तो आमच्या प्रार्थनांमुळे जय किंवा आमच्या शत्रूच्या प्रार्थनांमुळे अपराजय देत नसतो.आपणास जे सत् व असत् वाटते,त्याच्याशी त्या परमात्म्याला काही एक करावयाचे नाही,जे निर्माण केलेच पाहिजे असे परमेश्वराला वाटते ते तो आपल्या अनंत बुद्धीला योग्य वाटणाऱ्या नियमानुसार निर्माण करतो. या विश्वाला गतिमान ठेवणारे शाश्वत व सनातन यंत्र म्हणजे ईश्वर,पण या यंत्राला प्रेरणा देणाराही तोच व या यंत्राचे नियमन करणारी इच्छक्तीही तोच आणि शाश्वत गतिमान व शाश्वत प्राणमय अशा या शक्तियंत्रातले आपण सारे आवश्यक असे भाग आहोत आणि त्या अनंत शक्तिमान यंत्रालाच आपण अधिक सुटसुटीत नाव न सापडल्यामुळे ईश्वर म्हणून संबोधितो.
ईश्वरी इच्छा म्हणजेच निसर्गाचा कायदा.प्रकाश ताऱ्यांताऱ्यांपर्यंत सारखा फिरत आहे.मनुष्याची जाणीवशक्ती सारखी काम करीत आहे.कारण ती सर्व ईश्वरी इच्छेचा कायदा मानतात.प्रकाश प्रकाशाचा आवश्यक कायदा मानतो.मनुष्याची जाणीव जीवनाचा कायदा मानते.आपली मानवी इच्छाशक्तीही आवश्यक अशा नियमांचे पालन करते,जगात फ्री वुइल किंवा इच्छास्वातंत्र्य अशी चीज नाहीच.आपण परिस्थितीची बाळे आहोत.परिस्थिती आपणास बनवते.स्पायनोझा लिहितो,'आपल्या मनात केवळ 'सर्वतंत्रस्वतंत्र' असे काहीच नाही.आपणास इच्छास्वातंत्र्य नाही.आपण जी काही इच्छा मनात करतो,ती कोणत्यातरी कारणामुळे असते.त्या कारणाला दुसरे कारण असते.त्या दुसऱ्या कारणाला तिसरे कारण असते.अशा प्रकारे कार्यकारणपरंपरा अनंत असते.' दुसऱ्या शब्दांत हेच सांगायचे तर असे म्हणता येईल की, आपल्या तोंडावरचे भाव किंवा शरीराचे स्नायू यांच्याप्रमाणेच आपली सारी कर्मेही नैसर्गिक शक्तींवरच अवलंबून असतात. या नैसर्गिक शक्ती आपली कल्पनाशक्ती भूतकाळात मागे पाहू शकेल तेथपासून सारख्या चालूच आहेत. अनंत काळापासूनच म्हणा ना! निसर्गाच्या नियत नियमाप्रमाणे असे कायमचेच ठरलेले आहे की,दैवी संगीत लिहिण्याला बीथोव्हेन जन्मावा. लाखो लोकांना हिंसक मरणाकडे नेण्याला नेपोलियन निर्माण व्हावा.आकाशातून खाली पडणाऱ्या पावसाला स्वातंत्र्य नाही.अगर धनुष्यापासून सुटलेल्या बाणाची दिशा बदलता येत नाही.त्याचप्रमाणे आपली कर्मेही नियतच आहेत.आपली इच्छा असो नसो ती तशीच हातून घडावयाचीच.बाणाची गती व मानवाचे कर्म यात फरक इतकाच की,मानवाला आपल्या कर्माची जाणीव असते.स्वकर्माचे भान असते आणि या केवळ जाणिवेलाच तो चुकून आपली इच्छाशक्ती मानतो.आपण काय करतो ते आपणास माहीत असते.पण ते करणे भागच असते..तद्विपरीत वागण्याचे सामर्थ्य वा स्वातंत्र्य आपणास नसते.आपण आपल्या नियतीशी निबद्ध आहोत.
आपल्या जीवनाच्या या छोट्या नाटकात केवळ प्रेक्षक म्हणून राहण्यास आपणास परवानगी आहे.पण त्यात ढवळाढवळ करायला,तिथे लुडबुड करण्यास,आपली इच्छा सोडण्याला आपणास परवानगी नाही.आपल्या कर्माकडे पाहण्याची आपणास पूर्ण मुभा आहे.पण आपली कर्मे आपणच ठरवतो असे जे आपणास वाटते ते मात्र चूक आहे.आपण जे काही निर्णय घेतो ते केवळ आपल्याच भूतकाळाचे, गतजन्मीचे परिणाम नसून आपल्या सर्व पूर्वजांच्या मागील जन्मांचा तो परिणाम असतो.
म्हणून स्पायनोझा शेक्सपिअरच्या अपूर्व बुद्धिमत्तेबद्दल त्याची स्तुती करीत नाही किंवा खुनी माणसाने केलेल्या गुन्ह्यांसाठी त्याच्यावर रागावत नाही.तो लिहितो, 'आपणाकडून दुसऱ्यांचा उपहास होऊ नये,तसेच स्वतःला कधीही दुःख होऊ नये.
आपणाकडून कोणीही तिरस्कारिला जाऊ नये म्हणून मी फार जपतो.मानवी मनुष्यांच्या हातून होणारी नानाविध कर्मे समजून घेण्याचा प्रयत्न मी काळजीपूर्वक केला आहे.' तो गुन्हेगाराला शासन करील;पण सूडबुद्धीने मात्र नव्हे,तर त्याच्यापासून समाजाचे रक्षण व्हावे म्हणून.थंडगार वाऱ्यामुळे पडसे आले म्हणून काय आपण वाऱ्यावर रागावतो ? त्या वाऱ्याविषयी आपली जी उदासीन, अनासक्त भावना असते.तीच स्पायनोझा आपल्या निंदकांविषयी व अपायकर्त्यांविषयी ठेवी.त्याची एक प्रकारची शास्त्रीय अनासक्ती असे.कार्यकारणभावाच्या अनंत साखळीतील प्रत्येक वस्तू अपरिहार्य असा दुवा आहे,हे त्याने जाणले होते.तो प्रत्येक नैसर्गिक कर्म वा मानवी कर्म शाश्वततेच्या प्रकाशात पाहतो व अविचल राहतो.अशा प्रकारे शाश्वततेच्या आरशात पाहिल्यावर स्पायनोझा आपणास जसे पाहतो.त्याप्रमाणे आपण आपणास पाहण्याची खटपट करू या.प्रत्येक सजीव वस्तू ईश्वराचाच अंश आहे. काळाच्या पृष्ठावर साकार रूपाने,मूर्त रूपाने,प्रकट झालेला ईश्वराच्या अमर महाकाव्यातील विचार म्हणजे प्रत्येक जीव.पृष्ठ नष्ट झाले की काव्याचे मूर्त स्वरूप नष्ट होते,अदृश्य होते. पण तो विचार अदृश्य झाला तरी मरत नाही.होमरची कविता असलेले पुस्तक फाटले,म्हणजे होमरची कविता नष्ट झाली असे होत नाही.त्या कवितेचे केवळ ते मुद्रण नष्ट होते.होमरचे विचार अनेक पृष्ठांवर छापलेले आहे. ती पृष्ठे नष्ट करता आली,तरी ते विचार नष्ट करता येणार नाहीत.शरीर मरते,
पण आत्मा राहतोच.रूपक बदलून असे म्हणता येईल की,प्रत्येक जीव म्हणजे जीवनाच्या कॅलिडोस्कोपमधील रंगीत काचेचा एक तुकडा आहे. पुन्हा रूपक बदलून असेही म्हणता येईल की,
ईश्वराचा आत्मा,तो परमात्मा किंवा ईश्वरी योजना म्हणजे एक सूर्य आहे व मानवी शरीर म्हणजे पंकिल पल्वल आहे. ते तळे आटले - म्हणजेच हे शरीर मेले की सूर्याचे प्रतिबिंब नाहीसे होते.पण सूर्य पहिल्याप्रमाणेच तेजाने तळपत असतो.दुसऱ्या शब्दांत बोलायचे तर असे म्हणता येईल की,प्रत्येक मानवी प्राणी म्हणजे दैवी ब्रह्माचा अंश आहे.व्यक्ती मरते म्हणजे बिंदू सिंधूत मिळून जावा त्याप्रमाणे आत्मा परमात्म्यात विलीन होतो.एखादी तान महासंगीतात विलीन व्हावी तसा आत्मा परमात्म्यात मिळून जातो.क्षणभर दिक्कालात आलेला स्थानबद्ध झालेला तो भव्यदिव्य विचार पुन्हा शाश्वततेच्या योजनेत जाऊन बसतो.
'शरीरनाशाबरोबर मानवी मनाचा संपूर्ण नाश होणे शक्य नाही.... सद्गुणी आत्मे ईश्वरी अंशाचे असल्यामुळे दैवी ज्ञानाचे अंशभाक असल्यामुळे चिरंजीवच आहेत.'
मानवी प्राणी म्हणजे इतस्ततःविखुरलेले पृथक् व अलग जीव नव्हेत.प्रत्येक केवळ स्वतःसाठी धडपडणारा व स्वतःपुरता जगणारा नाही.आपण सारे त्या दैवी ब्रह्माचे संबद्ध भाग आहोत.आपणास माहीत असो वा नसो, आपण सारे एकाच ध्येयासाठी धडपडत आहोत.आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहोत.एवढेच नव्हे,तर आपण एकाच विराट शरीराचे अणू आहोत.अगदी क्षुद्रतम माणसावर केलेला प्रहारही सान्या मानवजातीच्या शरीरावरील आघात होय. एखाद्या क्षुद्र व्यक्तीविरुद्ध केलेला अन्याय साऱ्या मानवजातीवरीलच अन्याय होय.जो आपल्या सर्व मानवबंधूंना सहानुभूती दाखवतो,जो सर्वांवर प्रेम करतो,तो जीवनाच्या स्वरूपाशी सुसंवादी आहे,असे म्हणावे.स्पायनोझाच्या मताचा
वॉल्ट व्हिटमन् लिहितो,'सहानुभूतिशून्य हृदयाने तुम्ही एक फर्लांग चाललात,तर आपले कफन पांघरून तुम्ही आपलीच प्रेतयात्रा काढली,असे म्हणण्यास हरकत नाही.'
दुसऱ्याचे सुख वाढवून त्यायोगे स्वतः सुख मिळवणे हे मानवी जीवनाचे साध्य आहे.'शहाणा माणूस जी गोष्ट दुसऱ्यासाठी इच्छित नाही ती तो स्वतःसाठीही इच्छित नाही.'अल्पसंतुष्ट असणे,द्वेषाची परतफेड प्रेमाने करणे, दैवाने जे जे भोगावे लागेल ते ते आनंदाने व धैर्याने हसत हसत सहन करणे म्हणजेच भले जीवन,अर्थात स्पायनोझाच्या मते प्रज्ञावंतांचा संपूर्ण मार्ग अगर श्रेष्ठांचा निर्दोष मार्ग होय.मुख्य गोष्ट ही की,सर्व जगाशी एकरूप होऊन राहण्यात आनंद मानावयास शिका. तुमचे तसेच तुमच्या शेजाऱ्याचे जीवन कितीही क्षुद्र असले तरी,या विश्वाच्या विराट वस्त्रातील ते आवश्यक असे धागे आहेत, हे कधीही विसरू नका.आपल्या मनाचे सर्व निसर्गाशी ऐक्य आहे याची जाणीव वा याचे ज्ञान असणे ही परम मंगल व कल्याणप्रद गोष्ट. होय.' हे जग तुमच्यासाठी केलेले नसले, तरी निदान तुम्ही तरी या जगासाठी केले गेले आहात. तुम्ही या जीवनाच्या ग्रंथांतील एक महत्त्वाचे पृष्ठ आहात. तुम्ही नसाल तर तो अपूर्ण व अपुरा राहील हे विसरू नका.
स्पायनोझाचे जीवन अतिसुंदर व रमणीय,पण फारच अल्प होते.एका जागेहून दुसऱ्या जागी असा तो सारखा फिरत होता.शेवटी हेग येथे एका मित्राच्या घरी तो राहिला.त्याच्या हयातीतच हे घर यात्रेचे ठिकाण झाले. स्पायनोझाच्या दर्शनाला त्याच्या काळातील सारे महाबुद्धिमान,प्रज्ञावंत व प्रतिभाशाली लोक येत.तो आपल्या काळातील महर्षी होता.बुद्धिमंतांचा राणा होता.या घरातच तो बसे.आजूबाजूला शारीरिक व्यवसायाची हत्यारे पडलेली असत.त्याच्या अंगावर साथे कपडे असत.
कपड्यांबाबत तो एकदा म्हणाला, 'शरीर ही काय फार मोलाची वस्तु आहे? ही साधी वस्तू फार मौल्यवान कपड्यात कशाला गुंडाळायची?' येथे बसून तो मित्रांचे स्वागत करी,येथेच बसल्याबसल्या त्याने ते अमर नीतिशास्त्र लिहिले,हा ग्रंथ त्याचे हस्तलिखित त्याच्या मित्रांनी वाचले होते व समक्ष तोंडी, तशीच पत्रांनी त्यांनी त्यावर चर्चा केली होती.हा ग्रंथ त्याच्या मरणोत्तर छापला गेला.फ्रान्स व हॉलंड यांचे युद्ध या वेळी चालले होते.
राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा व सेनापतींच्या हालचाली व हुलकावण्या यांकडे त्याचे लक्ष नसे.त्याला त्यांची गोडी नव्हती.त्याला शत्रूविषयी देशबांधवांइतकाच आदर वाटे.त्याचा आनंद एकच होता,तो म्हणजे तत्त्वज्ञानविषयक.
एकदा तर एखाद्या निष्पाप मुलाप्रमाणे,एखाधा विश्वप्रेमी संताप्रमाणे तो शत्रुसैन्याच्या सेनापतीने बोलावल्यावरून शत्रूच्या गोटात गेला.सेनापती प्रिन्स कोडे याला स्पायनोझाशी थोडी तात्त्विक चर्चा करायची होती,थोड्या तात्त्विक गप्पा मारायच्या होत्या.त्या वेळी तो चुकून शत्रूचा हेर म्हणून फाशीच दिला जाणार होता.आपण देशद्रोही नाही,अशी आपल्या देशबांधवांची खात्री पटविण्याच्या कामी सुदैवाने त्याला यश आले म्हणून बरे.आपण निरुपद्रवी ज्ञानोपासक आहोत हे त्याने पटवून दिले म्हणूनच त्याचे प्राण वाचले.पण त्याचे प्राण फार दिवस वाचायचे नव्हते.त्याची प्रकृती झपाट्याने खालावत होती.१६७७ सालच्या हिवाळ्यात त्याची खालावलेली प्रकृती अधिकच खंगली व फेब्रुवारीच्या बाविसाव्या तारखेस तो मरण पावला. त्याच्या घराचा मालक व त्याच्या घराची मालकीण चर्चमध्ये गेली होती.त्याचा वैद्य तेवढा त्याच्याजवळ होता.त्याने टेबलावर असलेले सर्व पैसे लांबवले. चांदीच्या मुठीचा एक चाकूही गिळंकृत केलाआणि मृतदेह तसाच टाकून तो निघून गेला.स्पायनोझा हे पाहायला असता तर पोट धरून हसला असता.मरणसमयी त्याचे वय फक्त चव्वेचाळीस वर्षांचे होते. त्याच्या मनोबुद्धीचा पूर्ण विकास होण्याची वेळ येत होती.तो परिणतप्रज्ञ होत होता.अशा वेळी घाला आला आणि तो गेला.पण रेननच्या शब्दात म्हणू या की, 'ईश्वराची अत्यंत सत्यमय दृष्टी आजपर्यंत जर कोणी दिली असेल,तर ती स्पायनोझाने.ती दृष्टी देऊन तो गेला.'शोरमॅचर लिहितो,'विचाराच्या क्षेत्रात स्पायनोझा अद्वितीय आहे.त्याच्याजवळ कोणीही जाऊ शकत नाही.तो आपल्या कलेचा स्वामी आहे.या क्षुद्र जगाच्या फार वर तो आहे.या क्षुद्र जगात त्याला अनुयायी नाहीत व कोठेही नागरिकत्व नाही.तो जणू या जगाचा नाहीच.'
असे म्हणतात की,इतिहासात खरे निर्दोष ख्रिश्चन दोनच होऊन गेले.येशू व स्पायनोझा आणि दोघेही ज्यूच होते.