* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: दाखवण्यापुरती आधुनिकता/ Modernity for Show.

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

8/14/26

दाखवण्यापुरती आधुनिकता/ Modernity for Show.

एक गोष्ट बरी म्हणायची की, प्रत्येक जण स्वतःला ‘विज्ञानवादी’ समजत असतो. (‘सुरक्षित भविष्या’ची विक्री करणाऱ्या तमाम बुवा, कुडमुडे यांचीसुद्धा ‘तशीच’ धडपड असते.) तसेच प्रत्येकाचा आपण ‘आधुनिक’ असल्याचा दावा असतो. गंडेदोरे व खडे यांनी मढून गेलेल्या वेगेवेगळ्या क्षेत्रांत चमचमणाऱ्या व्यक्तींचा ‘तसा’ अट्टहास असतो. अशा ‘भास आभासाच्या’ पर्यावरणातून बाहेर पडले तर आधुनिकता उमजून घेता येते.

प्रो. डॉ. दिपंकर प्रो. गुप्ता ‘मिस्टेकन आयडेंटिटी, इंडिया बिटविन वर्ल्डस’ हार्पर कॉलिन्स प्रकाशन, ग्रथांचिया द्वारी, जग बदलू पाहणाऱ्या विचारांची यात्रा, अतुल देऊळगावकर, प्रकाशक-विश्वकर्मा पब्लिकेशन.

कधी काळी वेद हे अपौरुषेय मानल्यामुळे त्यांच्याविषयी काहीही बोलायचे नाही, ‘वेद हेच प्रमाण’ असा दंडक होता. ख्रिश्चन, पारशी, ज्यू, मुस्लीम या सर्व धर्मसत्तांनी मुकाट जनतेला मुकाट राहण्याचा आदेश दिला होता. प्रश्न विचारणाऱ्या वा नवीन उत्तरे शोधणाऱ्या वैज्ञानिकांना मृत्युदंड सोसावा लागला.

औद्योगिक क्रांतीनंतर राजसत्तेवरील धर्मसत्तेचा लगाम निसटत गेला. विज्ञानामुळे सृष्टीचे आकलन होऊ लागले. युरोपातील घडामोडी वेगवान होत्या. आज तिथे कुणीही, कुणावरही, काहीही बोलू वा लिहू शकतो. आपण विचारांची चिकित्सासुद्धा नाकारतो. महापुरुषांच्या नावाने ‘स्वतःची दुकानदारी’ चालवतो. आपल्या अस्मिता वरचेवर अतिशय नाजूक होत चालल्या आहेत. मुद्दे बाजूला ठेवून गुद्द्यांवर येण्याचे प्रमाण वाढतच जातेय. ही दांडगाई कुठल्या काळातली म्हणता येईल? आणि त्याची कारणे कोणती? प्रेमविवाह करणाऱ्या तरुणींचा बळी, हुंडाबळी, लैंगिक छळ, सार्वजनिक ठिकाणी होणारी हिंसा, अशा असंस्कृत कृत्यांमागील मानसिकता ही मध्ययुगातील असते. आक्रमकतेला, हिंस्रतेला आधुनिकतेचे प्रतीक ठरवले जाते. (जाहिरातींतून व चित्रपटांतून हा खास संदेश दिला जातो.) बारकाईने पाहिल्यावर लक्षात येईल की, यांपैकी कोणतीही बाब आधुनिक नाही. ते भूतकाळातील सरंजामी मनोवृत्तीचे अवशेष आहेत. खियांवरील अत्याचारांचे, घराण्याचे व नात्यांचे प्रदर्शन आणि प्रचलित नियमांना नकार ही त्याची लक्षणे आहेत.

आधुनिकता ही लहान बाळाच्या पावलाने येत असते. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत रुढी आणि परंपरा खोलवर रुजलेल्या भारतासारख्या खंडप्राय देशात ती आणखी मंद गतीने येते. समाजातील स्तरीकरणाला कर्मकांडाचे अधिष्ठान लाभल्याने जातिभेदांवर आधारलेली रचना उभी राहिली. जातीच्या स्तरीकरणाबाबतीत पारंपरिक भारताचा हात इतर कुठलाही देश धरू शकणार नाही. त्याचे परिणाम आजही जाणवतात. औद्योगिकीकरण व लोकशाहीमुळे बराच फरक पडला असला, तरीही अजून बरीच मजल गाठावी लागेल. प्रगतीची फळे परंपरेने चालत आलेल्या अभिजनांपुरतीच मर्यादित राहिली. सत्ताधारी बदलत गेले; परंतु पारंपरिक मूल्यांचा वारसा तसाच पुढे चालत राहिला. भारताचे शतखंडित स्वरूप ही त्याची परिणती आहे. एकसंधता नसल्याने विकासाचे प्रश्न जटिल होत आहेत. आर्थिक समस्यांमागे सामाजिक पैलू आहे. भारतासारख्या देशात आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती आणण्यासाठी विशेष व अथक प्रयत्न आवश्यक आहेत. त्याकरिता आधुनिकता म्हणजे काय? तिचे पुरस्कर्ते व विरोधक कोण व का असतात? समाजशास्त्रज्ञ प्रो. डॉ. दिपंकर प्रो. गुप्ता यांनी ‘मिस्टेकन आयडेंटिटी इंडिया बिटवीन वर्ल्डस’ ह्या पुस्तकातून आधुनिकतेस बाधक ठरणाऱ्या प्रथा व परंपरांचे सविस्तर विश्लेषण केले आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्याकडे आधुनिकता अनायासे आली. त्या आधीपासून देशातील सुधारक अथक झटत होते. आगगाडी आल्यावर प्रवासाला गती आली, सोय झाली. आगगाडी टाळता येत नव्हती. शेजारी निवडता येत नव्हता. साहजिक, प्रवासात कोणत्याही जातीचा शेजारी खपवून घेणे भाग पडले. नागरीकरणाच्या प्रक्रियेत सार्वजनिक वावर असलेल्या ठिकाणी जात-पात बाळगणे अशक्य झाले; पण जात काही मनातून जाता जात नाही. भारतातील आधुनिकता ही नवनव्या तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे आणि शहरीकरणामुळे लादलेली आहे. म्हणूनच तंत्रज्ञानाची उपकरणे वापरणे असा सुलभ अर्थ लावून आधुनिकतेकडे सर्रास पाहिले जाते. वास्तविक, आधुनिकता ही मनोवृत्तीशी निगडित आहे. सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या वर्तनातून व सामाजिक संबंधांतून ती व्यक्त होते.

‘आधुनिक’ समाजाची चार ठळक वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतात. वैयक्तिक प्रतिष्ठा, सार्वत्रिक निकष, जन्मामुळे वैयक्तिक विशेषाधिकार (प्रिव्हिलेज) किंवा नकार व सार्वजनिक जीवनातील उत्तरदायित्व या चार निकषांवर आधुनिकता तपासता येते. समाज कुठले तंत्रज्ञान वापरतो? किती वेगवान सुविधा उपभोगतो? उपभोगवादितेचं (कन्झ्युमेरिझम) प्रमाण किती आहे? यावरून काहीही लक्षात येत नाही. तंत्रज्ञान आणि उपभोगवाद म्हणजे आधुनिकता नव्हे. पेहरावामुळे मानसकिता बदलत नसते. भारतामध्ये आधुनिकतेचा खरा अर्थ लक्षात न घेता सुलभीकरण करीत तंत्रज्ञानाधारित उपकरणं, वस्तू बाळगण्यालाच (बहिरंगाला) आधुनिकता मानलं जात आहे.

आधुनिक समाजात समानता नांदत नसली आणि अनेक प्रकारचे वैविध्य असले, तरीही परस्परांची प्रतिष्ठा जपली जाते. त्यासाठी समानता ही मनातून स्वीकारली पाहिजे. तो मनोवृत्तीचा भागच झाला पाहिजे. आधुनिकतेचा पायाच मुळी समान संधी हा आहे. स्वतःच्या विकासाकरिता सर्वांना समान संधी मिळू लागणे हा इतिहासातील क्रांतिकारक टप्पा होता. सरंजामी रचनेमध्ये राज्यकर्तेच सर्वेसर्वा होते. त्या व्यवस्थेत नागरिकांना अजिबात स्थान नव्हते. आधुनिक समाजात नागरिकत्व मागता येते. फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा मंत्र दिला. खास लोकांपासून आम लोकांपर्यंत, बंदिस्ततेकडून खुल्या व्यवस्थेकडे वाटचाल झाली. ‘आपली प्रगती आपण करू या’, ही भावना रुजू लागली. एकमेकांना सहकार्य करून स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्याचे पर्व सुरू झाले. सामूहिकता हा आधुनिक जीवनाचा भक्कम पाया झाला. केवळ कायद्याने सर्व समान ठरले नाही, तर सहअनुभूती, सहभाग हा सार्वजनिक जीवनाचा आधार ठरला. असे परस्परसंबंध भारतामध्ये आढळत नाहीत. एकमेकांच्या कल्याणाकरिता आपली भूमिका महत्त्वाची आहे, ही भावना दिसत नाही. भारतीय उच्चभ्रू हे वंचितांचा यत्किंचितही विचार करत नाहीत. त्यांना सार्वजनिक सुविधांसाठी पैसा वा वेळ घालवायचा नाही. त्यांनी ‘स्वतःला समाजापासून अलग करण्याची प्रक्रिया म्हणजे आधुनिकीकरण’ असा अर्थ लावला आहे. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज रुग्णालयातील व्यवस्थापक व डॉक्टर तिथल्याच कर्मचारी, परिचारिका वा रुग्णांशी किती तुसडेपणाने वागतात? अद्ययावत तंत्रज्ञान हाताळणाऱ्या उद्योगसमूहातील निर्णयप्रक्रिया अगदी जुनाट सरंजामी धाटणीची असते. आदेश वरून खाली एका दिशेनेच जात राहतात. खालून वर काही सुचवण्याची सोय नसते.

भारतात उच्चवर्गीय स्वतःला मध्यमवर्गीय म्हणवून घेतात. पाश्चात्त्य देशांत मध्यमवर्गीय खऱ्या अर्थाने मध्यम स्तरावर असतात. एकंदर लोकसंख्या जवळपास मध्यमवर्गीय असते. त्यांचा वर्गीय स्तर त्यांच्या खरेदीवरून अथवा उपभोगावरून ठरत नाही, तर मध्यमवर्गीय त्यांच्या अभिव्यक्तीवरून ओळखले जातात. समाजातील घडणाऱ्या कुठल्याही घटनेबद्दल ते जागरुकपणे प्रतिक्रिया व्यक्त करतात. सरंजामीला मूठमाती देऊन युरोपातील लोकशाही बळकट करण्याचे ऐतिहासिक कार्य सजग मध्यवर्गीयांनीच केले होते. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील स्व-केंद्रित व मिजासखोर मध्यमवर्गीयांचे अधःपतन ठळकपणे जाणवते. आपल्याला ‘अभिजन’ समजणारा व ‘अभिजन’ होऊन धन्य होणाऱ्या मध्यमवर्गाची मानसिकता इतरांना तुच्छ लेखण्याची आहे.

दारिद्र्य हे आपल्या सार्वजनिक आयुष्याचे कडवट सत्य आहे. दारिद्र्य ही संकल्पना विपुलता, समृद्धीच्या विरुद्धार्थी एवढीच नाही. दारिद्र्य केवळ साधनांपुरतेच नसते. जगातील कित्येक सुखांपासून लोक वंचित असतात. माहिती आणि ज्ञान, अनुभव आणि क्षमता, प्रेम आणि आपुलकीपासून ते दूर राहतात. बेसुमार जंगलतोड करून लाकूड वापरणारेच आदिवासींना भिकेला लावतात. त्यांच्या दारिद्र्याला आपणच जबाबदार असतो. त्यांना स्वाभिमानाने जगवण्याची, उद्योगी व स्वयंपूर्ण करण्याची निकड आपलीच असली पाहिजे. आपला आराम, आपली चंगळ ही गरिबांच्या श्रमामुळे पोसली जात आहे. या सत्याला सामोरे जाण्याची आपली तयारी नसते. भारतामधील जगण्याची श्रीमंत शैली ही आर्थिक परिस्थितीमुळे नसून, ती सहज उपलब्ध स्वस्त मजुरांमुळे आहे. देशातील सुमारे १२ कोटी धनवानांचा भार कोट्यवधी मजुरांना सहन करावा लागतो. या कष्टकऱ्यांचे कुपोषण, भूक व हलाखीचा नायनाट करण्याचा, गरिबांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा विचार त्यांना शिवतदेखील नाही. सत्तेच्या केंद्रात आपले स्व-हितसंबंध तयार करणे व जोपासणे, कौटुंबिक संबंधांचा वापर करून घेणे आणि तहेत-हेचे विशेष लाभ (अधिकार असल्याच्या थाटात) पदरात पाडून घेणे, हेच मध्यमवर्गीयांचे स्वप्न व उद्दिष्ट असते. त्यांना सार्वजनिक आयुष्य, सार्वजनिक संस्था यांच्याविषयी घृणा वाटते. व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल त्यांना काही देणेघेणे नाही. ते टोकाचे व्यक्तिवादी (इंडिव्हिज्युऍलिस्ट) असतात. ‘गरीब हेच त्यांच्या गरिबीला कारणीभूत आहेत.’ त्यांना शिक्षण नको. स्वच्छता पाळत नाहीत. अंघोळ करत नाहीत. सेवाभावी संस्था त्यांच्यासाठी काही का करत नाहीत? सरकार त्यांच्यासाठी आमच्याकडून कर घेत राहते.’ ही त्यांची भावना असते. खरे तर भारतीय मध्यमवर्गीयांना आधुनिकता नकोशीच आहे. आधुनिकपूर्वकाळातील सर्व विलास उपभोगायला मिळत असल्याने आधुनिकतेची मूल्ये रुजविण्यामधला खरा अडसर मध्यमवर्गच आहे.

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या व्यक्ती गल्लीबोळांत दिसतात. मुख्यतः राहण्याची, खाण्या-पिण्याची ती नक्कल असते. इन्स्टाग्राम चॅटिंग-पिझ्झा-पेप्सी-जीन-शरीरावर टॅटू अशा पाश्चात्त्यांमधील मूर्खपणाच्या अंधानुकरणाला पाश्चात्त्यीकरण मानले जाते. सदान् कदा छोट्या पडद्यावरून स्व-प्रदर्शन करणे, ‘अंगठे’ दाखवणे, ते मोजत राहणे, ते ‘ज्ञान’ पुढच्यांना पाठवत राहण्याला ‘काळानुरूप’ ठरवले जाते. सर्वांना समान अधिकार, समान आदर हा पाश्चात्त्यीकरणाचा गाभा आहे. सार्वजनिक जीवनातील नियम पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ कायद्याचे बंधन म्हणून नाही; तर ते समाजमनाने स्वीकारले आहे. या अर्थाने ती वैचारिक संकल्पना आहे. याउलट, आपल्याकडे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात प्रचंड तफावत आढळते. तिकडे ‘पोलीस असो वा नसो, सिग्नल तोडू नये,’ हा संकेत सर्वांनी मनापासून स्वीकारला आहे. आपल्याकडे असे नियम तोडण्याला भूषण ठरवले जाते.

याउलट, आपल्याकडे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात प्रचंड तफावत आढळते. सोवळ्यासंबंधीच्या कितीतरी रीती शतकांपासून चालत आल्या आहेत. त्या स्वच्छतेशी व पावित्र्याशी जोडलेल्या आहेत. स्नान-शौचास कुठे जावे? ‘घाण’ काढण्याच्या सर्व प्रक्रिया ‘घरा’बाहेर कराव्यात. न्हाणीघर हे स्वयंपाकघर व देवघरापासून दूर असावे. स्वयंपाकघरातील स्वच्छतेला अतोनात महत्त्व आहे. (युरोपात ड्रॉइंग रूमला ते स्थान आहे.) घाण काढणारे, सफाई करणारे अपवित्र-अस्पृश्य आहेत. हा वर्णभेद त्याच्याशी निगडित आहे. श्रम टाळण्यासाठीची आणि लादण्यासाठीची ती चलाखी होती. अंगवस्त्र व गणिकांशी शरीरसंबंध ठेवताना हे सोवळे आड येत नसे. (युरोपात इतर प्रसंगी हेटाळलेल्या कृष्णवर्णीय महिलांची स्वयंपाक करण्यासाठी; इतकेच नव्हे तर, तान्ह्या बाळाला पाजण्यासाठीही मदत घेतली जायची.)

भारतात स्वच्छता ही निवडक असते. वैयक्तिक जीवनातील स्वच्छतेचा आग्रह सार्वजनिक आयुष्यात अजिबात नसतो. स्वतःच्या घरातसुद्धा स्वयंपाकघराची स्वच्छता न्हाणीघर वा संडासात आढळेल असे नाही. स्वतःच्या घराला स्वच्छ ठेवून सगळी घाण घराबाहेर टाकण्यात कसलाही संकोच वाटत नाही. संडास उपलब्ध नसल्यामुळे कोट्यवधींना उघड्यावर बसावे लागते. सध्या आशिया खंडातील कुठल्याही तिघांपैकी एकाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. निम्या आशियायी नागरिकांना संडासांची सोय नाही. दरवर्षी गरीब देशांतील दोन कोटी बालके दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांमुळे दगावतात.

प्रो. गुप्ता म्हणतात, ‘इस्लाम वा ख्रिश्चन धर्मासारखी हिंदू धर्मात सामूहिकतेची गरज कधीच भासत नाही. संतांनी भक्तिसंप्रदाय स्थापून सर्व जातींना एकत्र नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अशा सामूहिकीकरणाला गरीब व कष्टकरी जनतेने मनापासून स्वीकारले. परंतु ‘अभिजन’ वर्ग कटाक्षाने दूर राहिला. मागील ३० वर्षांपासून चिमुकल्या पंथांची संख्या वरचेवर वाढत आहे. नवनव्या प्रवचनकारांना राष्ट्रीय संत, महाराज संबोधले जात आहे. त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी दाटत आहे. ही नेमकी कुणाची मानसिक गरज आहे? याकडे मध्यम व उच्चवर्गीयांचा ओढा आहे. गुरूच्या अत्यंत निकट असावे. पापक्षालन होऊन त्यांच्या सहवासात आपले घर पवित्र व्हावे, मोक्षप्राप्तीसाठी या ‘शॉर्ट कट’ची धनिकांना विलक्षण आस असते. कित्येक कोट्यधीश, उच्चपदस्थ, सिनेमंडळी यांना महत्त्वाचा निर्णय, शुभकार्य, कठीण प्रसंग यांतून तरुन जाण्याकरिता गुरूंची वा महाराजांची भेट अत्यावश्यक वाटत असते. त्याशिवाय महाराजांच्या जितके जवळ जाता येईल, तितकी त्यांची प्रतिष्ठा उंचावली जाते. त्यातून स्पर्धा निर्माण होते. ‘महाराजांनी’ कोणत्या भक्ताकडे वास्तव्य करावे याकरिता बोली बोलली जाते. हे भक्त महाराजांच्या प्रवचनाचे भव्य आयोजन करतात. त्यांनी स्वतःच्या दूरचित्रवाणी वाहिन्या सुरू केल्या आहेत. त्यांची एक स्वतंत्र मार्केटिंग यंत्रणा तयार झाली आहे. ह्या सर्व ‘व्यवहारात’ उच्चवर्गीयांचे हितसंबंध जोपासले जातात. जातीचे भेदभाव, उच्चनीचता, वर्गीय भेद या कुठल्याच अहंकाराला बाधा पोहोचत नाही, तरी समाजमान्यता मिळाल्याचा भास होतो. हजारोंच्या गर्दीला एकत्र आणल्याचे समाधान लाभते. भारत व जपानमध्ये या प्रकारच्या पंथांचा सुळसुळाट झाला आहे. या प्रकारात मध्यमवर्ग भरडला जात आहे.’

अपूर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये.