स्वतःविषयी युरोपीय पंडितांनी चांगले लिहावे-बोलावे यासाठी चौदावा लुई लाचलुचपती देत होता.पण स्पायनोझाला तो पेन्शन द्यावयास तयार होता.अट एकच होती.या ज्यू तत्त्वज्ञान्याने आपले पुढचे पुस्तक लुईला अर्पण केले पाहिजे.पण ज्याच्याविषयी स्पायनोझाला आदर वाटत नसे त्याची खुशामत करण्याइतका क्षुद्रमती तो नव्हता.तो प्रामाणिक होता. त्याला आत्मवंचना करावयाची नसल्यामुळे त्याने लुईचे म्हणणे नम्रपणे;पण निश्चितपणे नाकबूल केले.
(अॅमस्टरडॅम येथील शांतमना स्पायनोझा,मानवजातीची कथा हेन्री थॉमस,अनुवाद-साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)
याच सुमारास जर्मनीतील एक राजा कार्ल लुडविग याने स्पायनोझाला हीडलबर्ग येथील विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाची जागा देऊ केली,पण एका अटीवर.'स्टेटच्या प्रस्थापित धर्मावर त्याने कधी टीका करता कामा नये.
स्पायनोझाने ती जागा साभार नाकारली.उपाशी राहावे लागले तरी हरकत नाही.पण सत्यच बोलायचे असे त्याने ठरवले.त्याच्यासमोर असल्या सुवर्णसंधी नाचत असता त्याला खरोखरच अर्धपोटी राहावे लागत होते.पैसे समोर खुळखुळत होते तरी त्याने ते नाकारले.कधीकधी तो गव्हाच्या अगर दुसऱ्या कसल्या पिठाची नुसती कांजी पिऊनच दिवस काढी.चव यावी म्हणून तो तीत थोडे बेदाणे व थोड्या मनुका टाकी.अजिबात उपाशी राहण्याचा प्रसंग येऊ नये यासाठी त्याला पै न् पै जपून खर्चावी लागे.चांगले व पोटभर अन्न तर मिळत नव्हतेच; पण बौद्धिक श्रम मात्र भरपूर होत असल्यामुळे त्याला क्षय होणार असे दिसू लागले.पण ईश्वरप्रेमाने मस्त असणारा हा निग्रही तत्त्वज्ञानी राजांचे साह्य नाकारीत होता.तशीच निकटवर्ती मित्रांचीही मदत स्वीकारीत नव्हता.दुसऱ्यांची श्रद्धा व दुसऱ्याचे पैसे घेणे म्हणजे जणू अधर्म असे त्याला वाटे.पोटासाठी तो चश्म्याच्या काचा घासून देई व मिळणाऱ्या फुरसतीच्या वेळात आपले विचार अधिक स्वच्छ व सतेज करी.कसे जगावे हे दुसऱ्यांना शिकविण्यासाठी तो आपले विचार घाशी व स्वतःला जगता येण्यासाठी चश्म्यांच्या काचा घाशी.
अशा अभंग व अविचल चारित्र्याचे लोक इतिहासात फार विरळा ! त्याचा आत्मा अत्यंत बलवान होता.तो अगदी एकाकी असा राहत होता.त्याच्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी त्याच्या धर्मबांधवांनी त्याला बहिष्कृत केले होते.त्याने कोणताही पंथ (वा चर्च) न पत्करता स्वतःचा सर्व चर्चेस् व सायनागॉग ज्याच्या पोटात येऊ शकतील असा स्वतंत्र विश्वव्यापक धर्म निर्माण केला. त्याला सर्व विश्वात विश्वंभर भासत होता.तो बंडखोर होता.पण त्याचे बंड विशिष्ट प्रकारचे होते.त्याच्या बहिणीने त्याचा वारसा लुबाडला होता.त्याने तिला कोर्टात खेचले व खटला जिंकला.पण पुन्हा सारी इस्टेट त्याने तिलाच परत दिली.
कन्फ्यूशियसप्रमाणे त्यालाही अपकारांवर वा अपायांवर रागावण्यास मुळीच वेळ नव्हता.अपकार वा अपाय करणाऱ्यांवर रागावण्याइतका क्षुद्र तो नव्हता.तो स्वतःचा इतका अधःपात होऊ देत नसे.दुसऱ्यांवर रागावण्याइतका खाली तो कधीही येत नसे.अॅमस्टरडॅम येथील ज्यू धर्मोपदेशकांनी त्याच्यावर बहिष्कार घातला व 'याच्याशी संबंध ठेवू नका.याला एखाद्या कुत्र्याप्रमाणे वागवा.'असे त्यांनी सर्व ज्यूंना आज्ञापिले,तरी त्यांच्यावर न रागावता स्पायनोझा त्यांना सोडून व आपली जात सोडून निघून गेला.'ज्यू राबींना जे मोलवान वाटत आहे. त्याचे ते रक्षण करीत आहेत.मला ते बहिष्कृत न करतील तर स्वतःच्या धर्माशी प्रतारणा केल्याचे पाप त्यांना लागेल.पण ज्यू धर्मोपदेशकांचे वर्तन त्यांच्या धर्मकल्पनेनुसार योग्य असले,तरी माझे वर्तनही माझ्या विचारसरणीनुसार योग्यच आहे व मी वागलो तसा न वागतो तर माझ्या हातून माझ्या आत्म्याची फसवणूक झाली असती.'अशी त्याची विचारसरणी असल्यामुळे ज्यूंनी त्याची ताबडतोब केलेली हकालपट्टी त्याच्या मते तर्कदृष्ट्या योग्यच होती.तो आता एकटाच राहिला. धर्महीन लोकांत फेकला गेला.त्याचा ज्यूंच्या धर्मावरचा विश्वास साफ उडाला होता.
ज्यूंनी बहिष्कृत केल्यावर त्याने आपले मूळचे 'वरुच' नाव बदलून 'बेनेडिक्ट' केले.स्पायनोझाचे तत्त्वज्ञान कब्बालाच्या गूढवादावर उभारलेले आहे व त्याचे नीतिशास्त्र जगातील प्रॉफेट्सच्या लिखाणांपासून मिळालेल्या स्फूर्तीतून जन्माला आले आहे.
धर्माभ्यासात तो ग्रॅज्युएट झाला.पण पास होताना जास्तीतजास्त अपमान त्याच्या वाट्यास आला. धर्माभ्यासानंतर त्याने लॅटिनच्या व इतर धर्मोपदेशकांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आरंभिला.व्हॅन डेन नामक डच पंडित त्याला लॅटिन शिकवीत असे. एन्डे भाषाकोविद व व्युत्पत्ति
शास्त्रज्ञ होता.धर्माच्या बाबतीत तो नास्तिक होता.पुढे काही वर्षांनी चौदाव्या लुईची त्याच्यावर अवकृपा झाली व त्याला सार्वजनिकरीत्या फाशी जाण्याचा मान लाभला.
व्हॅन डेन एन्डेची मुलगी स्पायनोझाला शिकण्यात मदत करीत असे.स्पायनोझा तिच्या मार्गदर्शनाचे लॅटिनच नव्हे तर प्रेमही शिकला.आपण ज्यू आहोत हे विसरून त्याने तिला लग्न करण्याची विनंती केली.तेव्हा तिने त्याचे ज्यूपण त्याच्या ध्यानी आणून दिले व स्वतःच्या कर्करिंग नामक दुसऱ्या एका विद्यार्थ्याशी लग्न केले.तो तिच्याच धर्माचा असून हँबूर्ग येथे त्याचा फायदेशीर धंदा होता.
प्रेमाचा हा असा अनुभव आला.त्यामुळे तो शहाणा झाला व आपल्या विफल प्रेमापासून अमूर्तच्या प्रेमाकडे वळला.त्याने प्लेटो,स्टोइक व एपिक्युरियन पंथांचे तत्त्वज्ञानी,त्याचप्रमाणे त्याच्या वेळेपर्यंत झालेले सर्व तत्त्वज्ञानी वाचून काढले.
गिऑर्डानो ब्रूनो हा विश्वी विश्वंभर मानणारा होता.त्याच्या तत्त्वज्ञानाचा स्पायनोझावर बराच परिणाम झाला.ब्रूनोला नवीन विचार करणारा म्हणून जाळण्यात आले.तसेच डेकार्टासच्या गणितातील अमूर्त तत्त्वांनीही तो आकृष्ट केला गेला.सनातनी विचार प्रकट करण्याबद्दल डेकार्टसला राजा महाराजांकडून मानसन्मान मिळाले होते.स्पायनोझाचे
मन अतिशय विशाल होते.तो जे जे वाची ते सर्व स्वतः पचवून टाकी.शेवटी,त्याचे तत्त्वज्ञान एक प्रकारचा ज्यू गूढवादच झाले.त्याला प्लेटोच्या विचारांचाही रंग होता.एपिक्युरसच्या संशयवादाचीही थोडीशी छटा होती.व इटालियन हुतात्मा ब्रूनो यांच्या अद्वैत तत्त्वज्ञानानेही त्याला थोडा आकार दिला होता. फ्रेंच तत्त्वज्ञानी डेकार्टस याच्या गणिती परिभाषेतून स्पायनोझाचे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले गेले. स्पायनोझाने आपली सारी पुस्तके सिसरोनियन लॅटिनमध्ये लिहिली.
त्याच्या बुद्धीइतकी विशाल व व्यापक बुद्धी इतिहासात फारच कचित दिसते.पण स्पायनोझाचे नीतिशास्त्र वर लिहिण्याप्रमाणे इसापचे नीतिशास्त्र होते.
वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आपले जन्मगाव अॅमस्टरडॅम सोडून तो लंडन शहराजवळच्या हिन्स्बर्ग उपनगरात येऊन राहिला.येथे प्राचीन इझायल ऋषीप्रमाणे तो शरीरश्रमाने पोटाला मिळवी व उरलेला वेळ जीवनाचे,तसेच ईश्वराचे कोडे उलगडण्यात घालवी जीवनाचा अर्थ काय,याचा विचार करीत तो बसे. आपसात लढणाऱ्या कोळ्यांची भांडणे पाहून त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागत,गाल ओले होते.होता होईतो तो कधी प्रक्षुब्ध होत नसे. ₹पण मालकिणीने त्याच्या खोलीतील कोळिष्टके झाडून टाकली,तर मात्र त्याला जरासा राग येई.कोळ्यांच्या जाळ्यांकडे पाहत असता तो मनात आपल्या तत्त्वज्ञानाचे चिंतन करीत बसे.त्याचे पहिले पुस्तक धर्मावर होते.त्याचे नाव (A Treatise on Religion and Politics.) त्यात त्याने बायबलवर टीका केली होती.जुन्या करारातील ईश्वराला रजा देऊन त्याने स्वतःच्या नव्या करारात अधिक दयाळू प्रभू निर्माण केला.स्पायनोझाचे हे नवे पुस्तक,हा त्याचा नवा करार म्हणजेच त्याचे सुप्रसिद्ध नीतिशास्त्र होय. भूमितीच्या पद्धतीने स्पायनोझाने लिहिलेले हे बायबल आहे.अध्यात्म गणितात बसविण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे.हा अदृश्य जगाचा फोटो आहे.हे शाश्वततेच्या सांगाड्यात बसवलेले जीवनाचे चित्र आहे.
कोणीतरी म्हटले आहे की,अध्यात्मशास्त्राचा अभ्यास म्हणजे अंधाऱ्या खोलीत तिथे नसलेले मांजर शोधीत बसण्यासारखे आहे.पण दुसरे काही म्हणतात की,ज्ञात जगाच्या अभ्यासाइतकाच अज्ञात जगाचा अभ्यासही महत्त्वाचा आहे आणि आजचे अध्यात्मच उद्याचे सृष्टिशास्त्र होईल.
शास्त्रज्ञ पाऊल टाकण्यास भितात,तिथे आपण वारंवार घुसू पाहत असतो हे तत्त्वज्ञानी कबूल करतात.पण त्यांचे म्हणणे असे असते की, तत्त्वज्ञान्यांनी ज्या अंधारात उड्या मारल्या.त्याचेच फळ म्हणजे विज्ञानातील मोठमोठे शोध.अंधारातील त्या उड्यांतूनच विज्ञान जन्मले आहे.
तत्त्वज्ञानाची प्रत्यक्ष उपयुक्तता किती आहे या वादात न शिरता स्पायनोझाच्या अध्यात्मसिंधूत आपण बुडी घेऊ या.पण आपण फार पुढे मात्र जावयाचे नाही.बुडणार नाही इतपतच खोल पाण्यात आपण जायचे.प्रत्यक्ष सृषष्टीच्या किनाऱ्यापासून फार दूर जायचे नाही. किनारा डोळ्यांसमोर ठेवायचा असे ठरवून या समुद्रात शिरू या.बुडी घेऊ या.आपणा सर्वांना नेहमी सोडवावेसे वाटणारे दोन प्रश्न स्पायनोझासमोरही होते.कोणते बरे प्रश्न ?
१. या जगात आपणास कोणी जन्माला घातले ?
२. येथे आपण काय करायचे?
या प्रश्नांची उत्तरे मिळावी म्हणून तो ईश्वराचे स्वरूप तपासू लागला.ईश्वराचे स्वरूप,विश्वाची रचना,मानवाचे मन या तिहींचे पर्यालोचन त्याने सुरु केले.तो अशा निर्णयाला आला की,ईश्वरात सारे आहे व ईश्वर सारे व्यापून आहे.ईश्वर म्हणजे सृष्टी निर्माण करणारे परम ज्ञान,त्या ज्ञानाने उत्पन्न होणारे हे जगही तोच आहे. परमेश्वर म्हणजे सनातन स्त्रष्टा,चिरंजीव व अमर कलावान.
काळाच्या खटक खटक करणाऱ्या भव्य मागावर सृष्टी,चंद्र,सूर्य ताऱ्यांचे व नाना ज्योतिर्गोलांचे तेजस्वी वस्त्र तो विणीत असतो व स्वतःच ते पांघरतो.हे दृश्य विश्व म्हणजे प्रभूचे शरीर आहे आणि विश्वाला चालना देणारी प्रेरणा,अंतःशक्ती व अंतःस्फूर्ती म्हणजे त्या प्रभूचे मन.पण शास्त्रज्ञ 'वस्तू व वस्तूंतील शक्ती एकरूप आहेत.' असे म्हणतो.त्याप्रमाणेच प्रभूचे हे शरीर व त्याचे मन एकरूप आहेत.दुसऱ्या शब्दांत हेच सांगावयाचे झाले,तर ईश्वर म्हणजेच हे अनंत विश्व व अनंत ज्ञान.ईश्वर म्हणजेच विश्व प्रत्येक पर्णात,मातीच्या प्रत्येक कणात, प्रत्येक प्राणिमात्रात मग तो कितीही क्षुद्र असो व सर्व चराचरात परमात्मतत्त्व आहे.
ईश्वराची दिव्यता चराचरातील अणुरेणूत आहे.आकाशातील अत्यंत तेजोमय गोल व पृथ्वीवरील एखादा भिकारी दोघांचीही या सृष्टीच्या महाकाव्यांत सारखीच जरुरी आहे.सृष्टीच्या महाकाव्यात ही दोन्ही अक्षरे सारखीच महत्त्वाची आहेत.
हे विश्वाचे महाकाव्य त्या अनंत ज्ञानाचे फळ आहे. मानवाच्या क्षुद्र इच्छा व त्याचे क्षुद्र कायदे यांना अनुसरून हे विश्वकाव्य रचण्यात येत नसते.ईश्वरी मनोबुद्धी व मानवी मनोबुद्धी यात बिलकुल साम्य नाही. जीवनाच्या नाटकात प्रभूने जे संविधानक योजलेले असेल ते आपल्या बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडचे आहे.ते केवळ मानवाची दृष्टी ठेवून निर्मिलेले नाही.मानवाने त्यावर बरे की वाईट हा निर्णय देत बसू नये.नाक चष्मा ठेवण्यासाठी आहे असे म्हणणे अगर डासांनी चावावे म्हणून हातपाय आहेत असे म्हणणे जितके वेडेपणाचे, तितकेच हे विश्व आमच्यासाठी निर्मिलेले आहे असे म्हणणे हेही वेडेपणाचे आहे. मानवांनी आपल्या मर्यादित ज्ञानाने ईश्वराच्या अनंत ज्ञानावर आक्षेप घेऊ नये.
स्पायनोझाच्या मते ईश्वर हा एखादा लहरीनुसार वागणारा सृष्टीचा हुकूमशहा नसून तो जणू दैवी चित्कळा आहे.
स्पायनोझाचा ईश्वर कोठे स्वर्गात बसलेला नाही… राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…