* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सर्वोत्तम देणगी / Best gift

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/9/26

सर्वोत्तम देणगी / Best gift

अखेर,ओतप्रोत जीवन जगलं,तर तीच खुद्द एक सर्वोत्तम देणगी असते.

चेहऱ्यावर गोंधळलेला भाव असलेला,असा जेसन मागे वळला आणि म्हणाला,मिस्टर हॅमिल्टन,तुम्ही कशाबद्दल बोलताय,मला कळत नाहीये.रेड आजोबांनी सांगितलेले बाराही देणगीचे धडे आपण केले,आणि ते म्हणाले नाही का तेव्हा,की हा शेवटचा महिना ?" मी उत्तर दिलं,"हे बघ,मी रेड स्टीव्हन्सचा मुखत्यार आणि त्याच्या संपत्तीचा कार्यकारी व्यवस्थापक आहे,त्याच्या मृत्युपत्राप्रमाणे एक देणगी त्यातून मिळेल.पण त्यासाठी सर्व अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.सगळ्या अटींचा एकटा निर्णयकर्ता या नात्याने मी तुला सांगू शकतो की सर्व अटी अपेक्षेबाहेर पूर्ण झाल्या आहेत."

जेसन गोंधळलेला दिसत होता.तो म्हणाला, "तुम्ही कशाबद्दल बोलताय ते मला कळतच नाहीये...."

मिस् हेस्टिंग्ज मध्येच बोलली,"मला ठाऊक आहे की, तुला वाटलं असेल की,तुझ्याकडून सगळं झालंय.तू माझ्यामागून कॉन्फरन्स रूममध्ये आलास तर सगळ्याचा तुला नक्कीच उलगडा होईल."

आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये गेलो,आणि थोड्या वेळातच रेड स्टीव्हन्स पुन्हा एकदा व्हिडियो पडद्यावरून आमच्याशी बोलायला लागला.तो म्हणाला,"जेसन,मला तुझा किती अभिमान वाटतो हे तुला सांगायचंय.तुझ्यासाठी मी जी सर्वोत्तम देणगीची योजना करून ठेवली तिची प्रत्येक मागणी तू पूर्ण केलीयेस,आणि तिचा प्रत्येक भाग तुला मिळालाय. तुला जशा आयुष्यात एवढ्या लवकरच्या टप्प्यात सगळ्या बारा देणग्या मिळाल्या,तशा त्या मला मिळायला हव्या होत्या.आता तुला सर्वोत्तम देणगी मिळाली आहे.तुला ती केवळ उपभोगायची नाही तर, प्रत्येक देणगीचा व्यवस्थित तोल राखत जबाबदारीनं तुझं आयुष्य जगायचं आहे.तेव्हा शक्य होईल तेव्हा,ही देणगी दुसऱ्याला सुपूर्द करायची आहे,ही तुझी आणखी एक जबाबदारी असेल.

"तुझ्या आयुष्यात व्हायच्या अशा कौतुकास्पद गोष्टी केवळ बघायला मी नं,तुझ्याबरोबर असायला हवं होतं रे,पूर्ण येन केन प्रकारेण,माझ्या स्वतःच्या पद्धतीनं मला वाटतं मी असेन तुझ्यासोबत.

"जेसन,मी आयुष्यात खूप गोष्टी केल्या,पण त्यातली सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे ही सर्वोत्तम गोष्ट तुला सुपूर्द करणं.कृपा करून मला शरम वाटेल असं कांही करू नकोस.ही देणगी वाढती आणि फलदायी कर.तुला जी सर्वोत्तम देणगी मिळाली आहे,त्या देणगीमुळे तुझं आयुष्य विस्तारू दे.हे सगळं तू केलंस म्हणजे,तू मला तुझ्या पद्धतीनं त्या सर्वोत्तम देणगीची माझ्यासाठी भर केल्यासारखं होईल.'

रेड स्टीव्हन्सची प्रतिमा मावळली.आता ही शेवटचीच वेळ होती.दिवे लावून उजेड झाला.जेसननं जागच्याजागीच एक उडी मारली.

आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासपूर्ण भाव ठेवून बोलला,"मी हे करणारच ! सर्वोत्तम देणगीच्या प्रत्येक भागाचा उपयोग करणार.मी एक वर्षापूर्वी जसा होतो,तसे जे लोक आहेत,त्यांना कुठल्या पद्धतीनं हे द्यायचं,हे मी शोधून काढीन.

मला कल्पनाच नव्हती,एखाद्याला सर्वोत्तम देणगी काही द्यायची तर,त्यांच्यापाशी आधीपासूनच ज्या उत्तमोत्तम गोष्टी आहेत त्याची त्यांना जाण आणि जाणीव आणून द्यायची असते."

जेसन पुन्हा एकदा दाराकडे वळला आणि मी त्याला थांबवून म्हटलं,"भल्या माणसा इतक्या घाईनं कधी कोणाला जातांना कधी पाह्यलं नाही मी."

तसेच चेहऱ्यावर गोंधळलेले भाव असलेला जेसन मागे वळला आणि म्हणाला,"सॉरी,मिस्टर हॅमिल्टन,मला वाटलं..

मी मध्येच अडवत म्हणालो,"मला ठाऊक आहे,तुला वाटलं,आटपलं आहे सगळं,तू जर नीट मागे रेलून बसलास तर,मी माझं रेड स्टीव्हन्सच्या मृत्युपत्राच्या संबंधातलं शेवटचं काम करतो."

मिस हेस्टिंग्जनं कागदपत्रांचा मोठा गठ्ठा दिला,आणि मी त्यातल्या योग्य कागदाकडे वळलो.मी माझा वाचायचा चष्मा खिशातून काढत होतो,तेव्हा जेसन पुटपुटला, "मला तर वाटलं..."

मी खोटंखोटं रागावत त्याला अडवत बोललो,"तुला सांगतो,नियुक्त केलेला मुखत्यार जेव्हां त्याचं अखेरचं काम करता असतो,तेव्हा त्याला मध्येच रोखू नये."

मिस् हेस्टिंग्ज हसून म्हणाली,"खास करून मुखत्यार जेव्हा ऐंशी वर्षाचा असतो तेव्हा".

आम्ही सगळे हसलो आणि मी दस्तऐवजातून वाचू लागलो,"आणि मी माझा पुतण नातू जेसन स्टीव्हन्स याला धर्मादाय न्यासाच्या निधीचा नियंत्रक म्हणून नेमतो.त्याची वर्तमानातली किंमत पाच हजार दशलक्ष डॉलरच्या थोडी वरतीच आहे.माझ्या पुतणनातवाने जीवनाच्या सर्व क्षेत्रात जबाबदारीची जाणीव आणि कर्तबगारी सिद्ध केली आहे.त्याला या धर्मादाय न्यासाच्या निधीचा एकट्याला पूर्ण ताबा मिळेल.या न्यासास रेड स्टीव्हन्सचं मुलांसाठी असलेलं आसरा-घर, रेड स्टीव्हन्सच्या वाचनालयाचा उपक्रम,निरनिराळ्या

शिष्यवृत्तींची योजना, रुग्णालयं आणि इतर पुष्कळशा महत्त्वाच्या संस्थांचा समावेश होतो.

"मी जेसनला सर्वोत्तम देणगीधारक म्हणून असं सांगतो की,त्यानं मिळालेलं शहाणपण आणि मिळालेला अनुभव यांचा उपयोग या योजनांचं काम करतांना करावा आणि अशा योजना,ज्या त्याला महत्वाच्या वाटतील,त्या योजनाही त्यानं कराव्यात."

पूर्णपणे बेसावध असलेला जेसन खुर्चीत मागे रेलून बसला होता.बोलायला अडखळत सुरूवात करत शेवटी तो म्हणाला,"या सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणाखाली असणार असं तुम्हाला म्हणायचंय का ?"

मी त्याच्याकडे औपचारिकपणे पाह्यलं आणि तशाच सुरात बोललो,

"मी जो दस्तऐवज वाचतोय,त्यावरून तसंच वाटतंय. वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी आणि शिवाय तुझ्या मते जे काही महत्त्वाचं आहे,त्या सगळ्याचा कार्यभार तुझ्याकडे आहे."

जेसनचा चेहरा उजळला.त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.त्यानं मिस हेस्टिंग्जकडे बघून परत माझ्याकडे पाहिलं,म्हणाला,"सर्वोत्तम देणगी जगभर पोचवण्यासाठी मी या धर्मादाय निधीतला काही भाग वापरणार."

मिस् हेस्टिंग्जनं उत्तर दिलं,"माझं ठाम मत आहे की रेड स्टीव्हन्सच्या मनात एवढा काळ हीच गोष्ट असली पाहिजे."

जेसननं पुन्हा आम्हा दोघांना मिठी मारली,खूप धन्यवाद दिले,आणि तो निघून गेला.

कॉन्फरन्स रूममध्ये मिस् हेस्टिंग्ज आणि मी यश आणि आनंद यात तुडुंब बुडलो होतो.एका वर्षात जेसनमध्ये जे विस्मयजनक परिवर्तन झाले होते त्याचा आनंद दोघांना वाटत होता.

शेवटी,नेहमी कार्यतत्पर असणारी मिस् हेस्टिंग्ज तिची दिवसभराची खूप सारी कामं करायला कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडली.मी कॉन्फरन्स रूममध्ये एकटाच उरलो.मला मोह आवरला नाही,आणि मी रेड स्टीव्हन्सची शेवटचा निरोप असणारी व्हिडिओ टेप काढून पुन्हा एकदा पाहू लागलो.

ती संपल्यावर मी त्या रिकाम्या पडद्याला उद्देशून बोललो,"वा मित्रा,आता नक्कीच सरतेशेवटी आपला सहवास संपला.सर्वोत्तम देणगी कार्यक्रमात तू माझा समावेश केल्याबद्दल मला किती धन्य वाटतंय ते तुला सांगावसं वाटतंय,आणि जेसननं ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आणि करणार आहे त्यापण तुला सांगाव्याश्या वाटताहेत."

कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडतांना मला ठाऊक होतं की रेडला हे कळलं असणार आणि त्याच्या स्वतःच्या पध्दतीने जेसन बाहेर कसा रहातोय आणि सर्वोत्तम देणगी कशी देतोय हे पण पहात असणार.

लेखक-परिचय

जिम् स्टोव्हॅल अंध असूनही राष्ट्रीय ऑलिंपिक दर्जाचा वेटलिफ्टर आहे.एक यशस्वी गुंतवणूक-ब्रोकर आहे, आणि एक उत्तम परिचालक (आंत्रप्रनर) आहे.नॅरेटिव्ह टेलिव्हिजन नेटवर्कचा तो अध्यक्ष आणि सहसंस्थापक आहे.आपल्या देशातल्या तेरा दशलक्ष अंध आणि अधू दृष्टीच्या लोकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी या संस्थेचे आणि दूरदर्शनचे कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात.मुळात अंध आणि अधू दृष्टिच्या लोकांसाठी बनवलेले असले तरी,एल.टी.एन.चा देशभर प्रेक्षकवर्ग साठ टक्के असा आहे की,ज्यांना पूर्ण दृष्टि आहे,त्यांना केवळ कार्यक्रमांमध्ये रस वाटतो.

जिम् स्टोव्हॅल "एन्.टी.एन्. शोकेस" या कार्यक्रमाचा यजमान आहे.त्याच्या पाहुण्यांमध्ये कॅथरिन हेपबर्न, जॅक लेमन,कॅरेल चॅनिंग,स्टीव्ह अ‍ॅलन आणि एडी अ‍ॅल्बर्ट यांसारख्या इतरांचा समावेश आहे.नॅरेटिव्ह

टेलिव्हिजन नेटवर्कला एमि अ‍ॅवॉर्ड आणि इंटरनॅशनल फिल्म अँड व्हिडिओ अ‍ॅवॉर्ड यांखेरीज कित्येक या क्षेत्रातले सन्मान मिळाले आहेत.

अमेरिकेत बाराशे केबल वाहिन्या आणि प्रक्षेपण केंद्रे यांच्या मार्फत पस्तीस दशलक्ष लोकांपर्यंत एन्.टी. एन्. पोचलेली आहे.याखेरीज इतर अकरा देशांमध्ये एन्.टी. एन्.दाखवतात.

एन्.टी.एन्.कार्यक्रम नॅरेटिव्ह टीव्ही. कॉम.या संकेतस्थळावरून इंटरनेटवरून जगातले लाखो लोक बघू शकतात.

यू.एस्.ज्युनिअर चेंबर ऑफ कॉमर्सने "दहा विशेष महत्त्वाचे तरूण अमेरिकन्स" निवडले.त्यांत वॉल्ट डिस्ने,ओर्सन वेल्स,चार अमेरिकन अध्यक्ष यांच्या पंक्तीत जिम् स्टोवेलची निवड केली."गुड मॉर्निंग अमेरिका"आणि सी.एन्.एन्.यावर तो दिसला आहे. रीडर्स डायजेस्ट,टी. व्ही. गाईड,आणि टाइम मासिकात त्याच्यावरचं लेखन आलं आहे.यापूर्वीच्या त्याच्या पुस्तकांची नांव अशी - यु डोन्ट हॅव टु बी ब्लाइंड टु सी, सक्सेस सीक्रेट्स ऑफ सुपर अचीव्हर्स आणि द वे आय सी द वर्ल्ड, तसंच त्याचं अगदी अलिकडलं पुस्तक 'द अल्टिमेट गिफ्ट'.अध्यक्षांची कमिटी ऑन ईक्वल ऑपर्च्यूनिटी यांनी जिम् स्टोव्हॅलची एकोणिसशे सत्त्याण्वचा उत्तम परिचालक म्हणून निवड केली. जून दोन हजारामध्ये जिम् स्टोव्हॅलला इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन अ‍ॅवॉर्ड मिळालं आणि तो माजी अध्यक्ष जिमी कार्टर,माजी प्रथम स्त्री नॅन्सी रीगन आणि मदर टेरेसा या दिग्गजांच्या रांगेत बसला.

सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,

डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर

EMBASSY BOOK DISTRIBUTORS

सर्वोत्तम देणगी.१५ प्रकरणव १२६ पानांचे हे पुस्तक आज संपले. आपल्या सर्वांचे शतशः आभार व धन्यवाद.