* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२७/१/२६

अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes



अँडीजवरच्या यशकथेवर पीअर्स पॉल रीड या लेखकाने लिहिलेलं 'अलाइव्ह' हे पुस्तक जगभर प्रचंड गाजलं. या अपघातातून वाचलेल्या सोळाजणांशी, त्यांच्या नातेवाइकांशी, तसंच मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाइकांशी बोलून रीड यांनी ही कहाणी जिवंत केली. त्या वेळी ते स्वतः या मुलांच्या कहाणीत ते इतके गुंतून गेले होते की मुलं त्यांना सतरावा सर्व्हयव्हर म्हणत! याखेरीज नँडो पॅरेडो आणि रॉबर्ट कनेसा यांनीही स्वतःच्या कहाणीवर अनुक्रमे 'मिरॅकल ऑन अँडीज' आणि 'आय हॅड टु सर्काइव्ह' ही पुस्तकं लिहिली. या लेखासाठी मुख्यतः 'अलाइव्ह' या पुस्तकाचा आधार घेतला आहे.


त्यानुसार १५ नोव्हेंबरला अपघात होऊन ३३ दिवस होऊन गेल्यानंतर नँडो कनेसा आणि विंझटिन मोहिमेवर निघतात; पण नेमकी त्या दिवशी एवढी हिमवृष्टी होते की त्यांना लगेचच पुन्हा विमानाकडे परतावं लागतं. दोन दिवसांनंतर ते पुन्हा बाहेर पडतात. या वेळी विमानाच्या ठिकाणापासून खाली उतरून थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना विमानाचं शेपूट सापडतं. त्यांच्यासाठी तो जणू खजिनाच असतो. त्यात अनेक बॅगा असतात. त्यात या तिघांना बरेच नवे कपडे मिळतात. प्रत्येकजण अंगावरचे घाणेरडे कपड़े काढून कपड्यांचे नवे थर घालतो. त्याशिवाय वाचायला कॉमिक्स आणि  कॅमेरा अशी कमाईही होते. कॅमेरा अजूनही चालू स्थितीत असतो. (त्यामुळेच अँडीजवर अडकलेल्या या मुलांच्या वास्तव्याचे फोटो आज आपल्याला बघायला मिळतात.) पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना विमानाच्या रेडिओची बॅटरी सापडते. ही बॅटरी काढून रेडिओला लावली तर बाहेरच्या जगाशी संपर्क करता येईल असं त्यांना वाटत असतं; पण बॅटरी इतकी जड असते की तिथून ती इंचभरही हलत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विमानाकडे परतून रेडिओ आणि त्यातल्या त्यात रेडिओची माहिती असणारा रॉय हार्ले यांना घेऊन पुन्हा इथे यायचं असं ते ठरवतात. त्या रात्री विमानाच्या त्या शेपटात त्यांना खूप काळात न मिळालेला आराम अनुभवता येतो. तिघं परततात. दुसऱ्याच दिवशी रेडिओ आणि रॉयसह ही पलटण पुन्हा तोच रस्ता चालू लागते. रॉय खूप खटपटी करतो, पण रेडिओ सुरू होत नाही. बाहेरच्या जगाशी संपर्क करण्याचा त्यांचा शेवटचा प्रयत्नही फोल ठरलेला असतो. परतीचा प्रवास रॉयसाठी विशेष अवघड ठरतो. शेवटच्या चढणीपाशी त्याच्यातले त्रास संपतात. मला इथेच सोडा, अशी विनवणी करत तो बर्फात पडून राहतो. त्याची वाट पाहत एका जागी थांबलो तर आपणही संपून जाऊ हे माहिती असूनही नँडो थांबून राहतो, त्याला ऐकवणार नाहीत अशा शिव्या घालत त्याच्यातली धुगधुगी पुन्हा जागी करतो. अगदी शेवटच्या टप्प्यावर तर तो कुठून शक्ती आणतो माहिती नाही, पण रॉयला अक्षरशः उचलून तो विमानापर्यंत घेऊन येतो.


या मोहिमेने झालेली शरीराची झीज भरून काढायला काही दिवस जातात. त्यानंतर तिघं पुन्हा एकदा बाहेर पडतात. या वेळी त्यांनी बऱ्यापैकी तयारी केलेली असते. प्रत्येकाने अंगावर पँट आणि शर्ट्सचे अनेक थर चढवलेले असतात. त्यावर तीन-तीन स्वेटर्स, मेलेल्या माणसांच्या कातडीपासून तयार केलेले सॉक्स,मांसाने भरलेली सॉक्सची पिशवी, पाण्याची बाटली, विमानातल्या सामानापासून तयार केलेले गॉगल्स, असा सगळा जामानिमा असतो. शिवाय या वेळी त्यांच्याकडे तिघंही मावतील अशी स्लीपिंग बॅगही असते. जाता जाता.


नँडो मागे वळतो आणि 'अन्नसाठ्या'ची जबाबदारी बघणाऱ्या मित्राला सांगतो, "समजा तशीच वेळ आली, तर माझ्या आई आणि बहिणीचं शरीर वापरायलाही मागेपुढे बघू नका." ." त्याच्या या वक्तव्याने तो मित्रच नव्हे तर आपणही गारद होऊन जातो. हे सांगण्याची ताकद नॅडोकडे कुठून येते ?


(तिघंही पश्चिमेकडे चालू लागतात.मरण्याआधी पायलट जे बोललेला असतो त्यावरून मुलांच्या लक्षात आलेलं असतं, की पश्चिमेकडे काही अंतरावर चिली देशाची हद्द सुरू होत असणार. त्यानुसार शेवटची मोहीम त्या दिशेने निघते. दिवसभर न थांबता चालत राहिलं तर रात्रीपर्यंत आपण किमान शिखराच्या जवळपास तरी पोहोचू, असा त्यांचा अंदाज असतो; पण प्रत्यक्षात बर्फामध्ये सगळीच अंतरं फसवी असतात. आत्ता दिसतंय ते टोक म्हणजे शिखर, असं वाटत असताना तिथे पोहोचल्यावर शिखर अजून बरंच वर असल्याचं त्यांच्या लक्षात येतं आणि नाइलाजाने ते तिघं पुन्हा शक्ती गोळा करून त्या दिशेने चालू लागत लागतात. 


जिथे अँडीजमधली हिमशिखरं सर करणं कसलेल्या गिर्यारोहकांसाठीही जवळपास अशक्य असतं, तिथे गिर्यारोहणातला 'ग' देखील माहिती नसलेली, महिनाभर उपाशी असलेली आणि गिर्यारोहणाची कोणतीही साधनं सोबत नसलेली तरुण पोरं केवळ इच्छाशक्तीच्या बळावर ती शिखरं चढत असतात.त्यातही सर्वांत पुढे असतो तो नँडो. लवकरात लवकर सुटका करून घेण्याच्या आणि पल्याड काय आहे हे पाहण्याच्या इच्छाशक्तीने त्याचा असा काही ताबा घेतलेला असतो की थकलेलं शरीर अस्तित्वातच नसल्यासारखा तो चालत असतो. त्याच्या झपाट्याला कनेसा आणि विंझटिन दोघंही पूरे पडत नसतात.


संध्याकाळ होते.अजून शिखर दृष्टिक्षेपातही नसतं. त्यामुळे अखेर त्यातल्या त्यात बरी जागा बघून रात्र काढायचा निर्णय होतो. ही जागा सपाटही नसते. फक्त समोर खडक असल्याने आपण खाली कोसळणार नाही, एवढाच काय तो दिलासा असतो. जवळपास उभ्यानेच झोपून हे तिघं रात्र घालवतात. उठतात ते पूर्ण गोठलेल्या अवस्थेत. अशी आणखी एक रात्र काढायला लागली तर आपण जिवंत असू का, हा विचार तिघांच्याही मनात येतो; पण नँडो थांबायला किंवा परतायला तयार नसतो. दुसऱ्या दिवशी दुपारी दोघा सोबत्यांना मागे टाकून तो अखेर शिखरावर पोहोचतो; पण ज्या आशेने तो हे शिखर चढून आलेला असतो.त्यावर पाणी फिरतं.शिखरावरून चहुबाजूंनी दिसत असतात त्या केवळ हिमाच्छादित पर्वतरांगा. कुठेही पर्वतरांगा संपून जीवन सुरू होत असल्याचं चिन्ह नसतं. त्यांच्या धडपडीची अखेर झालेली असते.


नॅडोच्या जागी कुणीही असतं तरी त्या शिखरावर शरीर टाकून तिथेच मृत्यूची वाट बघणं त्याने पत्करलं असतं किंवा पुन्हा विमानात जाऊन आपल्या सोबत्यांसोबत मृत्यूची वाट बघण्याचा मार्ग स्वीकारला असता. पण नँडो हार मानायला तयार नसतो. शरीरात त्राण नसताना आणि पुढे काय आहे याची पुसटही कल्पना नसताना तो पुढे चालत राहण्याचं ठरवतो. त्या परिस्थितीतही नँडोला आपण हे शिखर चढणं किती मोलाचं आहे याची जाणीव असते. या शिखरावर पोहोचलेला आपण पहिलाच माणूस असू, या विचाराने त्याचं मन भरून येतं. फाटलेल्या ओठांसाठी औषध म्हणून सोबत आणलेली लिपस्टिक घेऊन तो एका प्लास्टिक पिशवीवर 'माऊंट सेलर' असं लिहितो आणि एका दगडाखाली ठेवून देतो. त्या शिखराला त्याने स्वतःच्या वडिलांचं नाव दिलेलं असतं !


नामकरणाचं काम आटोपल्यावर तो परत एकदा परिस्थितीचं अवलोकन करू लागतो. त्याच्या लक्षात येतं, की हे शिखर उतरून पल्याड गेलं की काही किलोमीटरनंतर एक दरी आहे, जिथे बर्फाचं प्रमाण बरंच कमी झालेलं दिसतं आहे. पण तिथपर्यंत चालत जाणं शक्य आहे का? त्याच्या मनात त्याबद्दल शंकाही येत नाही. तो शिखर उतरून कनेसा आणि विंझटिन थांबलेले असतात तिथे येतो आणि कनेसाला सांगतो, "आपण विंझटिनला परत विमानाकडे पाठवू आणि त्याचा अन्नसाठा आपल्याकडे ठेवून घेऊ. म्हणजे आणखी काही दिवस आपल्याला तग धरून राहता येईल." नॅडोच्या वेड्या आशेवर विश्वास ठेवून त्याच्यासोबत जावं की सध्या सुरक्षित वाटणाऱ्या दुसऱ्या पर्यायाकडे, विमानाकडे परतावं हे कनेसाला कळत नाही. त्याचं शरीर त्याला सांगत असतं, की आता पुढे चालत राहणं तुझ्या क्षमतेपलीकडचं आहे; पण तरीही का कुणास ठाऊक, अखेर तो नँडोसोबत जाण्याचा निर्णय घेतो. विंझटिन त्या दोघांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडे सोपवून मागे फिरतो आणि सुरू होतो या दोघांचा अखेरचा प्रवास.


दोघं पुन्हा एकदा माऊंट सेलर चढू लागतात. दोघंही इतके थकलेले असतात की दर चार पावलांनी त्यांना थांबावं लागत असतं. अखेर शिखर येतं आणि उतार सुरू होतो. उतरण्यासाठी शक्ती कमी लागत असते; पण चुकून एक पाऊल चुकीचं पडलं तरी मृत्यू ठरलेला. एखादं हाड मोडलं तरी अशा ठिकाणी परिणाम

तोच मृत्यू. त्यातून कनेसाची शक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही संपत आलेली असते. तो सतत नॅडोच्या मागे पडत असतो आणि त्याला हाका मारून आपण मागे असल्याची आठवण करून देत असतो. 


दुपार होते तेव्हा ते एका सपाटीवर पोहोचतात.अजून अंधारू लागलं नसलं तरी ती जागा मुक्कामासाठी चांगली वाटल्याने दोघंही तिथे थांबायचं ठरवतात. सूर्य अजूनही तळपत असल्यामुळे बर्फाने ओले झालेले कपडे काढून ते सुकवत ठेवतात. मांसाचे थोडे तुकडे आणि ब्रँडी असं जेवण करून स्लीपिंग बॅगमध्ये शिरतात. थंडी थोडी कमी झालीय याचा अर्थ आपण आता अँडीजच्या शेवटाला आलो असणार, अशी स्वतःची समजूत घालत ते झोपी जातात.


दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य वर आल्यावर न्याहारी करून ते पुन्हा चालू लागतात. रात्रीच्या विश्रांतीमुळे ते काही काळ झपाट्याने चालतात; पण लवकरच तो उत्साह संपतो आणि थकवा जाणवू लागतो. पूर्ण संपलेल्या शरीराकडे दुर्लक्ष करण्यासाठी कनेसा सतत देवाशी बोलत असतो. त्याचं देवाला मागणं असतं, 'हा प्रवास तुला जितका अवघड करायचाय तितका कर पण तो अशक्य होऊ देऊ नकोस.' नॅडोचे विचार आकाशातल्या बापापेक्षा पृथ्वीवरच्या त्याच्या सख्ख्या बापावर केंद्रित झालेले असतात.


दुपार उलटून गेल्यानंतर ते पुन्हा मुक्कामाची तयारी करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की शिखरावरून पाहिलेली दरी आता बरीच जवळ दिसू लागलेली आहे. संध्याकाळ व्हायला आली असली तरीही अजून अंधाराची चिन्हं नाहीत. पर्वतरांगा संपत आल्याचंच हे चिन्ह असतं. सकाळी उठून पुन्हा चालणं सुरू होतं. आता कनेसाचा वेग आणखी मंदावतो. पावलं वाकडीतिकडी पडू लागलेली असतात. तो सतत नँडोला थांबण्यासाठी हाकारत असतो; पण शरीर तितकंच थकलेलं असलं तरी नॅडोचं मन त्याला पुढे पुढे खेचत असतं. अशाने अतिश्रमाने मरशील, हा कनेसाचा इशाराही तो कानाआड करतो. बर्फ कमी होऊ लागलेला असतो आणि आता पुढे काय दिसेल या ओढीने नँडो अक्षरशः पळत दरीच्या | शेवटाला येऊन पोहोचतो.


जे समोर दिसतं तो त्यांना स्वर्ग वाटतो! बर्फ संपून प्रचंड मोठे खडक उघडे पडलेले असतात आणि त्यामधून एक छोटा झरा वाहत असतो. झऱ्याच्या दोन्ही काठांवर गवत आणि दगडांवर शेवाळं उगवलेलं असतं. गवतात नाना प्रकारचे किडे बागडत असतात, पाली हिंडत असतात, पक्षी उडत असतात. हे दृश्य पाहून नँडो आणि कनेसा दोघंही आनंदाने वेडे होतात. गटागट झऱ्याचं पाणी पिऊन तेगवतात लोळण घेतात. कितीं तरी वेळ ते तिथेच पडून राहतात. अजून माणसांच्या वस्तीचा मागमूस लागला नसला तरी अँडीजच्या कराळ जबड्यातून त्यांची सुटका झालेली असते.


अर्थात प्रवास अजून संपलेला नसतो. आणि शेवटचा हा टप्पाच कनेसासाठी अतिशय कठीण ठरतो. त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागतो; पण त्याच्या पाठीवरची पिशवी स्वतःकडे घेऊन नँडो चालतच राहतो. थोड्याच वेळात ते दोघं एका नदीच्या काठी पोहोचतात. नदीकाठी हिरवळ असते, झाडं असतात. थोडं लक्ष देऊन पाहिल्यावर कनेसाला अनेक मानवी खाणाखुणाही दिसू लागतात. काही झाडं कापलेली असतात. वाळलेली का असेना पण जनावरांची विष्ठा असते. थोड्या वेळाने नदीच्या पल्याड गाई चरत असल्यासारखंही त्याला वाटतं. आता आपण सुटलो, या आनंदात शेकोटी पेटवून ते मांस भाजून खातात आणि झोपी जातात. सकाळी उठल्यावर दोघांच्याही मनात पहिला विचार येतो तो उरलेलं मानवी मांस पुरून टाकण्याचा. दुसरा माणूस भेटण्याआधी ते काम केलं पाहिजे, असं दोघांनाही वाटत असतं. दोघं पुन्हा चालू लागतात. अखेर थोड्या वेळाने कनेसाला पल्याडच्या बाजूला घोड्यावर बसून चाललेली दोन माणसं दिसतात.


नँडो जिवाच्या आकांताने ओरडत त्यांचं लक्ष वेधून घेतो; पण खळाळत वाहणाऱ्या नदीतून त्याचा क्षीण आवाज त्यांना ऐकू जाईल का ही शंकाच असते. पण आता दैव त्यांच्या साथीला असतं. त्या माणसांना हे दोघं दिसतात. अर्थात बोललेलं ऐकू जात नसल्यामुळे ती माणसं दगडाला कागद आणि पेन बांधून या काठावर फेकतात. नँडो त्यावर घाईघाईने खरडतो, 'आम्ही उरुग्वेच्या विमान अपघातातून बचावलेले प्रवासी आहोत. आमच्याकडे खायला काहीही नाही. आमचे १४ सहप्रवासी अजूनही अँडीजच्या पोटात जिवंत आहेत.' ते वाचून तिकडून उत्तर येतं- 'उद्या!' त्याचबरोबर आणखीही एक दगड नॅडोच्या पुढ्यात येऊन पडतो. त्या दगडाला एक ब्रेडचा तुकडा बांधलेला असतो. तो तुकडा वाटून खाताना नँडो आणि कनेसाला रडू फुटतं. 'आपण वाचलो', एवढंच म्हणत ते किती तरी काळ रडत राहतात. विमान कोसळल्यानंतर सत्तराव्या दिवशी आणि तब्बल दहा दिवस चालून ते पुन्हा बाहेरच्या जगात पोहोचलेले असतात.


दुसऱ्या दिवशी या दोघांना घेऊन जायला घोड्यांवरून माणसं येतात. उरुग्वे विमान अपघातातले प्रवासी सापडल्याची बातमी सगळीकडे पोहोचते. विमानात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी नँडोला घेऊन हेलिकॉप्टर्स अँडीजमध्ये रवाना होतात. नँडो आणि कनेसासह सर्व १६ प्रवाशांची सुखरूप सुटका होते.


या घटनेला आता ४५ वर्षं उलटून गेली आहेत, पण इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूला पुरून उरलेल्या तरुणांची ही गोष्ट आजही 'अँडीजवरचा चमत्कार' बनून जगाला आश्चर्यचकित करते आहे.


हा तीन भागातील लेख संपला…!!




२५/१/२६

अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes

आठव्या रात्री नैंडोची बहीण सुझाना मरते. त्यानंतर प्रत्येकालाच आपल्या मित्रांकडे बघून सर्वांची शक्ती झपाट्याने कमी होत चालल्याचं लक्षात येतं. चॉकलेटचा एक छोटा तुकडा, एक चमचा जॅम आणि बाटलीचं एक टोपण भरून वाइन, एवढाच त्यांचा दिवसभरातला आहार असतो. आता अन्न मिळालं नाही तर आपण हळूहळू मरत जाणार याची जाणीव प्रत्येकाला आतून होते. पण अन शोधणार कुठे ? बाहेर ना गवताचं पातं असतं, ना कुठले कीटक, ना एखादा पक्षी. 


काहीजण बाहेर बर्फात खोदून दगडावर शेवाळं मिळतं का ते बघण्याचा प्रयत्न करतात. तिथे काहीच न सापडल्यामुळे विमानातल्या कुशन्समधला फोम खाण्याचाही प्रयत्न होतो; पण त्याने पोट बिघडून भलतीच पंचाईत होईल हे लक्षात आल्याने तोही मार्ग बंद होतो.


त्यानंतर हळूहळू प्रत्येकाला नकळत ही जाणीव होऊ लागते, की जगायचं असेल तर मेलेल्या मित्रांच्या शरीरातलं मांस खाण्या

खेरीज दुसरा पर्याय नाही. बहुतेक सारी मुलं अतिशय धार्मिक असतात. हा विचार मनात येणंदेखील अनेकांना पाप वाटत असतं. आपण काय पाप केलं म्हणून मला देव शिक्षा देतोय, हा विचार त्यांना रात्रंदिवस छळत असतो; पण दुसरीकडे त्याखेरीज पर्याय नाही, हे वास्तव असतं. मुलं आपापल्या मित्रांशी त्याबद्दल खासगीत बोलत असतात, पण सर्वांसमोर हा विषय काढणं टाळत असतात. अखेर कनेसा या विषयाला तोंड फोडतो. "दहा दिवस होऊन गेलेले आहेत. अजूनही आपली सुटका झालेली नाही. आता आपल्यालाच सुटकेसाठी हालचाल करावी लागेल, आणि त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही. समोर आपल्या मित्रांच्या शरीरांच्या रूपात अन्न पडलेलं असताना ते नाकारून मृत्यूला सामोरं जाणं म्हणजे आत्महत्या ठरेल. आणि आत्महत्या करणं पाप आहे." कनेसा आपल्या मित्रांना समजावण्याचा प्रयत्न करतो. हे मांस खाणं नाइलाज नसून आपलं कर्तव्य आहे, असं त्याचं म्हणणं असतं. मेडिकलचा विद्यार्थी म्हणून त्याच्या मताला महत्त्व असतं; शिवाय तो अतिशय धार्मिक असल्यामुळेही मुलांना त्याचं हे म्हणणं भिडतं. जी मुलं हा विचार करायला कचरत असतात तीदेखील त्याच्या या आवाहनामुळे तयार होतात. किमान तात्त्विकदृष्ट्या तरी ते मान्य करतात.पण ते प्रत्यक्षात आणणं अवघड असतं.

पुन्हा एकदा कनेसाच पुढाकार घेतो. एक फुटकी काचेची बाटली घेऊन तो बाहेर ठेवलेल्या मृतदेहांकडे जातो. पालथ्या टाकलेल्या एका मृतदेहाच्या कुल्ल्याचा मोठा भाग तो कापून काढतो आणि विमानाच्या छतावर मऊ होण्यासाठी ठेवतो; पण तो प्रत्यक्ष खाण्याची वेळ येते तेव्हा त्याचेही हात-पाय गळतात, उलटीची भावना होऊ लागते. बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं. शेवटी मनावर दगड ठेवून तो एक तुकडा कसाबसा गिळतो. 


त्याच्या बुद्धीने त्याच्या मनावर विजय मिळवलेला असतो. त्याच्या जगण्याआड येणारा एक संस्कार त्याने झटकून दिलेला असतो. त्याच्या मनात येतं, आता मी जगेन ! नक्की जगेन ! आपल्याच मित्रांचं शरीर कापून खाण्यापेक्षा मेलेलं बरं, अशी भावना असतानाही ही मुलं त्या निर्णयापर्यंत कशी येतात? ही कहाणी वाचत असताना आपल्या लक्षात येतं, की त्यापेक्षा मेलेलं बरं, असं म्हटलं तरी प्रत्यक्षात आपलं शरीर त्या भावनेला साथ देतंच असं नाही. ते जगण्याची धडपड करत राहतं. त्या धडपडीमुळेच मृत्यू आसपास फिरत असला तरी तो सहजी जवळ येऊ शकत नाही. त्यामुळेच सर्व प्रवासी थोड्याफार दिवसांच्या फरकाने या नव्या अन्नाचा स्वीकार करतात. आता अन्नाचा साठा कमी नसतो. नॅडोची आई आणि बहीण या दोघींना सोडून इतरांची शरीरं त्यासाठी वापरायची असं ठरतं. या नव्या अन्नपुरवठ्यामुळे मुलांच्या शरीरातली ताकद सावकाश का होईना, वाढू लागते. त्यामुळे लवकरच वेगळ्या दिशेने आणखी एक मोहीम काढली जाते. या वेळी तिघं मोहीमवीर प्रचंड प्रयत्नांनी एका छोट्या शिखरावर चढतात; पण तिथून पाहतात तो नजर जाईल तिथपर्यंत अँडीजच्या रांगाच रांगा पसरलेल्या असतात. त्या शिखराहून प्रचंड उंच शिखरं पल्याड उभी असतात. या वेळी रात्री शिखराजवळ मुक्काम करून हे तिघं दुसऱ्या दिवशी परततात; पण रात्रीची थंडी आणि अतिश्रमाने त्यांचा जवळपास जीव घेतलेला असतो. रात्री विमानाबाहेर मुक्काम करणं किती जीवघेणं आहे हे त्यामुळे लक्षात येतं. पुढच्या मोहिमेसाठी आणखी बरीच तयारी करावी लागणार हेही स्पष्ट होतं.

पण पुढच्या मोहिमेचा विचार करण्याआधीच त्यांना आणखी एक आघाताशी सामना करावा लागतो. एके रात्री झोपेची आराधना करत असतानाच प्रचंड हिमवादळ होतं आणि विमानासह सारे प्रवासी आत गाडले जातात. त्या धक्क्याने सर्वांना जाग येते तेव्हा प्रत्येकजण बर्फाच्या लादीखाली चिमटलेला असतो.

त्यांच्यापैकी जे लवकर सुटका करून घेऊ शकतात ते जिवाच्या आकांताने इतरांना वाचवतात. अंगात शक्ती नसतानाही प्रत्येकजण त्या क्षणी दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यात जशी माणुसकी असते, तसं आपण एकटेच जिवंत राहिलो तर पुढे काय याची भीतीही असते. अखेर मदतकार्य थांबतं तेव्हा लक्षात येतं, की या वादळाने आठजणांचा बळी घेतलेला आहे. त्यात त्यांचा कॅप्टन मार्सेलो असतो आणि त्यांना बहिणीप्रमाणे धीर देणारी-बचावलेल्यांमधली एकुलती एक स्त्री लिलियाना असते.


या घटनेने मुलांचं मनोधैर्यही पुन्हा एकदा खाली घसरतं. कालपर्यंत आपल्या शेजारी झोपणारा मित्र एका क्षणात गाडला गेला हे पचवणं अवघड असतं.


शिवाय अव्हलांच आणखीही संकटं घेऊन येतं. विमान बर्फात गाडलं गेल्यामुळे मोठ्या मुश्किलीने तयार केलेली त्यातल्या त्यात उबदार खोली उद्धस्त झालेली असते. विमानातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झालेला असतो. दोन दिवसांनंतर प्रचंड परिश्रम करून, बोगदा तयार करून त्यांना पुन्हा सूर्यप्रकाशात यायला मिळतं. शिवाय सर्वांत मोठा फटका बसतो तो त्यांच्या अन्नसाठ्याला. पहिल्या अपघातात मेलेल्यांचे मृतदेह आता बर्फात आतवर गाडले जातात. या सगळ्या संकटांतून मार्ग काढत पुन्हा स्थिरस्थावर व्हायला अनेक दिवस जातात, पण आधीचे दिवस म्हणजे चैन होती, असं सर्वांना सतत वाटत राहतं.


या संकटातून सावरल्यावर पुन्हा मोहिमेची आखणी सुरू होते. 'निवड झाली नाही तरी मी मोहिमेवर जाणार' असा नॅडोचा निश्चय असतो. त्यामुळे त्याचं नाव पक्कं असतं. त्याच्याबरोबर कनेसाचं नाव नक्की होतं. त्यांच्याबरोबर आणखी कोण जाणार हे ठरवण्यासाठी एक छोटी मोहीम काढली जाते. त्यात रॉय हालें, कार्लिटोस पाएझ आणि विंझटिन असे तिघं जातात; पण परतताना त्यांच्यातले त्राण जवळपास संपतात. तिघांपैकी कोणी ना कोणी सतत खाली कोसळतं आणि इतरांना आपल्याला सोडून पुढे जाण्यासाठी विनवत राहतं, 'मी आता एक पाऊलही चालू शकत नाही. मला सोडा, मला मरू द्या', असं म्हणत राहते. पण आश्चर्य म्हणजे कुणीही कुणाला मागे ठेवत नाही. स्वतःचे प्राण शरीरातून जाण्याची वेळ आली तरीही इतरांचा विचार त्यांच्या मनातून जात नाही. कधी समजावून, कधी शिव्या देत उचकवून, कधी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यासाठी थांबत ते तिघं विमानात पोहोचतात. मृत्यूच्या इतक्या जवळ वावरत असतानाही ही तरुण पोरं जी नीतिमत्ता दाखवतात ती पाहून थक्क व्हायला होतं. पुढच्या मोहिमेतून रॉय आणि कार्लिटोस माघार घेतात. 'मोहीम काढणं अशक्य आहे, आपण इथेच मरणार आहोत', असं त्यांचं म्हणणं असतं. पण विंझटिन महणतो, "ते अवघड आहे. खरं, पण अशक्य नक्कीच नाही". त्यामुळे कनेसा आणि नॅडोसोबत विंझटिन मोहिमेवर जाणार हे ठरून जातं.


मोहीमवीरांची नावं नक्की झाल्यावर सगळीच मूलं मोहिमेच्या तयारीला लागतात. आतापर्यंतच्या मोहिमांनी त्यांना गरजांची जाणीव करून दिलेली असते. त्यानुसार गट पाडून काम सुरू होतात. काहीजण या तिघांसाठी स्लीपिंग बॅग बनवण्याच्या तयारीला लागतात. काहीजण मृतदेह शोधून अन्नाच्या शिदोरीची तजवीज करत असतात. काहीजण बर्फ वितळवून पाणी भरण्याच्या मोहिमेवर रुजू असतात. मोहीमवीरांना खास वागणूक मिळत असते. त्यांची शक्ती भरून निघावी यासाठी त्यांना अन्नाचा जादा वाटा दिला जातो. त्यांना कामातून सवलत मिळते. त्यांच्या विक्षिप्तपणाकडे, रागाच्या झटक्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. तेवीस वर्षांचा नँडो हा त्यातला एकटाच असा असतो की तो या सवलतीचा गैरफायदा घेत नाही. तो इतरांसारखीच कामं करत राहतो आणि कधीही स्वतःचा तोल ढळू देत नाही. खरं तर या अपघाताचा त्याला बसलेला फटका इतरांपेक्षा कैक पटीने जास्त असतो. त्याची आई आणि बहीण दोघीही त्याच्या डोळ्यांसमोर मरण पावलेल्या असतात; पण त्यामुळे हताश होण्याऐवजी उलट त्याच्या मनात सुटकेसाठी प्रयत्न करण्याची भावना आणखी प्रबळ होते. त्याच्या मनात सतत आपल्या वडिलांचा विचार असतो. बायको आणि दोन पोरांना घेऊन चाललेलं विमान कोसळलं, या बातमीचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल


याचा विचारही नँडोला करवत नसतो. त्यामुळेच लवकरात लवकर इथून सुटका करून घेत त्यांच्याकडे परतायचं, या इच्छेने त्याचा ताबा घेतलेला असतो. अशी प्रबळ इच्छाशक्ती काय चमत्कार घडवून आणू शकते याचं नँडो हे अफलातून उदाहरण असतं.


मोहीम निघण्याआधीचा काळ सर्वांसाठीच प्रचंड कठीण असतो. अँडीजवर अडकून महिना उलटलेला असतो. अपुऱ्या अन्नाचा त्यांच्या शरीराबरोबरच मनावरही परिणाम होऊ लागलेला असतो. अनेकदा छोट्या छोट्या कारणांवरून भडके उडत असतात. नैराश्याचे झटके येत असतात. अनेकांची प्रकृती खालावायला लागलेली असते. उरलेल्या मुलांमध्ये साहजिकच छोटे छोटे गट पडतात. हे गट एकमेकांवर चेक्स अँड बॅलन्सेस ठेवण्याचं काम करत असतात. मित्रमंडळी एकमेकांची काळजी घेत असतात, एकमेकांना इतरांच्या झटक्यांपासून जपत असतात. भांडणं जितक्या लवकर होत तितकीच लवकर ती मिटतातही. आपण सगळे एकत्र आहोत म्हणून जिवंत आहोत याची जाणीव प्रत्येकाला असते. मृत्यू दोन हातांवर उभा दिसत असताना त्यांचं मन अशक्य घुसळणीतून जात असतं. जसा मृत्यू सतत सोबत आहे तसाच देवही आपल्या खूप जवळ आहे असं अनेकांना वाटत असतं.


संध्याकाळ झाली आणि सारे आत आले की रात्री अनेक विषयांवर चर्चा रंगत असतात. त्या गप्पा म्हणजे प्रत्येक बुडत्यासाठी काडीचा आधार असतात. देवाने आपल्यावर ही वेळ का आणली, हा विषय अनेकदा त्या चर्चेत डोकं वर काढत असतो. जवळपास सारीच तरुण मंडळी सश्रद्ध असतात. देवाबद्दलच्या चिंतनातून त्यांना शांती मिळत असते आणि उमेदही. गप्पांमधला दुसरा विषय असतो तो रग्बी. जवळपास साऱ्यांची घरची शेती असल्यामुळे तो विषयही सतत बोलण्यात असतो. घर-कुटुंब-प्रेयसी हे विषय मात्र मनात घोंघावत असूनही फार कमी वेळा ओठांवर येतात. कारण त्यावर बोलणं सुरू झालं की बरं वाटण्याऐवजी त्रासच अधिक होत असतो. मनातल्या मनात मात्र आपल्या आई-वडिलांशी टेलिपथी साधण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न चालू असतो; पण बहुतेक वेळा त्यांच्या गप्पांचाओघ खाद्यपदार्थांवर येऊन थांबत असतो. 


टोकाच्या उपासमारीमुळे खाणं ही त्यांच्या डोक्यात सदोदित फिरणारी एकमेव गोष्ट असते. अनेकदा प्रत्येकजण आपल्या आवडत्या पदार्थांबद्दल बोलत असतो. पूर्वी केलेल्यापार्ट्यांची वर्णनं चवीने रंगवली जात असतात. वेगवेगळ्या पदार्थांच्या पाककृतींची चर्चा होत असते. डोळ्यांसमोर आपल्या आवडीचा पदार्थ आणून तोंडाला सुटलेल्यापाण्याने आवंढा गिळत राहणं हे त्यांचं नेहमीचं काम असतं. पण दुर्दैव असं, की ते समाधानही त्यांच्या नशिबी नसतं. कारण थोड्यांत दिवसांत त्यांच्या लक्षात येतं, की या वर्णनांमुळे शरीरात पाचक रस तयार होताहेत, पण प्रक्रिया करायला पोटात पुरेसं अन्न कुठेय? त्यामुळे अल्सर होण्याची भीती असल्याचं त्यांना जाणवतं. मग जाणून-बुजून ही चर्चा कमी केली जाते.मुलांनी तिथल्या अमानवी वातावरणाशी जुळवून घेतलं असलं तरी समस्या कमी नसतात. 


संध्याकाळ झाली की १५-१६ तास त्यांना विमानात अडकून पडावं लागत असल्यामुळे लघवीला जाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. दरवेळी उठून बाहेर येणं म्हणजे सर्वांना तुडवत जाणं. मग त्यावर उत्तर निघतं, की दाराच्या शेजारी झोपलेल्या मुलाने सर्वांना रात्रभर एक टमरेल पास करत राहायचं. त्याने ते बाहेर मोकळं करून पुन्हा आत फिरवायचं. अशा जागी झोपण्यासाठी कोण तयार होणार? त्यामुळे या कामासाठीही शिफ्ट्स लावल्या जात. दुसरा प्रश्न असतो तो संडासला जाण्याचा. पुरेसं अन्न खायला मिळत नसल्यामुळे सगळ्यांनाच टोकाच्या बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागलेला असतो. दिवसांमागून दिवस जाऊनही अनेकांना संडासला होत नाही. कुणाचं पंधरवड्याने, तर कुणाचं तब्बल महिन्याभराने पहिल्यांदा पोट साफ होतं; पण त्यानंतर दुसरा त्रास सुरू होतो तो जुलाबांचा. त्यात असते नसते ती शक्ती पार संपून जाते.मधल्या काळात जबर जखमी झालेल्या त्यांच्यातल्या दोघांचा मृत्यू होतो. हे मृत्यू सर्वांनाच धक्का देऊन जातात. हिमवादळातून बचावलेल्यांना आता काही होणार नाही, या त्यांच्या विश्वासाला तडा जातो. सारे अचानक मृत्यूसमोर उघडे पडतात. आपल्यापैकी कोणीही कधीही दगावू शकतं, या विचाराने त्यांची मनःशांती आणि शक्तीही ढळते. आता लवकरात लवकर मोहीम काढायला हवी हे साऱ्यांना कळून चुकतं…


अपुर्ण राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखात.।।




२३/१/२६

अँडीजवरचा चमत्कार / Miracle on the Andes



उरुग्वेतून चिलेला जाणारं एक छोटं विमान अँडीज हिमशिखरांमध्ये कोसळतं.जिथे मरण सोपं आणि सर्व यातनांपासून सुटका करणारं ठरू शकतं अशा अँडीजच्या अमानवी वातावरणात विमानप्रवासी तब्बल सत्तर दिवस कसे तग धरून राहतात याची कहाणी.


१२ ऑक्टोबर १९७२. दक्षिण अमेरिकेतल्या उरुग्वे देशाच्या हवाई दलाचं छोटं विमान ४० पॅसेंजर्स आणि पाच कर्मचारी घेऊन चिले या देशाच्या दिशेने उड्डाण करतं.उरुग्वेतल्या एका क्लबची रग्बी टीम मॅच खेळण्यासाठी चिलीला चाललेली असते;पण हवा खराब होते आणि विमानाला अर्जेंटिनातल्या एका शहरात थांबावं लागतं.दुसऱ्या दिवशी हवा निवळण्याची वाट बघत दुपारी तीनच्या सुमारास विमानाचे पायलट पुन्हा उड्डाण करण्याचा निर्णय घेतात;

पण उड्डाणानंतर थोड्याच वेळात हवामान पालटतं,वादळ सुरू होतं आणि त्या तडाख्याने विमान हिमशिखरांमध्ये कोसळतं.


अँडीज म्हणजे हिमालयानंतरची सर्वाधिक उंचीची आणि अफाट पसरलेली पर्वतरांग.ही पर्वतरांग उभी ७००० किलोमीटर आणि आडवी ५०० किलोमीटरचा परिसर व्यापून आहे.अर्जेंटिनाहून चिलेकडे जाणाऱ्या विमानांचे पायलट पाचशे किलोमीटरचा हा अँडीजचा टप्पा अक्षरशःनशिबाच्या भरवशावरच पार करत असतात.( नँडो पॅरेडो,रॉबर्ट कनेसा आणि इतर अँडीजवरचा चमत्कार,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन ) कारण इथे हवा कधी पालटेल आणि त्याचा तडाखा विमानाला कधी बसेल हे सांगणं अशक्य... आणि अँडीजमध्ये कोसळणं म्हणजे मृत्यू !


अशा अँडीजमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास उरुग्वेचं विमान कोसळतं.एका शिखरावर आपटून विमानाचा शेपटाकडचा भाग तुटतो.विमान तसंच पुढे जात राहतं आणि तिन्ही बाजूंनी शिखरांनी वेढलेल्या एका पठारावर येऊन आदळतं;पण आश्चर्य म्हणजे ना विमानाचा भडका उडतो ना चक्काचूर होतो.विमान जमिनीवर स्थिरावतं तेव्हा विमानातल्या साऱ्यांनाच मृत्यूने गाठलेलं नसतं.आपलं विमान कोसळलंय हे कळल्यावर साहजिकच पहिली प्रतिक्रिया असते ती हात-पाय गाळून मदतीची वाट बघणं.इथे तर बरेचसे खेळाडू विशीच्या आतले कोवळे तरुण असतात,पण तरीही त्यातले काही झपाट्याने सावरतात.आपल्या मित्रांपैकी कोण जिवंत आहे,कुणाला किती लागलंय याचा अंदाज घेऊ लागतात.काहीजण नशिबाने पहिल्या फटक्यातच मरण पावलेले असतात,पण बाकीच्यांची परिस्थिती मृत्यू परवडला असं म्हणण्याजोगी असते.


हादऱ्यामुळे माणसं विमानाच्या सीट्समध्ये अडकलेली असतात.

काहींचे पाय तुटलेले असतात,काही वरून हाती पायी घड दिसत असले तरी त्यांना अंतर्गत जखमा झालेल्या असतात.कित्येकजण बेशुद्ध पडलेले असतात,तर काही शुद्धीवर असूनही धक्क्यामुळे त्यांचं भान गेलेलं असतं.


खेळाडूंमपले दोघं मेडिकलचे विद्यार्थी असतात.रॉबर्ट कनेसा आणि गुस्ताव्ह झर्बिनो.हे दोघं तातडीने जखमींच्या परिस्थितीचा अंदाज बांधायच्या कामाला लागतात.जे खेळाडू जायबंदी झालेले नसतात तेही इतरांच्या मदतीला धावतात.त्यात मुख्य असतो तो त्यांच्या टीमचा कॅप्टन मार्सेलो पेरेझ.कॅप्टन असल्यामुळे तो फटाफट सूत्रं आपल्या हातात घेतो आणि काम सुरू करतो.काही मुलं विमानाच्या बाहेर पडून पाहतात,तर आजूबाजूला केवळ बर्फ आणि बर्फ पसरलेला असतो.त्यांच्या तिन्ही बाजूंनी प्रचंड हिमशिखरं आकाशाला भिडलेली असतात.त्यांची पहिली प्रतिक्रिया असते,संपलं सारं !


या परिस्थितीला प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद वेगळा असतो.

काहीजण विमानाबाहेरच्या बर्फात सुन्नपणे बसून सिगरेट ओढत राहतात.काहीजण भीतीने गोठून रडत राहतात,तर काही घडाक्याने काम करू लागतात. जखमींना थोड्या वेळासाठी बाहेर काढून विमानाची आवराआवर करतात.मदत येईपर्यंत सर्वांना बसायला थोडी जागा असावी असा त्यांचा प्रयत्न असतो.


विमानातल्या परिस्थितीचा पहिला अंदाज येईतो दुपारचे चार वाजलेले असतात.अँडीज हिमशिखरांच्या त्या बेचक्यात हळूहळू अंधारू लागतं आणि बर्फ पडायला सुरुवात होते.एव्हाना विमान कोसळल्याची बातमी कळली असेल आणि मदत रवानाही झाली असेल असं साऱ्यांना वाटत असतं.विमानातून बाहेर सिग्नल देण्याची सोय असेल तर आपलं नेमकं स्थान सांगता येईल,या विचाराने काहीजण पायलटच्या केबिनमध्ये डोकावतात.


मुख्य पायलट मरण पावलेला असतो,तर को-पायलट समोरचा डॅशबोर्ड आणि सीट यात अडकून जायबंदी झालेला असतो. मुलं त्याच्या मदतीने विमानातला रेडिओ सुरू करता येतो का बघतात;पण लक्षात येतं की ते यंत्र बॅटरीखेरीज पूर्ण निकामी आहे.


थोड्याच वेळात संध्याकाळचे सहा वाजून जातात.पूर्ण अंधारतं.

आता आज सुटका होणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकतं.

विमानात आहे त्या जागेत दाटीवाटीने बसून सकाळ होण्याची वाट बघण्याशिवाय त्यांच्या हातात काही नसतं.तापमान शून्याच्या किती तरी खाली गेलेलं असतं.कुणाकडेच पुरेसे गरम कपडे नसतात. एरवी अतिदक्षता विभागातच दाखल करावं लागलं असतं अशी अनेकांची प्रकृती असते.आणि इथे तर धडधाकट माणसालाही जगण्यासारखी स्थिती नसते. अशा परिस्थितीत रात्रभर आपला टिकाव कसा लागणार,हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात उभा असतो. 'ठीक आहे,एक रात्र कशीबशी काढावी लागेल, सकाळी सुटका होईलच',या भरवशावर सगळे विमानात गोळा होतात.तिथे शक्य तितकी जागा तयार केली जाते. 


प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर रचून उघडा भाग झाकला जातो.

बॅगांमध्ये सापडतील तेवढे कपडे अंगावर घालतात.तरीही थंडी कमी होत नाही.शेवटी सीट कव्हर्स काढून ती ब्लॅकेटसारखे गुंडाळण्याची कल्पना कुणाला तरी सुचते.जखमींना कमीत कमी त्रास होईल अशा स्थितीत पडून हे प्रवासी एकमेकांच्या आधाराने रात्र सरण्याची वाट पाहत राहतात.त्यांना सोबत असते ती आपल्या मित्रांच्या मृतदेहांची.


थंडी हाडं गोठवणारी असते;पण त्याहून अधिक भीतिदायक असतं ते घबराटीचं आणि उद्रेकाचं वातावरण.विमानातल्या प्रत्येक जखमीला वाटत असतं की आपली अवस्था सर्वात वाईट आहे.प्रत्येकजण ते आरडाओरडा करून दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो.जागा एवढी कमी असते,की कुणी एकाने हालचाल केली की आजूबाजूच्या सर्वांना त्याचा त्रास भोगावा लागत असतो.सगळीकडून कण्हण्याचे आवाज येत राहतात.कुणी मदतीसाठी ओरडत असतं, कुणी मृत्यूची याचना करत असतं.नँडो पॅरेडो या खेळाडूची तरुण बहीण आणि आई दोघीही त्याच्यासोबत आलेल्या असतात.अपघातात त्याची आई जागीच मरण पावलेली असते,तर नँडो बेशुद्ध पडलेला असतो.

त्याच्या बहिणीला जबरदस्त मार लागलेला असतो.रात्रभर ती आईसाठी रडत राहते.मधूनच तिचं मन भरकटतं आणि ती बालगीतं म्हणायला सुरुवात करते.एवढी प्रदीर्घ आणि भयानक रात्र त्यांच्यापैकी कोणीही आजवर अनुभवलेली नसते.


सकाळ होते.उठल्यावर लक्षात येतं की त्या भयानक रात्रीने तिघांचा बळी घेतलेला असतो.ते वास्तव स्वीकारून 'डॉक्टर्स' बचावलेल्यांची काळजी घेण्याच्या कामाला लागतात.जखमींवर उपचार करण्यासाठी ना त्यांच्याकडे पुरेसं ज्ञान असतं ना तशी साधनं हाताशी असतात.जखमांवर अँटिसेप्टिक म्हणून ओडी कोलोन लावून जखमा कपड्यांनी बांधल्या जातात.ज्यांची हाडं तुटलेली असतात त्यांना हालचाल न करण्यास बजावलं जातं.

अनेकांना शरीराच्या अंतर्गत अवयवांना जखमा झालेल्या असतात.त्यावर या दोघांकडे काहीच उपाय नसतो.आज दिवसभरात किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी सुटका होईल याची प्रत्येकाला खात्री असते. 


तरीही कॅप्टन मार्सेलो विमानात सापडलेल्या खाण्याजोग्या पदार्थांचं रेशनिंग करण्याचा निर्णय घेतो. काय असतात हे पदार्थ ? तर चॉकलेटची आठ पाकिटं, चिक्कीची पाचपाकिटं,

खजूर,जॅमच्या छोट्या बाटल्या आणि वाइन-व्हिस्की आणि ब्रँडीच्या काही बाटल्या.


 मार्सेलो प्रत्येकाला चॉकलेटचा एकेक तुकडा वाटून देतो.

दिवसातून दोन-तीन वेळा विमानाचे आवाज ऐकू येतात.त्या आवाजाने प्रत्येकाच्या छातीची धडपड वाढते.झालीच आता सुटका,असं मनात येतं;पण पुढे काहीच घडत नाही.ढगाळ हवेमुळे विमानं खाली उतरू शकत नसणार,अशी समजूत काढून मुलं स्वतःचं समाधान करून घेतात.संध्याकाळ होते,अंधारून येतं आणि आणखी एका रात्रीला सुरुवात होते.अर्थात दिवसभरात मुलांनी मृतदेह बाहेर नेलेले असतात आणि शक्य तितकी जागा करून ठेवलेली असते.त्यामुळे ही रात्र थोडी बरी जाते.


तिसरा दिवस निरभ्र उजाडतो.त्यामुळे आज सुटका नक्की याबद्दल कुणालाच शंका वाटत नाही.मन थोडं उल्हसित झाल्यामुळे अँडीजच्या रौद्र सौंदर्याकडेही कुणाकुणाचं लक्ष जातं.शिवाय मदत पोहोचेपर्यंत काही तातडीचे प्रश्नही त्यांना सोडवायचे असतात. त्यातला मुख्य प्रश्न असतो तो पिण्यासाठी पाणी मिळवण्याचा.एकाला कल्पना सुचते.तुटून पडलेल्या विमानाच्या सीटमधला अल्युमिनियमचा एक तुकडा वाकवून तो त्याचा द्रोणासारखा आकार तयार करतो. त्यात बर्फ भरून उन्हात ठेवला की थोड्या वेळात पाणी जमा होऊ लागतं.मग मुलांची एक टीम असे अल्युमिनिमचे तुकडे तयार करून पाणी गोळा

करण्याच्या कामाला लागते. 


मार्सेलो इतर मुलांमधून आणखी काही पथकं तयार करतो

.कनेसा,झर्बिनो हे दोघं डॉक्टरचं काम करत असतात.लिलियाना मेथॉल ही पस्तिशीची बाई त्यांची मदतनीस नर्स बनते.तिचा नवरा अति उंचीचा त्रास झाल्यामुळे झोपून असतो.त्याची काळजी घेण्याबरोबरच वयाने तरुण असलेल्या खेळाडूंनाही ती मोठ्या बहिणीसारखी आधार देत राहते.त्या दिवशी पुन्हा एकदा विमानाचा आवाज ऐकू येतो.आता या वेळी तर खात्रीच पटते,की मदत आली.त्या उत्साहात सारे आपापली कामं सोडून विमानाची वाट पाहत राहतात.काहीजण आनंदामध्ये वाइनच्या काही बाटल्या रिकाम्या करतात,रेशनिंग थांबवून चॉकलेट्स संपवतात.पण त्या दिवशीही मदत येत नाही. रात्री सगळ्यांनाच निराशा घेरून राहते.

त्यात काही जण अविचाराने वाइन आणि चॉकलेटवर तुटून पडल्यामुळे एकमेकांमध्ये भांडणंही जुंपतात.त्यामुळे ती रात्र पुन्हा सर्वांसाठी त्रासदायक ठरते.शिवाय गंभीर जखमा झालेल्यांसाठी एवढ्या दाटीवाटीत झोपणं वेदनादायी असतं.रात्री एखाद्याला नैसर्गिक विधीसाठी उठून बाहेर जावं लागलं तर सर्वांना तुडवत जाणं भाग असतं. त्यावर कनेसा एक उपाय शोधतो.

विमानातल्या सामानातूनच तो या जखमींसाठी हॅमॉक तयार करतो.हे हॅमॉक्स झोपायला फारसे सोईचे नसतात,पण किमान तिथे त्यांना सतत दुसऱ्यांच्या लाथा लागत नाहीत आणि खालच्यांसाठी झोपायला जास्तीची जागा तयार होते.आपल्याला याचं आश्चर्य वाटतं,की मन बधिर व्हावं अशा अपघातातही या तरुणांची डोकी चालू असतात.आपला आणि आपल्या सोबत्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी त्यांच्या सुपीक डोक्यातून सतत नव्या कल्पनाही बाहेर पडत असतात.


चार दिवस उलटूनही मदत येत नाही,तेव्हा पहिल्यांदा नँडो पॅरेडोच्या मनात येतं,की सुटकेसाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार.तोपर्यंत हा मुद्दा कुणाच्याही डोक्यातच आलेला नसतो.

आज नाही तर उद्या मदत येईल;तोपर्यंत वाट पाहायची,हे सरळ असतं.पण पहिले दोन दिवस बेशुद्ध असणारा नँडो तिसऱ्या दिवशी झपाट्याने बरा होतो आणि बाजूच्या शिखरावर चढून पलीकडे काय आहे हे बघायला हवं यासाठी मित्रांच्या मागे लागतो.जवळपास सारे त्याला वेड्यात काढतात. 'गेले चार दिवस एक चॉकलेटचा तुकडा आणि दोन घोट पाण्यावर आपण जगतो आहोत.एवढं उंच शिखर चढणार कसं?' हा त्यांचा सवाल असतो.ते खरंच असतं. पण नँडो एका मित्राशी बोलताना म्हणतो,"मी पायलटचं मांस खाईन.शेवटी त्याच्यामुळेच तर आपण इथे अडकून पडलोय."


विक्षिप्तपणा म्हणून त्या त्याचा मित्र हे बोलणं हसण्यावारी नेतो.पण आणखी दोन दिवस उलटल्यावरही मदत येत नाही म्हटल्यावर डोंगर चढून जाण्यासाठी मोहीम काढायचं ठरतं.

टीममधले त्यातल्या त्यात चार दणकट तरुण शक्य त्या तयारीनिशी निघतात;पण पाच-सहा दिवसांच्या उपासमारीमुळे त्यांच्या अंगात फारशी शक्ती नसते.त्यामुळे बर्फातून एकेक पाऊल उचलणं म्हणजे आई आठवणारं काम असतं.तरी हे चौघं कसेबसे चढत राहतात.


थोडं वर गेल्यावर मागे वळून पाहतात,तर त्यांना त्यांचं पडलेलं विमान दिसेनासे झालेले असतात.बर्फाच्या कुशीत पांढरं विमान पूर्णपणे लपून गेलेलं असतं.एवढ्या जवळूनही विमान दिसत नसेल,तर सुटका करण्यासाठी येणाऱ्या विमानांना ते दिसेल अशी अपेक्षा करणं हास्यास्पद असतं.


सूर्य वर येतो तसतसं बर्फ वितळू लागतं आणि चालणं आणखी अवघड होतं.त्यातला एकजण हिमदरीत पडता पडता वाचतो.

शेवटी चौघंही परतण्याचा निर्णय घेतात; पण येताना त्यांची शक्ती पूर्ण खलास होते.स्वतःला अक्षरशःओढत ते कसेबसे विमानात पोहोचतात.या मोहिमेनंतर विमानात नैराश्याची लाट पसरते. विमान वरून दिसतच नाही,तर सुटका होणार कशी? शिवाय शिखराचा छटाक भाग चढताना आपल्यातल्या तगड्या लोकांची अवस्था,तर इथून स्वतःहून बाहेर पडण्याच्या गोष्टी कशाच्या जीवावर करायच्या?पण अशा वेळी कोणी ना कोणी अशेचे बोल बोलून सर्वांचा धीर टिकवून.ठेवत असतं.अपुर्ण राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखात.।।


२१/१/२६

तुमच्यासोबत जग आहे.The world is with you.


तुमच्या,माझ्या समस्या सोडवण्याचा दावा केला,तर आपण त्यांचे प्रॉडक्ट्स आपोआप विकत घेऊ.उगीच कोणीतरी काहीतरी गळ्यात मारलेले कुणालाच आवडत नाही,हो ना?


मी सेल्समधील अशी अनेक माणसे पाहिली आहेत ज्यांची उभी हयात या क्षेत्रात गेली,पण तरीही ते 'ग्राहकांच्या नजरेतून' बघू शकत नाहीत.उदाहरणार्थ मी फॉरेस्ट टील या परिसरात गेली अनेक वर्षे राहतो आहे. ग्रेटर न्यू यॉर्कच्या मध्यभागी वसलेली ही एक छोटीशी टुमदार वसाहत आहे.एके दिवशी मी गडबडीत स्टेशनकडे निघालो होतो.तेवढ्यात मला रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारा एक ओळखीचा माणूस भेटला, जो या भागात अनेक वर्षांपासून काम करत होता. त्याला फॉरेस्ट टील हा भाग चांगला माहिती होता म्हणून मी त्याला विचारले,"प्लास्टर केलेल्या या घरात नेमके काय साहित्य वापरले आहे? आतमध्ये लोखंडी फ्रेम आहे की ती आतून पोकळ आहे?" यावर तो म्हणाला, "मला कल्पना नाही." तो एवढेच म्हणाला, "एखाद्या आर्किटेक्टला बोलावून विचारा." दुसऱ्या दिवशी त्याचे मला पत्र आहे.त्यातही त्याने मला काहीच माहिती दिली नाही.खरेतर एखादा फोन करून एका मिनिटात तो ही माहिती मिळवू शकला असता;पण नाही ! पुन्हा त्याने मी फोनवर सहज मिळवू शकलो असतो,तीच माहिती सांगितली."तुम्ही माझ्याकडून इन्शुरन्स घ्या," तो म्हणाला.


थोडक्यात मला मदत करण्यात त्याला काहीच रस नव्हता.

केवळ आपला फायदा पाहण्याशिवाय अन्य विचारच तो करू शकत नव्हता.


'सेल्स'मध्ये दोन प्रकारचे लोक समान परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारे हाताळू शकतात असे अलाबामा, बर्मिंगहॅम येथील जे होवर्ड ल्युकास याने सांगितले आहे.


 'मी काही वर्षांपूर्वी एका छोट्या कंपनीमध्ये मॅनेजमेंटच्या ग्रुपमध्ये होतो.आमच्या हेडक्वॉर्टरजवळएका इन्शुरन्स कंपनीचे भले मोठे ऑफिस होते.त्यांच्या एजंट्सना ठरावीक प्रदेश कार्यक्षेत्र म्हणून वाटून दिला होता आणि आमची कंपनी दोन एजंट्सच्या कार्यक्षेत्रात येत होती.त्या दोघांना मी इथून पुढे 'कार्ल' आणि 'जॉन' असे संबोधणार आहे.


"कार्ल आमच्या ऑफिसवरून जात असताना एके दिवशी सहजच आला व त्याने आम्हाला सांगितले की, अधिकारी वर्गासाठी एक नवीन लाइफ इन्शुरन्स पॉलिसी असून त्याच्या मते ती आमच्यासाठी फायद्याची आहे."मी यासाठी पुन्हा येईन,"असे सांगून तो निघून गेला.त्याच दिवशी दुपारी कॉफी ब्रेकमध्ये जॉनने आम्हाला बाहेर पडताना पाहिले आणि तो उत्साहाने ओरडला,

"हाय,माझ्याकडे तुमच्या सगळ्यासाठी एक गुड न्यूज आहे." तो अतिशय हर्षोल्हासित झाला होता. घाईघाईने जवळ येऊन त्याने उच्च अधिकारी वर्गासाठी त्याच्या कंपनीच्या इन्शुरन्स पॉलिसीबद्दल सांगितले.(ही तीच पॉलिसी होती,ज्याबद्दल सकाळी कार्लने आम्हाला साधारण कल्पना दिली होती.) ती पॉलिसी घेणारे पाहिले ग्राहक आम्ही असावे असा त्याचा आग्रह होता. त्याने पॉलिसीच्या कव्हरेजविषयीच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.'मी ऑफिसमधील प्रतिनिधीला तुमच्याकडे पाठवतो,जेणेकरून तो तुम्हाला सविस्तर माहिती देईल' असेही तो म्हणाला.त्याच्यामधील सळसळता उत्साह पाहून ही पॉलिसी घ्यायलाच हवी, अशी प्रबळ इच्छा आमच्या मनात निर्माण झाली.त्याने सोबत अर्जसुद्धा आणले होते.


त्याने अर्ज देऊन आम्हाला सह्या करायला सांगितल्या.

आम्हाला खरं तर पुरेसा तपशील कळला नव्हता,तरी आम्ही पॉलिसी घेतली.अर्थात आम्हाला नंतर समजले की,जॉनने जे काही सांगितले ते सर्व बरोबर तर होतेच,शिवाय त्याने सांगितल्यापेक्षाही कव्हरेज जास्त होते.


कार्लला आम्ही ग्राहक म्हणून मिळू शकलो असतो;पण आमच्यामध्ये पॉलिसी घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होण्यासाठी त्याने कोणतेच विशेष कष्ट घेतले नाहीत.


जे संधीचा फायदा घेतात व स्वतःला आजमावतात, अशा लोकांनी हे जग भरलं आहे.म्हणूनच या जगात निष्काम सेवा करणारे लोक दुर्मिळ आहेत.त्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागत नाही.ओवेन डी यंग हा प्रसिद्ध वकील आणि यशस्वी उद्योजक एकदा म्हणाला होता, "जे लोक इतरांच्या चपला घालून विचार करतात, इतरांच्या मनात काय चालले आहे याचा वेध घेतात त्यांना भविष्याची चिंता करण्याची गरज पडत नाही."इतरांच्या दृष्टिकोनातूनही विचार करायचा असतो,हे जरी या पुस्तकामुळे तुम्हाला उमजले तरी तुमचा भविष्यकाल उज्वल ठरेल.भावी उज्ज्वल.आयुष्याची ही सुरुवात असेल.


एखादी गोष्ट करण्याची ऊर्मी समोरील व्यक्तीत निर्माण करणे याला लबाडी म्हणता येणार नाही,कारण त्यामधून आपण फक्त आपला फायदा व इतरांचे नुकसान असे पाहत नसतो;तर त्या व्यवहारातून दोघांनाही काहीतरी फायदा होणार असतो.मि. व्हर्मिलेनच्या पत्रांमधून काय समजले,तर पत्र पाठवणारा आणि ज्याला प्रेषक अशा दोघांनाही त्या सूचनांचा फायदा मिळणार होता.बँकेला मिसेस अ‍ॅण्डरसनच्या पत्रांमुळे एक योग्य कर्मचारी लाभला आणि मिसेस अ‍ॅण्डरसनला मनासारखी नोकरी लाभली. मि.जॉनने मि.ल्युकासला इन्शुरन्स पॉलिसी विकल्यामुळे त्या दोघांनाही फायदा झाला.


ऱ्होडे आयलंड येथील मायकेल व्हिडन हा शेल ऑइल कंपनीचा रिजनल सेल्समन होता.माइकला त्याच्या जिल्ह्यात सर्वोत्तम विक्रेता व्हायचे होते,पण त्याच्या सगळ्या सर्व्हिस स्टेशनपैकी एक सर्व्हिस स्टेशन तेवढेसे चांगले चालत नव्हते.कारण एक प्रौढ गृहस्थ ते स्टेशन चालवत होता.ते स्टेशन सुस्थितीत नव्हते,त्याचा आकार चांगला नव्हता, रंगरंगोटी खास नव्हती,इतरही कोणत्या सोयी सुविधा नव्हत्या,त्यामुळे तिथली विक्री तुलनेने खूपच घटली होती.माइकने मॅनेजरला आतापर्यंत कितीतरी विनंत्या केल्या होत्या.तरी ते सिनिअर मॅनेजर ऐकणाऱ्यांपैकी नव्हते. समजावून सांगून आणि अगदी तळमळीने सांगूनही त्यांच्यामध्ये काही फरक पडत नव्हता.मग माइकने एक शक्कल लढवली.माइकने त्या मॅनेजरला शेल कंपनीच्या नवीन सर्व्हिस स्टेशनच्या उ‌द्घाटनला बोलावले.तो मॅनेजर आला आणि ते चकचकीत सर्व्हिस स्टेशन, तेथे असलेल्या सोयी सुविधा पाहून अक्षरशःप्रभावित झाला;पण तो काही बोलला नाही.माइक जेव्हा पुढच्या वेळेला त्या जुनाट सर्व्हिस स्टेशनवर गेला तेव्हा त्या सर्व्हिस स्टेशनचं रूप पालटलं होतं आणि त्याची विक्रीसुद्धा सुधारली होती.त्यामुळे माइकचे आता त्या प्रदेशातील सर्वोत्तम विक्रेता म्हणून स्थान निश्चित झाले होते.मॅनेजरच्या मतपरिवर्तनासाठी त्याने केलेल्या चर्चा, सूचना व्यर्थ ठरल्या होत्या,पण माइकने जेव्हा स्वतः घडवलेलं आधुनिक सर्व्हिस स्टेशन त्या मॅनेजरला दाखवले तेव्हा त्यायोगे त्याच्यामध्ये 'माझेही सर्व्हिस स्टेशन असे असावे',ही प्रबळ इच्छा निर्माण झाली.ही इच्छा सत्यात उतरली.फायदा झाला आणि तोही दोघांचा,माइकचा आणि मॅनेजरचासुद्धा !


अनेक लोक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतांना स्वतःच्या मेंदूचे कार्य कोणत्या पद्धतीने चालले आहे, याचा मुळीच विचार करत नाहीत.मी एकदा तरुण पदवीधर मुलांसाठी 'प्रभावी वक्तृत्व' या विषयीचा एक प्रशिक्षण कार्यक्रम घेतला होता.ही मुले सुप्रसिद्ध एअर कंडिशनर्सचे उत्पादक 'कॅरिअर कॉपोरेशन'साठी इंटरव्ह्यूला जाणार होती.त्यांपैकी एका मुलाला मोकळ्या वेळेत बास्केट बॉल खेळण्याची व त्यासाठी इतर मुलांना राजी करण्याची इच्छा होती.म्हणून तो असे म्हणाला,"मला असे वाटते की,आपण बास्केटबॉल खेळू या.मागील काही वेळेस मी जिमखान्यात गेलो तेव्हा तेथे सोबत फारसे कोणी नव्हते.जेमतेम दोघे तिघेच जमलो. आम्ही बास्केटबॉल खेळलो खरे,पण दोघांतिघांत खेळण्यात रंगत कशी येणार? माझा तर डोळा बॉलच्या फटक्याने काळानिळा झाला.उद्या रात्री तुम्ही सगळे खाली आलात,तर मला बास्केटबॉल खेळता येईल."आता तुम्हाला काय हवंय याबद्दल तो काही बोलला का? कदाचित तुमच्यापैकी कोणालाच जिम्नॅशिअममध्ये जाण्याची इच्छा नसेल.हो ना? त्याला काय हवे आहे याची काळजी करण्याची तुम्हाला काय गरज? विनाकारण डोळा सुजवून घ्यायचा.


जिम्नॅशिअममध्ये जाऊन तुम्हाला काय मिळेल,हे त्याने इतरांना पटवून दिले का? त्याला त्याची आवश्यकताच वाटली नाही.

बास्केटबॉल हा किती आनंददायी खेळ आहे! किती स्फूर्तिदायक आहे! त्यामुळे शरीर व मन किती प्रफुल्लित होते, हे तो नक्कीच सांगू शकला असता.


प्रो.ओव्हरस्ट्रीट म्हणतात- 'आधी समोरच्याच्या मनात त्या गोष्टीविषयी तीव्र इच्छा निर्माण करा.हे करू शकणाऱ्यासोबत सगळे जग असते अन् जो हे करू शकणार नाही त्याचा मार्ग 'एकला चलो रे' असतो.'


आमच्या प्रशिक्षण शिबिरातील एका प्रशिक्षणार्थीचा मुलगा नीट खात-पीत नव्हता व त्याचे वजनही वयाच्या मानाने खूप कमी होते.त्याच्या पालकांनी पारंपरिक पद्धत वापरली.ते त्याला खूप रागावले.'आईला असे वाटते म्हणून तू ते खा',बाबाला असे वाटते म्हणून तू ते खाऊन धष्टपुष्ट व्हावे,' वगैरे वगैरे सांगून झाले.


पण त्या पाल्याने त्यांच्या विनंत्या धुडकावून लावल्या.


त्या आईवडिलांच्या मनाला अशी कल्पनासुद्धा शिवली नाही की,आपल्या बाळाला काय वाटते?तीन वर्षांच्या मुलाला तीस वर्षांच्या बापाचा दृष्टिकोन कसा समजेल? पण त्या बापाला मात्र नेमके तेच हवे होते.त्यांची अशी अपेक्षा होती की,त्यांच्या मनातली प्रत्येक गोष्ट मुलाला समजायला हवी.हा चक्क मूर्खपणा होता,पण शेवटी या बापाच्या ही गोष्ट लक्षात आली.


मग तो स्वतःशीच म्हणाला,'मुलाला नेमके काय हवे आहे? मला जे हवे तेच त्याला हवे असण्यासाठी मी काय करायला पाहिजे ?'


आता या दिशेने विचार करायला सुरुवात केल्यावर पुढचे काम सोपे झाले.त्या मुलाला आपण सध्या 'जॉन' म्हणू या.जॉनकडे तीन चाकी सायकल होती.त्याला ती खूप आवडायची.तो सायकल चालवत काही घरे सोडून थोडेसे पुढे आला की एका घरात त्याच्यापेक्षा थोडा मोठा,जाडजूड असा एक मुलगा राहत होता.तो जॉनला सायकलवरून खाली ढकलून स्वतः त्याच्या सायकलवर कब्जा करायचा.साहजिकच जॉन रडत आईकडे येई. मग तिला घरातून बाहेर यावे लागे.त्या धष्टपुष्ट मुलाला रागवून जॉनला पुन्हा सायकलवर बसवून घरी आणावे लागे.हा रोजचाच नित्यपाठ झाला होता.


जॉनला नेमके काय हवे होते? जॉनची तीव्र इच्छा जाणण्यासाठी शेरलॉक होम्सला विचारण्याची गरज नाही! त्याचा स्वाभिमान,

त्याचा संताप,त्याची इच्छा व त्यांचा आत्मसन्मान या सगळ्याच तीव्र भावना जागृत होऊन त्या बलाढ्य मुलाच्या नाकावर एक जोरदार बुक्की मारावी असेच त्याला वाटले असणार ना! नेमक्या त्याच वेळी त्याच्या वडिलांनी जॉनला सांगितले.


की,"तू रोज व्यवस्थित जेवण केलेस; पालेभाज्या, अंडी,चिकन,

मटण,फळे,दूध असा पौष्टिक आहार घेतलास,तर तू त्या जाड्याला नाकावर सहज ठोसा मारून त्याला गप्प बसवू शकतो."चांगला आहार घेतल्याने थोड्याच दिवसांत जॉन त्या जाड्या मुलाला धडा शिकवू शकेल व जॉनचा पुन्हा अवमान होणार नाही,याची खात्री पटताच जॉनने सगळे जेवण जेवण्यास सुरुवात केली.


जॉनची आणखी एक सवय होती.ती म्हणजे बिछाना ओला करण्याची !


जॉन त्याच्या आजीबरोबर झोपायचा.रोज सकाळी आजी म्हणायची,"जॉन,अरे काल रात्री तू तेच केलेस."


त्यावर जॉन म्हणायचा, "छे! हे मी नाही,तूच केलेस." रागावून

मारून काही फरक पडला नाही.त्यामुळे पालकांनी आता स्वतःला प्रश्न विचारला,"या मुलाला स्वतःचा बिछाना कोरडा ठेवावा असे वाटावे यासाठी काय करावे बरे?"


जॉनच्या इच्छा काय होत्या? पहिली गोष्ट म्हणजे, त्याला त्याच्या बाबांसारखा पायजमा घालायचा होता. दुसरे म्हणजे,त्याला आजीच्या पलंगावर झोपायचे नव्हते.आपला वेगळा पलंग हवा होता.आजी तर त्याच्या या सवयीमुळे वैतागलीच होती. त्यामुळे दोन्ही गोष्टींना तिने आनंदाने होकार दिला.


त्याची आई त्याला ब्रुकलीनमधील मोठ्या दुकानात घेऊन गेली.

त्या सेल्सवुमनला डोळ्यांनी इशारा करून ती म्हणाली,"इथे एक लहानसे जन्टलमन आले आहेत आणि त्यांना स्वतःसाठी काही शॉपिंग करायची आहे."


त्या सेल्सवुमनने या नाटकात सहभागी व्हायचे ठरवले. त्याला खूप महत्त्वाचे वाटावे म्हणून त्याच्याशी ती अदबीने बोलली,"हे जन्टलमन,मी तुझी काय सेवा करू शकते?"टाचा उंच करत जन्टलमन जॉन म्हणाला, "मला एक पलंग खरेदी करायचा आहे."


जॉनच्या आईने त्या विक्रेतीला डोळ्यांनी खुणावले.मग विक्रेतीने जॉनचे मतपरिवर्तन करून आईला आवडलेला पलंग घेण्यास भाग पाडले.


जॉन घरी आल्यावर उत्साहात म्हणाला,"डॅडी, डॅडी! वरती या आणि माझा पलंग पाहा."


वडिलांनी तो पलंग पाहिला,त्यांनी अत्यंत गोड शब्दात त्याची प्रशंसा केली आणि मुक्तपणे,सढळपणे स्तुती केली.


"बेटा तू आता हा बिछाना ओला करणार नाहीस,हो ना?" वडील म्हणाले.


"छे! छे! मुळीच नाही! मी हा बिछाना मुळीच ओला करणार नाही."जॉनने आपले वचन पाळले,त्याचे शब्द त्याच्या स्वाभिमानाशी निगडीत होते.आता तो मोठ्या पुरुषाप्रमाणे पायजमा वापरत होता.आता त्याला खरंच जन्टलमनसारखे वागायचे होते आणि त्याने तसेच केले.


आमच्या प्रशिक्षणवर्गात येणाऱ्या आणखी एका वडिलांची कथा ऐका.त्यांचे नाव के. टी. डशमॅन.ते टेलिफोन इंजिनिअर होते. त्यांची तीन वर्षांची मुलगी नाश्ता करताना कुरकुरायची.नेहमीचे रागावणे, मनधरणी करणे असे सगळे प्रकार करून झाले;पण व्यर्थ ! मग पालकांनी स्वतःलाच प्रश्न विचारला."नाश्ता करण्याची इच्छा तिच्या मनात कशी निर्माण करता येईल?"त्या चिमुकलीला आईची हुबेहूब नक्कल करायला खूप आवडायचे.नक्कल केल्यामुळे आपण मोठे झालो आहोत असे वाटायचे.म्हणून एके दिवशी त्यांनी तिला जेवणाच्या टेबलावर स्वतंत्र खुर्चीत बसवले.टेबलावर सगळे अन्न मांडले होते.तोच क्षण त्यांनी पकडला.वडिल टेबलाजवळ आले तेव्हा पेज चमच्याने ढवळत ती मुलगी म्हणाली,"डॅडी! मी आज सकाळी पेज बनवली."


तिने स्वतःच स्वतःसाठी दोन वेळा पेज बनवली.आज कोणालाही त्यासाठी आग्रह-आर्जवं करावी लागली नाही.तसे करण्यात तिला आनंद वाटत होता.तिला घरात खूपच महत्त्वाचे स्थान मिळाले होते.तिला तसे करण्यात स्वतःला व्यक्त करून आनंद मिळत होता.


विल्यम विंटर म्हणतो,"स्वतःला अभिव्यक्त करणे ही मानवी स्वभावाची सगळ्यात मोठी आवश्यकता आहे." आपण हीच मानसिकता व्यवसायात का नाही वापरत ? जर आपण आपल्या कल्पना लोकांच्याच आहेत असे त्यांना भासवले, तर त्या त्यांना खूप आवडतील आणि मग त्या नवीन कल्पनेला त्यांचा विरोध होणार नाही, कारण त्या त्यांना आपल्या वाटतील आणि मग त्यातून विधायक कार्य घडू शकेल.


लक्षात ठेवा : आधी समोरच्या माणसाच्या मनात त्या गोष्टीविषयी तीव्र इच्छा निर्माण करा,जी तुम्हाला तिच्याकडून अपेक्षित आहे.हे करू शकणाऱ्यासोबत सगळे जग असते अन् जो हे करू शकत नाही त्याचा मार्ग 'एकला चलो रे' असतो.


समोरच्या माणसाच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करा.


…समाप्त…!


मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,अनुवाद-कृपा कुलकर्णी,मंजुल प्रकाशन,९ सिध्दांत सांगणारे ३६७ पानांचे (प्रस्तावना सोडून ) आज संपले.आपल्या सर्वांचे जाहीर आभार व धन्यवाद..!