोक येत.तो आपल्या काळातील महर्षी होता.बुद्धिमंतांचा राणा होता.या घरातच तो बसे.आजूबाजूला शारीरिक व्यवसायाची हत्यारे पडलेली असत.त्याच्या अंगावर साथे कपडे असत.

कपड्यांबाबत तो एकदा म्हणाला, 'शरीर ही काय फार मोलाची वस्तु आहे? ही साधी वस्तू फार मौल्यवान कपड्यात कशाला गुंडाळायची?' येथे बसून तो मित्रांचे स्वागत करी,येथेच बसल्याबसल्या त्याने ते अमर नीतिशास्त्र लिहिले,हा ग्रंथ त्याचे हस्तलिखित त्याच्या मित्रांनी वाचले होते व समक्ष तोंडी, तशीच पत्रांनी त्यांनी त्यावर चर्चा केली होती.हा ग्रंथ त्याच्या मरणोत्तर छापला गेला.फ्रान्स व हॉलंड यांचे युद्ध या वेळी चालले होते.

राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा व सेनापतींच्या हालचाली व हुलकावण्या यांकडे त्याचे लक्ष नसे.त्याला त्यांची गोडी नव्हती.त्याला शत्रूविषयी देशबांधवांइतकाच आदर वाटे.त्याचा आनंद एकच होता,तो म्हणजे तत्त्वज्ञानविषयक.


एकदा तर एखाद्या निष्पाप मुलाप्रमाणे,एखाधा विश्वप्रेमी संताप्रमाणे तो शत्रुसैन्याच्या सेनापतीने बोलावल्यावरून शत्रूच्या गोटात गेला.सेनापती प्रिन्स कोडे याला स्पायनोझाशी थोडी तात्त्विक चर्चा करायची होती,थोड्या तात्त्विक गप्पा मारायच्या होत्या.त्या वेळी तो चुकून शत्रूचा हेर म्हणून फाशीच दिला जाणार होता.आपण देशद्रोही नाही,अशी आपल्या देशबांधवांची खात्री पटविण्याच्या कामी सुदैवाने त्याला यश आले म्हणून बरे.आपण निरुपद्रवी ज्ञानोपासक आहोत हे त्याने पटवून दिले म्हणूनच त्याचे प्राण वाचले.पण त्याचे प्राण फार दिवस वाचायचे नव्हते.त्याची प्रकृती झपाट्याने खालावत होती.१६७७ सालच्या हिवाळ्यात त्याची खालावलेली प्रकृती अधिकच खंगली व फेब्रुवारीच्या बाविसाव्या तारखेस तो मरण पावला. त्याच्या घराचा मालक व त्याच्या घराची मालकीण चर्चमध्ये गेली होती.त्याचा वैद्य तेवढा त्याच्याजवळ होता.त्याने टेबलावर असलेले सर्व पैसे लांबवले. चांदीच्या मुठीचा एक चाकूही गिळंकृत केलाआणि मृतदेह तसाच टाकून तो निघून गेला.स्पायनोझा हे पाहायला असता तर पोट धरून हसला असता.मरणसमयी त्याचे वय फक्त चव्वेचाळीस वर्षांचे होते. त्याच्या मनोबुद्धीचा पूर्ण विकास होण्याची वेळ येत होती.तो परिणतप्रज्ञ होत होता.अशा वेळी घाला आला आणि तो गेला.पण रेननच्या शब्दात म्हणू या की, 'ईश्वराची अत्यंत सत्यमय दृष्टी आजपर्यंत जर कोणी दिली असेल,तर ती स्पायनोझाने.ती दृष्टी देऊन तो गेला.'शोरमॅचर लिहितो,'विचाराच्या क्षेत्रात स्पायनोझा अद्वितीय आहे.त्याच्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही.तो आपल्या कलेचा स्वामी आहे.या क्षुद्र जगाच्या फार वर तो आहे.या क्षुद्र जगात त्याला अनुयायी नाहीत व कोठेही नागरिकत्व नाही.तो जणू या जगाचा नाहीच.'


असे म्हणतात की,इतिहासात खरे निर्दोष ख्रिश्चन दोनच होऊन गेले.येशू व स्पायनोझा आणि दोघेही ज्यूच होते.

१६/११/२५

शांतमनाचा स्पायनोझा / Spinoza of peace

स्वतःविषयी युरोपीय पंडितांनी चांगले लिहावे-बोलावे यासाठी चौदावा लुई लाचलुचपती देत होता.पण स्पायनोझाला तो पेन्शन द्यावयास तयार होता.अट एकच होती.या ज्यू तत्त्वज्ञान्याने आपले पुढचे पुस्तक लुईला अर्पण केले पाहिजे.पण ज्याच्याविषयी स्पायनोझाला आदर वाटत नसे त्याची खुशामत करण्याइतका क्षुद्रमती तो नव्हता.तो प्रामाणिक होता. त्याला आत्मवंचना करावयाची नसल्यामुळे त्याने लुईचे म्हणणे नम्रपणे;पण निश्चितपणे नाकबूल केले.


(अ‍ॅमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा,मानवजातीची कथा हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)


याच सुमारास जर्मनीतील एक राजा कार्ल लुडविग याने स्पायनोझाला हीडलबर्ग येथील विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची जागा देऊ केली,पण एका अटीवर.'स्टेटच्या प्रस्थापित धर्मावर त्याने कधी टीका करता कामा नये.

स्पायनोझाने ती जागा साभार नाकारली.उपाशी राहावे लागले तरी हरकत नाही.पण सत्यच बोलायचे असे त्याने ठरवले.त्याच्यासमोर असल्या सुवर्णसंधी नाचत असता त्याला खरोखरच अर्धपोटी राहावे लागत होते.पैसे समोर खुळखुळत होते तरी त्याने ते नाकारले.कधीकधी तो गव्हाच्या अगर दुसऱ्या कसल्या पिठाची नुसती कांजी पिऊनच दिवस काढी.चव यावी म्हणून तो तीत थोडे बेदाणे व थोड्या मनुका टाकी.अजिबात उपाशी राहण्याचा प्रसंग येऊ नये यासाठी त्याला पै न् पै जपून खर्चावी लागे.चांगले व पोटभर अन्न तर मिळत नव्हतेच; पण बौद्धिक श्रम मात्र भरपूर होत असल्यामुळे त्याला क्षय होणार असे दिसू लागले.पण ईश्वरप्रेमाने मस्त असणारा हा निग्रही तत्त्वज्ञानी राजांचे साह्य नाकारीत होता.तशीच निकटवर्ती मित्रांचीही मदत स्वीकारीत नव्हता.दुसऱ्यांची श्रद्धा व दुसऱ्याचे पैसे घेणे म्हणजे जणू अधर्म असे त्याला वाटे.पोटासाठी तो चश्म्याच्या काचा घासून देई व मिळणाऱ्या फुरसतीच्या वेळात आपले विचार अधिक स्वच्छ व सतेज करी.कसे जगावे हे दुसऱ्यांना शिकविण्यासाठी तो आपले विचार घाशी व स्वतःला जगता येण्यासाठी चश्म्यांच्या काचा घाशी.


अशा अभंग व अविचल चारित्र्याचे लोक इतिहासात फार विरळा ! त्याचा आत्मा अत्यंत बलवान होता.तो अगदी एकाकी असा राहत होता.त्याच्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्याच्या धर्मबांधवांनी त्याला बहिष्कृत केले होते.त्याने कोणताही पंथ (वा चर्च) न पत्करता स्वतःचा सर्व चर्चेस् व सायनागॉग ज्याच्या पोटात येऊ शकतील असा स्वतंत्र विश्वव्यापक धर्म निर्माण केला. त्याला सर्व विश्वात विश्वंभर भासत होता.तो बंडखोर होता.पण त्याचे बंड विशिष्ट प्रकारचे होते.त्याच्या बहिणीने त्याचा वारसा लुबाडला होता.त्याने तिला कोर्टात खेचले व खटला जिंकला.पण पुन्हा सारी इस्टेट त्याने तिलाच परत दिली.


कन्फ्यूशियसप्रमाणे त्यालाही अपकारांवर वा अपायांवर रागावण्यास मुळीच वेळ नव्हता.अपकार वा अपाय करणाऱ्यांवर रागावण्याइतका क्षुद्र तो नव्हता.तो स्वतःचा इतका अधःपात होऊ देत नसे.दुसऱ्यांवर रागावण्याइतका खाली तो कधीही येत नसे.अ‍ॅमस्टरडॅम येथील ज्यू धर्मोपदेशकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला व 'याच्याशी संबंध ठेवू नका.याला एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागवा.'असे त्यांनी सर्व ज्यूंना आज्ञापिले,तरी त्यांच्यावर न रागावता स्पायनोझा त्यांना सोडून व आपली जात सोडून निघून गेला.'ज्यू राबींना जे मोलवान वाटत आहे. त्याचे ते रक्षण करीत आहेत.मला ते बहिष्कृत न करतील तर स्वतःच्या धर्माशी प्रतारणा केल्याचे पाप त्यांना लागेल.पण ज्यू धर्मोपदेशकांचे वर्तन त्यांच्या धर्मकल्पनेनुसार योग्य असले,तरी माझे वर्तनही माझ्या विचारसरणीनुसार योग्यच आहे व मी वागलो तसा न वागतो तर माझ्या हातून माझ्या आत्म्याची फसवणूक झाली असती.'अशी त्याची विचारसरणी असल्यामुळे ज्यूंनी त्याची ताबडतोब केलेली हकालपट्टी त्याच्या मते तर्कदृष्ट्या योग्यच होती.तो आता एकटाच राहिला. धर्महीन लोकांत फेकला गेला.त्याचा ज्यूंच्या धर्मावरचा विश्वास साफ उडाला होता.


ज्यूंनी बहिष्कृत केल्यावर त्याने आपले मूळचे 'वरुच' नाव बदलून 'बेनेडिक्ट' केले.स्पायनोझाचे तत्त्वज्ञान कब्बालाच्या गूढवादावर उभारलेले आहे व त्याचे नीतिशास्त्र जगातील प्रॉफेट्सच्या लिखाणांपासून मिळालेल्या स्फूर्तीतून जन्माला आले आहे.


धर्माभ्यासात तो ग्रॅज्युएट झाला.पण पास होताना जास्तीतजास्त अपमान त्याच्या वाट्यास आला. धर्माभ्यासानंतर त्याने लॅटिनच्या व इतर धर्मोपदेशकांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आरंभिला.व्हॅन डेन नामक डच पंडित त्याला लॅटिन शिकवीत असे. एन्डे भाषाकोविद व व्युत्पत्ति

शास्त्रज्ञ होता.धर्माच्या बाबतीत तो नास्तिक होता.पुढे काही वर्षांनी चौदाव्या लुईची त्याच्यावर अवकृपा झाली व त्याला सार्वजनिकरीत्या फाशी जाण्याचा मान लाभला.


व्हॅन डेन एन्डेची मुलगी स्पायनोझाला शिकण्यात मदत करीत असे.स्पायनोझा तिच्या मार्गदर्शनाचे लॅटिनच नव्हे तर प्रेमही शिकला.आपण ज्यू आहोत हे विसरून त्याने तिला लग्न करण्याची विनंती केली.तेव्हा तिने त्याचे ज्यूपण त्याच्या ध्यानी आणून दिले व स्वतःच्या कर्करिंग नामक दुसऱ्या एका विद्यार्थ्याशी लग्न केले.तो तिच्याच धर्माचा असून हँबूर्ग येथे त्याचा फायदेशीर धंदा होता.


प्रेमाचा हा असा अनुभव आला.त्यामुळे तो शहाणा झाला व आपल्या विफल प्रेमापासून अमूर्तच्या प्रेमाकडे वळला.त्याने प्लेटो,स्टोइक व एपिक्युरियन पंथांचे तत्त्वज्ञानी,त्याचप्रमाणे त्याच्या वेळेपर्यंत झालेले सर्व तत्त्वज्ञानी वाचून काढले.


गिऑर्डानो ब्रूनो हा विश्वी विश्वंभर मानणारा होता.त्याच्या तत्त्वज्ञानाचा स्पायनोझावर बराच परिणाम झाला.ब्रूनोला नवीन विचार करणारा म्हणून जाळण्यात आले.तसेच डेकार्टासच्या गणितातील अमूर्त तत्त्वांनीही तो आकृष्ट केला गेला.सनातनी विचार प्रकट करण्याबद्दल डेकार्टसला राजा महाराजांकडून मानसन्मान मिळाले होते.स्पायनोझाचे

मन अतिशय विशाल होते.तो जे जे वाची ते सर्व स्वतः पचवून टाकी.शेवटी,त्याचे तत्त्वज्ञान एक प्रकारचा ज्यू गूढवादच झाले.त्याला प्लेटोच्या विचारांचाही रंग होता.एपिक्युरसच्या संशयवादाचीही थोडीशी छटा होती.व इटालियन हुतात्मा ब्रूनो यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानानेही त्याला थोडा आकार दिला होता. फ्रेंच तत्त्वज्ञानी डेकार्टस याच्या गणिती परिभाषेतून स्पायनोझाचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले गेले. स्पायनोझाने आपली सारी पुस्तके सिसरोनियन लॅटिनमध्ये लिहिली.

त्याच्या बुद्धीइतकी विशाल व व्यापक बुद्धी इतिहासात फारच कचित दिसते.पण स्पायनोझाचे नीतिशास्त्र वर लिहिण्याप्रमाणे इसापचे नीतिशास्त्र होते.


वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आपले जन्मगाव अ‍ॅमस्टरडॅम सोडून तो लंडन शहराजवळच्या हिन्स्बर्ग उपनगरात येऊन राहिला.येथे प्राचीन इझायल ऋषीप्रमाणे तो शरीरश्रमाने पोटाला मिळवी व उरलेला वेळ जीवनाचे,तसेच ईश्वराचे कोडे उलगडण्यात घालवी जीवनाचा अर्थ काय,याचा विचार करीत तो बसे. आपसात लढणाऱ्या कोळ्यांची भांडणे पाहून त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागत,गाल ओले होते.होता होईतो तो कधी प्रक्षुब्ध होत नसे. ₹पण मालकिणीने त्याच्या खोलीतील कोळिष्टके झाडून टाकली,तर मात्र त्याला जरासा राग येई.कोळ्यांच्या जाळ्यांकडे पाहत असता तो मनात आपल्या तत्त्वज्ञानाचे चिंतन करीत बसे.त्याचे पहिले पुस्तक धर्मावर होते.त्याचे नाव (A Treatise on Religion and Politics.) त्यात त्याने बायबलवर टीका केली होती.जुन्या करारातील ईश्वराला रजा देऊन त्याने स्वतःच्या नव्या करारात अधिक दयाळू प्रभू निर्माण केला.स्पायनोझाचे हे नवे पुस्तक,हा त्याचा नवा करार म्हणजेच त्याचे सुप्रसिद्ध नीतिशास्त्र होय. भूमितीच्या पद्धतीने स्पायनोझाने लिहिलेले हे बायबल आहे.अध्यात्म गणितात बसविण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे.हा अदृश्य जगाचा फोटो आहे.हे शाश्वततेच्या सांगाड्यात बसवलेले जीवनाचे चित्र आहे.


कोणीतरी म्हटले आहे की,अध्यात्मशास्त्राचा अभ्यास म्हणजे अंधाऱ्या खोलीत तिथे नसलेले मांजर शोधीत बसण्यासारखे आहे.पण दुसरे काही म्हणतात की,ज्ञात जगाच्या अभ्यासाइतकाच अज्ञात जगाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे आणि आजचे अध्यात्मच उद्याचे सृष्टिशास्त्र होईल.

शास्त्रज्ञ पाऊल टाकण्यास भितात,तिथे आपण वारंवार घुसू पाहत असतो हे तत्त्वज्ञानी कबूल करतात.पण त्यांचे म्हणणे असे असते की, तत्त्वज्ञान्यांनी ज्या अंधारात उड्या मारल्या.त्याचेच फळ म्हणजे विज्ञानातील मोठमोठे शोध.अंधारातील त्या उड्यांतूनच विज्ञान जन्मले आहे.


तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष उपयुक्तता किती आहे या वादात न शिरता स्पायनोझाच्या अध्यात्मसिंधूत आपण बुडी घेऊ या.पण आपण फार पुढे मात्र जावयाचे नाही.बुडणार नाही इतपतच खोल पाण्यात आपण जायचे.प्रत्यक्ष सृषष्टीच्या किनाऱ्यापासून फार दूर जायचे नाही. किनारा डोळ्यांसमोर ठेवायचा असे ठरवून या समुद्रात शिरू या.बुडी घेऊ या.आपणा सर्वांना नेहमी सोडवावेसे वाटणारे दोन प्रश्न स्पायनोझासमोरही होते.कोणते बरे प्रश्न ?


१. या जगात आपणास कोणी जन्माला घातले ?


२. येथे आपण काय करायचे?


या प्रश्नांची उत्तरे मिळावी म्हणून तो ईश्वराचे स्वरूप तपासू लागला.ईश्वराचे स्वरूप,विश्वाची रचना,मानवाचे मन या तिहींचे पर्यालोचन त्याने सुरु केले.तो अशा निर्णयाला आला की,ईश्वरात सारे आहे व ईश्वर सारे व्यापून आहे.ईश्वर म्हणजे सृष्टी निर्माण करणारे परम ज्ञान,त्या ज्ञानाने उत्पन्न होणारे हे जगही तोच आहे. परमेश्वर म्हणजे सनातन स्त्रष्टा,चिरंजीव व अमर कलावान.

काळाच्या खटक खटक करणाऱ्या भव्य मागावर सृष्टी,चंद्र,सूर्य ताऱ्यांचे व नाना ज्योतिर्गोलांचे तेजस्वी वस्त्र तो विणीत असतो व स्वतःच ते पांघरतो.हे दृश्य विश्व म्हणजे प्रभूचे शरीर आहे आणि विश्वाला चालना देणारी प्रेरणा,अंतःशक्ती व अंतःस्फूर्ती म्हणजे त्या प्रभूचे मन.पण शास्त्रज्ञ 'वस्तू व वस्तूंतील शक्ती एकरूप आहेत.' असे म्हणतो.त्याप्रमाणेच प्रभूचे हे शरीर व त्याचे मन एकरूप आहेत.दुसऱ्या शब्दांत हेच सांगावयाचे झाले,तर ईश्वर म्हणजेच हे अनंत विश्व व अनंत ज्ञान.ईश्वर म्हणजेच विश्व प्रत्येक पर्णात,मातीच्या प्रत्येक कणात, प्रत्येक प्राणिमात्रात मग तो कितीही क्षुद्र असो व सर्व चराचरात परमात्मतत्त्व आहे.


ईश्वराची दिव्यता चराचरातील अणुरेणूत आहे.आकाशातील अत्यंत तेजोमय गोल व पृथ्वीवरील एखादा भिकारी दोघांचीही या सृष्टीच्या महाकाव्यांत सारखीच जरुरी आहे.सृष्टीच्या महाकाव्यात ही दोन्ही अक्षरे सारखीच महत्त्वाची आहेत.


हे विश्वाचे महाकाव्य त्या अनंत ज्ञानाचे फळ आहे. मानवाच्या क्षुद्र इच्छा व त्याचे क्षुद्र कायदे यांना अनुसरून हे विश्वकाव्य रचण्यात येत नसते.ईश्वरी मनोबुद्धी व मानवी मनोबुद्धी यात बिलकुल साम्य नाही. जीवनाच्या नाटकात प्रभूने जे संविधानक योजलेले असेल ते आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचे आहे.ते केवळ मानवाची दृष्टी ठेवून निर्मिलेले नाही.मानवाने त्यावर बरे की वाईट हा निर्णय देत बसू नये.नाक चष्मा ठेवण्यासाठी आहे असे म्हणणे अगर डासांनी चावावे म्हणून हातपाय आहेत असे म्हणणे जितके वेडेपणाचे, तितकेच हे विश्व आमच्यासाठी निर्मिलेले आहे असे म्हणणे हेही वेडेपणाचे आहे. मानवांनी आपल्या मर्यादित ज्ञानाने ईश्वराच्या अनंत ज्ञानावर आक्षेप घेऊ नये.


स्पायनोझाच्या मते ईश्वर हा एखादा लहरीनुसार वागणारा सृष्टीचा हुकूमशहा नसून तो जणू दैवी चित्कळा आहे.

स्पायनोझाचा ईश्वर कोठे स्वर्गात बसलेला नाही… राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

१४/११/२५

पैल तो गे काऊ / Pail to gay cow

्तरीचा दिवा


हिवाळ्यातील अशीच एक सायंकाळ.मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी साऱ्या पर्वताच्या रांगा देदीप्यमान दिसू लागतात.हळूहळू तो सोन्याचा गोळा पर्वताआड दिसेनासा होतो.कावळे चार, तीन, दोनच्या थव्यांनी दशदिशांतून परतू लागतात. गावच्या मध्यावर मारुतीचं देऊळ आहे.देवळापुढे पिंपळाचा मोठा पार.मोठा पार.हा पिंपळ फार जुना आहे.

काकागार ते हेच.इथं रोज सायंकाळी हजारो कावळे जमतात.सारा गाव त्या कावळ्यांच्या कॉव कॉवने दुमदुमतो.काही वेळातच हा हलकल्लोळ एका विलक्षण गतीनं अंधारात विरून जातो.कसं शांत,अद्भुत वाटतं.दुरून घरादारातील दिव्यांची उघडझाप दिसते.लामण दिवा विझू नये म्हणून हाताचा आसरा करून एखादी सुतनू लगबगीने एका दारातून दुसऱ्या दाराकडे जाताना दिसते. माझ्या बालमनावर कोरलेले हे ध्वनिचित्र कधीही पुसट होत नाही.अंतरीचा हा दिवा कधीही मालवला नाही.


हिरव्या दुलईत


बागेत हिरव्या दुलईत कावळे झोपी गेले आहेत. मध्यरात्र झाली असेल.एका वृक्षावरील कावळ्यांचा थवा अचानक जागा झाला.त्यांच्या पंखांच्या फडफडीने वातावरणात विलक्षण अस्वस्थता पसरली.त्यांच्या कॉव-कॉव या आवाजाने सारे वातावरण निनादित झाले.इतर वृक्षांवरील कावळ्यांना देखील जाग येते आणि एकच कोल्हाळ माजतो.रात्रीच्या गर्भातील हा त्यांचा आवाज दिवसा ऐकू येणाऱ्या स्वरापेक्षा कितीतरी भिन्न आहे. 


लाडीगोडी


प्रेमिकांच्या गाठीभेटीसाठी वसंत ऋतूसारखा काळ नाही.रात्री लहान असल्या तरी असा कुठं डोळा लागतो तोच पहाटेचे आगमन होते.अंथरुणावर पडल्या पडल्या उघड्या खिडक्यांच्या जाळीतून बागेत पाहता येते.पहाटेचा गार वारा वाहू लागतो. प्रेमी युगुलांची ती गोड सलज्ज कुजबूज विरहापूर्वीची ती लाडीगोडी आणि अचानक कसला तरी मोठा आवाज कानी पडतो.वाटते की, आपणास अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर नसेल ! हत् तिच्या ! हा तर बागेत उडणाऱ्या कावळ्याचा आवाज.


परभृत


कावळ्यांचा आवाज एरवी मोठा कर्कश.परंतु अंड्यावर बसलेल्या कावळीचा खोल आवाज पर्वतमालांतून ज्यानं ऐकला असेल,तो त्या गूढ निळाईनं झाकलेल्या पर्वतमालांच्या गर्भागारातून येणाऱ्या आवाजानं रोमांचित होईल.त्याच वेळी कोकिळ गाऊ लागतात.मध्येच त्या कावळींच्या घरट्यावरून ससाण्यासारखी झेप घेत कुहुकुहू करीत उडू लागतात.कावळे त्यांचा पाठलाग करीत असतात.

कोकिळेला गाता येत नाही.कंठातून घळघळणाऱ्या आवाजानं त्या नरांना साद घालू लागल्या.कावळ्याचे घरटे हेरताच त्यांनी कोल्हाळ माजविला.


शांत काकागार


बाहेर रिमझिम वर्षत आहे.पर्वतमालावर हळूवार जाणाऱ्या मेघात सारी जनश्री लपली आहे. खिडकीजवळ वेताच्या खुर्चीवर बसून या दृश्याकडे पाहात बसलो आहे.खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची गार झुळूक शरीरावर रोमांच उभे करीत आहे. कुंपणाच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांनी चोची वर करून माना आखडून धरल्या आहेत व पंख पसरले आहेत.जणू त्यांना सुळावर चढविलं आहे असं वाटतं.

काकागारदेखील आता काही काळ शांत राहील.


आनंददायी कावळे


वैशाख महिना.नदीकाठचे कळंब,जांभळी, रस्त्याच्या दुतर्फा असलेले लिंब,नांदुरकी,शेतावरची आंब्याची झाडं यांवर कावळ्यांनी घरटी बांधावयास सुरुवात केली आहे.एकेका झाडावर ३-४ खोपी दिसतात.कावळी आनंदानं कोटरात बसून नादमधुर कुर्रर्रर्र असा आवाज करीत आहे.त्यांचा अनुनय-प्रियाराधन-चौर्यरत चालला आहे. कावळ्यांचं पोषण करणाऱ्या अशा निष्कंटक वृक्षांवर त्यांनी खोपी केली की त्या वर्षी चांगला पाऊस पडायचा.जिकडे तिकडे आबादी आबाद असे.परंतु एखाद्या वर्षी सावर-पांगारा-बाभूळ अशा काटेरी झाडांवर किंवा सुकलेल्या वृक्षांवर त्यांची कोटरे दिसू लागायची.रात्री-अपरात्री ती झोपेत बरळायची.त्यांना दुःस्वप्नं तर दिसत नसतील ना? कारण असे आवाज दिवसा कधीही ऐकू यायचे नाहीत आणि पुढे अवर्षण पडायचे.


पिलावरील पाखर ( जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,

नागपूर….)


नदीचं पात्र खोल होतं.त्या काठाला लागून अर्जुनसादड्याचं वेडं वाकडं वाढलेलं झाड वर्षानुवर्षे नदीच्या पुराला तोंड देत उभं होतं. एखाद्या वर्षी सारा वृक्षच नदीच्या पाण्याखाली बुडून जाई.त्या विक्राळ प्रवाहात त्याचा शेंडा तेवढा वर दिसावयाचा.त्या वर्षी कावळ्यानं त्यावर घरटं केलं.खूप पाऊस पडला. पूर आलेल्या नदीच्या तीरावरील झाडावरच्या घरट्यात आपल्या पिलाचं रक्षण कसे होईल या विचारानं वृती एकाग्र झाल्यामुळे स्व-नासाची पर्वा न करणारी एकाकी कावळी पुराबरोबर वाहून गेली.


गॅलिलीच्या जीझस् ने आपल्या शिष्याला उद्देशून काढलेले अंतिम निरोपाचे शब्द

" I am with you always
even unto the end of the world " 

"मी नेहमी तुझ्याबरोबर आहे
अगदी जगाच्या शेवटी "

"Jagācyā śēvaṭāparyanta mī nēhamīca āpalyābarōbara āhē."

" जगाच्या शेवटापर्यंत मी नेहमीच आपल्याबरोबर आहे."


मला भेटलेली एक सुंदर स्त्री!


एका संध्याकाळी सगळी कामं  आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना .... 


काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी.... 


आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...! 


तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे... 


तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा.... 


अरेरे ! तुमच्या आईबापाच्या  आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...


वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?


तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? 


म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं  त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?

Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!


पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला? 


म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,  पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? 


तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे ! 


आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की,  त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... ! 


आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली... 


पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार ! 


आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ? 


कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही... 


ते कसं आज्जी मला नाही समजलं ...


ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी  बोलता येतंय ना मला ??? 


काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ? 


काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स






१२/११/२५

सामने,युद्ध,देव ! / Front,war,God !

होतं:आणि यानं त्यांचं अन्न शोधायचं क्षेत्रही कमी होत होतं. २५.१०.२५ ,या लेखातील शेवटचा दुसरा भाग..


नुसती माघार घेणं हा पराभव नव्हता.एखादे वेळी माघार घेऊन पराभव टाळणं,विजय मिळवणं,हेही जमलं असतं.आपली कुमक कमी अंतरावरून आणि लवकर येणार;शत्रूला मात्र दुरून येणारी कुमक उशिरानं मिळणार:हे चांगलंच होतं.पण अन्न मिळायचं क्षेत्र कमी होण,हे मात्र मोठं नुकसान होतं.मुळात पायवाट वारुळाची लोकसंख्या घटत असल्यानं त्यातल्या मुंग्यांना हा त्रासही फार वाटला नाही.वारुळाजवळच्या कमी क्षेत्रातच अन्न शोधूनही वारूळ जगू शकत होतं.आता सामने बंद करून शांततेचा काळ भोगणं पायवाट-वारुळाला मोहवू लागलं.पण मुंग्यांची वारुळं अशी स्थिरावलेली शांतता कायम राखू शकत नाहीत.एक वारूळ जिंकत जातं,दुसरं हरत जातं.तीन आठवडे पायवाट-वारूळ मागे सरकत होतं. शेवटी स्पर्धेचं मैदान अगदी वारुळाच्या पायथ्याशी आलं.

आता ओढा-मुंग्या शड्डू ठोकत नव्हत्या,की ताकद दाखवत नव्हत्या.त्या थेट पायवाट-वारुळावर तुटून पडत होत्या.हेही पायवाट-वारुळातल्या मुंग्यांना सुचायला हवं होतं.दर स्पर्धेत,दर सामन्यात ओढा-मुंग्या जास्तजास्त आक्रमक होत होत्या.धक्के देणं वाढलं होतं.पायवाट-मुंग्यांभोवती रिंगणं आवळली जात होती. कधीतरी ही आक्रमकता स्पर्धा-सामन्यावर न थांबता युद्धात बदलणार होती.शांततेचा उंबरठा ओलांडून ओढा-मुंग्या रणभूमीत उतरणार होत्या.एकदा पायवाट-मुंग्या मीटरभर सज्ज उभ्या असताना ओढा-अभिजन मुंगीनं उंबरठा ओलांडला.भेटलेल्या पहिल्याच पायवाट-मुंगीवर तिनं विषारी द्रव्य फवारलं.


सोबत भीती दाखवणाऱ्या फेरोमोन्सचाही मारा केला. आता तिच्या शेजारच्या ओढा-मुंग्या चेकाळल्या,आणि त्यांनीही पायवाट-मुंग्यांवर हल्ला चढवला.एका द्वंद्वयुद्धाची दोन,दोनाची चार,अशी झपाट्यानं मारामारी पसरत गेली.काही पायवाट-मुंग्या हल्ल्याला तोंड देऊ लागल्या,तर काही मागे जाऊन आणखी मुंग्यांना रणमैदानाकडे बोलावू लागल्या.आता दिखाऊ वागणूक संपली.

कोणतीच मुंगी ताठ उभी राहून उंची वाढवेना, की पोट फुगवून आकार वाढवेना.आता एकमेकींवर चढून आपल्या करवतीसारख्या जबड्यांनी शत्रूचे पाय, शत्रूची शिंगं तोडायचा प्रयत्न होऊ लागला.कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा होऊ लागला.जखमी आणि मेलेल्या शत्रूची खांडोळी उडवली जाऊ लागली.लवकरच सगळं क्षेत्र मेलेल्या आणि जायबंदी मुंग्यांनी भरून गेलं.बहुतेक मेलेल्या मुंग्या पायवाट-वारुळाच्या होत्या.त्यांच्यात राणीची सेवा करणारी,नंतर वारूळ सावरायला मदत करणारी अभिजन मुंगीही होती.तिला ओढा-मुंग्यांनी मारून तिचे तुकडे केले होते.


आता बहुतेक पायवाट-मुंग्या पळून वारुळात जाऊन बसल्या.बाहेर राहिलेल्या सगळ्या मारल्या गेल्या.त्या ओढा-मुंग्यांचं अन्न झाल्या.

एखादा नाकतोडा किंवा सुरवंट खाल्ला जावा,तशाच मेलेल्या शत्रु-मुंग्याही खाल्ल्या गेल्या.युद्धाची मोहीमच अन्न कमावण्याची मोहीमही झाली.केवळ युद्धातल्या विजयामुळे नव्हे,तर एरवीही असे स्वजातिभक्षण झालंच असतं.


पराभूत पायवाट-मुंग्यांना आपण आपल्या माय-वारुळाच्या जास्तजास्त जवळ ढकलले जातो आहोत,हे समजत होते.त्यातून पराभव किती भीषण आहे,हेही समजत होते.अखेर वारुळाच्या तोंडाजवळचे काही इंच सांभाळणंही अशक्य झालं,तेव्हा आसपासची माती,काडीकचरा गोळा करून पायवाट-मुंग्यांनी आपल्या वारुळाचं दार बंद केलं.आता पायवाट वारूळ पूर्ण वेढ्यात वारुळाच्या बाहेरचा सारा भाग तपासत, नोंदत फिरत होत्या.काही जास्त होतं,आणि तेही भूमिगत तळघरासारखं किंवा बंकरसारखं.ओढा-मुंग्या शूर,जास्त चौकस मुंग्या तर वारुळापलीकडचा भागही तपासायला गेल्या.आता वेढ्यातल्या पायवाट मुग्या अधूनमधून बाहेर पडून अन्न शोधायला धडपडायच्या.पण जवळच्या क्षेत्रात ओढा-मुंग्यांनी काही अन्न शिल्लक ठेवलंच नव्हतं.आणि पायवाट मृग्यानी दूर जायचा प्रयत्न केला, की त्यांना पकडून,मारून,खाऊन टाकायला ओढा मुग्या सज्जच होत्या.आता पायवाट मुग्यांची उपासमार व्हायला लागली. आधी त्यांनी राखीव अन्नसाठे संपवले.मग संगोपन दालनातील अळ्या आणि कोष खाल्ले गेले.स्वतःच्या धाकट्या बहिणींना मारून प्रौढ बहिणींची पोटं भरली. अखेर तर अंगातली चरबी सोडून काहीच पोषक द्रव्यं उरली नाहीत.


बाहेर ओढा-मुंग्यांनी पायवाट-मुंग्यांचं जुनं सर्व क्षेत्र तपासलं.जुन्या राजवटीचे सर्व अवशेष,जुन्या सर्व खुणा संपवल्या गेल्या.जुन्या पायवाट क्षेत्रभर शेवटच्या लढाईच्या फेरोमोन-खुणा होत्या.कुठे धोक्याची सूचना देणारी रसायनं होती,तर कुठे लढाईला चलायचा आग्रह करणारी.ही सगळी रसायनं आपोआपच नष्ट होत होती, आणि ओढा-मुंग्याही शत्रूच्या या खुणा पुसून टाकत होत्या.पायवाट वारुळात मुंग्या इकडून तिकडे,तिकडून इकडे धावत होत्या.त्यानं काहीच साधलं जात नव्हतं. पण ही सगळी धावपळ मूलप्रवृत्तीतून केली जात होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून सर्वांनी बाहेर पडायचं.काही थोड्या मुंग्या जिवंतपणी वेढा फोडून निघाल्या,


एकत्र झाल्या.तर कुठेतरी नव्या जागी वारूळ घडवता येईल, अशी शक्यता मुंग्यांना त्यांचे जीन्स सुचवत होते.पण हे जमायला वेढा फोडणाऱ्यांमध्ये,वाचणाऱ्यांमध्ये खरीखुरी राणी असणं आवश्यक होतं.सैनिक-राणी पुरी पडणार नव्हती.या कडोनिकडीच्या काळात काही वयस्क मुंग्यांना एक वेगळी ऐतिहासिक घटना आठवत होती.ती घडली तेव्हा सध्या वारुळात असणाऱ्या बहुसंख्य मुंग्यांचे जन्मही झाले नव्हते.त्या वेळी सूर्य जोमानं तळपत होता. पायवाट-राणी सातत्यानं अंडी देत होती.संगोपन-दालनं खात्यापित्या अंड्यांनी भरलेली होती.

कामकरी मुंग्या तरुण वयातच दूरदूर जाऊन अन्न गोळा करत असायच्या.आणि अशा काळात,आकाशात ढगही नसताना माथ्यावर सूर्य क्षणभर दिसेनासा झाला जसा झटक्यानं दिसेनासा झाला,तसाच झटक्यात परत दिसायला लागला.आणि हा लपंडाव बराच वेळ होत राहिला.मुंग्यांच्या अंधूक दृष्टीला लांबोळक्या,उंच वस्तू दिसत होत्या.त्यांच्या सावल्या दिसत होत्या.या वस्तू होत्या झाडांसारख्याच;पण त्या हलत होत्या!


त्यांचे आवाजही वेगळेच होते.किडे-मकोडे,खारी आणि सरडे,पक्षी, या सगळ्यांच्या आवाजांपेक्षा वेगळे आवाज ही हलती झाडं काढत होती.आवाज लहानमोठे होत होते.वेगवेगळ्या झाडांजवळून आवाज निघत होते.


आवाज जसे वेगळे होते.तसेच वासही वेगळे होते. उंचावरून येणारे हे विचित्र अशा घटनांचा अनुभव नव्हता.वादळ,पावसाची थैमानं त्यांना आठवत होती.हे मात्र फार वेगळं होतं.काही मुंग्या घाबरून वारुळात पळून गेल्या काहींनी मात्र शौर्यानं या हलत्या झाडांवर हल्ला केला.झालं होतं असं.माणसांचं एक कुटुंब पिकनिकसाठी जंगलात आलं होतं,आणि निष्काळजीपणानं त्यांनी पायवाट वारुळाजवळ जेवायचं ठरवलं होतं! उन्हं कलायला लागली.आणि मुंग्यांना हलती झाडं गेल्याचं जाणवलं.ते विचित्र आवाजही बंद झाले,आणि ते अनोळखी वासही मंदावत गेले.जरा वेळानं वारुळातल्या मुंग्या परत बाहेर पडू लागल्या.त्यांना त्या प्रचंड हलत्या झाडांना साजेसंच विचित्र दृश्य दिसलं.अनेक मुंग्या जमिनीवर चेंगरलेल्या, सपाट अवस्थेत मरून पडल्या होत्या.पण यापेक्षा विचित्र म्हणजे,सगळीकडे अन्नाचे कण पडले होते. काही साध्या मुंग्यांच्या आकाराचे होते,तर काही लाखो पटीनं मोठे होते.वेगळंच अन्न होतं,ना बियांसारखं,ना कीटकांच्या शरीरांसारखं.पण जे काही होतं,ते शुद्ध आणि सघन होतं.

त्यात प्रथिनंही होती,स्निग्ध पदार्थही होते,आणि साखरेचे प्रकारही होते.एरवी मुंग्यांना 'मावा' किड्यांची विष्ठा अन्न म्हणून फार चवदार वाटत असे. कीटकांची शरीरं अत्यंत पौष्टिक वाटत असत.हे स्वर्गीय अन्न त्या दोन्हींपेक्षा चविष्ट आणि पौष्टिक होतं. माणसांनी त्यांच्या पिकनिकचा सर्व कचरा पायवाट-वारुळा शेजारीच टाकला होता.तरुण मुंग्यांना ही घटना आठवत नव्हती.त्यांनी ती भोगली नव्हती.वयस्क मुंग्यांना मात्र गेल्या वर्षीची ती विचित्र आणि अन्न देणारी घटना आठवत होती. पूर्ण वारुळाच्या स्मरणसाठ्याचा विचार केला,तर ती घटना पुसट,

स्वप्नासारखी आणि चमत्कारिक रूपात आठवत होती.


वारूळ-महाप्राण्याच्या वयस्क भागाला ती हलती झाडं नेहमीच्या त्यांच्या विश्वाबाहेरची वाटत होती.माणसांना देवांचे व्यवहार जसे भासतात तसा हा प्रकार.माणसांना जसे देव हे काहीतरी एकाएकी मारणारे,अन्न देणारे जीव वाटतात,तसे वारुळाला हे जीव वाटत होते.कोणास ठाऊक,ते जीव काही दृष्टीनं मुंग्यांचे उपकारी दोस्त असतील.आणि या संकटाच्या काळात ते पुन्हा वारुळाच्या मदतीला धावून येतील.


सगळ्याच मुंग्यांचा या दैवी मदतीवर विश्वास नव्हता. काही मुंग्यांना वाटायचं,की वाऱ्यावादळानं जसे अन्नकण येतात,मुंग्या मरतात,

तशीच ती घटना होती. पण ती फारदा न घडल्यानं दैवी वाटत होती.आणि त्या हलत्या झाडांना मुंग्यांशी घेणंदेणं नव्हतं;ना मारक,ना तारक.आणखी काही मुंग्यांचा तर,असं काही घडलं होतं,यावरच विश्वास नव्हता.थोड्याशा मुंग्यांना तो सगळा काही म्हाताऱ्या मुंग्यांमुळे उपजलेला भ्रम वाटत होता;प्राचीन काळाबद्दलचं स्वप्नरंजन !


पायवाट-वारुळातला भाव असा दुःखानं,भीतीनं रडारड करण्याचा तरी होता;नाहीतर देव मदतीला येतील,अशा आशेचा तरी.वेढ्यात अडकलेली,मरू घातलेली प्रजा होती,ती.तिला एकत्र बांधून ठेवणारी,हेतू पुरवणारी व्यवस्था नव्हती.सुट्या मुंग्यांपासून समाज घडवणारी यंत्रणा नव्हती.अन्न गोळा करा.अंड्यांची आणि अळ्यांची काळजी घ्या,राणीभोवती राखणदारांची फळी उभारा;असे कोणतेच फेरोमोन-संदेश नव्हते. सैनिक-राणीचे फेरोमोन-संदेश वारुळाला सांधून ठेवण्याइतके सबळ नव्हते.

वारुळाला जोडणाऱ्या कड्या विरघळल्या होत्या.आणि बाहेर ओढा-शत्रू उभा होता.


शेवटी उरली भीती आणि फक्त भीती.आता मारू किंवा मरू करत बाहेर पडायचं,किंवा वारुळात कुढत मरायचं.शत्रूला फसवणं,घाबरवणं, धमकावणं,मारणं,वारूळ मजबूत करणं,नवं वारूळ उभारणं,सगळ्या शक्यता संपल्या होत्या.