* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/11/26

एका महामानवाचे एक भव्य स्वप्न ! A grand dream of a great man!

वि. स. खांडेकर

त्यावेळी गांधीजी नुकतेच आफ्रिकेतून मायदेशी परतले होते.आपले गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांना भेटावे आणि त्यांच्या सल्ल्याने देशसेवेचा भावी कार्यक्रम निश्चित करावा असे त्यांनी ठरविले होते.पुण्याला गोखल्यांच्या भारत सेवक समाजात ते काही दिवस येऊन राहिले होते.त्यांचे अनवाणी चालणे,शेंगदाणे किंवा असलेच काही मोजके पदार्थ घेऊन भोजन करणे इत्यादी व्रतस्थ मनोवृत्ती दर्शविणाऱ्या गोष्टी कर्णोपकर्णी आम्हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कानांवर पडत होत्या.आश्चर्यमिश्रित आदराने आम्ही त्या ऐकत होतो. 'मासिक मनोरंजना'च्या त्यावेळच्या एका अंकात गांधी आणि कस्तुरबा यांचा फोटो प्रसिद्ध झाला होता.तो पाहून माझ्यासारख्या तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या मनात उठलेले वादळ चित्रित करणे मोठे कठीण आहे.त्या फोटोतले गांधी एका बाजूने त्यांचे जग आमच्या जगापेक्षा भिन्न आहे,याची जाणीव होऊन ते फार दूरचे वाटू लागत.

स्वातंत्र्ययुद्धाची सूत्रे हलविणारा अर्धनग्न सेनापती

पण एक गोष्ट निश्चित होती.छायाचित्रांतल्या अत्यंत साध्या पोषाखातल्या गांधींच्या मूर्तीने अनेक तरुणांच्या अंतरीची एक अनामिक तार छेडली होती.आजच्या मानाने त्या काळी सुटाबुटातला मनुष्य बराच दुर्मीळ होता.सुटाबुटाभोवती परकीय राज्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेचे एक झगझगीत वलय सदैव पसरलेले असे.हे सूटबूटमाहात्म्य एवढे मोठे असूनही बॅरिस्टर झालेला हा मध्यमवयीन मनुष्य इतका साधा पोषाख का करतो, नुसत्या साध्याच नव्हे तर जवळजवळ खेडवळ वाटेल अशा पेहरावात का वावरतो,हे कोडे त्यावेळी मी सोडविण्याचा प्रयत्न केला.पण मला ते सुटले नाही. मात्र काठेवाडी फेटा,बाराबंदीसारखा पायघोळ अंगरखा आणि जाडेभरडे टाचके धोतर अशा वेषातील गांधीजींची ती मूर्ती माझ्या मनावर कायमची कोरली गेली.

गांधीजींचा हा साधा वेषसुद्धा पुढे फार दिवस टिकला नाही.

लवकरच त्याचे रूपांतर खादीची पैरण,पांढरी टोपी आणि त्या सरंजामाला शोभेल असे धोतर या अतिसाध्या पोषाखात झाले.हाही अवतार अल्पकाळ टिकला आणि गांधीजी पुढे आमरण ज्या वेषात वावरले तोच छायाचित्रांनी आणि प्रतिमांनी जनमानसात अमर केला.डोक्यावर कसलेही शिरोभूषण नाही,गुडघ्याच्या खाली कसेबसे पोहोचेल असे पंचेवजा धोतर

आणि अंगावर एखादी चादर अथवा शाल याच वेषात भारतीय जनतेची अस्मिता जागृत करणारे नेते म्हणून आणि दोन तपांपेक्षा अधिक काळ स्वातंत्र्ययुद्धाची सूत्रे हलविणारे सेनापती म्हणून गांधीजी काम करीत राहिले.

गोलमेज परिषदेच्या वेळी गांधी इंग्लंडमध्ये गेले असताना बादशाहांनी त्यांच्या भेटीची इच्छा प्रदर्शित केली.राव-रंक सारेच गांधीजींचे मित्र.साहजिकच गांधींनी भेटीला जायचे मान्य केले.मात्र ज्याच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नव्हता,अशा राजाच्या भेटीला जातानासुद्धा आपल्या वेषात सूतभरही फरक करण्याचे त्यांनी नाकारले.

इंग्लंडमध्ये राजदर्शनाकरिता विशिष्ट प्रकारचा साहेबी पोषाख करण्याचा शिष्टाचार आहे.तो गांधींना समजावून सांगण्यात आला.पण "राजेसाहेबांची व माझी भेट व्हायची असेल तर ती माझ्या नेहमीच्या पोषाखातच होईल." असे गांधीजींनी निक्षून सांगितले. जेय देशातील एका 'अर्धनग्न फकिराच्या' भेटीसाठी बकिंगहॅम पॅलेसमधील शिष्टाचारांना तात्पुरती रजा देण्यात आली!सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याच्या वेषाशीं साम्य पावणाऱ्या पोषाखातच गांधीजी दीर्घ काळ वावरले. 

हा वेष त्यांनी का स्वीकारला हे इतिहासाने स्पष्ट केले आहे.

गांधीजींच्या सर्व चळवळींचा,साऱ्या शिकवणुकीचा आणि प्रयोगशील जीवनाचा केंद्रबिंदू सामान्य मनुष्याचे पुनरुत्थान करून त्याची भौतिक आणि आत्मिक उंची वाढविण्याची पराकाष्ठा - हाच होता.ज्याचे नाव उभ्या जन्मात वृत्तपत्रात येण्याचा संभव नाही,पण जो आपल्या वाट्याला आलेले जीवन जिद्दीने जगण्याची धडपड करीत आहे असा अनामिक सामान्य मनुष्य हे गांधीजींचे दैवत होते.त्या माणसाविषयी त्यांच्या अंतःकरणात अपार भक्ती भरली होती.तथाकथित राजकीय मुत्सद्दी किंवा मोठमोठे पंडित यांच्यापेक्षा त्यांचे आंतरिक आणि स्नेहपूर्ण नाते होते ते या अज्ञात सामान्य माणसाशी!

आफ्रिकेत गांधीजी झगडले,सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन लढले,ते याच सामान्य माणसावर होणारा अन्याय दूर व्हावा म्हणून! भारतांत अत्याचार या सामान्य माणसाच्या दुःस्थितीने व्यथित होऊनच त्यांनी त्याच्या उद्धाराचे कंकण हाती बांधले.चंपारण्यातला लढा, असहकारिता,खादीप्रचार,हरिजनसेवा,तिसऱ्या वर्गाचा प्रवास आणि भंगी वस्तीतला निवास या साऱ्या गोष्टी सामान्य माणसावरच्या त्यांच्या आत्यंतिकप्रेमाच्या निदर्शक होत्या.त्यांनी शेवटी स्वीकारलेला वेष हे त्यांच्या अंतरंगाच्या या उत्कट प्रेमाचे प्रतीक होते. 

'बुडती हे जन। पहावेना डोळा' असा सामान्य माणसाविषयीचा आपल्या अंतरीचा कळवळा तुकोबांनी व्यक्त केला आहे. सर्व संतांनीही आपल्या परीने ही अंतरीची व्यथा प्रकट केली आहे. सामान्य माणसाच्या दुःखाने त्यांची अंतःकरणे हेलावून जात असतील, हे काय कुणी कुणाला सांगायला हवे? पण संतांनी सामान्य मनुष्याची चिंता वाहिली ती मुख्यतः आध्यात्मिक दृष्टीने.विज्ञानविन्मुखतेच्या काळात वैराग्याचा वसा घेतलेल्या करुणावंतांना अन्य मार्ग सुचणे अशक्य होते

सामान्य मनुष्याच्या दररोजच्या हलाखीच्या जीवनात संतांनी सहसा लक्ष घातले नाही,किंबहुना ऐहिक जीवन हा,भारतातल्या काय किंवा अन्य देशांतल्या काय, साधुसंतांनी आपल्या चिंतनाचा प्रधान विषय कधीच मानला नाही.याला अपवाद असलेले रामदासांसारखे संत फार थोडे !

अन्याय,अज्ञान,अनीती व दारिद्र्य यांच्याविरुद्ध बंड

मात्र गांधीचे संतांशी एका बाजूने अगदी निकटचे नाते असले,तरी त्यांनी सामान्य मनुष्याच्या जीवनाचा जो विचार केला त्यात केवळ परलोकाला प्राधान्य नव्हते. माणसाला माणूस म्हणून या जगात जगविणे या ध्येयावरली त्यांची दृष्टी कधीच विचलित झाली नाही. गांधीजींच्या चिंतनात ऐहिक जीवनाच्या सर्व अंगोपांगांना स्थान होते.वैयक्तिक जीवनात यतिधर्मांचा पुरस्कार करणारे गांधीजी सामान्य मनुष्याच्या सर्व ऐहिक गरजांचा सूक्ष्म दृष्टीने विचार करीत असत.धर्मबुद्धी ही ईश्वर,अध्यात्म,परलोक इत्यादी गोष्टींशीच संबद्ध असलेली भावना नाही;सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनातही तिला स्थान आहे;आणि अन्याय, अज्ञान,अनीती व दारिद्र्य यांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारणे हे त्या धर्मबुद्धीचे परमपवित्र कर्तव्य आहे हे गांधींनी पंचविशीतिशीतच जाणले.

मानवी जीवन सुखी समृद्ध आणि सत्प्रवृत्त व्हावयाचे असेल तर दैनंदिन जीवनात धर्मबुद्धी सदैव जागरूक असली पाहिजे हे गांधींइतके सातत्याने आणि स्वच्छपणाने जगातील कोणत्याही राजकीय,सामाजिक वा आध्यात्मिक नेत्याने सांगितले नव्हते.

या नव्या धर्मबुद्धीची जाणीव गांधींच्या ठिकाणी किती प्रखर होती,याचे ते आफ्रिकेहून हिंदुस्थानात परत आले तेव्हाचे एक उदाहरण देण्याजोगे आहे - १९१६ च्या प्रारंभी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचा उद्घाटनसमारंभ होता.त्यात बोलण्याविषयी पंडित मालवीयांनी गांधींना निमंत्रण दिले.गांधींनी ते स्वीकारले.या समारंभाला बडेबडे संस्थानिक जुन्याकाळी स्वयंवराला जमत असत,त्याप्रमाणे नटून सजून आले होते! ता. ४ फेब्रुवारी १९१६ रोजी या समारंभात गांधी बोलले. या भाषणात त्यांनी अनेक ज्वलंत विचार प्रकट केले. "भाषा हे माणसाचे प्रतिबिंब आहे.

आपले विचार प्रकट करण्यास आपल्या भाषा जर असमर्थच असतील तर आपण जिवंत राहण्यापेक्षा मरून गेलेले बरे!" ही त्यातली एक ठिणगी! कागदी योजनेच्या बळावर आपण स्वराज्य मिळवू शकणार नाही,आपण स्वराज्याला पात्र ठरणार आहोत ते केवळ आपल्या कृतीच्या जोरावर.स्वराज्य मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना आपण आपल्यातील दोष काढून टाकण्याचा प्रयत्न कसोशीने केला पाहिजे" - दुसरा स्फुल्लिंग! पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत.ते पुढे म्हणाले, "काल या समारंभाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात हिंदुस्थान देशाच्या दारिद्र्याचा उल्लेख केला. इतर अनेक वक्त्यांनी या मुद्यावर विशेष भर दिला.पण व्हॉईसरॉयांच्या हस्ते कोनशिलासमारंभ झाला त्यावेळी आपल्याला मंडपांत कोणते दृष्य दिसले? मला तर मंडपांत हिऱ्या-मोत्यांचे व जड जवाहिऱ्यांचे एक जंगी प्रदर्शन भरल्याचा भास होत होता.असले मौल्यवान दागिने घालून मिरविणाऱ्या संस्थानिकांना व सरदार दरकदाराना पाहून माझ्या मनात विचार आला की त्यांनी आपल्या अंगावरील हे दागिने देशबांधवांना देऊन टाकले नाहीत तोपर्यंत त्यांचे दारिद्र्य दूर होणार कसे? ब्रिटिश हिंदुस्थानात किंवा एखाद्या संस्थानात एखादा राजवाडा अथवा टोलेजंग इमारत उभारण्यात येणार असल्याची वार्ता माझ्या कानावर आल्याबरोबर माझ्या मनात पहिला विचार येतो स्वतः आपल्या शेतकऱ्याला लुबाडीत आहोत किंवा इतरांना लुबाडू देत आहोत तोपर्यंत तो हा की "अरेरे! हा सारा पैसा शेतकऱ्याकडून लुबाडण्यात आलेला आहे. आपण आपली स्वराज्याची तळमळ खरी आहे असे मुळीच म्हणता येणार नाही."

हरिजनांच्या दुःखाची समस्या

सामान्य मनुष्याविषयी गांधींना वाटणारे हे उत्कट ममत्व केवळ बौद्धिक,भावनिक अथवा व्यवहारिक स्वरूपाचे नव्हते.त्यात पुढारीपणाचा अभिनिवेश अथवा स्वप्नाळू करुणेचा लवलेश नव्हता.पुढारी होणाऱ्या मनुष्याला समाजाविषयी आपुलकी वाटते; मात्र, “ऐसी कळवळ्याची जाती। लाभाविण करी प्रीती।" या तुकारामांच्या कसोटीला तो सहसा उतरत नाही. ज्याच्या अंगी उपजत कळवळा नसतो, त्यालाही त्याचे शक्य तेवढे नवरसपूर्ण नाटक करावेच लागते. त्याशिवाय त्याचे सामाजिक स्थान स्थिर होत नाही आणि सुरक्षित राहत नाही.अशा विविध बुद्धिवान आणि कर्तृत्ववान लोकांपैकी एखाद्याने व्यक्त केलेला कळवळा अब्राहम लिंकन,मोहनदास गांधी किंवा मार्टिन ल्यूथर किंग यांच्याप्रमाणे अंतरंगातून उचंबळून आलेला स्त्रोत असत नाही.पंडिताने बुद्धिकौशल्याने सुलभ पद्यरचना करावी तसे पुढाऱ्यांचे बोलणे,चालणे आणि वागणे वाटते.हृदयाच्या हृदयातून निघालेल्या काव्याशी तुलना केली की ती पद्यरचना कृत्रिम,नाटकी आणि निर्जीव वाटू लागते.

या बाबतीत गांधीजी बड्याबड्या नेत्यांहून सर्वस्वी भिन्न होते.आपली मुले अर्धपोटीच झोपी गेलेली पाहून अंथरुणावर तळमळत पडणाऱ्या माउलीप्रमाणे भारतात सर्वत्र पसरलेल्या कोट्यवधी दलित,पीडित आणि वंचित जनतेविषयी त्यांचे मन अष्टौप्रहर चिंतन करी.त्यामुळे राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अधिक समर्थ कशी करता येईल या एकाच विचाराने त्यांचे मन संपूर्णपणे कधीही व्यापून टाकले नाही.राजकीय आंदोलनांच्या धुमश्चक्रीतच आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाला पोषक अशा अनेक चळवळी त्यांनी सुरू केल्या. हरिजनसेवा ही त्यांतलीच एक फार महत्त्वाची प्रवृत्ती. राजकीय व्यासपीठावरून

पूर्वीच्या कुणाही पुढाऱ्याने हरिजनांच्या दुःखांचा आणि समस्यांचा इतक्या मूलग्राही पद्धतीने आणि अथांग आपुलकीने विचार केला नव्हता.पण शतकानुशतके अन्यायाला बळी पडलेल्या या दलित समाजाचा कैवार घेऊन गांधीजी पुढे सरसावले आणि कामाला लागले. सामान्य मनुष्याविषयी त्यांना वाटणारी ही आत्मीयता भारताच्या सामाजिक इतिहासात अपूर्व होती.

अपर्णादेवीच्या सिद्धार्थाची गोष्ट

बनारस हिंदू युनिव्हर्सिटीतल्या भाषणाप्रमाणेच त्यांची दुसरी एक आठवण सांगण्याजोगी आहे व चित्तरंजनदास यांच्या कन्या श्रीमती अपणदिवी यांनी डॉ. सुनीतीकुमार चटर्जी यांना सांगितलेली ही आठवण अशी आहे.

अपणदिवीचा पहिला मुलगा सिद्धार्थ.देशबंधुदास हे त्याचे आजोबा.त्यांनी आपल्या लाडक्या नातवाला नाना प्रकारच्या मौल्यवान अलंकारांनी नटविले होते.एकदा गांधीजी दासबाबूंना भेटावयाला त्यांच्या घरी आले. अपणदिवीनी आपल्या लाडक्या लेकाच्या अंगावर सारी बाळलेणी चढवली आणि गांधीजी व कस्तुरबा यांच्या आशीर्वादासाठी त्याला बाहेर आणले.गांधींनी सिद्धार्थाला वात्सल्याने उचलून घेतले.त्याच्याकडे पहात ते उद्‌गारले, "लहान मुलांच्या सौंदर्याबाबत कुणाला काही कळत नाही हेच खरे," एवढे बोलून त्यांनी सिद्धार्थाला जवळच्या पलंगावर ठेवले आणि त्यांच्या अंगावरून एक एक दागिना उतरविण्याला सुरुवात केली.हे पाहून आपली नापसंती दर्शवीत कस्तुरबा उदगारल्या, "हे काय चालविलंय तुम्ही? या गोड बाळाच्या अंगावरले दागिने काढून टाकणे किती निष्ठुरपणाचे आहे ! छे! त्याच्या अंगावरच राहू देत ते," गांधीजी हसत उतरले,"मी काय करतोय हे तुला समजलेलं दिसत नाही;जरा स्वस्थ बैस आणि नीट पहा."

शेवटी सिद्धार्थाच्या अंगावर एकही दागिना उरला नाही. मग त्याच्याकडे पाहत गांधीजी म्हणाले,"आता किती सुरेख दिसतो हा ! जणू काही एखादा राजपुत्रच!" मग अपणदिवीकडे वळून ते उद्गारले, "हे सारे दागिने या मुलाच्या नावाने देणगी म्हणून मी हरिजन कार्याकरिता स्वीकारीत आहे.अपर्णा,आता तुझी दागिन्याची पेटी आण पाहू." अपणदिर्वीच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पण त्या मुकाट्याने आत गेल्या आणि आपल्या दागिन्याच्या दोन पेट्या आणून त्यांनी गांधीजींच्या पुढे ठेवल्या.गांधीजींनी त्या पेटीतले सर्व दागिने पाहिले. त्यांतले काही मोठे नग निवडून,त्यांनी त्यांचे वजन आजमावले.मग ते दागिने आपल्यापाशी ठेवून ते म्हणाले, "अपर्णा,तू एका मोठ्या मनुष्याची मुलगी आहेस.हरिजनकार्याला मदत म्हणून तुझे हे दागिने मी घेत आहे.मला तुझं वचन हवंय.मी घेतलेल्या दागिन्यांच्या ऐवजी पुन्हा असले दागिने तू करवून घ्यायचे नाहीस.आहे

कबूल?" अपणदिवींनी तसे वचन दिले;ते दिल्यावर "आपल्या मनावरला एक फार मोठा अनामिक भार नाहीसा झाला,"असे अपणदिवींनी नमूद करून ठेवले आहे.

सामान्य माणसाची भौतिक प्रगती आणि आत्मिक जागृती

दलित,पीडित आणि वंचित मानवतेबद्दल वाटणारे उत्कट ममत्व हा गांधीजींच्या आत्म्याचा स्थायिभाव होता.त्यामुळे आफ्रिकेत काय किंवा भारतात काय, त्यांनी ज्या ज्या चळवळी आणि उपक्रम केले त्यांचे त्यांचे मध्यवर्ती सूत्र एकच होते.उपेक्षित आणि वंचित सामान्य मनुष्याचा उद्धार !

भारतीय स्वातंत्र्यांच्या चळवळीचे दोन तपांहून अधिक काळ त्यांनी नेतृत्व केले;पण राजकीय स्वातंत्र्य हे त्यांच्या दष्टीने अंतिम साध्य नव्हते;या देशातल्या सामान्य मनुष्याचा सामाजिक,आर्थिक आणि सांस्कृतिक पुनर्जन्म घडवून आणण्याचे ते एक समर्थ साधन होते.मात्र हे सर्वस्पर्शी परिवर्तन केवळ बाह्य बदलांनी होणार नाही,सामान्य माणसाची सुप्त आंतरिक शक्ती जागृत व वृद्धिंगत करून तिच्या सहाय्याने हे परिवर्तन घडवून आणले पाहिजे,याचा त्यांना कधीच विसर पडला नाही.सर्व प्रकारच्या आत्यंतिक विषमतेमुळे सत्ताधाऱ्यांच्या,उच्चवर्णीयांच्या आणि धनसंपन्नांच्या पायदळी तुडवला जाणारा मनुष्य तसाच राहू नये म्हणून त्यांनी या सर्वांची पावले जशी रोखून धरली,तशी धुळीत पडलेल्या दुर्बल दलितांना स्वतःच्या हातांनी उठवून त्यांच्या अंगावरील धूळ त्यांनी झटकून टाकली;ताठ मानेने इतरांच्यापुढे उभे राहण्याची त्यांना दीक्षा दिली.भारतीय समाजातल्या अगदी तळाच्या मनुष्यालाही निर्भय,स्वावलंबी आणि जीवनसन्मुख करण्याचे जेवढे निकराचे प्रयत्न गांधींनी केले,तेवढे अन्य कोणीही केले असतील असे वाटत नाही.सामान्य माणसाच्या आत्मबलावर साचलेला राखेचा थर दूर व्हावा,त्या राखेखाली विझत चाललेला स्फुल्लिंग मुक्तपणे चमकावा,त्या ठिणगीला ज्ञानाचे आणि चिंतनाचे वारे लागावे आणि हळूहळू फुलून तिच्यातून खरीखुरी माणुसकी असलेला आणि हक्क व कर्तव्य यांची सारख्याच भक्तिभावाने उपासना करणारा नवमानव निर्माण व्हावा ही गांधीजींची अंतरीची तळमळ होती.केवळ भौतिक समृद्धी माणसास समाधानी ठेवू शकणार नाही हे त्यांनी ओळखले होते. म्हणून एका बाजूने सामान्य मनुष्याच्या भौतिक प्रगतीसाठी आणि दुसऱ्या बाजूने त्याच्या आत्मिक जागृतीसाठी गांधीजी सतत धडपडत राहिले.

एका महामानवाचे ते भव्य स्वप्न होते !

ही धडपड पिढ्यान् पिढ्या चालू राहणे आवश्यक होते. कारण हा काही केवळ क्रांतीने आणि कायद्यांनी नवा समाज घडविण्याचा प्रयत्न नव्हता.दानव बदलू शकतो, त्याच्यातले पशुत्व पुन्हा वर डोके काढणार नाही,असे परिवर्तन त्यांच्यात होऊ शकते,दुर्दम्य श्रद्धेने प्रेरित झालेल्या एका महामानवाचे ते भव्य स्वप्न होते. 

असल्या स्वप्नांच्या साक्षात्काराने झपाटलेली माणसे इतिहासाला अज्ञात नाहीत.आपले स्वप्न सत्यसृष्टीत उतरावे म्हणून ही जगावेगळी माणसे जीवाचे रान करतात.गांधीजींनीही आयुष्यभर तेच केले पण आजच्या सर्वसामान्य मनुष्याकडे आपण पाहू लागलो तर गांधीजींनी वर्षानुवर्षे उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला दिसतो! गांधीजींच्या स्वप्नातला तो माणूस आज भारतातून अदृश्य झाला आहे!

आचार्य दादा धर्माधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी एका व्याख्यानात 'गांधीजी ज्याचे राष्ट्रपिता होते ते राष्ट्र आज कोठे आहे?" असा परखड प्रश्न विचारला होता. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत या दुःखद प्रश्नाचे प्रतिध्वनी पावलोपावली ऐकू येत आहेत.ब्रिटिश सिंहाच्या गर्जनेला भीक न घालणारा भारतीय सामान्य मनुष्य आज नाना प्रकारच्या जुन्या नव्या गंडांनी ग्रासला गेला आहे.त्याला जशी मध्यान्ह काळाची चिंता भेडसावते,तशी आपल्या कच्च्याबच्यांच्या भवितव्याची काळजीही बेचैन करते.पारतंत्र्याच्या काळात ताठ मानेने तुरुंगात पाऊल टाकायला शिकलेला हा माणूस आज स्वराज्यात हुजरेगिरी आणि मुजरेगिरी,भ्रष्टाचार आणि काळाबाजार यांच्याशिवाय आपल्या स्थैर्याला दुसरा आधार नाही असे मानण्याइतका भ्रांतचित्त झाला आहे. टिळक-गांधीजींच्या काळात त्याच्या मनात लुकलुकणारी देशभक्ती आज विझून गेली आहे.त्याग आणि सेवा हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देव्हाऱ्यातले देव होते;पण आज त्यांची किंमत दगडापेक्षा अधिक राहिलेली नाही!

चार तपांपूर्वी दरमहा हजारो रुपये कमावणाऱ्या बॅ.चित्तरंजन दासांसारख्या कायदेपंडितांनी गांधीजींनी कोर्टावर बहिष्कार घालण्याचा आदेश देताच आपली वकिली सोडून दिली.ही गोष्ट आजच्या विशी-पंचविशीतल्या तरुणांना स्वप्नातले राज्यदानाचे वचन खरे करणाऱ्या हरिश्चंद्राच्या कथेइतकीच पौराणिक वाटली तर त्यात नवल कसले ?

१९२० ते १९४७ हा गांधीजींच्या भारतातील कर्तृत्वाचा कालखंड,त्याची समाप्ती स्वराज्यप्राप्तीने झाली.पण या कालखंडात गांधीजींनी सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जे चैतन्य निर्माण केले होते,जी सामाजिक धर्मबुद्धी जागृत केली होती,तिची स्थिती गेल्या वीस वर्षांत विझत चाललेल्या यज्ञकुंडाप्रमाणे झाली आहे.या कुंडातली राख अजून थोडी ऊन आहे,अधूनमधून ती अंगारा म्हणून लोकांना देता येते,एवढ्यावर बडी बडी माणसे संतुष्ट आहेत!

गांधी नावाचे महात्मा,संपादक रॉय किणुकर,साहाय्यक- अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन्स..

ते चैतन्य आज अस्तित्वात आहे काय ?

शालिवाहनाने मातीच्या बाहुल्यातून लढवय्ये सैनिक निर्माण केल्याची लोककथा आहे.तिचा साक्षात्कार १९२० नंतरच्या काळात भारताला झाला.पोलिसाला घाबरणारी माणसे निधड्या छातीने.

उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…!!